फॉलोअर

१४ जून २०१६

सिक्किम सफर भाग 3


                   नथुलापास भारताची बर्फाच्छादित सीमा... "सॅल्यूट टू जवान'

भारत चीन सीमा. ..दोन  इमारती चीन मध्ये, त्या  अलिकडे भारत



सार्वभौम भारताच्या संरक्षणासाठी सीमा रेषेवर  जवान अखंड पहारा देत असतात. महाराष्ट्रासहीत दक्षिण भारत, मध्य भारत येथील राज्यांना इतर देशांची सीमारेषा नाही. त्यामुळे हल्ला, अतिक्रमण किंवा घुसखोरीचा धोका फार कमी आहे. मात्र पूर्वोत्तर आठ राज्यांना नेपाळ, चीन, भूतान, बांग्लादेश  या देशांच्या सीमेने वेढले आहे.
अरुणाचल प्रदेश, आसाम, त्रिपुरा, मिझोरम, मनीपूर, नागालँड, मेघालय ही सात राज्ये देशाच्या एका बाजूला ठेवल्यासारखी आहेत. या राज्यांना रस्त्याने जोडणारा पश्चिम बंगालचा भूभाग आहे. ही राज्ये म्हणजे सात बहिणी आणि त्यांच्यापासून वेगळा लांब उंचावर असलेला भाऊ म्हणजे सिक्किम. सिक्किमच्या पश्चिमेला नेपाळ, पूर्वेकडे भूतान, उत्तरेकडे चीनव्याप्त तिबेट या देशांची बॉर्डर आहे.


चीनचा धोका भारताने अनेक वर्षांपूर्वी ओळखला आहे.आता भारत स्वंयंपूर्ण झाला असून चीनच्या आक्रमणाला रोखण्यासाठी सीमारेषेवर जोरदार तयारी केली आहे. याचाच एक भाग म्हणून भारत आणि चीन  सीमारेषेलगतच्या नथुलापास आणि लॉचिंग या ठिकाणी भारताने लष्करी तळ उभारले आहेत.
भारत-चीन युद्धकाळातील नोंदणीय नथुलापास नावाच्या लष्करी तळाला भेट देण्याचा योग आला. नथुलापास म्हणजे भारताचे सिक्किमच्या बाजूचे  शेवटचे लष्करी तळ. समुद्र सपाटीपासून 14 हजार 500 फूटांवर वसलेल्या या बर्फाच्छादित ठिकाणावर जायला खूप उंच डोंगर, नद्या पार करीत अरुंद रस्त्यावरुन जावे लागते. गंगटोक ते नथुलापास हे अंतर अवघे 55 किलोमीटर आहे. मात्र ते पार करायला नैसर्गिक परिस्थिती चांगली असेल तर तीन तास आणि विरुद्ध असेल तर 5 तासही लागतात.

BRO फलक 

नथुलापास या ठिकाणी जायला सर्वसामान्य लोकांना थेट प्रवेश नाही. तिथे जाण्यासाठी सिक्किम (पूर्व ) जिल्हा पोलिस अधिक्षकांची खास परवानगी व परवाना लागतो.  फक्त भारतीय लोकांनाच हा पास मिळतो. राज्यपालांचे खास पाहुणे असल्यामुळे त्यांच्या कोट्यातूनच हा पास राजभवन सर्किट हाऊसला सकाळीच पोहोचला होता. दोन सुमो गाड्या बाहेर तयार होत्या. या वाहनांवर "गेस्टस्‌ ऑफ गव्हर्नर' असे लेबल लावण्यात आले.
खचलेल्या रस्त्यावरुन आम्ही पुढे गेलो 

बाहेर खूप पाऊस पडत होता. वातावरण अंधारले होते. मधूनच पाऊस थांबला की धुके यायचे. मात्र जायचेच असा निश्चय करून आम्ही वाहनात बसलो. गंगटोक सोडले की गणेशटोक, हनुमानटोक या उंच टेकड्यांवरून पर्यटन केंद्रे सोडल्यानंतर नथुलापासकडे जाण्यासाठी फाटा आहे. तेथे लष्कराचा चेक पॉईंट आहे. परवाना पास पाहून तसेच वाहनांत असलेल्या व्यक्तिंची खात्री करून एक-एक वाहन सोडले जात होते. आम्ही पुढे निघालो. पाऊस पडत असल्यामुळे सगळीकडे पाणीच-पाणी झाले होते. उंच कडेदार डोंगरदऱ्यांतून पाणी वाहत रस्त्यावर येत होते. अनेक ठिकाणी रस्ता खचला होता. मात्र असे वातावरण आणि रस्त्याची सवय असलेल्या आमच्या चालकाने अतिशय काळजीपूर्वक वाहन चालवित आम्ही कसेबसे 10 किलोमीटर अंतर पार केले.

भारतीय हद्दीत सुमो उभी करून बर्फातल्या रस्त्यावरुन चाललो

अचानक सर्व वाहने थांबू लागली. खूप लांबवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. हा रस्ता पूर्णपणे बीआरओच्या ताब्यात आहे. एकेरी रस्त्यावर समोरून दुसरे वाहन आले की अंगाचा थरकाप उडायचा. नथुलापासला जाणाऱ्या वाहनांची संख्या खूप होती आणि ती वेळ जाण्याची असल्यामुळे समोरुन फक्त लष्कराचे वाहनच यायचे. पुढे रस्ता खचला होता. तो दुरूस्त करण्याचे काम लष्कराचे जवान करीत होते. जेसीबी रस्त्यावरच उभा होता. त्यामुळे वाहने पुढे जाऊ शकत नव्हती. अर्धा तासात हे काम संपले व पुन्हा वाहतूक सुरू झाली.

जागोजागी लष्करी तळ आहेत 

चांगो या लष्करी तळावर पुन्हा आमची वाहने थांबली. तेव्हा पाऊस उघडला होता. संपूर्ण आकाश कोरडे झाले होते. आम्ही वाहनांतून खाली उतरलो. सगळीकडे उंच डोंगर, हिरवीगार वनसंपदा आणि शेकडो छोटे-छोटे धबधबे दिसत होत. डोळ्यांचे पारणे फिटले. येथील अतिशय सुंदर असे चांगो तळे आम्हाला खुणावू लागले. रस्ता घसरटी असल्यामुळे तळ्याकडे न जाता ते सौंदर्य डोळ्यांत साठवून आम्ही पुढे निघालो.

याक   सोबत फोटो  काढून इथे गरम कपडे घालून पुढे निघालो 

नथुलापास आता 5-6 किलोमीटर अंतरावर  राहिले होते. नैसर्गिक परिस्थिती बदलली. वारे सुरू झाले. अचानक तापमान खूप कमी झाले. थंडी वाजू लागली. वाहनातील आम्ही सारे कुडकुडू लागलो. कुठे चहा मिळतोय का? असे चालकाला विचारले. एका ठिकाणी आमची गाडी थांबली. थंडीसाठी लागणारे गरम कपडे, जॅकेट, हॅन्डग्लोज, मोजे, गमबूट  येथे भाड्याने घ्या, असे ड्रायव्हरने सांगितले. ही कपडे घालून सारे तयार झाले. गरमागरम मॅगी खाल्ली, चहा पिला आणि आम्ही मार्गस्थ झालो.

लांबूनच नथुलापास बाबा मंदिर हा फलक  आम्हाला खुणावू लागला. खाली उतरलो. समोर फक्त बर्फ, बर्फ अणि बर्फच दिसत होते. पांढरा शुभ्र गालिचा पसरला आहे, हिमालय शुभ्र कपडे घालून नटला आहे, असे भासत होते. उबदार कपडे घालूनही आम्ही थंडीने कुडकुडत होतो. बर्फातल्या रस्त्यातून वर जाऊ लागलो. 100 मीटर बर्फात चालल्यानंतर भारतीय लष्कर तळ, जवान दिसू लागले. एवढ्या थंडीत न कुडकुडता ते ताठ उभे होते. त्यांच्यात ही ताकद कुठून येते? असा प्रश्न पडला.

ककधी धुके कधी खुला आसमान 

या ठिकाणी सीमारेषेपलिकडे मोठ्या दोन इमारती दिसू लागल्या. त्या चीनने बांधलेल्या आहेत. सीमारेषा म्हणजे खूप  वेगळे काहीतरी असते, अशी भावना होती. मात्र, लोखंडी काटेरी साधे मोडके-तोडके कुंपन होते. त्याला आम्ही हात लावला. भारतमातेला वंदन केले. कुंपनाच्या पलिकडे चीन होता. पलिकडे जायला परवानगी नव्हती. तरीही एका जवानाला विचारले असता त्याने पलिकडे गेलेल्या चौघा तरुणांना चीनच्या सैनिकांनी दिवसभर कोंडून ठेवले होते, असे सांगितले.  उणे 8 तापमान होते. फोटो काढायला परवानगी नव्हती. एकमेकांच्या अंगावर बर्फ टाकताना आमच्यातील काही जण खाली पडले. बुटामध्ये बर्फ गेला मात्र लगेच जाणीव झाली नाही. एवढ्या उंचावर पहिल्यांदाच गेलो होतो.
तेथे असणाऱ्या छोटेखानी हॉटेलमध्ये चहा सोबत मोमो खाल्ला.




खाली उतरु लागलो. जवानांना सलाम केला. दरम्यान, जोरदार बर्फवृष्टी सुरू झाली. बर्फ पडताना पाहण्याचा आनंद काही औरच होता. कोणी तुझ्या टोपीवर बर्फ साठले आहे ते काढ, असे सांगत होता तर दुसरा तोंडातून वाफ बाहेर काढून दाखवत होता. बर्फवृष्टीचा आनंद घेतला. मात्र त्याचवेळी अशा बर्फातही आपले जवान कसे राहतात? त्यांच्या सहनशिलतेला दाद दिली पाहिजे. हे जवान आहेत म्हणून आपली बॉर्डर सुरक्षित आहे ही कृतज्ञतेची भावना मनी आली .
आणि लता दींदींच्या आवाजातील देशभक्ती गीत मुखातून बाहेर पडले.


बाबा हरभजनसिंग मंदिर 



                  "ए मेेरे वतन के लोगों..
                        जरा आँख में भर लो पाणी...
                              जो शहिद हुए हैं उनकी..
                                       जरा याद करों कुर्बानी...'




                            ☝ मेजर बाबा हरन सिंग यांचे मंदिर ☝

19 रजपूज रेजिमेंटचे मेजर हरभजन सिंग  हे 1968 साली युद्धा दरम्यान नथुलापास येथे कामी आले. भारतीय सेनेने त्यांच्या नावाने येथे छोटेसे मंदिर उभारलेले आहे. सैनिक श्रद्धेने बाबा हरभजनसिंग यांची पूजा करतात. बाबा सैनिकांच्या पाठीशी राहतात. पहारा देणाऱ्या टीपकी मारतात, सैनिकांना जागे ठेवतात. त्यांचे संरक्षण करतात,अशी सैनिकांची श्रद्धा आहे. 26 जानेवारी 1969 साली भारत सरकारने मरणोत्तर महावीर चक्र देवून हरभजन सिंग यांचा गौरव केला होता.



(क्रमश:)


१३ जून २०१६

सिक्किम सफर भाग 2



                  स्वयंशिस्त, वाहतूक नियमांचे काटेकोर अंमलबजावणी

समुद्र सपाटीपासून 5,700 फुटांवर वसलेले गंगटोक शहर असो किंवा 14, 500 फुटांवर असलेली भारत-चीन सीमारेषेवरील नथुलापास असो. सिक्किम राज्यात कोठेही जा. उंच पहाड, वेडीवाकडी वळणे, अंगावर थरकाप येईल अशा दऱ्या. उंच झाडे, घनदाट जंगल, नैसर्गिक सौंदर्याची खाण पहावयास मिळते. येथे सपाट भाग पहावयास मिळत नाही. काही ठिकाणी सपाट भाग तयार करून तेथे स्टेडियम, क्रीडांगण किंवा मोठ्या शासकीय इमारती उभारलेल्या पहावयास मिळाल्या. दऱ्या-खोऱ्यांच्या या राज्यात वाहतूक व्यवस्था अतिशय अवघड आहे. मात्र "पहले आप..!' असा मंत्र असणारी वाहतुकीची शिस्त वाखाणण्यासारखी आहे.

      रस्ते विकासक BRO बाॅर्डर रोड ऑरगनायझेशन

पश्चिम बंगालमधील बाघडोग्रा हे छोटेसे शहर. वास्तविक बाघडोग्रा हे मिलिटरी कॅम्प आहे. बाघडोग्रा विमानतळ मिलिटरीच्या ताब्यात आहे. सिक्किमचे प्रवेशद्वार म्हणून बाघडोग्राला ओळखले जाते. बाघडोग्रा सोडल्यानंतर सुमारे वीस किलोमीटर सपाट रस्ता आहे. त्यानंतर तिश्ता नदीच्या काठावरील वळणाचा रस्ता सुरू होतो. सुमारे 70 किलोमीटर नंतर रंगपो येथे सिक्किमची हद्द सुरू होते. संपूर्ण सिक्कीम राज्यात सगळीकडे नागमोडी, वेडीवाकडी वळणे असलेला घाटरस्ता आहे. हा बहुतांश रस्ता सेना दलाच्या ताब्यात आणि नियंत्रणाखाली आहे. नेपाळ, भुतान आणि चीन या देशांची सरहद्द सिक्किमला लागून आहे. चीनचा धोका ओळखून सिक्किममध्ये लष्करी तळ मोठ्या प्रमाणात वसविलेला आहे. सीमारेषेकडे जाणारे गंगटोक ते नथुलापास, गंगटोक ते नामची, गंगटोक ते लाचंग (उत्तर) हे सर्व रस्ते बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (बीआरओ) अर्थात मिलिटरीच्या नियंत्रणाखाली आहेत. या रस्त्यांची  डागडुजी, पुलांचे बांधकाम- दुरूस्ती सर्व मिलिटरी करते. "देशाला जोडणारा रस्ता, बीआरओतर्फे आपले स्वागत' असे फलक वेगवेगळ्या ठिकाणी पहावयास मिळतात.  हे सर्व रस्ते कायम खुले रहावेत यासाठी मिलिटरी इंजिनिअरिंग विभाग, सिव्हील विभाग सतत कार्यरत असतो.



                  नो चक्का जाम Always open

राज्यात बहुतांश रस्ते 6 ते 7 मीटरचे आहेत. हे रस्ते म्हणजे सिक्किमच्या विकासाच्या धमण्या आहेत. रस्ते कायम खुले रहावेत, वाहतूक ठप्प होऊ नये म्हणून वेगळे कायदे, कडक नियम काहीही नाहीत. मात्र तरीही नैसर्गिक अचानक ओढवलेल्या परिस्थितीचा अपवाद वगळता वाहतूक कधीही ठप्प होत नाही. पर्यटनाच्या हंगामामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाहने रस्त्यावर असतात. मात्र तरीही रस्ता बंद नसतो. वाहतूक सतत चालूच राहते. याचे प्रमुख कारण आहे सिक्किममधील वाहन चालक-मालकांमध्ये असणारी स्वयंशिस्त.
गंगटोक शहरामध्ये खूप लहान अनेक रस्ते आहेत. वाहतूकही मोठ्या प्रमाणावर असते. वाहतूक पोलिसांची संख्याही कमी आहे. तरीही कुठेच चक्का जाम पहायला मिळाला नाही. उपलब्ध पोलिसांच्या बळावर आणि चालकांमध्ये असलेल्या स्वयंशिस्तिमुळे  कधीच वाहनचालकांमध्ये, मालकांमध्ये वाद, भांडणे पहायला मिळत नाहीत.  खूप छोटा रस्ता आहे. सर्वांनाच जायचे आहे. गडबड सर्वांनाच आहे मात्र शिस्त नाही पाळली तर सर्व ठप्प होईल आणि आपल्याबरोबरच पर्यटकांचेही मोठे नुकसान होईल. राज्याचे नुकसान होईल, रोजी-रोटीवर परिणाम होईल हा छोटासा मात्र परिणामकारक मंत्र सर्वांनीच स्विकारला आहे.

    पहले आप 

अरुंद रस्त्यावर समोरून वाहन आले तर समोरचा चालक स्वत:हून थांबतो. डिप्पर मारून मलाच जायचे आहे, तूच थांब असे चुकूनही करीत नाही. अरुंद धोकादायक घाट रस्त्यावर वेग नियंत्रण आपोआप येते. मात्र तरीही मोकळा रस्ता दिसला म्हणून वेग वाढविला, असे होत नाही. ड्रायव्हरमध्ये वादावादी होत नाहीत. उलट परस्पर सन्मान ठेवला जातो. वास्तविक सिक्किममध्ये अरे-तुरे बोलणे म्हणजे शिवी समजली जाते. ओळखीचा असो वा नवखा सर्वांशी "आप..' अशा सुरात नम्रतेने बोलले जाते. सिक्किममधील पोलिस  ठाण्यात अपघाताच्या खूप कमी घटना नोंद आहेत.


    सजलेली वाहने, नियमबद्ध नंबरप्लेट 

प्रत्येक प्रवासी वाहतूक किंवा पर्यटक परवानाधारक कार, टॅक्सीमध्ये बुद्ध प्रतिमा हमखास असते. सजावट केलेली टॅक्सी म्हणजे नटून-थटून आलेली दुल्हनच वाटते. मात्र कोणत्याही गाडीवर आक्रमक भाषेतील वाक्ये, डिझाईन केलेल्या नंबर प्लेट, "बघतोस काय रागानं...' या प्रकारचे रेडियम आर्ट पहायला मिळाले नाहीत. रिझर्व्ह, टुरिस्ट या दोनच पाट्या पहावयास मिळाल्या.

सिक्किमवासियांचे फुटबॉलप्रेम जगावेगळे आहे. टॅक्सीमध्ये फुटबॉल संघाचे लोगो असणारे स्टिकर्स, झेंडे हमखास लावलेले असतात. "ओम माने पे मी हू' हा बौद्ध धर्माचा मंत्र असलेल्या पताका गाडीमध्ये बांधलेल्या आढळतात. टॅक्सीचालक  कोणालाच फसवत नाहीत. चुकीचा मार्ग दाखवित नाहीत. सांगितलेल्या वेळेत टॅक्सी हॉटेलच्या दारात हजर असते. ड्रायव्हरकडून पर्यटकांची लूट झाली, असा एकही गुन्हा गंगटोकमधील पोलिस ठाण्यात दाखल झाल्याचे आढळले नाही. उलट टॅक्सीमध्ये  पॉवर बँक विसरला तर चालकाने तो परत आणून दिल्याचा सुखद अनुभव मला स्वत:ला आला.
  
  टुरिस्ट वाहने मोठ्या प्रमाणात   
  
या राज्यात बेरोजगार युवकांकडे ड्रायव्हिंग करणे  हा सर्वांत सोपा आणि जवळचा मार्ग आहे. दहावी, बारावी शिक्षण झाल्यानंतर कोणच्या तरी हाताखाली जाऊन युवक ड्रायव्हिंग शिकतात. अनेक राष्ट्रीय बॅँकांच्या शाखा येथे आहेत. वाहन कर्जाचे प्रमाण खूप आहे. पर्यटक हंगाम काळात यांना चांगला रोजगार मिळतो. लोकल पर्यटन केंद्रे पाहण्याचे सरासरी भाडे प्रति दिवस  2000 रुपये तर 50 ते 60 कि.मी. दरम्यान 4 ते 4500 हजार इतके भाडे आहे. अनेकजण दुसऱ्यांच्या वाहनांवर ड्रायव्हर म्हणून काम करतात. प्रामाणिकपणा या चालकांच्या रक्तातच आहे. कोणताही मोबदला न घेता ते पर्यटकांना गाईड करीत असतात. या ठिकाणची भौगोलिक परिस्थिती व कडक नियमांचे पालन पाहता बाहेरील राज्यातील चालकांचे या रस्त्यावर वाहन चालविण्याचे धाडस क्वचितच होईल.

     राज्यात केवळ  सिक्किमच्या वाहनांनाच परवानगी

सिक्किममध्ये एस.के. 01, 02, 03 आणि 04 या चार पासिंगचीच वाहने पर्यटक नेऊ शकतात. इतर राज्यांतील परमिट वाहने येथे येऊ दिली जात नाहीत. पश्चिम बंगालची वाहने गंगटोकमध्ये पर्यटकांना हॉटेलपर्यंत सोडून जातात. फक्त स्थानिक लोकांनाच रोजगार मिळावा. हा त्यामागचा हेतू आहे. कार टाईपच्या वाहनांत चारपेक्षा अधिक प्रवासी घेतले जात नाहीत. तर इनोव्हा, सुमो या जड प्रवासी वाहनांत 7 प्रवासी बसू शकतात. या नियमाचे काटेकोरपणे पालन केले जाते.
                       (क्रमश:)


राजभवन समोर सतीश मोरे

१२ जून २०१६

सिक्कीम सहल विशेष भाग 1



पूर्वोत्तर सात राज्य  म्हणजे सात बहिणी आणि त्यांचा आठवा भाऊ म्हणजे सिक्किम. 1975 साली भारतामध्ये सामिल झालेले सिक्किम हे छोटेसे राज्य आहे. लोकसंख्या 6.5 लाख. चार विभागांत विभागलेल्या या राज्यात पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर सिक्किम असे चार जिल्हे आहेत.
गेली 5 टर्म या ठिकाणी पवनकुमार चामलिंग हे एकच या  राज्याचे मुख्यमंत्री आहेत. तर गेल्या पावणेतीन वर्षांपासून कराडचे लोकप्रिय खासदार म्हणून कारकिर्द गाजविलेले श्रीनिवास पाटील हे राज्यपाल म्हणून कार्यभार पाहत आहेत. श्रीनिवास पाटील सिक्किमचे राज्यपाल झाल्यापासून या राज्याला भेट देणाऱ्या महाराष्ट्रातील विशेषत: पश्चिम महाराष्ट्रातील पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.
गत आठवड्यात राज्यपालांच्या निमंत्रणावरून या राज्याचा दौरा करण्याचा योग आला. खूप वेगळं पहायला मिळालं या ठिकाणी. भारतामध्ये असे शिस्तबद्ध राज्य असू शकतं याबाबत आश्चर्य वाटतं. परदेशात राहत आहोत, अशी भावना झाली. सिक्क्मिचे काही सुखद अनुभव आजपासून...



बुद्धिझमचा प्रभाव, आचरण  आणि अतिथी देवो भव 

बौद्ध धर्माची लोकसंख्या आणि प्रभाव असलेल्या सिक्किममधील लोक अतिशय नम्र आहेत. पर्यटन हा मुख्य उद्योग असल्यामुळे घरा-घरांत पर्यटनपूरक व्यवसाय आहेत.
स्त्रीपुरूष असा भेदभाव कुठेही पहायला मिळाला नाही. साक्षरतेचे प्रमाण 83 टक्के आहे. तर स्त्री-पुरूष जन्मदर 1000 पुरूषांमागे 900 हून अधिक स्त्रिया असा आहे. घरात मुलगी जन्माला आली की आनंदोत्सव साजरा केला जातो. मुलगी घर सांभाळते, आई-वडिलांना काही कमी पडू देत नाही. स्त्री-भ्रृणहत्या, गर्भलिंग निदान सेंटर हा प्रकारच येथे नाही. अनेक हॉटेल्स, दुकाने, टुरिस्ट सेंटर यांमध्ये महिला काम करताना दिसल्या.

सिक्किम राज्यात पदवीपर्यंत मुला-मुलींना सर्व प्रकारचे शिक्षण मोफत आहे. मात्र तरीही उच्च शिक्षण घेण्याचे प्रमाण कमी आहे. याबाबत राका येथील एका दुकानदाराला विचारले.  आमच्याकडे बहुतांश मुले-मुली कामचलाऊ म्हणून दहावी, बारावीपर्यंत शिकतात व त्यानंतर पर्यटनपूरक व्यवसायाच्या मागे लागतात. शिक्षणाबरोबरच घरही चालले पाहिजे, अशी भावना पालकांमध्ये असते, असे त्यांनी सांगितले.



सिक्किमची राजधानी गंगटोक. पहाडावर वसलेले हे शहर पाहताना सह्याद्रिच्या खोऱ्यात राहणाऱ्या आपल्यासारख्यांच्या ऊरात धडधड होते. जेथे फक्त पक्षी, किडे-मुंग्या, जंगली प्राणीच जाऊ शकतात, अशा उंच ठिकाणी कडावर  लोकांनी घरे बांधली आहेत. मोठे बंगले उभे केले आहेत. लांबून ही घरे पाहिली तर अशा ठिकाणी या लोकांनी घरे बांधलीच कशी असा प्रश्न पडतो. गंगटोकमध्ये हॉटेल्सची संख्या खूप आहे. मार्च ते जून आणि ऑक्टोबर ते जानेवारी हा पर्यटनाचा हंगाम असतो. या काळात देशभरातील पर्यटकांची येथे रेलचेल असते. परदेशी पर्यटक येथे कमी पहायला मिळाले.
पर्यटनावरच शहराची किंबहुना राज्याची रोजी-रोटी असल्यामुळे येथे "अतिथी देवो भव्‌: ' हा मंत्र पहावयाला मिळाला. उत्तर भारतातील आणि दक्षिण भारतातील काही पर्यटन स्थळांवर पर्यटकांना दमबाजी,  लूट, फसवणूक असे प्रकार पहावयास मिळतात. मी हे स्वत: अनुभवलेले आहे.  मात्र पूर्ण सिक्किममध्ये आठ दिवसांत मला असा कोणताच प्रकार पहावयास मिळाला नाही.


बुद्धिझमचा प्रभाव असलेले गंगटोकवासिय खरंच बुद्धांच्या वाटेने चालत आहेत हे प्रत्यक्ष अनुभवायला मिळाले. कार ड्रायव्हर, फेरीवाला, दुकानदार, हॉटेल मॅनेजर, वेटर, कामगार, बाजारपेठेतील सेल्समन, पॅराग्लायडिंग पायलट, रिवर राफ्टिंग पायलट, त्यांचे सहकारी, पर्यटन केंद्रावरील अधिकारी, पहारेकरी, तिकिट विक्री करणारा, सिक्किम टुरिझम सेंटरमधील स्टाफ, अधिकारी, राजभवन सर्किट हाऊस खानावळमधील वेटर, कुक तसेच रस्त्यावर मला अनेक लोक भेटले. त्या प्रत्येकामध्ये नम्रता पहावयाला मिळाली. व्यवहार ठरविताना, विक्री करताना कुठेही दमबाजी, वस्तू घेण्याचा आग्रह, घासाघीस, अडवणूक असा प्रकार पहावयास मिळाला नाही. दुकानात मांडलेली वस्तु हाताने घ्या, पहा.. निवड करा आणि घ्या, असा खुला व्यवसाय येथे आहे.



पैसे देवाणघेवाण वेगळी पद्धत 

भारतात कोठेही पहायला मिळाली नाही अशी एक वेगळी गोष्ट मला येथे पहायला मिळाली. कोणत्याही ठिकाणी आर्थिक व्यवहार झाल्यानंतर पर्यटक खिशातून पैसे काढतात आणि द्यायला लागतात तेव्हा हे लोक अतिशय नम्रतेने हे पैसे स्विकारतात. दोन्ही हातांची ओंजळ करून पैसे स्विकारण्याची इथली खास पद्धत आहे. पैसे परत देताना उजव्या हातानेच द्यायचे. पैसे देताना उजव्या हाताच्या कोपराला डावा हात लावून  अतिशय नम्रपणे पैसे परत दिले जातात. संपूर्ण सिक्किम राज्यात आर्थिक देवाण-घेवाणीचा हा एक वेगळाच अनुभव आला.  "तुम्ही असे का करता?' असे न राहवून  एका टॅक्सी ड्रायव्हरला विचारले असता "ही तर आमच्या धर्माची, बुद्धांची शिकवण आहे. पैसा नम्रतेने द्यावा आणि स्विकारावा, कारण त्यामध्ये बुद्ध आहेत. पैसा आला म्हणून मस्ती करु नये आणि नसला म्हणून भीक मागू नका. कष्ट करा, अशी आमची शिकवण आहे.' असे त्या ड्रायव्हरने सांगितले.

नो भिकारी  आणि देणगी पेटी
  
संपूर्ण सिक्किम राज्यात सात-आठ दिवस होतो. प्रयत्नपूर्वक शोध करून सगळीकडे पाहिले. मात्र कोठेही भिकारी दिसला नाही. ना स्टँडवर, ना रस्त्यावर, ना मार्केटमध्ये, ना मंदीर.. चर्च..मोनॅस्ट्रीबाहेर. बौद्ध धर्माचे मंदिर म्हणजे गुंबा. याला इंग्लिशमध्येमोनॅस्ट्री असे म्हणतात. अनेक लहान-मोठ्या गावांमध्ये 100- 150 वर्षांपूर्वीच्या प्राचीन मोनॅस्ट्री पहावयास मिळाल्या. गंगटोकमध्ये तर 18 व्या शतकातील प्राचीन मोनॅस्ट्री आहे.  येथे दूर्मिळ वस्तुंचे संग्रहालय असून बुद्ध धर्मप्रचारकांच्या हस्तलिखित ग्रंथांच्या प्रति आहेत. अतिशय देखण्या, सुबक अशा या मोनॅस्ट्रीबाहेर कोठेही भिकारी पहावयास मिळाला नाही.


कोठेही "येथे देणगी स्विकारली जाईल', "दानपेटीतच पैसे टाकवेत',  अशा प्रकारचे बोर्ड पहावयास मिळाले नाहीत. मोनॅस्ट्रीमध्ये पुजारी नव्हता किंवा पहारेकरीही नव्हता. कोणीही यावे दर्शन घ्यावे, पुजा करावी आणि शांतपणे निघून जावे. असे वेगळे वातावरण पहावयास मिळाले. गणेशटोक व हनुमानटोक येथेही मंदिर आहेत. मात्र तेथे सुद्धा पुजा साहित्य विक्री केंद्रे, देणगी आग्रह फलक दिसले नाहीत. मोनॅस्ट्रीबाहेर भिकारी का नाहीत?  असा सवाल पडला. मोडक्या हिंदी भाषेत बौद्ध धर्मगुरूंनी मला सांगितले, "येथील लोक स्वाभिमानी आहेत. भिक कधी मागणार नाहीत. कष्ट करून काम करून पोट भरा, अशी आमची शिकवण आहे. आम्ही भिक मागायची वेळ येणारच नाही असे काम करा. व्यसने करू नका असे शिकवितो.' असे त्यांनी सांगितले.




राजभवनचे "खुले निमंत्रण'
सिक्किम हे पर्यटनप्रेमी राज्य आहे. येथील लोक आलेल्या पाहुण्यांना आपला मानतात. पर्यटकांची लूट, वस्तु चोरी अशा घटना येथे घडत नाहीत. मी राज्यपाल झाल्यापासून महाराष्ट्रीय पर्यटकांना येथे येण्याचं "खुलं आवातणं' दिलं आहे. राजभवनावर आलेल्या मराठी पर्यटकांसाठी मी खास वेळ देतो. येण्यापूर्वी राजभवनला कळविले तर त्यांची योग्य व्यवस्था करण्यास माझा राजभवन स्टाफ तयार असतो.
           - श्रीनिवास पाटील,
          राज्यपाल, सिक्किम
             (क्रमश:)

१० जून २०१६

ट्रीप विदाऊट प्लॅन




खुप फिरायचं आहे, उंच उडायचं आहे
प्लॅन न करता लाॅग टूरवर जायचं आहे
लांब पठारावर बेधुंद होऊन फिरायचं आहे
इवल्याशा फुलांसोबत गप्पा मारत
हिरव्यागार गालीच्यावर हुदडायचं आहे
प्लॅन न करता टूरवर जायचं आहे


डोंगर, दरी, झाडे अन् खळखळणारे झरे
हे तर आहेत माझे सखेसोयरे
त्याच्यासोबत हितगुज करायची आहे
प्लॅन न करता टूरवर जायचं आहे

निसर्ग साद घालत मला खुणावतोय,
वस्तूच्या मागं का लागलाय सुनावतोय
स्वच्छंद पाखरासोबत उडायचं आहे
प्लॅन न करता टूरवर जायचं आहे

मी तर माझ्या हुकमाचा राजा
कोणाचीच नाही मला परवा
राजासारखं एक दिवस रहायचं आहे
प्लॅन न करता टूरवर जायचं आहे

कुणाला हे हवं, कुणाला तेही हवं
निसर्गाचा आनंद मला फक्त हवाय
दिलखुलास एन्जॉय करायचं आहे
प्लॅन न करता टूरवर जायचं आहे

           ....सतीश मोरे,
               





26 मे 2016
बागडोगरा ते दिल्ली
विमान प्रवासात सुचली
Return journey from Sikkim






०५ जून २०१६

सखी पाऊस आणि वार्‍याची झुळूक



1

            पाऊस

आजचा पाऊस खुप वेगळा होता
ती आणि मी जवळ येत होतो
पाऊस आमच्या मागे होता
आम्हाला भेटू देत नव्हता !



        दोघांना पावसात भिजायचं होतं
        मला भिजताना तिला पहायचं होतं
        माझ्या गालावरचे थेंब चुंबायचे होते
        पण मला
        तिच्या डोळ्यात खोल पहायचं होते !

थांब म्हणून ती थांबली नाही
हळुवार पावसात चिंब भिजून गेली
मागे वळून पाहताना मला
चिंब चिंब भिजवून गेली !


        आज पुन्हा पाऊस आला
        भिजलं सारं गाव
        खिडकीच्या काचेवर
        मग पुन्हा तुझं नाव !


म्हणूणच
पाऊस आला की
मला काहीच सुचत नाही
फक्त आठवतो
तुझा श्वास !

आणि

वेड लावतं
तुझं वावरणं !

                 ..   सतीश मोरे






2







                          वार्‍याची झुळूक

'ती' छोटीशी झुळुक
हळुवारपणे आली
'तु'ला स्पर्शून गेली
अन जरा थबकली
सखी माझी हसली
ओठावरची लाली फुलली !

     तशा तुम्ही दोघीही अवखळ
     तुला हवं स्वातंत्र,ती स्वच्छंद
     तुम्हा दोघींनाही अडवणार कोण
     तव तुमा स्पर्शाची आस लागली
     सखी माझी हसली
     ओठावरची लाली फुलली !


त्या सुंदर केशकल्पांवर
तुझा न राहीला अधिकार
'तीला'ही न आवरला मोह
स्पर्श घेता त्या बटेचा
सखी माझी हसली
ओठावरची लाली फुलली !

     तु तुझ्या हुकुमाची राणी
    'ती' तुझ्या सख्याची आळवणी
    मिलनाचा संदेश घेऊनी आली
    भेटीच्या आसुने तु ही खुलली
    सखी माझी हसली
    ओठावरची लाली फुलली !

   
.                            ......  सतीश मोरे











०१ जून २०१६

सिक्कीम राज्य निर्माण : चौघा महाराष्ट्रीयन दिग्गजाचे योगदान

गगंगटोक

पश्चिम महाराष्ट्रातील कोकण प्रवेशद्वार म्हणजे पाटण तालुका. या तालुक्यातील मारुल हवेली गावातील शेतकरी कुटुंबातील एक व्यक्ती सिक्किम राज्याच्या उच्च पदावर राज्यपालपदी विराजमान झाली आहे . श्रीनिवास पाटील राज्यपाल झाले आणि आपणा सर्वांना  सिक्किम राज्य आपलं वाटू लागलं. यापूर्वी सिक्किम हे भारतातील एका राज्यापैकी एक अशी आपली ओळख होती. घटनात्मकदृष्टया राज्यपालपद फार मोठे आहे. राजकारणातून निवृत्त झालेल्या व्यक्ति राजकीय सोय करण्यासाठी राज्यपाल पदावर नेमणूक केली जाते. हा या पदाचा आजपर्यंतचा इतिहास आहे, यात तथ्यही आहे. मात्र सिक्किमसारख्या संवेदनशील राज्याचा राज्यपाल म्हणून नेमणूक करताना आतपर्यंतचा इतिहास पाहिला तर केवळ उच्च विद्याविभूषित व्यक्तिंनाच संधी मिळाली आहे.
आयएएस ऑफिसर, इंग्लिशवर प्रभूत्व, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडींचा सखोल अभ्यास याचा विचार करूनच सिक्किमचे राज्यपाल नियुक्त झाले आहेत. श्रीनिवास पाटील यांची नियुक्ती याच निकषावर झाली आहे. महामहिम राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्यामुळेच महाराष्ट्रीयन पर्यटकांचा ओढा तिकडे वाढला आहे.  राजभवनामधील शाही पाहुणचार हे ही त्यामागचे गोड कारण आहे.




औंध पंतप्रतिनिधी

श्रीनिवास पाटील प्रशासकीय सेवेतून राजीनामा देवून बाहेर पडले आणि थेट कराड लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत उतरले. 1999 आणि  त्यानंतर 2004 असे सलग दोनदा ते मताधिक्याने निवडून गेले. या कालावधीत त्यांनी खासदार फंड काय असतो आणि खासदार फंडाशिवायसुद्धा इतर निधी किती प्रमाणात आणता येतो हे दाखवून दिले. विकासकामांबरोबरच श्रीनिवास पाटील यांनी खासदार झाल्यांनतर वेगळ्या शैलीमुळे जनसंपर्क वाढविला, ओळखी वाढविल्या, प्रत्येक गावात खुमासदार शैलीत भाषण करून अनेकांना आपलंसं केलं.

बोलणारा, काम करणारा, सहज उपलब्ध असणारा खासदार कराड मतदारसंघाला लाभला. 2009 साली लोकसभा मतदारसंघ पुनर्रचनेमध्ये कराड मतदारसंघाचे अस्तित्व संपुष्टात आले. वास्तविक मतदारसंघ पुनर्रचना कमिटीमध्ये स्वत:  श्रीनिवास पाटील होते. कराड मतदारसंघ वाचवायचा असेल तर कराडला कोकणचा काही  भाग जोडावा लागला असता आणि कराड-सातारा जवळीकता कमी झाली असती आणि हे होऊ नये म्हणून श्रीनिवास पाटील यांनी त्यात बदल सुचवले.  सातारा आणि माढा असे दोन लोकसभा मतदासंघात जिल्हा विभागला गेला.

कराड मतदारसंघाचे अस्तित्व संपल्यानंतर अभ्यासू  राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांनी श्रीनिवास पाटील यांना पुन्हा संधी देण्यासाठी  राजकीय ताकद पणाला लावून त्यांना सिक्किमच्या राज्यपालपदी सन्मानित  केले. ओळखीने, शिफारसीने, दबाव टाकून अथवा इतर मार्गाने कोणतेही पद, नोकरी मिळविता येते. मात्र ते टिकविण्याचे, वाढविण्याचे, समृद्ध करण्याचे आणि त्या पदाची उंची वाढविण्याचे काम त्या व्यक्तिलाच करावे लागते.उच्च विद्याविभूषित श्रीनिवास पाटील यांनी तेच केले.



सिक्किम राज्याला विशेष दर्जा आहे. 1975 साली हे राज्य भारतात सहभागी झाले. वास्तविक या भूभागावर पहिल्यापासूनच चीनचा डोळा होता. सिक्किमच्या राजाच्या ऐशोआराम कार्यपद्धतीला कंटाळून  या राज्यातील नागरीक भारतात सहभागी झाले. नेपाळ, चीनव्याप्त तिबेट या देशांनी सिक्किमला वेढले आहे. चीनचा धोका आणि घुसखोरी याचा विचार करून सिक्किममध्ये भारताने मोठा लष्करी तळ उभारला आहे. संरक्षक विषयक गुप्त माहिती, ज्ञान आणि अवलोकन असणारा राज्यपालच या राज्यात नेमला जातो.
राज्यातील जनतेच्या मुलभूत प्रश्नांसाठी लोकशाही मार्गाने निवडून दिलेले सरकार असते. मात्र संवेदनक्षम अशा सिक्किमसारख्या सर्व पूर्वोत्तर राज्यांत राज्यपालांना विशेष अधिकार आहेत. या राज्यपालांचा सतत थेट राष्ट्रपतींशी संपर्क आणि संवाद असतो. राष्ट्रपती हे तिन्ही दलांचे प्रमुख असल्यामुळे या राज्यपालांकडून संरक्षक विषयक  मिळालेल्या माहितीवरून देशाचे संरक्षणात्मक धोरण व उपाययोजना राबविल्या जातात. अशा उच्च पदावर श्रीनिवास पाटील यांचे नेमणूक होणे हा खरंच मराठी माणसाचा सन्मान आहे. सिक्किमच्या निर्मितीपासून आजअखेर 4 दिग्गज मराठी व्यक्तिंनी या राज्याच्या विकासासाठी आणि वाटचालीसाठी योगदान दिले आहे.


सिक्कीम हा स्वतंत्र देश होता. या देशावरही भारताप्रमाणे इंग्रजांचे राज्य होते. इंग्रज सरकारचे भारताचे राजकिय राजदुत म्हणून 1952 ते 1958  दरम्यान  महाराष्ट्रातील औंध संस्थानचे आप्पासाहेब पंतप्रतिनिधी यांनी काम पाहिले आहे.  1952 मध्ये पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी सिक्कीम देशाला भेट दिली होती. त्यावेळी पंतप्रतिनिधी त्याचेसमवेत होते. दरम्यान 1957 मध्ये पंडित नेहरू कन्या  इंदिरा यांना घेऊन सिक्कीमला आले होते.  येथून पुढे ते ल्हासा (तिबेट ) येथे गेले होते.  तत्कालीन सरंक्षण मंत्री व्हि. के.  कृष्णन मेनन त्याच्या समवेत होते. पंतप्रतिनिधी यांच्या रूपाने मराठी माणसाने सिक्कीम देशात कारभार पाहिला होता.



1975 साली सिक्किमच्या जनतेने भारतात सामिल होण्याचा निर्णय घेतला. तेव्हा सार्वमत चाचणी घेण्यात आली. 98 टक्क्यांहून अधिक लोकांनी त्याला पाठींबा दिला. सिक्किम राज्याचा सार्वमताचा हा ठराव त्यावेळचे गृहमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी लोकसभेत मांडला. सिक्किमच्या जनतेची मागणी यशवंतराव चव्हाण यांनी या ठरावाद्वारे सभागृहासमोर मांडली. लोकसभेने बहुमताने यास मान्यता दिल्यानंतर 16 मे 1975 साली सिक्किम भारतात सहभागी झाले. त्यामुळे सिक्किम राज्य निर्मितीमध्ये यशवंतराव चव्हाण यांचे महत्वपूर्ण योगदान राहिले आहे.



 महाराष्ट्राचेच रहिवासी असलेल्या होमी तल्यार खान यांनी 1981 ते 1984  सिक्किम राज्यपाल म्हणून काम पाहिले .अभ्यासू खान यांनी त्या काळात चांगले कार्य केले होते. 20 जुलै 2013 पासून श्रीनिवास पाटील सिक्किम राज्यपाल  आहेत. सिक्किम देश  आणि राज्याशी राजकिय आणि घटनात्मकदृष्टया संबंध असलेले हे चौथे मराठी व्यक्ति आहेत.
दोन वर्षे 10 महिन्यांपूर्वी श्रीनिवास पाटील सिक्किमचे राज्यपाल झाले. त्यानंतर त्यांनी  लोकनियुक्त पवनकुमार चामलिंग यांच्या सरकारमधील मंत्री, स्थानिक लोक, विरोधी पक्ष आदी सर्वांना विश्वासात घेवून आपलेसं केलं आहे. "मिशीवाला बडा साहब' अशी त्यांची राज्यभर ओळख झाली आहे. सिक्किमची संस्कृती जपण्याबरोबरच वाढविण्यासाठी स्थानिक जनतेत मिसळून काम करणारा आपला राज्यपाल असे त्यांचे काम आहे.

रराज्यपाल तल्यार खान



श्रीनिवास पाटील सिक्किम राजभवनामध्ये राहतात. वास्तविक राजभवनात स्थानिक जनतेचे काही काम नसते, किंवा खुप कमी असते. तरीही राजभवन सर्वांसाठी खुले करण्याचा निर्णय श्रीनिवास पाटील यांनी घेतला आणि त्यामुळेच  रोज किमान 50 लोकांना राज्यपाल भेटतात. महाराष्ट्रातील लोकांना तर राजभवनाचे खुले आमंत्रण असते.
"पुढारी'च्या माध्यमातून गेली 20 वर्षे सातारा जिल्ह्यातील अनेक राजकीय नेत्यांशी माझे जवळचे संबंध राहिले आहेत. खासदार पदाच्या कालावधीत श्रीनिवास पाटील अनेकदा "पुढारी' वर्धापन दिनासाठी उपस्थित राहिले होते. पुढारी परिवारातील सर्व सदस्यांना ते नावाने ओळखतात. सिक्किमला अवश्य या! असे त्यांचे अनेक दिवसापासून आग्रहाचे निमंत्रण होते. गेल्या दोन वर्षांत कराड, पाटण तालुक्यातील सुमारे 2000 लोक सिक्किमला जाऊन आले आहेत. आपण पण गेलेच पाहिजे  अशी मनापासून इच्छा होती.  ती पुर्ण झाली.


3 हजार मिलोमीटर अंतर पार करून आपल्या  इकडचा माणूस जेव्हा सिक्किमला जातो तेव्हा त्याची पहिली इच्छा असते, राज्यपाल श्रीनिवास पाटील यांना भेटायची. एवढ्या लांबून आलेल्या प्रत्येकाशी आपुलकीने बोलणे, त्यांच्या राहण्याची व्यवस्था करणे, राज्यभर फिरण्यासाठी मार्गदर्शन करणे हे करण्यासाठी राजभवनमधील स्टाफ आनंदाने तयार असतो. इस्टेट मॅनेजर तारासिंग तसेच किचन स्टाफ काही कमी पडू देत नाहीत.  नवीन राजभवन सर्कीट हाऊस इमारत देखणी आहे.  या इमारतीच्या टेरेस वरून कांचनगंगा पर्वत रांगांचे दर्शन होते.  अतिशय सुंदर नजारा आहे तो!  या ठिकाणी पन्नासएक वातानुकूलीत सुट आहेत . राजेशाही थाटात इथे राहण्याची संधी मिळाली, हे माझे भाग्यच म्हणायचे. येथे अतिशय उत्तम जेवणाची सोय आहे. अतिशय प्रशस्त दिवानखाना , हाॅल आहेत.  इमारतीचे बांधकाम अलीकडेच झाले आहे, लुक जुन्या पद्धतीचा आहे. खुप छान सोय केली जाते, सर्व पाहुण्यांची !



इथं येणार्‍या प्रत्येक व्यक्तीशी राज्यपाल  श्रीनिवास पाटील स्वत:  बोलतात , वेळ देतात. लहान-मोठ्या सर्वांची आपुलकीने चौकशी करतात. हा आजपर्यंत जाऊन आलेल्या सर्वांचा अनुभव आहे. पुढारी पत्रकार म्हणून त्यांनी मला खूप प्रेम दिले. राजभवनमध्ये आयोजित न्यायमुर्ती शपथविधी कार्यक्रमाचे मला विशेष निमंत्रण होते. हा माझा आणि "पुढारी'चा सन्मानच आहे, असे मी समजतो.
नियोजित सुचनेनुसार दुपारी 1 वाजता  सहकुटुंब मी राजभवनवर पोहोचलो.
सोबत साडू दिलिप आणि मेहुणी पिंकी होती. वेळेत पेाहोचा... वेळ पाळा.. तुम्ही फार मोठे व्हाल! हा फार मोठा मंत्र श्रीनिवास पाटील यांनी अनेकदा दिला आहे.
ते स्वत: वेळ पाळण्यात सुरूवातीपासूनच दक्ष असतात. आम्ही वेळेत पोहोचलो. राजभवनाबाहेरील सुरक्षा रक्षकांनी तपासणी केल्यानंतर आम्ही पाहुणे कक्षामध्ये जाऊन बसलो.  अतिशय सुंदर सजविलेल्या या कक्षात भगवान गौतम बुद्ध आणि त्यांचे अनुयायी यांचे सुंदर तैलचित्र लावलेले होते. पाचच मिनीटांत शाही थाटातील चहा-पान झाले.



थोड्याच वेळात रुबाबदार शैलीत राज्यपालांचे या कक्षात आगमन झाले. आल्या-आल्या सर्वांना नमस्कार केला. आम्ही सर्वजण या वडिलधारी दिग्गजासमोर नतमस्तक झालो. एका सहाय्यकाला त्यांनी हळदी-कुंकू करंडा द्यायला सांगितला. माझी पत्नी आणि मेहुणीने एकीमेकीला हळदी-कुंकू लावले. मी चाटच पडलो. एवढ्या लांब आल्यानंतर हळदी-कुंकू कार्यक्रम तोही राजभवनात पहायला मिळेल याचा मी स्वप्नात देखील विचार केला नव्हता.
भगवान गौतम बुद्धांची आकर्षक मुर्ती, पांढरं उपरणं देवून आम्हा दोन्ही कुटुंबियांचा त्यांनी सत्कार केला. माझ्यासाठी खास वेगळी भेट म्हणून ड्रॅगनचे सुंदर शिल्प असलेनं टेबल पेन होल्डर  दिला. कुटुंबातील सर्वांची आपुलकीने चौकशी केली.कसलीही राजकीय चर्चा न करता केवळ जुन्या आठवणींमध्येच आमच्या गप्पा रंगल्या. पुढारीकार ग. गो. जाधव यांच्या आठवणी जागवल्या. संपादक पद्मश्री प्रतापसिंह जाधव यांनी पुढारी खुप  मोठ्ठा केला आहे,  कष्ट घेतले  आहे,  असे  साहेबांनी सांगितले. माझा मुलगा पियुष आणि देवयानी यांची चौकशी केली, पुढे काय होणार हे विचारले. सौ विद्या यांच्या शाळेची माहिती घेतली.




रिलायन्स आणि एल ऍन्ड टी मध्ये  काम करणारे माझी मेहुणी आणि साडू यांच्या कंपनीतील दिग्गज अधिकाऱ्यांची नावे, अनुभव, किस्से सांगितले. धिरुभाई अंबानी यांच्यासोबत झालेली भेट सविस्तर कथन केली. त्यानंतर राज्यपालसाहेब आम्हाला त्यांच्या मुख्य कार्यालयीन केबिनमध्ये घेवून गेले.
दोन्ही बाजूला तिरंगे, भिंतीवर राष्ट्रपती, पंतप्रधान यांचे फोटो, त्यासमोरील टेबलावर सिक्किमचा नकाशा असा आगळा-वेगळा रूबाब पहायला मिळाला. श्रीनिवास पाटील यांच्या ऑफिस टेबलवर यशवंतराव चव्हाण यांचा  फोटो होता. त्याचबरोबर आई-वडील, जवळचे नातेवाईक यांचे फोटोही एका बाजूला काचेच्या खाली ठेवलेले होते. साहेबांच्या उजव्या बाजूला भिंतीवर छत्रपती शिवाजी महाराजांचे अतिशय दुर्मिळ फोटो असणारे तैलचित्र लावले होते. तर डाव्या बाजूला भिंतीवर पंढरीच्या विठ्ठलाची सुंदर फोटो फ्रेम होती. साहेबांनी आमच्याशी इथेपण गप्पा मारताना केवळ सिक्किम हाच विषय घेतला होता. एलईडी पॉईंटर लाईट नकाशावर  दाखवून त्यांनी सिक्किमच्या प्रत्येक भागाची माहिती दिली. सिक्किम राज्यपाल म्हणून असणारे विशेष अधिकार, कलम समजावून सांगितले. येथेही  फोटोसेशन केले.

त्यानंतर ग्रंथालय, अभ्यासिका, चिंतन कक्ष, व्यायाम कक्ष आदी सर्व खोल्या त्यांनी स्वत: पुढे होवून दाखविल्या. राजभवनात एक विशेष तिब्बत भवन नावाचा कक्ष आहे. येथे राज्यपालांचे विशेष पाहुणे मुक्काम करतात. गतवर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी  याच कक्षात उतरले होते, असे साहेबांनी सांगितले. या कक्षामध्ये जाऊन आम्ही फोटोसेशन केले. राजभवनला लागुनच तिश्ता रेसिडन्सी मध्ये राज्यपाल राहतात.  साहेबांच्या घरात सुद्धा संपुर्ण मराठीमय वातावरण आहे.   साडेतीन तास राजभवनावर केवळ गप्पा सुरू होत्या आणि आमच्या ज्ञानात भर पडत होती.
खूप सांगण्यासारखं आहे. लिहीण्यासारखं आहे. पण लेखन मर्यादा आहेत.



"आप मेरे साथ इधर आओ'
श्रीनिवास पाटील राज्यपाल होऊन राजभवनावर मुक्कामास आल्यापासून राजभवनाचे विजेचे बिल निम्म्यावर आले आहे. वास्तविक राजभवन खूप उंचावर आहे. येथे प्रकाश भरपूर पडतो. रात्री सजावटीचे दिवे लावले जातात. येथे 4.30 वाजता  उजाडते. सायंकाळी 6 वाजता लावलेले दिवे सकाळी 4.30 वाजता बंद झालेच पाहिजेत, असा साहेबांनी दंडक केला. यापूर्वी निवांत 7 वाजता दिवे बंद करण्याची सवय असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्याने सुरूवातीला याकडे थोडे दुर्लक्ष केले मात्र सज्जड दम दिल्यानंतर शिस्त लागली. आता तो कर्मचारी साहेबांचा लाडका झाला आहे.
साहेबांच्या केबिनमधून दुसऱ्या केबिनमध्ये आम्ही जात असताना मी एक खूप वेगळी गोष्ट अनुभवली  थोड्या वेळापूर्वी आम्हाला चहा घेऊन आलेल्या कर्मचाऱ्याला साहेबांनी "आप मेरे साथ इधर आओ' असे सांगितले. एवढे मोठे राज्यपाल आपल्या कार्यालयातील "क' वर्ग कर्मचाऱ्याला अहो-जाहो बोलवतात,  याचं खूप आश्चर्य वाटलं. न रहावून मी साहेबांना विचारलं? मला लहानपणापासून ही सवय आहे. आमच्यात ती पद्धतच आहे. रहिला प्रश्न सिक्किम राज्यपाल म्हणून तर या राज्यात अरे-तुरे बोलविणे ही शिवी समजली जाते, असे त्यांनी मला सांगितले. राज्यपाल साहेबांच्या त्या उत्तराने मी थक्क झालो.









११ मे २०१६

सैराट आठवण

सैराट आठवण
आज तुझी खुप आठवण आली

मग मी ती वही हळुच बाहेर काढली
अलगद तुला न्याहळू लागली
तुझा स्पर्श स्मरण करून गेली
आज तुझी खुप आठवण आली

ती वही, ती पत्रे, ती प्रेमस्फुरणे
निशब्द होऊन बोलत राहीली
तुझ्यातला मी शोधू लागली
आज तुझी खुप आठवण आली

सुगंध बहरला शब्दफुलांचा अन् कायेचा
ऋतू आला पतझड सावनका
अबोल प्रीत प्रिया ती बावरली
आज तुझी खूप आठवण आली

आठवणीच आणि माझं नातं खुप जुनं
जवळ असुनही खुप दूर का वसली
वर्षे सरली पण स्मरणात तु  राहीली
आज तुझी खुप आठवण आली

एकटी आठवण खुप सुंदर असते
तिच्यात फक्त तु अन् मी असतो
का  ती भुतकाळ विस्कटत आली
आज तुझी खुप आठवण आली

आठवण आज सैराट जाहली
मज सोडून माझी सखी का गेली
उध्वस्त ह्रदयाला  फुंकर मारून गेली
आज तुझी खुप आठवण आली
.         
          ........सतीश मोरे

भेट  लास्ट वन्
भेट सरता सरता
हात सोडता सोडता
मी हळुच पुसले तीजला
सांग ना सखे काय हवे तुजला ??

सोडलेला हात पुन्हा घट्ट पकडत
ती बोलली ,
हा स्पर्श ठेऊन जा
बदल्यात माझे श्वास घेऊन जा
ते क्षण जे एकत्र जगलो
ती साधना ठेऊन जा
बदल्यात माझी प्रीतीची
भावना घेउन जा

मी फक्त इतकेच बोललो
जे तुझेच आहे राणी
ते वेगळे मागु नको
एकच जीव आहोत आपण 

तु वेगळी वागु नको
तु आणि तुझे डोळे
तू नुकतंच बहरलेल हिरवं रान
वहीत जपलेलं जाळीदार पान☘
तुझे नयन कट्यार 
करते  थेट ह्रदयावर वार ❤

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...