फॉलोअर

१९ मार्च २०१६

सोळावं वरीस मोक्याचं

सोळावं वरीस मोक्याचं
आकरावीचे काॅलेज सुरू झाल्यानंतर महीना दिड महिन्यात मला आलेला अनुभव मी काल शेअर केला. जवानीत गाढवीण सुद्धा सुंदर दिसते, आपण तिच्या मागे लागायचे नसते.  योग्य वेळी योग्य गोष्टी करायला हव्यात, करायच्या असतात. या शब्दरूपी शस्रानी मला समजून सांगणारे, बरं करणारे गुरू मला भेटले म्हणून आयुष्यातील तो दिवस माझ्या साठी टर्निंग पाॅईंट ठरला. थोरात मॅडम यांनी मला मंत्र दिला,  इथे ज्या कामासाठी आला आहे तेच करा. ते काम कोणते तर अभ्यास करायचे, शिकायचे, चांगल्या मार्काने पास व्हायचे, करियर करायचे, स्वतःच्या पायावर उभे रहायचे. हे सर्व करण्यासाठी आपण आपले लक्ष या गोष्टीवर  केंद्रित केले पाहिजे. जी गोष्ट अनेकांनी सांगून मी मनावर घेतली नसती ती एका अनुभवाने, तेजस्वी सल्ल्याने मला शक्य झाली.

तेरा ते एकोणीस Thirteen To Nineteen ही सात वर्षे  नाजुक असतात.  मानसशास्त्रज्ञ याला  TEEN AGE असे म्हणतात. आमचे ओगलेवाडीचे सय्यद सर म्हणायचे, ' या टीन वयात ज्याने संयम ठेवला, लक्क्ष्यावर लक्ष केंद्रित केले तो आयुष्याच्या परिक्षेत कधीच फेल होणार नाही '  काय काय शक्य असते या वयात असा प्रश्न कोणी विचारला तर मी म्हणेन काय  काय शक्य नाही या वयात. आपल्याकडच्या शिक्षण पद्धती नुसार या वयात आठवी ते बारावी हा महत्त्वाचा काळ असतो.  या दरम्यान दहावी  आणि बारावी  अशा दोन महत्वाच्या परिक्षांना आपण सामोरे जात असतो. आठवी नववीचे कोवळे वय काही तरी नवीन शोधत असते . घरातील व्यक्तीं पेक्षा बाहेरच्या लोकाचे, मित्रमंडळीचे बरे वाटते आणि नवनवीन शोध करण्याचे वेध लागतात. एकटे बाहेर जाऊ वाटते,  शारीरिक बदल होतात,  काही गोष्टी समजत नाहीत. समजून सांगणारे चांगले मित्र,  सल्लागार भेटले नाहीत तर 'बालक पालक' मधील पोरांसारखी अवस्था होते. माझ्या काळात बरीच माहिती आम्हाला मिळाली नव्हती, कोण सांगत पण नव्हते, मात्र आजची ANDROID परिस्थिती खुप वेगळी आणि गंभीर आहे. मला खुप चांगले मित्र आणि आईवडिलांचे संस्कार मिळाले , करवडी सारख्या अध्यात्मिक वातावरण असलेल्या गावांमध्ये रहाण्याचे भाग्य लाभले.

पंधरा किंवा सोळाव्या वर्षी दहावीचे महत्वाचे वर्ष असते. सोळाव्या वर्षी खुप मोठ्ठे कार्य करणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या भुमित महाराष्ट्रात आपण रहातो, हे काय कमी आहे ! ज्या वयात नवे नवे अंकुर फुटत असतात, नवी क्षितिजे खुणावत असतात त्याच मार्गावर  आपण जायला हवे.  ही क्षितिजे ( टेकड्या नव्हे) खुप विस्तीर्ण  आहेत, असतात . त्या दिशेने वाटचाल केली तर आयुष्य सुंदर होऊ शकते, याची जाणीव झाली पाहिजे. आपल्याकडे सोळावं वरीस धोक्याचं असे म्हणतात. चांगले मित्र, चांगले सहकारी, चांगले विचार, चांगले साहित्य, चांगले शिक्षक या काळात मिळाले नाहीत तर खरंच हे वय धोकादायक आहे.  वहात जाणार्‍या पाण्यात चांगले वाईट सर्व काही मिसळते. आपली धारा, धारणा , ध्यान योग्य दिशेने असली की चुकीचे काम होणारच नाही. असे म्हणतात आपण कोणतीही चुकीची गोष्ट, काम,  विचार करत  असतो तेव्हा आतून एक आवाज येतो. तो आवाज सांगतो तू जे करतो आहे ते बरोबर नाही. ज्यांना हा आवाज  ऐकू येतो,  पटतो तो कधीच वाईट मार्गाने जात नाही. मात्र हा  आवाज  ऐकू येऊ नये म्हणून भुलवणारे अनेक भोवरे तुमच्या कानाभोवती भुंग भुंग करत  असतात. त्यांना बाजूला काढून टाका. ते करण्यासाठी चांगले साहित्य वाचायला हवे.  मला माझ्या आयुष्याच्या या कठीण काळात आकरावी-बारावीत ययाती आणि मृत्युंजय या दोन महान कलाकृती वाचायला मिळाल्या.  या कादंबरीचे वाचन करताना मी नोटस् काढल्या होत्या.  त्यामधील दिव्य विचार आणि सकस, समृद्ध विचाराचे सोबती, सल्लागार, भाऊ,  अध्यात्मिक गुरू यामुळे मी नेहमी रूळावर राहीलो.

सोळाव्या वर्षी खुप काही करता येत. या काळात करवडी मध्ये माझी दोन ज्ञानेश्वरी पारायणे झाली होती. वाचन केले होते, समजले किती माहिती नाही, पण ज्ञान काय असते याचा स्पर्श  होऊन गेला होता. पसायदानाचे आकर्षण लागले. आकरावी मध्ये चांगले मार्क मिळाले. बारावीच्या परीक्षेत चांगले यश मिळाले. काही वाईट वळणे लागली नाहीत. एक चहा आणि एक क्रिमरोल चौघात शेअर करणारे मित्र लाभले .काल मी जो अनुभव कथन केला त्यावरून  अनेक मित्रांचे फोन आले , काही पालकांनी पण फोन केला.  त्यांनी ही गोष्ट त्याच्या  आकरावी बारावी मधील मुलांना दाखवली. मुलांना कसे सांगणार असा प्रश्न पडलेल्या एका पालकांनी माझे आभार मानले. आपल्याला आलेले अनुभव शेअर करणे, त्यातून दुसर्‍याचा फायदा होणे यासाठीच तर हा खटाटोप!


                                                                                                                              सतीश मोरे


१८ मार्च २०१६

जवानीत गाढवीण सुंदर दिसते

जवानीत गाढवीण सुद्धा सुंदर दिसते

1988 मध्ये टिळक हायस्कूल मध्ये दहावी परीक्षा पास झालो. 1982 ते 1988 माझ्या शालेय जीवनातील संस्कारमय खुप आठवणी आहेत. योग्य वेळी त्याही सांगणार  आहे.  दहावी नंतर कोणत्या साईटला जायचे, काय करायचे हे सांगायला तेव्हा जवळचे असे कोणी नव्हते. मित्र, शेजारी किंवा शिक्षक म्हणतील तसे करायचे. सायन्स साईडचे तेव्हा फार आकर्षण होते.  डिसेक्शन बाॅक्स, मोठे प्रॅक्टीकल जनरल, पुस्तके घेऊन जाणारी सायन्सची पोरं लय हुशार अशी इमेज होती. आम्हाला पण कुणीतरी सांगितले, सायन्स लय भारी, नोकरी मिळते, डाॅक्टर  इंजिनिअर होता येते. तु हुशार आहे, घे सायन्स( खरंच त्यावेळी 70 -80 % वाल्यांना हुशार समजत होते) स्वतः गेलो सदगुरू गाडगे महाराज काॅलेजमध्ये, प्राॅसपेक्ट आणले. घरी आल्यावर सांगितले मी सायन्स घेणार आहे. पाचवी सहावी पासून स्वावलंबन आणि स्वंयंनिर्णय ही शिकवण देणार्‍या माझ्या आदरणीय वडीलांनी (दादांनी) हा ही निर्णय तुच घे, तुला योग्य वाटेल ती साईट घे, पण ज्या क्षेत्रात जाशील तिथे टाॅपवर जा असा सल्ला दिला.



काॅलेजमध्ये आल्यानंतर माझ्या आयुष्यातील एक अविस्मरणीय अनुभव मला आज सांगायचा  आहे.  प्रत्येक दिवस हा नवा  धडा घेऊन येतो, काहीतरी शिकवून जातो. दहावी, आकरावीचे वय वेगळेच असते . X Y आकर्षण, प्रेम ,नवी उमेद, नवे नवे काही तरी शोधण्याची जिज्ञासा गप्प बसून देत नाही. सदगुरू गाडगे महाराज काॅलेजला अॅडमिशन घेणारी पोरं ग्रामीण भागातील, सुमार , रांगडी, कुठे मिळेना तर  इथे नक्की प्रवेश मिळणार , असे हे महाविद्यालय. इतर काॅलेजची पोरं आमच्या काॅलेजला गाडगे महाराजांचा मठ म्हणायचे ! खरंच तेव्हा सारं भकास होते तिथे. साधी राहणी असलेली आमच्या सारखी खेडेगावातून आलेली पोरं, साध्या पिशवीत घालून पुस्तके, वह्या घेऊन आलेली. अशा मठात आमचे सायन्स शिक्षण सुरू झाले.

आकरावीचे वर्ग सुरू झाले. माझ्या वर्गात साठ सत्तर पोरं आणि सहा पोरी. मुली त्या पण खेड्यातून  आलेल्या. पैकी दोघीचे वडील याच काॅलेजमध्ये प्राध्यापक होते म्हणून त्या इथे होत्या. आम्ही आमच्या समान सवयीचा, स्टाईलचा, खेड्यातला ग्रुप तयार केला नव्हे आपोआप झाला, जुलै महिन्यात प्रॅक्टीकलसाठी आमच्या बायोलॉजि लॅबमध्ये आम्ही जमलो होतो. डिसेक्शन बाॅक्स, जनरल नोटबुक नवीन आणली होती. प्रत्येकजण आपल्या हातात ते बाॅक्स घेऊन लॅबमध्ये आला. आज काही तरी नवीन शिकायला मिळणार अशी सर्वाना  उत्तुकता होती. थोरात मॅडमनी दोघात एक असे वाटप करून एक झुरळ (काॅकरोच) घ्यायला सांगितले. शिपायांनी झुरळे वाटली. (सायन्स केलेल्या लोकांना हे माहिती आहे तेव्हा झुरळे कशी मारली जायची, उंदरे कशी पकडली जायची. तेव्हा परवानगी होती. आता मनेका गांधी यांच्या दबावामुळे सर्व प्राणी डिसेक्शन बंद आहे )

ज्या झुरळाला पाहून महिला, पोरी, स्त्रिया ई~ई~ई~ई~ई~ई करतात ती झुरळे वाटप सुरू झाली की आमच्या वर्गातल्या पोरींची चुळबुळ सुरू झाली.  इन बीन सहा पोरी त्यांना कोण सांगणार. मॅडमनी दम दिल्यावर त्यापुढे आल्या. झुरळ ताब्यात घेतले .आम्ही पण घेतले.  सुचने प्रमाणे काम सुरू झाले.  मॅडम सांगत होत्या आणि आम्ही करत होतो.  या दरम्यान माझे लक्ष एका मुलीकडे गेले. तिची मैत्रीण डिसेक्शन करत होती व ती फक्त पहात होती. सोळा वयाचा जादुई आकडा सर्वात धोकादायक असतो असं म्हणतात.  इंग्रजीत आकरा ते एकोणीस या वयाला TEEN AGE म्हणतात.  या वयाने तिला पहायला सुरुवात केली. माझे सारे लक्ष तिच्याकडे होते, तिचे डिसेक्शनकडे होते.  माझा सहकारी मित्र मला सांगत होता, शस्त्र instruments मागत होता, मी (माझे शरीर ) देत होतो, पण मन मात्र तिच्याकडे होते.  पाच दहा मिनिटे हे सर्व सुरू असेल. माझी तंद्री लागली होती. अचानक मला मित्रांनी हलवलं, मोरे जावा तुम्हाला मॅडम बोलवत आहेत. माझी तंद्री तुटली. घाबरत घाबरत थोरात मॅडम जवळ जाऊन मान खाली घालून उभा राहिलो.

मोरे, काय करत होता, मॅडमनी विचारले.
काही नाही मॅडम प्रॅक्टीकल करत होतो, डिसेक्शन करत होतो... मी
खरं सांगा, मोरे?
मॅडम, काही नाही करत होतो...मी
तुमचं प्रॅक्टीकल सुरू होतं की प्रॅक्टीस? माझे लक्ष होतं, तुमच्याकडे!

मी काय करत होतो,नक्की काय चालले होते हे मॅडमनी पाहीले होते, ओळखले होते.
मी चुक मान्य केली. त्यांनापण ते आवडले.

' मोरे, ज्या कामासाठी इथे आला आहे, तेच काम करा.आणि हे लक्षात ठेवा,
 जवानीत गाढवीण सुद्धा सुंदर दिसते.आयुष्यभर पुन्हा हेच करायचे आहे. जावा आता '

चक्कीत जाळ झाला, काजवे चमकले. मी पुर्ण ब्ल्नॅक झालो होतो. ते शब्द कानावर हल्ला करत होते. आयुष्याचा एक उत्कृष्ट धडा त्यादिवशी मी शिकलो. त्यानंतरकाॅलेज पुर्ण होईपर्यंत आजपर्यंत हे वाक्य लक्षात आहे. पुढे मी त्या मॅडमचा लाडका विद्यार्थी झालो. मुलाना कसे समजावून सांगायचे हा प्रश्न आज आम्हाला पडतो. त्यावेळी थोरात मॅडमनी शब्दरूपी शस्त्राने वार करून मला जखमी नव्हे बरे केले होते.




                                                                                                                  ......सतीश मोरे





१६ मार्च २०१६

मी कोण?

मोठ्ठा माणुस छोटा विचार 






जगाचा पसारा खुप मोठ्ठा आहे . इथे माणुस म्हटलं तर फार मोठा नाहीतर खुप छोटा आहे . करवडी सारख्या छोट्या खेडेगावात मी वाढलो, मोठ्ठा झालो. गाव जितके लहान तितके विचार लहान पण व्यक्ती मात्र खुप महान असतात. माझ्या गावासारखे दुसरे गाव नाही असे अजुनही वाटते. गावातील प्रत्येक व्यक्ती गावातील इतर व्यक्तींना ओळखते, घराघरांत त्याचे येणे जाणे असते. पुर्वी साधन संपत्ती, दळणवळणाची साधने उपलब्ध नव्हती. मात्र संपर्क खुप होता.

गावात चांगले, वाईट काही झाले तरी गावाला कळते. ट्रक घेतला काय आणि सायकल घेतली, चर्चा तेवढीच. मला आठवतं गावात एखाद्याने हरक्युलस सायकल जरी घेतली तरी त्याची चर्चा गावभर व्हायची.सायकल कुठून घेतली, कितीला घेतली, कशी आणली, किती छान आहे, घंटी कसली आहे, डायनामा आहे का, ती कशी दिसते इथपासून उंची किती आहे , टायर कसला आहे याबाबत गावभर गप्पा रंगायच्या. गावातील राहणीमान पद्धती, दुसर्‍याची चौकशी करून माहिती काढणे लय भारी असतं.


गावातील लोकांना पारावर गप्पा मारायला खुप आवडतात. दिवसभर शेतात काम करून कंटाळून आलेला तो घरी येतो. स्वयंपाक होईपर्यंत याच आवडतं ठिकाण म्हणजे पार. तिथं त्याचे जोडीदार अगोदरच येऊन बसलेले असतात. पारावरच्या गप्पाची एक पद्धत असते. गप्पा मारता मारता एखादा नवा माणूस आला की त्याला बरोबर  नवीन विषय सुरू, मग ह्याचं काय चाललंय, त्याचं काय, त्याने नवीन काय केले, त्याचं काय,  त्याला काय कळतंय अशी मापं काढत विषय एखाद्या खाजगी विषयावर येतो. मग आणखी खाजगी ! ही चर्चा सुरू असताना एखादा माणूस निघून गेला की त्याच्या विषयी चर्चा सुरू होते.

पारावरच्या गप्पात गावाबाहेर असलेल्या गावातील मोठ्या व्यक्तीचा विषय निघाला की 'आरं त्याला कितीही मोठा होऊ दे , एक दिवस गावातच यायचं आहे,'असे बोलले जाते. माणूस कितीही मोठा झाला तरी शेवटच्या दिवशी त्याला गावातचं आणले जाते, कुठेही गेला तरी तो गाव विसरत नाही. गावाबाहेर गेलेला माणूस गावाचे नाव राज्यभर, देशभर, जगभर करत असतो. तरीही त्याचं मोठ्ठपन मान्य नाही करणारा पारावरचा आगळावेगळा युक्तिवाद मला नेहमी भंडावून सोडतो.


जगाच्या पसार्‍यात माणुस किती तरी छोटा आहे, त्याचे विश्व खुप लहान आहे, त्याचे विचार तरी त्याहून लहान  आहेत, असे असताना  तो माणूस स्वःतला  गावपातळीवर  आणून स्वःतला आणखी लहान का करतो? गावाबाहेर गेलेला माणूस गावाचे नाव राज्यभर, देशभर, जगभर करत असतो. माणूस तालुक्याचे ठिकाणी  गेला तर त्याला पहिल्यांदा त्याचे गाव विचारले जाते. आणखी पुढे जाऊन अंदाज घेऊन,आडनाव विचारून मग तुम्ही कुणापैकी हा प्रश्न हमखास विचारला जातो. पावणं कुठलं गाव? हे विचारले की मी करवडीचा हे उत्तर आले की हिकडं कुठे आला,  कुणाचं पाहुणं, नाव काय हे प्रश्न येत रहातात. हीच व्यक्ती जेव्हा जिल्ह्य़ात जाते तेव्हा ती गावची ओळख सांगत नाही, तालुक्याचं नाव सांगते. जसजसे वर वर जाऊ तसे गावाचे नाव खुप मागे पडते.

मी करवडीचा, मी कराडचा, मी सातारचा, मी घाटावरचा, मी कोकणातला, मी विदर्भातला, मी मराठवाडय़ातला, मी पश्चिम महाराष्ट्राचा, मी महाराष्ट्राचा आणि सर्वात शेवटी मी भारताचा अशी ओळख होते. मी भारतीय आहे ही ओळख करून द्यायला मला भारताबाहेर जावे लागते. भारतात मला कोणीच भारतीय म्हणून बोलवत नाही. भारतात मी भारतीय का होऊ शकत नाही? कधी मी गोंधळात पडतो मी कोण?

  
नाव सांगितले तर तु कुणाच्या घरातल्या, कुणाचा पोरगा, वरच्या घरातला की खालचा, यांचा पाहुणा की त्यांचा मेव्हणा, मग तुझी सासुरवाडी कोणती? आजोळ कोणते? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जातात? आडनाव आले की ठरवले जाते, या आडनावाची भावकी कोणती? जात कोणती? त्याची गावात घरं किती? पाहुणेपै कोणत्या गावात आहेत? भावकी मोठी असेल तर कोणत्या वाड्यातला? बुडखा कोणता? गावात  एकटं घर असेल तर दत्तक आहे का उपरा आहे ? अशा  किती तरी विषयावर त्याला भंडावून सोडले जाते. किती खालच्या पातळीवर जाऊन चौकशी केली जाईल याचा नेम नाही. गावातील लोकांच्या या विचार पद्धतीमुळे मी चक्रावून जातो आणि हे शब्द बाहेर पडतात.







मी कोण?
मी सतीश मोरे
माझे गाव करवडी
राहतो कराडात
पण मला सगळे म्हणतात 
..................करवडीकर

मी जेव्हा सातारला जातो
तेव्हा ते मला कराडकर म्हणतात
मी जेव्हा मुंबईला जातो
तेव्हा ते मला सातारकर म्हणतात.
सांगाना मी कोण?

मी विदर्भात जातो, 
जेव्हा मी मराठवाडय़ात जातो 
तेव्हा ते मला पश्चिम महाराष्ट्राचा म्हणतात
मी कोकणात जातो
तेव्हा ते मला घाटावरचा म्हणतात 
सांगाना मी कोण ?

मी जेव्हा दिल्लीला जातो
मी जेव्हा सुरतला जातो
मी जेव्हा कलकत्त्यात जातो 
मी जेव्हा पंजाबला जातो
तेव्हा ते मला महाराष्ट्रीयन म्हणतात 
सांगाना मी कोण?

मी जेव्हा अमेरिकेत जातो
मी जेव्हा दुबईला जातो
मी जेव्हा जपानला जातो
मी जेव्हा जगात कुठेही जातो
तेव्हा मला इंडीयन म्हणतात 
सांगाना मी कोण?

प्लीज मला कोणी सांगेल का 
मी कोण?

                ..........कनफ्युज्ड ?



                                                               ......................सतीश मोरे   







१५ मार्च २०१६

सातारची पारशी विहीर आणि उंची चपला

सातारची पारशी विहीर आणि उंची चपला


आठवी नववीत असताना 1987 - 88 मध्ये सातारला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिबीरात सहभागी होण्याचा योग आला होता. नवनवीन शिकायचे, गावाला जायचे, तिथे काहीतरी वेगळे पहायचे, नवे मित्र जोडायचे, असे ते दिवस होते. शिबिरात तंबूत रहायचा वेगळा आनंद होता. हे शिबिर सातारच्या बाहेर डोंगराच्या पायथ्याशी जिथे होते त्या डोंगरावर उंचावर पारशी लोकांची दफनभूमी विहीर आहे. ती विहीर पहायला आम्ही सवंगडी गेलो.

पारशी समाजाची व्यक्ती मृत्यू पावल्यावर या विहिरीत त्याचा मृतदेह टाकला जातो. तो देह प्राणी, किडे, मुंगी यांना भोजन म्हणून कामी यावा , मृत्यूनंतर आपला देह कुणाच्या तरी कामी यावा , अशी या समाजाची भावना, मानसिकता आहे. आम्ही त्या विहिरीजवळ पोहचलो.  ती विहीर पाहून भिती वाटली होती. त्या परिसरात घारी, घुबड फिरत होती. खुप दुर्गंधी होती. मृत्यू नंतर शरिर  असे फेकले जाते,  या कल्पनेनेच अंगाला घाम फुटला.

दरम्यान आमच्यातल्या एका सिनिअरने त्याला वेगळा संदर्भ देत जीवो जीवस्य जीवनम् , शरीर नाशवंत असते, इतरांसाठी काही तरी करतो तोच खरा माणुस वगैरे लेक्चर दिले,असे सांगून वेळ मारून नेली. मृत्यूबाबत मनात उमटलेल्या भावना भिती काही काळ दूर झाली. आम्ही परत खाली शिबिरात  आलो.

शिबिरात सहभागी काही जणांना आम्ही हा प्रकार सांगितला. काही जण कशाला तिकडे गेला होता म्हणून रागावले. दुसर्‍या दिवशी सकाळी उठलो तेव्हा पुन्हा त्या लांबवर असलेल्या विहिरी कडे माझे पुन्हा लक्ष गेले. बरोबर असणार्‍या मुलांनी कशाला तिकडे बघतोस, चल असे म्हणत शिबिर प्रमुखांच्या मुख्य  तंबूकडे नेले. त्याठिकाणी बाहेर उंचावर टेबलावर एक फळा लावला होता. त्यावर सुवाच्य अक्षरात खडूने एक सुविचार लिहला होता. तो सुविचार मोठ्याने वाचा दाखवा असे प्रमुखांनी सांगितले.

' माझ्या पायात उंची चपला नव्हत्या 
म्हणून मी माझ्या बाबांकडे तक्रार करत होतो,
पण एकदा मी रस्त्यावर पायच नसलेला माणूस पाहीला 
आणि माझी तक्रार पळून गेली '

दोन तीन वेळा हा सुविचार वाचला तेव्हा थोडाफार समजला. तिथे उपस्थित सरांनी आम्हाला त्याचा अर्थ विचारला. आम्ही आमच्या परीने काही तरी सांगीतले. सर म्हणाले,' खरंच आपण खुप  सुखी आहे. आपल्याला हात पाय आहेत, पाय भाजू नये म्हणून घालायला चप्पल पण आहे. तरीही आपण तक्रार करतो, मला हे नाही, ते नाही. जगात आपल्या पेक्षा कितीतरी लोक आहेत, ज्यांना पाय नाहीत.  तरीही ते जगत आहेत, काम करत आहेत, प्रयत्न करत आहेत, जीवन संघर्ष करत आहेत. आपण  सारे असूनही तक्रार करत आहे. हे सर्व पाहून मी काय करू शकतो? मला तर हात पाय आहेत, मग मी का रडत बसू ? चला  उठा कामाला लागा. '



सातारच्या शिबिरात अनुभवलेल्या या दोन्ही घटना माझ्या आयुष्यात आजपर्यंत  कोरलेल्या आहेत. स्वतः साठी काही करता येईल तेवढे मनुष्य करतोच , दुसर्‍यासाठी काय करता येईल ते करता आले पाहिजे. आपल्याकडे देण्यासारखे जे काही आहे ते दिले पाहिजे, देण्यात आनंद आहे, देणार्‍याने देत रहावे. काही देता येत नसेल तर शरीर रूपी सेवा देता येते. इतरांसाठी काहीतरी करता येत तेवढं करायचं असतं, हे मला पहिल्या प्रसंगाने सांगितले.

आपण आपली सद्य परिस्थिती स्वीकारली पाहीजे. परिस्थिती बदलण्याची तयारी केली पाहिजे. आपल्या कडे जे काही त्या सामग्रीचा फायदा, वापर करून परिस्थिती बदलली पाहिजे. रडत बसायचे नाही, जे आहे ते स्वीकारून पुढे जायचे. रडायचे नाही, लढायचे. आपल्याला दु:ख जास्त आहे असे वाटले तर आपल्यापेक्षा जास्त दु:खी व्यक्ती कडे पहा,
हे मला त्या सुविचाराने शिकवले.

दुनियामे कितना गम है, मेरा गम कितना कम है 
लोगो का गम देखा तो मै अपना गम भुल गया

अमृत चित्रपटातील हे गाणे सुद्धा बरंच काही सांगून जाते.

 ' चला हवा येऊ द्या ' कार्यक्रमात लातूर येथील आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महीलेची कहाणी ऐकली.
तिने व्यक्त केलेल्या अडचणी, दु:ख ऐकून मला जाणवलं की आपण खरंच आपण खुप सुखी आहोत. त्या महिलेने पतीच्या निधनानंतर स्वतः ला सावरलेच, दुसर्‍याना पण आधार दिला. तिला असणारे दुःख पाहीले, ऐकले तेव्हा मला सहज सुचलं.

सहन होत नाही 
सांगता पण येत नाही 
दु:ख व्यक्त तरी कुणाकडं करायचं
इथं माझ्यापेक्षा दु:ख्खी खुप आहेत !

दोन टाईम खातुया चार टाईम पितुया
खाल्ल्यालं पचवायचं की पचवायला खायचं
पोट भरतंय पण मन भरत नाही 
पण सांगायचं तरी कुणाला 
इथं माझ्यापेक्षा दु:ख्खी खुप आहेत  !

बसायला एसी अन फिरायला कार
जिथं जाईल तिथं होते माझी सोय 
तरी पण समाधान काय होत नाही
पण करायचं काय, बोलायचं कुणाला
इथं माझ्यापेक्षा दु:ख्खी खुप आहेत  !

दिवसभर काम करतोय, रात्रीबी राबतो
पैसा कमवला पण सुख काय मिळना
सारं मिळतंय, पण भोगायला वेळ मिळना
सारं सांगायचं आहे ,पण कुणापुढे सांगु
इथं माझ्यापेक्षा दु:ख्खी खुप आहेत !

                    ...............सतीश मोरे.














१४ मार्च २०१६

सदाशिवगड सच्चा शिवभक्त

सदाशिवगड गडावरचा सच्चा शिवभक्त

सात मार्चला 2016 सदाशिवगडावर जाण्याचा योग आला. सदाशिवगड आणि माझे नाते,  येणेजाणे 30-35 वर्षापासून आहे. चौथी पर्यंत शालेय शिक्षण करवडीच्या जीवन शिक्षण विद्या मंदीरात झाले.  श्रावण महिना सुरू झाला की आम्हाला वेध लागायचे गडावर जाण्याचे. रोज सकाळी उठून घराबाहेर  आलो की पहीले दर्शन सदाशिवगडाचे. 1980 - 85 च्या दरम्यान गडावर वीज कनेक्शन नेले असावे.  हजारमाचीचा पायथा ते गडाच्या टोकाला ते सदाशिव मंदीर  असे लाईटींग झाले होते.  रात्रीच्या वेळी गडावर जाण्यासाठी ही चांगली सोय झाली होती.  याचा दुसरा फायदा मात्र परिसरातील गावांना व्हायचा. गडावर रात्री लाईट लागली की लोक वेळ सांगायचे.  साडे सहा वाजले, गडावरील बल्ब लागले.  काही ठिकाणी बल्ब गेला असेल तर त्याची पण लोक लांबून चर्चा करायचे. करवडी,वाघेरी विरवडे,ओगलेवाडी, पार्ले, बनवडी गावातील लोकांसाठी गडावरील हे दिवे म्हणजे आकर्षण होते. आणि हो आमच्या गावातली लाईट गेली की आम्ही  घराबाहेर येऊन पहिल्यांदा गडावर लाईट आहे काय हे पहात  असू.  गावातील लाईट गेली अन् गडावर  आहे म्हणजे गावातच कुठेतरी फाॅल्ट झाला आहे आणि गावात पण लाईट नाही, गडावर पण लाईट नाही म्हणजे वरनंच लाईट गेलीआहे,  असा  आमचा अनुभव होता.

गडावरील या लाईट खांबाच्या रांगा, सदाशिवगड मंदीराचे शिखर आम्हाला रोज इकडे ये असे खुले निमंत्रण देत असे . श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी गडावर जायचेच असा माझ्या सहीत परिसरातील भक्त, शाळकरी मुलांचा अट्टाहास असायचा. शाळेतल्या सहली साठी सदाशिवगड हे मोस्ट फेवरेट पर्यटन स्थळ होते.  विना खर्च,  विना त्रास विना कटकट  अशी ही सहल होती.  सहली दिवशी सकाळी लवकर उठून आवरून, डबा घेऊन  तयार होऊन आम्ही शाळेत जायचो. करवडी ते सदाशिवगड ओळीत चालताना रस्त्यावरची वाहने पाहताना मजा यायची. गडावर चढताना गुरूजीच्या सुचना असायच्या, गडबड करायची नाही, पळायचे नाही. जसे जसे वर जाऊ तसे पायथ्याला असणारे हजारमाची गाव स्पष्ट दिसे. आणखी वर गेले की आसपासची गावे दिसायची, लांबवर कराड शहर  आणि नागमोडी कृष्णा नदी  आणि हिरवागार निसर्ग खुप छान दिसू लागे.  मग  आपले गाव कुठे आहे,  गावातले मंदीर दिसते काय,  खाली विटा, वडूज रस्त्यावरील वाहने पाहताना खुप मजा यायची.  सर्वात जास्त मजा यायची झुकझुक गाडी बघताना.  गडाच्या पायथ्याशी जवळच कराड रेल्वे स्थानकावर रेल्वे थांबायची, मग ती सुरू होऊन पुढे जायपर्यंत, डोळ्याआड होईपर्यंत  आम्ही बघत  होतो.  कुणीतरी मग रेल्वेचे डबे मोजायचा. मालगाडी आहे की प्रवासी गाडी आहे, हे सांगताना तो मला खुप कळते याचा आविर्भाव आणायचा.
खुप मजा, मस्ती करत कधी गडावर पोहचायचो ते कळत नव्हते. गडावर पोहचलो की मोकळे  पठार  आणि सदाशिव मंदिर पाहून डोळ्याचे पारणे फिटायचे. देवदर्शन झाल्यावर पठारावर फेरफटका मारून मग  आम्ही गोल करून  एखाद्या झाडाखाली जेवायला बसत होतो. सगळ्याचा डबा बघत, तु काय आणलंय,  मी खिचडी आणली, त्याने शेंगा आणल्यात, हे बघत सारे जेणणावर ताव मारत होते . गडावरील विहीरीत पाणी  असायचे, गुरूजी मोठ्या पोरांना घेऊन पाणी आणायला जायचे. गाण्याच्या भेंड्या, शब्द कोडी, गाणी, गप्पा मारत गोलाकार बसण्याचे ते दिवस खुप सुंदर होते. पुढे पाचवीला कराडला टिळक हायस्कूलला प्रवेश घेतला,  तिथे पण हीच  सहल असायची.1993 साली काॅलेज पुर्ण होई पर्यंत  श्रावण महिना  आणि सदाशिवगड हे समीकरण कायम राहीलं. दरम्यान 1990  मध्ये बारावी पास झालो की  मी शिकवणी सुरू केली. क्लासच्या मुलांना घेऊन सर म्हणून मी सदाशिवगड सहल घेऊन जाऊ लागलो. 1996 मध्ये मी आणि यादव सरांनी मिळून ओगलेवाडी येथे यादव मोरे क्लासेस सुरू केले.  2001पर्यंत क्लासेस सुरू होते. या काळात गडावर कित्येकदा गेलो.

अलीकडे गडावर जायला आठ नऊ वर्षे जमले नव्हते. परवा महाशिवरात्री दिवशी सकाळी साडे सहा वाजता गडाच्या पायथ्याशी पोहचलो.  लहानपणी गडावर जाण्याचे थ्रील वेगळेच होते, आता त्या  आठवणी जाग्या झाल्या. मजा करत साडे सात वाजता गडावर पोहचलो. जाताना तीन चार ठिकाणी थांबलो,  सेल्फी काढली. गडावर खुप गर्दी होती.  अनेक विद्यार्थी,  कराडकर,  जुने मित्र भेटले. मंदिराच्या परिसरात माझा विद्यार्थी योगेश कुंभार भेटला. आनंदाने धावत  आला, सर चहा घ्यायला या. छोट्या खोलील चहा कढत होता.  दर्शन घेऊन परत येतो म्हणून पुढे गेलो . सदाशिवाच्या पिंडीला मनोभावे नमस्कार केला. या देवावर माझी खुप श्रद्धा आहे.  गडावर  सारे ओगलेवाडी येथील भक्त नित्यक्रमाने पुजा करतात. रोज सकाळी कराडहून गडावर जाणार्‍याची संख्या गेल्या दहा वर्षांत शंभरावर गेली आहे. या लोकांनी स्व देणगीतून, लोकवर्गणी तून सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. स्वयं प्रेरणेने रोज पुजा करणारा एक कृष्णत भोसले नावाचा भक्त मला तिथे भेटला, ओगलेवाडीचाच होता. शिवलिंगावर काही जण दुधाचा अभिषेक करत होते. त्या लोकांना हा पुजारी सांगत होता, दुध देवावर ओतू नका, बाहेर चहा करायला ठेवला आहे, हे दुध त्यात नेऊन ओता,कुणाच्या तरी मुखात हे दुध जाऊदे! मला खरा भक्त आणि खरा पुजारी पहायला मिळाला. तोच खरा साधु, तोच खरा संत हे पटले.

मंदीराबाहेर आलो. योगेश कुंभार सोबत चहा घेतला, त्याने माझ्या हस्ते भाविकांना खिचडी वाटप केले. गड उतरून खाली आलो.ऑफिस मध्ये गेलो. दिवसभर माझ्या मनात तो पुजारी होता. अनेक ठिकाणी  देवाला, देवाच्या नावाखाली, मंदीरात ओतले जाणारे दुध वाया जात असते . पुजारी तिकडे कधी लक्ष देत नसतात, त्याचे तोंडी फक्त दक्षिणा टाका येवढेच असते.  सदाशिवगडावर मात्र वेगळे चित्र पहायला मिळाले. सुखद अनुभव देऊन गेले. त्या पुजार्‍याचा आदर्श सार्‍यांनी घेतला तर मंदिर स्वच्छ,  सुंदर आणि मनमंदीरे  होतील.  होय ना?

                                                                                                              .......... सतीश मोरे.






१२ मार्च २०१६

साहेबांची समाधी आणि साहेब

नमस्कार,
यशवंतराव चव्हाण आणि कराडचा प्रितिसंगम  हे घट्ट नाते आहे.
साहेबांना अभिवादन करावयास येणार्‍या असंख्य यशवंत प्रेमींना कृष्णा कोयनेच्या संगमाची, घाटाची , निसर्ग सौंदर्याची आणि समाधी स्थळाची भुरळ पडते. हा परिसर कोणी सजवला, समाधी आणि बाग कोणी  आणि कशी उभारली याबाबत अलिकडच्या पीढीला काहीच माहिती नाही. कोण म्हणतो शासनाने बांधली,  कोण पालिकेने तर कोणी म्हणतो कराड शहरवासियांनी ही  समाधी बांधली. मात्र सत्य वेगळे आहे. याबाबत पी.डी साहेबांचे चिरंजीव सुभाषराव पाटील काका आणि माझ्यात अनेकदा चर्चा झाली होती.  या चर्चेतून मला वेगळी आणि छान माहिती मिळाली. पी.डी. साहेबाच्या पुण्यतिथी दिनी गत वर्षी मी पुढारी प्रीतीसंगमावरून मध्ये  ही  माहिती (लेख ) छापला होता. आज चव्हाण साहेबाच्या जन्मदिनी पुन्हा पोस्ट करत आहे.
                                                                                                                         

                                                                                                                      धन्यवाद. ....सतीश मोरे

साहेबांची समाधी आणि साहेब

कृष्णा आणि कोयना या दोन भगिनी कराडला समोरासमोर कडकडून भेटतात. महाबळेश्वर मध्ये ताटातूट झालेल्या सख्ख्या बहिणीचा करहाटक नगरीत  प्रेमाचा संगम होतो. खुप कमी ठिकाणी पहायला मिळेल अशा कराडच्या प्रीतिसंगमाची भुरळ सर्वाना पडते. कृष्णा नदीकाठी अनेक प्राचीन मंदीर आहेत. दक्षिण काशी अशी ओळख असलेल्या कृष्णा काठावर संगमाच्या डाव्या बाजूला  अतिशय सुंदर, रेखीव आणि अष्टकोनी यशवंतराव चव्हाण साहेबांची समाधी आहे. देशभरातील यशवंत प्रेमीसाठी श्रद्धा आणि प्रेरणास्थान असलेली ही समाधी 1988 साली बांधून पूर्ण झाली. यशवंतराव चव्हाण साहेबाच्या विचाराचे सच्चे पाईक असलेले तसेच  सुखदुःखात, भरारीच्या आणि पडत्या काळात चव्हाणसाहेबांना सावली प्रमाणे साथ देणाऱ्या आदरणीय स्व. पी डी पाटील यांच्या पुढाकाराने,सह्याद्री साखर कारखान्यातील सभासद, कामगारांच्या एक एक रूपयांच्या निधीतून आणि कराड नगरपालिकेच्या सहकार्यमुळे उभे राहिलेले हे प्रेरणास्थळ साहेबांच्या साहेबांवरील निस्सीम प्रेमाची साक्ष देत आहे.
यशवंतराव चव्हाण याची कर्मभूमी असलेल्या कराडमध्ये साहेबाचे बालपण गेले. शुक्रवार पेठेतील डुबल गल्लीत त्याचे बालपण गेले. तेथून कृष्णा जवळच असल्याने साहेबाच्या लहानपणीच कृष्णाकाठाचे आकर्षण राहिले होते. विद्यार्थी दशेत या परिसराने त्यांच्या मानसिक व बौद्धिक विचाराला चालना दिली. त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रास कृष्णाकाठ असे नाव दिले आहे. कोणत्याही प्रकारच्या सुविधा नसताना कठीण आणि प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत त्यांनी स्वतःच्या पायावर उभे राहून लहानपणी शाळेत बोललेली मी यशवंतराव चव्हाण होणार हा संकल्प पुर्णत्वाकडे नेला. महाराष्ट्राचे पहीले मुख्यमंत्री ते भारताचे उपपंतप्रधान हा त्यांचा राजकीय प्रवास थक्क करणारा आहे.  राज्यात, देशात उच्च पदावर काम करीत असताना साहेबांचे कराडला सतत येणे होते. मुख्यमंत्रीपदावर असताना त्यांनी कृष्णा काठावर फेरफटका मारला. त्यानंतर मुंबईला गेल्यावर त्यांनी या परिसराबाबत हळुवार भावना व्यक्त करणारे पत्र 16 मे 1961रोजी तत्कालिन नगराध्यक्ष पी डी पाटील यांना लिहिले होते. या पत्रात त्यांनी प्रीतिसंगमाचा परिसर सुधारण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे सुचविले होते. साहेबांच्या इच्छेनुसार पी डी पाटील यांनी त्यानंतर भुईकोट किल्ला परिसरातील संगमालगतची साडेसात एकर जागा औध पंतप्रतिनिधी कडून संपादित केली. 1974 मध्ये बागेचा आराखडा तयार करून कंपाऊंड घातले. दरम्यान 1976 च्या पुरात हे सर्व वाहून गेले. त्यानंतर संगमाच्या वळणावर संरक्षक भिंत बांधून याबाबत शासनाकडे 1983 मध्ये प्रस्ताव सादर केला.
25 नोव्हेंबर 1984 रोजी यशवंतराव चव्हाण यांचे दिल्ली येथे निधन झाले. साहेबांच्या पार्थिवावर मुंबईत अंत्यविधी करावे असा विचार पुढे आला.  मात्र पी डी पाटील, बाबुराव कोतवाल, मंत्री शामराव अष्टेकर यांनी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव पाटील यांच्याशी संपर्क साधला. चव्हाणसाहेब कराडचे आहेत आणि त्यांच्यावर कृष्णाकाठावरच अंत्यसंस्कार व्हायला हवे अशी समस्त कराडकराची इच्छा असल्याचे त्यांनी मुख्यमंत्र्याना पटवून सांगितले. दुसऱ्या दिवशी सकाळी विमानाने चव्हाणसाहेबांचे पार्थिव कराडात आणण्यात आले. त्यावेळी लाडक्या नेत्यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी हजारोंच्या संख्येने जनसमुदाय लोटला होता. पी डी पाटील यांनी  चव्हाण साहेबाच्या त्या पत्रातील प्रितीसंगमावरील प्रेमभावनेचा विचार करून संगमाच्या काठावरच अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला.
त्यानंतर काही दिवसांतच शरद पवार यांनी मुंबईत  यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानची स्थापना केली. इकडे कराडात साहेबांचे चिरंतन स्मारक उभारण्यासाठी यशवंतराव मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन झाली. मात्र या समितीने पुढे काहीच न केल्यामुळे पी डी पाटील त्यातून बाजूला झाले. पी डी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली. साहेबांच्या समाधीसाठी निधी संकलन करण्यासाठी नागरिकापुढे जाण्याऐवजी सह्याद्री साखर कारखाना सभासदाकडून उसातून प्रतिटन रक्कम  कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. कारखान्याच्या उभारणीत चव्हाणसाहेबांचे फार मोठे योगदान आहे, साहेबामुळेच हा कारखाना उभा राहिला, शेतकरी सधन होऊ शकता आणि या कृतज्ञता भावनेने शेतकरी सभासदांनी यास एकमताने मंजुरी दिली. कामगार सुद्धा पुढे आले. सभासद आणि कामगार यांनी 5 लाखावर निधी गोळा केला. कोल्हापूर चे आर्किटेक्ट बेरी यांनी आराखडा तयार केला. रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीच्या धर्तीवर बेरी यांनी हे डिझाईन पी डी पाटील यांच्या सूचनेवरून केले.
या समाधीची लांबी रुंदी 20×20 फुट आहे. सभोवतालची परिक्रमा मार्ग 8 फुट 6 इंच रुंदीचा आहे. समाधी पूर्वेस पाणघाटावर 30×30 फुट  मापाचा अष्टकोनी चौथरा असून तेथून समाधी कडे जाणार्‍या मार्गाची रुंदी 15 फुट व लांबी 95 फुट आहे. चबुतरा, समाधी कडे जाणारा मार्ग, समाधी,  परिक्रमा मार्ग,  समाधी मार्ग ही कामे आरसीसी मध्ये एकजीव आहेत.  या कामाच्या फौडेशनसाठी 15 फुट खोलीपर्यंत एक फुट जाडीचे 75 आर सी सी काॅलम उभे करण्यात आले.  या सर्व काॅलमना जोडणाऱ्या बिम्स सर्वत्र आहेत. या कामासाठी गोकाक स्टोन वापरला आहे. परिक्रमा, चौथरा व मधला मार्गावर आग्रा टाईल्स बसवली आहे तर समाधी सभोवताली व माथ्यावर पिंक शेडच्या ग्रॅनाईट स्टोन फरशी आहे. कोल्हापूरच्या अॅडव्हान्स कन्स्ट्रक्शन कंपनीने हे काम पूर्ण केले.  समाधीचा स्लॅब टाकण्या अगोदरच जमिनीत खोल एक ताम्रमंजुषा ठेवली असून त्यामध्ये साहेबांचे साहित्य, ग्रंथ,भाषणे, पत्रे, फोटो ठेवली आहेत. ताम्रपटावर त्याचे जीवन चरित्र कोरले आहे. कामाची पाहणी करून शरद पवार यांनी प्रतिष्ठानच्या वतीने 3 लाख रुपये दिले.
समाधी समोर साडेसात एकर जागेत आर्किटेक्ट जयंत धारप यांच्या आराखड्यानुसार अतिशय सुंदर बाग तयार करण्यात आली. उद्यानाच्या प्रवेश द्वाराकडून समाधी कडे जाण्यासाठी 15 फुट रूंदीचा रस्ता तयार केला आहे. बागेत गोलाकार,  नागमोडी रस्ते तसेच विशाल हिरवळ केली आहे. उद्यानाच्या दक्षिण बाजूस कोटाच्या उतरणीवर निलगिरी झाडे लावल्या मुळे हा भाग खुप छान दिसतो. या सर्व कामातून उरलेली रक्कम पालिकेच्या खात्यावर जमा करून त्या व्याजातून समाधी देखभाल दुरुस्ती व पुजा करण्याचा निर्णय घेण्यात आला. तर शामराव अष्टेकर याच्या आमदार फंडातून पर्णकुटी इमारत व ग्रंथालयाचे काम केले . 25 नोव्हेंबर 1988 रोजी मुख्यमंत्री शरद पवार यांच्या हस्ते समा

Add caption


धी व बागेचे अनावरण करण्यात आले.
पी डी पाटील यांच्या पुढाकाराने आणि दूरदृष्टी मुळे कराडात अनेक कामे पूर्ण झाली आहेत. टाऊन हॉल, शिवाजी स्टेडियम, पालिकेची इमारत, शाॅपिंग काॅम्लेक्स, शाळा इमारती, साहेबांची समाधी,साखर कारखाना, शिक्षण संस्था यासारखी भव्य दिव्य कामे पूर्ण करून पी डी साहेबांनी अतिशय सन्मानाने राजकीय निवृत्ती. 42 वर्षे सलग कराड नगराध्यक्ष म्हणून काम करताना सामोपचाराने कारभार केला.  साहेबांच्या कालावधीतील पालिकेत सर्व ठराव एकमताने मंजूर झाले,  ही एक ऐतिहासिक घटना म्हणावी लागेल. यशवंतराव चव्हाण साहेबाच्या विचाराचे सच्चे पाईक म्हणून त्याच्या पश्चात अनेक उपक्रम पी डी पाटील यांच्या पुढाकाराने राबवले जातात.  कराड शहरात आदीलशहा कालीन भव्य दिव्य मनोरे आहेत. पी डी पाटील आणि यशवंतराव चव्हाण हे दोघेही विकासकामाचे उत्तुंग मनोरेच आहेत. हे दोघेही कराडचे वैभव आहेत.
यशवंतरावजी चव्हाण यांच्या जयंती दिनी त्यांना अभिवादन.

                                                                                                      ........सतीश मोरे, कराड.

११ मार्च २०१६

आडवी जाणारी मांजरे आणि माणसे

🐱 मांजरापेक्षा माणसेच जास्त आडवी येतात 🐱

    🌝 आपण पुढे चालत रहायचं असते🌝

बिचारं मांजर आडवे आले की आपण त्याला दोष देतो, त्याच्यामुळे काम होणार नाही अशी अटकळ बांधतो, पुढची कामे सोडून देतो. पण आयुष्यात आलेल्या अनुभवाचा, लागलेल्या ठेचांचा विचार केला तर  मांजरापेक्षा माणसेच आपल्या आडवी आली होती हे लक्षात येईल.

मांजर आडवे गेले की आपण थांबतो, कुणीतरी रस्ता ओलांडून पुढे जाण्याची वाट पाहतो किंवा दोन पाऊले मागे येऊन पुन्हा चालायला सुरुवात करतो. हे करून आपल्याला समाधान मिळते व पुढे जाऊन आपण कामाला लागतो. अंधश्रद्धा ठेऊन पुन्हा श्रद्धेने कामाला लागतो.

आयुष्यात अनेकदा चांगले काम करताना वाईट विचाराची मांजररूपी माणसे आडवी येतात. आडवे येणे हा त्यांचा स्वभाव असतो. त्यांच्या आडव्या येण्यामागे तुमचे चांगले काम बंद पाडणे हा हेतू असतो. आडवे येणाऱ्याच्या आडवे जाऊन त्यामध्ये वेळ घालविण्याची चुक शहाणे लोक करत नाहीत. मांजर आडवे आल्यावर जे आपण करतो तसेच अशा वेळी करायला हवे.

दोन पाऊले मागे येऊन दोन मिनिटे विचार करायचा.समोरचा माणूस माझ्या आडवा येतोय म्हणजे मी त्याच्यापेक्षा काही तरी वेगळे करतोय. असे चांगले आणि वेगळे काम करतोय की जे त्या व्यक्तीला जमत नाही. अशा वेळी त्या व्यक्तीला त्याचे काम करू देत. माझे काम मी ठरवल्यानुसार पुर्ण करणारच ,असा दृढनिश्चय करून त्या मांजररूपी आडव्या आलेल्या व्यक्तीला तेथेच सोडून यायचे, डोक्यातून घरी आणायचे नाही.

असे केले तरच आपण पुढे जाऊ शकतो. भारतीय वंशाचे थोर विचारवंत राॅबीनसिंग म्हणतात, तुम्ही जेव्हा डोक्यावर पाच दहा किलो वजनाची पाटी घेऊन चालता तेव्हा त्रास तुम्हाला होतो. तसेच तुम्ही जेव्हा एखाद्या व्यक्तीला डोक्यात घेऊन जगता तेव्हा त्रास तुम्हालाच होतो. तुमच्या विषयी वाईट विचार करणारे, तुम्हाला दुषणे देणारे किंवा आडवे येणाऱ्याना तुम्ही तुमच्या डोक्यावरून, डोक्यातून काढून टाका. बघा तुम्हाला कसे हलके हलके वाटते. लोक तुमच्यावर जळतात तेव्हा समजायचे की तुम्ही काही तरी चांगले काम करत आहात.

परवाच मी एक विचार वाचण्यात आला, तुम्हाला जर शिखरावर पोहचायचे असेल तर रस्त्यावर आडवे येणाऱ्या प्रत्येक कुत्र्यारूपी  म्हणजे प्रगती विरोधी भुंकणाऱ्या लोकांसाठी शक्ती वाया घालवू नका.सोबत बिस्किटे ठेवा, त्याच्यापूढे फेका आणि पुढे चालायला लागा.

                                  .......सतीश मोरे, कराड.


Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...