फॉलोअर

११ जुलै २०२२

पंढरीची वारी 10 जुलै

🚩 *माझी पंढरीची वारी* 🚩
   पंढरपूर,१० जुलै २०२२
 *_सतीश मोरे _* 

याचसाठी केला होता अट्टाहास,
शेवटचा दीनु गोड व्हावा !

आज आषाढी एकादशी. पांडुरंगाला भेटण्यासाठी राज्यभरातून सुमारे दहा लाख भाविक आणि वारकरी पंढरपुरात दाखल झाले होते. पांडुरंगाच्या कृपेने आमची वारी सफल झाली. काल रात्री पांडुरंगाचे दर्शन झाले होते. 'याचसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिनू गोड व्हावा' अशी मनाची स्थिती झाली होती. पावसाने थोडीशी आमच्यावर कृपा केली, त्यामुळे गर्दी थोडीफार कमी होती, त्याचा फायदा आम्हाला झाला आणि विठ्ठलाचे दर्शन लवकर झाले. पंढरीची वारी मी या अगोदर सहा वेळा केली आहे. यापैकी यापूर्वी मला फक्त एकदा पांडुरंगाचे दर्शन झाले आहे. यावेळी सातव्या वारीच्या दरम्यान पांडुरंगाच्या कृपेने पांडुरंगाचे दर्शन झाले, हे मी माझे भाग्य समजतो.


आज आषाढी एकादशी, वारकऱ्याला एकादशी उपवास करावीच लागतो. जो एकादशी करतो, जो रोज हरिपाठ करतो, जो आषाढी, कार्तिकी माघु आणि चैत्री या चारी वाऱ्या करतो त्याला खरा वारकरी म्हणतात. आम्हाला फक्त एकच वारी करता येते. मात्र हेही नसे थोडके. आषाढी एकादशी असल्यामुळे आज पंढरीत जिकडे तिकडे माऊलीमय वातावरण होते. विठ्ठल रुक्मिणी भक्तनिवास मधून तयार होऊन बाहेर पडलो, चेकआउट केले आणि थेट आम्ही आमच्या मारुती बुवा कराडकर मठामध्ये गेलो. या मठापर्यंत जाईपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला वारकऱ्यांचा महापूर वाहत होता. आमच्याकडे चार चाकी वाहनाचा पास असल्यामुळे आम्हाला जाणे शक्य झाले अन्यथा वाहनांना परवानगीच नव्हती. सुदैवाने आज सकाळी पावसाने पूर्ण उघडीप दिली होती. वातावरण पावसाळी होते मात्र पाऊस पूर्ण थांबला होता. मारुती बुवा मठात गेल्यानंतर अनेक वारकरी भेटले, सर्वांना वारकरी नमस्कार केला. आम्ही तिथे पोहोचेपर्यंत नगरप्रदक्षिणासाठी आमची बारा नंबर दिंडी पुढे गेलेली होती, त्यामुळे आम्ही तात्काळ या दिंडीच्या पाठोपाठ जायचा निर्णय घेतला. एकादशी दिवशी नगरप्रलचना झाल्याशिवाय पंढरीची वारी पूर्ण होत नाही. मारुती बुवा कराडकर मठ झेंडे गल्लीत आहे इथून पुढे चौकात पंढरपूर को-ऑपरेटिव्ह बँकेचे मुख्यालय आहे. तेथून आम्ही नगरप्रदक्षिणा सुरुवात केली. पंढरीच्या वारीला येणारा वारकरी एकादशी दिवशी संपूर्ण पंढरी नगरीला प्रदर्शना घालतो, चंद्रभागेला जाऊन नमस्कार करतो, तत्पूर्वी चंद्रभागेत स्नान करतो. 

आम्ही प्रदक्षिणा सुरू केली, एक एक रस्ता, चौक, गल्ली करत पुढे जात राहिलो. पुढे आल्यानंतर चंद्रभागा काठावर आलो. चंद्रभागा काठावर वारकऱ्यांचा आणि वैष्णवांचा मेळावा भरलेला होता. जिकडे पाहील तिकडे फक्त वारकरी दिसत होते. पावसाने उघडीप दिल्यामुळे अनेक वारकऱ्यांनी चंद्रभागा नदीमध्ये जाऊन स्नान करणे पसंत केले. चंद्रभागा नदीवरील पुलापासून विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोरील घाटापर्यंत सगळीकडे फक्त वारकरीच दिसत होते. चंद्रभागा नदीमध्ये अनेक बोटी मधून वारकरी पलीकडच्या बाजूला जात होते. इस्कॉनने चंद्रभागाच्या पलीकडच्या बाजूला मोठा घाट आणि मठ बांधलेला आहे. हा घाट अतिशय सुंदर दिसत होता. आम्ही चंद्रभागेमध्ये जाऊन पाणी डोक्यावर घेऊन नदीला नमस्कार केला. यावर्षी चंद्रभागा नदीचे पाणी अतिशय स्वच्छ होते, याचे कारण दोन दिवसापासून पडणारा पाऊस. चंद्रभागाला नमस्कार करून पुन्हा आम्ही नगरप्रदक्षिणा सुरू केली. अनेक दिंड्या या ठिकाणी आम्हाला भेटल्या. पंढरीच्या वारीला आलेल्या सर्व सोहळ्यातील दिंड्या नगरप्रदक्षणा घालतात. छोट्या-मोठ्या अनेक दिंड्या मला या ठिकाणी भेटल्या. या दिंड्यातील वारकरी चंद्रभागा काठी भजन करत होते. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद भरून वाहत होता. सर्वांची वारी पूर्ण झाली होती. आज एकादशी होती यापैकी काहीजणांचं पांडुरंगाचे दर्शन झाले होते तर काहीजणांनी फक्त कळसाचे दर्शन घेतले होते. तरीही या सर्वांच्या चेहऱ्यावर उत्साह दिसत होता. सर्वांचं स्वप्न साकार झाले होते.

या दरम्यान संत ज्ञानेश्वर माऊली पालखी या ठिकाणी दाखल झाली. नगर प्रदक्षिणा घालण्यासाठी माऊलींची पालखी प्रमुख दिंड्यासोबत या ठिकाणी आली होती. या पालखी समोरील दोन्ही अश्वाना नमस्कार केला, फोटो काढले. आमचे खरंच नशीब चांगले होते.  मी माऊली सोबत चाललो, माऊलींचे दर्शन आम्हाला पुन्हा एकदा चंद्रभागा काठी झाले होते. माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेऊन आम्ही पुन्हा पुढे चालायला लागलो. चंद्रभागा  घाट आला, नदी काठावरील जुन्या धर्मशाळा, मठ, होळकर, शिंदे , छत्रपतींच्या काळातील बांधकामे पंढरपूरचे महात्म्य साक्ष देत होती.  

चंद्रभागा घाटातून आम्ही वरती आलो. या ठिकाणी दर्शनाची भली मोठी लाईन होती.पांडुरंगाच्या दर्शनासाठी 14 ते 18 तास लाईन होती तर मुखदर्शनासाठी सहा ते सात तास लाईन होती. या लाईन मधील सर्व वारकऱ्यांना पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ लागली होती. पांडुरंगाचे दर्शन घेतल्यानंतर काय आनंद होतो याची अनुभूती आम्ही कालच घेतलेली होती. 14 ते 18 तास लाईन मध्ये उभं राहण्याची ताकद या वारकऱ्यांना पांडुरंग देतो. एवढा वेळ लाईन मध्ये उभा राहून शेवटी पांडुरंगाचे दर्शन झाल्यानंतर सारा कंटाळा निघून जातो. या लाईन मध्ये कोणी घुसू नये म्हणून या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला होता. तिथून पुढे आम्ही गोपाळपूर येथे आलो. रस्त्यावर सर्व बाजूला भाविक उभे होते तर अनेक दिंड्या संपूर्ण रस्त्यावरून पांडुरंगा माऊलीच्या नावाचा जयघोष करत होत्या.आम्ही प्रत्येक दिंडीचे दर्शन घेऊन शेवटी चौकातील श्रीकृष्ण मंदिरात आलो. येथून विठ्ठल मंदिराला नमस्कार केला, पुन्हा एकदा शिखराचे दर्शन घेतले. पुढे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोरील चौकात येऊन शेवट झेंडे चौकात नगरप्रदक्षिणा मी सांगता केली. 

त्यानंतर मारुतीबुवा कराडकर मठाकडे जाताना संपतराव चव्हाण कुंभारगावकर वकील यांच्या निवासस्थानी थांबलो. त्यांच्या घराचे नाव त्यांच्या वारकरी संप्रदायात मानाने घेतले जाते. पूर्वसंचित असे नाव असणाऱ्या वकीलांच्या घरामध्ये अनेक वारकरी उतरले होते. एडवोकेट संपतराव चव्हाण यांच्याकडून अतिशय महत्त्वाची माहिती घेतली, याबाबत मी लवकरच वेगळे लिखाण करणार आहे. त्यांच्या घरी फराळ करून पुन्हा आम्ही मारुती बुवा कराडकर मठामध्ये गेलो. या ठिकाणी सर्व वारकऱ्यांची भेट घेतली, सर्वाना नमस्कार केला. मठातील विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले. अनेक वारकऱ्यांना पुढच्या वर्षी भेटू असे सांगून निरोप घेतला. त्यानंतर आम्ही आमचा परतीचा प्रवास सुरू करण्याचा निर्णय घेतला. बारा वाजता आम्ही आमच्या गाडीमध्ये बसून कराड कडे निघालो. येताना म्हसवड गोंदवले या तीर्थक्षेत्राला भेट झाली.सहा वाजता कराडला पोहचलो.

कराडकडे येताना पंढरीची वारी पूर्ण झाल्याचा आनंद तर होताच मात्र आमच्या सारे लक्ष, ध्यान पंढरपुरात होतं. गेल्या तीन दोन दिवसात पंढरपुरातील गर्दी, पाऊस, या पावसामध्ये चिंब होऊन नाचलेले वारकरी, माऊली पालखी सोहळा, मंदीरासमोरील गर्दी, विद्युत रोषणाई डोळ्यासमोर येत होती. गेल्या 21 दिवसात पंढरीची वारी करताना भेटलेले अनेक माऊली, छोट्या मोठ्या मदतीला धावून आलेले अनेक लोक, ऊन वारा पावसात चालणारे वारकरी, वारकऱ्यांच्या पडलेल्या पंगती, दिवेघाटात झालेला पाऊस, सासवड मध्ये झालेला पाहुणचार, वाल्याच्या डोंगरावरून पाहिलेला वारकऱ्यांचा मेळावा या गोष्टी डोळ्यासमोरून जात होत्या. आमचे नशीब चांगले म्हणून आम्ही पंढरी वारीत सहभागी होत आहे. पंढरीची वारी नशिबवान लोकांच्या नशीबातच असते, असे म्हणतात. पंढरीची वारी पुन्हा पुन्हा करण्याचे भाग्य आम्हाला मिळो, अशी माऊली चरणी प्रार्थना!

धन्य झालो हो संसारी । आम्ही देखीली पंढरी ।                                     चंद्रभागे करुनी स्नान । घेतले पुंडलीकाचे दर्शन ।                                          केली क्षेत्र प्रदक्षिणा। भेटलो संत ,सज्जना ।                                      उभे राहुनि गरूडपारी । डोळे भरुनी पाहीला पांडुरंग । 



राम कृष्ण हरी..

 *_सतीश मोरे सतीताभ_*
  ९८८११९१३०२

३१ मे २०२२

पण तु येत नाहीस


तुझी खुप आठवण येते, 
तुझं हास्य डोळ्यासमोर तरळते,
तुझे आवाज कानात घुमत राहतात,
.
.
.
पण, तू येत नाहीस  !


तुझी छबी समोर दिसते,
तुझे सतत भास होत राहतात,
तुझ्या गोड आठवणीत मी हरवून जातो,
.
.
.
पण तु येत नाहीस !

तु मला बोलवतेस,
तुझे पावलांचे आवाजही ऐकू येतात,
तुझ्या आवाजाच्या दिशेने मी धावतो,
.
.
.
पण तु येत नाहीस !


30/05/2022

२० मे २०२२

तु, मी आणि पाऊस


तु, मी आणि पाऊस 

१.
पाऊस तुझ्यासारखा असतो,
खोडकर, अवखळ आणि नखरेल!


२.
पाऊस सरकन येतो अन् जातो,
अगदी तुझ्या सारखाच !
तु येतेस क्षणभर
बेभान करतेस मनभर !

तु करतेस मला बेभान
तु नसताना पाऊस करतो मला बैचेन !

४.
तु जवळ असलीस
की पाऊस आनंददायी असतो!
मनातील अनेक वादळे
तो शांत करत असतो !

५.
चिंब पावसात भिजून
सखी मला बिलगली!
श्वासाचा वेग मंदावला,
पण हृदयाची धडधड वाढली !

@सतिताभ
२०.०५.२०२२

माझा विद्यार्थी सिनेमा दिग्दर्शक झाला


गणेश शंकर चव्हाण... कामगार ते दिग्दर्शक
माझा विद्यार्थी सिनेमा दिग्दर्शक झाला 

शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील नातं खुप जिव्हाळ्याचं असतं हे आपल्याला माहीत आहेच.आपल्याकडे शिकलेला एखादा विद्यार्थी गरीब असो वा श्रीमंत असो तो भेटल्यानंतर किंवा तो मोठा झाला आहे हे पाहून जो आनंद होतो, तो आनंद केवळ शिक्षकच जाणतो.1990 ते 2001 या दहा अकरा वर्षाच्या कालावधीत मी यादव मोरे क्लासेसच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्राशी जोडलेला होतो. 

करवडी,ओगलेवाडी,बनवडी, विद्यानगर या ठिकाणी आमचे क्लासेस होते. ओगलेवाडी परिसरातील बाबरमाची, राजमाची, वनवासमाची,हजारमाची,करवडी, टेंभू, गोवारे, सुर्ली,कामथी तसेच शामगाव, वडोली निळेश्वर, पार्ले, बनवडी या गावातील अनेक विद्यार्थ्यांसाठी आमचा क्लास यशाची खात्री देणारा होता. आमच्या क्लासेसमध्ये प्रवेश घेतला म्हणजे शंभर टक्के पास होण्याची खात्री अशी आमची एक प्रतिमा झालेली होती. ज्या मुलांना इंग्लिश विषयामध्ये कधीच पास होता आले नाही, कधीही इंग्रजीमध्ये दहावीस पेक्षा जास्त मार्क पडले नाहीत, त्या मुलाला दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत 35 ते 40 मार्क मिळवून देण्याची हमी  मोरे सरांनी म्हणजे मी दिली होती. तीच परिस्थिती होती गणित विषयाची. 52 मार्क पडण्यासाठी लागणारी प्रमेय, सूत्रे याचा मेळ कसा लावायचा आणि पास कसे व्हायचे याचा एक शिस्तबद्ध फाॅर्मुला इथं यादव सर शिकवायचे. फक्त पास होणेच नव्हे तर इंग्लिशमध्ये 80 तर गणितात पैकीच्या पैकी 150 मार्कस मिळवणारे विद्यार्थी सुद्धा आमच्या यादव मोरे क्लासेसने घडवले आहेत.दहावीच्या गुणवत्ता यादीमध्ये आमच्या क्लासचे दोन विद्यार्थी झळकले होते. आज यादव मोरे क्लासेस माध्यमातून आम्ही घडवलेल्या एका विद्यार्थ्याविषयी मला बोलायचे आहे. हा विद्यार्थी खरंच असाधारण,असामान्य अवलिया आहे. ज्याचं नाव आहे गणेश शंकर चव्हाण !

आमच्या करवडी गावच्या शेजारीच आमच्या गावच्या हद्दीत  पाटबंधारे विभागाची आरफळ वसाहत 1980 च्या दरम्यान उभी राहिली. त्याचं आरफळ वसाहत आणि पुढे करवडी कॉलनी असं नामकरण झाले. काॅलनीमध्ये त्या काळात फार मोठ्या प्रमाणात शासकीय कार्यालये अधिकाऱ्यांची रेलचेल होती. आरफळ आणि धोम या कालव्याची कामे सुरू असल्यामुळे याठिकाणी कामाचा मोठा व्याप होता. करवडी कॉलनीमध्ये शासकीय अधिकाऱ्यांसाठी  निवासस्थाने होती. मध्यभागी दत्त मंदिर, दुकानगाळे, सांस्कृतिक हाॅल,भव्य क्रिडांगण होते. शनिवार रविवारी याच मैदानावर आम्ही क्रिकेट खेळायला जात असू. याठिकाणी आमचे सद्गुरू किराणा दुकान होते. या कॉलनी मुळेच आमच्या करवडी गावचे अर्थकारण उभारी लागले होते.

करवडी कॉलनीमध्ये माझे अनेक मित्र आहेत, होते. किराणा दुकान माध्यमातून आमच्या कुटुंबाचे कॉलनीमधील अनेक कुटुंबाशी जवळचे नाते होते, घरी येणं जाणं होतं. कॉलनीच्या पूर्व बाजूला शंकर चव्हाण हे वाई तालुक्यातील एक गृहस्थ तिथे राहत होते तर त्यांच्या शेजारी मदनेकाका हे दुसरे वाई तालुक्यातील नोकरदार राहत होते. शंकरराव चव्हाण यांच्या यांना संतोष आणि गणेश ही दोन मुले. ही दोन्ही मुले क्लाससाठी सुरुवातीला करवडी गावात तर त्यानंतर ओगलेवाडी येथे माझ्याकडे येत होती. सायकलवरुन डबल सीट येणारी ही दोन्ही मुले मला आजही आठवतात.अवखळ,खोडकर मात्र तितकीच आज्ञाधारक. इतर विद्यार्थ्यांप्रमाणेच आमच्या यादव क्लासेस मध्ये शिक्षण घेऊन दोघेही 1996 साली दहावी पास झाले. पुढील दोन वर्षानंतर आयटीआय कोर्स करून २००० च्या दरम्यान गणेश चव्हाण ऑस्ट्रेलिया येथे नोकरीनिमित्त गेला.

दरम्यानच्या काळात करवडी कॉलनीमधील शासकीय काम संपत आल्यानंतर या कॉलनीतील अनेक कुटुंबे कॉलनी सोडून त्यांच्या मूळ गावी किंवा कराड विद्यानगर मलकापूर अशा ठिकाणी स्थलांतरित झाली. हळूहळू कॉलनी ओस पडू लागली. आज तर हि कॉलनी पूर्णपणे भकास आहे.या कॉलनीची आणखी एक आठवण मला सांगायची तर या कॉलनीत प्रत्येक वर्षी साजरा होणारा भव्य गणपती उत्सव. ठेकेदाराकडून मोठ्या प्रमाणात निधी गोळा करून त्या काळात हा गणपती उत्सव साजरा केला जायचा. उत्सवात खूप मोठ्या प्रमाणात खर्च केला जात असे. सलग चार पाच दिवस मोठ्या पडद्यावर हिंदी मराठी चित्रपट दाखवले जात, नाटकेही होत. चित्रपट, ऑर्केस्ट्रा पाहण्यासाठी करवडी परिसरातील अनेक स्त्रिया आणि पुरुष दीड दोन किलोमीटर पायपिट करून जात. याठिकाणी पाहिलेले तीसरी मंजिल, मोहरा आणि दोस्ताना हे तीन चित्रपट तरी मला चांगलेच आठवतात. याशिवाय सुशीला, अष्टविनायक हे मराठी चित्रपट सुद्धा मी या ठिकाणी पाहिलेले आहेत. कॉलनी ओस पडल्यानंतर कॉलनीमधील माझे मित्र आणि नोकरदारांचे संबंध तुटले. मात्र रवि सुतार, महेश सटवे तसेच गणेश, विजय सुतार सारखे काही विद्यार्थी संपर्कात होते.रवींद्र सुतार, महेश सटवे यांच्यासारखे निवडक मित्रच आजही संपर्कात आहेत. 

गणेश शंकरराव चव्हाण या विषयाकडे मी पुन्हा येतो. ऑस्ट्रेलियामधील नोकरी करून चार-पाच वर्षांपूर्वी गणेश पुण्याला आला. पुढे वाईला आला आणि याच काळात त्याच्या डोक्यात चित्रपट काढण्याचे खूळ आले. चित्रपट सृष्टीचा कसलाही अनुभव नाही, चित्रपट शूटिंग कसं होतं माहीत नाही, कॅमेरा कसा धरतात माहीत नाही, कोणत्याही नाटकात काम केले नाही, चित्रपटाचं समीक्षण केले नाही, चित्रपटगृहांमध्ये जाऊन फार चित्रपट पाहिलेले नाहीत, लेखक काय असतो? दिग्दर्शक काय असतो? निर्माता काय असतो ?याचं कसलंच ज्ञान नाही. पटकथा, छाया, मेकअप याची कसलीही माहिती नाही. टीव्हीवर किंवा कधीतरी थेटर मध्ये जाऊन पाहिलेला सिनेमा एवढंच काय या गणेशला चित्रपटाविषयी असलेलं ज्ञान. मात्र तरीही त्याने चित्रपट निर्मिती करायची ठरवली. 

नागराज पोपटराव मंजुळे हा आदर्श डोळ्यासमोर ठेवून गणेशने चित्रपट निर्मिती करण्याचा निश्चय केला. गणेशचं करवडी कॉलनीवर इतकं प्रेम आहे की त्याने निर्मिती संस्थेला 'काॅलनी फिल्मस' असे नाव दिले. काॅलनीमधील दत्त मंदिरात जाऊन शुभारंभ केला. त्याच्या डोक्यात जी कथा होती, ती कथा हळू स्फुरत गेली. त्या कथेची पटकथा तयार झाली आणि "जिव्हारी" चित्रपट पुढे सरकू लागला. 

चित्रपट तयार करण्याची जिद्द गणेशने मनाशी खुणगाठ बांधली खरी पण चित्रपट काढणे म्हणजे लहान मुलांचा खेळ नसतो. त्यासाठी पैसा लागतो. हा पैसा आणायचा कोठून ? कुणाकडून कर्ज काढायचे? असे अनेक प्रश्न त्याच्या मनामध्ये आले. मग कुणाकडे पैसे मागण्याची मागण्याऐवजी आपणचं पैसे गोळा करू या असा विचार त्याच्या मनामध्ये आला. घरात असलेलं सर्व सोने-नाणे दागिने, घर-दार, पुण्यामध्ये विकत घेतलेला फ्लॅट, सर्व संपत्ती त्याने विकून टाकली. या माध्यमातून कसेबसे एक कोटी रुपये गोळा झाले आणि जिव्हारीच्या शूटिंगला सुरुवात झाली. 

गेल्या दोन-तीन वर्षांत फेसबुकच्या माध्यमातून त्याचा माझा संपर्क वाढला आहे.फेसबुक वरील त्याचे कोव्हिड कालावधीतील त्याचे लिखाण पाहून गणेश आता प्रगल्भ झाला आहे हे जाणवले. याच काळात त्यांने चित्रपट निर्मिती विषयी सांगितले होते. त्यावेळी मला त्याचं खूप आश्चर्य आणि अप्रुप वाटलं होतं. गणेश चव्हाण आणि थेट पिक्चर काढणार! पण माझा एक विद्यार्थी थेट चित्रपट क्षेत्रात उतरतो, निर्माता लेखक दिग्दर्शक होतो, ही गोष्ट माझ्यासाठी अभिमानाची होती. गणेशचा चित्रपट सृष्टीतला प्रवास आत्ता सुरू झाला. खरं तर चित्रपट सृष्टीमध्ये पैशांची गुंतवणूक करणे हे फार अवघड काम आहे. कसल्याही प्रकारे यशाची खात्री नसते. आजच्या काळात वेगवेगळे अधिकार, गाणी तसे चित्रपटाचे अधिकार वाहिन्यांना विकून पैसे गोळा होतात खरे. मात्र घरदार विकून चित्रपट काढण्याचं धाडस करणारा गणेश शंकर चव्हाण यांच्या सारखा वेडा एखादाच असतो. 

मला आणखी एका कारणासाठी गणेशचा अभिमान वाटतो. लहानपणी आपणास कोणी नाव विचारल्यानंतर आपण पूर्ण नाव सांगत असतो. अजूनही गणेशला नाव विचारलं तर तो आपले पूर्ण नाव सांगतो. फेसबुक अकाउंटवर गणेश शंकरराव चव्हाण अशी नोंद आहे. मलाही वडलांचं नाव सांगायला खूप आवडते. पितृप्रेमी गणेशच्या कामाचे कौतुक करावे तेवढे थोडे थोडे आहे. चित्रपटाचे शुटींग दरम्यान त्याने अनेकदा आपल्या वडिलांना सेटवर नेले होते.

मध्यंतरी क्रांती नावाचा एक मल्टीस्टार हिंदी चित्रपट आला होता. या चित्रपटाच्या निर्मितीच्या वेळी निर्माता मनोज कुमार यांनी संपूर्ण घरदार बँकेला तारण ठेवले होते, असे मी ऐकले होते. गणेश चव्हाण यांनी बँकेला संपत्ती प्रॉपर्टी गहाण ठेवण्याऐवजी ती विकून पैसे गोळा केले आहेत. चित्रपट निर्माण करताना येणाऱ्या सगळ्या अडचणींवर मात करून गणेशने हा चित्रपट तयार केला आहे. हा चित्रपट सातारा व कराड येथे  20 मेला रिलीज होणार आहे. 

सातारा कराड येथील मुलं चित्रपट तयार करतात, दिग्दर्शक बनतात हा खरंच आपल्यासाठी आनंदाचा क्षण आहे. माझी सुद्धा खूप वर्षापासून दिग्दर्शन करण्याची इच्छा आहे. पण मला आयुष्यात कधीही ती संधी मिळाली नाही किंवा मी त्यावर जास्त विचारही केला नाही. मनातली ती एक अतृप्त इच्छा अनेक वेळा माझ्या मित्रांना बोलून दाखवली होती. मला हे शक्य झालं नाही, मात्र माझ्या विद्यार्थ्याने गणेशने हे शिवधनुष्य पेलले आहे. गणेश दिग्दर्शक झाला आहे. आज सोनियाचा दिनू आहे. गणेशला खुप खुप शुभेच्छा.

...सतीश वसंतराव मोरे
 २० मे २०२२

२८ एप्रिल २०२२

अगोदर मला सावरं मग तुझं आवरं



एकदा ती म्हणाली,
ऐ वेड्या,
बस की आता, 
आवरू दे मला !

मग मी सहज बोललो 
अगोदर मला सावरं, 
मग तुझं आवरं !

न्हाहून प्रेमरसात नीव,
तुझ्यात गुंतलाय जीव 
बेफाम भावनेचा गुंत्ता , 
तो अगोदर सोडवं , 
मग तुझं आवरं !

न झालेल्या भेटीची उत्कंठा , 
साक्षात भेटीपेक्षा झालीय उत्कंठ,
प्रेमरसात डुबलेल्या 
माझ्या मनाला अगोदर सावरं, 
मग तुझं आवरं !

वार्‍याहून वेगवान विजेहून जलद, 
तुझ्यापर्यंत पोहचणाऱ्या 
माझ्या प्रेमलहरीला 
अगोदर सावरं, 
मग तुझं आवरं !

कवेत तुझ्या विरघळून जाण्याची , 
ओढ अजुनच वाढलीय मिलनाची, 
ओढीने त्या व्याकुळ 
या जीवाला अगोदर सावरं,
मग तुझं आवरं !

भावनिक गुंफण अन् कोमलता  
नात्यात बहरली आहे आता मणभर, 
हळव्या मनाला 
तु अगोदर सावरं, 
मग तुझं आवरं !

तुझे भास होताना, 
घड्याळाचे काटेही थांबतात क्षणभर , 
मग मात्र मीही होतो स्वैरभर,
अगं वेडे 
म्हणून तर म्हणतो 
अगोदर मला सावरं, 
मग तुझं आवरं !

 *सतिताभ
२७.०४.२०२२

२२ मार्च २०२२

कवितेचा जन्म

कवितेचा जन्म
आठवणीतून होतो !
कवितेचा जन्म
जाणिवेतून होतो !
कवितेचा जन्म
प्रेमरसातून होतो !
कवितेचा जन्म
प्रेमभंगातून होतो !
कवितेचा जन्म
त्यागातून होतो !
कवितेचा जन्म
त्राग्यातून होतो !
कवितेचा जन्म
विरहातून होतो !
कवितेचा जन्म
मैत्रीतून होतो !
कवितेचा जन्म
नातेबंधातून होतो !
कवितेचा जन्म
विश्वासातून होतो !
कवितेचा जन्म
गद्दारीतून होतो !
कवितेचा जन्म
आनंदातून होतो !
कवितेचा जन्म
दुःखातून होतो !
कवितेचा जन्म
सौंदर्यांतून होतो !
कवितेचा जन्म
प्रतिभेतून होतो !
कवितेचा जन्म
प्रतिक्षेतून होतो !
कवितेचा जन्म
कवितेतून होतो !

१९ डिसेंबर २०२१

एकाला जायची घाई झाली होती...


एकाला जायची घाई झाली होती, एकाला यायची !
@ मराठी बाणा शामगाव घाट

'पुढारी' वर्धापन दिनानिमित्त कराड पाटण तालुक्यातील गावागावांत,मान्यवरांच्या संस्थेत दौरे सुरू आहेत.काल शनिवारी सायंकाळी शामगावच्या घाटात नव्याने सुरू झालेल्या हाँटेल 'मराठी बाणा'मध्ये जाण्याचा योग आला. मुंबई महापालिकामध्ये सहायक अभियंता म्हणून काम पाहणारे अंतवडी गावचे सुपुत्र कृष्णा शिंदे आणि सौ.सुजाता शिंदे यांनी हे हाँटेल सुरू केले आहे. अजून बरंच काम बाकी आहे.सध्या फक्त चहा-नाश्ता तसेच शाकाहारी आणि मांसाहारी जेवण विभाग सुरू केला आहे.निसर्गरम्य ठिकाणी सुरू झालेल्या या हाँटेलला एकदा भेट द्यायला हवी. सुमारे साडे चार एकर क्षेत्रावर विकसित होत असलेल्या 'मराठी बाणा' मध्ये भविष्यात कृषी पर्यटन, रेसार्ट,जलतरण, वाॅटर बोटींग आणि बरंच काही करण्याचा शिंदे सरांचा मानस आहे.


मी,दिलीप माने सरांच्या सोबत सायंकाळी सहाच्या सुमारास 'मराठी बाणा' येथे पोहचलो. अतिशय दुर्मिळ, अविस्मरणीय आणि सुंदर असं दृश्य आणि निसर्गाचा आविष्कार आज एकाच वेळी मला याठिकाणी अनुभवायला आला,पाहता आला. 

एकीकडे पश्चिमेला 'सुर्यनारायण' मावळतीला निघाले होते तर दुसरीकडे 'चंद्रदेव' शामगावच्या डोंगरातून डोकावत होते. एकाला जायची घाई होती, एकाला यायची! दोघेही निसर्गाचे अखंड,अढळ, अटल,अनिवार्य,अविभाज्य,अनुपम,अतुट,अविरत कार्यरत घटक. योग्य वेळीच यायचे,योग्य वेळीच जायचं. कधीही वेळ चुकवायची नाही. आपलं काम चोख बजवायचे ! जाताना सर्वांना प्रकाशित करत जायचं,देत रहायचं. देत असताना परत काही मिळेल याचा हिशोब नाही ठेवायचा. एक प्रखर दुसरा शितल. दोघांशिवाय जग चालूच शकत नाही. जीवनात काही वेळी आक्रमकता हवी तर कधी संयम हवा, हेच तर हे दोघं सांगत आहेत. 

निसर्ग आपल्याला खुप काही शिकवून जातो. निसर्गाचा हा आविष्कार पाहताना आज मी पुन्हा एकदा 'चंद्रमा'च्या प्रेमात पडलो होतो, 'दिनकरां'च्या रंग उधळणीवर भाळलो होतो.

@सतीताभ
१९.१२.२०




Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...