त्रिशूल
अमिताभच्या पंचाहत्तरी निमित्त ही पोस्ट लिहिली पण उशीर झाला.
काल संध्याकाळी एका एफएम चॅनलवर एक आरजे लाडिक लाडिक स्वरात अमिताभला ट्रिब्युट वगैरे देत होती. त्याचे डायलॉग स्वतःच म्हणत होती. पिक्चर्स होते
मर्द, शहेनशहा, खुदा गवाह, मोहब्बते,अग्निपथ. एक अग्निपथ सोडल्यास बच्चनचे हे टुकार पिक्चर्स !! तिचा दोष नव्हता तिच्या वयाचा होता. अमिताभ कारकिर्दीच्या शिखरावर असताना त्याचा शेवटचा सॉल्लिड रोल म्हणजे शराबी. त्यानंतर तिचा जन्म झाला असावा. पण रेडिओवर येताना जरा अभ्यासोनी प्रकटावे ना !!
अमिताभची तुफान डायलॉगबाजी म्हणजे दीवार आणि त्रिशूल. बाकी जंजीर,शोले,अमर अकबर अंथॉनी, डॉन ,मुकद्दर का सिकंदर,शक्ती,शराबी आहेतच पण दीवार आणि त्रिशूलची सर नाही. हे माझे वैयक्तिक मत आहे. त्याचे टॉप तीन चित्रपट काढले तर तिसरा कोणता घ्यावा यावर डोकेफोड करीन.
त्यातही डावे उजवे करायचे तर दीवारपेक्षा मला त्रिशूल जास्त प्रिय.माझ्यामते सलीम-जावेद यांची त्रिशूलची कामगिरी म्हणजे सुनील गावस्करच्या बंगलोरच्या ९६.
"जिसने पच्चीस बरस अपनी मां को हररोज थोडा थोडा मरते हुए देखा है असे मौत से क्या डर लगेगा" इथून सुरुंगाच्या वातीवर विडी पेटवून तो स्क्रीनला जी आग लावतो ती "आज आप के पास आपकी सारी दौलत है मगर आप जैसा गरीब मैने जिंदगी में नही देखा" असे संजीवकुमारला सांगत विझवतो. गरीब हा शब्द जो काही उच्चरला आहे त्याला तोड नाही. सगळा त्वेष ओतलाय. या दोन सीन दरम्यान तो आपल्याला जी चित्रानुभूती देतो ती पुण्याच्या भाषेत "अशक्य" आहे.
सगळा पिक्चर त्याने खोल,दुःख दर्शवणाऱ्या नजरेवर (ब्रूडिंग लुक्स ), गोळीबंद आवाजात मारलेल्या जबरदस्त डायलॉग्सवर, संवादाच्या लयबद्ध चढउतारांवर आणि घेतलेल्या पॉजेसवर पेलला आहे.समोर संजीवकुमारसारखे अभिनयाचे दुसरे विद्यापीठ उभे असताना हे करणे म्हणजे खायचे काम नाही.
"यू आर राईट मिस्टर आर के गुप्ता" पासून सुरू होऊन "मेरी बनाई कॉलनी मे मकान चाहीये तो तकल्लूफ मत किजीएगा. मिल जायेगा" इथे संपणारा सीन म्हणजे बोर्ग मॅकेन्रो १९८० ची मॅचच !!
"किताबों में छपते है चाहत के किस्से हकीकत की दुनिया में चाहत नही है" असे साहिरचे जळजळीत शब्द गाणारा विजय "मै आज तुमसे बहोतसी दोस्ती, बहोतसा प्यार मांगता हूं" असे म्हणत प्रेमाची हळवी कबुली देतो.
"मै चाहता हूं मिस्टर आर के गुप्ता के खानदान से न सिर्फ उनकी दौलत,उनकी इज्जत छिन लू बलकी उनके दिल की हर खुशी, होटोंकी हर मुस्कराहट को मिटा दू खतम कर दू "
इतका जळजळीत विखार बाळगणारा अमिताभ जेंव्हा त्याच आर के गुप्ताचा म्हणजे त्याच्या अनौरस बापाचा प्रेम चोप्रा जेंव्हा अपमान करतो तेंव्हा तितक्याच त्वेषाने कानाखाली जाळ काढतो तेंव्हा "खून खून होता है पानी नही" हे आनंद बक्षीचे शब्द आठवतात.
१९७८ च्या मे महिन्यात ५ तारखेला ( चू भू द्या घ्या ) रिलीज झालेला त्रिशूल इतका भिनला आहे अंगात की कोणाचे म्हणणे मान्य असेल तर आजही "यू आर राईट मिस्टर आर के गुप्ता"असेच तोंडातून बाहेर येते. कोणाला येतो म्हणून सांगताना "मै आ रहा हूं मिस्टर आर के गुप्ता"
अशी वॉर्निंग देतो आणि कोणी मित्र मैत्रीण भेटायला वेळ देत नसेल ,नखरे करत असेल तर "फिर किसी दिन मेरे पास वक्त नही होगा मिस्टर आर के गुप्ता" असे आपसूक सुनावले जाते.
आता हे "मिस्टर आर के गुप्ता" प्रकरण काय आहे ? संजीवकुमारच्या किरदाराचे नाव आहे. यात हे नाव अमिताभ प्रत्येक वेळेस संपूर्ण उच्चारतो एक दोन अपवाद वगळता. यात कोणाला काही खटकले का ? हे सहज झालेले नसावे . काहीतरी कारण असावे असे तेंव्हा वाटले होते. खूप नंतर एक किस्सा ऐकला. खरे खोटे देव जाणे. तो किस्सा नंतर कधीतरी !!
त्या आरजे मुळे त्रिशूल आठवला आणि विचार केला की साला आपुनभी "ट्रिब्युट" देनाईच मंगता है !!
अमिताभ बच्चन यांना ७५ व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!
आनंद देवधर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा