फॉलोअर

१७ सप्टेंबर २०१६

पी डी पाटील जयंती विशेष पुन्रप्रकाशित


न पाहिलेले साहेब

वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी मातृछत्र हरवलेला एक छोटा मुलगा धैर्याने उभा राहतो.  परिस्थितीशी झुंजत ध्येय गाठायचेच अशा दृढनिश्चयाने स्वत:ला झोकून देतो, प्रसंगी उपाशीपोटी झोपतो, टिळक हायस्कूल मधील मित्र भानुदास पागणीस यांचे सोबत स्वावलंबनाचे धडे  गिरवतो. अखेर तोच जिंकतो! शिकतो, मोठ्ठा होतो, अढळ स्थान निर्माण करतो ...  पी. डी. पाटील होतो !

जगाच्या  इतिहासात कराडचे नाव नेहमीच उंचावर राहीले आहे. कराडचे नाव साता समुद्रापार नेणारी निवडक रत्ने कृष्णामाईच्या काठावर जन्माला आली. त्यात पाडुरंग दादासाहेब पाटील उर्फ पी.डी. पाटील यांचे नाव निश्चित सर्वोच्च आणि आदरणीय आहे.  पी.डी.पाटील यांच्या आयुष्यातील अनेक घटना, प्रसंग अनुभव यापूर्वी अनेकांच्या आयुष्यात आलेले असतील पण त्या अनुभवातून स्वतःला सिद्ध करण्याची किमया फक्त साहेबांनीच साधली. तत्कालीन परिस्थितीचा स्वतःवर जरादेखील परिणाम होऊ न देता साहेब त्याला तोंड देत गेले.  कधी पुढे जाऊन कधी एक पाऊल मागे घेत पुन्हा गनिमी कावा करत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलाने गेले. सभोवतालची सामाजिक परिस्थिती पाहून मन हेलावले गेले. त्यावेळी भगवान गौतम बुद्धांच्या तत्वज्ञानाकडे ओढले गेले. कधी जैन मुनीजनाच्या विचाराने प्रभावीत झाले. सर्व धर्मात सांगितलेली तत्वे आपल्या नजरेतून पाहताना टीकात्मक लेखन वाचण्यावर त्यांचा भर होता. साहेबांच्या घरातील वैयक्तिक ग्रंथालयात असलेली पुस्तके याचीच साक्ष देतात.


साहेबांच्या राजकीय आयुष्यात त्यांना काही चढ उतारांना, स्वकियांनी दिलेल्या आकस्मिक धक्क्यांना तोंड द्यावे लागले. धुरंधर समाजकारणी, राजकारणी असलेल्या साहेबांनी संयम ढळू दिला नाही. ज्या कामात आनंद मिळाला, मिळतो तेच काम करत राहिले. यशवंतराव चव्हाण 1962 साली दिल्लीच्या राजकारणात सक्रिय झाले. त्यानंतर त्याच वर्षी पी.डी.पाटील यांनी कराड  उत्तर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाच्या बैलजोडी चिन्हावर निवडणूक जिंकली आणि ते पहिल्यांदा आमदार झाले. हा त्यांच्या आयुष्यातील सुवर्णकाळ होता. त्यानंतरच्या तीन विधानसभा निवडणुकीत साहेबांनी उत्तर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले नाही, परंतु या तिन्हीही निवडणुकीत त्यांची भूमिका महत्वपूर्ण राहिली. त्यानंतर 1980 साली पुन्हा वेगळ्या परिस्थितीत साहेब पुन्हा एकदा कराड उत्तरचे आमदार झाले.

1985 मध्ये झालेल्या निवडणुकीत मात्र त्यांना पराभवाचा धक्का बसला. जवळच्या लोकांनी सहकार्य न केल्याने, दगाबाजी केल्याने झालेला हा पराभव त्यांच्या जिव्हारी लागला होता. अशा परिस्थितीत बरोबरच्या लोकांनी साहेबाकडे जाऊन पराभवाला जबाबदार असलेल्या लोकांना सोडू नका, वगैरे सल्ले दिले.  मात्र त्यांनी संयमाने हा पराभव स्वीकारला.  लगेच दुसऱ्या दिवशी  कामाला सुरूवात केली. आपल्या जवळचे कोण याचे आत्मचिंतन करतानाच त्यांनी पुढच्या म्हणजे 1990 च्या विधानसभा निवडणुकीत शामराव अष्टेकर यांच्यासाठीच तिकीट
मागितले. त्याचांच प्रचार केला, निवडून पण आणले. 1985 च्या निवडणुकीत जवळ राहून उलटे काम करणारांना उघडेे पाडले. योग्य वेळी योग्य निर्णय घेताना साहेबांनी या निमित्ताने ज्यानी त्यांना पाडले त्यानांच उघडे पाडले.

हवा उलटी असताना खाली बसले की संकट निघून जाते, याची जाणीव असलेल्या साहेबांनी नंतरच्या काळात विरोधकांचे अस्तित्व, नाव पूर्ण संपवलेच शिवाय कराड उत्तर मध्ये आपली पाळेमुळे आणखी घट्ट रोवली. त्याचा फायदा त्यांना 1995 साली झालेल्या निवडणुकीत झाला. या निवडणुकीत कॉंग्रेसने उमेदवारी नाकारली आणि बंडखोरी करून साहेब अपक्ष उभे राहिले. तिसऱ्यांदा आमदार झाले. ही निवडणूक चुरशीची झाली, राष्ट्रीय कॉंग्रेसच्या आनंदराव पाटील यांचा त्यांनी पराभव केला आणि हीच निवडणूक त्यांना आणि त्यांचा मुलगा बाळासाहेब पाटील यांच्यासाठी खऱ्या अर्थाने माईल स्टोन ठरली.


1999 साली राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची स्थापना झाली. त्यावेळी पहिल्याच दिवशी शरद पवार यांच्या पाठीशी उभे राहणारे राज्यातील ते पहिले आमदार होते.  हीच योग्य वेळ साधून साहेबांनी बाळासाहेब पाटील यांना रिंगणात उतरवले. उत्तर मधील परंपरागत राजकीय विरोधकांची ताकद ओळखून साहेबांनी पाऊले टाकली. या निवडणुकीत बाळासाहेब पाटील जिंकले.  आपल्या राजकीय वारसदाराला योग्य वेळी राजकारणात सक्रिय करण्याची साहेबांनी दाखवलेली चातुर्य बुद्धी खरंच वाखाणण्यासारखी आहे. साहेबांच्या परिपक्वतेची ती पावती आहे. पराभवातून कसे उभे रहायचे याचे ते मूर्तीमंत उदाहरण होत.

कराड शहरात, तालुक्यात साहेब गावागावांत जात. कराड  उत्तर मधील एखादेच गाव असेल जिथे साहेब गेले नसतील. साधेपणा त्यांना आवडत होता. प्रियजणांच्या घरी जाऊन ते  जेवत.  ज्यांच्या घरी पाहुणचार घेतला त्या घराची काळजी त्यांनी कायम घेतली.  त्या घरातील एका तरी व्यक्तीला रोजगारपण दिला. दूर्दैवाने व्यसनाच्या आहारी गेलेला एक पालिका कर्मचारी साहेबांना कधीही, कुठेही, रस्त्यावर थांबवून, साहेब काय काम होईल का ?असे म्हणत मदत मागायचा. साहेब सुद्धा सर्वासमोर त्याला मदत करायचे. यावेळी  साहेब त्याला मदत का करतात असा प्रश्न  अनेकांना पडे. कराड मधील एका सच्च्या स्वातंत्र सैनिकाचा तो मुलगा होता. स्वातंत्र्यानंतर त्यांनी कसल्याही प्रकारची मदत, पेन्शन, ताम्रपट स्वीकारला नाही.  मी जे केले ते देश सेवेसाठी, मग पेन्शन कशासाठी घ्यायची? अशा विचाराचे ते पोलादी स्वातंत्र सैनिक होते. स्वातंत्र चळवळीत फारसा सहभाग घेता आला नाही याची हुरहुर असलेल्या पी. डी. साहेबांनी या स्वातंत्र सैनिकाच्या मुलाला पालिकेत नोकरी दिली. त्याचा पगार प्रत्येक महिन्याला त्याच्या पत्नीच्या हातात नेऊन दिला. स्वतःच्या मुलाप्रमाणे त्याची काळजी घेतली. स्वातंत्र्य सैनिकाच्या घराची इतकी काळजी घेणारा असा लोकप्रतिनिधी दुर्मिळच म्हणावा लागेल.

1995 साली कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातून साहेब अपक्ष विजयी झाले. 43 अपक्ष आमदार विजयी झाले आणि त्यांच्या पाठींब्यावर  युती सरकार आले. सरकारला पाठिंबा द्या, सत्तेत सहभागी व्हा अशा प्रकारचे निरोप  वेगवेगळया माध्यमातून त्यांना आले. तत्कालीन मंत्री दौलतराव आहेर यांनी कराडातील एका डॉक्टरांच्या  मार्फत निरोप देऊन साहेबांना मंत्रीपदाची ऑफर दिली. काही दिवस मुख्यमंत्र्यांनी सहकार खाते पी. डी. पाटील यांना द्यायचे म्हणून स्वतः कडेच ठेवले होते. मात्र साहेब शेवटपर्यंत तत्वावर कायम राहिले आणि नकार कळवला.  तत्वाशी तडजोड स्वीकारून साहेबांनी त्यावेळी मंत्रीपद स्वीकारले असते तर राज्याला सर्वोत्तम सहकार मंत्री मिळाला असता.

याच कालावधीत महाराष्ट्रातून निवडून द्यायच्या राज्यसभा सदस्यपदासाठी शरद पवार यांनी एका उद्योगपतीना संधी दिली होती. तीस आमदारांचा मताचा कोटा होता. मतदारांना फार मोठे अमिष दाखवले गेले. सर्व प्रकारची अमिषे धुडकावून लावून साहेब तत्वावर ठाम राहिले. मतदानादिवशी साहेब मुंबईला गेले. त्यावेळी अमिष न स्वीकारणारा आमदार कोण आहे हे पहायला ते उमेदवार आले होते .शरद पवार यांच्याकडून खात्री करून घेऊन साहेबांनी मतदान करून साहेब थेट कराडला आले. पैसा, मोठ्ठेपणा,डामडौल यांच्या मोहापासून कित्येक मैल दूर राहिलेल्या साहेबांनी आमदार पेन्शन कधीच घरच्या कामाला वापरली नाही. पेन्शन जमा झाली की सहाय्यका करवी ते पैसे गरजू, अपंग यांना पोहचवले जात होते. आमदार कोट्यातून  मुंबईत मोक्याच्या ठिकाणी त्याना शासनाने फ्लॅट दिला होता. 2007 साली हा फ्लॅट विकून काही रक्कम लाडक्या नातवाना दिली आणि उर्वरित मोठी रक्कम गरीब गरजू लोक, होतकरू संस्थाना वाटून टाकली. ही रक्कम पोहचल्यावर काही लोक त्यांच्याकडे  आभार मानायला आले. तुमच्यामुळे आम्हाला मदत झाली, आम्ही तुमचे  उपकार कधी विसरणार नाही, अशी कृतज्ञता लोकांनी साहेबाप्रती व्यक्त केली. यावेळी "मी तुम्हाला जे काही दिले आहे, ते मी विसरून गेलो आहे, तुम्ही पण विसरून जा' असे नम्रपणे सांगत साहेबांनी दान कसे करावे हे दाखवून दिले. उजव्या हाताने केलेले दान डाव्या हाताला पण कळले नाही पाहिजे, असे सारेच जण बोलतात. पण साहेबांनी हा विचार कृतीत उतरविला.


सर्व धर्म विचारसरणी साहेबांनी अंगीकारली, जगली. हिंदू धर्मात सांगीतल्याप्रमाणे फळाची अपेक्षा न करता कर्म करत राहीले. बौद्ध धर्माच्या संयम या शिकवणीमुळे ते अनेक संकटात तग धरून राहिले. इस्लामचा भाईचारा आयुष्य भर जपल्याने सर्वाचे झाले. आपले कार्य संपल्यावर पृथ्वीतलावर राहतात ते सामान्य लोक. जैन धर्मियाचा "क्षमा'मंत्र आयुष्यभर जपताना जैन मुनीप्रमाणे प्रायोपोवेशन करून देह ठेवला आणि दैवत्वाकडे पोहचले.

 दिव्य विभुती पी. डी. साहेबांना अभिवादन! 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...