पंढरीच्या वारीत वारकऱ्यांच्या सेवेसाठी असणारे 10 हजारांहून अधिक हलकी व जड वाहने वारकऱ्यांचे साहित्य नेण्यासाठी सोयीची असली तरी या वाहनांतून बाहेर पडणारा धूर आणि अवजड वाहनांमुळे रस्त्यावर उडणारी धूळ याचा वारकऱ्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे. कितीही नियोजन केले तरीही ही वाहने कोणत्या वेळेत सोडायची हा दिंडी मालकांबरोबरच पोलिस यंत्रणेसमोरील मोठा प्रश्न आहे. धूळ आणि धूर याचा आरोग्यावर होणारा परिणाम धोकादायक असला तरीही या वाहनांना आवरणार कोण? तसेच दिंडी चालक-मालकांचीच विनापरवाना अनावश्यक वाहने अडवणार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पालखी सोहळ्यात नोंदणीकृत अडीचशेच्या दरम्यान दिंड्या सहभागी असतात. शेकडो वर्षांपासून या दिंड्यांचे मानकरी, मालक, चालक पालखी सोहळ्यात सहभागी होत आहेत. एका दिंडी सोहळ्यात 600 ते 2000 वारकरी सहभागी असतात. यामध्ये दिंडी चालक- मालक, वारकरी, टाळकरी, विणेकरी, स्वयंपाकी, तंबू उभारणारे, मदतनीस , ट्रक चालक व क्लिनर तसेच स्वयंपाक कामात महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या महिला यांचा समावेश आहे. वारकऱ्यांच्या संख्येचा विचार करून त्यांच्या सेवेसाठी त्या दिंडीत वाहने निश्चित केली जातात. अनेक वाहने कित्येक वर्षे वारी सेवेत आहेत. मुक्कामाच्या ठिकाणी राहण्यासाठी तंबू व इतर साहित्य, स्वयंपाक तयार करण्याचे साहित्य, गहू, तांदूळ, तेल व इतर साहित्य तसेच वारकऱ्यांच्या पिशव्या, गाठोडी आणि इतर जीवनावश्यक वस्तू आदी वाहून नेण्यासाठी दिंडीमध्ये वाहन व्यवस्था असते.
साधारण 800 वारकरी सहभागी होणार असतील तर त्यांच्यासाठी 1 ट्रक, 1 टेम्पो, 1 पाणी टँकर (पाणी क्षमतेनुसार), 1 जीप अशी 4 वाहने लागतात. मात्र यामध्ये गरज नसताना दिंडी मालकाच्या आणि त्यांच्या जवळच्या नातेवाईकांसाठी असणाऱ्या 2 ते 3 वाहनांची भर पडते. दिंडी मालक-चालकांच्या आर्थिक क्षमतेनुसार 5 लाखांपासून 25 ते 30 लाख रुपयांपर्यंतच्या अत्याधुनिक वातानुकूलित वाहनांची संख्या गेल्या काही वर्षांत वाढलेली आहे. 600 वारकरी दिंडीत सहभागी असतील तर त्यांच्यासाठी 4 ते 5 वाहने पुरेशी असतात. मात्र ही संख्या 10 वर गेली आहे. आळंदी ते पुणे दरम्यान वाहने कमी असतात. मात्र सासवड ते वाखरी दरम्यान वाहनांची संख्या वाढतच जाते. 250 दिंड्यांमधे सहभागी 2 ते अडीच लाख वारकऱ्यांसाठी आवश्यक असलेल्या वाहनांपेक्षा दुपटीने वाहने सहभागी होत असल्यामुळे अनेक अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत.
काही दिंड्यांमध्ये तर 30 ते 40 वाहने आहेत. अत्यावश्यक सेवेसाठी वाहनांची गरज आहेच. मात्र दिंडी चालक-मालक आणि दिंडीसाठी आर्थिक पुरवठा करणारे दानशूर व्यक्तिंसाठी किंबहुना स्टेटससाठी आणलेली वाहने वाढत आहेत. मुख्य पालखी सोहळ्यातील या दिंड्यांच्या सेवेसाठी ढोबळमानाने विचार केला तर सुमारे 3000 वाहनांची गरज असताना दुप्पट वाहने सहभागी होत असल्याचे लक्षात आले आहे.
वाहनांची वाढणारी संख्या आणि त्यामुळे विस्कळीत होत असलेली वाहतूक व्यवस्था हा एक भाग आहे. याचा ताण पोलिस यंत्रणेवर पडतो. पालखी सोहळ्यासाठी कार्यरत अत्यावश्यक असणारी वाहने पहाटे 4 ते 5.30 दरम्यान मुक्कामाच्या ठिकाणावरून निघतात. मुक्कामाच्या ठिकाणी उभारलेले तंबू काढण्याचे काम पहाटे 3 च्या सुमारास सुरू होते. वारकऱ्यांची लगबग याच दरम्यान असल्यामुळे त्यांच्या मुलभूत सोयीसाठी उभे असलेले पाणी टँकरवर गर्दी होते. वारकऱ्यांचे साहित्य, गाठोडी, तंबू साहित्य घेवून जाणारा ट्रक आणि धान्य वाहून नेणारा टेम्पो अथवा जीप चारच्या दरम्यान मुक्कामाच्या ठिकाणाहून पुढील ठिकाणी जायला निघतो. टाकीतले पाणी संपल्यानंतर पाणी टँकर पाचच्या दरम्यान पाणी भरण्यासाठी नेमूण दिलेल्या ठिकाणाकडे मार्गस्थ होतात. तेथे पाणी भरून हे टँकर पुढे दुपारच्या भोजन व्यवस्थेच्या ठिकाणी जाऊन थांबतात.
स्वयंपाकाचे साहित्य (शेगडी, गॅस, भांडी, पातेली, ताट-वाट्या आदी.) घेवून जाणारे वाहनसुद्धा याच दरम्यान निघून दुपारच्या भोजन व्यवस्थेसाठी नियोजित ठिकाणाकडे मार्गस्थ होतात. या वाहनांची संख्या फार मोठी असल्यामुळे पहाटे 4 ते 6 या दरम्यान पालखी मुक्कामाच्या ठिकाणी फार मोठी लगबग सुरू असते. ही वाहने रस्त्याला लागतात. त्या दरम्यान मोकळ्या समाजातील वारकरी पहाटेच्यावेळी चालणे कमी त्रासदायक असल्यामुळे बाहेर पडलेले असतात. या वारकरी लोकांची संख्या पालखीच्या पुढे मागे असलेल्या दिंडीतील वारकऱ्यांपेक्षा अधिक असते. हा आकडा 2 ते अडीच लाखाचा असतो. पहाटे अंधारात पुढच्या वारकऱ्याकडे पाहत अंदाजे हे वारकरी मार्गक्रमण करीत असतात. डाव्या बाजूला वारकऱ्यांची मोठी संख्या आणि उजव्या बाजूला धावणारी वाहने असे चित्र असते. पहाटेच्यावेळी स्वच्छ हवा आणि ताजेतवाने शरीर यामुळे अंतर उरकण्यासाठी बाहेर पडलेला मोकळा समाज या वाहनांतून पडणाऱ्या विषारी धुरामुळे पुरता बेजार होऊन जातो. या वाहनांमध्ये मोठ्या प्रमाणात साहित्य असल्यामुळे वाहन कच्च्या रस्त्यावर उतरले की खूप धूळ उडते. या धुराचा आणि धुुळीचा सामना करीत वारकरी पुढे जात असतात. उजव्या बाजूला वाहने असल्यामुळे वारकरी तिकडे जात नाहीत. मात्र चालण्याचा वेग जास्त असणारे वारकरी पुढे जाण्यासाठी (ओव्हर टेक) उजवीकडील वाहनांच्या मार्गावर येतात आणि त्यामुळे वाहनांचा वेग कमी होतो.
धूळ आणि धूर या दोन कारणांमुळेच वारकऱ्यांना त्रास होतो. माऊली हरिनाम घोषात उन्ह, वारा-पावसात चाललेले अंतर वारकऱ्यांना काहीच वाटत नाही. याचा त्रासही होत नाही. मात्र वाहनांतून बाहेर पडणारा कार्बन मोनॉक्साईडसारखा विषारी घटक आरोग्यास हानीकारक आहे. यामुळे वारीत खोकणाऱ्या वारकऱ्यांची संख्या वाढत आहे. धूळ आणि धुरामुळे वारकरी त्रस्त होतात. काहींना खोकला होतो. उपचारासाठी मुक्कामाच्या ठिकाणी आरोग्य सुविधा मोफत उपलब्ध असतात. मात्र वाहनांची संख्या कमी करण्यासाठी कोणतीही यंत्रणा प्रयत्न करीत असल्याचे दिसत नाही.
पंढरीची वारी वाढत आहे, फुलत आहे. ही वारी अधिक शिस्तबद्ध होण्यासाठी प्रशासन झटत आहे. मात्र आरोग्यदायी आणि स्वच्छ वारी करण्यासाठी शासकीय यंत्रणा करीत असलेले प्रयत्न कमी पडत आहेत. वास्तविक वारी ही चालत करायची असते. अत्यावश्यक वाहनांची गरज आहेच मात्र मोठेपणा दाखविण्यासाठी येणारी दिंडी चालक- मालकांची वाहने कमी होण्याची गरज आहे.










