मराठा आरक्षणाचा मुद्दा, ऍट्रॉसिटी कायद्यामधील बदलाची मागणी, कोपर्डी येथे घडलेल्या घटनेचा निषेध आणि नराधमांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी असो या प्रमुख मागण्यांवरून गेल्या दीड महिन्यांपासून महाराष्ट्रात मराठा समाजाने क्रांती मोर्चा काढला. "न भूतो न भविष्यती' असे महामोर्चे काढून मराठा समाजाने एकीचे दर्शन घडविले आहे.
मराठा समाज कधीही एकत्र येत नाही. एकमेकांचे पाय ओढण्यात समाधान मानतो, असा शेकडो वर्षांपासूनचा मराठा समाजाविषयी असणारा समज 21 व्या शतकातील जिगरबाज मराठ्यांनी दूर केला आहे. मराठे एकत्र येत आहेत. त्यांना समाजातील इतर घटकांचाही पाठींबा मिळत आहे. अगदी मुस्लिम समाजसुद्धा खांद्याला खांदा लाऊन मराठ्यांच्या मोर्चात सहभागी झाला आहे. याची कारणे अनेक आहेत. यापैकी एक कारण मराठा समाजामध्ये नेतृत्व करण्याचा उपजत असलेला गुण आहे.
मराठा पुढे चालु लागला की आपोआप सारे गांव, सारे शहर, अवघे राज्य आपोआप मागे येते. याचा प्रत्यक्ष अनुभव गेल्या काही दिवसांत आला आहे. लाखोंचा समाज एकत्र झाला. मोर्चाला स्वातंत्र्य काळातील क्रांतीला साजेसे असं नाव देण्यात आलं आहे. नेतृत्वाशिवाय एकत्र येऊन एका विशिष्ठ मागणीसाठी समाज गोळा झाला, ही खरंच एक क्रांती आहे. आता यापुढे जाऊन मराठा समाजाने ही एकी टिकवत समाजाचा सर्वांगिण विकास करण्यासाठी काळाबरोबर बदलण्याची गरज निर्माण झाली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली 350 वर्षांपूर्वी स्वराज्य निर्मितीसाठी मराठा समाज एकवटला होता. तो मराठा म्हणजे केवळ जातीचा मराठा नव्हता तर मराठी भाषा बोलणारा अवघा समाज होता. स्वराज्य निर्मितीसाठी छत्रपतींना अवघ्या समाजाने साथ दिलीच शिवाय त्यांच्या मदतीसाठी मुस्लिम मावळेही धावून आले होते. छत्रपतींनी स्वराज्य निर्मितीसाठी घेतलेला ध्यास, स्वराज्य मिळविल्यानंतर राबविलेले शिवराज्य याचा आदर्श घेवून आजची पिढी मार्गक्रमण करीत आहे. खरा शिवाजीराजा खूप कमी लोकांना समजला आहे. छत्रपतींनी स्वराज्याच्या दुष्मनांना, आपल्यातील आणि मोगलांमधील दुष्प्रवृत्तींना तसेच रयतेवर अन्याय करणाऱ्यांना, आया-बहिणींच्या अब्रुवर वाईट नजर ठेवणाऱ्या प्रवृत्तींना ठेचून काढले होते.
350 वर्षांपूर्वीचे हे स्वराज्य पुन्हा अस्तित्वात यावे, राज्यात शिवशाही अवतरावी अशी सर्वसामान्य मराठी जनतेची इच्छा होती व आहे. मात्र अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार होऊन तिचा निर्घृणपणे खून झाला. . या सर्व गोष्टींविरोधात संतापाची ठिणगी पडली. पेटून उठलेला मराठा समाज मोर्चा काढताना त्याला समाजातील सर्व घटक पाठींबा देतात. पुढे या ठिणगीचा भडका राज्यभर उडतो. सुरूवातीला हजारोंच्या संख्येने या प्रवृत्तीविरोधात मोर्चे निघतात. पुढे आकडा लाखांवर जातोे, लाखोंवर जातो. या सर्वाच्या पाठीमागे कोणताही नेता, मंत्री नसतानाही लोक गोळा होतात. पुढे पेटून उठलेला समाज स्वयंस्फुर्तीने यात सहभागी होतो. याला क्रांतीच म्हणले पाहिजे !
साताऱ्यामध्ये 3 ऑक्टोबरला झालेल्या महाविराट मोर्चामध्ये जिल्ह्यातील सर्व भागांतून, गावागावांतून, घराघरांतून लोक आले होते. जिल्ह्यातील सर्व मोठ्या शहराच्या बाजारपेठा, दुकाने, आर्थिक व्यवहार, हॉटेल्स, दळण-वळण बंद ठेवून लोक मोर्चात सहभागी झाले. मोर्चाला चला असे सांगायला, निमंत्रण द्यायला गावातील कोणीही नेता आला नव्हता. कोणीही आग्रह केला नव्हता. पत्रिका पाठविली नव्हती. प्रलोभन दाखविले नव्हते. तरीही पहाटेपासूनच लगीन घाईच्यावर परिस्थिती गावागांवात, घराघरात होती. जेवणाची शिदोरी, पाणी बॉटल घेऊन लोक घराबाहेर पडले.
ट्रक, टेम्पो, ट्रॅव्हल्स, एसटी, जीप, कार आणि दुचाकी अशा मिळेल त्या वाहनाने राजधानी साताऱ्याकडे निघाले. सातारा शहराने या पूर्वी कधीही एवढी माणसे पाहिली नसतील. इतकी गर्दी झाली होती. मोर्चा यशस्वी झाला. स्फुल्लिंग पेटलेला मराठा राजधानीत पहायला मिळाला. ही सर्व मराठा समाजाच्यादृष्टीने जमेची बाजू आहे. मराठा समाज एकत्र येणे हीच मोठी क्रांती होती, ती झाली. हा झाला आंदोलनाचा, मोर्चाचा पहिला टप्पा. खरी क्रांती या पुढील काळात होणे अपेक्षित आहे. यासाठी खालचा, वरचा, कमीतला, कुणबी, 96 कुळी, भारीतला आणि इतर सर्व विभागात विभागलेल्या मराठा समाजाने केवळ मराठा याच झेंड्याखाली एकत्र राहण्याची गरज आहे.
मराठा आरक्षण हा विषय या समाजाच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे. हे आरक्षण मिळविणे फार अवघड नाही, तो हक्कच आहे. मुळात या समाजाला आरक्षणाची गरज आहे, हाच मुद्दा स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्रात सत्तेवर आलेल्या कोणाही नेत्याला कळला नाही. एकत्र कुटुंब पद्धतीत हा समाज वाढला. काळानुरूप कुटुंबे विभक्त झाली. 10-15 एकर शेती असणारा शेतकरी दोन एकरवर येऊन पोहोचला. पुढे त्याचे कुटुंब वाढले आणि मग त्याचा शेतकरी मुलगा अर्ध्या गुंठ्यावर येऊन पोहोचला.
महाराष्ट्रात असलेल्या मराठा समाजापैकी जमीनदार, कारखानदार, राजकीय घराणे, शिक्षणसम्राट, उद्योगपती यांचे प्रमाण केवळ 5 टक्के आहे. उरलेल्या 95 टक्के लोकांपैकी 36 टक्के लोक भूमीहिन आहेत. तर 8 टक्के लोक दारिद्रयरेषेखाली आहेत. 1 ते 2 एकर शेतजमीन असणाऱ्या मराठा समाजातील शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. हा शेतकरी जागतिकीकरण, वाढलेला शेतीखर्च, त्यामानाने खूप कमी प्रमाणात मिळणारे उत्पन्न आणि कर्जफेडीची गणितं न जुळाल्यामुळे अक्षरश: खचून गेला आहे. मुलांचे शिक्षण, मुलींची लग्ने याचा वाढलेला खर्च परवडत नसल्यामुळे आणि शेतीतून काही मिळत नाही अशी परिस्थिती झाल्यामुळे या शेतकऱ्यांच्या घरात अस्वस्थता वाढली आहे. तरीही कर्ज काढून, जमिनी गहाण ठेवून शेतकरी मुला-मुलींना शिकवितो. पण नोकऱ्या मिळत नाहीत. गुणवत्ता चांगली असूनही केवळ मराठा आहे म्हणून नोकरी न मिळाल्याने किंवा उच्च शिक्षणासाठी संधी न मिळालेल्या युवा वर्गात असंतोष खदखदून वाहत आहे.
चांगली परिस्थिती असणारा शेतीतून भरघोस उत्पन्न मिळवणारा शेतकरी, गुंठ्यात शेती पिकविणारा सामान्य मराठा शेतकरी आणि शेतीच नसणारा दारिद्र्रय रेषेखालील मराठा याला एकाच तराजूत तोलले जात आहे. याचा विचार राज्यकर्त्यांनी कधीच केला नाही. मिळालेले मराठा आरक्षण काढून घेण्यात आले. पुन्हा देण्यासाठी टाळाटाळ सुरू झाली. नेतृत्व करणारे मराठे नेतेच मराठी समाजाला विसरले. निवडून येण्यासाठी मतांची गणिते करताना मराठा समाजाला नेहमी गृहित धरले, मात्र त्यांच्या मागण्यांचा, दुखण्यांचा कधीच विचार केला नाही. यामध्ये खरे तर आपलेही (मराठा समाजाचे) चुकलेच. आपण प्रत्येक वेळी नेत्यांच्या पाठीमागे फरफटत गेलो, पण ही बाब लक्षात आल्यानेच मराठा क्रांती मोर्चात मराठा समाजाने नेत्यांना बाजुला ठेवले. किंबहुना त्यामुळेच समाज एकत्र येऊ शकला.
यापुढील काळातही नेत्यांना बाजुला ठेवून फक्त मराठा समाजाची प्रगती याच मुद्यावर या समाजाने एकत्र राहण्याची आवश्यकता आहे आणि हीच एकजूट कायम राहिली तर मराठा नेत्यांना समाजाच्या पाठीमागे यावंच लागेल.
मी मराठा.., मी 96 कुळी, मी वरच्यातला, तो खालच्यातला, ते आमच्यात बसत नाहीत.., वाडीचा असल्यामुळे सोयरीक होत नाही. यांसारखे तुक्कड विचार बाजूला सारून फक्त एक मराठा... लाख मराठा या प्रेरणेने सारा मराठा समाज आता एक झाला आहे. यापुढील काळात माझ्यासहीत मराठा जातीच्या सर्व कुटुंबाची प्रगती यातच माझे सौख्य सामावले आहे, अशी प्रतिज्ञा घेऊन दृढ निश्चयाने समाजाच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे.
मी मराठा.., मी 96 कुळी, मी वरच्यातला, तो खालच्यातला, ते आमच्यात बसत नाहीत.., वाडीचा असल्यामुळे सोयरीक होत नाही. यांसारखे तुक्कड विचार बाजूला सारून फक्त एक मराठा... लाख मराठा या प्रेरणेने सारा मराठा समाज आता एक झाला आहे. यापुढील काळात माझ्यासहीत मराठा जातीच्या सर्व कुटुंबाची प्रगती यातच माझे सौख्य सामावले आहे, अशी प्रतिज्ञा घेऊन दृढ निश्चयाने समाजाच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे.
गावागावांत राजकीय गट आहेत. हे तर राजकारणापुरतेच ठेवून समाजाची प्रगती या मुद्यावर यापुढील काळात मराठा क्रांतीच्या झेंड्याखाली सर्वांनी एकी टिकवत वाटचाल केली पाहिजे. मुस्लीम समाजाच्या एकीचे उदाहरण नेहमी दिले जाते. हा समाज सर्वच क्षेत्रांमध्ये काम करताना दिसतो. राजकीय गट-तट याही समाजात आहेत. पण मुस्लिम समाजाच्या हिताचा विषय आला की सारे जण एकत्र येतात. कोठूनही उभे रहा, सत्ता मिळवा, कोणताही उद्योग करा, एकत्र रहा, आपल्या समाजाची प्रगती करा, असा नारा हा समाज देतो. उद्योगात, नोकरीत, समाजकारणात, राजकारणात हा समाज जातबंधुंना मदतीला धावून जातो. हाच आदर्श मराठा समाजाने यापुढील काळात घेतला पाहिजे.
मराठा मोर्चातील एकीमुळे गावागावांत मराठ्यांचा आता प्रचंड असा मराठा दबाव गट निर्माण झाला आहे. हा दबाव कायम ठेवण्यासाठी फक्त मराठा या छत्राखाली एकत्र राहण्याची गरज आहे. निवडणुका येतील.. जातील. निवडणुकीत जिंकणारे मराठा प्रतिनिधी त्यांच्या पातळीवर मराठा समाजासाठी काम करतील. निवडणुका दरम्यान आणि निवडणुका संपल्यानंतर मराठा या एकाच झेंड्याखाली पुन्हा-पुन्हा एकत्रित राहिलो तरच फायदा मराठा समाजाचा होणार आहे. इतर सर्व समाज त्यांच्या मागण्यांसाठी एकत्र येतात. निवडणुका संपल्यानंतर पुन्हा फक्त स्वत:चा कसा फायदा होईल, हे पाहतात. तसंच या पुढीलही काळात मराठा समाजाने स्व:जातीचे हित पाहिले पाहिजे. आपण एकत्र राहिलो तरच राज्यकर्त्यांना आपली किंमत कळेल. आपल्या मागण्या तर मान्य होतीलच शिवाय खोटे गुन्हे दाखल करणारे आणि त्यांच्या मागून राजकारण करणाऱ्या आपल्यातीलच लोकांना धडा मिळेल.
फक्त शेतीवरच अवलंबून असलेल्या मराठा समाजाने आता उद्योग-धंद्यांबरोबरच शिक्षणाकडेही लक्ष द्यायला हवे. गावागावांत आयपीएस, आयएएस अधिकारी तयार झाले पाहिजेत. आपली मुलं शिकली पाहिजेत. "फक्त शेतीवरच तुझं भागणार नाही', "तुला शिकावं लागेल', "मोठा अधिकारी व्हावे लागेल' असं आपल्या पोराबाळांच्या मनावर लहानपणापासूनच बिंबविले पाहिजे. मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्यायला हवे. शिक्षण क्षेत्रात किंवा उच्च पदावर मक्तेदारी असणाऱ्या एखाद्या समाजाला नावे ठेवत बसण्यापेक्षा तो समाज त्या पदावर शिक्षणामुळेच पोहोचला आहे, याचे भान ठेवले पाहिजे. त्या समाजाविषयी बोलण्यापेक्षा आपण शिकून त्यांच्यापेक्षा मोठे कसे होता येईल याचा आजच्या तरुणांनी विचार करण्याची गरज आहे.
एक चांगले उदाहरण नेहमीच सांगितले जाते. एखादी रेष ओढल्यानंतर ती पुसून लहान करण्यापेक्षा त्यापेक्षा मोठी रेष ओढण्याचा प्रयत्न केला तर लहान रेषेलाही त्याचे दु:ख वाटण्याचे कारण नाही व तेढही निर्माण होत नाही. त्यामुळ याचा विचार करून आपली मुलंही शिकविली पाहिजेत हे लक्षात घ्यायला हवे.
एकमेकांच्या मदतीला धावून जाणे हा तर मराठी लोकांचा स्थायिभाव आहे. समाजातील सर्व घटक आपले आहेत. किंबहुना सर्व घटक मिळून समाज तयार होतो. मराठा समाज आजवर कोणाच्याही विरोधात नव्हता. यापुढेही नसेल. गावागावांत सर्व लोक एकदिलाने राहतात. कोणाच्याही आरक्षणाला मराठ्यांचा विरोध नाही. हे आरक्षण कायम ठेवून आरक्षण मिळावे ही मागणी आहे. ती मान्य होईल मात्र आता सर्व बाजुला ठेवून "एक मराठा.. लाख मराठा' हा नारा पुढे कायम ठेवताना "एकत्रित मराठा... सक्षम मराठा' हा नारा कृतीत दिसला पाहिजे.
- सतीश मोरे
![]() |
| कराडच्या मराठा टीमसोबत मी पण |





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा