व्हेन 'सतिताभ' मिटस् 'अमिताभ !'
‘अमिताभ बच्चन’
अगदी
लहानपणापासूनच म्हणजे कळायला लागल्यापासूनच अमिताभ बच्चन हे नाव
ऐकतोय...पाहतोय. त्यांच्या चित्रपटाचा आनंद लुटतोय. नव्हे.. अमिताभ बच्चन
यांचेे चित्रपट पाहतच मी लहानाचा मोठा झालो. हे चित्रपट पाहत असताना त्या
काळात फक्त निखळ आनंद, मज्जा, एंटरटेंटमेंट एवढाच मुख्य उद्देश असायचा.
होय..!
ते वयंच तसं होतं. शालेय जीवनात गाणी, फायटिंग आणि झाडामागे पळणारे
हिरो-हिरोइन एवढेच सर्वांना कळायचे. शालेय जीवन संपवून कॉलेजला प्रवेश
केला. त्यानंतर मात्र अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटांचे रसग्रहण करायला
आम्ही शिकलो. कोणता चित्रपट, त्याचा दिग्दर्शक कोण? निर्माता कोण? कोणतं
प्रोड्नशन? अमिताभवर चित्रित गाणी कोणी गायलीत? संगीतकार कोण? त्या
गाण्याचं शुटिंग कुठे झालं? इथपर्यंतचा सुक्ष्म अभ्यास बच्चन यांचे चित्रपट
पाहताना हळूहळू होत राहिला.
कराडच्या
रॉयल, प्रभात, नटराज आणि राजमहल या चित्रपटात अमिताभ बच्चन यांचे चित्रपट
हमखास लागायचे. रॉयल आणि प्रभातमध्ये सर्वाधिक चित्रपट लागायचे. अमिताभ
बच्चन यांचा कोणताही चित्रपट आला की शुक्रवारी किंवा शनिवारी पिक्चर बघायला
जायचेच असा जणू अलिखित नियमच झाला होता. अधुनमधून इस्लामपूरच्या
माणकेश्वर, विट्याच्या भैरवनाथ थिएटरमध्येही नातेकवाईकांकडे गेले की प्निचर
पहायला जातच होतो. आजोळी रेठरे बुद्रुकला गेल्यानंतर तेथील टुरिंग
टॉकिजमध्ये अमिताभ बच्चन यांचा चित्रपट असेल तर मामाशी गोड बोलून रोज प्निच
बघायला जाण्याचा हट्ट करीत होतो.
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून होणाऱ्या मनोरंजनाबरोबरच त्यांचे एक -एक डायलॉग मनात घर करुन जात होते.
अमिताभ
बच्चन यांच्या क्रांतीकारी संवादाने मला सन्मानानं कसं उभा रहायचं हे
शिकवलं. ‘मैं आज भी फेंके हुए पैसे नहीं उठाता’ असं म्हणणारा दीवारमधला
विजय कष्टाचे चीज जाणणारा, स्वाभिमानाने रहायला शिकविणारा होता. तो मला
भावला होता. अगदी अलिकडचा अग्निपथ घ्या ना! ‘जिंदगी में तर्नकी करना है, तो
ना बोलना बहुत जरुरी है’. ‘हवा तेज है दिनकरराव टोपी संभालो उड जायेगा’
असं म्हणणारा अमिताभ आयुष्यात काही गोष्टींना नाही म्हणायला पाहिजे हे
शिकवतो. हाच अमिताभ जेव्हा वातावरण विरोधात असतं तेव्हा माणसानं झुकलं
पाहिजे, आपल्या टोपीला हात लाऊन ती सांभाळली पाहिजे, अन्यथा अनर्थ होईल,
असे शिकवतो. अमिताभ बच्चन यांच्या वेगवेगळ्या संवादावर अजूनही खूप काही
लिहिता येईल, मात्र पुन्हा कधीतरी.
हे सर्व
सांगण्याचा उद्देश असा अमिताभ बच्चन यांना पहात पहात मोठे होत असताना
अमिताभ बच्चन यांना कधीतरी प्रत्यक्ष भेटायचं, अशी माझी प्रबळ इच्छा होती.
अनेकदा अमिताभ बच्चन यांचे ‘मायापुरी’ व चित्रलेखा समुहाच्या ‘जी’ या
सिनेमासिकांत आलेले फोटो कटिंग करून ठेवले होते. त्या मासिकात आलेल्या
पत्त्यावर अमिताभ बच्चन यांना पोस्टकार्डदेखील पाठवलं होतं. अमिताभ बच्चन
यांना भेटायची इच्छा हळूहळू दृढ होत गेली. एखाद्याला भेटण्याची आस
लागल्यानंतर जी परिस्थिती होती, तशीच परिस्थिती माझीही झाली होती.
दरम्यान,
1998 साली शिवउद्योग सेनेच्या वतीने अमिताभ बच्चन यांचा पुणे येथील गणेश
कला क्रीडा मंदिर येथे एक कार्यक्रम आयोजित केला असल्याची माहिती पुणे
पेपरमध्ये वाचण्यात आली. या कार्यक्रमाला जायचंच असा निश्चय करून माझे
मित्र आणि आमच्या यादव- मोरे क्लासेसचे माझे सहकारी अजित यादव यांना गाडीवर
बसवलं आणि बॉक्सर सिटी हंड्रेड दुचाकीवरून आम्ही पुणे गाठले. 11 नोव्हेंबर
1998 सायंकाळी सहाच्या दरम्यान कार्यक्रम होता. तिथं माझा बालमित्र हणमंत
काशिद अगोदरच पोहचला होता. आम्ही तिथे पोहोचेपर्यंत सर्व हॉल गच्च भरून
वाहत होता. बाहेरही खूप गर्दी झाली होती. आत जायला जागाच उरली नव्हती.
साडेपाच सहाच्या दरम्यान आमचे लाडके अमिताभ बच्चन आलिशान गाडीतून उतरले
आणि थेट हॉलमध्ये गेले. मी त्यांना पाठमोरे पाहू शकलो. त्यांची ती पाठमोरी
छबी आजही माझ्या नजरेत साठवली आहे. कार्यक्रम सुरू झाला. अमिताभ बच्चन
यांनी मै ओर मेरी तनहाई सादर केली. तसेच आयुष्यात घडलेले काही प्रसंग
सांगताना सदैव पुढे चालत रहा असा संदेश देऊन उपस्थित युवकांना उर्जा दिली.
बाहेर उभा राहून स्पिकरवरुन आम्ही कार्यक्रम ऐकला. त्या दिवशी पुण्यात
मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी या कार्यक्रमाची बातमी पेपरमध्ये येणारच याची
खात्री होती. त्यामुळे स्वारगेट स्टँडवर जाऊन पुढारी घेतला आणि तो अंक आजही
माझ्या संग्रही आहे. पुढारीमध्ये अमिताभ बच्चन यांचे भाषण आले होते, जे मी
ऐकले होते . काय होते त्या भाषणात?
‘मन
का हो तो अच्छा, नहीं हो तो और भी अच्छा’ अमिताभ बच्चन यांनी त्यांचे
वडिल हरिवंशराय बच्चन यांच्या तोंडून ऐकलेला हा दिव्य विचार मला खूप भावला.
जर एखादी गोष्ट आपल्या मनासारखी झाली तर ते खरंच चांगलं असतं पण
दुर्दैवानं आपल्या मनासारखे झालं नाही तर ते त्याहुन अधिक चांगलं असतं.
कारण जे आपल्या मनासारखं होत नाही, ते ईश्वराच्या मनासारखं असतं आणि ईश्वर
कधीही कुणाचं वाईट करुचशकत नाही. बच्चन यांच्या वडिलांचा खुद्द बच्चन
यांच्या तोंडून ऐकलेला हा विचार माझ्या मनावर त्या दिवसापासूनच इतका भिनला
आहे, की कधीही मला कोणत्याही अडचणी आल्या, कार्यालयीन, सामाजिक, वैयक्तिक
असो किंवा कौटुंबिक असो मी हे वाक्य डोळ्यासमोर घेतो आणि मला प्रश्नांची
उत्तरे मिळतात.
1998 साली
अमिताभ बच्चन यांना पुण्यात भेटू शकलो नाही, मात्र त्यांना दुरुनच पाहिलं
होतं. तरीही मनाचं समाधान झालं नव्हतं. बच्चन साहेबांना एक दिवस भेटायचंच
हा माझा पक्का इरादा होता. अमिताभ बच्चन मला भेटणारच. याचा मला पूर्ण
विश्वास होता. असं म्हणतात एखाद्या व्यक्तीवर प्रेम केलं तर तीही व्यक्ती
तुमच्यावर प्रेम करते. अमिताभ बच्चन यांच्यावर कलाकार म्हणून असलेलं प्रेम
मला कधीच झोपू देत नव्हतं. अमिताभ बच्चन यांचा चित्रपट पाहून आल्यानंतर या
चित्रपटात असलेली भूमिका घेऊन तशाच प्रकारची वेशभूषा असलेले अमिताभ माझ्या
घरी येऊन गेलेले आहेत. होय.. खरंच! ही स्वप्नातली गोष्ट असली तरी अमिताभ
बच्चन यांच्या स्वप्नातल्या भेटीचा पण आनंद औरच आहे.
मला
आठवतंय 1988 च्या दरम्यान अमिताभ बच्चन यांचा ‘शहेनशाह’ हा चित्रपट रिलीज
झाला होता. हा चित्रपट त्यावेळी चित्रपट गृहांबरोबरच व्हिडिओ सेंटरमध्येही
रिलीज होत होता. काही कारणांमुळे हा चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी विरोध
होत होता. त्याकाळी अमिताभ बच्चन यांच्या मदतीला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब
ठाकरे धावून आले होते आणि त्यानंतर हा चित्रपट रिलीज झाला.प्रभात थिएटरच्या
शेजारी असलेल्या ‘फन अँड फूड व्हिडिओ सेंटर’मध्ये बाकड्यावर बसून पाहिलेला
‘फर्स्ट डे फर्स्ट शो’ आजही स्मरणात आहे. त्याच रात्री ‘शहेनशहा’ची
वेषभुषा धारण करुन बच्चनजी आमच्या घरी आले होते. असो ..असं म्हणतात ज्याला
भेटावयास तुम्हाला खूप ओढ लागली आहे... आस लागली आहे... ती आस जर खरी असेल
तर, तुमचं प्रेम जर खरं असेल.. तर त्या लहरी त्या व्यक्तीपर्यंत पोहोचतात
आणि तुम्हाला त्या व्यक्तीपर्यंत जाण्यासाठीच्या अनेक वाटा दिसू लागतात.
अशीच एक वाट मलादेखील सापडली. व्हाटस् अॅप सुरू झाल्यानंतर.
व्हाटस्
अॅप हे सोशल अॅप सुरू झाल्यानंतर त्यावरील प्रोफाइल फोटो लावण्याची पद्धत
सुरू झाली. पहिल्या दिवशीपासून आजअखेर व्हाटस् अॅपच्या प्रोफाइलवर फक्त
अमिताभ बच्चन यांचाच फोटो मी ठेवलेला आहे. पत्रकारितेच्या क्षेत्रात काम
करत असल्याने अनेक मित्रांनी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी माझ्या
अमिताभ बच्चन यांच्या प्रोफाइल्सचे कौतुक करतानाच तुम्हाला हे फोटो कुठून
मिळतात? असा प्रश्न सुरुवातीच्या काळात केला होता. हळूहळू माझी ‘अमिताभ
बच्चनप्रेमी’ अशी ओळख तयार झाली आणि त्यातूनच अमिताभ बच्चन यांच्या नावाचा
अमिताभ बच्चनप्रेमी नावाचा ग्रुप मी सुरू केला. या ग्रुप मध्ये माझ्या
जवळचे अमिताभ बच्चनप्रेमींना अॅड करून आम्ही सर्व कराड, सातारचे
बच्चनप्रेमी एकत्र आलो. हळूहळू या ग्रुपवर येण्यासाठी जिल्हाभरातून मागणी
होऊ लागली.एका हिरोच्या नावाने सातारा जिल्ह्यात पाच वर्षांपूर्वी सुरु
झालेला ‘अमिताभ बच्चनप्रेमी’ हा आमचा पहिलाच ग्रुप असावा. या ग्रुपच्या
माध्यमातून आम्ही अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटाविषयी चर्चा करू लागलो.
गाणी, व्हिडिओ, फोटो शेअर करू लागलो आणि अल्पावधीतच आमचा ग्रुप अतिशय
लोकप्रिय झाला.
खरं
तर व्हाटस् अॅपवरती अनेक मेसेज येत असल्याने लोक खूप कंटाळतात. तरीही फक्त
अमिताभ बच्चन यांचीच गाणी, व्हिडिओ, फोटो, बातम्या एवढेच टाकायचे. इतर
काही टाकल्यास दोन चुका माफ.. तिसऱ्यावेळी ग्रुपमधून बाहेर. असा अतिशय कडक
नियम असलेला आमचा ग्रुप चांगल्या पद्धतीने वाढत होता. आमच्या ग्रुपची
गेल्या वर्षी एक बैठक झाली. या बैठकीत अमिताभ बच्चन यांचा 75 वा वाढदिवस
कराडच्या विश्रामगृहावर साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याच दिवशी
दैनिक पुढारीने अमिताभ बच्चन यांच्या पंचाहत्तराव्या वाढदिवसानिमित्त
पुरणीचे पूर्ण पान प्रसिद्ध केले होते. त्याचे प्रकाशन आम्ही केले. या
कार्यक्रमात अमिताभ बच्चन यांना भेटायला जाण्यासाठी काय करता येईल? याबाबत
चर्चा झाली. अमिताभजींना भेटण्याची माझ्या एकट्याची इच्छा आता आमच्या
समूहाची झाली. आमच्या समूहाने अमिताभ बच्चन यांना भेटण्यासाठी काहीतरी
करावे तिथपर्यंत पोहोचावे असा संकल्प केला. या कार्यक्रमात बोलताना मी एक
निश्चय व्यक्त केला होता अमिताभ बच्चन यांना आपण भेटणारच. अमिताभ बच्चन
यांना आपण फक्त भेटणार नाही तर त्यांच्याशी हस्तालोंदनही करणार. अमिताभ
बच्चन यांच्यावर प्रेम करणारे आपण प्रेमी आहोत. प्रेमी आहोत म्हणून बच्चन
यांचं महत्त्व आहे आणि अमिताभ बच्चन आपल्याला भेटणारच, असा अतिशय सकारात्मक
संकल्प करून आम्ही वाटचाल सुरु केली. (11 ऑ्कटोबर 2017)
आमचा
अमिताभ बच्चनप्रेमी ग्रुप कराडात कार्यरत आहे. त्याहून फार मोठा ग्रुप
कोल्हापूरमध्ये गेल्या चार पाच वर्षांपासून काम करत आहे. ‘बच्चनवेडे
कोल्हापुरी’ नावाचा हा ग्रुप सुरू झाल्यानंतर माझे पत्रकार मित्र संभाजी
थोरात यांच्याकडून मला या ग्रुपची माहिती मिळाली. या ग्रुपचे मुख्य अॅडमिन
सुधर्म वाझे यांच्याशी संपर्क करून मीही त्या ग्रुपमध्ये सहभागी झालो.
कोल्हापूरकरांच्या बच्चनवेडाला खरंच तोड नाही. गेले चार वर्षे हा बच्चनवेडे
कोल्हापुरी ग्रुप धूम धडाक्यात सुरू आहे, असं म्हणण्याचं कारण की, जसे
अमिताभ बच्चन यांचे चित्रपट रजत, सुवर्ण, अमृत महोत्सव साजरा करतात, थांबत
नाहीत. तसाच बच्चनवेडे कोल्हापुरी हा ग्रुप 24 बाय 7 सुरु असतो. एका दिवसात
या ग्रुपवर किमान तीनशे पोस्ट पडतात. रोज रात्री 9 ते 12 अमिताभ बच्चन
यांच्या गाण्याची मैफिल सुरु असते. या ग्रुपमध्ये मी सहभागी झाल्यानंतर
माझ्याकडे असलेली काही माहिती मला त्या ग्रुपवर शेअर करता आली. त्याहून
कितीतरी पटीने नवीन माहिती मला मिळत गेली. या ग्रुपचे अनेकदा गेट-टुगेदर
होतात. त्यातल्या दोन कार्यक्रमांना मला जाता आले. कोल्हापूरकरांनी मला
इतके प्रेम दिले की मलाही कोल्हापूरवासिय व्हावे, अशी इच्छा झाली. दोन
महिन्यापूर्वी या अमिताभ बच्चनवेडे कोल्हापुरी ग्रुपला कौन बनेगा
करोडपतीच्या सेटवर जाण्याची संधी मिळाली. या ग्रुपचे तब्बल 50 सदस्य
केबीसीच्या सेटवर गेले होते. या सर्वांनी अमिताभ बच्चनरुपी अभिनय देवाला
प्रत्यक्ष डोळे भरून पाहिले. याचे वर्णन मी ग्रुपवर वाचत होतो आणि इकडे
माझी इच्छा तीव्र अजूनच होत होती. माझे सातारचे बच्चनप्रेमी मित्र दीपक
प्रभावळकर आणि मी अमिताभ बच्चन यांना भेटण्यासाठी आणखी काय करता येईल यावर
सविस्तर चर्चा सुरू केली.
कराडमधील
अनेक राजकीय लोकांशी माझे जवळचे संबंध आहेत. या राजकीय लोकांना
भेटल्यानंतर मी कधीही वैयक्तिक काम त्यांना सांगितले नव्हते. सांगणारही
नाही.. पण सध्याच्या मुख्यमंत्र्यांजवळ वजन असलेल्या दोन-तीन प्रमुख
दिग्गजांना, माजी मुख्यमंत्र्यांजवळ ‘मला अमिताभ बच्चन यांना भेटायचे आहे.
तुम्ही काय करू शकता?’ अशी विनंती केली होती. आपल्या सर्वांचे दैवत छत्रपती
शिवाजी महाराज यांचे थेट तेरावे वंशज श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले
यांच्यावतीने अमिताभ बच्चन यांना सातारा येथे ‘सातारा भूषण’ पुरस्कार
देण्याचा निर्णय सत्कार समितीने घेतला. या समितीमध्ये माझे मित्र हरिष
पाटणे आणि दीपक प्रभावळकर यांचा समावेश होता. याबाबत त्या दोघांनाही मी
अनेकदा फोन करून भेटेल तेव्हा ‘सातारा येथे अमिताभ बच्चन आल्यानंतर मला
त्यांना भेटायचे आहे, आमच्या बच्चनप्रेमी ग्रुपला अमिताभ बच्चन यांना
भेटण्यासाठी वेगळा वेळ मागा. तुम्ही काहीतरी कराच,’ असा मी सतत आग्रह केला
होता. हरिष पाटणे आणि दीपक प्रभावळकर या दोघांनीही आपण बच्चन यांना
भेटायचेच, असे सांगत मला सकारात्मक ऊर्जा दिली.
दरम्यान,
राजस्थान येथे ‘ठग्ज ऑफ हिंदुस्थान’ या चित्रपटाचे शुटिंग सुरु असताना
अमिताभ बच्चन यांची प्रकृती बिघडल्याने आणि यानंतर पुढील शुटींगसाठी सलग
तारखा असल्याने त्यांना सातारा येथे पुरस्कार स्विकारण्यासाठी येता येऊ
शकले नाही. छत्रपती उदयनराजे भोसले यांना साताऱ्यामध्ये आणणारच, अशी
शिवप्रतिज्ञा करत या कामासाठी त्यांच्या जवळच्या काही मित्रांना अमिताभ
बच्चन यांच्या संपर्कात राहण्यासाठी वाटा दाखवून दिल्या. सातारा येथे
अमिताभ बच्चन यांचा होणारा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला. मी काहीसा नाराज
झालो असलो तरी बच्चन आम्हाला भेटणारंच. आता तरी बच्चनजींना भेटल्याशिवाय मी
सोडणारच नाही, असा संकल्प आणखीन दृढ झाला.
दरम्यान,
आमचा कराडचा बच्चनप्रेमी ग्रुप आता अधिकच कार्यतत्पर झाला होता. अमिताभ
बच्चन यांचा 11 ऑक्टोबरला वाढदिवस असतो. या दिवशी काहीतरी वेगळं करण्याचा
संकल्प आम्ही केला. बच्चन यांचा वाढदिवस तर सगळेच लोक करतात, मग आपण अमिताभ
बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त वेगळं काय करू शकतो? असा विचार पुढे
आल्यानंतर बच्चनप्रेमी राहुल खोचीकर यांनी समाजासाठी काहीतरी करावे, असे
सुचविले. अमिताभ बच्चन हे भारत सरकारच्या स्वच्छ सर्व्हेक्षण अभियानाचे
ब्रँड अॅम्बेसिडर आहेत, तर मग वाढदिवसानिमित्त अमिताभ बच्चन यांनी
सांगितलेला मार्ग स्वीकारत आपण कराड शहरात स्वच्छता अभियान राबवावे, असा
विचार केला.
11 ऑक्टोबर
2018 रोजी सकाळी साडेसहा वाजता आम्ही कराडच्या कोल्हापूर नाका परिसरात
जमलो. महात्मा गांधी पुतळा परिसर, पोपटभाई पेट्रोेल पंप परिसर, पंकज हॉटेल
परिसर या ठिकाणची स्वच्छता केली. सुमारे चार टन कचरा गोळा केला. कधी घरात
झाडूही उचलून न ठेवणारे आमच्यातील बच्चनप्रेमी लोक त्यादिवशी हिरीरीने
स्वच्छता करीत होते. आमच्यात बच्चनप्रेमाचा उत्साह संचारला होता. आमच्यात
अनेक सामान्य नागरिकांबरोबरच डॉक्टर, इंजिनिअर, राजकीय नेते, पत्रकार,
नगरसेवक, उद्योगपती ते करोडपती असे बच्चनप्रेमी आहेत, मात्र आमच्या
सर्वांचा दुआ फक्त बच्चन हा आहे. ‘आमचा श्वास... आमचा ध्यास.. अमिताभ..
अमिताभ!’ हे आमच्या बच्चनप्रेमी ग्रुपचे ब्रीदवा्नयच आहे. बच्चन प्रेमाने
भारावलेल्या आम्ही 50 जणांनी स्वच्छता अभियान राबवून आनंद लुटला. दुपारी
आम्ही कराडच्या चावडी चौकात जिलेबी वाटप केले आणि सायंकाळी सर्वांनी एकत्र
बसून ‘मुकद्दर का सिकंदर’ हा चित्रपट पाहिला. केक कापला.. मजा केली. या
कार्यक्रमात बोलताना पुन्हा एकदा सर्वांनी ‘अमिताभ बच्चन यांना कधी
भेटायचे, काहीतरी करा’ असा नारा केला. या कार्यक्रमासाठी सातारहून आलेल्या
दीपक प्रभावळकर यांनी कराडमध्ये बच्चनप्रेमींचे गेट-टुगेदर झाले, अगदी तसेच
सातारमध्येही करूया, असा विचार मांडला. यानंतर लगेचच 22 ऑक्टोबरला सातारा
येथील 30 बच्चनप्रेमींच्या सोबतीने आम्ही कराडचे चाळीस बच्चनप्रेमींनी
सातारमध्ये अमिताभ बच्चन यांचा ‘शराबी’ चित्रपट एकत्रपणे पाहिला. केक
कापला.. धमाल केली.इथेही पुन्हा अमिताभ बच्चन यांना कधी भेटायचे असा विचार
सर्वांनीच मांडला.अमिताभ बच्चन यांना अनेकदा भेटलेले, छत्रपती उदयनराजे
भोसले यांचे निकटवर्तीय सातारचे पंकज चव्हाण या बैठकीला उपस्थित होते.
त्यांनी अमिताभ बच्चन यांच्या भेटी दरम्यान व्यक्त केलेल्या अनेक
अनुभवांतून आमच्या डोळ्यांसमोर बच्चनजी उभे राहत होते आणि बच्चनभेटीची
इच्छा आणखीनच तीव्र होत होती.
सातारचा
कार्यक्रम पार पडल्यानंतर आपल्या ग्रुपच्या सर्व उपक्रमाची माहिती एकत्र
करून याबातचे एक माहिती पत्रक तयार करण्याचा विचार प्रभावळकर यांनी मांडला.
हे माहिती पत्रक अमिताभ बच्चन यांच्यापर्यंत कसे पोहोचेल? कसे पोहोचवता
येईल? यासाठी पंकज चव्हाण यांनी पुढाकार घेण्याचे मान्य केले. दोन दिवस
विचार करून एक वेगळ्या प्रकारचे माहितीपत्रक विशाल देशमुख यांच्या मदतीने
तयार करून घेतले. विशालने हे माहिती पत्रक अतिशय आकर्षक होण्यासाठी त्याचे
सर्व स्किल वापरले. हे माहिती पत्रक तयार करताना यामध्ये अमिताभ बच्चन
प्रेमी ग्रुपचे नाविण्यपूर्ण उपक्रम आणि या ग्रुपचा मूळ उद्देश आम्ही
मांडला. ग्रुपची माहितीचा संक्षिप्त शब्दांत मराठीमध्ये मजकूर मी तयार
केला. मात्र अमिताभ बच्चन यांना मराठी वाचता येणार नाही. त्यामुळे याचे
इंग्लिश भाषांतर केले पाहिजे. हे इंग्लिश भाषांतर अतिशय मोजक्या आणि
प्रभावी शब्दांत करण्यासाठी कराडचे दुभाषक आणि पत्रकार दीपक पाटील यांनी
मला मोलाची मदत केली. हे माहितीपत्रक तयार झाल्यानंतर पंकज चव्हाण यांच्या
माध्यमातून अमिताभ बच्चन यांच्यापर्यंत याची पीडीएफ फाईल पाठवण्यात आली.
अमिताभ बच्चन यांनी ती फाईल पाहिली.. आणि पुढे चमत्कार झाला.
छत्रपती
उदयनराजे भोसले यांचे अमिताभ बच्चन यांच्यासोबत असणारे दृढ संबंध आणि पंकज
चव्हाण यांच्यामुळे अखेर अमिताभ बच्चन यांच्या प्रत्यक्ष भेटीचा योग आलाच.
वाचा उद्याचा भाग काय झालं या भेटीत.
(पूर्वार्ध)
सतीश वसंतराव मोरे, कराड.
सतिताभ
+91 988 1191 302, +91 976 5566 202.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा