फॉलोअर

११ मे २०१६

सैराट आठवण

सैराट आठवण
आज तुझी खुप आठवण आली

मग मी ती वही हळुच बाहेर काढली
अलगद तुला न्याहळू लागली
तुझा स्पर्श स्मरण करून गेली
आज तुझी खुप आठवण आली

ती वही, ती पत्रे, ती प्रेमस्फुरणे
निशब्द होऊन बोलत राहीली
तुझ्यातला मी शोधू लागली
आज तुझी खुप आठवण आली

सुगंध बहरला शब्दफुलांचा अन् कायेचा
ऋतू आला पतझड सावनका
अबोल प्रीत प्रिया ती बावरली
आज तुझी खूप आठवण आली

आठवणीच आणि माझं नातं खुप जुनं
जवळ असुनही खुप दूर का वसली
वर्षे सरली पण स्मरणात तु  राहीली
आज तुझी खुप आठवण आली

एकटी आठवण खुप सुंदर असते
तिच्यात फक्त तु अन् मी असतो
का  ती भुतकाळ विस्कटत आली
आज तुझी खुप आठवण आली

आठवण आज सैराट जाहली
मज सोडून माझी सखी का गेली
उध्वस्त ह्रदयाला  फुंकर मारून गेली
आज तुझी खुप आठवण आली
.         
          ........सतीश मोरे

भेट  लास्ट वन्
भेट सरता सरता
हात सोडता सोडता
मी हळुच पुसले तीजला
सांग ना सखे काय हवे तुजला ??

सोडलेला हात पुन्हा घट्ट पकडत
ती बोलली ,
हा स्पर्श ठेऊन जा
बदल्यात माझे श्वास घेऊन जा
ते क्षण जे एकत्र जगलो
ती साधना ठेऊन जा
बदल्यात माझी प्रीतीची
भावना घेउन जा

मी फक्त इतकेच बोललो
जे तुझेच आहे राणी
ते वेगळे मागु नको
एकच जीव आहोत आपण 

तु वेगळी वागु नको
तु आणि तुझे डोळे
तू नुकतंच बहरलेल हिरवं रान
वहीत जपलेलं जाळीदार पान☘
तुझे नयन कट्यार 
करते  थेट ह्रदयावर वार ❤

२५ एप्रिल २०१६

उन्हाळी सुट्टी आमची आणि आजची



   
                                     झुक झुक आगीनगाडी
                                         धुराच्या रेषा हवेत सोडी
                                              पळती झाडे पाहु या
                                                   मामाच्या गावाला जाऊया !!




हे बालगीत आठवतंय 
लहानपणी केलेला, दंगा, गोंधळ, मजा, धाबडधिंगा 
सगळे डोळ्यासमोर उभे राहिले ना !
मामाच्या गावाला जाण्यासाठी 
आई बाबाकडे केलेला हट्ट पण आठवतोय, होय ना ! 
एसटीत, रेल्वेत बसायला मिळणार असल्याने 
वाढणारी  उत्सुकता पण  आठवतेय ना! 

1990- 1995 च्या अगोदर शाळेत असणाऱ्या  आपल्या पिढीला मामा,  मामी,  आजी आजोबा, मामाचा मुलगा, मामाची मुलगी, मामाचं गाव,  मामाचे दोस्त, मामाच्या गावातील गल्ली बोळ,  रस्ता,  विहिर,  मैदान,  घरगुती बैठे खेळ,  पत्ते ,चलस , सूर, आठ्या पाट्या आणि खुप खुप काही पहायला मिळाले आहे. 
आजच्या घडीला  आपल्या मुलांना हे काही पहायला मिळू शकत नाही. 


सोशल मिडिया वर मे महिन्यातील सुट्टी 20 वर्षापुर्वीची आणि आजची असे दोन फोटो फिरत आहेत.  हे फोटो पाहून माझ्या मुलीने पप्पा तुम्ही झाडावर खेळत होता? असे आश्चर्याने विचारले.  मला पण का पाठवत नाही, असा प्रश्‍न केला. पुढे जाऊन तिने तुम्ही आणखी काय काय करत होता, कसे जायचा, पारंब्या म्हणजे काय, कुठले खेळ खेळायचा,  कुठे लपून बसायचा, असे एकावर एक प्रश्नाची सरबत्ती केली. खरंच किती रम्य काळहोता तो,  किती सुंदर  आठवणी  आहेत, बालपणीच्या!


शाळेत जायचे होते, पण शाळेचे टेन्शन नव्हते, आभ्यास होता पण टारगेट नव्हते, गुरूजीचा धाक, भिती होती मात्र एक्स्ट्रा क्लासचा दबाव नव्हता. पास होण्यासाठी धडपड होती, 90 % चे ध्येय नव्हते . पण या सर्व शिक्षणात प्रचंड आनंद मिळत होता.  घरची कामे करून शाळेला जायचे,  खाकी चड्डी, पांढरा शर्ट मुलांसाठी आणि निळा पांढरा ड्रेस मुलीसाठी, हा ऑल  ओव्हर मराठी शाळेचा ड्रेस कोड.  हायस्कूलला पण तोच ड्रेस.

शाळेत जायला ना स्कूल बस ना व्हॅन, ना रिक्षा. जीवन जगण्यासाठीचं खरं शिक्षण मिळत होतं या शाळेत. मे महिना आणि दिवाळीची सुट्टी कधी लागते इकडे  सगळ्यांचेच लक्ष असायचे. सुट्टीचे प्लॅनिंग एकच मामाच्या गावाला जायचे. मामाचं गाव हा सार्‍या भाच्चा भाच्चीसाठी जगातील सर्वात आनंददायी ठिकाण असायचे. बहीण भाऊ नाते खूप पवित्र,  निरागस,  समर्पण , सेवा,  त्याग  आणि काळजीचं आहे आणि होतं. आज समानता आणि आई वडिलांच्या संपत्तीमधील वाटा यामुळे काही ठिकाणी  हे नाती ताणले गेले आहे. तरीही मामा हा प्रत्येकाचा जवळचा होता व आजही आहे.



सुट्टीची तारीख पोस्ट कार्ड ने मामाला कळवली जायची, त्या दिवशी मामा कुठल्याही परिस्थितीत बहीण च्या घरात हजर! भाच्चे मंडळीना सायकल, एसटी, रेल्वे , बैलगाडी तर जवळपास गाव  असेल तर चालत घेऊन मामा जायचा. मामाची मामी वाट पाहत  असायची.  भाच्याला, भाच्चीला आदराने हाक मारली जायची. ती नावे पण गमतीशीर असायची. राणीसाहेब, राजसाहेब. मामी खुप जपायची या नात्याला. 

सुट्टीत खुप मज्जा करायचो आम्ही पोरं.  नदीकाठी आजोळ असेल तर नदी, नाहीतर विहिरीत पोहायला जाणे हे हमखास  असायचे.  पोहायची, पाण्याची भिती मामा अशी घालवायचा की पोहणे चार  आठ दिवसांत शिकत होतो. सकाळपासून संध्याकाळ ते रात्री झोपेपर्यंत दंगा, मस्ती, खेळ याशिवाय काही नव्हते. मामी खुप छान स्वयंपाक करायची, प्रेमाने भरवायचीही. मामाची मुलगी किंवा मुलगा हा विक पॉइंट होता.  मामी चेष्टा करायची, जावई म्हणून चिडवायची. मामा पोरांना घेऊन रानात जायचा,  शेतावर विहिरीच्या पाटात धम्माल खेळ. झाडावर चढून खेळायचे, सावलीत बसून मस्त पैकी कांदा चटणी , पिठलं खायचं. कुळवावर बसायचा जो आनंद होता तो आज  ऑडीत बसण्यातही नाही.
 दुपारी पत्ते किंवा चलस खेळ, कंटाळा आला की गाण्याच्या, गावांच्या, शब्दांच्या भेंड्या.

चिंचेचे चिचोके आडवे फोडायचे, त्या आमच्या सोंगट्या. पांढरी बाजू आणि काळी बाजू हे परिणाम. जमीनीवर, पाटावर  उभ्या आडव्या रेषा आखून खेळ भलताच रंगायचा, चलसचा.





मी तर मे महिन्यात आणि दिवाळीत रेठरे बु गावाला आजोळी जायचोच. चैनीच्या रेठर्यात टुरिंग टाॅकीज होती. तिथे पिक्चर पहायला जाणे हा माझा आवडता छंद. मामाकडून गोड बोलून पैसे काढायचे, अनं रात्री पिक्चर बघायला जायचे.  मामा नाही म्हणला तर मामी जवळ गुळुगुळु करायचे. मामी पैसे द्यायची, रात्री उशीरा हळूच येऊन पत्र्यावर झोपायचे, असा क्रम असायचा.


अनेकांच्या  मामाच्या गावची  जत्रा मे महिन्यात असायची. मग आणखी मजा. पाळणा, गोल रिंगण,  खेळणी, पिपाणी, चिरमुरं, बत्तासू काय काय!  सुट्टी संपत आली की मामा छान ड्रेस घ्यायचा. परत घरी सोडायला यायचा.  मामी आग्रहानं म्हणायची , जावई बापू या पुढच्या सुट्टीत.  खुप छान आठवणी आहेत मामाच्या गावाच्या,  मे महिन्यातील सुट्टीच्या. पुन्हा एकदा लहान होऊन मामाच्या गावाला जावंसं वाटतंय.




आज काळ बदलला आहे. मामा मामी नोकरी करतात. भाच्चा-भाच्चीसाठी मामाला वेळ नाही. अपवादात्मक कुटुंबे सोडली तर मामाचं गाव आता खुप दूर झालं आहे.  मनोरंजनाचे निकष बदलले आहेत.  तेव्हा टिव्ही, मोबाईल नव्हते.  घराबाहेर  असणाऱ्या मोठ्या जगात मनोरंजन शोधलं जायचं. आजची पोरं  4 जी आहेत. सुट्टीत मोबाईल वर तुटून पडलेली आहेत.  खेळायला म्हणून  जमतात पण येताना मोबाईल खिशातून आणतात.  मग व्हिडिओ, फोटो, पिक्चर,  फाईल अपलोड  अॅड ट्रान्स्फर आणि चॅटिंग यातच यांची सुट्टी जात आहे. यापेक्षा अधिक लिहलं तर राग येईल आजच्या पिढीला.


आजच्या या परिस्थितीवर
आधुनिक मामाचा गाव  ही
कविता वाचून समाधान आणखी काही सांगायची गरज नाही.

झुक झुक झुक आगीनगाडी 
धुरांची रेषा विसरून गेली
एसीचे डबे बुक करूया
मामाच्या गावाला जाऊया

मामाचा गाव हाय मोठा
मॉल बझारला नाही तोटा
ऑन लाईन शॉपिंगही करूया
मामाच्या गावाला जाऊया
मामा मोठा पगारदार
घेऊन येई ऑडी कार
लाँग ड्राईवला जाऊया
फोर व्हिलर शिकूया
मामाच्या गावाला जाऊया

मामाची बायको शिकलेली
व्हाट्सअप मध्ये गुंतलेली
तिला जोक पाठवूया
रूसलेली मामी हसवूया 
मामाच्या गावाला जाऊया

मामाची बायको चटपट 
रोज रोज मॅगी झटपट
पिझ्झा बर्गर खाऊया 
मामाच्या गावाला जाऊया

...........सतीश मोरे




२३ एप्रिल २०१६

जागतिक पुस्तक दिन विशेष

आठ दिवसांत लातूर दौरा आणि किरकोळ आजारपण यामुळे लिहता आले नाही.
आज जागतिक पुस्तक दिनी पुन्हा एकदा नव्याने सुरू करत आहे.

लोभ आहेच तो यापुढेही कायम रहावा. 




☑२३ एप्रिल जागतिक पुस्तक दिन

〰〰〰〰〰〰〰〰〰
२३ या अंकाला अंकशास्रामध्ये सगळ्यात जास्त महत्व आहे....
२३ अंक हा बुद्धिमत्ता कारक मानला जातो....
आज शेक्सपियर चा जन्म दिवस आणि मृत्यू दिवस हि.....

🔲🔲🔲

🔺मरगळलेल्या, अस्वस्थ मनाला शांत करण्याचे उत्तम ठिकाण म्हणजे पुस्तकांनी भरलेली जागा “वाचनालय”. चाफ्याच्या फुलांनी मन जसं प्रफुल्लित होतं अगदी तसंच नवीन कोऱ्या पुस्तकाचं असतं. नवीन पुस्तकं हातात आलं की त्याचं नाव न पाहता त्याची किंमत न पाहता पहिला त्या पुस्तकाचा गंध मनात भरून घ्यावा हीच खऱ्या वाचकाची सवय. आज असं पुस्तकं आणि त्याचा सुगंध आठवण्याचा खास दिवस म्हणजे आजचा ‘जागतिक पुस्तक दिन’.
#२३ एप्रिल हा जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा केला जातो.

🔲🔲🔲

जगप्रसिद्ध साहित्यिक शेक्सपिअरचा जन्मदिन आणि मृत्यूदिनही! विल्यम शेक्सपियरचा जन्म २३ एप्रिल, इ.स.१५६४ आणि मृत्यू देखील २३ एप्रिल, इ.स. १६१६. शेक्सपिअर हा इंग्रजी भाषेतला प्रसिद्ध कवी, नाटककार आहे. याने लिहिलेली नाटके व काव्ये इंग्लिश साहित्यात अजरामर आहेत. शेक्सपियरच्या शोकांतिका विशेष नावाजलेल्या आहेत. जगातील सर्व श्रेष्ठ लेखक, नाटककार म्हणून विल्यम शेक्सपियर यांचे नाव घेतले जाते. जगातील सर्व प्रमुख भाषांमध्ये शेक्सपियर यांच्या नाटकांची भाषांतरे झाली आहेत. गेली चार शतके शेक्सपियर यांच्या नाटकांचे असंख्य प्रयोग जगभर होत असतात.

वाचकांना प्रेरित करून त्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या साहित्यिकांचा आणि पुस्तकांचा सन्मान करण्यासाठी व वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी १९९५ साली पॅरिस येथे झालेल्या परिषदेत युनेस्कोने २३ एप्रिल हा दिवस जागतिक पुस्तक आणि कॉपिराईट दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. आज जवळपास १०० पेक्षा जास्त देशांमध्ये हा दिवस उत्साहात साजरा केला जातो.

🔲🔲🔲

भरपूर आर्थिक संपत्ती नसताना देखील या जगातील एक व्यक्ती खूप श्रीमंत असते असे म्हटले जाते, आणि ती व्यक्ती म्हणजे ‘पुस्तक प्रेमी’. ज्याच्याकडे पुस्तकांचा खजिना असतो, त्याच्याकडे ज्ञानाचे भंडार असते.

🔲🔲🔲

चांगल्या पुस्तकांमुळे आपल्या संपूर्ण जिवनाला एक वेगळे वळण मिळते. कधीकधी न वाचलेल्या गोष्टी आपण एखाद्या पुस्तकात वाचतो आणि आपल्या विचारांमध्ये क्रांतिकारक बदल घडतो. विविध विषयांची चांगली पुस्तके आपल्याला जगण्याची नवी दिशा दाखवतात. पुस्तकांमधील समृद्ध विचारांचा आपल्या जीवनावर सकारात्मक परिणाम होतो आणि आयुष्याकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन कायमचा बदलून जातो.

🔲🔲🔲

कुणाला वाचनालयात जायला वेळ नाही लायब्ररीमध्ये उपलब्ध होणारी पुस्तकं फिरत्या वाचनालयातून घरपोच फिरू लागली.आता या वाचनालयांबरोबरच इंटरनेट आणि ‘ई-बुक’ देखील आहेत. ऑनलाईन साईट्समुळे विविध विषयांमधील पुस्तके मोठय़ा प्रमाणात उपलब्ध आहेत. लहानांपासून मोठय़ांपर्यंत पुस्तके हा अनेकांच्या जिव्हाळयाचा विषय असतो. पूर्वी केवळ ‘वाचनालय’ हे पुस्तके वाचण्याचे आणि मिळण्याचे एकमेव ठिकाण होते. लोक आवडीने वाचनालयास भेट द्यायचे. आज पुस्तके वाचण्याचे आणि खरेदी करण्याचे मोठो स्त्रोत निर्माण झाले आहे. तंत्रज्ञानामुळे चांगल्या पुस्तांचा आणि लेखकांचा प्रसार मोठया प्रमाणात होत आहे.


📚📖📚📖🌎📖📚📖📚



आज शनिवार कविता डे

विल्यम शेक्सपिअर यांच्या प्रेम कविता अजरामर आहेत .

प्रेम वेड्या
त्या दोघांच्या भेटीचा हळुवार संवाद ,

माझ्या नजरेतून तुमच्या साठी !



तो आणि ती 

1

ती

कालची संध्याकाळ वेगळी होती
तुझ्या आठवणींची त्यात गर्दी होती

शोधत होते त्यामध्ये मीच मला
त्या गर्दीत मला दिसत होते
अफाट वाळवंट आणि बेफाम वारा!

त्याक्षणी
माझ्यासाठी आला एक ढग
तो आला एका क्षणासाठी पण

मी तृप्त झाले मणभर
ज्याची मी वाट बघत होते जीवनभर!


2

तो

मी माझा कधीकधी असतो
अनेकदा तुझ्याच विचारात असतो
मणभर आणि काकणंनर
जीवनभर आणि क्षणभर
नातं आपलं जपुया हर पल


3

ती

कधी कातरवेळी तुझी आठवण
मनी माझ्या दाटून येते
दूरवर पसरलेल्या क्षितिजाकडे
मग मन उगाच पहात राहते
तुझ्या स्पर्शाची जादू
मनाला हळूच हलवून जाते
तु नसतानाही असे का होते
माझे मलाच उमजत नाही
जवळ नसतानाही तुझा भास होतो
तुझ्या आठवणींत चिंब भिजवून जातो

4

तो

तुझी आठवण मला कधीच येत नाही
तुझी काळजी मात्र सतत लागून राहते
कुठेही रहा, सुखी रहा,
स्वच्छंद , सुमधूर, सुमंगल
पण
तुझ्यावरचा माझा अधिकार मात्र राखीव ठेव

तुझ्या सुखातच माझा आनंद आहे
तु उभी राहण्यातचं माझा स्वर्ग आहे.


5

ती

मी कुठेही असेन
तुझ्यासाठी तुझ्यातच असेन
साद दे कधीपण जीवलगा
येईन परतुन सख्या साजना

आठवतोय तुला तो पाऊस
नाही? असं का करतोस

काल पुन्हा पाऊस आला 
पाऊस पडून गेला अन
तुझ्या आठवणीने पुन्हा गर्दी केली

हुरहुर लावतात तुझ्या या आठवणी
पण सुखद स्पर्शाचा थंडावाही देतात

जायचं असतं परतून तर येतोसच का? 
वेड या जीवा लावतोस का ?    
                            
यायच्या आगोदर तुला परतुनी जायचं असत
मला मात्र सतत तुझ्याजवळ राहायचं असतं


6

तो

मला परत जायचंच नसतं
तुझ्या जवळ रहायचे असतं..

मी आल्यावर तुझ्याजवळ असतो
गेल्यानंतर तर तुझ्यामध्येच असतो


                   ..........सतीश मोरे


१६ एप्रिल २०१६

आयुष्य म्हणजे काय


आयुष्य म्हणजे
जीवन-मरण, स्मरण विस्मरण
येणे-जाणं, देणे आणि घेणं
वाटणं आणि लुटणं
दिसणं आणि असणं
कष्ट करणं, संघर्ष करणं, उभं राहणं




आयुष्य म्हणजे
मजा आणि मस्करी करणं
मित्र जोडणं आणि मैत्री टिकवणं
आनंद घेत घेत आनंद लुटणं
सेवा करणं, कर्तव्य करणं
जमवणे, गोळा करणं आणि सर्वाना देणं


आयुष्य म्हणजे खेळ नव्हे,
फुकट मिळालेला वेळ नव्हे,
आयुष्य एक कोडं आहे,
सोडवाल तितक थोडं आहे.
आयुष्य एक रंगमंच आहे..
इथ प्रत्येकाला नाटक करावेच लागते
कितीही नाही बोलाल तर हसावच लागत..


आयुष्य म्हणजे 
इतरांसाठी काही तरी करणं
आयुष्य म्हणजे इतरांना त्रास न देणं
दुसर्‍यासाठी चांगले करता आले नाही तर
किमान वाईट तरी न करणं
आपण सुखी होणं
आणि इतरांनाही सुखी करणं


               .......सतीश मोरे 

१५ एप्रिल २०१६

शिक्षकांवर जोक म्हणजे कृतघ्नपणा



मित्रहो जरा सर्वांनी इकडे लक्ष द्या,
     
सध्या social media वर शिक्षक विद्यार्थी संवादाचे अनेक जोक येत आहेत.
या जोकचा शेवट खालीलपैकी एखाद्या वाक्याने केलेला आढळतो.

मास्तर बेशुद्ध पडले!
मास्तर सैरावैरा पळत आहेत!
मास्तर जागेवर कोसळले!
मास्तरांनी राजीनामा दिला!
मास्तरांनी जागेवर प्राण  सोडले!
मास्तर कोमात-------- जोमात!


आपण जास्त विचार न करता हे जोक forward करतो.
मात्र शिक्षकांची बदनामी करण्याचे हे एक मोठे षड्यंत्र आहे
ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे.
असे जोक forward करू नयेत ही विनंती. कारण कोणत्यातरी गुरुजींनी, मॅडमनी  आपल्यावर चांगले संस्कार केले आहेत हे आपण कधीही विसरू नये .
आपल्या गुरुंचा काही कुसंस्कारी व्यक्तींकडुन होत असलेला अपमान सहन करू नका.




गुरूजी, शिक्षक, सर, बाई, मॅडम
कोणत्याही नावाने हाक मारली तरी एक आदरयुक्त भिती निर्माण होते. 
सर असोत वा गुरूजी , बाई असोत वा मॅडम
या आदरणीय आहेत , कारण ते आपले देव आहेत,  तुम्ही म्हणाल कसे?

सदगुरू वामनराव पै यांनी देवाची
अतिशय सुंदर व सोपी व्याख्या सांगीतली आहे,
देतो तो देव.

सदगुरूंनी आई, वडील, शिक्षक, गूरू आणि आत्गुमरू
असे पाच जिवंत देव सांगितले आहेत.

आपले शिक्षक म्हणजे आपले देवच आहेत. ते आपल्याला ज्ञान देतात.
जगात कसे रहायचे, वागायचे, काय करायचे, काय नाही करावे ते शिकवतात.

आई आणि वडीलानंतर पहीली ओळख होते ती शिक्षकांची.
लहान गट, बालवाडी,  नर्सरी, केजी, पीजी म्हणा नाहीतर अंगणवाडी असो.
सुरुवातीला तिथे जायला नको वाटते, पण नंतर गोडी लागते. बाई छान छान कविता शिकवतात,
गोष्टी सांगतात, खेळायला देतात .
शब्द शिकवतात, कोडी घालतात. मग गोडी निर्माण होते. जरा मोठ्ठे होतो, 
मग पहीलीत प्रवेश होतो. नवीन पुस्तके, वह्या, नवीन मॅडम,  गुरूजी, सर.
रोज नवीन काहीतरी शिकायला मिळते,  शिस्त लागते,  गुरूजी विषयी  आपुलकी,  प्रेम, भीतियुक्त आदर निर्माण होतो.
पहीली पासून पदवी संपादन करेपर्यंत अनेक शिक्षकांचे मार्गदर्शन लाभते.
प्रत्येक दिवशी नवनवीन शिकायला मिळते ते फक्त त्यांच्या मुळेच!



गुरूजींनी दिलेली शिकवण , केलेली शिक्षा यातुन मिळालेले धडे कधी आपण विसरू शकत नाही.

 मला आठवतंय करवडी गावातील जीवन शिक्षण विद्या मंदिर म्हणजे आजची प्राथमिक शाळा.  शाळा माझ्या घरासमोर होती.  शाळेत गेल्या गेल्या एकच काम  असायचे,  स्वच्छता. वर्गाची,  व्हरांड्याची, मैदानाची. गुरूजींनी अतिशय सुंदर व्यवस्था बसवली होती. कोणत्या दिवशी कोणत्या वर्गाने मैदान झाडायचे, व्हरांड्याची स्वच्छता करायची. स्वच्छता अभियान तेव्हा सुरू होते असे म्हणा.

माझ्या आवडत्या सुर्यवंशी बाई होत्या.  मी वर्गात पहिल्या एक दोन मध्ये होतो. आजच्या तमाशा सम्राज्ञी मंगला बनसोडे यांचा थोरला मुलगा अनिल माझा वर्ग मित्र.  त्याची व माझी पहील्या नंबर साठी स्पर्धा असायची. घरातील कलेचे वातावरण आणि परिस्थिती मुळे त्याने चौथी पास झाल्यावर शाळा सोडली . या शाळेत प्राथमिक शिक्षणाचा पाया भक्कम केलेल्या माझ्या गुरूंजणांच्या ऋणात रहाणे मी आयुष्यभर पसंत करेन.

या शिक्षकांवर ,गुरूजीवर फालतु जोक करणे तर दूरच त्याचे फक्त नाव आठवले तरी कृतज्ञतेने मान झुकते.

गुरूजी,  सर,  मॅडम, बाई या आदरणीय व्यक्ती आहेत .
त्याच्यावर फालतू जोक, कमेंट करून स्वतःची लायकी घालवून घेऊ नका.
असे जोक कोणी पाठवले तर त्याला सडेतोड उत्तर द्या.  हे मेसेज पुढे पाठवू नका. 
आपल्याला जगात कसे वागायचे हे शिकवणारे हे प्रत्यक्ष देव  आहेत. देवावर जोक तुम्ही सहन करता का? 

मी पुन्हा एकदा स्पष्ट करतो,  देतो तो देव.  फोटोतला, चार हाताचा देव तुम्हाला काय देतो की नाही हे मला माहित नाही पण शिक्षक आपल्याला खुप काही देतात,  दिले आहे,  देणार आहेत .

या  जिवंत देवाची चेष्टा करणे म्हणजे कृतघ्नपणा आहे. 
तो आपण करणार नाही,  अशी शपथ आज घेऊ या चला.

मला ज्ञान देणार्‍या सर्व शिक्षकांचा मी ऋणी आहे.

                ............  सतीश मोरे


१४ एप्रिल २०१६

जागृत कराडकर बाबासाहेबांना भावले


डाॅ बाबासाहेब आंबेडकर जयंती विशेष  

2 जानेवारी 1940 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर कराडात  आले होते. कराड मुन्सिपाल्टीने त्यांना या दिवशी मानपत्र प्रदान करण्याचे निश्चित केले होते. त्यादिवशी बाबासाहेब सातारा येथील निवासस्थानाहून तीन वाजण्याच्या सुमारास मोटारीने निघाले.
सातारपासून 13 मैलावर  म्हणजे अतित गावच्या  आसपास त्याची गाडी नादुरुस्त झाली. सर्वजण खाली उतरून दुसऱ्या वाहनांची व्यवस्था होते काय हे पहात होते. दरम्यान  मुंबई येथील परळ  भागातील तंबाखू व्यापारी लक्ष्मणराव शेटे त्याच्या मोटारीने निघाले होते, त्यांनी बाबासाहेबांना कराडपर्यंत नेण्याचे आनंदाने कबुल केले. या मोटारीत बसून सारे कराडला यायला निघाले. 
दुर्दैवाने या मोटारीला कराडजवळ मोठा अपघात झाला. सुदैवाने सारे जण मरणाच्या दारातून वाचले. सातारचे बॅरिस्टर करंदीकर यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने  सर्व जखमींना सरकारी दवाखान्यात दाखल केले.  जखमींवर उपचार केले, पट्‌ट्या बांधण्यात आल्या. दवाखान्यात थोडी विश्रांती घेऊन सहाच्या सुमारास बाबासाहेब आंबेडकर कराडात मानपत्र स्वीकारण्यासाठी पोहचले.

या ठिकाणी कराडात बाबासाहेबांचा मानपत्र प्रदान करण्यात आले 

अतिशय सुंदर, शानदार समारंभ झाला. पाण्याच्या टाकी शेजारी मुन्सिपाल्टी कचेरी होती. मुन्सिपाल्टी हॉल आतून व बाहेरून सजवण्यात आला होता. कार्यक्रमास सर्व 17 सभासद, नागरिक उपस्थित होते. सुरुवातीला विद्यार्थीनीनी स्वागतपर गीत सादर केले. त्यानंतर प्रसिद्ध वकील सदाशिव कृष्ण  बहुलेकर यांनी मानपत्र वाचन केले. पालिकेचे अध्यक्ष राऊ बाळा कदम यांनी मानपत्र देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सत्कार केला.

या नंतर बाबासाहेब यांनी केलेले भाषण जसेच्या तसेे पुढील प्रमाणे....

अध्यक्ष महाराज, सभासद, भगिनी व बंधुजनहो,

आपण मला जे मानपत्र दिले आहे त्याबद्दल मी आपला फार आभारी आहे. स्थानिक प्रश्नाबाबत मी काही कामगिरी केलेली नाही. मी कऱ्हाडचा रहिवाशी नाही. माझी  कामगिरी राजकीय स्वरूपाची आहे. अशा परिस्थितीत आपण मला मानपत्र अर्पन करून माझा जो गौरव केला आहे  यातून आपला उदारपणा मात्र व्यक्त होतो. आज या समारंभास मला हजार राहता आले ही इष्टापत्तीच होय.

हिन्दुस्थानच्या आजच्या परिस्थितीत जागृती व जबाबदारीची फार आवश्यकता आहे. युध्दोत्तर हिंदुस्थानापुढे मोठ मोठे प्रश्न उपस्थित होणार आहेत. स्वराज्य सर्वासच हवे यात शंका नाही पण एकाचे स्वराज्य दुसऱ्यास गुलामगिरीत डांबण्यास कारणीभूत होणार नाही, अशी आपण सर्वांनी दक्षता बाळगली पाहिजे.

अल्पसंख्यांकांच्या मागण्या या वरील भीतीच्या निदर्शकच आहेत. ही भीती नाहिशी करण्यासाठी आपणापुढील प्रश्न सोडविण्यासाठी अल्पसंख्य व बहुसंख्य या दोन्ही लोकात आपण जागृती जबाबदारीची जाणीव उत्पन्न केली पाहिजे असे माझे सांगणे आहे.

आज हिन्दी राजकारणात मोठी विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. हा विचित्रपणा लक्षात येण्यासाठी आपण गेल्या पिढीचे राजकारण व या पिढीतील राजकारण यातील तुलना करू.
गेल्या पिढीतील गोखले, टिळकांचे राजकारण व आजचे गांधी राजकारण यामध्ये एक मोठा फरक आहे. गेल्या पिढीतील राजकारणास विद्वतेची जरुरी भासत असे. आजच्या राजकारणात बोटवाती, काडवाती करणारांची जरुरी भासत आहे. विद्वानांची यातून खड्यासारखी उचलबांगडी करण्यात येत आहे.
 
आजचे राजकरण हे आंधळ्याच्या माळेच्या हाती गेली आहे. हि अत्यंत अनिष्ट गोष्ट झालेली आहे. देशाची प्रगती होत राहण्यास विविध विचार व वादविवादांचे निरनिराळे प्रवाह आवश्यक आहेत. अशा भिन्न विचारांच्या प्रवाहातून हमेशा प्रगती होत असते. आंधळ्याच्या माळेमागून एकाच मार्गाने देश जात राहिला तर तो खळग्यात पडल्याशिवाय राहणार नाही, हे खास.

राजकाणात एकच पंथ निर्माण करणे हा चालू राजकारणातील हेतू आहे. जागृती, नाना तऱ्हेचे विचार व साधक बाधक प्रमाणे यांचे या राजकीय पंथास वावडे आहे. त्याच त्या गोष्टींची री ओढीत राहण्यात फायदा काहीच नाही. आज लोक गांधीवेडे झाले आहेत. गांधीवाक्य हे ब्रम्हवाक्य होऊ पाहत आहे. या गांधी वेडाबरोबरच ढोंगबाजीही खूप वाढू लागली आहे. केवळ स्वार्थासाठी कॉंग्रेसला चार आणे देऊन व्यभिचार करणारे अनेक हरीचे लाल आज पैदा होत आहेत. जागृती व जबाबदारी नाही तेथे तशी बिकट स्थिती होणारच.

आपल्या कराड म्युनिसीपालिटीत भिन्न मतांचे व भिन्न पक्षाचे सभासद आहेत.यावरून स्थानिक मतदार विचारी असावेत असे मला वाटते. आपल्यात विचार जागृत आहेत म्हणून मी आपले अभिनंदन करतो. आपण दिलेल्या मानपत्राबद्दल पुन: एकदा आपले आभार मानून मी आपले भाषण पुरे करतो.

अतिशय प्रभावी व मुद्देसुद अशा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या या भाषणाला, मानपत्र कार्यक्रमाला 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. आज बाबासाहेबांची 125 वी जयंती आहे, हा योग आहे.


बाबासाहेबांचे कराडातील ते  प्रभावी भाषण अनेक मुद्दयाला स्पर्शून गेले आहे.  तत्कालीन हिंदुस्थानची  परिस्थिती, आंधळ्यांच्या हातात गेलेले राजकारण, गांधीवेडातून वाढलेली ढोंगबाजी, स्वार्थासाठी व्यभिचार करणारे हरिचे लाल तसेच देशाच्या विकासासाठी आवश्यक विविध विचार प्रवाह यावर त्यांनी कडक शब्दांत मते व्यक्त केली होती.
कराड गावात भिन्न मताचे, भिन्न पक्षाचे मुन्सिपाल्टी सभासद  असणे म्हणजे गावातील लोक विचारी आहेत, असे कौतुक करताना त्यांनी कराडकर जनतेचे अभिनंदन केले होते, कृतज्ञता पूर्वक आभार मानले होते. जागृत विचारांचे कराडकर बाबासाहेबांना भावले. बाबासाहेबांचे ते भाषण उपस्थितांना प्रेरणा देऊन गेले होते.

बाबासाहेबांचे कराडवर प्रेम होते म्हणूनच त्यांनी हे मानपत्र स्वीकारले, कराडचे गोडवे गायले,  कराडच्या जनतेला आजही बाबासाहेबांविषयी आपुलकी वाटते. 1974 साली तत्कालिन नगराध्यक्ष पी. डी. पाटील यांच्या पुढाकाराने पालिकेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पुतळा उभारला गेला.  याही घटनेला 43 वर्षे पूर्ण होत आहेत. 
आज 125 व्या जयंतीच्या निमित्ताने या भाषणाचा, भेटीच्या स्मृती जपण्यासाठी कराडात  प्रेरणा स्तंभ उभारणी संकल्पना पुढे आली आहे. शहरातील  आंबेडकर प्रेमी जनतेने याबाबत पुढाकार घेतला तर सर्व समाज त्याला पाठिंबा देईल. बाबासाहेब सर्व समाजातील  उपेक्षित, दुर्बल, दलित, शोषित घटकांचे नेते होते. त्यांच्या मुळेच या घटकांना न्याय मिळाला आहे. कराडात यावर्षी या सर्व घटकांना बरोबर घेवून 125 वी जयंती साजरी होत आहे, हे कौतुकास्पद आहे.
1940 साली बाबासाहेबांना कराडकरांमध्ये दिसलेली ती वैचारिकता, जागृकता कराडकरांनी जपून ठेवावी, वाढवावी हीच बाबासाहेबांना आदरांजली.  


                       जय भिम, जय भारत.


१२ एप्रिल २०१६

सेल्फी. ...मी कसा दिसतो



आकरावी बारावी शिक्षण सदगुरू गाडगे महाराज काॅलेज SGM मध्ये झाले. सगळे मित्र ग्रामीण भागातून आलेले. स्टाईल मारणारे काहीजण होते. एक दोघे दुचाकी वाहने घेऊन यायचे.  पण बहुतांशी जण सायकल आणायचे. टिबल सीट सायकल जोरात चालवणे,  हात सोडून सायकल चालवणे, ही आमची स्टाईल.

आम्ही बाहेर गावावरून येणारे कृष्णा कॅनाल वर उतरायचो, तेथून चालत काॅलेज मध्ये.  कराड शहरातील पोरं तशी आमच्या काॅलेजात कमीच. कारण SGM म्हणजे डाऊन मार्केट, खेड्यातल्या पोरांचे काॅलेज. सगळे  आमच्या काॅलेजला मठ म्हणून  हिनवायचे.

सदगुरू गाडगे महाराज काॅलेज म्हणजे आमचं विश्व होतं. त्यावेळी काॅलेजात एक कॅन्टीन होतं,  पण तिथं आम्ही कमी जायचो. बाहेर एक चहाचे खोके होते. तिथं आम्ही मित्र चहा प्यायला जात होतो.  खिशात  पाच दहा रूपये  असायचे. पण ते असणं पण मोठ्ठं होते.  कधी कधी पैज लागायची, हरेल त्याने चहा क्रिमरोल द्यायचा. काय सांगू त्या चहा आणि क्रिमरोलला कसली भन्नाट  टेस्ट यायची. 

चांगले मित्र होते,  टीचर तर एकदम बेस्ट.आम्ही अॅडमिशन घेतले तेव्हा पासूनच ओळख, कारण कोणते विषय ठेवायचे ते तेच सांगायचे. सर आणि विद्यार्थी याच्यामध्ये आदराचे नाते होते, घरी येणेजाणे व्हायचे. खेड्यातल्या पोरांना शिकवायला खेड्यातून आलेले शिक्षकच होते. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेचे हे काॅलेज असल्याने एक वेगळीच शिस्त होती.

आमचा मित्र परिवार वाढत होता कारण आमचा बोलण्याचा स्वभाव आणि ओळख काढण्याचा नाद. अशातूनच मित्राचा मित्र असलेला एक नवीन मित्र  तयार झाला, विटा भागातला होता. त्याचे पुर्ण नाव आठवत नाही, पण निकम फक्त आठवतंय. तो मिलिटरी होस्टेल मध्ये रहायचा.  होस्टेलची शिस्त कडक असलेने तिथे बाहेरच्या मुलांना क्वचित प्रसंगी प्रवेश मिळायचा. 



एकदा दुपारी मी त्याच्या सोबत तिकडे गेलो होतो. आत प्रवेश केला, समोर मोठ्ठा  आरसा होता. आठरावं वरीस आणि समोर आरसा दिसल्यावर काय होतं, हे सर्वश्रुत आहे. हे वय असं असतं की सारखं आरशात बघून मी कसा दिसतो,  हे पाहण्याची उत्सुकता असते. थोडं मिसरूड फुटलेलं,  त्यामुळे मी मोठ्ठा झालो असे वाटू लागते. सारखा कंगवा आणि आरसा. एकडून तिकडून  आलं की आरसा बघायचा, तोंड धुवायचे, पावडर लावायची, भाग पाडायचा, हे TEEN AGE काॅलेजकुमाराचे आवडते काम.



मिलिटरी होस्टेल मधील तो आरसा पाहून खिशात हात घातला, कंगवा काढला आणि स्टाईल मध्ये भाग पाडू लागलो.  तेवढ्यात सिक्युरिटी गार्डचा आवाज आला, 
अ काॅलेजकुमार, जरा  दमानं,  आरसा फुटंल. भांग पाडा आणि मग आरशावर काय लिहलंय ते ही वाचा,
त्यानी दम भरला. 
इतक्या वेळ फक्त आरशात बघत होतो, आता आरशाकडे पाहीले,
वरच्या बाजूला सुंदर अक्षरात लिहिले होते,
' तुम्ही कसे दिसता त्यापेक्षा तुम्ही कसे आहात याचा विचार करा.'

थोडं डोकं हललं. विचार केला, विचार करण्याचं वय होते ते. एक छोटं वाक्य होतं ते.  पण  अर्थ खुप मोठा होता. सुंदर दिसण्यासाठी सगळेच आटापिटा करतात,  पण आतून सुंदर दिसावे, खुलावे,आंतरिक सौंदर्य वाढवावे, यासाठी कोण प्रयत्न करते का? तो प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे , किती सोप्या शब्दात सांगितले होते.

सेल्फी अशी प्रसन्न असावी

आज हे आठवायचे कारण म्हणजे आजकाल वाढलेले सेल्फीचे वेड. माझा मुलगा सोळा वर्षाचा आहे,  तो पण सारखा सेल्फी काढत  असतो. त्याला पाहून मला मिलिटरी होस्टेल वरचा तो आरसा डोळ्यासमोर उभा राहिला. सध्या  बहुतेक जणांकडे ANDROID मोबाईल आहे.  पाच ते बारा पिक्सल कॅमेरा त्यामध्ये आहे. दिवसभर एक सेल्फी काढत नाही , असा काॅलेजकुमार आढळणे अवघड आहे. काढला सेल्फी, टाकला ग्रुपवर. मित्रमंडळीना केला शेअर फेसबुकवर, व्हाॅटस अपवर, हाईकवर !


आता तर सेल्फी स्टीकपण आली आहे. इतके फोटो काढतात, शेअर करतात,
पण कुणीतरी मी कसा दिसतो त्यापेक्षा मी कसा आहे, हा विचार केला आहे का?
त्यांना  असा विचार करा म्हणून सांगणारे भेटतात का ?

दिवसभर काय काय केलं ? कुणाकुणाला किती वेळा रागवलो ? कुणाचे मन दुखावले ? कुणावर ओरडलो ? कुणाकुणाला आनंद दिला ? किती गोष्टी मनासारख्या केल्या?  किती मनापासून केल्या? मनाविरुद्ध केल्या? कोणाकोणाच्या चेह-यावर हसू आणले ? काय नको तसे वागलो, काय हवे तसे वागलो, वगैरे गोष्टींचा विचार करणे, त्या टिपणे म्हणजे अंतरंगाचा सेल्फी.! 
आपण हा सेल्फी टीपतो का ?



थोर तत्त्ववेत्ते राॅबीन सिंग म्हणतात,
आपण रोज किमान एकातरी अनोळखी व्यक्ती कडे पाहून हसले पाहिजे .

अनोळखी व्यक्तीकडे पाहून हसल्यावर वेगळा आनंद मिळतो. आपण आपल्या ओळखीच्या व्यक्ती कडे तरी बघून हसतो का कधी? खोटं हास्य आणून सेल्फी काढतो तेव्हा आपणास आनंद मिळतो का? मिळाला तर तो आनंद किती काळ टिकतो?  स्वतः आनंदी होण्यासाठी दुसराही आनंदी असायला हवा, असा आपण का विचार करत नाही. सेल्फी मुळे आनंद मिळतो, जर तो मिळाला नाही तर काय होईल, काहीच नाही !

स्वतःचा चेहरा जपतो, मग विचार का जपत नाही ?
सेल्फी म्हणजे आपलं प्रतिबिंब आहे आपले खरे रूप नव्हे.
आपलं खरं रूप,  अंतरंग  आपल्या  इतकं कुणालाही माहीत नाही.
आपण आपल्या आतील मनाला विचारले तर आपल्या इतके वाईट कोणी नाही ,
मी हे चुकीचे केले आहे, असं करायला नको होतं,
हे आपल्या लक्षात येईल .

संत कबीर म्हणतात,

बुरा जो देखन मैं चला
बुरा न मिलिया कोय
जो दिल खोजा अपना
मुझसे बुरा न कोई  !

सेल्फी हे आपले अंतरंग व्हायला हवे. आपल्या चेहर्‍याकडे पहिल्यावर आपल्याला आनंद झाला पाहिजे .
रात्री झोपताना या सर्वांचा विचार करायला हवा.
आज दिवसभरात जे चुकले ते उद्या सुधारण्याचा मी  प्रयत्न करेन आणि
आधीच्या दिवसापेक्षा दुस-या दिवसाची सेल्फी अधिक चांगली येईल यासाठी प्रयत्न करेन.
चेहर्‍याच्या सेल्फी पेक्षा अंतरंगाचा आनंद महत्वाचा , होय ना ?
               



Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...