*अंतरंग*
अतिशय सुंदर गोष्ट आहे ,
वाचा,आपणास नक्की आवडेल!
*मी बारावीमध्ये असताना इंग्लिश पुस्तकात शिकलेला नंतर यादव मोरे क्लासेसमध्ये अनेकदा शिकवलेला एक धडा. मला लेखक आठवत नाही.*
*९९ लोकांची एक जमात*
*Community of 99 People*
एक गाव होतं. डोंगराच्या पायथ्याशी वसलेलं, त्या गावात ९९ स्त्री पुरुष रहात होते. सारे लोक अतिशय अतिशय कष्टाळू होते. दिवसभर काम करत. खाऊन पिऊन सुखी होते सारे. *त्या ९९ लोकांमध्ये एक अतिशय हुशार व्यक्ती होता.*
गावातील लोक रोज सकाळी पाणी आणण्यासाठी खुप लांब पायपीट करीत उंचावर असलेल्या झर्याजवळ जायचे. या कामासाठी त्यांचे रोज सकाळचे तीन चार तास खर्ची पडायचे. हे सर्व लोक हे काम पूर्ण झाल्यानंतर इतर कामाला लागायचे. त्या हुशार माणसाने याचा अभ्यास केला, माहिती घेतली,पाण्याचा प्रवाह कसा आहे याचे निरीक्षण केले आणि हे पाणी गावात कसे आणता येईल याचे नियोजन सुरू केले.
रात्रंदिवस काम केले, झरा ते गावापर्यंत पाणी प्रवाहाने आणण्यासाठी चर खोदायला त्याने सुरुवात केली. अनेक दिवस काम केले.शेवटी ते पाणी गावात आले,लोक खुश झाले.आता गावातच पाणी मिळणार, पाण्यासाठी चार तास घालवावे लागणार नाहीत, याचा सर्वानाच आनंद झाला.
आता मात्र त्या हुशार व्यक्तीने लोकांना पाणी देण्यासाठी एक अट घातली. *मी तुम्हाला पाणी देईन मात्र त्या बदल्यात तुम्हाला मला तुमचा वेळ द्यावा लागेल. आज पर्यंत तुम्ही पाणी आणायला रोज चार तास घालवत होता,आता एका तासात तुमचे पाणी भरण्याचे काम होणार आहे, त्यामुळे तुमचे चार तास वाचतील. त्यापैकी ३ तास तुम्ही मला द्यायचे,अशी अट त्याने घातली.*
रोज पाणी आणायला लागणार्या वेळेच्या बदल्यात दोन तास त्या व्यक्तीला देऊन आपलेही दोन तास उरतात, हा व्यवहार इतर सर्वांना पटला. वाचलेला वेळ हुशार व्यक्तीला द्यायची अट सर्वानी मान्य केली.
सर्व ९८ लोक हुशार व्यक्तीच्या घरी रोज २ तास कामाला येऊ लागले. घरातील स्वच्छता, शेती मशागत, कपडे धुणे, झोपडी बांधणे,जनावरांची काळजी घेणे, दुध काढणे आदी अनेक प्रकारची कामे हे लोक करू लागले.
ही कामे करत असताना त्या हुशार व्यक्तीने अनेक लोकांना हेरले. त्याच्या असे लक्षात आले की 'म' नावाची व्यक्ती फळे फुले याची काळजी योग्य प्रकारे घेतोय, त्याला यात रस आहे. मग त्याने 'म' ने इतर सर्व लोकांच्या घरातील, शेतातील फळाफुलांची काळजी, मशागतीची कामे करायची. त्या बदल्यात इतर सर्व व्यक्तींनी त्याची इतर कामे करायची, असा निर्णय घेतला. पुढे ती व्यक्ती 'माळी' म्हणू लागले.
त्या हुशार व्यक्तीने प्रत्येक लोकांमधील एक एक गुण हेरला. पुढे त्याच्यातील सर्वोत्तम गुणाचे ते काम त्याला दिले, त्या बदलात इतर लोकांनी त्याला वेळ दिला. पुढे वेळेच्या जागेवर वस्तू आल्या आणि पुढे कामावर आधारीत व्यवस्था त्या गावात निर्माण झाली.
चांगली कपडे शिवणारा शिंपी झाला, चांगले पशुसंवर्धन करणारा गवळी झाला. चांगली मातीची भांडी तयार करणारा कुंभार झाला. न्हावी,चर्मकार, लोहार, शेतकरी, गवंडी, गायक, वादक, धोबी असे अनेक *'कर्मकार'* झाले.
*काम चांगले करणारा कुशल कामगार तयार झाला,पुढे त्याची पत्नी, मुले, पुढची पिढी हेच काम करत राहीले व त्यानंतर त्याच नावाने, कामावरून त्यांना ओळखले जाऊ लागले. कामावर आधारित व्यवस्था, पुढे जाती व्यवस्था तयार झाली.*
© @ *सतिताभ*
सतीश वसंतराव मोरे
२४.०१.२०१९
karawadikarad.blogspot.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा