*निसर्गवारी*
_*संकल्प २२१ वृक्ष लागवडीचा*_ !
१५ जुलै २०२१
राम कृष्ण हरी माऊली
आमची निसर्गवारी गेली चौदा दिवस माऊली कृपेने अखंडपणे सुरू आहे. आज आमची निसर्ग वारी नांदगाव ते उंडाळे आयोजित होती. या वारीचे जेव्हा मी वेळापत्रक तयार केले त्यावेळी मला कसलीही कल्पना नव्हती की याच दिवशी म्हणजे १५ जुलैला ज्येष्ठ नेते विलासराव पाटील उंडाळकर यांचा जन्मदिवस आहे. दोन दिवसापूर्वी आमचे पुढारी प्रतिनिधी वैभव पाटील यांच्याशी चर्चा करताना १५जुलै काकांची जयंती आहे, असे त्यांनी मला सांगितले. त्यानंतर या ज्येष्ठ नेत्यांच्या गावात आपण जातोय तर एक झाड लावण्याऐवजी १५ झाडे लावूया असे वाटले. हा विचार उदयसिंह पाटील (दादा) यांना फोनवरून बोलून दाखवला.त्यांनी या गोष्टीला तात्काळ सहमती दर्शवली. कोरोनामुळे जयंती मोठ्या प्रमाणात होणार नाही. निसर्ग वारीच्या माध्यमातून उंडाळे ज्या ठिकाणी विलासराव काका यांच्यावर अंत्यसंस्कार झाले तिथेच आपण एक झाड लावू या आणि उरलेली झाडे गावात इतरत्र लावावी,असे सुचवले. त्यानुसार आम्ही आजच्या वारीचे नियोजन केले होते.
सकाळी सहा वाजता आम्ही कोल्हापूर नाक्यावर एकत्र आलो. आमच्या वाहनातून कालेटेक येथील नर्सरी मध्ये गेलो. याठिकाणी पत्रकार सुहास पाटील आणि सुनिल शेवाळे आमच्या स्वागतासाठी येऊन थांबले होते. नर्सरीमधून आंबा, वड, जांभूळ रोपे विकत घेतली. त्यानंतर ही रोपे यातील पंचवीस रोपे आम्ही नांदगाव पोलीस चौकीत नेऊन ठेवली, पुन्हा वाहन घेऊन नांदगाव फाट्यावर आलो. एका ओळखीच्या कार्यकर्त्यांच्या घरी वाहन उभं केलं आणि नांदगाव पासून उंडाळे पर्यंत पायी वारीला सुरवात केली.
आज वातावरण अतिशय प्रसन्न होतं. पाऊस येऊन गेला होता. सात वाजता ओंड येथे पोहोचलो. पुढे सवादे फाट्यावर आम्हाला तुळसणचे दिलिप पाटील आणि.. येऊन मिळाले. सर्व सहकार्यांसोबत आम्ही आमची वारी सुरू केली. आज बाबा महाराज सातारकर यांचा हरिपाठ आम्ही ब्लूटूथ स्पीकरवर लावला होता.वेगळ्या चालीतील हरिपाठ तितक्याच शांत वातावरणात ऐकच आम्ही आम्ही चालत राहिलो. या राज्य मार्गावर चालताना एक वेगळा फिल येत होता. रस्ता रुंदीकरण झाल्यामुळे आम्हाला आरामात चालत जाता येत होते.आमच्यासोबत माझे पत्रकार शिक्षक मित्र सुहास पाटील होते. सुहास पाटील यांच्याकडे पाहिल्यानंतर उंची छोटी मात्र कीर्ती मोठी असे त्यांचे एका ओळीत वर्णन करता येईल. सुहास यांनी विलासराव पाटील-उंडाळकर यांचा समतेचा विचार जपला आहे. ते प्राथमिक शिक्षक आहेत. विलासकाका उंडाळकर यांचेविषयी दैनिकामध्ये आलेल्या सर्व बातम्यांची कात्रणे त्यांनी जपून ठेवलेली आहेत. काही महिन्यापूर्वी त्यांनी नवीन घर बांधले या घराची वास्तुशांती त्यांनी संविधान पूजन करून केली होती. त्यांचे दुसरे सहकारी सुनील शेवाळे आमच्या सोबत चालत होते. ते उंडाळे येथील ग्रामीण शिक्षण संस्थेचे क्लार्क आहेत. शेवाळे यांनी विलासकाकां समवेत अनेक वर्षे काम केले आहे. काकांच्या निधनानंतर प्रत्येक महिन्याच्या चार तारखेला एक झाड आपल्या घराच्या परिसरात किंवा शेतात लावायचे असा त्यांनी संकल्प केला आहे आणि गेली नऊ महिने त्यांनी ९ झाडे लावलेली आहेत. काकांच्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने चार तारखेला एक तरी झाड लावावे असा त्यांचा आग्रह आहे आणि तसे आवाहन त्यांनी त्यांच्या जवळच्या मित्रमंडळींना केले आहे. शेवाळे यांचा हा संकल्प पुरा करण्यासाठी उंडाळकर प्रेमीनी विचार केला तर वर्षभरात अनेक झाडे लावू शकतात.
आता आम्ही उंडाळेच्या नवीन पुलावर पोहचलो. हा पूल नुकताच बांधून (ठेकेदाराच्या चुकीमुळे तीन जणांचे बळी घेऊन) पूर्ण झाला आहे. काही दिवसापूर्वी वाहनांसाठी खुला करण्यात आला, या पुलावर काही काळ थांबून पुढे चालत राहिलो. पावणे आठच्या सुमारास आम्ही उंडाळे येथे पोहोचलो. गावाच्या अलीकडे अर्धा किलोमीटर कृष्णाजी बुवा उंडाळकर यांनी यांच्या स्मरणार्थ बांधलेले विठ्ठल-रुक्मिणी मंदिर आहे. कृष्णाजी बुवा हे विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. कृष्णाजी बुवा हे विलासराव पाटील-उंडाळकर यांचे पणजोबा.या मंदिराच्या पाठीमागे शेतातच विलासकाका यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. याच जागेत एक झाड लावावे असा माझा आग्रह होता. त्यानुसार आम्ही त्या ठिकाणी थांबलो. विठ्ठल मंदिरात जाऊन माऊलींचे दर्शन घेतले.या मंदिरात आज एक सन्मान आम्हाला मिळाला. आज पहिल्यांदाच विठ्ठल रुक्मिणी देवाची पूजा करण्याचा मान माझ्याकडे होता. माऊलीची पूजा केली. विठ्ठल देवाची पूजा करण्याचा मान हे फार मोठं शुभसंकेत आहेत असे मी समजतो. विठ्ठल रुक्मिणी पूजा होईपर्यंत त्या ठिकाणी उदयसिंह पाटील उंडाळकर पोहोचले होते. पुन्हा त्यांच्या सोबत आम्ही विठ्ठल माऊलीचे दर्शन घेतले. औषधी काढा घेतला आणि मंदिराच्या बाहेर आलो.
विलासकाकांवर प्रेम करणारे अनेक जण त्याठिकाणी उपस्थित राहिले होते. उंडाळे ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य यांच्यासहित परिसरातील ग्रामस्थ काकांच्या जयंतीदिनी अभिवादन करण्यासाठी जमले होते. या सर्वांचा उपस्थित काकांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मंदिरा शेजारी एक झाड लावले आणि पुंडलिक वरदे हरी विठ्ठलचा जयघोष केला. एक वेगळ्याच वातावरणात आम्ही रंगून गेलो.
त्यानंतर आम्ही सर्वजण चालत गावातील मुख्य चौकात पोहचलो. उंडाळे पोलीस चौकी समोर असणाऱ्या भव्य जागेत पुन्हा एकदा सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत आम्ही उरलेली १४ झाडे लावली. काकांच्या जयंती दिवशी १५ झाडे लावण्याचा आमचा संकल्प आज उंडाळे ग्रामस्थ आणि उंडाळकर कुटुंबाच्या सहकार्याने पूर्ण झाला. आज या निमित्ताने अनेक उंडाळकर प्रेमी, कार्यकर्ते भेटले. त्यांच्याशी बोलून, त्यांना भेटून खूप आनंद झाला. पुढे आम्ही सर्वजण ग्रामपंचायत कार्यालयात आलो. या ठिकाणी दिवंगत काकांच्या प्रतिमेला अभिवादन करून आदरांजली वाहिली.
आमचे पत्रकार मित्र वैभव पाटील यांनी निसर्गवारीच्या उपक्रमाचे कौतुक करताना काकांना अपेक्षित अशी ही वारी आहे,असे सांगितले. यावेळी बोलताना काकांच्या अनेक आठवणी जाग्या झाल्या. उंडाळकर काकांच्या राजकीय कारकीर्दीला पन्नास वर्षे पूर्ण झाली तेव्हा खा. सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते काकांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला होता. यावेळी काकांनी उपस्थिताना मार्गदर्शन करताना 'मी आयुष्यभर लोकामध्येच विठ्ठल पाहिला. जनतेमध्येच देव पाहिला. माझी जनता हाच माझा पांडुरंग' असे भावनाविवश उद्गार काढले होते. काकांच्या भाषणातील ती वाक्ये माझ्या कानावर पडत होती.आम्ही प्रत्येक झाडांमध्ये एक देव आहे असे समजून २२१ झाडे लावण्याचा एक वेगळाच संकल्प केलेला आहे.
काकांनी जनतेसाठी केलेले काम फार मोठे आहे.जनमानसात मिसळणारा, गावागावातील सर्व घटकांची जिव्हाळ्याचे संबंध असणारा, खेडोपाड्यातील शेवटच्या घटकासाठी वैयक्तिकरित्या काही ना काही मदत करणारा, त्याला नावाने ओळखणारा, सामान्य घरातील व्यक्तीला मोठ्या पदावर पदावर बसवणारा, साध्या माणसाला मोठ्या संस्थेचे चेअरमन करणारा, सतत वाचत रहा शिकत रहा असा सल्ला देणारा,पुरोगामी विचारांची पेरणी करणारा, जनजागृतीसाठी साहित्य संमेलने घेणारा,जनसामान्यांची नाडी ओळखणारा असा नेता पुन्हा होणे नाही.
काकांच्या प्रतिमेला अभिवादन करुन आम्ही परत उंडाळकर स्मारक कार्यालय मध्ये जाऊन सुहास पाटील यांनी तयार केलेले कात्रण संग्रह पहिले. यावेळी महाराष्ट्र न्यूजचे पत्रकार सुहास पाटील उपस्थित होते. आठवणीतील काकांच्या बातम्या वाचून काकांच्या कार्याला उजाळा दिला. उपस्थित सर्व मान्यवरांना नमस्कार केला, धन्यवाद दिले आणि आम्ही आमच्या मार्गाने परत निघालो.
येताना नांदगाव पोलीस चौकीत पोहोचलो. नांदगाव पोलीस चौकीच्या मालकीची पावणेदोन एकर जागा आहे, येथे वृक्षारोपण करा असे पोलिस उपअधीक्षक रणजीत पाटील, कराड तालुका ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भरणे आणि कराड शहरचे पोलिस निरीक्षक बी. आर पाटील यांनी काल आम्हाला सुचवले होते. नांदगाव पोलीस चौकी इंग्रज कालीन आहे. चौकीची फार जुनी कौलारू इमारत आहे. या इमारतीत समोर इंग्रज अधिकाऱ्यांचे घोडे बांधले जात असत असे आम्हाला समजले. याठिकाणी पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे, त्यांचे सर्व सहकारी आणि आम्ही सर्वांनी १२मिळून झाडे लावली. उर्वरित १३ झाडे त्या ठिकाणी ठेवून ही झाडे लवकरच लवकर लावा अशी विनंती पोलिसांना करून आम्ही या पोलिस चौकीच्या इमारतीसमोर काही काळ आराम केला. या इमारती समोर वडाची चार झाडे आहेत. या झाडाखाली बसल्यानंतर एक वेगळा आनंद मिळाला. नांदगाव पोलीस चौकीच्या मालकीची मोकळ्या जागेचे नंदनवन करण्यासाठी नांदगाव ग्रामस्थांनी तसेच तेथील सामाजिक संघटनांनी पुढाकार घ्यावा, याकामी झाडे लावण्यासाठी कसल्याही प्रकारचे सहकार्य लागले तर निसर्गवारी ग्रुपच्या वतीने दिले जाईल असे रणजीत पाटील यांनी पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे यांना सांगितले. पोलीस मित्रांचा निरोप घेऊन आम्ही परतीचा प्रवास सुरू केला.
माझे जवळचे मित्र आणि सकारात्मक विचार करणारे साम टीव्ही ब्युरोचिफ संभाजी थोरात यांच्या धोंडेवाडी फाटा येथील मैत्रीपार्क या हॉटेलचा आज आठवा वर्धापन दिन होता. संभाजी थोरात यांना मी या भागात येणार आहे याची माहिती होते, काही कामानिमित्त ते कोल्हापुरात अडकून पडले होते. मात्र हॉटेलच्या वर्धापन दिनानिमित्त आमच्या हॉटेलसमोर वृक्षारोपण करावे अशी इच्छा थोरात यांनी काल रात्री माझ्याशी बोलून दाखवली होती. संभाजी थोरात यांच्या इच्छेनुसार आम्ही मैत्री पार्क हॉटेल समोर थांबलो. थोरात कुटुंबीयांनी आमचे स्वागत केले ,येथे दोन झाडे लावली. त्यानंतर थोरात बंधुनी गत वर्षी सुरू केलेल्या शिवनेरी शाकाहरी हाॅटेलमध्ये जाऊन आम्ही नाश्तावजा जेवणच केले आणि आमचा परतीचा प्रवास सुरू केला.
आज आमचे निसर्ग वारीत थोडी धावपळ झाली. आम्ही ठरल्याप्रमाणे सहा किलोमीटर अंतर चालून झाले पण कोणताही थकवा जाणवला नाही. विलासकाका उंडाळकर यांच्या गावात गेल्यानंतर काकांच्या आठवणीला उजाळा मिळाला. काकांच्या नियोजित स्मारका शेजारी आमच्यानिसर्ग़वारीतील १ झाड लावता आले. काकांनी उभ्या केलेल्या अनेक वास्तूमध्ये काही काळ व्यथित करता आला. ज्या स्वातंत्र्यसैनिकाच्या पंढरीमध्ये देशभरातील अनेक मान्यवर येऊन गेले आहेत त्याठिकाणी जाऊन एक नवी प्रेरणा मिळाली.
राम कृष्ण हरी
जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल