फॉलोअर

१८ जुलै २०२१

होतं वडगाव हवेलीचा चौरंगीनाथ डोंगर पायथा

 निसर्गवारी*

_*संकल्प २२१ वृक्ष लागवडीचा*_ !
१८ जुलै २०२१
आज प्रत्यक्ष पंढरीची वारी असती तर आम्ही भंडीशेगाव येथे पोहोचलो असतो.पंढरीत पोहचण्याचा शेवटचा टप्पा आहे, वाखरी. वाखरीच्या अगोदर भंडीशेगाव लागते. याच मुक्कामात प्रत्येक वर्षी वैकुंठवासी भगवान मामा कराडकर यांची पुण्यतिथी साजरी केली जाते आणि यानंतर गुलाबजाम चा प्रसाद वाटला जातो. आज आमच्यासाठी भंडीशेगाव होतं वडगाव हवेलीचा चौरंगीनाथ डोंगर पायथा. चौरंगीनाथ हे देवस्थान पलूस तालुक्यात येतं मात्र त्याचा पायथा भाग वडगाव हवेली गावात येतो.
या गावात जाण्यासाठी सकाळी साडेसहा वाजता आम्ही वडगाव हवेली फाट्यावर म्हणजेच राष्ट्रीय महामार्गावर महात्मा गांधी हायस्कूल समोर आलो. या विद्यालयांमध्ये आमच्या सर्व गाड्या उभ्या केल्या. आज आमच्या निसर्ग वारीमध्ये नवीन सहा सदस्य सहभागी झाले होते. त्यांच्यासमवेत महामार्गावरून वडगाव हवेली गावात कडे चालायला सुरुवात केली.वडगाव हवेली फाटा ते वडगाव या दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजुला ग्रामपंचायतीने अतिशय सुंदर पद्धतीने वृक्षारोपण केलं आहे. हे वृक्ष गावात प्रवेश करणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करतात. या गावाचा आदर्श सर्वांनी घ्यायला हवा.
आज आमची संख्या एकदम बारावर पोहोचल्यामुळे गावात कुणी अधिकारी आले आहेत, काय असा ग्रामस्थांचा समज होत होता. मात्र एक-दोन ग्रामस्थांना आमच्या निसर्ग वारीचा संकल्प सांगून आम्ही सिद्धेश्वर मंदिरात निघालो आहे असे सांगून पुढे निघालो. दहा मिनिटात गावात प्रवेश केला. वडगाव अतिशय सधन व उपक्रमशील शेतकऱ्यांचे मोठे गाव आहे. या गावाला राजकीय दृष्ट्या फार मोठे महत्त्व आहे. गावात अनेक सर्व पक्षाचे नेते मंडळी आहेत.आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांचे साडू माजी मंत्री दादासाहेब जगताप यांचे गाव म्हणून वडगाव ओळखले जाते. याच गावात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या बहिणी दिल्या आहेत. जगताप भावकी मोठ्या प्रमाणात असलेले हे गाव कृष्णा साखर कारखान्याच्या लिफ्ट योजनेमुळे सधन झाले आहे.
गावात प्रवेश केल्यानंतर आम्हाला अनेक जुने वाडे (हवेल्या) दिसले. ज्या गावात मोठ्या हवेली आहेत त्या गावाच्या नावासमवेत हवेली हे नाव जोडले जाते. आता वडगाव हे नाव कसे पडले याचा प्रश्न आपल्याला पडला असेल? या गावात मी अनेकदा गेलो आहे,आज केलेले निरीक्षण पाहता गावात अनेक ठिकाणी वड आणि पिंपळ यांची झाडे पहायला मिळाली.फार मोठ्या प्रमाणात रस्त्याकडेला असणारे वड पाहून आम्ही चक्रावून गेलो. रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या पारंबी असणारे हे वड पाहताना आम्हाला त्यांचे आयुष्य किती आहे याचा अंदाज करायला भाग पाडत होते. मोठ्या प्रमाणात वड असणारे गाव म्हणून वडगाव आणि गावात मोठी हवेली आहे म्हणून हवेली असे या गावाचे नाव वडगाव हवेली पडले आहे,असे ग्रामस्थांनी आम्हाला सांगितले.
गावातील मुख्य चौकात आलो. चौकात असलेल्या यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या पुतळ्याला अभिवादन करून पुढे गावातून बाहेर पडलो. मघाशी उल्लेख केल्याप्रमाणे गावाबाहेरच्या सिद्धेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या या रस्त्याला दोन्ही बाजूला आम्हाला अनेक वडाची झाडे दिसली. पुढे रस्त्याकडेला एक जुने भक्कम मंदिर आहे,या मंदिराला दगड मारले जातात. हे दगड का मारले जातात याबाबतची माहिती आम्हाला ग्रामस्थांकडून मिळाली नाही. एक दोन लोक भेटले मात्र त्यांनी माहित नाही,पण जुनी परंपरा आहे एवढेच सांगितले. मात्र याच मंदिराच्या पुढे ते एक गणपती मंदिर आहे. हे गणपती मंदिर प्रत्येक वर्षी गव्हाच्या आकाराने पुढे डोंगराच्या दिशेने सरकते अशी या गावातील लोकांचा भावना आहे.
हे मंदिर आणि परिसरातून थोडे सिद्धेश्वर मंदिराकडे जात असताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला वड आणि पिंपळाची इतक्या मोठ्या प्रमाणात झाडे पाहिली.या झाडामुळे गावातील लोकांना मुबलक ऑक्सिजन मिळत असावा आणि त्यामुळेच वडगाव हवेली गावातील लोक तंदुरुस्त आहेत असे आम्हाला वाटले. निसर्ग वारीमध्ये आम्ही वड पिंपळ आंबा ही तीन झाडे लावण्याचा संकल्प केला आहे, तो किती योग्य होता याची आम्हाला अभिमान वाटला.
थोडे अंतर गेल्यानंतर आम्हाला उंचावर बिरोबाचे अतिशय सुंदर मंदिर दिसले मात्र या मंदिराला दुरूनच नमस्कार करून आम्ही पुढे चालत आलो. आता आम्ही सिद्धेश्वर मंदिराच्या जवळ पोहोचलो. या मंदिरा शेजारीच आम्हाला वृक्षारोपण करायचे होते मात्र अजून आमची पायी वारी पूर्ण झालेली नव्हती. मंदिराच्या शेजारीच असणार्या पाझर तलावाकडे आम्ही निघालो. अतिशय सुंदर आणि विस्तीर्ण हा पाझर तलाव आहे. या तलावाच्या पायथ्याशी सिद्धेश्वर मंदिर आहे तर तलावाच्या शेजारी वरती डोंगरावर चौरंगीनाथ मंदिर आहे. चौरंगीनाथ डोंगरावर जाण्यासाठी सिद्धेश्वर मंदिरापासून जवळचा रस्ता आहे. चौरंगीनाथाला जाण्यासाठी निघाले काही आमचे मित्र आम्हाला या ठिकाणी भेटले.
आम्ही तलावाच्या लगत आलो. तलावाच्या कडेकडेने आम्ही चालायला सुरुवात केली, पूर्ण तलावाला गोल वेढा मारून प्रदक्षिणा घालून परत आपण पुन्हा सिद्धेश्वर मंदिराजवळ यायचे आणि मग वृक्षारोपण करायचे असे आम्ही ठरवले. तलावाच्या कढेने जात असताना अतिशय सुंदर असा नजारा मला दिसत होता. सूर्याची सोनेरी किरणे या तलावाच्या पाण्यावर पाण्यावर पडलेले होती. मोरांचे आवाज ऐकू येत होते, तलावाच्या कडेला पाणी पिण्यासाठी काही पक्षी दिसत होते. काठाला असलेल्या पाऊलवाटेवरुन आम्ही आता डोंगराच्या पायथ्याला पोहचलो. चालत राहिलो. पुढे अशी वेळ आली आम्हाला पुढे जायला रस्ता दिसत नव्हता. मात्र त्यातूनही झाड वेलीतून, दाट झाडीतून, जंगलातून पुढे जाऊन रणजीत पाटील यांनी रस्ता काढला. आम्ही नऊ जण या जंगलाच्या कसाबसा रस्ता काढून पुढे येत होतो. हा रस्ता जनावरांचा होता, बिबट्याचा होता,मात्र आम्ही त्यातून मार्ग काढत एकमेकाला आधार देत निघालो होतो. राम कृष्ण हरीचा जप करत पुढे चाललो. या अर्धा तासात आम्ही आयुष्यातील सर्वात सुंदर असा प्रवास केला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
घनदाट झाडीतून पुढे जात असताना एकमेकाला आधार देत आम्ही पुढे निघालो होतो, मागे कोणी राहणार नाही याची खात्री करत होतो. आज खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा आम्ही निसर्गाच्या सोबतीत चाललो होतो. ही वाट आम्हाला खुप आनंद देत होती. एका ठिकाणी अशी परिस्थिती आली ओघळी पलीकडे जायला पाण्यातून जावे लागणार होते. तिथे काही दगड पडले होते. दगडावर पाय ठेवत पुढे जायचा सुरुवातीला एक जणांनी प्रयत्न केला मात्र पाय घसरल्यामुळे ते पाण्यात पडले, त्यानंतर पायातील शूज काढून पुढे जावे असे नानांनी सुचवले. तरीही मी दगडावर पाय ठेवून चालण्याचा प्रयत्न केला आणि व्हायचे तेच झाले पाय निसटून मीही पाण्यात पडलो. शूजमध्ये पाणी गेले गुडघ्यापर्यंत पॅन्ट ओली झाली. मात्र माऊलींच्या कृपेने कोणाला काही झाले नाही. पुढच्यास ठेच मागचा शहाणा या या उक्तीप्रमाणे नंतरच्या लोकांनी शूज हातात घेऊन अतिशय काळजीपूर्वक पाण्यातला रस्ता क्रॉस करून सारे पुढे आले.अतिशय आनंददायी हा प्रवास होता. पुढे मुख्य रस्त्यावर आलो, या रस्त्यावरून एक फाटा जिकडे वळतो तिथे त्या रस्त्याला अनेक दगडाच्या खाणी आहेत. तिकडे न जाता आम्ही पुन्हा मंदिराकडे वळालो.
थोडे चालत पुन्हा सिद्धेश्वर मंदिरा पर्यंत पोहोचलो. सिद्धेश्वर मंदिरातील मठाधिपती, ग्रामस्थ, पोलिस पाटील,युवक या ठिकाणी आमची वाट पाहत होते. या सर्वांच्या उपस्थितीत आम्ही त्या ठिकाणी दोन वडाची झाडे लावली. खरं तर या मंदिराच्या परिसरात अनेक वड आणि पिंपळाची झाडे आहेत. मात्र आम्हाला झाडे लावायला मिळालेली जागा अतिशय योग्य होती. सिद्धेश्वर मंदिराचा परिसर निसर्गरम्य आहे या ठिकाणी रविवारी फार मोठ्या प्रमाणात गर्दी असते.चौरंगीनाथला जाणारे अनेक भाविक पहिल्यांदा सिद्धेश्वराचे दर्शन घेतात आणि मग पुढे जातात. हा परिसर अतिशय चांगल्या पद्धतीने ग्रामस्थांनी विकसित केला आहे. मंदिराच्या पाठीमागे आम्ही जे झाड लावले ते मोठे झाल्यानंतर अनेक भाविकांना तिथे आराम करण्यासाठी जागा मिळणार आहे. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल,सिद्धनाथाच्या नावानं चांगभलं करून आम्ही मंदिरासमोर तयार केलेल्या एका पारावर आराम केला.
रणजीत पाटील यांच्या मित्रांनी, आजोळच्या नातेवाईकांनी आमच्यासाठी आज धपाटे,दही, उसळ,भात आणि कांदेपोहे चहा असा जंगी बेत आखला होता. आम्ही सर्वजण मंदिराशेजारील मठाधिपतींच्या खोलीमध्ये पंगत मांडली. दऱ्याखोऱ्यातून, पाण्यातून सुमारे 3 किलोमीटर चालल्यानंतर खूप भूक लागली होती ,त्यामुळे माऊलीने दिलेला प्रसाद आम्ही पोटभरून खाल्ला.
आज आमची निसर्गवारी पूर्ण निसर्गाच्या संगतीत झाली. माऊलींची कृपा आणि आमच्यासोबत विठ्ठलनाम असल्यामुळे आम्हाला कसलीही अडचण आली नाही. अतिशय सुंदर वातावरणात आम्ही दोन तास देहभान हरपून चाललो, हरिपाठ करत होतो,राम कृष्ण हरी चा जप करत होतो.असे सुख,असा आनंद या अगोदर क्वचितच मिळाला असेल.
राम कृष्ण हरी!
जय जय विठ्ठल!
जय हरी विठ्ठल !
*सतीश मोरे*
Ashok Mohane, Brijesh Arvind Rawal and 52 others
12 comments
2 shares
Like
Comment
Share

१७ जुलै २०२१

रेठरे बुद्रुक आणि रेठरे खुर्द

 *निसर्गवारी*

_*संकल्प २२१ वृक्ष लागवडीचा*_ !

१७ जुलै २०२१
राम कृष्ण हरी माऊली
आज पंढरीची वारी असती तर वेळापूरला येऊन पोहोचली असती. आज वेळापूर उद्या भंडीशेगाव परवा सोमवारी वाखरी आणि मंगळवारी पंढरपूर . मात्र प्रत्यक्षात यंदा वारी होणार नाही. मात्र आमची निसर्ग वारी आज पोहोचली आहे सहकार पंढरीमध्ये! सहकार पंढरी रेठरे बुद्रुक गावांमध्ये जाण्यासाठी सकाळी साडेसहा वाजता वाठार येथील पेट्रोल पंपावर वाहन उभे करून हरिपाठ म्हणत चालू लागलो. वाठार गाव पास करून आम्ही पुढे आल्यानंतर रस्त्याकडेला शेतामध्ये पाणी साचलेले पाहायला मिळाले. गेल्या दोन महिन्यात मुसळधार पाऊस झाला आहे त्या पावसामुळे महामार्गावरील अनेक शेतांमध्ये पाणी अजूनही साचलेले आहे. वाठार ते रेठरे दरम्यान अशाच प्रकारे शेतात असलेले पाणी पाहायला मिळाले.
रेठरे खुर्द येथे पोहचलो. रेठरे बुद्रुक आणि रेठरे खुर्द ही दोन गावे कृष्णाकाठची अतिशय सुंदर गावे आहेत. या गावात आल्यानंतर ओळखीचे काही ग्रामस्थ भेटले. आम्ही इतक्या लांब चालत आलेले आहेत हे ऐकून त्यांना अप्रुव वाटलं. त्यांना निसर्ग वारीची कल्पना सांगून राम कृष्ण हरी करत आम्ही पुढे निघालो.
रेठरे खुर्द गाव पार केल्यानंतर रस्त्याकडेला राधाकृष्ण मंदिर आहे तेथे आम्ही थांबलो. या मंदिरात अतिशय सुंदर देखणी अशी मूर्ती आहे. हे मंदिर एका मोठ्या झाडाखाली आहे. प्रथमदर्शनी हे झाड वडासारखे वाटले मात्र आज आमच्या सोबत सहभागी झालेले वाठार येथील माझे स्नेही प्रभाकर पाटील यांनी या झाडाबाबतची माहिती दिली. या झाडाला कळंब किंवा कदंबचे झाड म्हणतात. हा वृक्ष अनेक वर्षे जगतो, तो वडा सारखा उंच असतो. सातारा जिल्ह्यात फक्त एकमेव रेठरे खुर्द येथेच कळंब वृक्ष आहे. या वृक्षाच्या परिसरात राधाकृष्णाचं वास्तव्य असते.
भागवत पुराणात श्रीकृष्ण आणि कदंब यांचे अद्वैत ठायी ठायी निदर्शनास येते. 'बाळकृष्णा'च्या गोकुळातील सर्व लीलांचा कदंब साक्षीदार आहे. कालिया मर्दनाच्या वेळी याच झाडावरून 'देवकीनंदना'ने डोहात उडी घेतली, याच्याच फांद्यांमध्ये दडून गोपिकांची वस्त्र पळवली आणि याच झाडावर लपवून ठेवली. कर्णफुले म्हणून उपयोग करतानाच याची चेंडूसारखी कठीण फुले गोपाळांबरोबर खेळण्यासाठीही वापरली.
हे झाड धनंजय मारूती पाटील (तात्या) यांच्या शेतात आहे.या वृक्षाची माहीती समोर आल्यानंतर या वृक्षाखाली श्रीकृष्णाचे मंदिर बांधावे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. धनंजय पाटील यांच्या पत्नीने या ठिकाणी एक नवस बोलला,त्यानुसार त्यांचा मुलगा उच्च पदावर जाऊन पोहचला आणि त्यानंतर या अमेरिकास्थित मुलाने पाठवलेल्या द्रव्यातून हे मंदिर उभे केले. या कदंब वृक्षाला आणि राधा कृष्णाला नमस्कार करून आम्ही पुढे आलो.
डाव्या बाजूला भारती विद्यापीठाचे जाई मोहिते हायस्कूल होते. तिथून पुढे आल्यानंतर कृष्णा नदीला समांतर असणारा रस्ता, या रस्त्याच्या बाजूलाअसणारी विस्तीर्ण शेती आणि उजव्या बाजूला कृष्णा नदी पाहून मन प्रफुल्लित झाले. या ठिकाणी पुढे असणाऱ्या एका कट्ट्यावरती यशवंतराव मोहिते भाऊ हे आपल्या मित्रांसोबत गप्पा मारत असतं .राजकिय निवृत्तीनंतर भाऊ रोज संध्याकाळी या रस्त्यावर चालायला येत आणि या ठिकाणी बसत, या ठिकाणाला पुढे पेन्शनर चा कट्टा म्हणून नाव पडलं.
थोर विचारवंत यशवंतराव मोहिते भाऊ यांच्या आठवणी या निमित्ताने जाग्या झाल्या.रेठरे बुद्रुक या गावाचे नाव संपूर्ण राज्यभर आहे ते यशवंतराव मोहिते यांच्या विचारांमुळे. भाऊंसारखा ज्येष्ठ विचारवंत, समाजवादी व्यक्ती रेठरे बुद्रुक या गावात जन्माला आला,कराड तालुक्याला भाऊंचा सहवास लाभला आहे, हे आपल्या तालुक्याचे मोठे भाग्यच आहे. यशवंतराव मोहिते यांच्या विधानसभेतील अभ्यासू भाषणांचा विक्रम आजही अबाधित आहे. त्यांनी सामान्य जनतेसाठी राबवलेल्या योजनाची फळे आज आपण चाखत आहोत. सहकारातील उत्तुंग मनोरे यशवंतराव मोहिते आणि त्यांचे बंधू जयवंतराव भोसले यांचे गाव म्हणून रेठरे बुद्रुक या गावाला देशभर ओळख मिळाली आहे.
2002/3 च्या दरम्यान यशवंतराव मोहिते भाऊ यांची मुलाखत घेण्यासाठी प्रकाश देसाई यांच्यासमवेत मी रेठरे बुद्रुक येथील निवासस्थानी गेले होतो. भाऊंची मुलाखत आम्ही तीन भागात पुढारीमध्ये छापली होती. सुमारे तीन तास ही मुलाखत चालली होती. भाऊ बोलत होते आणि तेव्हा माझ्यासारख्या नवीन वार्ताहर हे सर्व ऐकत होता,भारावून गेला होता. भाऊंच्या मुलाखतीची टिपणे घेण्यासाठी आम्ही एक सोबत डायरी (पॅड) घेऊन गेलो होतो. त्या डायरीची सर्व पाने संपली तरी भाऊंची मुलाखत संपत नव्हती. भांऊचे विचार संपत नव्हते, भाऊ मनापासून, अंतःकरणापासून बोलत होते, एक वेगळा विचार मांडत होते आणि आम्ही तो टिपून घेत होतो. माझ्या आयुष्यातील भाऊंची मुलाखत ही एक सुंदर आठवण आहे.
माननीय जयवंतराव भोसले(आप्पा ) यांच्यासोबत माझ्या खूप आठवणी आहेत. आमचे बाबरमाची येथील काका दामू अण्णा पाटील यांच्या समवेत मी पहिल्यांदा जयवंतराव भोसले आप्पा यांना भेटायला त्यांच्या निवासस्थानी गेलो होतो. 98 साली माझ्या पत्नीला कृष्णा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये नोकरी मिळावी म्हणून मी आप्पांना भेटायला गेलो होतो. दामू आण्णा हे ओगले काच कारखान्याचे प्रसिद्ध कामगार नेते. दामू अण्णा यांचे जयवंतराव आप्पा यांच्याशी अतिशय जवळचे संबंध होते. आप्पांच्या आणि अण्णांच्या शिफारशीवर माझ्या पत्नीला कृष्णा इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये 1998 साली सहा नोकरी मिळाली होती. पुढे बीएडला ॲडमिशन मिळाल्यानंतर तीला ही नोकरी सोडावी लागली.आप्पांच्या समवेत झालेली माझी ही पहिली अतिशय सुखद अशी भेट.
2001 झाली पुढारीमध्ये काम सुरू केल्यानंतर जयवंतराव भोसले आप्पा यांच्या अनेक प्रेस कॉन्फरन्सला मी ट्रस्टवर गेलो होतो. माझ्यासोबत कराडचे निवडक चार पाच पत्रकार असायचे. प्रेस कॉन्फरन्सचा विषय फक्त पंधरा-वीस मिनिटांचा असायचा मात्र त्यानंतर जयवंतराव आप्पा यांच्या समवेत आमच्या तासभर गप्पा रंगायच्या. यादरम्यान कृष्णा ट्रस्ट निर्मितीमध्ये यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील याचे योगदान, अत्यंत कमी कालावधीत उभारलेलली कृष्णा हॉस्पिटलची इमारत, ग्रामीण भागात मेडिकल कॉलेज देताना पुण्या-मुंबईतील उच्चभ्रू लोकांनी दिलेला त्रास याबातच्या आठवणी आप्पा दिलखुलासपणे सांगत.
जयवंतराव भोसले आप्पा यांनी लिहिलेल्या जीवनयात्री या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या अगोदर आम्ही त्यांना भेटलो होतो. या पुस्तकामध्ये आप्पांनी जीवन मृत्यू,कर्तव्य, व्यवसाय,अध्यात्म, लोक, देश,परदेश आदी विषयावर प्रकाश टाकला आहे, हे पुस्तक संग्रही असे आहे. यशवंतराव मोहिते आणि जयवंतराव भोसले यांच्या सहकार क्षेत्रातील कार्याबाबत मी काय लिहीणार? त्यांचे कार्य फार मोठे आहे. या दोन्ही महामानवांचा सहवास मला लाभला हे माझे भाग्य आहे.
बावीस डिसेंबर या आप्पांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला आप्पांची पुढारीसाठी घेतलेली एक मुलाखत मला आठवते. या मुलाखती दरम्यान त्यांनी एक विचार बोलून दाखवला होता, तो आजही माझ्या स्मरणात आहे. आप्पा म्हणाले होते, 'तुम्ही कोणत्याही क्षेत्रात जा, कोणतेही काम करा. पण ते काम करताना तुम्ही ते करिअर म्हणून करा, वेळ घालवण्यासाठी, टाईमपास करण्यासाठी करू नका. शेती असो किंवा राजकारण असो, ते काम करताना जशी तुम्ही नोकरी करता तसा तुम्ही शेतीसाठी खूप पूर्ण वेळ दिला पाहिजे. तुम्ही जर राजकारण करत असाल तर राजकारणाकडे तुम्ही करिअर म्हणून पाहिले. तुम्ही जर सहकार क्षेत्रात काम करत असाल तर तुम्ही सहकार क्षेत्राकडे करिअर म्हणून पाहिले पाहिजे. आपल्या नोकरी अथवा व्यवसायाकडे करिअर म्हणून पाहतात ते नक्कीच यशस्वी होतात' असे आप्पां मुलाखती दरम्यान बोलले होते.
जयवंतराव भोसले आप्पा आणि यशवंतराव मोहिते यांच्या आठवणीच्या प्रवासात चालत चालत आम्ही पुढे कृष्णा नदी पुलावर पोहचलो. या पुलावरून रेठरे बुद्रुक गावाचे अतिशय सुंदर असे चित्र दिसते. या परिसरात कृष्णा नदीचे पात्र विस्तीर्ण असे आहे. हा पुल रेठरे बुद्रुक आणि रेठरे खुर्द या गावांना जोडणारा आहे. हा पुल नव्हता तेव्हा कायलीतून प्रवास केला जायचा. अशा प्रकारची काईल नदीमध्ये आम्हाला पाहायला मिळाली. या पुलावरून पुढे जात असताना अनेक ओळखीचे भेटले, त्यांना नमस्कार केला, फोटो आठवणी टिपल्या आणि आम्ही सहकार महर्षी जयवंतराव भोसले स्वागत कमानी मधून रेठरे बुद्रुक गावात प्रवेश केला. या ठिकाणी रेठरे बुद्रुक येथील वार्ताहर दिलीप धर्म आणि त्यांचे सहकारी आमची वाट पाहत होते. रेठरे बुद्रुकच्या सरपंच सौ. सुवर्णा कापूरकर आणि मान्यवरांच्या उपस्थितांच्या समवेत आम्ही कापूरकर स्मारकाशेजारी एक वडाचे झाड लावले. त्यानंतर स्वर्गीय मारुती रावजी कापूरकर यांच्या समाधीचे दर्शन घेतले. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठलचा जयघोष केला. या ठिकाणी ज्योतिर्लिंग मंदिराचा ग्रामस्थांच्या सहकार्याने विनायक भोसले यांनी पुढाकार घेऊन नुकताच जीर्णोद्धार केला आहे. पूर्वीचे ज्योतिर्लिंग मंदिर आणि आत्ताचा परिसर पाहिला तर पटणार नाही इतका मोठा बदल झाला आहे. अतिशय नियोजनपूर्वक या मंदिराचा परिसर फुलवण्यात आलेला आहे. मंदिराच्या खाली लाॅन तयार करून बाग तयार केली आहे, आकर्षक पद्धतीने मंदिराची सजावट केली आहे. खुप दिवसानंतर या मंदिरात आज जाण्याचा योग आला. यापूर्वी जेव्हा या मंदिरात गेलो होतो तेव्हा वरती जायचा रस्ता साधा होता. मात्र आज पायरी वरून आम्ही वरती जात होतो. दोन्ही बाजूला हिरवळ तसेच वेगळ्या प्रकारची फुले झाडे आणि आकर्षक बाग पाहून खूप आनंद झाला. ज्योतिर्लिंग देवाचे मनोभावे दर्शन घेतले आणि या मंदिराच्या परिसरात काही थांबलो. रेठरे गावचा परिसर मंदिराच्या उंचावरून पाहिला.अतिशय सुंदर असा हा नजारा होता. त्यानंतर सहकार महर्षी आबासाहेब मोहिते घाट कमानीतून खाली येऊन स्मशानभूमी परिसरात आम्ही वडाची चार झाडे लावली.अतिशय भावभक्तीपूर्ण वातावरणात कृष्णा काठावर आम्ही ही वडाची झाडे लावली. यावेळी स्मशानभूमी परिसरात पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारामचा आवाज घुमला. सर्व ग्रामस्थांना आम्ही धन्यवाद दिले आणि आमचा परतीचा प्रवास सुरु केला.
रेठरे बुद्रुक हे माझे आजोळ असल्यामुळे या गावात मी अनेकदा गेलेलो आहे. पूर्वी कृष्णा नदीवर पूल नव्हता. तेव्हा आम्ही शेणोली मार्गे रेठरेला जायचो. उन्हाळ्याची किंवा दिवाळीची सुट्टी लागली की माझे वडील मला कराड स्टॅंडवर कराड रेठरे बुद्रुक एसटीमध्ये बसवायचे, बस मधून या गावात जाण्याचा आनंद काही औरच होता. बसमधून दिसणारी शेतं, झाडं, कधीकधी झुकझुक गाडी, कृष्णा कारखाना पाहताना खूप मजा यायची.
माझ्या शालेय जीवनातील अनेक गोड आठवणी रेठरे बुद्रुक येथील आहेत. 1982 च्या दरम्यान अमिताभ बच्चन यांचा कुली चित्रपटपटाच्या सेटवर झालेला अपघात आणि त्यानंतर मृत्यूच्या दाढेतून बाहेर पडताना अमिताभ बच्चन यांनी केलेला संघर्ष वृत्तपत्रांमध्ये छापून येत होता. अमिताभ बच्चन लवकर बरे होण्यासाठी अनेकांनी नवस केले होते, मी रेठरे बुद्रुक या गावातील मंदिरात जाऊन अमिताभ बच्चन लवकर बरा व्हावा अशी प्रार्थना केली होती. यावेळी मी रेठरे बुद्रुक येथे आजोळी मुक्कामी होतो. आमच्या मामाची मुले हा पेपर मला दाखवत. अमिताभ बच्चन मला लहानपणापासूनच आवडतो. त्यामुळे अमिताभ बच्चन यांच्या अपघाताची वाचलेली बातमी मला अजूनही आठवते.
या गावांमध्ये सुट्टीमध्ये जाण्याचे आणखी एक कारण म्हणजे त्या ठिकाणी असणारी टुरिंग टॉकीज. माझ्या मामाच्या मुलीचा मुलगा रवींद्र शिंदे आणि मी सुट्टीत रेठरे गावात नक्की असायचो. आमच्या दोघांचा एक नित्यक्रम असायचा, रोज रात्री दहा वाजता रेठर्याच्या टूरिंग टाॅकिजमध्ये जाऊन चित्रपट पाहायचा. चित्रपट पहायला कधी मामाला विचारून तर कधी न विचारता जायचो.चित्रपट पाहायला न सांगता गेलो तर रात्री एक वाजता परत आल्यानंतर मामांच्या घराच्या पाठीमागील दारावरून वरती चढायला एक वाट होती, त्या वाटेतून आम्ही वर यायचं आणि शेजारच्या दुसऱ्या मामांचा टेरेस वरती जाऊन झोपायचं,अशा या माझ्या रेठरे बुद्रुक गावच्या आठवणी आहेत.
या गावात माघ पौर्णिमेला एक वेगळी लिंबाची यात्रा असते. घरातील ज्येष्ठ पुरुष लिंब नेसतात.लिंबाचा पाला शरीराभोवती गुंडाळून देवाची पूजा केली जायची. माझ्या मामाला लिंब नेसलेले मी पाहिले आहे. या यात्रेच्या निमित्ताने रेठरे बुद्रुकला देवाला नारळ द्यायला जायचे जाणे व्हायचे.
आजची वारी आठवणींच्या हिंदोळ्यावर होती. मामा- मामीने माझ्यावर केलेले निखळ प्रेम,आजोळी केलेली मज्जा, मामीच्या हातची खाल्लेली तूप रोटी अजूनही आठवते. पूर्वी आमच्या घरात कधीतरी भात खायला असायचा. पण रेठरे बुद्रुक येथे गेल्यानंतर दोन्ही वेळेला भात खायला मिळायचा. या भातामध्ये दोन-तीन चमचे तूप वाढणारी माझी मामी मला अजूनही आठवते. आजच्या मुलांना आजोळी राहायचे सुख मिळते का ? आपण खुप नशीबवान आहोत ना?
झुक झुक झुक झुक आगीनगाडी, धुरांच्या रेषा हवेत सोडी पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया!
राम कृष्ण हरी
जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल
*सतीश मोरे*

१६ जुलै २०२१

निसर्गवारी आज होती कालवडे गावात.

 *निसर्गवारी*

_*संकल्प २२१ वृक्ष लागवडीचा*_ !
१६ जुलै २०२१
राम कृष्ण हरी माऊली
निसर्गवारी आज होती कालवडे गावात. आम्ही नेहमीप्रमाणे एकत्र आलो आणि वाठार गाव सोडून पुढे कालवडे फाट्यावर आमची वाहने पार्क केली. आज आमच्या सोबत सुधीर एकांडे हे माऊली सहभागी झाले होते, त्याचबरोबर सुनील शेवाळे उंडाळेहुन खास आमच्या वारीमध्ये सहभागी होण्यासाठी आले होते. साडेसहाच्या सुमारास आम्ही येथून चालावयास सुरुवात केले. जरा पुढे गेल्यानंतर आमचे वाहन पुढे नेण्यासाठी त्या ठिकाणी माझे सहकारी बालीश थोरात आले. ते वाहून गेल्यानंतर मी पुन्हा एकदा गावाच्या दिशेने चालायला सुरुवात केली.
कालवडेला जाणारा रस्त्याच्या दोन्ही कडेला उसाची शेती मोठ्या प्रमाणात आहे. ऊसाला पाणी पाजण्यासाठी अनेक मोटारी सुरू होत्या, हा परिसर भाजीपाला पिकासाठी (माळवे )प्रसिद्ध आहे. अनेक ठिकाणी टोमॅटो दोडका मिरची याचे प्लाॅट दिसले. महामार्गापासून कालवडे पर्यंत तीन किलोमीटर अंतर आम्ही अर्धा तासातच पार केले. गावात प्रवेश केला गावातून चालत असताना लोक आम्हाला भेटले, अनेक जुने वाडे पाहायला मिळाले तसेच एका जुन्या वाड्यात असलेले सुंदर राम मंदिर पाहायला मिळाले. कालवडे गावातून बाहेर पडल्यानंतर नांदगावला जो रस्ता जातो त्या रस्त्याने आम्ही चालू लागलो. आज पहिल्यांदाच या रस्त्याने जात होतो. हा रस्ता पुढे नांदगावला जातो.
कालवडे गाव हे अतिशय समृद्ध आहे. या गावात कल्याणी समूहाची सुमारे चारशे एकर जमीन आहे. या जमिनीवर अत्याधुनिक शेती प्रयोग केले जातात, त्यांचा पोल्ट्री उद्योग आहे, नारळाच्या बागा आहेत. गावाबाहेर आल्यानंतर आता चढाचा रस्ता सुरू झाला. पुढे डोंगर होता आणि या डोंगरावरील महादेवाचे मंदिर आम्हाला लांबून दिसत होते आणि त्या डोंगरावरच आम्हाला जायचे होते. या रस्त्यावरून चालताना दोन्ही बाजूला डोंगराच्या कडेला ऊस शेती खरंच पाहण्यासारखी आहे. डोंगरावर सामाजिक वनीकरणाने मोठ्या प्रमाणात झाडे लावल्यामुळे हा परिसरात अतिशय सुंदर दिसतो. या झाडावर मोरांची वस्ती आहे. पुढे तीन किलोमीटर आल्यानंतर आम्हाला उंचावर उंडाळे प्रादेशिक योजनेची पाण्याची टाकी दिसली. आम्ही त्या डोंगराच्या पायथ्याशी आलो आणि उजवीकडे वळून पुढे चालू लागलो. येथे आम्हाला एक मंदिर पहावयास मिळाले. या मंदिरातील देवी गाईवर बसलेली होती, गाईवर बसलेली ती रुक्मिणी माता होती. अशा प्रकारचे मंदिर पहिल्यांदाच पाहायला मिळाले. त्या माउलीला नमस्कार करून पुढे आम्ही डोंगराकडे चालू लागलो.पावणे आठच्या सुमारास आम्ही या डोंगरावर पोहोचलो.
डोंगरावर सुळागिरी महादेव मंदिर आहे. हे अतिशय जुने मंदिर असून गावातील युवकांच्या प्रयत्नातून त्याचा जिर्णोद्धार अतिशय प्रयत्नपूर्वक सुरू आहे. मंदिर छोटेखानीअसलले तरी परीसर सुंदर आहे. या डोंगरावरून कराड आणि वाळवा तालुक्यातील कासेगाव, वाठार, बेलवडे, कालवडे, काले या गावांचे दर्शन होते. समोर मच्छिंद्रगड आणि चौरंगीनाथचा डोंगर दिसतो. अतिशय निसर्गरम्य वातावरण आहे हा.या मंदिरात पोहोचल्यानंतर उपस्थित सर्व शिवभक्तांच्या मदतीने या ठिकाणी आम्ही पाच वडाची झाडे लावली.
सुळागिरी महादेव मंदिराचा उल्लेख पांडवप्रताप या ग्रंथामध्ये आहे. शंकराला प्रसन्न करुन शिवभक्त रावणाने शिवलिंग मिळवले होते. ते शिवलिंग गणपतीने बालक रूपातून रावणाच्या हातातून काढून घेतले आणि जेव्हा रावण लघुशंकेला गेला तेव्हा ते शिवलिंग जेथे ठेवले ते गोकर्ण महाबळेश्वर.या घटनेनंतर संतप्त झालेला रावण वणवण फिरू लागला आणि तो कालवडे परिसरात आलेला होता. त्याच्या हातातील मळापासून शिवलिंग तयार झाले आहे अशी अख्यायिका आहे.
गेल्या काही वर्षापासून कालवडे ग्रामस्थ, शिवभक्त आणि युवकांच्या मदतीने या मंदिराच्या परिसरात जाण्यासाठी रस्ता तयार करण्यात आला, लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून तसेच वर्गणीतून येथे अनेक कामे झाली आहेत. या मंदिरापासून पुढे काही अंतरावर निळागिरी मंदिर असून मंदिराकडे जाण्यासाठी पाऊलवाट आहे. सुळागिरी मंदिर आणि निळागिरी मंदिर ही दोन्ही ठिकाणी अतिशय सुंदर आहेत. कराडपासून जवळ पाहण्यासाठी हीअतिशय निसर्गरम्य ठिकाणे आहेत. आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी झाडे लावली आणि परत आमचा प्रवास सुरु केला.
गावात आल्यानंतर गावातील विठ्ठल रुक्माई मंदिर तसेच चिलाई देवीचे दर्शन घेतले. पुरातनपासून धार्मिकतेचा वसा जपणाऱ्या कालवडे नगरीमध्ये अनेक देव-देवतांची मंदिरे पूर्वजांनी सुसज्ज अशी बांधलेली आहेत. महाराष्ट्रामध्ये अनेक जागृत देवस्थाने आहेत त्यामध्ये कालवडे गावच्या चिलाई देवी या जागृत देवस्थानचा उल्लेख केला जातो. म्हणून या देवस्थानचे वेगळेपण जपण्याचा प्रयत्न कालवडेकर करत आहेत. कालवडे गावातील ग्रामस्थ व सासरी गेलेल्या माहेरवाशिणी तेवढ्यात धार्मिकतने या जागृत देवस्थानचा वसा जपत आहेत.
गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या चौरस आकार असणाऱ्या दगडाच्या विहिरीमध्ये उत्तरेच्या बाजूस ईशान्य कोपऱ्यामध्ये विहिरीत सुमारे दहा फूट खोलीवर चिलाई देवी मातेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे. तर बाजूला सात दोऱ्या आहेत यामध्ये सात सुवासिनींची मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे. सुमारे ५० फुट खोल असणाऱ्या चौरस आकाराच्या पारंपारिक विहिरीची कलात्मक बांधणी भाविकांना परंपरेचे दर्शन घडवते. विहिरीत उतरण्यासाठी रुंद दगडी पायर्या व बाजूचे बांधकाम कित्येक पिढ्यानी पाहिले आहे. ते बांधकाम आज अखेर तसेच आहे. सुमारे सात फूट रुंद व 50 फूट लांब विहिरीच्या तिन्ही बाजूनी तिन्ही बाजूने कार्यक्रम पाहण्यासाठी चबुतरा तयार करणे केला आहे.
या विहिरीतील पाण्याचे महत्व सांगावयाचे म्हटले तर पावसाळ्यामध्ये कितीही पाऊस पडला तरी देवी चिलाई देवी मातीच्या मूर्तीच्या गळ्यापर्यंतच पाणी भरले जाते. मूर्तीपासून वरती सुमारे दहा फूट उंच विहीर असून सुद्धा पाणी मूर्तीच्या गळ्यापासून वर आज आखेर आलेले नाही.
चिलाई देवीच्या जागृत देवस्थान विहिरीचे महात्म्य परंपरेपासून आजही अत्यंत काटेकोरपणे पाळले जात आहे. म्हणूनच गावातील प्रत्येक कुटुंबातील व सासरवासिनी यांना होणारे पहिले अपत्य या विहिरीत पाण्यावरती पाळण्यामध्ये बसवून फेऱ्या काढून सोडण्याचा कार्यक्रम केला जातो. ही परंपरा गावातील प्रत्येक कुटुंब अखंडितपणे जपत आहेत. ही परंपरा जपताना होणाऱ्या आर्थिक खर्चाचा विचार न करता आपल्या हातून होणाऱ्या अन्नदानाचा विचार करून हजारोंच्या संख्येने नातेवाईक मित्रमंडळी ग्रामस्थ यांना स्नेहभोजन देतात.
आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला व मामांना ही नवीन वस्त्रे तसेच सात सुवासिनींची परिस्थितीनुसार खणा-नारळाने ओटी भरली जाते. पाळण्यात सोडण्याच्या कार्यक्रमाच्या प्रथेप्रमाणे पहाटे चिलाई देवीच्या मूर्तीला पाणी घालून साडीचोळी अर्पण केली जाते. सकाळी नऊ वाजता सात सुवासिनींना पान विडा व हळदीकुंकू देऊन भोजनाचे निमंत्रण दिले जाते. सकाळी दहा वाजता कार्यक्रम केला जातो . त्यानंतर सकाळी 11 वाजता सात सुवासिनींची मंडपामध्ये पूजा केली जाते. कुटुंबातील सर्वजण या नवीन वस्त्रे परिधान करतात या कार्यक्रमासाठी त्याचे आई-वडील आपत्ती व सात सुवासनी आदल्या रात्री बारा वाजल्यापासून ते सोडण्याचा कार्यक्रम होऊन पाद्यपूजन होईल तोपर्यंत पाणी सुद्धा ग्रहण करत नाहीत. ज्या कुटुंबामध्ये कार्यक्रम आहे ते कुटुंब व सुवासिनी पायात चप्पल घालत नाही. त्या सर्व कार्यक्रमांमध्ये देवीचे पूजन व भोजन याला फार महत्त्व आहे, जोपर्यंत सात सवासनी भोजन करत नाही तोपर्यंत कोणीही भोजन करत नाही. त्यानंतर मात्र सर्वजण भोजन करतात.
चिलाई देवी आणि विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही आमचा परतीचा प्रवास सुरु केला आणि कराडात पोहचलो.आजच्या निसर्ग वारीमध्ये नवीन ठिकाण पाहायला मिळाले. सुळागिरी आणि निळागिरी या देवस्थान ला जाण्यासाठी एक दिवसाची छोटी सहल अतिशय चांगल्या पद्धतीने होऊ शकते. आपण नक्की जा.
सामाजिक कामासाठी आज एका ठिकाणी जावे लागले, या कामाबाबत आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर आलेल्या अनुभवाबाबत मी लवकरच स्वतंत्र लिहिणार आहे. ज्या ठिकाणी गेलो होतो तिथेही मी आणि रणजीत पाटील यांनी पाच वडाची झाडे लावली, हा एक आनंदाचा क्षण तुम्हाला शेअर करावासा वाटतो. यामुळे आजचा ब्लॉग झाला उशीर झाला आणि सविस्तर लिहू शकलो नाही उद्या सविस्तर देत आहे.
राम कृष्ण हरी
जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल
*सतीश मोरे*

१५ जुलै २०२१

निसर्ग वारी नांदगाव ते उंडाळे

 *निसर्गवारी*

_*संकल्प २२१ वृक्ष लागवडीचा*_ !
१५ जुलै २०२१
राम कृष्ण हरी माऊली
आमची निसर्गवारी गेली चौदा दिवस माऊली कृपेने अखंडपणे सुरू आहे. आज आमची निसर्ग वारी नांदगाव ते उंडाळे आयोजित होती. या वारीचे जेव्हा मी वेळापत्रक तयार केले त्यावेळी मला कसलीही कल्पना नव्हती की याच दिवशी म्हणजे १५ जुलैला ज्येष्ठ नेते विलासराव पाटील उंडाळकर यांचा जन्मदिवस आहे. दोन दिवसापूर्वी आमचे पुढारी प्रतिनिधी वैभव पाटील यांच्याशी चर्चा करताना १५जुलै काकांची जयंती आहे, असे त्यांनी मला सांगितले. त्यानंतर या ज्येष्ठ नेत्यांच्या गावात आपण जातोय तर एक झाड लावण्याऐवजी १५ झाडे लावूया असे वाटले. हा विचार उदयसिंह पाटील (दादा) यांना फोनवरून बोलून दाखवला.त्यांनी या गोष्टीला तात्काळ सहमती दर्शवली. कोरोनामुळे जयंती मोठ्या प्रमाणात होणार नाही. निसर्ग वारीच्या माध्यमातून उंडाळे ज्या ठिकाणी विलासराव काका यांच्यावर अंत्यसंस्कार झाले तिथेच आपण एक झाड लावू या आणि उरलेली झाडे गावात इतरत्र लावावी,असे सुचवले. त्यानुसार आम्ही आजच्या वारीचे नियोजन केले होते.
सकाळी सहा वाजता आम्ही कोल्हापूर नाक्यावर एकत्र आलो. आमच्या वाहनातून कालेटेक येथील नर्सरी मध्ये गेलो. याठिकाणी पत्रकार सुहास पाटील आणि सुनिल शेवाळे आमच्या स्वागतासाठी येऊन थांबले होते. नर्सरीमधून आंबा, वड, जांभूळ रोपे विकत घेतली. त्यानंतर ही रोपे यातील पंचवीस रोपे आम्ही नांदगाव पोलीस चौकीत नेऊन ठेवली, पुन्हा वाहन घेऊन नांदगाव फाट्यावर आलो. एका ओळखीच्या कार्यकर्त्यांच्या घरी वाहन उभं केलं आणि नांदगाव पासून उंडाळे पर्यंत पायी वारीला सुरवात केली.
आज वातावरण अतिशय प्रसन्न होतं. पाऊस येऊन गेला होता. सात वाजता ओंड येथे पोहोचलो. पुढे सवादे फाट्यावर आम्हाला तुळसणचे दिलिप पाटील आणि.. येऊन मिळाले. सर्व सहकार्यांसोबत आम्ही आमची वारी सुरू केली. आज बाबा महाराज सातारकर यांचा हरिपाठ आम्ही ब्लूटूथ स्पीकरवर लावला होता.वेगळ्या चालीतील हरिपाठ तितक्याच शांत वातावरणात ऐकच आम्ही आम्ही चालत राहिलो. या राज्य मार्गावर चालताना एक वेगळा फिल येत होता. रस्ता रुंदीकरण झाल्यामुळे आम्हाला आरामात चालत जाता येत होते.आमच्यासोबत माझे पत्रकार शिक्षक मित्र सुहास पाटील होते. सुहास पाटील यांच्याकडे पाहिल्यानंतर उंची छोटी मात्र कीर्ती मोठी असे त्यांचे एका ओळीत वर्णन करता येईल. सुहास यांनी विलासराव पाटील-उंडाळकर यांचा समतेचा विचार जपला आहे. ते प्राथमिक शिक्षक आहेत. विलासकाका उंडाळकर यांचेविषयी दैनिकामध्ये आलेल्या सर्व बातम्यांची कात्रणे त्यांनी जपून ठेवलेली आहेत. काही महिन्यापूर्वी त्यांनी नवीन घर बांधले या घराची वास्तुशांती त्यांनी संविधान पूजन करून केली होती. त्यांचे दुसरे सहकारी सुनील शेवाळे आमच्या सोबत चालत होते. ते उंडाळे येथील ग्रामीण शिक्षण संस्थेचे क्लार्क आहेत. शेवाळे यांनी विलासकाकां समवेत अनेक वर्षे काम केले आहे. काकांच्या निधनानंतर प्रत्येक महिन्याच्या चार तारखेला एक झाड आपल्या घराच्या परिसरात किंवा शेतात लावायचे असा त्यांनी संकल्प केला आहे आणि गेली नऊ महिने त्यांनी ९ झाडे लावलेली आहेत. काकांच्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने चार तारखेला एक तरी झाड लावावे असा त्यांचा आग्रह आहे आणि तसे आवाहन त्यांनी त्यांच्या जवळच्या मित्रमंडळींना केले आहे. शेवाळे यांचा हा संकल्प पुरा करण्यासाठी उंडाळकर प्रेमीनी विचार केला तर वर्षभरात अनेक झाडे लावू शकतात.
आता आम्ही उंडाळेच्या नवीन पुलावर पोहचलो. हा पूल नुकताच बांधून (ठेकेदाराच्या चुकीमुळे तीन जणांचे बळी घेऊन) पूर्ण झाला आहे. काही दिवसापूर्वी वाहनांसाठी खुला करण्यात आला, या पुलावर काही काळ थांबून पुढे चालत राहिलो. पावणे आठच्या सुमारास आम्ही उंडाळे येथे पोहोचलो. गावाच्या अलीकडे अर्धा किलोमीटर कृष्णाजी बुवा उंडाळकर यांनी यांच्या स्मरणार्थ बांधलेले विठ्ठल-रुक्मिणी मंदिर आहे. कृष्णाजी बुवा हे विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. कृष्णाजी बुवा हे विलासराव पाटील-उंडाळकर यांचे पणजोबा.या मंदिराच्या पाठीमागे शेतातच विलासकाका यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. याच जागेत एक झाड लावावे असा माझा आग्रह होता. त्यानुसार आम्ही त्या ठिकाणी थांबलो. विठ्ठल मंदिरात जाऊन माऊलींचे दर्शन घेतले.या मंदिरात आज एक सन्मान आम्हाला मिळाला. आज पहिल्यांदाच विठ्ठल रुक्मिणी देवाची पूजा करण्याचा मान माझ्याकडे होता. माऊलीची पूजा केली. विठ्ठल देवाची पूजा करण्याचा मान हे फार मोठं शुभसंकेत आहेत असे मी समजतो. विठ्ठल रुक्मिणी पूजा होईपर्यंत त्या ठिकाणी उदयसिंह पाटील उंडाळकर पोहोचले होते. पुन्हा त्यांच्या सोबत आम्ही विठ्ठल माऊलीचे दर्शन घेतले. औषधी काढा घेतला आणि मंदिराच्या बाहेर आलो.
विलासकाकांवर प्रेम करणारे अनेक जण त्याठिकाणी उपस्थित राहिले होते. उंडाळे ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य यांच्यासहित परिसरातील ग्रामस्थ काकांच्या जयंतीदिनी अभिवादन करण्यासाठी जमले होते. या सर्वांचा उपस्थित काकांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मंदिरा शेजारी एक झाड लावले आणि पुंडलिक वरदे हरी विठ्ठलचा जयघोष केला. एक वेगळ्याच वातावरणात आम्ही रंगून गेलो.
त्यानंतर आम्ही सर्वजण चालत गावातील मुख्य चौकात पोहचलो. उंडाळे पोलीस चौकी समोर असणाऱ्या भव्य जागेत पुन्हा एकदा सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत आम्ही उरलेली १४ झाडे लावली. काकांच्या जयंती दिवशी १५ झाडे लावण्याचा आमचा संकल्प आज उंडाळे ग्रामस्थ आणि उंडाळकर कुटुंबाच्या सहकार्याने पूर्ण झाला. आज या निमित्ताने अनेक उंडाळकर प्रेमी, कार्यकर्ते भेटले. त्यांच्याशी बोलून, त्यांना भेटून खूप आनंद झाला. पुढे आम्ही सर्वजण ग्रामपंचायत कार्यालयात आलो. या ठिकाणी दिवंगत काकांच्या प्रतिमेला अभिवादन करून आदरांजली वाहिली.
आमचे पत्रकार मित्र वैभव पाटील यांनी निसर्गवारीच्या उपक्रमाचे कौतुक करताना काकांना अपेक्षित अशी ही वारी आहे,असे सांगितले. यावेळी बोलताना काकांच्या अनेक आठवणी जाग्या झाल्या. उंडाळकर काकांच्या राजकीय कारकीर्दीला पन्नास वर्षे पूर्ण झाली तेव्हा खा. सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते काकांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला होता. यावेळी काकांनी उपस्थिताना मार्गदर्शन करताना 'मी आयुष्यभर लोकामध्येच विठ्ठल पाहिला. जनतेमध्येच देव पाहिला. माझी जनता हाच माझा पांडुरंग' असे भावनाविवश उद्गार काढले होते. काकांच्या भाषणातील ती वाक्ये माझ्या कानावर पडत होती.आम्ही प्रत्येक झाडांमध्ये एक देव आहे असे समजून २२१ झाडे लावण्याचा एक वेगळाच संकल्प केलेला आहे.
काकांनी जनतेसाठी केलेले काम फार मोठे आहे.जनमानसात मिसळणारा, गावागावातील सर्व घटकांची जिव्हाळ्याचे संबंध असणारा, खेडोपाड्यातील शेवटच्या घटकासाठी वैयक्तिकरित्या काही ना काही मदत करणारा, त्याला नावाने ओळखणारा, सामान्य घरातील व्यक्तीला मोठ्या पदावर पदावर बसवणारा, साध्या माणसाला मोठ्या संस्थेचे चेअरमन करणारा, सतत वाचत रहा शिकत रहा असा सल्ला देणारा,पुरोगामी विचारांची पेरणी करणारा, जनजागृतीसाठी साहित्य संमेलने घेणारा,जनसामान्यांची नाडी ओळखणारा असा नेता पुन्हा होणे नाही.
काकांच्या प्रतिमेला अभिवादन करुन आम्ही परत उंडाळकर स्मारक कार्यालय मध्ये जाऊन सुहास पाटील यांनी तयार केलेले कात्रण संग्रह पहिले. यावेळी महाराष्ट्र न्यूजचे पत्रकार सुहास पाटील उपस्थित होते. आठवणीतील काकांच्या बातम्या वाचून काकांच्या कार्याला उजाळा दिला. उपस्थित सर्व मान्यवरांना नमस्कार केला, धन्यवाद दिले आणि आम्ही आमच्या मार्गाने परत निघालो.
येताना नांदगाव पोलीस चौकीत पोहोचलो. नांदगाव पोलीस चौकीच्या मालकीची पावणेदोन एकर जागा आहे, येथे वृक्षारोपण करा असे पोलिस उपअधीक्षक रणजीत पाटील, कराड तालुका ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भरणे आणि कराड शहरचे पोलिस निरीक्षक बी. आर पाटील यांनी काल आम्हाला सुचवले होते. नांदगाव पोलीस चौकी इंग्रज कालीन आहे. चौकीची फार जुनी कौलारू इमारत आहे. या इमारतीत समोर इंग्रज अधिकाऱ्यांचे घोडे बांधले जात असत असे आम्हाला समजले. याठिकाणी पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे, त्यांचे सर्व सहकारी आणि आम्ही सर्वांनी १२मिळून झाडे लावली. उर्वरित १३ झाडे त्या ठिकाणी ठेवून ही झाडे लवकरच लवकर लावा अशी विनंती पोलिसांना करून आम्ही या पोलिस चौकीच्या इमारतीसमोर काही काळ आराम केला. या इमारती समोर वडाची चार झाडे आहेत. या झाडाखाली बसल्यानंतर एक वेगळा आनंद मिळाला. नांदगाव पोलीस चौकीच्या मालकीची मोकळ्या जागेचे नंदनवन करण्यासाठी नांदगाव ग्रामस्थांनी तसेच तेथील सामाजिक संघटनांनी पुढाकार घ्यावा, याकामी झाडे लावण्यासाठी कसल्याही प्रकारचे सहकार्य लागले तर निसर्गवारी ग्रुपच्या वतीने दिले जाईल असे रणजीत पाटील यांनी पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे यांना सांगितले. पोलीस मित्रांचा निरोप घेऊन आम्ही परतीचा प्रवास सुरू केला.
माझे जवळचे मित्र आणि सकारात्मक विचार करणारे साम टीव्ही ब्युरोचिफ संभाजी थोरात यांच्या धोंडेवाडी फाटा येथील मैत्रीपार्क या हॉटेलचा आज आठवा वर्धापन दिन होता. संभाजी थोरात यांना मी या भागात येणार आहे याची माहिती होते, काही कामानिमित्त ते कोल्हापुरात अडकून पडले होते. मात्र हॉटेलच्या वर्धापन दिनानिमित्त आमच्या हॉटेलसमोर वृक्षारोपण करावे अशी इच्छा थोरात यांनी काल रात्री माझ्याशी बोलून दाखवली होती. संभाजी थोरात यांच्या इच्छेनुसार आम्ही मैत्री पार्क हॉटेल समोर थांबलो. थोरात कुटुंबीयांनी आमचे स्वागत केले ,येथे दोन झाडे लावली. त्यानंतर थोरात बंधुनी गत वर्षी सुरू केलेल्या शिवनेरी शाकाहरी हाॅटेलमध्ये जाऊन आम्ही नाश्तावजा जेवणच केले आणि आमचा परतीचा प्रवास सुरू केला.
आज आमचे निसर्ग वारीत थोडी धावपळ झाली. आम्ही ठरल्याप्रमाणे सहा किलोमीटर अंतर चालून झाले पण कोणताही थकवा जाणवला नाही. विलासकाका उंडाळकर यांच्या गावात गेल्यानंतर काकांच्या आठवणीला उजाळा मिळाला. काकांच्या नियोजित स्मारका शेजारी आमच्यानिसर्ग़वारीतील १ झाड लावता आले. काकांनी उभ्या केलेल्या अनेक वास्तूमध्ये काही काळ व्यथित करता आला. ज्या स्वातंत्र्यसैनिकाच्या पंढरीमध्ये देशभरातील अनेक मान्यवर येऊन गेले आहेत त्याठिकाणी जाऊन एक नवी प्रेरणा मिळाली.
राम कृष्ण हरी
जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...