फॉलोअर

१३ जून २०२०

Virtual vari 1

इंद्रायणी काठी देवाची आळंदी



आळंदी ते पंढरपूर अशी पंढरीची वारी आणि पालखी सोहळा सुमारे पाऊणेतीनशे किलोमीटर अंतराचा आहे. याया वर्षी करण्याच्या पार्श्वभूमीवर पंढरीची वारी निघणार नाही मात्र वारी मधील अनुभव आणि वारी वारी च्या परंपरा याविषयी सलग अठरा दिवस आपण या ब्लॉगच्या माध्यमातून भेट देणार आहोत. भक्तीच्या या महासागरात ‘पुढारी’सुद्धा सहभागी होणार आहे.  आमच्या वाचकांसाठी ही भक्तीपर्वणीच आहे. आजपासून रोज पुढारीमध्ये ‘देव माझा विठू सावळा’ हे विशेष सदर वाचकांच्या भेटीला येत आहे.


वरुणा, अलका, कणिका,
आनंद, सिद्धक्षेत्र, अलंकापूरी आणि आळंदी
पंढरीची वारी म्हणजे आनंदाचा प्रवास. आनंद वाटत-वाटत माणसांमधील ईश्वराला भेटण्याचा प्रवास. शेकडो वर्षांपासून पंढरीची ही वारी अखंडपणे सुरू आहे.
महाराष्ट्र, कनार्टक, गोवा, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश या राज्यांतील 5 ते 6 लाख लोक या वारीमध्ये सहभागी होत असतात. ‘माऊलीऽऽ... माऊलीऽऽ’ चा जयघोष करीत आनंद वाटत-वाटत लुटण्याचा हा प्रवास  13 जून ते 1 जुलैपर्यंत चालणार आहे.
चला आळंदीला जाऊ । ज्ञानदेवे डोळा पाहु ॥
होतील संतांच्या भेटी । सांगू सुखाच्या गोष्टी ॥
ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर । सुखी म्हणता चुकतील फेरे ॥
जन्म नाही रे आणखी । तुका म्हणे माझी भाक ॥
आळंदी म्हणजे महाराष्ट्राच्या धार्मिक भावनांचे केंद्रबिंदु. आळंदीचे नाव  ऐकले की, ज्ञानेश्वर माऊलींची वात्सल्याने ओसंडून वहात असलेली दयाघन ज्ञानमूर्ती डोळ्यांपुढे उभी राहते. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधीने पावन झालेल्या या भूमीचे वारकरी सांप्रदायात अनन्यसाधारण महत्त्व आहे. माउलींच्या समाधीबरोबरच येथे असणारे विविध मठ, मंदिरे यामुळे या तीर्थस्थानाला एक वेगळेच पावित्र्य लाभले आहे. अशा या अलंकापुरीत आजपासून पालखी सोहळा सुरुहोत आहे. 
आळंदी गावचा इतिहास फार जूना आहे. स्कंद पुराणात या गावाचा उल्लेख आहे. ज्ञानेश्वर माऊलींचे वडील पंढरीची वारी करीत, असा संदर्भ आहे. माऊलींनी ही वारी पुढे चालु ठेवली. आता या वारीला महाकाय स्वरुप प्राप्त झाले आहे. वारीची सुरूवात आळंदीतून होते. माऊलींचे वास्तव्य लाभलेल्या अलंकापुरीत वारकरी येतात आणि माऊलीमय होऊन जातात. शुभमंगला इंद्रायणी नदीच्या काठी बसलेले गाव म्हणजे आळंदी. सुमारे 725 वर्षापूर्वी इथे एक दिव्य-चरित्र घडले. श्री ज्ञानेश्वर महाराजांचा दिव्य अवतार व चरित्र घडले ते याच परम पावन क्षेत्री! त्यांच्या खाणाखुणा या गावाने अजून जपून ठेवल्या आहेत. इंद्राने पृथ्वीवर येऊन यज्ञयाग केले, त्यावरून इंद्रायणी हे नाव पडले. कुबेरगंगा असेही नाव पूर्वी प्रचलित होते.
ज्ञानदेवांनंतर पुढे देहूला श्री तुकाराम महाराज इंद्रायणीच्या काठी राहिले. त्यामुळे ज्ञानोबा तुकारामाची इंद्रायणी’ असे आबालवृद्धांच्या तोंडी बसले. साधु हे तीर्थांना तीर्थत्व प्राप्त करून देतात. ज्ञानदेवांचा स्पर्श या मुळच्या पवित्र नदीला झाल्यामुळे ती आता परम पवित्र झाली आहे. आळंदी हे गावही ज्ञानदेवांच्या पूर्वीपासून प्रसिद्ध आहे. स्कंद पुराणातील सह्याद्री खंडाच्या 64 व्या अध्यायात आळंदीची वरुणा, अलका, कणिका, आनंद व सिद्ध क्षेत्र अशी नावे आली आहेत. मराठी संतांनी तिला अलंकापुरी म्हटले आहे.
॥ अलंकापुरी पुण्य भूमी पवित्र, जिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र ॥
श्री ज्ञानदेवांनी या ठिकाणी संजीवनी समाधी घेतल्याने, हे गाव अजरामर झाले आहे. गेल्या 700 वर्षात अनेक संतांच्या आणि ऐतिहासिक घटनांच्या पाऊलखुणा येथे उमटलेल्या आहेत. पौराणिक काळापासून हे गाव प्रसिध्द आहे. इतिहासकार राजवाडे यांच्या मते आळंदी हे गाव मध्ययुगातले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी एका शेताचे उत्पन्न श्री ज्ञानदेवांच्या समाधी स्थानास दिले होते. त्यानंतर राजाराम महाराज, बाळाजी बाजीराव पेशवे, पहिले बाजीराव वगैरेंनी आळंदी गावाकडे लक्ष पुरविले आणि आळंदीला गावपण दिले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...