फॉलोअर

०३ मार्च २०१९

फुल फुललं

आज मला एक फुल भेटलं
माझी विचारपुस करू लागलं !
कुणीतरी दुखावलं
म्हणून नाराज का होतोस
असं पुसू लागलं !

माझी कैफियत ऐकून
ते हसून बोलू लागलं !
पाणी घालतो एक
काळजी घेतो एक
विकत घेतो दुसराच
सुवास घेतो तिसराच !
तरीही मी माझा
स्वभाव नाही सोडत !
आनंद देता देता
जमीनीत नष्ट होतो
तिथंही पुन्हा फुलतो !
कळीचं पुन्हा फुल बनतो
आनंद देतच राहतो
असं बरंच सांगू लागलं !

स्व:तचा स्वभावगुण
सोडू नकोस
आनंद देत रहा !
विश्वास वाढवत रहा !
काम करत रहा!
तत्व सोडू नको
देत रहा , हसत रहा !

खरं पचायला
आणि रुचायला
वेळ रागतो
संयम ठेव !
तु जर वाईट
केलं नाहीस तर
तुझं कोणीच
वाकडं करू
शकत नाही !

घेतला वसा
सोडू नकोस
तुला जे हवं आहे
ते इतरांना देत रहा !
असं मला
सांगू लागलं!

फुलाचा सल्ला
ऐकून मी फुललो !

तोडलं तरी आनंद
देत रहा
सदाबहार फुलाच्या
गुणाच्या प्रेमातच पडलो !

*सतिताभ*

२१ फेब्रुवारी २०१९

प्रभातीचे रंग आँन यु ट्युब

*अंतरंग*

*प्रभातीचे रंग युट्युबवर*

१९९५-९० चा काळ खरंच खुप सुंदर होता. सुंदर सकाळची सुरुवात आकाशवाणीने व्हायची. सहा वाजता रेडिओ सुरू व्हायचा हिंदी राष्ट्रीय बातम्याने. त्यानंतर हवामान, भक्ती संगीत, प्रभातीचे रंग, आरोग्यम धनसंपदा ते सात वाजून दहा मिनिटाच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या मराठी बातम्या. परत मराठी चित्रपट संगीत. आठ ते सव्वा आठ वाजता हिंदी बातम्या,सव्वा आठला एखादा माहिती पुर्ण कार्यक्रम पुन्हा साडे वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या मराठी बातम्या आणि आठ वाजून चाळीस मिनिटांनी आमच्या सर्वाच्या आवडीचा कार्यक्रम हिंदी चित्रपट संगीत.

सकाळचे सहा ते नऊ दरम्यान सर्व कामे आटोपत सर्व कुटुंब आकाशवाणीचे हे कार्यक्रम मन लावून ऐकत. अनेकजण या कार्यक्रमाच्या वेळा पाहून ऊठत, कामावर जात, काय करायचे हे ठरवण,घड्याळ लावत. *सकाळचे दोन तीन तास निर्भेळ आनंद, करमणूक, माहिती, चिंतन, भक्ती, शक्ती सर्व काही मिळत असे. खुप आनंदाचा काळ होता तो !*

आज काय चालले आहे ते सांगायची गरज नाही. आज किती घरात रेडिओ एवढा तीन तास ऐकला जातो हे शोधावे लागेल. किती जण सहा वाजता उठतात हा दुसरा शोध घ्यावा लागेल. किती जण भक्ती संगीत,चिंतन ऐकतात हेही पहावे लागेल.पण उठल्या उठल्या टिव्ही लावायला लागतो असे खुप जण आढळतील. टीव्हीवर हिंदी गाणी बातम्या ऐकायला पहायला येतात , मात्र रेडिओची ती मजा नाही. आता तर उठल्या उठल्या टच स्किन मोबाईल हातात घेतल्या शिवाय दिवस सुरू होत नाही. लहान मुलं मोबाईल मागतात, नसेल तर टीव्ही लावतात. सकाळचे चिंतन करायला कोणाला वेळ आहे. भक्ती संगीतामध्ये खुप चाँईस आले आहेत. आकाशवाणी वरील उठी उठी गोपाळा, कानडा राजा पंढरीचा ऐकण्यात जी मजा होती ती टीव्हीवर माऊली माऊली पाहताना कधीच येत नाही.

रेडिओ ऐकायला मुलांना आवडत नाही. मग काय करायचे असा विचार काही दिवसांपूर्वी माझ्या मनात आला . मी सहज You Tube वर मोटीव्हेशनल स्पिच नावाने सर्च केल्यावर मला माहिती आणि ज्ञानाचा खजिनाच आढळला . शिवव्याख्याते नितिन बानगुडे पाटील, शिव खेरा यांच्यापासून विश्वास नांगरे पाटील यांच्यापर्यंत अनेक दिग्गजांचे मोटिवेशनल थॉट्स , भाषणे मला आढळली .ब्लूटूथ स्पीकर लावून रोज सकाळी ही ऐकण्याचा सपाटा गेले काही दिवस मी लावला आहे .

घरात देवयानी सह  सर्वजण माझ्या सोबत ही भाषणे ऐकतात. रोज अर्धा पाऊण तास चहा घेताना, निवांत बसल्यानंतर ऐकताना दिवसभराची ऊर्जा मिळत जाते. मुलांना मोबाईल देऊ नका असे सारेच म्हणतात मग काय द्या हे कोणी सांगत नाही. दुसरीकडे मोबाईलवर काय द्यायचे याची माहिती जर पालकांना असेल तर खूप चांगले पाहायला मिळते .

गेली महिनाभर रोज सकाळी आमच्या घरात मोटिवेशनल स्पीच भाषणे चहापाणी, व्यायामा वेळेस मी लावतो .पंधरा-वीस मिनिटे चांगले चिंतन होते. नितीन बानगुडे पाटील सरांच्या भाषणांमध्ये एक तरी गोष्ट असतेच. ही गोष्ट छोट्या मुलांना खूप आवडते त्यामुळे युट्युब वर या गोष्टी ऐकायला काही हरकत नाही.

*कुणाच्या हातात मोबाईल देऊन बघत बसण्याऐवजी मोबाईलचा स्पीकर लावून किंवा ब्लूटूथ स्पीकर लावून मोठ्या आवाजात फक्त भाषणे ऐकली तरी खूप आनंद मिळतो. हा आनंद मी गेली महीनाभर घेत आहे.*

कधी सकाळी कधी दुपारी कधी संध्याकाळी वेळ मिळेल तेव्हा युट्युब वरील मोटिवेशनल स्पीच सहकुटुंब ऐकण्यात खरच खूप मजा येत आहे. दिवसाची सुरुवात चांगली होते किंवा सायंकाळी ऐकल्यानंतर दिवसभराचा कंटाळा निघून जातो आणि नव्या दिवसाची नवी प्रेरणा मिळत जाते.

*काहीतरी वेगळं ऐकायला मिळालं म्हणून सांगण्याचा हा प्रयत्न*

धन्यवाद.

*सतीश वसंतराव मोरे*
    सतिताभ

karawadikarad.blogspot.com

२१.०२.२०१९

०६ फेब्रुवारी २०१९

स्मरण

स्मरण

आज मी ठरवलं
तुला फोन करायचा नाही !

आज मी ठरवलं
तुझ्या टेक केअर म्हणायचं नाही !

आज मी ठरवलं
तुझ्या वाटेला डोळे लावायचे नाहीत !

आज मी ठरवलं
तुला अजिबात मिस करायचं नाही !

आज मी ठरवलं
तुझं नावाचा पासवर्ड ठेवायचा नाही !

आज मी ठरवलं
तुझी आठवण काढायची नाही !

आज मी ठरवलं
तुला लव यु म्हणायचं नाही !

आज मी ठरवलं
तुझा डिपी फोटो पहायचा नाही !

आज मी ठरवलं
तुझ्याशी अजिबात बोलायचं नाही !

आज मी ठरवलं
तुझ्यावर प्रेमच करायचं नाही !

आज मी ठरवलं
तुझं लास्ट सिन पहायचं नाही !

आज मी ठरवलं
तुला भेटायला ये म्हणायचं नाही!

आज मी ठरवलं
तुझ्यासाठी झुरत बसायचं नाही !

आज मी ठरवलं
तुझं नाव हातावर लिहायचं नाही !

आज मी ठरवलं
तुझ्या आवडीचं काहीच करायचं नाही !

आज मी ठरवलं
तुला मेसेज करायचा नाही !

आज मी ठरवलं
तुला तु माझीच आहे म्हणायचं नाही !

आज मी ठरवलं
तुला काहीच सांगायचं नाही !

आज मी ठरवलं
तुला व्हाँटसअप करायचं नाही !

आज मी ठरवलं
दिवसभर आँनलाईनच रहायचं नाही !

आज मी ठरवलं
तुला काहीच सांगायचं नाही !

आज मी ठरवलं
तुझं स्मरण करायचं नाही !

आज मी ठरवलं
तुझ्या डोक्यात आणायचं नाही !

आज मी ठरवलं
तुझ्यासाठी डोळ्यात पाणी आणायचं नाही !

सखी,

आज मी फक्त ठरवतंच गेलो
पण माझे मला न कळले
हे सर्व करताना
मी तुझेच स्मरण करत राहिलो 😢

२४ जानेवारी २०१९

Community of 99 people

*अंतरंग*

अतिशय सुंदर गोष्ट आहे ,
वाचा,आपणास नक्की आवडेल!

*मी बारावीमध्ये असताना इंग्लिश पुस्तकात शिकलेला नंतर यादव मोरे क्लासेसमध्ये अनेकदा शिकवलेला एक धडा. मला लेखक आठवत नाही.*

*९९ लोकांची एक जमात*
*Community of 99 People*

एक गाव होतं. डोंगराच्या पायथ्याशी वसलेलं, त्या गावात ९९ स्त्री पुरुष रहात होते. सारे लोक अतिशय अतिशय कष्टाळू होते. दिवसभर काम करत. खाऊन पिऊन सुखी होते सारे. *त्या ९९ लोकांमध्ये एक अतिशय हुशार व्यक्ती होता.*

गावातील लोक रोज सकाळी पाणी आणण्यासाठी खुप लांब पायपीट करीत उंचावर असलेल्या झर्‍याजवळ जायचे. या कामासाठी त्यांचे रोज सकाळचे तीन चार तास खर्ची पडायचे. हे सर्व लोक हे काम पूर्ण झाल्यानंतर इतर कामाला लागायचे. त्या हुशार माणसाने याचा अभ्यास केला, माहिती घेतली,पाण्याचा प्रवाह कसा आहे याचे निरीक्षण केले आणि हे पाणी गावात कसे आणता येईल याचे नियोजन सुरू केले.

रात्रंदिवस काम केले, झरा ते गावापर्यंत पाणी प्रवाहाने आणण्यासाठी चर खोदायला त्याने सुरुवात केली. अनेक दिवस काम केले.शेवटी ते पाणी गावात आले,लोक खुश झाले.आता गावातच पाणी मिळणार, पाण्यासाठी चार तास घालवावे लागणार नाहीत, याचा सर्वानाच आनंद झाला.

आता मात्र त्या हुशार व्यक्तीने लोकांना पाणी देण्यासाठी एक  अट घातली. *मी तुम्हाला पाणी देईन मात्र त्या बदल्यात तुम्हाला मला तुमचा वेळ द्यावा लागेल. आज पर्यंत तुम्ही पाणी आणायला रोज चार तास घालवत होता,आता एका तासात तुमचे पाणी भरण्याचे काम होणार आहे, त्यामुळे तुमचे चार तास वाचतील. त्यापैकी ३ तास तुम्ही मला द्यायचे,अशी अट त्याने घातली.*

रोज पाणी आणायला लागणार्‍या वेळेच्या बदल्यात दोन तास त्या व्यक्तीला देऊन आपलेही दोन तास उरतात, हा व्यवहार इतर सर्वांना पटला. वाचलेला  वेळ हुशार व्यक्तीला द्यायची अट सर्वानी मान्य केली.

सर्व ९८ लोक हुशार व्यक्तीच्या घरी रोज २ तास कामाला येऊ लागले. घरातील स्वच्छता, शेती मशागत, कपडे धुणे, झोपडी बांधणे,जनावरांची काळजी घेणे, दुध काढणे आदी अनेक प्रकारची कामे हे  लोक करू लागले.

ही कामे करत असताना त्या हुशार व्यक्तीने अनेक लोकांना हेरले. त्याच्या असे लक्षात आले की 'म' नावाची व्यक्ती फळे फुले याची काळजी योग्य प्रकारे घेतोय, त्याला यात रस आहे. मग त्याने 'म' ने इतर सर्व लोकांच्या घरातील, शेतातील फळाफुलांची काळजी, मशागतीची कामे करायची. त्या बदल्यात इतर सर्व व्यक्तींनी त्याची इतर कामे करायची, असा निर्णय घेतला. पुढे ती व्यक्ती 'माळी' म्हणू लागले.

त्या हुशार व्यक्तीने प्रत्येक  लोकांमधील एक एक गुण हेरला.  पुढे त्याच्यातील सर्वोत्तम गुणाचे ते काम त्याला दिले, त्या बदलात इतर लोकांनी त्याला वेळ दिला. पुढे वेळेच्या जागेवर वस्तू आल्या आणि पुढे कामावर आधारीत व्यवस्था त्या गावात निर्माण झाली. 

चांगली कपडे शिवणारा शिंपी झाला, चांगले पशुसंवर्धन करणारा गवळी झाला. चांगली मातीची भांडी तयार करणारा कुंभार झाला. न्हावी,चर्मकार, लोहार, शेतकरी, गवंडी, गायक, वादक, धोबी असे अनेक *'कर्मकार'* झाले.

*काम चांगले करणारा कुशल कामगार तयार झाला,पुढे त्याची पत्नी, मुले, पुढची पिढी हेच काम करत राहीले व त्यानंतर त्याच नावाने, कामावरून त्यांना ओळखले जाऊ लागले. कामावर आधारित व्यवस्था, पुढे जाती व्यवस्था तयार झाली.*

© @ *सतिताभ*
सतीश वसंतराव मोरे

२४.०१.२०१९

karawadikarad.blogspot.com

१८ जानेवारी २०१९

फ्लेक्स बंदी निर्णय न ठरो वांझोटा



एक महिन्यापूर्वी सकाळी मंगळवार पेठेतील एका ब्राम्हण कुटुंबातून फोन आला होता. ‘पत्रकार,आमच्या भागात गुंडांचे खूप सारे फ्ले्नस लागले आहेत. आम्हाला घरात येणाऱ्या रस्त्यावरच हे फ्ले्नस लावले आहेत. कोणाला सांगायचे? नगरपालिकेला कळवायचे तर त्या फ्ले्नसवर एका नगरसेवकाच्या भावाचा फोटो आहे. पोलिसांना कळवायचे तर.. ते ही आमची जबाबदारी नाही, असे सांगून मोकळे होतात. असा या पूर्वीचा अनुभव आहे. त्यामुळे तुम्हीच यावर काहीतरी करा.!’ यानंतर ‘ आम्हाला त्या फ्ले्नस डॉनची आम्हाला भीती वाटते’ या आशयाची बातमी प्रसिद्ध केली होती. फ्नत बातमी प्रसिद्ध करुन आम्ही थांबलो नाही तर कराडचे कारभारी जयवंतराव पाटील आणि राजेंद्रसिंह यादव यांना प्रत्यक्ष भेटून या गोष्टींची दाहकता स्पष्ट केली होती. मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनाही भेटून आम्ही याबाबत कराड पालिकेने कडक कारवाई करण्याची गरज आहे. फ्ले्नस लावण्यासाठी त्या गुंडांच्या समर्थकांनी परवानगी घेतली होती हे जरी खरे असले तरी परवानगी घेऊन, पैसे भरून कोणाचेही, कसलेही फ्ले्नस लावायला केवळ उत्पन्नात भर पडते म्हणून पालिका परवनगी देणार असेल तर पालिका दुसरे धंदे का सुरु करीत नाही? असा खडा सवालही केला होता. पालिकेचे कारभारी आणि मुख्याधिकारी या दोघांनीही याबाबत एकमेकांकडे बोटे दाखविली. मात्र कराडमध्ये गुंड प्रवृत्तीच्या लोकांचे उदात्तीकरण होत राहिले तर यशवंतनगरी ‘गुंडनगरी’ होईल आणि हेच गुंड पुढे जाऊन पालिकेच्या राजकारणात येतील. समाजसेवेचा बुरखा घातलेले शस्त्र बाळगणारे गुंड जर कराडच्या राजकारणात येऊ घातले तर कराडच्या विकासावर याचा फार मोठा परिणाम होईल, अशा प्रकारची विनंती पालिकेच्या पदाधिकाऱ्यांना केल्यानंतर राजेंद्रसिंह यादव आणि जयवंतराव पाटील यांनी याबाबत लवकरच पालिकेच्या सभेत गंभीर दखल घेतली जाईल. प्रसंगी कराडात फ्ले्नस बंदीचा ठरावही घेतला जाईल, असे अभिवचन पुढारी प्रतिनिधींना दिले होते.



‘पुढारी’चे कराडच्या समाजकारणाशी गेल्या 30 वर्षांपासून बांधिलकी आहे. 1990 साली  पुढारी कराडात आला. तेव्हापासून कराड शहराच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, वैचारिक, शैक्षणिक आणि राजकीय जडण-घडणीत पुढारीने नेहमीच वाटा उचलला आहे. यशवंतराव चव्हाण साहेबांची कर्मभूमी, पी.डी. पाटीलसाहेबांचे गाव आणि पुढे आता माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांचे गाव म्हणून कराडचा देशभर नावलौकिक आहे. तो यशवंतराव चव्हाण, पी. डी. पाटील, यशवंतराव मोहिते, जयवंतराव भोसलेे, विलासकाका उंडाळकर, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या दूरदृष्टी असलेल्या विकास महापुरुषांमुळेच! कराडचा नावलौकिक टिकविण्याची आणि वाढविण्याची जबाबदारी नागरिकांवर, राज्यकर्त्यांवर जितकी आहे तितकीच लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून दैनिकांवरही आहे आणि याच भूमिकेतून आणि आम्हाला मिळालेल्या अधिकारातून ‘पुढारी’ने कराडच्या कारभाऱ्यांसमोर जी भूमिका मांडली, ती त्यांनी ऐकली, त्याबद्दल सर्वप्रथम त्यांचे अभिनंदन! आता यापुढे जबाबदारी आहे, केलेला ठराव, घेतलेला निर्णय प्रत्यक्षात उतरवण्याचा! 



स्वच्छ सर्व्हेक्षण या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत कराड पालिकेने नावलौकीक मिळवला आहे. दोन वर्षांपूर्वीचे कराड शहर आणि आताचे कराड शहर यात फार मोठा फरक झाला आहे. कराड शहरात कुठेही कचराकुंडी नाही हे सांगताना कराडकरांचा ऊर भरुन येतो. परवा मिडियामधील दिल्लीचे एक वरिष्ठ कराडात आले होते. कोल्हापूर ना्नयावर आल्यानंतर त्यांनी मला कराडची माहिती विचारायला सुरुवात केली. कराडची भौगोलिक व राजकीय माहिती सांगून झाल्यानंतर आमच्या शहरात कुठेही कचरा कुंडी नाही, हे मी त्यांना सांगितले. मात्र त्यांना ते पटलेच नाही. शेवटी मी त्यांना चॅलेंज केले. त्यांनी संपूर्ण शहराला फेरफटका मारला आणि कचरा कुंडी नसल्याचे पाहून ‘मैंने जिंदगी में पहली बार ऐसा सिटी देखा है’ असे कौतुक केले. 



स्वच्छता अभियानात कराडने केलेली कामगिरी, त्या माध्यमातून वाढविलेला लौकिक आणखी वाढविण्याची गरज आहे. या स्पर्धेत अजून खूप काही करायचे आहे. कराडला देशात नं.1 वर न्यायचे आहे. कराडचे मुख्याधिकारी यशवंत डांगे यांच्या सोबतीने विजय वाटेगांवकर, प्रियांका यादव यांच्यासारख्या स्वच्छतेसाठी वाहून घेतलेल्या पदाधिकाऱ्यांमुळे आणि नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली कराड नंबर 1 होईल याची खात्री आहे. याचाच एक भाग म्हणून पालिकेने शहर प्लास्टिक मु्नत करण्याचा निर्णय घेतला. रस्त्यावर कुठेही कचरा पडणार नाही यासाठी पालिकेचे आरोग्य कर्मचारी रात्रंदिवस झटत असतात. (या स्वच्छतेच्या शिलेदारांचा ‘पुढारी’ने वर्धापनदिनी सत्कारही केला होता.) सायंकाळी 6 वाजता बाजारपेठेत पडलेला कागद, उच्चभू्र लोकांनी रस्त्यावर टाकलेले वेफर्सचे रॅपर, चॉकलेट कॅडबरीचे कागद उचलताना या स्वच्छताकर्मींना पाहिले की, हेच कराडचे खरे ‘गाडगेबाबा’ आहेत, अशी खात्री पटते. कराड शहर आणखी सुंदर दिसण्यासाठी पालिकेने घेतलेला फ्ले्नस बंदीचा ठराव याचाच एक भाग आहे.  



मिसरुडही न फुटलेले आणि कर्तृत्व दीड फूटही नसलेले काही युवक  शहरात कुठेही दहा फुटी फ्ले्नस लावतात. त्याखाली डॉन, बादशाह, किंगमेकर, राडा, साहेब, भावड्या, नाद नाय करायचा.., आमचा कराल नाद.. तर व्हाल बाद, आमच्याशी वाकडं... त्याची नदीवर लाकडं.. , अशी वा्नये टाकून काय साध्य करतात, हे त्यांचं त्यांनाच माहित! हे फ्ले्नस बघून शाळेतली पोरं आणखी बिघडायला लागली आहेत. आईचे बोट धरुन चालणारा मुलगा भले मोठ्ठे फ्ले्नस बघून ‘आई, हा कोण आहे?’ असा प्रश्न विचारतो तेव्हा कोणत्या तोंडाने आणि काय याचे वर्णन करु असा प्रश्न आईला पडतो.  


विशी-तिशीतले हे युवक बिघडले खरे. मात्र त्यांना बिघडवणारे आणि त्यांना पाठींबा देऊन लाव फ्ले्नस.. तुला कोण काय करतंय? असे म्हणणारे, त्यांना पाठिंबा देणारे कराडचे काही मेहेरबानच आहेत. आता या मेहेरबानांनीच फ्ले्नस बंदीचा ठराव घेतला आहे. धन्यवाद! कोणत्याही परिस्थितीत कराडमध्ये यापुढे कुठेही फ्ले्नस यापुढे लागता कामा नये. कायदेशीर बाबींचा विचार करुन, परवानगी घेऊन खासगी ठिकाणी किंवा नगरपालिकेच्या मालकीच्या जागेत काही मुख्य चौकात फ्ले्नस किंवा बोर्ड लावण्याचे स्पॉट डेव्हलप करण्याची गरज आहे. मात्र याठिकाणी लावावयाचे बोर्ड फ्नत प्रेरणादायी असले पाहिजेत. मात्र कसल्याही परिस्थिती शहरात कुठेही, कसेही फ्ले्नस लागता कामा नयेत. मागे विनायक औंधकर यांनी याबाबतचा प्रयोग केला होता. मात्र फ्ले्नस बहाद्दर मेहेरबानांनी त्यांना पळवून लावले. आता डांगे यांनी सत्ताधाऱ्यांना फ्ले्नस बंदीचा ठराव केल्यामुळे कराड पालिकेचा कसा फायदा होणार आहे आणि स्वच्छ सर्व्हेक्षणमध्ये कराडचे नाव कसे उंचावणार आहे हे पटवून देण्याची गरज आहे. पालिकेत बसलेले कारभारी कुणाही गुंडाचा किंवा कोपऱ्यावरील युवा नेत्याचा बोर्ड लावण्यासाठी दबाव टाकत असतील तर त्यांची नावे मुख्याधिकाऱ्यांनी मिडियाकडे जाहीर करावीत. कायदेशीर फ्ले्नस, होर्डिंग्जला परवानगी देताना त्यातील मजकूर, फोटो तपासून घ्यावे लागतील. पालिकेच्या परवानगीबरोबरच पोलिसांच्या परवानगीशिवाय फ्ले्नस लावता येणार नाही, असा दंडक करण्याची गरज आहे. 


सुदैवाने कराडचे पोलिस याबाबत सकारात्मक आहेत. कराडातील गुंड आणि गुंडगिरी संपविण्यासाठी पोलिसांनी गेल्या चार वर्षांत ठोक कारवाई केली आहे. पालिकेने सहकार्य केले तर फ्ले्नसद्वारे गुंडाचे होणारे उदात्तीकरण संपविण्यासाठी पोलिसही चार पावले पुढे टाकतील यात शंकाच नाही. शेवटचा एकच सल्ला... घेतलेला निर्णय अतिशय योग्य आहे. निर्णय घेणे सोपे असते. मात्र त्याची कार्यवाही करणे फार अवघड असते. पालिकेच्या पाठिशी कराडकर आहेतच! त्यामुळे निर्णय प्रभावीपणे राबवा. ‘पुढारी’ तुमच्यासोबत आहेच!


http://www.pudhari.news/news/Satara/Flexbandi-decision-does-not-end-up-in-Wanjhota/m/

१७ जानेवारी २०१९

ना बोलना जरूरी है

*अंतरंग*

*'ना बोलना बहुत जरुरी है'*

अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच्यासमोर बसलेत. कमिशनर गायतोंडे विजयला सांगतात, ज्याच्यासाठी तू काम करतोस त्यांना नाही.ऐकायला आवडत नाही आणि तु तर त्यांना नाही म्हणतो आहेस . यावर अमिताभ बच्चन (विजय)म्हणतो,

*'इस दुनिया मे तरक्की करने के लिए ना बोलना बहुत जरुरी है कमिशनर'*

खरंच बरच काही सांगून जातो हा संवाद ! आपल्या आयुष्यात अनेकदा आपल्याला 'नाही' म्हणण्याचे प्रसंग येतात. अगदी समोरच्या व्यक्तीने चहा घ्या म्हटल्यानंतर 'नाही' कसा म्हणू तिथंपासून एखाद्या व्यक्तीसोबत दिवसभर फिरायला जाऊन आपला चार पाच तास त्याच्या सोबत वाया घालवण्यास 'नाही' म्हणण्यापर्यंत!

आपण अयोग्य गोष्टीला 'नाही' म्हणू शकत नाही तेव्हा आपला वेळ,श्रम आणि शक्ती वाया जाते. काही गोष्टीना 'नाही' न म्हणल्यामुळे आजारपण ओढावते, संकटे येतात,मनस्ताप होतो. हे टाळायला शिकवणारा आणि या सर्वावर मात करायला शिकवणारा अमिताभ बच्चन यांचा 'ना बोलना बहोत जरूरी है' हा डायलॉग मला खूप आवडतो .

खरंच योग्य ठिकाणी जर आपण नाही म्हणायला शिकलो तर पुढील अनेक अनर्थ टळतात. एकदा नाही म्हणलं तर समोरच्या व्यक्तीला एक वेळ राग येईल, दोनदा नाही म्हणले तर आणखीन राग येईल आणि तिसऱ्यांदा तो तुम्हाला त्या गोष्टीसाठी फोर्स करणार नाही.

कोणत्या कोणत्या गोष्टीला नाही म्हणालं शिकले पाहिजे? जी गोष्ट केल्यामुळे आपल्या शरीराचे नुकसान होणार आहे ,जी गोष्ट केल्यामुळे आपला कोणताही फायदा होणार नाही,आपला वेळ वाया जाणार आहे,आपल्याला ती गोष्ट घडल्यानंतर मनस्ताप करावा लागणार आहे, आपल्याला त्या गोष्टीतून फक्त वेदनाच होणार आहेत, ज्या गोष्टी केल्याची आपणास, आपल्या कुटुंबाला लाज वाटेल,अशा कोणत्याही गोष्टीला आपण 'नाही' म्हणायला पाहिजे.

   *नाही कशी म्हणू तुला*
 
खूप वेळा असं होत की "नाही" कसं म्हणावं या संकोचामुळे आपण बळजबरीने आपल्याच मनाला मारत "हो" म्हणतो. मग नंतर पश्चाताप होतो. या प्रश्नांवर एकचं उत्तर म्हणजे 'नाही' म्हणा पण अतिशय नम्रपणे.

"नाही" म्हणायच्या काही खास पद्धती आहेत. ज्या तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरतील...

# *मी नाही म्हणण्याने माझ्या पेक्षा तुमचाच फायदा होणार आहे*

# *-"मला मदत करायला खुपच आवडले असते. पण मी बांधील असलेल्या इतर काही कामांमुळे तुमचे काम मला योग्य वेळेत पूर्ण करणे शक्य होणार नाही..."*-

# *"क्षमा करा पण सध्या मी ज़रा व्यस्त असल्याने मला तुमच्या कामासाठी ही वेळ योग्य वाटत नाही. पुढील महिन्यात केले तर नाही का चालणार? "*

# *"तुमची योजना खरंच चांगली आहे. पण तरीही मला विचार करायला काही अवधी लागेल. मी तुम्हाला अमुक एक दिवसांनंतर संपर्क केला तर चालेल का?"*

# *" 'अमुक अमुक' कारणामुळे मला ताबडतोब निर्णय देणे शक्य नाही. तरीही कृपया मला विचार करायला ज़रा वेळ दयाल का?"*

# *"मला असे वाटते की 'अमुक अमुक' कारणामुळे मी यासाठी योग्य व्यक्ती नाही. तुम्ही 'अमुक अमुक' व्यक्तिशी का नाही बोलत?"*

# *माफ़ करा पण मला यावेळी खर्च करणे शक्य नाही.मी तुम्हाला मदत करू शकत नाही*

# *हे माझ्या तत्त्वात बसत नाही मी हे केले तर माझं मन मला माफ करणार नाही*

एवढं करूनही समोरची व्यक्ती फारच आग्रही असल्यास कोणतेही कारण देण्याच्या फंदात न पड़ता त्या व्यक्तिला  स्पष्ट 'नाही' म्हणा. शेवटी *एखादया कामाला 'हो' किंवा 'नाही' म्हणणे हे पूर्णतः वैयक्तिक इच्छेवर अवलंबून असते*. त्यामुळे कोणाला काय वाटेल याचा फारसा विचार न करता अत्यंत नम्रपणे आणि आत्मविश्वासाने स्पष्ट बोलणे अधिक योग्य !

©@ सतीश वसंतराव मोरे
*सतिताभ*

१७.०१.२०१९

karawadikarad.blogspot.com

१६ जानेवारी २०१९

आवा चालली पंढरपूरला

*अंतरंग*

*परिसे गे सुनेबाई |*
*नको वेचू दूध दही ||१*
*आवा चालीली पंढरपुरा |*
*वेसींपासुन आली घरा ||२*
*ऐके गोष्टी सादर बाळे |*
*करि जतन फुटके पाळे ||३*
*माझा हातींचा कलवडू |*
*मज वाचुनी नको फोडूं ||४*
*वळवटक्षिरींचे लिंपन |*
*नको फोंडू मजवाचून ||५*
*उखळ मुसळ जाते |*
*माझे मनं गुंतले तेथे ||६*
*भिक्षुंक आल्या घरा |*
*सांग गेली पंढरपुरा ||७*
*भक्षी परिमित आहारु |*
*नको फारसी वरों सारू ||८*
*सुन म्हणे बहुत निके |*
*तुम्ही यात्रेची जांवे सुखे ||९*
*सासुबाई स्वहित जोडा |*
*सर्वमागील आशा सोडा ||१०*
*सुनमुखीचे वचन कानी |*
*ऐकोनी सासु विवंची मनी ||११*
*सवतीचे चाळे खोटे |*
*म्या जावेसे इला वाटे ||१२*
*आता कासया यात्रे जाऊ |*
*काय जाऊन तेथें पाहू ||१३*
*मुले लेकरे घर दार |*
*माझे येथेंचि पंढरपूर ||१४*
*तुका म्हणे ऐसे जन |*
*गोवियेलें मायेंकरून ||१५*

          *संत तुकाराम महाराज*

या अभंगावर आधारित निरूपण कीर्तन मी लहानपणी ऐकले होते. आज तो अभंग पुन्हा आठवायचे कारण दुपारी एक मित्र मला पंढरीच्या वारीबाबत विचारत होता.अठरा दिवस तुम्ही वारीला कसे जाता, इथलं सोडून तिथं कसं जमतं तुम्हाला ,असा सवाल त्याने मला केला. वारीला आला कि तुला हे सर्व कळेल ,तु चल तर वारीला असे बोलून त्याला मी या अभंगाच्या दोन ओळी ऐकवल्या. संसारातून पाय न निघणाऱ्या मानवाचे अतिशय सुंदर चित्रण संत तुकाराम महाराज यांनी अभंगातील खुमासदार गोष्टीतून वर्णन केले आहे.

आवा नावाची महिला पंढरीला यात्रेला चालली आहे. घरातून ती बाहेर पडते खरी पण तिला काहीतरी आठवते आणि ती वेशीपासूनच घरी परत येते. प्रपंचाच्या अनेक साधनामध्ये तिझे मन गुंतले आहे.तीला घरातील प्रत्येक वस्तूची काळजी वाटते. मी पंढरीला गेल्यावर त्याचे काय होणार या विवंचनेत ती परत येऊन सुनबाईला सांगते,या सगळ्यां वस्तुंची काळजी घे. कोणी भिक्षा मागायला आला तर त्यांना काही देऊ नको, तुझी सासू पंढरपूरला गेली असं सांग. सासुबाईंच्या एवढया सुचना व आदेश ऐकून शेवटी सुनबाई त्यांना सांगते, सासुबाई तुम्ही आरामात जावा , मी सर्व काळजी घेईन.पाठीमागील सर्व आशा सोडा असा सल्ला देत तुम्ही बिनधास्त पंढरपूरला जावा असे सुनबाईने सुनावल्यानंतर सासुबाई तापते आणि तिच्या उद्देशाबद्दल संशय घेऊन तिला सवतीची उपमा देते अन् म्हणते, मी इथून जावे असे हिला वाटतंय,पण मी जाणार नाही.कारण माझे घर-दार, माझी मुले- लेकरे हेच माझे पंढरपुर आहे असे सांगून पंढरपूरला जायचे रद्द करते.

*आपल्या समाधानासाठी घरदार मुले लेकरे यांनाच परमेश्वर आणि तिर्थक्षेत्र मानण्यापर्यंत या लोकांची मजल जाते कारण त्यांचा संसारातून पाय निघत नाही,असे तुकाराम महाराज म्हणतात.*

पंढरीच्या वारीला मी ह्या वर्षी नक्की येणार, मला तुमच्या बरोबर घेऊन जावा असे सांगणारे मला अनेक मित्र भेटले आहेत. न विसरता मी प्रत्येक वर्षी त्यांना आठवण करतो जून महिन्यात मात्र त्यांना त्यावेळेला बरोबर अडचणी येतात, हा अभंग हेच तर सांगतो.

माझ्या शिवाय जगाचे कसे होणार, मी जर गावात थांबलो नाही तर गावाचे कसे होणार ,माझ्या संसाराचे काय होणार ,माझ्या कामाचे काय होणार, माझ्या नोकरीचे काय होणार, माझ्या मुलाबाळांचे काय होणार, माझ्या व्यापाराचे काय होणार, नगराचे काय होणार याची चिंता करत बसलेल्या लोकांना देवाची आठवण येते खरी पण फक्त संकटातच. मोह ,माया,लोभ आणि विषयसुखाच्या आहारी गेलेल्या मानवाची अवस्था या अभंगातून संत तुकाराम महाराजांनी मांडली आहे.

©@ सतीश वसंतराव मोरे
*सतिताभ*

१६.०१.२०१९

karawadikarad.blogspot.com

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...