फॉलोअर

११ ऑक्टोबर २०१६

अमिताभ बच्चन लेख

बच्चन...
लिहायला घेतलं की त्याच्याबद्दल काय लिहिणार असा प्रश्नं मला नेहमी पडत आलाय. न कळत्या वयात त्यालाच पहिल्यांदा पाहिल्यामुळे असेल पण त्याचा अमिट ठसा एकदा उमटला तो उमटलाच. त्याच्या अभिनयबद्दल काय बोलणार, आता कंटाळा येईल इतकं बोलून झालंय. त्याची जादूच वेगळी आहे. पण तो नुसता उंचीनीच मोठा नाहीये. गुणांनी पण मोठा आहे. जिवंत दंतकथा. सुसंस्कृत, नम्र. एक प्रामाणिक माणूस, सगळी कर्तव्यं पार पाडणारा, कुणाचाही रूपया न बुडवणारा, संकटांना सामोरा जाणारा आणि हरलेली बाजी जिंकणारा. नम्रता आणि कृतज्ञता हे त्याचे सर्वात मोठे गुण आहेत. या सगळ्यासाठी तो मला जास्ती आवडती आणि आदरणीय आहे. लोक सगळ्या बाजूनी बोलतात पण सगळ्या बाजूंवर बोलत नाहीत. 'हत्ती आणि सहा आंधळे' या बोधकथेसारखा तो प्रत्येकाला वेगळा दिसू शकेल. त्यामुळे मला ज्यासाठी आवडला तसाच दुस-यांना आवडेल असं नाही.
माणूस एकदा प्रेमात पडला की  दोष दिसत नाहीत किंवा दिसले तरी खुपत नाहीत. व्यक्तिपूजा हा आपला राष्ट्रगुण आहे. तरीपण त्याचा 'मृत्यूदाता' पहाताना मी काळझोप लागल्यासारखा झोपलो होतो, 'मर्द',  'गंगा जमना सरस्वती', 'आज का अर्जुन' बघताना तुफान हसलो होतो, 'इन्सानियत' बघताना लाजून काळवंडलो होतो. 'जादूगर', 'अजूबा', 'तुफान' मी अजून पूर्ण बघू शकलेलो नाही. 'द लास्ट लिअर' मी पाहिलेला नाही. तसे त्याचे बरेच नविन चित्रपट मी पाहिलेले नाहीत. त्यामुळे माझं काही अडलेलंही नाही. त्याचे 'डॉन', 'मुकद्दर का...'. 'अमर अकबर...', 'चुपके चुपके', 'मिली', 'अभिमान', 'त्रिशूल', 'काला पत्थर', 'फरार', 'दिवार', 'सत्ते पे सत्ता', 'अग्नीपथ', 'आखरी रास्ता' 'सौदागर', 'मजबूर' आणि एक छोटासा हिट 'शोले' पुरेसे आहेत. 'सुहाग', 'कस्मे वादे',  'कालिया', 'शहेनशाह', 'देशप्रेमी', 'हम', 'खुदा गवाह', 'दोस्ताना', 'हेरा फेरी' चॅनल बदलताना दिसले तर क्षणिक घुटमळायला बरे आहेत. (लिस्ट थांबवण्यात येत आहे, किती लिहिणार ना).
त्याची माणुसकी अफाट आहे जी मला कायम मोह घालत आली आहे. कुठेही वाच्यता न करता चांगलं काहीतरी करत रहाणं अवघड असतं. 'इन्सानियत' टिटो टोनीचा ('राम बलराम', 'दो अंजाने' त्याचेच) होता. ८९ ला सुरु झालेला सिनेमा नूतन, विनोद मेहरा गेल्यामुळे तसाही रखडलाच होता. तो, सनी, चंकी, सोनम, रविना, जयाप्रदा अशी एकदाच एकत्रं आलेली स्टारकास्ट होती. तेंव्हा बच्चनचा वाईटकाळ होता. तरीपण ९४ ला फिल्म रिलीज झाली. आपटणार हे कन्फर्म होतं. पण बच्चनचा सिनेमा एक आठवडा भारतभर चालला तरी कॉस्ट वसूल होते म्हणून त्यानी  फिल्म पूर्ण केली. त्याच्या करिअरला फटका बसलेलाच होता, हा रिलीज करून अजून खपली निघणार होती पण तरीही त्यानी मान्यता दिली. निर्माता आयुष्यातून उठला नाही त्यामुळे. रस्त्यावर आलेल्या नरिमन इराणीला नफ्यात आणण्यासाठी तो, झीनत आणि चंद्रा बारोटनी डॉन कसा केला हे सांगून झालंय म्हणून इथे पोस्ट वाढवत नाही.
आई बाप सुसंस्कृत असले म्हणजे मुलं असतीलंच असं नाही. सुनील दत्तनी 'यादें' मधे दिलेला पहिला रोल तो आजपर्यंत विसरलेला नाहीये. 'रेश्मा और शेरा' मधे ऐनवेळी रोल अदलाबदली झाले आणि बच्चन मुका झाला आणि विनोद खन्ना बोलका पण सुनील दत्तच्या शब्दावर तो काही बोलला नाही. संजय दत्तच्या पाठीशी परतफेड म्हणून तो कायम उभा असतो. 'नाम' (सलीमचा एकट्याचा 'दिवार') रिलीज झाल्यावर त्याने त्याला सोन्याची साखळी आणि पत्रं दिलं होतं. 'सात हिंदुस्थानी'मध्ये संधी देणा-या ख्वाजा अहमद अब्बास यांच्या आजारपणात त्यानी त्यांची काळजी घेतली होती. पंकज पराशरच्या पहिल्या मोठ्या चित्रपटासाठी ('जलवा') त्यानी दोस्तीत स्पेशल अपिअरन्स केला होता. रजनीकांतच्या हिंदीत एंट्रीसाठी 'अंधा कानून' केला. माणूस भिडस्तं असणार त्याशिवाय कर्जबाजारी नसता झाला. बोफोर्स प्रकरणात एकदाही आक्रस्ताळं तो बोलल्याचं मला आठवत नाही.
दुर्धर 'मायस्थेनिया ग्रेव्हीस', पुनीत इस्सारबरोबरची फायटिंग, टी.बी.सगळ्यातून तरला, दिवाळखोरीच्या उंबरठ्यावरून परत आला. रेखा, परवीन, माधवी अनेक नावं जोडून झाली, तो एक शब्दंही कधी बोलला नाही. 'बावर्ची'च्या सेटवर तो जयाला घ्यायला जायचा तेंव्हा खन्ना त्याच्याशी बोलणं लांब, ओळख सुद्धा द्यायचा नाही पण तो एक शब्दंही कधी बोलला नाही, उलट त्याला कायम पहिला सुपरस्टार म्हणून वंदत आला. बोफोर्स मधून निर्दोष सुटला म्हणून 'जितं मया' करत बोलत सुटला नाही. पेशंस पाहिजेत बॉस. मला त्याला बघितलं की एक शेर आठवतो, 'अपने खिलाफ बातोंको अक्सर मैं खामोशी से सुनता हूं ... क्योंकी...जवाब देनेका हक मैंने वक्तको दे रखा है'! आदर्श असे गल्लोगल्ली मिळत नसतात. आपल्याला सोयीस्कर असतो तो आदर्श नसतो, त्याच्यासारखं वागणं, जगणं आपल्याला जमणार नाही असं वाटून जातं तो माणूस 'आदर्श' असतो.
त्याच्या सुसंस्कृतपणाचा एक फारसा प्रसिद्ध नसलेला किस्सा आहे. खूप वर्ष झाली. प्रसिद्ध गोगटे कुटुंबियांकडून तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबईच्या एका पंचतारांकित हॉटेल मधे त्याचा सत्कार झाला होता. कसला तरी पुरस्कार प्रदानाचा कार्यक्रम होता. सत्कार झाला, भाषणं झाली. सगळ्यांना मंत्रमुग्ध करून तो निघाला. मग मागे मुख्यमंत्री, गोगटे कुटुंबीय व इतर मान्यवर गप्पा मारत उभे होते. उत्सवमूर्ती गेल्यामुळे काही लोक बाहेर गप्पा मारायला आले. बघतात तर काय, तो पार्किंग मधे गाडीला टेकून उभा. एकजण अचंबित होऊन पुढे गेला (ज्यानी मला हा किस्सा सांगितलाय तो). कारण विचारलं, काही राहिलंय का, कुणी येणार आहे का? नाहीतर आत चला, मी थांबतो कुणी येणार असेल तर.त्यानी दिलेलं उत्तर वेड लावणारं  होतं. "नाही, तसं काही नाही, पण मुख्यमंत्री हे राज्याचे प्रथम नागरिक आहेत, त्यांनी गेल्यावर आपण जायचं हा शिष्टाचार आहे. म्हणून थांबलोय." बातमी वा-यासारखी पसरली. मग मुख्यमंत्री गेले मग हा गुणांनी पण उंच असलेला माणूस गेला.  बारा फुटी फ्लेक्स लावून उपयोग नाही अशी उंची गाठण्यासाठी मुळात असावं लागतं ते. 'वाहतो ही दुर्वांची जुडी' मधे (चू.भू.दे.घे.) बाळ कोल्हटकर फार सुंदर म्हणून गेले आहेत - "नियतीने उत्कर्षाच्या प्रत्येक क्षणी एक घसरण्याचा क्षण ठेवलेला असतो". उंचीवर पोचलेला माणूस म्हणजे सतत स्लीपर घालून तेल सांडलेल्या जमिनीवरून चालणारा माणूस. एक क्षण पुरतो पतन व्हायला. म्हणून त्याच्याकडे बघून मी एवढंच शिकलोय आणि लक्षात ठेवलंय की 'मान वर हवी ती अजून किती उंची गाठायची आहे ते बघण्याकरता, नाहीतर ठेच आहेच'.
आमची पिढी सगळ्यात नशीबवान. आम्ही लता, आशा, सचिन, द्रविड, मार्शल, रिचर्ड्स, अमिताभ, प्राण, आरडी, किशोर पाहिले, ऐकले. चौ-याहत्तर वर्षांचा झाला तो आज. तो अमर नाही, आपणही नाही. पण तो अजरामर आहे.
पुढली अनेक शतके थेटरात अंधार होईल, डोअरकीपर दरवाजे लावेल, टायटल्स संपतील आणि मग त्याचा संमोहनाचा खेळ सत्तर एमएमवर चालू होईल. त्याच्या चेह-यावर हलणारी नस, डोळ्यांपाशी होणारी मायक्रो हालचाल, गळ्याशी ताणल्या जाणा-या शिरा, तो अंगावर काटा आणणारा आवाज, कुठल्याही भूमिकेतला तो सुसंस्कृत, अभ्यासपूर्ण वावर - काय बोलू, तुझे ऋणको आहोत आम्ही. 
जयंत विद्वांस

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...