निसर्गवारी*
मसूर ते किवळ
संकल्प २२१ वृक्ष लागवडीचा!
5 जुलै 2021
राम कृष्ण हरी माऊली
सकाळच्या प्रसन्न वातावरणात साडेपाच वाजता कराड कृष्णा नाका येथे जमलो. आज जरा थोडं लांब जायचं असल्यामुळे लवकर येण्याचं नियोजन केलं होतं मात्र सर्वजण यायला सहा वाजले आणि मसूर मध्ये पोहोचायला सव्वासहा वाजले. मसूरमध्ये शिवाजी हायस्कूल समोर असणाऱ्या डॉक्टर सत्यजित पाटील यांच्या हॉस्पिटल समोर आमचे गाडी उभी केली आणि आम्ही मसूर किवळ या निसर्गवारीतील पाचव्या दिवसाच्या प्रवासाला सुरुवात केली.
मसूर ते किवळ हा सहा किलोमीटर संपूर्ण रस्ता दाट वनराईतून जातो. या परीसरात सर्व गावे अलीकडच्या काही काळात बदलून गेली आहेत. आरफळ कॅनॉलचे पाणी या परिसरात आल्यानंतर समृद्धी आली. मसूर गाव सोडल्यानंतर दोन्ही बाजूला असणाऱ्या हिरव्यागार झाडीतून जाताना आम्हाला आजवेगळाच आनंद मिळत होता. दोन-तीन दिवस आम्ही जो वारी मार्ग केला त्या मार्गात रस्त्यावरून वाहने ये जा करत होती मात्र यादरम्यान आम्ही चालत असताना एक दोन दुचाकी वाहने सोडली तर वाहने नव्हती. रस्त्यावर संपूर्ण शांतता होती. पक्षांचे मंजुळ आवाज येत होते .रस्त्याकडेला व्यायामासाठी आलेले लोक आम्हाला दिसत होते. युवक रस्त्यावर जोर बैठका मारत होते तर आमचा हरिपाठ सुरू होता. चिखली गावाच्या अलीकडे आरफळच्या पुलावर काही ग्रामस्थ गप्पा मारत बसले होते. त्यांना राम कृष्ण हरी म्हणत आम्ही तिथे दोन मिनिटे विश्रांती घेतली. आमचा फोटो काढायला एका ज्येष्ठ नागरिकाला सांगितले. तो फोटो काढायचा कसा हे त्यांना शिकवले. त्या ज्येष्ठ नागरिकांने अतिशय सुंदर फोटो काढला पण फोटो कसा काढायचा हे सांगताना आलेली मजा खरंच मी शब्दात व्यक्त करू शकत नाही.
आरफळ कॅनॉल क्रॉस करून पुढे आल्यानंतर चिखली गावाच्या चौकात हायस्कूलची भव्य इमारत पाहून खूप आनंद झाला.ग्रामीण भागात शिक्षणाची दारे उघडी करण्यासाठी कर्मवीरांना पासून या भागातील अनेकांनी जे योगदान दिले आहे त्यामुळेच लहान गावात सुद्धा आता हायस्कूल उभी राहिलेली आहेत. चिखली मागे सोडून आम्ही पुढे निघालो. या हिरव्यागार झाडीतून जाताना आम्ही बाबा महाराज सातारकर यांचे किर्तन ब्लुटुथवर लावले. कीर्तनातील अभंग होता 'संतांचे संगती मनोमार्ग गति अकळावा श्रीपती'. हरिपाठातील हा अभंग ऐकताना प्रसन्न शांततेत बाबा महाराज सातारकरांचा गोड आवाज हृदयापर्यंत जात होता. अतिशय सुंदर विवेचन करत बाबा महाराजांनी संतांची संगत किती महत्त्वाचे असत, मनाची ताकद काय असते, मन कसे चंचल असते. आकाशाची घडी घालता येऊ शकते, पर्वताची पुडी बांधता येऊ शकते, समुद्राचे पाणी एका घोटात पिता येऊ शकते मात्र मन ताब्यात ठेवता येत नाही. परंतु हे ताब्यात ठेवण्यासाठी हरिनाम आणि संतांची संगत किती महत्त्वाची असते या आशयाचे संपूर्ण विवेचन त्यांनी केले. हरीनामाचा गोडवा ऐकत आम्ही साडेसात वाजता किवळ गावाच्या प्रवेशद्वारावर पोहोचलो. या गावात असणाऱ्या देशभक्त देशभक्त भिकोबा साळुंखे माध्यमिक हायस्कूल समोर उभा राहून फोटो काढण्याचा मोह आवरला नाही इतकी या शाळेची इमारत खुप सुंदर आहे. आजी माजी सैनिक संघटना कमानीतून पुढे आलो, माझा बीएससी चा मित्र या गावचे माजी सरपंच सुनिल साळुंखे तिथे येऊन थांबले होते. साळुंखे यांनी आपण झाड लावण्यासाठी किवळ शामगाव रस्ता निवडला आहे असे सांगितल्यानंतर आम्ही गाव पार करून पुढे शामगाव रस्त्याला लागलो.
कराड तालुक्यातून शामगावला जाणारा फलटण रोड सर्वांना माहीत आहे. मात्र किवळ गावातून शामगावला जाणारा एक रस्ता आहे, हे खूप कमी लोकांना माहिती आहे. हा रस्ता अजून पूर्ण झालेले नाही. यातील बाराशे मीटरचा रस्ता वन विभागाच्या हद्दीतून जातो, तो होणे बाकी आहे. डोंगराच्या अलीकडे असणारे किवळ गाव आणि डोंगराच्या पलीकडे असणारे शामगाव या दोन्ही गावांनी डोंगरापर्यंत रस्ता करून ठेवलेला आहे. फक्त डोंगरातील हद्दीतील बाराशे मीटरचा रस्ता झाला तर मसूर परिसरातील गावांना शामगाव नवीन रस्ता मिळू शकतो.आज रोजी या बाराशे मीटर अंतरातुन पाऊलवाट आहे ,वाहने जाऊ शकत नाहीत. वन विभागाच्या परवानग्या आणि इतर कार्यवाही करून हे काम करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करण्याची गरज आहे.
या रस्त्यावरून पुढे जाऊन आम्ही किमयागार किवळ गावाच्या शिवारात आलो. खरंच हे किमयागार गाव आहे. 2011 12 पर्यंत या गावात पाण्याचा टँकर सुरू करा,अशा प्रकारच्या बातम्या आम्ही छापलेल्या आहेत. किवळ, खोडजाईवाडी, निगडी, हेळगाव परिसरात पाण्याचे सतत दुर्भिक्ष्य असायचे. या गावात मे महिन्यात पाण्याचा टॅंकर द्यावा लागायचा. 2013 अखेर या गावात पाण्याच्या टँकरची मागणी होती मात्र त्यानंतरच्या काळात ग्रामस्थांनी लोकसहभागातून केलेली जादु खरंच कौतुकास्पद आहे.
कराड तालुक्यातील तसे हे शेवटचे गाव.कायमस्वरूपी टंचाईग्रस्त, कोरडवाहू शेती असा या गावावर शिक्का होता. या गावात सरासरी पर्जन्यमान 615 मिलिमीटर एवढे आहे. गावाचे एकूण भौगोलिक क्षेत्र सतराशे हेक्टर आहे. यापैकी पाचशे एकर क्षेत्र वन विभागाच्या ताब्यात आहे.उर्वरित क्षेत्रात बहुतांश शेतकरी खरीप पीक तर काही जण द्राक्षबागा घेत होते. 2011 नंतर या गावातील परिस्थिती हळूहळू बदलत गेली. गावाने नालाबंडिंग, जलसंधारण. स्वच्छता अभियान, एकात्मिक विकास योजना, शतकोटी वृक्षारोपण, कंपार्टमेंट बंडिंग, सिमेंट नाला यासारखी अनेक कामे हाती घेतली. 50हून अनेक ठिकाणे पाणी अडवले आणि जिरवले. 34000 हून अधिक छोटी मोठी झाडे लावली. याचा फायदा हळूहळू होत गेला. विहिरींच्या पाणीपातळीत वाढ होत गेली. पुढे मंत्रालयामध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांचे स्वीय साहाय्यक तानाजी साळुंके यांनी या आपल्या गावासाठी वेगवेगळ्या माध्यमातून निधी दिला. शेतकऱ्यांनी,ग्रामस्थांनी एकमेकांना अडवून एकमेकांची जिरवण्याऐवजी पाणी अडवले पाणी अडवले आणि पाणी जिरवून गावात समृद्धी आणली.
आज या गावात सुमारे 200 हेक्टर क्षेत्रामध्ये ऊस असून चालू वर्षी शेतकऱ्यांनी साखर कारखान्याला सुमारे 20 हजार टन इतका ऊस घालवला आहे. मोठी आर्थिक प्रगती केली आहे. केवळ गावाला खरंच एकदा भेट दिली पाहिजे याच आणखी एक कारण आहे देशातील पहिला ओढाजोड प्रकल्प या गावाने यशस्वीपणे पूर्ण केला आहे. डोंगराच्या बाजूने येणारे दोन मोठे ओढे एका ठिकाणी एकत्र करून हे पाणी अडवल्यामुळे गावात पाणी पातळी वाढली आहे. सतरा वर्षांपूर्वी पाण्यासाठी वणवण फिरणार्या आणि टॅंकरची वाट पाहणाऱ्या किवळने केलेली ही प्रगती पाण्यासाठी आजअखेर राज्यभरातील हजारो ग्रामपथकांनी या गावाला भेट दिली आहे.
गावाबाहेर असणाऱ्या सुमारे 12 एकर गायरानामध्ये सागवानाची लागवड केली आहे, ही लागवड खरच पाहण्यासारखी आहे. गावाच्या दोन्ही बाजूला असणारा डोंगर गावाची शोभा वाढवतो. नैसर्गिक संपत्तीचा उपयोग करून ग्रामस्थांनी,प्लॅन करून डोंगराच्या पायथ्यापर्यंत पाणी नेले आहे.
सध्या काम सुरू असलेली हणबरवाडी धनगरवाडी योजना या गावांसाठी आणखी वरदान ठरणार आहे. या योजनेचे काम या परिसरात मोठ्या वेगाने सुरू आहे. या योजनेच्या पाईप जमीनीमध्ये टाकून पूर्ण झाल्या आहेत. या संपूर्ण योजनेची माहिती आम्ही ग्रामस्थांकडून घेतली. पालकमंत्री बाळासाहेब पाटील या कामावर जातीने लक्ष ठेवून आहेत असे ग्रामस्थांनी सांगितले.
डोंगराच्या पायथ्याशी कैलास साळुंखे यांच्या शेतामध्ये आम्ही वडाचे झाड लावले. यावेळी संकेत साळुंखे, श्रीकांत काशीद प्रणव साळुंखे तसेच मित्र परिवार उपस्थित होता. या शेतातच आम्ही नाश्ता केला,चहा घेऊन परत गावात आलो. संत नावजीनाथ महाराज यांचे मंदिर पाहिले. अतिशय सुंदर मंदिर आहे. माऊलींचे दर्शन घेऊन आम्ही परतीचा प्रवास सुरू केला.
आज निसर्ग वारीमध्ये एका उपक्रमशील गावाला भेट देण्याचा सुंदर योग आला. कराड,खटाव आणि कोरेगाव तालुक्याचे हद्द जिथे डोंगरावर एकत्र येते असे ठिकाण दुरून पाहिले. खोडजाईवाडी डोंगर लांबूनच पाहून खूप आनंद झाला.
राम कृष्ण हरी
जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल
*सतीश मोरे*



