फॉलोअर

१५ जून २०२०

माझी व्हर्चुअल वारी 15 जुन

*माझी व्हर्चुअल वारी*

*सतीश वसंतराव मोरे*

कराड वहागाव कराड

दि. 15 जुन 2020




पंढरीच्या वारीमध्ये आजचा दिवस खरंतर पुण्यामध्ये मुक्कामाचा आहे. काल रात्री उशिरा संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पुणे शहरात पोहचली असती. काल पुण्यात मुक्काम होता. रात्री वारकरी आता आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी विसावले असते. काहीजण आपल्या नातेवाईकांच्या घरी गेले असते. दोन दिवस पुण्यात मुक्काम असल्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा पुण्यामध्ये आल्यानंतर अनेक वारकरी शहरातील नातेवाईकांच्या कडे मुक्कामाला जातात हा अनुभव आहे.

आज वारी पुण्यात मुक्काम असल्यामुळे आज प्रवास नव्हता. मात्र माझी वारी 18 दिवस रोज चालणार आहे. एकूण 240 किलोमीटर हे वारीचे अंतर मला अठरा दिवसात पार करून 30 जूनला मला पंढरपूर पोहोचायचे आहे. 240 किलोमीटर अंतराचा अंदाज घेऊन रोज 14 किलोमीटर चालायचेच असा संकल्प असल्यामुळे आज सकाळी पावणेसहा वाजता घराबाहेर पडलो.

आजच्या माझ्या वारीमध्ये कराड चे लोकप्रिय नगरसेवक माझे 2006 पासूनचे मित्र विजय वाटेगावकर गुंड्याभाऊ आणि माझे मित्र धनंजय राजमाने माझ्यासोबत सहभागी झाले होते. सहा वाजता पियुषने मला कोल्हापूर नाक्यावर सोडले तर राजमाने च्या गाडीवर बसुन वाटेगावकर गुंड्याभाऊ आम्ही सारेजण कोल्हापूर नाक्यावर पोहोचलो..दुचाकी वाहने तिथे पार्क केले. राष्ट्रीय महामार्गाला नमन करून चालायला सुरुवात केली. वारकरी जेव्हा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणावर जायला निघतात तेव्हा पहिल्यांदा ते धरती मातेच्या म्हणजेच जमिनीच्या पाया पडतात. एखाद्या शेतकऱ्यांच्या बांधावर किंवा रस्त्याकडेला कुठेही बसतात, झोपतात आणि त्यानंतर पुन्हा चालायला  सुरुवात करतात तेव्हासुद्धा हे वारकरी धरणी मातेच्या पाया पडतात, नतमस्तक होतात. आज आम्ही वारीला चालायला सुरू केल्यानंतर धनंजय राजमाने यांना मी जमिनीच्या का पाया पडलो याचे थोडे अप्रूप वाटले म्हणून मी त्यांना चालता-चालता सांगावयाला सुरूवात केली.

 वारकरी संप्रदाय मध्ये कृतज्ञताभाव हा फार महत्वाचा आहे. ज्याने ज्याने तुमच्यासाठी मदत केली आहे, तुमच्या साठी वेळ दिला आहे, जागा उपलब्ध केली आहे किंवा कोणत्याही प्रकारची मदत केली आहे, त्याच्याविषयी कृतज्ञताभाव व्यक्त करावा,, त्याला नमस्कार करतात. त्याचा निरोप घेताना किंवा भेटताना राम कृष्ण हरी म्हणून बोलायला सुरुवात करणे असा वारकर्‍याचा नित्यनेम असतो. वारकरी जेव्हा चालावयास सुरुवात करतात तेव्हा ते धरणी मातेच्या पाया पडतात कारण त्या धरणीमातेच्या पोटावर, खांद्यावर, छातीवर आपण बसलेलो असतो. या धरणीमातेने आपल्याला बसावयास जागा दिलेली असते. म्हणून वारकरी त्या जमिनीच्या पाया पडतात. रस्त्यावरून चालायला सुरुवात करताना रस्त्याच्या पाया पडतात याचे कारण असे आहे की हा रस्ता त्यांना पंढरपूर पर्यंत घेऊन जाणार आहे, पंढरपूर मध्ये विठोबा विटेवरी उभा आहे. त्या विठोबाचे दर्शन घेण्यासाठी हा रस्ता मार्ग दाखवणार आहे, हाच रस्ता त्यांना सोबत देणार आहे, त्यामुळे वारकरी रस्त्याचाही पाया पडतात. एखाद्या शेतात बसून उठल्यानंतर प्रवास सुरू करताना त्या शेतकऱ्याला, त्या जमिनीच्या मालकाला कृतज्ञतेने नमस्कार करतात आणि मगच पुढे चालायला सुरुवात करतात. वारकरी संप्रदायामध्ये असणारा हा कृतज्ञताभाव मला या संप्रदायावर प्रेम करावयास किंवा या संप्रदायावर संप्रदायाच्या प्रेमात पडण्यास एक महत्त्वाचा घटक ठरला आहे.



सहा वाजता कोल्हापूर नाक्यावरून उंब्रजच्या दिशेने चालायला सुरुवात केली. आज आमच्या शेवटचे टोक वहागाव होतं. या गावाला जायचं होतं. पावसाची रिमझिम सुरू होती. खरं तर सकाळी घराबाहेर पडताना हा पाऊस आपल्याला घराबाहेर न पडण्यासाठी येतो की रस्त्यावरून चालताना गारवा निर्माण करण्यासाठी येतो असा मला प्रश्न पडला होता. मात्र निसर्ग कधीही वाईट करत नाही. निसर्गाच्या मनात नेहमी चांगलंच असतं हे मला समजावलं. त्यामुळे पावसात ही आम्ही तिघांनी चालावयास सुरुवात केली. कोयना पुलावर गेल्यानंतर कोयना नदीचे विशाल पात्र आणि सुंदर रूप पाहून खूप आनंद झाला. सव्वा सहा वाजले होते, पुर्ण उजाडले होते. आता पुला वरून जाणारी वाहने आमच्या अंगावर पावसाचे पाणी उडवित होते. मात्र याचाही आम्ही आनंद घेतला. कोयना पूल पार करून वारुंजी फाट्यावर आल्यानंतर आम्ही सर्विस रोडचा आधार घेतला. सर्विस रोड वरून पुढे चालायला सुरुवात केली. गोटे गाव पार करून पुढे आल्यानंतर पावसाने आणखीनच वेग घेतला होता. जोरात पाऊस सुरू होता. फर्न हॉटेल क्रॉस करून पुढे आल्यानंतर रस्त्याकडेला सर्विस अनेक युवक जोर-बैठका मारत असल्याचे लांबूनच दिसले.भरपावसात युवा पिढी इतक्या आनंदाने आणि जोशात सकाळी सकाळी व्यायाम करताना पाहून मलाही माझे गावातील व्यायामाचे दिवस आठवले. माझा मित्र हनुमान काशीद रोज मला करवडी कॉलनीच्या रस्त्यावरून पळत कॉलनीपर्यंत व्यायामाला न्यायचा. कॉलनी मध्ये जाऊन आम्ही पहाटे व्यायाम करत असू. गोटे गावातील हे युवक मिलिट्री भरतीला जाण्यासाठी तयारी करत होते. भर पावसात या मुलांचा व्यायाम पाहून मोबाईल बाहेर काढून शुट केलं. युवकांचे रक्त सळसळत असतं आणि ते कधीच थांबू शकत नाही, हेच खरं. मुलांसोबत गप्पा मारल्या फोटो काढले आणि पुढे चालायला सुरुवात केली.

 खोडशी पर्यंत पोहोचेपर्यंत पाऊस थांबला होता. मात्र थंड हवा वाहत होती. याच वेळेला लतादीदीनी गायलेला भेटी लागे जीवा लागलीसे आस हा अभंग मोबाइलवर लावला आणि या अभंगाचे संपूर्ण विवेचन करायला सुरुवात केली.

 खरे तर वारकरी संप्रदायाचा आमच्या घराचा फार जुना वारसा आहे. माझी आजी माळकरी होती. दरवर्षी पंढरीला जायची. आजीसोबत गावातल्या विठ्ठल रुक्माई च्या मंदिरात किंवा हनुमान मंदिरात गेल्यानंतर तिथे सुरू असलेला हरिपाठ अजूनही मला आठवतो. करवडी गावातील अखंड ज्ञानेश्वरी सप्ताहात मी अनेकदा सहभागी झालो आहे. शालेय जीवनात चार-पाच वेळा ज्ञानेश्वरी वाचन झाले आहे. कराडच्या कृष्णा घाटावर झालेल्या भव्य ज्ञानेश्‍वरी पारायण सोहळ्यातही तीन वेळा मी सहभाग घेतला होता. वारकरी संप्रदाय, कीर्तन, प्रवचन याची मला सुरुवाती पासूनच गोडी आहे. कीर्तनामध्ये ऐकलेले अभंग विवेचन, प्रवचनामधील चिंतन मी अनेकदा माझ्या मित्रांसोबत शेअर  केले आहे. मात्र मला सर्वात आवडत असलेली संत तुकाराम महाराजांचा अभंग वाणी भेटी लागी जीवा, लागलीची आस ही आम्हाला अकरावी बारावीच्या पुस्तकात कविता होती. ही कविता प्रा. लता पाटील मॅडमनी अतिशय सुंदरपणे शिकवली होती. त्यामुळे त्याचा प्रत्येक शब्दाने शब्द मुखद्गत आहे आणि त्याचा अर्थही. आता भेटी लागे जीवा या अभंगाचे विवेचन करण्याचा मी थोडासा प्रयत्न केला. आपला वारी मध्ये केवळ चालणे हा उद्देश नाही. राम कृष्ण हरी चा जप तर झालाच पाहिजे. आणि संतवाणीवर चर्चा झाली पाहिजे.अभंगाचा अर्थ समजून घेतला पाहिजे, संतांचे विचार समजून घेतले पाहिजेत,असा वारीला जाण्याचा माझा पहिल्यापासूनच हट्ट आहे आणि होता. त्यामुळे आम्ही या अभंगाचा अर्थ चालत  सांगत राहिलो. दिवाळीच्या तोंडावर आपला बाप सणाला न्यायला येईल यासाठी बापाची आतुरतेने वाट पाहणारी नवविवाहिता, फक्त पावसाचे पाणी पिणारा चातक पक्षी आणि या पावसाची वाट पाहणारा हा चातक पक्षी, भूक लागल्यानंतर रडून आईला बोलावणारा बाळ आणि आईचीच वाट पाहणारा बाळ आणि विठ्ठलाची वाट पाहणारे संत तुकाराम महाराज,  त्यांच्या मनात असणारी घालमेल एकच प्रकारचे होती, असा काही अर्थ असणारी ही अभंगवाणी आहे. विठ्ठलाचे वाट पाहणार्या, आस लागलेल्या आणि विठ्ठल दर्शनासाठी आतुर झालेल्या संत तुकाराम महाराजांचा हा अभंग आहे.




पुढे चालत राहिलो वनवासमाची जवळ आल्यानंतर या गावात असलेल्या लोकांनी कोरोणाच्या महाराक्षसाला पळवून लावण्यासाठी ज्या पद्धतीने तोंड दिले त्याचा अभिमान वाटला. आम्ही सर्वांनी वनवासमाची करांच्या दिशेने तोंड करून या गावकऱ्यांचे कौतुक केले. आदर्श मिलिटरी ऍकॅडमी चालवणारा वहागाव  येथील एक युवक वनवासमाचीच्या पुढे एका ठिकाणी मिलिटरी भरतीसाठी रस्त्याकडेला युवक-युवतींना प्रशिक्षण देत असलेला आम्हाला पहावयास मिळाला. या युवकासोबत चर्चा केली. त्यांच्या सोबत असणारे मुले मुलींना भरतीसाठी शुभेच्छा दिल्या आणि पुढे निघालो.



आता वहागाव जवळ आले होते.वहागाव येथे कराडचे नगरसेवक आनंदराव लादे यांनी होटेल अशोका चालवावयास घेतले आहे. त्या ठिकाणी आम्ही पोहचलो‌. आठ किलोमीटर अंतर पूर्ण झाले होते. आता परत मागे फिरायचे आहे असा विचार करून अशोका हॉटेलच्या दारात दहा मिनिटं आराम केला. त्या ठिकाणी बसून निसर्ग सौंदर्याचा आनंद घेतला आणि पुन्हा कराडच्या दिशेने चालायला सुरुवात केली.

मगाशी जाताना वनवासमाची नजीक दोन महिला हायवेच्या शेजारी काहीतरी ग़ळा करताना पाहिल्या होत्या. मी त्यावेळी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले होते. मात्र आता येताना त्या महिला काहीतरी वेचत आहेत हे पाहिल्यानंतर मला राहावले नाही. तुम्ही काय करत आहात माउली असा प्रश्‍न विचारल्यानंतर आम्ही करंज्या गोळा करत आहोत असे त्यांनी सांगितले. महामार्गालगत करंजीची झाडे अनेक आहेत. या झाडाच्या लागलेल्या करंज्या आता खाली पडलेल्या आहेत. त्या वेचण्यासाठी या महिला काम करत होत्या. मला राहवलं नाही आणि मी त्यांना त्यांचं गाव विचारलं. उंब्रजच्या बेघर वस्तीतील ह्या दोन महिला होत्या. त्यांची मुलं भंगार गोळा करण्याचा व्यवसाय करतात तर नवरा एकीचा नवरा केस गोळा करण्याचे काम करतो. लॉक डाऊन मुळे गेल्या दोन अडीच महिने या कुटुंबाला कसलेच काम मिळाले नव्हते. शासनाने रेशनची व्यवस्था केली होती मात्र घरातील इतर वस्तू विकत आणण्यासाठी ह्या लोकांच्या कडे पैसे नव्हते. त्यामुळे गेल्या दोन महिन्यापासून पोलिसांचे व इतरांचे लक्ष चुकून या दोन्ही महिला करंज्या गोळा करत होत्या. दहा रुपये किलो दराने या करंज्या विकून त्यांना पन्नास शंभर रुपये मिळतात. या शंभर रुपयासाठी पाच ते सहा तास या माऊली कष्ट करतात, अडचणीत कुठेही जातात, कपारी मध्ये हात घालतात, दगडांमध्ये चालतात. या महिलांचे कष्ट पाहून  त्यांच्याकष्टाला सलाम करावासा वाटला.या महिलांची एक मुलाखत घेतली आणि परत चालायला सुरुवात केली.

 परतीच्या प्रवासात राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी आम्ही सर्वांनी सुरू ठेवला होता. राम कृष्ण हरीच्या या जयघोष यामुळे अंतर कसे पार होत गेले हे आम्हाला कळलेच नाही. गोटे गावाजवळ आलो. या गावात प्रकाश पवार नाना यांनी फोन करून मी तुमच्या गावातील विठ्ठल रुक्मिणी च्या दर्शनासाठी येत आहोत असे कळवले होते. नऊच्या सुमारास गोटे गावातील मंदिरात आम्ही तिघेही पोहोचलो. गावाच्या मध्यभागी ग्रामस्थांनी दहा वर्षांपूर्वी लोकवर्गणीतून हे विठ्ठल-रुक्मिणी मंदिर बांधले आहे. गोटे मुळगाव नदीकाठाला आहे, मात्र या गावाचे पुनर्वसन झाले आहे. त्यामुळे नवीन गावात विठ्ठल-रुक्मिणीचे जुने मंदिर आहे. मात्र तिकडे जाणे सर्वांना शक्य होत नसल्यामुळे ग्रामस्थांनी नवीन गोटे गावात विठ्ठल-रुक्मिणीचे मंदिर बांधले आहे. या मंदिराच्या सभागृहात आम्ही प्रवेश केला. विठ्ठल-रुक्मिणीचे डोळे भरून दर्शन घेतले आणि थोडा आराम केला. प्रकाशनानानीं आमच्यासाठी कांदेपोह्यांचा नाश्ता केला होता. या मंदिरात देवाची सेवा करणारे तसेच वारकरी, भजन करणारी मंडळी तसेच नित्यनियमाने हरिपाठ करणारे काही ज्येष्ठ नागरिक आमच्या स्वागतासाठी, आमच्या भेटी साठी थांबले होते. या नागरिकांसोबत आम्ही गप्पा मारल्या. आमच्या पंढरीच्या वारी बाबत त्यांना खूप अप्रूप वाटले. या सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या चरणी दंडवत करून आम्ही साडेनऊ वाजता तिथून निघालो.

गोटेगाव ते कराड हा दोन अडीच किलोमीटरचा शेवटचा टप्पा आला. खरं तर खूप कष्टाचा टप्पा होता. कारण पाय खूप दुखत होते. असंच होतं शेवटचा टप्पा आला कि पाय दुखतात. मुक्कामाचं गाव जवळ आले आहे असं वाटतं. मात्र गाव जवळ आलेलं नसतं. शेवटच्या टप्प्यातील गाव लांबून जवळ दिसतं मात्र अजून चालायला पुढे जायला काही वेळ जाणार असतो. या अडीच किलोमीटरच्या अंतरात लांबून गाव दिसत असलं तरी तिथे पोहोचायला अजून किलोमीटर चालावं लागणार आहे हे मनाला समजावून सांगावं लागत होतं.  माणसाचं पण असंच होतं. त्याला सुख जवळ आहे असं वाटतं. मात्र तो सुखा जवळ गेला की त्याच्या पासून सुख आणखीन दूर जात. सुखाचा शोध घेत बसला तर ते कधीच मिळत नाही. काम करत रहा, चालत रहा ,सुख नक्की मिळेल,हेच खर आहे. त्यामुळे पुढे चालत राहिलो. वारुंजी फाट्यावर अनेक ओळखीचे लोक भेटले. विजय वाटेगावकर, मी आणि धनंजय राजमाने आम्ही तिघेही चालत का कराडला निघालो आहे असे अनेकांनी विचारले. कोयना पुलावर आलो आता कोल्हापूर नाक्यावर आलो की आपला आजचा वारीचा प्रवास संपणार याचा खूप आनंद झाला. दहा वाजता पुढारी कार्यालयासमोर पोहोचलो. धनंजय राजमाने विजय वाटेगावकर यांना घेऊन घराकडे गेले आणि मी माझ्या ऑफिसच्या कामासाठी कार्यालयात हजर राहिलो.

अशा पद्धतीने आजची पंढरीची वारी अतिशय सुंदर पद्धतीने पार पडली. आज सुद्धा 16 किलोमीटर अंतर कसे आनंदाने पार पडले हे जाणवलेच नाही, सर्व काही माऊलींची कृपा!



राम कृष्ण हरी


karawadikarad.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...