माझेकरवडीकराड
नमस्कार,
11 मार्च 2016 रोजी या भावनेने माझे करवडीकराड हा ब्लॉग मी सुरू केला. तसं पाहिलं तर ब्लॉग लिखाण ही कल्पना आपल्या भागात नवी होती. ब्लॉग कसा वाचायचा, लिंक कशी ओपन करायची याची काही कल्पना नसल्याने सुरू केल्यावर सुरूवातीला कमी प्रतिसाद मिळाला. पुढे लोकांना माहिती दिली, झाली. गेल्या सहा महिन्यांत बरेच विषय शेअर केले. ऑफीस कामातील व्यस्ततेमुळे रोज लिहता आले नाही. तरीही आज अखेर 86 दिवस ब्लॉग लिखाण केले आहे.
आता ब्लॉग वाचन करणारांची संख्या वाढत चालली आहे. सोशल मीडिया वर मी ब्लॉग विषयक थोडी माहिती आणि लिंक टाकतो. लोक वाचतात, पुढे शेअर करतात. पंढरीची वारी करताना ब्लॉग वर दैनंदिनी मांडली होती. त्याला तुमच्या सारख्या वाचकांनी डोक्यावर घेतले. हळूहळू सातारा ,सांगली, कोल्हापूर जिल्ह्याबरोबर पुणे जिल्ह्यातून ब्लॉग वाचन होऊ लागला. नंतर राज्य भर माझ्या ब्लॉगची लिंक गेली. लोक वाचतात म्हटल्यावर माझापण उत्साह वाढला. ब्लॉगची मी पुढे जाऊन माहिती घेतली असता भारताबाहेर अमेरिका, युएई ,फ्रान्स, जर्मनी, चीन, सौदी अरेबिया, इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया, आयर्लंड आदी देशांत मराठी भारतीय सुद्धा माझे करवडीकराड ब्लॉग वाचन करतात. ( खालील चार्ट पहा )
सहा महिन्यात आज अखेर 86 ब्लॉग पोस्ट केल्या,
या पोस्ट 10000 वाचकांनी पाहिल्या, वाचल्या.
हा आकडा फार मोठा आहे. मला प्रेरणा, स्फूर्ती देणारा आहे.
मी आपल्या सर्व ब्लॉग वाचकांचे आभार मानतो, धन्यवाद देतो, कृतज्ञता व्यक्त करतो.
यापुढील काळात प्रत्येक महिन्यात किमान 15 दिवस तरी लिखाण करण्याचा विचार आहे.
माऊली, आपले आशिर्वाद राहोत.
आपलाच
सतीश मोरे
9765566202 9881191302
आपल्या प्रतिक्रियेची वाट पहात आहे.
वाचक संख्या ब्लॉग स्किनवर पाहण्याची सोय उपलब्ध केली आहे.
आज पुन्हा एकदा आपल्या साठी सर्वात पहिला ब्लॉग टाकत आहे.
Friday, March 11, 2016
माणसापेक्षा मांजरेच जास्त आडवी येतात
बिचारं मांजर आडवे आले की आपण त्याला दोष देतो, आता आपले काम होणार नाही ,
अशी अटकळ बांधतो, पुढची कामे सोडून देतो.
पण आयुष्यात आलेल्या अनुभवाचा, लागलेल्या ठेचांचा विचार केला तर
मांजरापेक्षा माणसेच आपल्या आडवी आली होती,
हे आपल्याला लक्षात येईल.
मांजर आडवे गेले की आपण थांबतो, कुणीतरी रस्ता ओलांडून पुढे जाण्याची वाट पाहतो
किंवा दोन पाऊले मागे येऊन पुन्हा चालायला सुरुवात करतो.
असे करून आपल्याला समाधान मिळते व पुढे जाऊन आपण कामाला लागतो. अंधश्रद्धा ठेऊन पुन्हा श्रद्धेने कामाला लागतो.
आयुष्यात अनेकदा चांगले काम करताना वाईट विचाराची मांजररूपी माणसे आडवी येतात. आडवे येणे हा त्यांचा स्वभाव असतो. त्यांच्या आडव्या येण्यामागे तुमचे चांगले काम बंद पाडणे हा हेतू असतो. आडवे येणाऱ्याच्या आडवे जाऊन त्यामध्ये वेळ घालविण्याची चुक शहाणे लोक करत नाहीत. मांजर आडवे आल्यावर जे आपण करतो तसेच अशा वेळी करायला हवे.
दोन पाऊले मागे येऊन दोन मिनिटे विचार करायचा.समोरचा माणूस माझ्या आडवा येतोय याचाच अर्थ मी त्याच्यापेक्षा काही तरी वेगळे करतोय, असे चांगले आणि वेगळे काम करतोय की जे त्या व्यक्तीला जमत नाही ! अशा वेळी त्या व्यक्तीला त्याचे काम करू देत.
माझे काम मी ठरवल्यानुसार पुर्ण करणारच ,असा दृढनिश्चय करून त्या मांजररूपी आडव्या आलेल्या व्यक्तीला तेथेच सोडून यायचे, डोक्यातून घरी आणू नका.
असे केले तरच आपण पुढे जाऊ शकतो. भारतीय वंशाचे थोर विचारवंत राॅबीनसिंग म्हणतात, तुम्ही जेव्हा डोक्यावर पाच दहा किलो वजनाची पाटी घेऊन चालता तेव्हा त्रास तुम्हाला होतो. त्याचप्रमाणे तुम्ही जेव्हा एखाद्या व्यक्तीला डोक्यात घेऊन जगता तेव्हा त्रास तुम्हालाच होतो. तुमच्या विषयी वाईट विचार करणारे, तुम्हाला दुषणे देणारे किंवा आडवे येणाऱ्याना तुम्ही तुमच्या डोक्यावरून, डोक्यातून काढून टाका. बघा मग तुम्हाला कसे हलके हलके वाटते. लोक तुमच्यावर जळतात तेव्हा समजायचे की तुम्ही काही तरी चांगले काम करत आहात.
परवाच मी एक विचार वाचण्यात आला,
तुम्हाला जर शिखरावर पोहचायचे असेल तर
रस्त्यावर आडवे येणाऱ्या प्रगती विरोधी भुंकणाऱ्या लोकांसाठी शक्ती वाया घालवू नका.
सोबत बिस्किटे ठेवा, त्याच्यापूढे फेका आणि पुढे चालायला लागा !
मांजरापेक्षा माणसेच जास्त आडवी येतात,हाण्यांनी थांबायचं नसतं,सतत पुढे चालत रहायचं असते !






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा