फॉलोअर

२१ ऑक्टोबर २०१६

कराड पत्रकार भवन : प्रवास आणि प्रवासी भाग 1

ठिकाण...
वर्षा मुख्यमंत्री निवासस्थान
दिनांक... 22 मे 2013.

कराडच्या पत्रकारांचे माझ्या वाटचालीत फार मोठ्ठे योगदान आहे,
तुम्ही लोक कधीच माझ्या कडे काहीच मागायला येत नाही.
पण मला तुमच्या साठी काहीतरी करायची इच्छा आहे. 
काहीही सार्वजनिक काम घेऊन या .....  ना. पृथ्वीराज चव्हाण, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य.

या दिवशी सहकुटुंब सहपरीवार आम्ही मुंबईला गेलो होतो, निमित्त होते माझ्या  लग्नाचा वाढदिवस. बाबांसमवेत फोटोसेशन, चर्चा झाली. या दरम्यान माझ्या सोबत बोलताना झालेला बाबांचा वरील संवाद मला आठवतोय.

बाबा मुख्यमंत्री होऊन तीन वर्षे झाली होती. मुख्यमंत्री पद कराडला मिळाल्याने कराडचे नाव तर उंचावले होतेच, पण आम्हा कराडच्या पत्रकारांचे काम आणि सन्मान पण वाढला होता. माझे मुंबई दौरे तर वाढले होतेच शिवाय आमच्या संपादक साहेबाच्या सुचनेनुसार कार्यालयीन कामानिमित्ताने कोल्हापूरला येणेजाणे पण वाढले होते. जेथे जाईल तेथे या मुख्यमंत्याच्या गावचे पत्रकार म्हणून सन्मान मिळायचा. या बाबांच्या जवळचे पत्रकार म्हणून वेगळी ट्रिंटमेंट मिळत होती. माझ्यासहित कराडच्या कोणीही पत्रकारांनी या सर्व बाबींचा कधीच  फायदा घेतला नाही. 

मुख्यमंत्री दौरा कराडला सारखा असायचा, पण या दरम्यान बातमी विषय सोडला तर आम्ही पत्रकार कधीच बाबांकडे गेलो नाही, जात नव्हतो. कधीच त्याना काही मागीतले नाही. कदाचित हीच गोष्ट बाबांना जास्त आवडली असावी आणि त्यामुळेच मी जेव्हा सहकुटुंब  वर्षावर गेलो तेव्हा बाबांनी मला वेळ दिलाच, कुटुंबाची चौकशी केलीच आणि कराडच्या पत्रकाराविषयी काही तरी करायची इच्छा बोलून दाखविली.

मुख्यमंत्री कार्यालय मंत्रालय मुंबई 


आमचे मित्र सचिन शिंदे पंढरीची वारी करून आले होते, या निमित्ताने त्याचा सत्कार, वारी अनुभव कथन अशा संयुक्त कार्यक्रमासाठी आम्ही प्रमुख पत्रकार कराड विश्रामगृहात जमलो होतो. यावेळी मुख्यमंत्री म्हणून बाबांनी माझा समोर व्यक्त केलेली इच्छा मी सर्वांना सांगीतली. देवदास मुळे, सचिन देशमुख, सचिन शिंदे, शशिकांत पाटील, गोरख तावरे आम्ही सारे जण या विषयावर बोललो. बरीच चर्चा झाली काय मागावे बाबांना यावर उवापोह झाला . शहरातील पत्रकारांना घरे मिळाली पाहिजेत, प्लाॅट हवा आहे, पत्रकार काॅलनी उभी राहिली पाहिजे, पत्रकार भवन पाहिजे, असा मतप्रवाह आला.

पत्रकार काॅलनी किवा नगर असाव असा विचार पुढे येऊन जागेचा शोध सुरू झाला. शहरात कुठेच शासकीय भुखंड उपलब्ध नसल्याची माहिती कळल्यावर लगतच्या गावात शोध घेतला. तहसीलदार कार्यालयातील अधिकार्यसोबत जवळचे संबंध असलेले  हेमंत पवार यांनी माहिती काढली. सैदापूरात आय टी आय शेजारी शासकीय जागा पहायला आम्ही सारे जण गेलो. जागेचे उतारे काढले, मागणी प्रस्ताव तयार केला.  त्यावेळी पुण्या मुंबईच्या धर्तीवर  शहरातील सर्व पत्रकारांचा क्लब असावा अशी कल्पना पुढे आली.  प्रेस क्लब ऑफ कराड असे नाव मी सुचविले, प्रस्ताव पत्र तयार केले. 


मुख्यमंत्री कराड दौर्‍यावर आल्यावर विश्रामगृहात आम्ही सारे जण पुन्हा त्यांना भेटलो. सोबत गृहराज्य मंत्री सतेज पाटील,  आनंदराव पाटील, ओएसडी धनाजी तोरस्कर होते. आम्ही जागेची मागणी केली. स्पष्टता, पारदर्शकता आणि सडेतोडपणा हा बाबांचा स्थायी स्वभाव आहे, हे आम्हाला माहीत होते. यावेळी त्याचा अनुभव आला. राज्यात कुठेही,  कुणालाही, खाजगी संस्थांना शासकीय जागा द्यायच्या नाहीत, असा मी आणि माझ्या मंत्री मंडळाने धोरणात्मक निर्णय घेतला आहे,  त्यामुळे तुम्हाला मी ही जागा देऊ शकत नाही, असे स्पष्ट करून बाबांनी आम्हाला नकार दिला. थोडे वाईट वाटले, पण झुलवत ठेवणारा हा नेता नाही, याचा आनंदही झाला. पत्रकार काॅलनीचा विषय संपला. काही दिवस हा विषय थंड पडला.


कराड विश्रामगृह येथे मुख्यमंत्यासोबत चर्चा 


परत आम्ही सारे एकत्र आलो. आता पुढे काय करायचे, आम्ही पुन्हा विचार सुरू केला. पत्रकार भवनाचा मुद्दा पुढे आला.  कराडात स्थानिक, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर प्रिंट आणि  इलेक्ट्राॅनिक्स मिडिया मधील सुमारे 80 लोक काम करतात , या सर्वाना  एकत्र येण्यासाठी,  प्रेस घेण्यासाठी, खाजगी कार्यक्रम घेण्यासाठी तसेच मिडियातील घडामोडी वर चर्चा करण्यासाठी एखादी जागा असावी ,असा विचार पुढे आला. शहरातील सर्व प्रमुख पत्रकारासोबत चर्चा सुरू केली. दोन्ही बाजूने विचार पुढे आले. काहींनी नाके मुरडली,  अनेकांनी पाठिंबा दिला, पुढे जायचा सल्ला दिला.

पत्रकार भवन कुठे बांधायचे, जागा हवी , तसा प्रस्ताव सादर करायला हवा, याचा विचार करून आम्ही सर्व जण बसलो तेव्हा कराड शहरात नगरपालिकेच्या अनेक जागा आहेत, तिथे आपल्याला जागा मिळेल, असा विचार पुढे आला. याबाबत लोकशाही आघाडी अध्यक्ष सुभाषराव पाटील, तत्कालिन उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी खुप सहकार्य केले.  सचिन देशमुख यांनी या कामी पालिका पदाधिकारी आणि अधिकारी याचा पिच्छा धरला, कामासाठी खुप वेळ दिला. सुभाषकाकानी पालिका अधिकारी वर्गाला बोलावून माहिती मागितली, जागा आम्हाला सुचवल्या, दाखवल्या.

छत्रपती संभाजी महाराज मार्केट मध्ये दुसर्‍या मजल्यावर असणारी जागा पसंत पडली . सर्व शासकीय कार्यालये, दैनिकाची ऑफिसेस तसेच मध्यवर्ती ठिकाण  आणि मुबलक पार्किंग याचा विचार करता ही जागा सर्वोत्तम होती. आम्ही  पालिकेकडे रितसर मागणी केली, सर्वसाधारण सभेत त्याला एकमताने  मंजुरी मिळाली.  त्यानंतर सर्व बाजूंनी विचार करून प्रस्ताव तयार केला आणि तयारीनिशी आम्ही पुन्हा बाबांकडे गेलो. सोबत मुख्याधिकारी प्रशांत थोडे सर्व कागदपत्रे, ठराव, प्लॅन घेऊन आले होते.  बाबांनी माहिती घेतली,  त्या पत्रावर हिरव्या पेनने शेरा मारून मी हे काम मंजूर केले आहे, असे बाबांनी सांगितले.


आम्ही खुप खुश झालो. चला आपले काम झाले म्हणून आनंद झाला. एक महत्त्वाचा टप्पा पार पडला होता,  पण खरे काम यापुढे होते. फक्त सही होऊन चालत नाही,  पुढे पाठपुरावा खुप करावा लागतो, मुंबईला जावे लागते, असा सल्ला काहीनी दिला. धनाजी तोरस्कर यांनी या कामी महत्त्वाच्या टिप्स दिल्या. विधानसभा अधिवेशन काळात आम्ही काही जण मुंबईत असायचोच. पुन पुन्हा बाबांना भेटलो. या दरम्यान गृहराज्य मंत्री सतेज पाटील यांनी खुप सहकार्य केले. सचिव,  प्रधान सचिव,  वित्त विभाग आदी वरिष्ठ अधिकार्याना स्वत फोन करून हे बाबांच्या गावचे काम आहे. लवकर पुढील कार्यवाही करा, बजेट तरतुदी साठी प्रस्ताव सादर करा, अशा सूचना बंटी साहेबांनी दिल्या. आमदार बाळासाहेब पाटील यांनी सुद्धा हे काम लवकर व्हावे यासाठी मंत्रालय पातळीवर सहकार्य केले. मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी कुठे, कसे जायचे, कुणाला भेटायचे याचे सतत मार्गदर्शन केले.

ऑगस्ट 2014 मध्ये सरकारला निवडणुकीचे वेध लागले होते. लवकर निधी वर्ग होण्यासाठी आम्ही हेलपाटे वाढवले.  सुदैवाने मला पुढारीच्या कामा निमित्ताने या काळात खुप वेळा मुंबईला जावे लागले होते. त्यामुळे वेळ मिळत गेला. माझे  सहकारी सचिन देशमुख,  देवदास मुळे आणि प्रमोद सुकरे कराडात बसून सुत्रे हलवत होते,  तर गोरख तावरे,  शशिकांत पाटील आणि मी मुंबईत तळ ठोकून होतो. खुप मोठ्या घडामोडी होत होत्या. मंत्रालयात, विधानभवनात, वर्षा वर जिथे भेटेल तेथे बाबांकडे पाठपुरावा सुरू होता. 

सरकार मध्ये हालचाली गतीमान झाल्या होत्या. आम्हाला  आमची काळजी लागली होती.  पुढारीच्या कामासाठी सलग 19 दिवस मी मुंबईत मुक्कामी होतो. अधून मधून तावरे येत राहिले.  माझ्या कामाचा पाठपुरावा झाला की लगेच बाबांना पत्रकार भवनाचे निधीची आठवण करून देत होतो. मुख्यमंत्य्याचे ओएसडी तोरस्कर,  प्रमोद शिंदे आणि खाजगी सहायक गजानन आवळकर यांना भेटून फाॅलोअप चालूच ठेवला.

कराड पत्रकार भवनासाठी 55 लाख रूपयांचा निधी उपलब्ध झाला आहे, या आशयाचा जी आर 5 सप्टेंबर 2014 रोजी महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर अपलोड झाला आहे, अशी माहिती फोनवरून तोरस्कर साहेबांनी कळवली. हा निधी जिल्हाधिकारी साताराकडे वर्ग झाल्याचा उल्लेख त्यात होता. याच दरम्यान  आम्ही मुंबई येथे होतो. मुख्यमंत्री कार्यालयात जाऊन बाबांची भेट घेतली, आभार मानले.  जी आरची प्रिंट काढली. सर्वाना कळवले, आणखी महत्वाचा एक टप्पा पार पडला होता   .

              .........पुर्वार्ध (2013-2014)

            (दुसरा भाग उत्तरार्ध 2014 -2016 लवकरच )


अत्यंत महत्वाचं :
कराड शहरातील सर्व पत्रकार मित्रानी
या कामी खुप मोठे सहकार्य, पाठबळ दिले आहे.
तुम्ही करताय, करत रहा, असा विश्वास दिला.
किंबहुना सर्वामुळेच हे शक्य झाले आहे.

               .....सतीश मोरे


Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...