वारी नव्हे ‘मॅनेजमेंट गुरु’
पंढरीचा वारकरी । वारी चुकोनेदी हरी ॥
पंढरीची वारी कशी सुरू होते.. कशी चालते, वारकर्यांना कोण निमंत्रण पाठवतं? लाखो वारकर्यांच्या राहण्याची, खाण्या-पिण्याची सोय कोण करतं? कसं चालतं हे सगळं..! कोणी मोठा नाही.. कोणी लहान नाही. सगळे एकाच ध्यासाने, एका दिशेने ऊन, वारा, पाऊस याची कदर न करता कसे चालतात. त्यांना ही शक्ती कोठून मिळते? हे न उलगडणारं कोडं आहे !
जगातील कोणत्याही देशात.. कोणत्याही धर्मात अशा प्रकाची सतत 18 दिवस चालणारी धार्मिक यात्रा नाही. वारकरी हे कसं घडवून करतात? हा सर्व संशोधनाचा विषय आहे. संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा आणि जगतगुरु तुकोबा महाराज पालखी सोहळा या दोन प्रमुख पालख्यांबरोबरच राज्यभरातील शंभरहून अधिक गावांतून येणार्या विविध संतांच्या नावाच्या पालख्या आणि सुमारे 5000 गावांतून येणार्या लहान-मोठ्या दिंड्या यांचे नियोजन हा अवघ्या जगासाठी अभ्यासाचा विषय आहे. हे सर्व घडवून आणणारा वारकरी माऊली हा सर्वश्रेष्ठ मॅनेजमेंट गुरु’ आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा आळंदी येथून तर संत तुकाराम महाराज पालखी सोहळा देहु येथून सुरू होतो. या सोहळ्यात राज्यभरातून अनेक दिंड्या सहभागी होतात. ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यात रथापुढे 27 तर रथामागे सुमारे 300 नोंदणीकृत दिंड्या तसेच नोंदणी नसलेल्या सुमारे 200 दिंड्या आहेत. तुकोबा माऊली पालखी सोहळ्यात नोंदणीकृत 325 तर नोंदणी नसलेल्या 100 हून अधिक दिंड्या आहेत. या दोन्ही सोहळ्यामध्ये सुमारे 1 हजार दिंड्या असल्याची नोंद आहे. एका दिंडीमध्ये 50 ते एक हजार वारकरी असतात. यामध्ये झेंडेकरी, वीणेकरी, टाळकरी, चोपदार, पाणी सेवा देणारे तसेच इतर सेवेकरी यांचा समावेश असतो. प्रस्थानाअगोदर दोन-तीन महिने दिंडी प्रमुखाच्या नेतृत्चाखाली तयारी सुरु होते. दिंडीत सहभागी वारकर्यांच्या संख्येनुसार राहण्याची सोय, तंबू, भोजन, वाहतूक याची तयारी केली जाते. सर्व संच एकत्र करून वारकर्यांना घेऊन वाहने आळंदी, देहुत पोहोचतात. प्रस्थानाच्या आदल्या दिवशी या दिंड्यांतील वारकरी आळंदी, देहुतील मठामध्ये किंवा खासगी जागेत कुठेही मुक्काम करतात. ज्ञानेश्वर माऊली व तुकाराम महाराज या दोन्ही पालख्यांचा पुण्यात दोन दिवस मुक्काम असतो. पुण्यनगरीत माऊली भक्तांच्या सेवेसाठी महानगरातील अनेक सेवाभावी संस्था, मंडळे कार्यरत असतात. पुण्यात वारकर्यांच्या निवासाची सोय शाळा, महाविद्यालये, धर्मशाळा येथे केली जाते. अनेक वारकरी मिळेल तेथे निवास करतात. अलिकडे पुणे, पिंपरी-चिंचवड येथील अनेक अपार्टमेंटच्या बेसमेंटमध्ये वारकर्यांच्या निवासाची सोय केली जाते. पुणे शहर सोडून या दोन्ही पालख्या वेगवेगळ्या दिशेने पंढरपूरकडे मार्गक्रमण करतात. सासवड आणि लोणी काळभोर येथील मुक्कामाच्या ठिकाणापासून खर्या अर्थाने वारीचे अचूक मॅनेजमेंट पहायला मिळते.
पालखी सोहळा सकाळी सातच्या सुमारास मार्गस्थ होतो आणि सायंकाळी सहाच्या दरम्यान मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचतो. साधारण 6 ते 8 किलोमीटर अंतर पार पडल्यानंतर पहिला विसावा घेतला जातो. पहिल्या विसाव्यानंतर पुढे तेवढेच अंतर पार पडल्यानंतर दुपारी 12 च्या सुमारास जेवणासाठी सोहळा विसावतो. तासाभरानंतर पुन्हा सोहळा मार्गस्थ होतो. सायंकाळी चारच्या सुमारास आणखी एका ठिकाणी विसावा घेतला जातो. त्यानंतर मुक्कामाच्या ठिकाणी सोहळा पोहोचतो. वारकरी सकाळी 7 वाजता चालावयास सुरुवात करतात. ज्ञानेश्वर माऊली तुकाराम’, ‘राम कृष्ण हरी..’ च्या जयघोषात, भजनाच्या तालावर टाळ वाजवत वारकरी चालत असतात. प्रत्येक दिंडीच्या सुरुवातीला झेंडेकरी, त्या पाठोपाठ वीणेकरी. सोबत तुलशी वृंदावन आणि पाण्याचा हंडा घेतलेली महिला वारकरी अन् त्यांच्या पाठोपाठ तीन किंवा चारच्या ओळीत टाळकरी, आणि शेवटी चोपदार अशी प्रत्येक दिंडीतील व्यवस्था असते. शिस्तबद्ध सोहळ्यातील वारकरी कोणत्याही प्रलोभनाला बळी पडत नाहीत. एकदा चालावयास सुरुवात केल्यानंतर जोपर्यंत माऊलींचा रथ थांबत नाही तोपर्यंत कोणतीही दिंडी मध्ये थांबत नाही.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा