फॉलोअर

३१ मे २०२२

पण तु येत नाहीस


तुझी खुप आठवण येते, 
तुझं हास्य डोळ्यासमोर तरळते,
तुझे आवाज कानात घुमत राहतात,
.
.
.
पण, तू येत नाहीस  !


तुझी छबी समोर दिसते,
तुझे सतत भास होत राहतात,
तुझ्या गोड आठवणीत मी हरवून जातो,
.
.
.
पण तु येत नाहीस !

तु मला बोलवतेस,
तुझे पावलांचे आवाजही ऐकू येतात,
तुझ्या आवाजाच्या दिशेने मी धावतो,
.
.
.
पण तु येत नाहीस !


30/05/2022

२० मे २०२२

तु, मी आणि पाऊस


तु, मी आणि पाऊस 

१.
पाऊस तुझ्यासारखा असतो,
खोडकर, अवखळ आणि नखरेल!


२.
पाऊस सरकन येतो अन् जातो,
अगदी तुझ्या सारखाच !
तु येतेस क्षणभर
बेभान करतेस मनभर !

तु करतेस मला बेभान
तु नसताना पाऊस करतो मला बैचेन !

४.
तु जवळ असलीस
की पाऊस आनंददायी असतो!
मनातील अनेक वादळे
तो शांत करत असतो !

५.
चिंब पावसात भिजून
सखी मला बिलगली!
श्वासाचा वेग मंदावला,
पण हृदयाची धडधड वाढली !

@सतिताभ
२०.०५.२०२२

माझा विद्यार्थी सिनेमा दिग्दर्शक झाला


गणेश शंकर चव्हाण... कामगार ते दिग्दर्शक
माझा विद्यार्थी सिनेमा दिग्दर्शक झाला 

शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील नातं खुप जिव्हाळ्याचं असतं हे आपल्याला माहीत आहेच.आपल्याकडे शिकलेला एखादा विद्यार्थी गरीब असो वा श्रीमंत असो तो भेटल्यानंतर किंवा तो मोठा झाला आहे हे पाहून जो आनंद होतो, तो आनंद केवळ शिक्षकच जाणतो.1990 ते 2001 या दहा अकरा वर्षाच्या कालावधीत मी यादव मोरे क्लासेसच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्राशी जोडलेला होतो. 

करवडी,ओगलेवाडी,बनवडी, विद्यानगर या ठिकाणी आमचे क्लासेस होते. ओगलेवाडी परिसरातील बाबरमाची, राजमाची, वनवासमाची,हजारमाची,करवडी, टेंभू, गोवारे, सुर्ली,कामथी तसेच शामगाव, वडोली निळेश्वर, पार्ले, बनवडी या गावातील अनेक विद्यार्थ्यांसाठी आमचा क्लास यशाची खात्री देणारा होता. आमच्या क्लासेसमध्ये प्रवेश घेतला म्हणजे शंभर टक्के पास होण्याची खात्री अशी आमची एक प्रतिमा झालेली होती. ज्या मुलांना इंग्लिश विषयामध्ये कधीच पास होता आले नाही, कधीही इंग्रजीमध्ये दहावीस पेक्षा जास्त मार्क पडले नाहीत, त्या मुलाला दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत 35 ते 40 मार्क मिळवून देण्याची हमी  मोरे सरांनी म्हणजे मी दिली होती. तीच परिस्थिती होती गणित विषयाची. 52 मार्क पडण्यासाठी लागणारी प्रमेय, सूत्रे याचा मेळ कसा लावायचा आणि पास कसे व्हायचे याचा एक शिस्तबद्ध फाॅर्मुला इथं यादव सर शिकवायचे. फक्त पास होणेच नव्हे तर इंग्लिशमध्ये 80 तर गणितात पैकीच्या पैकी 150 मार्कस मिळवणारे विद्यार्थी सुद्धा आमच्या यादव मोरे क्लासेसने घडवले आहेत.दहावीच्या गुणवत्ता यादीमध्ये आमच्या क्लासचे दोन विद्यार्थी झळकले होते. आज यादव मोरे क्लासेस माध्यमातून आम्ही घडवलेल्या एका विद्यार्थ्याविषयी मला बोलायचे आहे. हा विद्यार्थी खरंच असाधारण,असामान्य अवलिया आहे. ज्याचं नाव आहे गणेश शंकर चव्हाण !

आमच्या करवडी गावच्या शेजारीच आमच्या गावच्या हद्दीत  पाटबंधारे विभागाची आरफळ वसाहत 1980 च्या दरम्यान उभी राहिली. त्याचं आरफळ वसाहत आणि पुढे करवडी कॉलनी असं नामकरण झाले. काॅलनीमध्ये त्या काळात फार मोठ्या प्रमाणात शासकीय कार्यालये अधिकाऱ्यांची रेलचेल होती. आरफळ आणि धोम या कालव्याची कामे सुरू असल्यामुळे याठिकाणी कामाचा मोठा व्याप होता. करवडी कॉलनीमध्ये शासकीय अधिकाऱ्यांसाठी  निवासस्थाने होती. मध्यभागी दत्त मंदिर, दुकानगाळे, सांस्कृतिक हाॅल,भव्य क्रिडांगण होते. शनिवार रविवारी याच मैदानावर आम्ही क्रिकेट खेळायला जात असू. याठिकाणी आमचे सद्गुरू किराणा दुकान होते. या कॉलनी मुळेच आमच्या करवडी गावचे अर्थकारण उभारी लागले होते.

करवडी कॉलनीमध्ये माझे अनेक मित्र आहेत, होते. किराणा दुकान माध्यमातून आमच्या कुटुंबाचे कॉलनीमधील अनेक कुटुंबाशी जवळचे नाते होते, घरी येणं जाणं होतं. कॉलनीच्या पूर्व बाजूला शंकर चव्हाण हे वाई तालुक्यातील एक गृहस्थ तिथे राहत होते तर त्यांच्या शेजारी मदनेकाका हे दुसरे वाई तालुक्यातील नोकरदार राहत होते. शंकरराव चव्हाण यांच्या यांना संतोष आणि गणेश ही दोन मुले. ही दोन्ही मुले क्लाससाठी सुरुवातीला करवडी गावात तर त्यानंतर ओगलेवाडी येथे माझ्याकडे येत होती. सायकलवरुन डबल सीट येणारी ही दोन्ही मुले मला आजही आठवतात.अवखळ,खोडकर मात्र तितकीच आज्ञाधारक. इतर विद्यार्थ्यांप्रमाणेच आमच्या यादव क्लासेस मध्ये शिक्षण घेऊन दोघेही 1996 साली दहावी पास झाले. पुढील दोन वर्षानंतर आयटीआय कोर्स करून २००० च्या दरम्यान गणेश चव्हाण ऑस्ट्रेलिया येथे नोकरीनिमित्त गेला.

दरम्यानच्या काळात करवडी कॉलनीमधील शासकीय काम संपत आल्यानंतर या कॉलनीतील अनेक कुटुंबे कॉलनी सोडून त्यांच्या मूळ गावी किंवा कराड विद्यानगर मलकापूर अशा ठिकाणी स्थलांतरित झाली. हळूहळू कॉलनी ओस पडू लागली. आज तर हि कॉलनी पूर्णपणे भकास आहे.या कॉलनीची आणखी एक आठवण मला सांगायची तर या कॉलनीत प्रत्येक वर्षी साजरा होणारा भव्य गणपती उत्सव. ठेकेदाराकडून मोठ्या प्रमाणात निधी गोळा करून त्या काळात हा गणपती उत्सव साजरा केला जायचा. उत्सवात खूप मोठ्या प्रमाणात खर्च केला जात असे. सलग चार पाच दिवस मोठ्या पडद्यावर हिंदी मराठी चित्रपट दाखवले जात, नाटकेही होत. चित्रपट, ऑर्केस्ट्रा पाहण्यासाठी करवडी परिसरातील अनेक स्त्रिया आणि पुरुष दीड दोन किलोमीटर पायपिट करून जात. याठिकाणी पाहिलेले तीसरी मंजिल, मोहरा आणि दोस्ताना हे तीन चित्रपट तरी मला चांगलेच आठवतात. याशिवाय सुशीला, अष्टविनायक हे मराठी चित्रपट सुद्धा मी या ठिकाणी पाहिलेले आहेत. कॉलनी ओस पडल्यानंतर कॉलनीमधील माझे मित्र आणि नोकरदारांचे संबंध तुटले. मात्र रवि सुतार, महेश सटवे तसेच गणेश, विजय सुतार सारखे काही विद्यार्थी संपर्कात होते.रवींद्र सुतार, महेश सटवे यांच्यासारखे निवडक मित्रच आजही संपर्कात आहेत. 

गणेश शंकरराव चव्हाण या विषयाकडे मी पुन्हा येतो. ऑस्ट्रेलियामधील नोकरी करून चार-पाच वर्षांपूर्वी गणेश पुण्याला आला. पुढे वाईला आला आणि याच काळात त्याच्या डोक्यात चित्रपट काढण्याचे खूळ आले. चित्रपट सृष्टीचा कसलाही अनुभव नाही, चित्रपट शूटिंग कसं होतं माहीत नाही, कॅमेरा कसा धरतात माहीत नाही, कोणत्याही नाटकात काम केले नाही, चित्रपटाचं समीक्षण केले नाही, चित्रपटगृहांमध्ये जाऊन फार चित्रपट पाहिलेले नाहीत, लेखक काय असतो? दिग्दर्शक काय असतो? निर्माता काय असतो ?याचं कसलंच ज्ञान नाही. पटकथा, छाया, मेकअप याची कसलीही माहिती नाही. टीव्हीवर किंवा कधीतरी थेटर मध्ये जाऊन पाहिलेला सिनेमा एवढंच काय या गणेशला चित्रपटाविषयी असलेलं ज्ञान. मात्र तरीही त्याने चित्रपट निर्मिती करायची ठरवली. 

नागराज पोपटराव मंजुळे हा आदर्श डोळ्यासमोर ठेवून गणेशने चित्रपट निर्मिती करण्याचा निश्चय केला. गणेशचं करवडी कॉलनीवर इतकं प्रेम आहे की त्याने निर्मिती संस्थेला 'काॅलनी फिल्मस' असे नाव दिले. काॅलनीमधील दत्त मंदिरात जाऊन शुभारंभ केला. त्याच्या डोक्यात जी कथा होती, ती कथा हळू स्फुरत गेली. त्या कथेची पटकथा तयार झाली आणि "जिव्हारी" चित्रपट पुढे सरकू लागला. 

चित्रपट तयार करण्याची जिद्द गणेशने मनाशी खुणगाठ बांधली खरी पण चित्रपट काढणे म्हणजे लहान मुलांचा खेळ नसतो. त्यासाठी पैसा लागतो. हा पैसा आणायचा कोठून ? कुणाकडून कर्ज काढायचे? असे अनेक प्रश्न त्याच्या मनामध्ये आले. मग कुणाकडे पैसे मागण्याची मागण्याऐवजी आपणचं पैसे गोळा करू या असा विचार त्याच्या मनामध्ये आला. घरात असलेलं सर्व सोने-नाणे दागिने, घर-दार, पुण्यामध्ये विकत घेतलेला फ्लॅट, सर्व संपत्ती त्याने विकून टाकली. या माध्यमातून कसेबसे एक कोटी रुपये गोळा झाले आणि जिव्हारीच्या शूटिंगला सुरुवात झाली. 

गेल्या दोन-तीन वर्षांत फेसबुकच्या माध्यमातून त्याचा माझा संपर्क वाढला आहे.फेसबुक वरील त्याचे कोव्हिड कालावधीतील त्याचे लिखाण पाहून गणेश आता प्रगल्भ झाला आहे हे जाणवले. याच काळात त्यांने चित्रपट निर्मिती विषयी सांगितले होते. त्यावेळी मला त्याचं खूप आश्चर्य आणि अप्रुप वाटलं होतं. गणेश चव्हाण आणि थेट पिक्चर काढणार! पण माझा एक विद्यार्थी थेट चित्रपट क्षेत्रात उतरतो, निर्माता लेखक दिग्दर्शक होतो, ही गोष्ट माझ्यासाठी अभिमानाची होती. गणेशचा चित्रपट सृष्टीतला प्रवास आत्ता सुरू झाला. खरं तर चित्रपट सृष्टीमध्ये पैशांची गुंतवणूक करणे हे फार अवघड काम आहे. कसल्याही प्रकारे यशाची खात्री नसते. आजच्या काळात वेगवेगळे अधिकार, गाणी तसे चित्रपटाचे अधिकार वाहिन्यांना विकून पैसे गोळा होतात खरे. मात्र घरदार विकून चित्रपट काढण्याचं धाडस करणारा गणेश शंकर चव्हाण यांच्या सारखा वेडा एखादाच असतो. 

मला आणखी एका कारणासाठी गणेशचा अभिमान वाटतो. लहानपणी आपणास कोणी नाव विचारल्यानंतर आपण पूर्ण नाव सांगत असतो. अजूनही गणेशला नाव विचारलं तर तो आपले पूर्ण नाव सांगतो. फेसबुक अकाउंटवर गणेश शंकरराव चव्हाण अशी नोंद आहे. मलाही वडलांचं नाव सांगायला खूप आवडते. पितृप्रेमी गणेशच्या कामाचे कौतुक करावे तेवढे थोडे थोडे आहे. चित्रपटाचे शुटींग दरम्यान त्याने अनेकदा आपल्या वडिलांना सेटवर नेले होते.

मध्यंतरी क्रांती नावाचा एक मल्टीस्टार हिंदी चित्रपट आला होता. या चित्रपटाच्या निर्मितीच्या वेळी निर्माता मनोज कुमार यांनी संपूर्ण घरदार बँकेला तारण ठेवले होते, असे मी ऐकले होते. गणेश चव्हाण यांनी बँकेला संपत्ती प्रॉपर्टी गहाण ठेवण्याऐवजी ती विकून पैसे गोळा केले आहेत. चित्रपट निर्माण करताना येणाऱ्या सगळ्या अडचणींवर मात करून गणेशने हा चित्रपट तयार केला आहे. हा चित्रपट सातारा व कराड येथे  20 मेला रिलीज होणार आहे. 

सातारा कराड येथील मुलं चित्रपट तयार करतात, दिग्दर्शक बनतात हा खरंच आपल्यासाठी आनंदाचा क्षण आहे. माझी सुद्धा खूप वर्षापासून दिग्दर्शन करण्याची इच्छा आहे. पण मला आयुष्यात कधीही ती संधी मिळाली नाही किंवा मी त्यावर जास्त विचारही केला नाही. मनातली ती एक अतृप्त इच्छा अनेक वेळा माझ्या मित्रांना बोलून दाखवली होती. मला हे शक्य झालं नाही, मात्र माझ्या विद्यार्थ्याने गणेशने हे शिवधनुष्य पेलले आहे. गणेश दिग्दर्शक झाला आहे. आज सोनियाचा दिनू आहे. गणेशला खुप खुप शुभेच्छा.

...सतीश वसंतराव मोरे
 २० मे २०२२

२८ एप्रिल २०२२

अगोदर मला सावरं मग तुझं आवरं



एकदा ती म्हणाली,
ऐ वेड्या,
बस की आता, 
आवरू दे मला !

मग मी सहज बोललो 
अगोदर मला सावरं, 
मग तुझं आवरं !

न्हाहून प्रेमरसात नीव,
तुझ्यात गुंतलाय जीव 
बेफाम भावनेचा गुंत्ता , 
तो अगोदर सोडवं , 
मग तुझं आवरं !

न झालेल्या भेटीची उत्कंठा , 
साक्षात भेटीपेक्षा झालीय उत्कंठ,
प्रेमरसात डुबलेल्या 
माझ्या मनाला अगोदर सावरं, 
मग तुझं आवरं !

वार्‍याहून वेगवान विजेहून जलद, 
तुझ्यापर्यंत पोहचणाऱ्या 
माझ्या प्रेमलहरीला 
अगोदर सावरं, 
मग तुझं आवरं !

कवेत तुझ्या विरघळून जाण्याची , 
ओढ अजुनच वाढलीय मिलनाची, 
ओढीने त्या व्याकुळ 
या जीवाला अगोदर सावरं,
मग तुझं आवरं !

भावनिक गुंफण अन् कोमलता  
नात्यात बहरली आहे आता मणभर, 
हळव्या मनाला 
तु अगोदर सावरं, 
मग तुझं आवरं !

तुझे भास होताना, 
घड्याळाचे काटेही थांबतात क्षणभर , 
मग मात्र मीही होतो स्वैरभर,
अगं वेडे 
म्हणून तर म्हणतो 
अगोदर मला सावरं, 
मग तुझं आवरं !

 *सतिताभ
२७.०४.२०२२

२२ मार्च २०२२

कवितेचा जन्म

कवितेचा जन्म
आठवणीतून होतो !
कवितेचा जन्म
जाणिवेतून होतो !
कवितेचा जन्म
प्रेमरसातून होतो !
कवितेचा जन्म
प्रेमभंगातून होतो !
कवितेचा जन्म
त्यागातून होतो !
कवितेचा जन्म
त्राग्यातून होतो !
कवितेचा जन्म
विरहातून होतो !
कवितेचा जन्म
मैत्रीतून होतो !
कवितेचा जन्म
नातेबंधातून होतो !
कवितेचा जन्म
विश्वासातून होतो !
कवितेचा जन्म
गद्दारीतून होतो !
कवितेचा जन्म
आनंदातून होतो !
कवितेचा जन्म
दुःखातून होतो !
कवितेचा जन्म
सौंदर्यांतून होतो !
कवितेचा जन्म
प्रतिभेतून होतो !
कवितेचा जन्म
प्रतिक्षेतून होतो !
कवितेचा जन्म
कवितेतून होतो !

१९ डिसेंबर २०२१

एकाला जायची घाई झाली होती...


एकाला जायची घाई झाली होती, एकाला यायची !
@ मराठी बाणा शामगाव घाट

'पुढारी' वर्धापन दिनानिमित्त कराड पाटण तालुक्यातील गावागावांत,मान्यवरांच्या संस्थेत दौरे सुरू आहेत.काल शनिवारी सायंकाळी शामगावच्या घाटात नव्याने सुरू झालेल्या हाँटेल 'मराठी बाणा'मध्ये जाण्याचा योग आला. मुंबई महापालिकामध्ये सहायक अभियंता म्हणून काम पाहणारे अंतवडी गावचे सुपुत्र कृष्णा शिंदे आणि सौ.सुजाता शिंदे यांनी हे हाँटेल सुरू केले आहे. अजून बरंच काम बाकी आहे.सध्या फक्त चहा-नाश्ता तसेच शाकाहारी आणि मांसाहारी जेवण विभाग सुरू केला आहे.निसर्गरम्य ठिकाणी सुरू झालेल्या या हाँटेलला एकदा भेट द्यायला हवी. सुमारे साडे चार एकर क्षेत्रावर विकसित होत असलेल्या 'मराठी बाणा' मध्ये भविष्यात कृषी पर्यटन, रेसार्ट,जलतरण, वाॅटर बोटींग आणि बरंच काही करण्याचा शिंदे सरांचा मानस आहे.


मी,दिलीप माने सरांच्या सोबत सायंकाळी सहाच्या सुमारास 'मराठी बाणा' येथे पोहचलो. अतिशय दुर्मिळ, अविस्मरणीय आणि सुंदर असं दृश्य आणि निसर्गाचा आविष्कार आज एकाच वेळी मला याठिकाणी अनुभवायला आला,पाहता आला. 

एकीकडे पश्चिमेला 'सुर्यनारायण' मावळतीला निघाले होते तर दुसरीकडे 'चंद्रदेव' शामगावच्या डोंगरातून डोकावत होते. एकाला जायची घाई होती, एकाला यायची! दोघेही निसर्गाचे अखंड,अढळ, अटल,अनिवार्य,अविभाज्य,अनुपम,अतुट,अविरत कार्यरत घटक. योग्य वेळीच यायचे,योग्य वेळीच जायचं. कधीही वेळ चुकवायची नाही. आपलं काम चोख बजवायचे ! जाताना सर्वांना प्रकाशित करत जायचं,देत रहायचं. देत असताना परत काही मिळेल याचा हिशोब नाही ठेवायचा. एक प्रखर दुसरा शितल. दोघांशिवाय जग चालूच शकत नाही. जीवनात काही वेळी आक्रमकता हवी तर कधी संयम हवा, हेच तर हे दोघं सांगत आहेत. 

निसर्ग आपल्याला खुप काही शिकवून जातो. निसर्गाचा हा आविष्कार पाहताना आज मी पुन्हा एकदा 'चंद्रमा'च्या प्रेमात पडलो होतो, 'दिनकरां'च्या रंग उधळणीवर भाळलो होतो.

@सतीताभ
१९.१२.२०




२५ नोव्हेंबर २०२१

बाळासाहेबांनी करून दाखवलं !


बाळासाहेबांनी करुन दाखवलं...

फक्त कराड उत्तरचे पालकमंत्री, कराड तालुक्यात बाळासाहेब पाटलांचा दबदबाच नाही, बाळासाहेब अपघाताने मंत्री झाले आहेत, त्यांना साखर कारखान्या शिवाय काही कळत नाही, या आणि अशा अनेक टीकाटिप्पणी आणि टोमण्यांना सामोरे गेलेले सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मिळवलेला विजय मी पण काय कमी नाही, पन्नास वर्षे कराड तालुक्याचे राजकारण आणि सलग 42 वर्षे नगराध्यक्ष म्हणून काम पाहिलेल्या पी.डी.पाटील यांचा पुत्र आहे, असे जणू काही दाखवून दिले आहे. बाळासाहेब पाटील कराड सोसायटी गटातूनच का उभे राहिले आणि ते का जिंकले याची अनेक कारणे आहेत. मात्र, यामध्ये सर्वात महत्त्वाचं कारण त्यांना कराड तालुक्याचा प्रमुख नेता व्हायचं होतं आणि त्यांनी ते या निकालातून सिद्ध करुन दाखवलं आहे !

--------------



सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीला या वर्षी फार महत्त्व आले. या अगोदर गेल्या अनेक निवडणुका दरम्यान पालकमंत्री एक तर अजित पवार राहिले होते किंवा रामराजे नाईक निंबाळकर किंवा आणखी कोणी. या सर्व नेत्यांनी त्या काळात विलासराव उंडाळकर यांना हाताशी धरून जिल्हा बँकेच्या निवडणुका लढवल्या होत्या, जिंकल्या होत्या. मात्र, ही पहिली निवडणूक होती ज्या निवडणुकीत विलासराव पाटील-उंडाळकर नव्हते. सलग नऊ टर्म जिल्हा मध्यवर्ती बँकेत निवडून जाण्याचा विक्रम विलासराव पाटील यांच्या नावावर आहे. हा विक्रम फक्त उपस्थिती पुरता नाही तर या कालावधीत त्यांनी सातारा जिल्हा बँक टॉपला नेऊन ठेवली. जानेवारी 2021 मध्ये काकांचे निधन झाले. दरम्यान दोन वर्षांपूर्वी ठाकरे सरकार आल्यानंतर बाळासाहेब पाटील सहकार मंत्री झाले, पुढे पालकमंत्री झाले. या अगोदरच्या दोन निवडणुकांमध्ये जिल्हा बँकेत जाण्यासाठी बाळासाहेब पाटलांना संघर्ष करावा लागला होता. एकदा पक्षाच्या खातिर पराभव समोर दिसत असून सुद्धा उदयनराजेंच्या विरोधात लढावे लागले होते. तर गेल्या निवडणुकीत गप्प बसवून नंतर स्वीकृत संचालक म्हणून त्यांची बोळवण करण्यात आली होती. हे करताना त्यांना पद्धतशीर पद्धतीने राष्ट्रवादीने बाजूला ठेवले होते. मात्र यावेळी बाळासाहेब पाटील स्वतः पालकमंत्री असल्यामुळे निर्णय  प्रक्रियेमध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका होती. ना. रामराजे नाईक निंबाळकर, आ. शिवेंद्रराजे भोसले, आ. मकरंद आबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँकेचा कारभार गेल्या पाच वर्षात चांगला झाला. तिघेही सुरुवातीपासून एकत्र आहेत आणि होते. बाळासाहेब पाटील पालकमंत्री झाले म्हणून त्यांना जिल्हा  बँकेच्या उमेदवार निवड प्रक्रियेत फारसे महत्त्व येणार नाही असं पद्धतशीर पूर्वक नियोजन करून डाव आखला गेला. विलासराव पाटील -उंडाळकर आणि रामराजे नाईक निंबाळकर यांचे संबंध चांगले होते. खरतरं मनात आणलं असतं तर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि खासदार शरद पवार यांच्याशी ‘मनापासून’ दुबार चर्चा करून ना. निंबाळकर हे उदयसिंह पाटील यांचे मन वळवू शकले असते किंवा बाळासाहेब पाटील यांना पर्यायी जागा देऊ शकले असते.
 सातारा जिल्ह्याच्या राजकारणात कराडचे सुरुवातीपासूनच असणारे मोठे स्थान कमी करण्यासाठी गेल्या दहा-पंधरा वर्षात फार मोठा प्रयत्न झाला. मात्र, नियतीने 2010 साली पृथ्वीराज चव्हाण यांच्या रूपाने कराडला मुख्यमंत्रीपद दिले. त्यानंतर भाजप सरकार आल्यानंतर डॉ. अतुल भोसले, शेखर चरेगावकर यांच्या माध्यमातून सत्ताकेंद्रे कराडलाच राहिली. दोन वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत भाजपमध्ये गेलेले शिवेंद्रराजे निवडून आले, मात्र शरद पवार यांचे जवळचे शशिकांत शिंदे पराभूत झाले. मकरंद पाटील हे निवडून आले मात्र त्यांचा अनुभव बाळासाहेब पाटील यांच्यापेक्षा कमी असल्यामुळे बाळासाहेब पाटील यांना मंत्रिपद मिळाले आणि पुन्हा एकदा सत्ता केंद्र कराडला आले. मात्र असे असूनही राष्ट्रवादीच्या या जिल्हा टीमने कधीही बाळासाहेब पाटील यांना स्वतंत्रपणे काम करू दिले नाही. ना. बाळासाहेब पाटील यांची छाप पडू लागली तर आपली इमेज कमी होईल यासाठी भरपूर प्रयत्न झाले. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत बाळासाहेब पाटील हे सोसायटी मतदार संघातूनच कशी निवडणूक लढतील, त्यांच्यासमोर उदयसिंह पाटील कसे उभे राहतील याचं नियोजन राष्ट्रवादी मधील दिग्गजांनी केलं. कराडचा वाद मिटवण्या ऐवजी पेटवण्याचा प्रयत्न झाला. परंपरा आणि वारसा या जिद्दीला पेटलेल्या उदयसिंह पाटील यांनी सोसायटी मतदारसंघातून पहिल्यांदा अर्ज भरला आणि बाळासाहेब पाटील यांना शह देण्याचा प्रयत्न केला. बाळासाहेब पाटील यांनीही या दबावाला न झुकता याच गटातून उभे राहण्याचा निर्णय जाहीर केला.
गेली नऊ टर्म कराड तालुका सोसायटी मधून प्रतिनिधित्व करणार्‍या विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या चिरंजीवांच्या विरोधात निवडणूक लढवताना बाळासाहेब पाटील यांनी सुरुवातीपासूनच केलेला अभ्यास आणि त्यांचे बंधू जयंत पाटील यांच्यासहित एकनिष्ठ कार्यकर्त्यांची साथ महत्त्वाची होती. याच मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे निश्चित केले असल्यामुळे त्यांनी निवडणुकी अगोदरच तीन महिने सर्व मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या होत्या. कोणता मतदार कोणाचा आहे? कुठे विकू, झुकू शकतो? कुठे स्ट्राँग होऊ शकतो? या मतदाराचा वीक पॉईंट कोणता? हा कुणाचे नेतृत्व मानतो इथपासून तो कुणाचा पाहुणा आहे ? त्याचा कोणी नातेवाईक कुठल्या ठिकाणी नोकरीला आहे? त्याच्यावर कोणत्या पद्धतीने दबाव टाकता येईल किंवा मदत करता येईल? याचा ‘कराड उत्तर पॅटर्न’ नुसार अभ्यास बाळासाहेब पाटील गटाने केला होता. बाळासाहेब पाटील यांचे समर्थक हे त्यांच्या सोबतच राहणार होतेच. आ. पृथ्वीराज चव्हाण यांना मानणारे मतदार उघडपणे उदयसिंह पाटील यांना मदत करणार नव्हते. पृथ्वीराज चव्हाण आणि उदयसिंह पाटील यांच्यातील मनोमिलन किती मनापासून झालेले आहे याचा अभ्यास बाळासाहेब पाटील यांना होता. कराड तालुक्यातील गावागावात गेल्या दोन वर्षात नेटवर्क अधिक मजबूत करून उत्तर मतदार संघाप्रमाणे बाळासाहेब पाटील यांनी दक्षिणेत आपला एक माणूस गावागावात तयार केला होता.


बाळासाहेब पालकमंत्री आहेत, सहकार मंत्री आहेत ते निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतात म्हणजे काहीतरी त्यांच्याकडे ‘स्ट्राँग पॉइंट’ असणार, असा प्रचार कराड तालुक्यात सुरुवातीपासूनच झाला. छत्रपती उदयनराजें विरोधात जिल्हा बँकेत पक्षाने त्यांच्यावर लादलेल्या उमेदवारीमुळे झालेला पराभव वगळता बाळासाहेब कधीही पराभुत झालेले नाहीत. गेली अनेक वर्षे त्यांनी कराड दक्षिणच्या राजकारणात फारसा रस घेतला नव्हता. कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीतही त्यांचा फारसा सहभाग नसतो. कुणालाही न दुखावण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे सहसा त्यांचा नवीन राजकीय विरोधक तयार होत नाही. त्यांचे परंपरागत काही विरोधक आता त्यांच्यासोबत काम करत आहेत. मात्र बाळासाहेब पाटील यावेळी दक्षिण मधील सर्व घटकांचा अभ्यास करून या निवडणुकीला सामोरे गेले.
ज्येष्ठ नेते पी.डी.पाटील यांच्या घराचे एक फारमोठे शल्य आहे. एवढे मोठं राजकीय आणि विकासात्मक काम करूनही यशवंतराव चव्हाण साहेबांच्या बरोबर असून सुद्धा विलासराव पाटील यांच्या राजकीय प्रभावामुळे त्यांना कराड तालुक्याचे नेते होते आले नव्हते. किंबहुना ज्येष्ठ नेते पी.डी.पाटील यांनी कराड शहर आणि  उत्तर या पलीकडे जाऊन जास्त पाहिले नव्हते. मतदारसंघ पुनर्रचनेनंतर बाळासाहेब पाटील यांनी सह्याद्री कारखाना कार्यक्षेत्र असलेल्या सातारा, कोरेगाव आणि खटाव तालुक्यात विधानसभा निवडणुकीपुरते लक्ष घातले. पुढे त्यांचा तिथे गट निर्माण झाला. मात्र या तालुक्यातील राजकारणात त्यांनी कधीही ढवळाढवळ केली नाही.  उंडाळकर आणि पी.डी.पाटील गटाचे अनेक वर्षे अनेक निवडणुकीमध्ये सख्य राहिले. मात्र ते मनापासून नव्हते. परिस्थितीनुसार निर्णय घेऊन ज्येष्ठ नेते पी.डी. पाटील आणि विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या गटाने त्या -त्या वेळी पंचायत समिती, बाजार समिती या सत्ता ताब्यात घेतल्या होत्या. काकांनी दक्षिणेतील आपले पाय मजबूत करताना मोहिते- भोसले यांच्यामध्ये भांडणे लावत सतत मोठा विरोधक तयार होऊ दिला नव्हता. त्यामुळे ते सलग विधानसभेत जाऊ शकले. राज्यात असणारा दरारा कायम ठेवत बँकेच्या माध्यमातून काका नेहमी जिल्ह्याचे नेते म्हणून कार्यरत राहिले. सह्याद्री कारखाना आणि माझे शहर एवढाच विचार तसेच सोयीचे आणि तडजोडीचे राजकारण करत असल्यामुळे पी.डी. साहेब यांना कधीही जिल्ह्याच्या राजकारणात जावसं वाटलं नाही. मात्र त्यांच्या निधनानंतर बाळासाहेब पाटील यांनी कराड तालुक्याच्या राजकारणात आपली पावले भक्कम करण्यास सुरुवात केली. कृष्णा कारखानाच्या निवडणुकीत बाळासाहेब पाटील तटस्थ राहत अप्रत्यक्षरित्या त्यांनी अतुल भोसले यांना पाठिंबा दिला. अतुल भोसले यांचा तीन वेळा झालेला पराभव कुणामुळे झाला हे सर्व जिल्ह्याला माहित आहे. पहिला पराभव थेट बाळासाहेब पाटलांनी केला. दुसर्‍या दोन पराभवाला बाळासाहेब पाटील थेट जबाबदार नसतील पण कराड दक्षिणमधील बाळासाहेब पाटील यांचा गट अतुल भोसले यांच्या सोबत राहिला असता तर कदाचित चित्र वेगळे दिसले असते. या जरी जर-तरच्या गोष्टी असल्या तरी कराड दक्षिण राजकारणात जिकडे बाळासाहेब पाटील तिकडे विजय
नक्की होऊ शकतो अशी सध्याची परिस्थिती आहे.
दुसरीकडे पृथ्वीराज चव्हाण यांच्या घराण्यासोबतही बाळासाहेब पाटील यांचे फारसे सख्य राहिलेले नाही. गेल्या दहा वर्षात बदलत्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब पाटील जरी एकत्र दिसले असले तरीही या गटातील दुरावा वेळोवेळी दिसला आहे. कराड नगरपालिकेच्या गत निवडणुकीवेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी सुभाषराव पाटील यांच्या विरोधात केलेला प्रचार आणि लोकशाही आघाडीचा झालेला मानहानीकारक पराभव बाळासाहेब पाटील गट अजूनही विसरलेला नाही. पृथ्वीराज चव्हाण गट आणि उदयसिंह पाटील यांचा गट एकत्र आलेला असला तरी कार्यकर्त्यांमधील कुजबुज काय आहे याची माहिती घेत बाळासाहेब पाटील यांनी कराड तालुक्यातील राजकारणाचा चांगला अभ्यास केला. या अभ्यासाच्या जोरावरच ते जिल्हा बँकेच्या निवडणुकीला सामोरे गेले.
जिल्हा बँकेची निवडणूक सोपी नसते. सोसायटी मतदारसंघातून निवडून जायचं असेल तर तेवढी ताकद आपल्याकडे आहे का? गेल्या दोन निवडणुकीमध्ये आपल्याला किती मते मिळाली होती? याचा अंदाज घेतानाच उदयसिंह पाटील यांच्या विरोधातील सर्व मतदारांपर्यंत पोहोचण्यात ते यशस्वी झाले. उदयसिंह पाटील हे काँग्रेसचे उमेदवार आहेत असा प्रचार सुरुवातीपासूनच करण्यात आला. मात्र काँग्रेसचे आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या सहित कोणीही नेता  उदयसिंह पाटील यांच्या प्रचारासाठी कराड तालुक्यात कुठेही फिरताना दिसला नाही. पृथ्वीराज चव्हाण यांना मानणारी जी काही मते मते होती ती मते सुद्धा आपल्याकडे खेचून घेण्यात बाळासाहेब पाटील यांचे बंधू यशस्वी झाले. उदयसिंह पाटील यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या गटाकडे मदत मागितली नाही, असे पृथ्वीराज चव्हाण यांचे कार्यकर्ते आता बोलून दाखवत आहेत. हे जरी खरे असले तरी काँग्रेस प्रेमी अनेक व्हाट्सअप ग्रुप वरती बाळासाहेब पाटील यांच्यावर खालच्या शब्दात जोरदार टीका झाली. फक्त या ग्रुपवरच हे दोन गट एकत्र असल्याचे दिसले. प्रत्यक्षात उंडाळकर गट आणि पृथ्वीराज चव्हाण यांचा गट जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून कुठेही एकत्र काम करताना कोणालाही दिसला नाही. याची कारणेही
वेगळी आहेत.
पृथ्वीराज चव्हाण यांना कराड तालुक्याच्या राजकारणात तसा फारसा इंटरेस्ट नाही. त्यांना दक्षिण सोडून दुसरीकडे जायचे नाही. दक्षिणमध्ये ‘सध्या तरी’ ते सेफ आहेत. दक्षिणमध्ये निवडून यायचे असेल तर बाळासाहेब पाटील गटाची मदत लागणार आहे किंबहुना बाळासाहेब पाटील यांच्या गटाच्या मदतीमुळेच ते 2019 च्या निवडणुकीत निवडून आलेले आहेत. त्यामुळे उघड प्रचार करून मने दुखावण्यापेक्षा जिल्हा मध्यवर्ती बँकेतील मला काही कळत नाही असे बोलून ते या निवडणुकीपासून लांब राहिले. त्यांना या निवडणुकीपासून दूर ठेवण्यासाठी सुद्धा बाळासाहेब पाटील गटाने चांगलेच लॉबिंग केल्याची चर्चा आहे. पृथ्वीराज चव्हाण यांना मानणारी काही मते जर पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले असते तर कदाचित उदयसिंह पाटील यांना मिळू शकली असती. मात्र उदयसिंह पाटील यांनी तशी मदतच मागितली नाही, असे पृथ्वीराज चव्हाण यांचे कार्यकर्ते खासगित बोलून दाखवत आहेत. मात्र, हे सगळं घडूच नये यासाठी बाळासाहेब पाटील यांच्या सहीत यांच्या बंधूनी खेळलेल्या खेळी यशस्वी झाल्याचे निकालावरून लक्षात येते. खरेतर उदयसिंह पाटील सोसायटी मतदारसंघातून उभे राहिले नसते तर बाळासाहेब पाटील दक्षिणेतल्या गावा-गावात पोहोचू शकले नसते. ही झाली एक बाजू.  मात्र उदयसिंह पाटील हे एकाकी लढले.त्यांना मिळालेली मते पहिली तर त्यांची मते त्यांच्या सोबत आहेतच हे स्पष्ट होते. पराभवानंतर ते स्वतः यावर आत्मचिंतन करतीलच!
बाळासाहेब पाटील यांनी त्यांचे कट्टर विरोधक अतुल भोसले यांच्या गटाची जुळवून घेतले, ही या निवडणुकीला सुरुवातीला मिळालेली एक वेगळी कलाटणी होती. अतुल भोसले यांच्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँक, बाजार समिती किंवा नगरपालिका फारसे महत्त्वाचे नाही. त्यांना काही करुन फक्त विधानसभेत जायचं आहे आणि विधानसभेत जाण्याचा मार्ग ‘मंगळवार पेठे’तून जातो याची त्यांना चांगली जाणीव आहे. उदयसिंह पाटील किंवा पृथ्वीराज चव्हाण हे कराड दक्षिणचे येणार्‍या निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार असू शकतात. या दोन्ही उमेदवारां विरोधात उभे राहताना बाळासाहेब पाटील यांना आत्ता मदत केली तर भविष्यात फायदा होऊ शकतो, या दूरदृष्टीतून अतुल भोसले यांनी बाळासाहेब पाटील यांच्याकडे मदतीचा हात पुढे केला. बाळासाहेब पाटील यांना मिळालेली मते पाहिली तर अतुल भोसले यांची मदत त्यांना किती फायद्याची ठरली आहे हे स्पष्ट होते.
या निकालामुळे बाळासाहेब पाटील यांचा कराड तालुक्यातील दरारा वाढला आहे. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी जिल्हा बँकेत येण्यासाठी वेगळे पर्याय देऊ केले होते, मात्र थेट सोसायटीतूनच लढायचे आहे असा आग्रह बाळासाहेबांनी करण्याचे कारण त्यांना  जिंकून  कराड तालुक्यावर आपला होल्ड आहे हे सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांना दाखवायचे होते. बाळासाहेब पाटील ठासून या निवडणुकीत जिंकले. या निकालामुळे भविष्यात अनेक राजकीय स्थितंतरे  होणार आहेत. काँग्रेसचं काय होणार, काँग्रेस काय करणार ? कराड तालुक्यात भविष्यात निवडणुका कशा होणार?  हे पाहण्यासाठी येणार्‍या काळाची वाट पहावी लागेल.

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...