फॉलोअर

१४ जानेवारी २०१९

रोजच गोड आणि आदरार्थी बोलू या

*अंतरंग*

*तिळगुळ घ्या आणि आदराने बोला*

आज मकर संक्रांतीदिनी आपणास गोड शुभेच्छा.

तिळगुळ आणि गोड बोलण्यावरून माझ्याअनेक आठवणी आहेत. खरंतरं तिळगुळ देऊन गोड बोलणे हा फक्त एकाच दिवशी करण्याचा सण नाही, रोजच गोड बोलण्याचा दिवस आहे.या जगात सर्व काही गोष्टी ,ज्या शक्य आहेत त्या गोड बोलण्याने होऊ शकतात. मग एकच दिवस का गोड बोलायचे ?

तुम्ही कुठेही जाल तिथे सभ्यतेने, तेथील नियमाप्रमाणे,शिस्तीप्रमाणे राहिला,वागला आणि गोड बोलला तर तुमची कामे सहज होतात.(याला काही शासकीय किंवा सार्वजनिक कार्यालये अपवाद असू शकतील). मात्र कुठल्याही ठिकाणी वावरताना आपली भाषा जर योग्य असेल, सभ्य आणि आदराची असेल तर समोरच्यांची भाषा आपोआप सभ्य आणि मृदू होते हा माझा अनुभव आहे.

1990 च्या दरम्यान बारावीपास झाल्यानंतर मी करवडीत दहावीचे क्लासेस सुरू केले. तेव्हा अजित  यादव सर यांचे ओगलेवाडी येथे गणित विषयाचे क्लासेस सुरू होते. त्यांना इंग्लिश विषयासाठी पार्टनर हवा असल्याने आणि माझ्याकडे शिकणाऱ्या मुलांनी त्यांना माझ्याविषयी कल्पना दिल्यानंतर मी ओगलेवाडीला एकत्र क्लासेस सुरू केले .करवडीमधील मोरे क्लासेस ओगलेवाडीला मध्ये गेल्यानंतर यादव मोरे क्लासेस असे नामांतर झाले. अजित यादव हे कडेपूरचे.  खानदानी कुटुंबातील यादव हे सनातन पद्धतीचे, परंपरा मानणारे होते. यादव सरांचा स्वभाव अतिशय मनमिळावू होता. त्यांच्या सोबतीने क्लास सुरू केल्यानंतर त्यांच्यातला एक गुण मला खूप आवडला,तो म्हणजे इतरांना आदर द्यायचा !

कितीही छोटा, कितीही मोठा मनुष्य समोर आला तर त्याच्याशी आदराने , प्रेमाने आणि अहो जावो बोलवायचे. कोणाशीही एकेरी भाषेत बोलायचे नाही, या त्यांच्या सवयीची मी कॉपी केली आणि त्याचे अनेक फायदे होत गेले.

इयत्ता पाचवीमधील 10 वर्षाच्या मुलापासून अगदी बारावीमध्ये शिकणाऱ्या 17 वर्षाच्या मुलांना आम्ही 'आहो जाहो' बोलायला लागलो. ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या हायस्कूलमधील शिक्षक एकेरी ,गावरान आणि शिवराळ भाषेत बोलत होते, त्यांचा अपमान करत होते त्या विद्यार्थ्यांना आम्ही आदराने बोलवतो हेच पटत नव्हते.

अनेक विद्यार्थ्यांनी आम्हाला सर , तुम्ही आम्हाला एकेरी बोलवत जा,अशी विनंती केली. मात्र आम्ही आमची सवय सोडली नाही आणि त्याचा फायदा आम्हाला होत गेला. जे विद्यार्थी शाळेतील शिक्षकाविषयी बाहेर वाईट बोलायचे, आमचे सर वर्गात काही शिकवत नाहीत फक्त टाईमपास करतात असे सांगायचे, ते विद्यार्थी कधीही आमच्या विषयी किंवा क्लासेस विषयी वाईट बोलले नाहीत.आमचा निकालही चांगला होता, शिकवण्याची पद्धत सोपी आणि सहज होती आणि आमची इतरांसोबत बोलण्याची सवय आदराची होती. त्यामुळे आमचा क्लास ओगलेवाडी पंचक्रोशीत खूप लोकप्रिय झाला. पुढे आम्ही बनवडी कॉलनीमध्ये त्याची शाखा काढली.

हे सर्व सांगण्याचे कारण समोरच्या आलेल्या कोणत्याही व्यक्तीला 'एकेरी' बोलवायचे नाही, भले तो मोठा असो लहान असो किंवा पदाने तुमच्या पेक्षा खुप लहान असो, समोरच्या माणसाला आदराने बोलावले तर तो आपोआप तुमच्याशी आदराने बोलतो. तुम्ही त्याचे आडनाव घ्या किंवा त्याला नावाने बोलवा मात्र कधीही एकेरी भाषेत बोलू नका , बघा काय परिणाम होतो त्याचा !

कराड शहरातील माझ्या पेक्षा वयाने लहान असो वा मोठ्ठया पत्रकारांना, व्यक्तिंना मी कधीही एकेरी भाषेत बोलायचे मी टाळतोच.आदर दिल्याशिवाय आदर मिळत नाही. गोड बोलले की आपोआप पुढचा माणूस तुमच्याशी गोडंच बोलतो आणि आपले काम पूर्ण होते.

परवा एका ठिकाणी एक पाटी वाचली होती. 'कृपया आत येताना आपल्या चपला आणि इगो बाहेर ठेवून या'

खरं आहे हे. आपण जेव्हा नवीन ठिकाणी जातो तेव्हा जाताना आपल्या मनात इगो झालेला असतो. मी या पेपरचा मोठा पत्रकार ! मी या शाळेचा मुख्याध्यापक  ! मी बँकेचा मॅनेजर ! जिल्हा परिषद सदस्य ! अमुक कंपनीचा मालक, बिल्डर ! मी मोठा राजकारणी ! मी कराडचा मोठा मेहरबान ! असे स्वतःसोबत घातलेले इगोचे मोठे आवरण घालून आपण समाजात वावरत असतो. समोरच्या व्यक्तीला तुम्ही मला ओळखले नाही का मी कोण आहे ? तुला माहिती आहे का?  असे मोठ्या ताठरपणाने आपण विचारतो.

खरं तर समोरच्या व्यक्तीला भेटल्यानंतर त्याला आपली ओळख सांगणे हे आपले कर्तव्य असते. कारण तुमच्या चेहऱ्यावर,  शर्टावर कुठेही लेबल लावलेले नसते की तुम्ही मोठे नगरसेवक आहात, मोठे राजकारणी किंवा पत्रकार आहात. नवख्या ठिकाणी गेल्यानंतर आपण आपली ओळख सांगत, समोरच्या व्यक्तीला आणि त्याच्या खुर्चीला मान देऊन जर आपली ओळख सांगून त्याला एखादे काम सांगितले तर ते नक्की पूर्ण होऊ शकते, नव्हे होतेच हा माझा अनुभव आहे !

गोड बोलण्याची आपणास सवय लागली पाहिजे. मला आयुष्यात कोणत्याही ठिकाणी कसलीही अडचण आलेली नाही. कोठेही गेल्यानंतर आपली ओळख सांगण्याअगोदर आपला स्वभाव , समोरच्यांशी बोलण्याची आपली पद्धत ,त्याच्याकडून माहिती काढण्याची कौशल्य, आपण दाखवलेली नम्रता यावरून तोच माणूस शेवटी तुम्हाला मी तुमच्या साठी काय करतो असे बोलून तुमचं नाव काय ? तुम्ही काय करता? असं विचारतो.

टेलिफोन एक्सचेंज असो बँके असो अथवा शासकीय कार्यालयामध्ये असो, आपण एखाद्या व्यक्तीसमोर गेल्यानंतर त्याच्याशी गोड बोलले पाहिजे. आपले काम थोडक्यात सांगितले पाहिजे, हे काम सांगितल्यानंतर त्याच्याकडून नक्की सकारात्मक प्रतिसाद मिळतोच !

माझे एक मुंबईचे जवळचे पत्रकार मित्र आहेत, उदय तानपाठक. मुंबईला गेल्यानंतर त्यांच्यासोबत मी अनेकदा  हॉटेलमध्ये जेवायला गेलेलो आहे. उदय तानपाठक हे मुंबई नव्हे राज्यभर पत्रकारिता क्षेत्रातील फार मोठे नाव आहे. अतिशय मनमिळावू स्वभावाचा हा माणूस कुठेही गेल्यानंतर   पुढच्या व्यक्तीला जिंकतोच. प्रेस क्लब आँफ मुंबईच्या बिल्डींग मधील भव्य अशा हॉटेलमध्ये मी त्यांच्यासोबत अनेकदा जेवायला गेलेलो आहे. तिथे गेल्यानंतर तानपाठक हे हॉटेलमधील वेटरशी प्रेमानेच बोलतात . अनेकवेळा हॉटेलमध्ये गेल्यामुळे त्यांना तेथील वेटरची नावेही पाठ आहेत. त्यांना नावानिशी बोलल्यानंतर ते पहिल्यांदा त्या वेटरच्या खिशामध्ये पन्नास शंभर रुपयाची नोट ठेवतात आणि आज काय चांगलं आहे, काय फ्रेश आहे हे तूच सांग आणि तूच घेऊन ये,असा प्रेमळ आदेश त्याला देतात. खरंतर वेटरला ए बारक्या, ए पिंट्या, ए पोरा इकडे ये,असे एकेरी नावाने हाक मारणे सर्वत्र आपण पाहिले आहे. पण कोणत्याही हॉटेलमधील वेटरची ओळख करून ,त्याचे नाव गाव विचारून आणि त्यापुढे जाऊन त्याला नावाने हाक मारली तर तो तुमच्याशी अतिशय चांगल्या पद्धतीने वागतोच शिवाय तुम्हाला चांगली सेवाही देतो. कारण त्याला त्याच्या नावाने हाक मारणारे फक्त त्याचे काही जवळचे मित्र, घरचे लोक असतात. तुम्हीही त्याला नावाने हाक मारली, त्याच्याशी थोडेसे प्रेमाने बोलला तर तुमची अनेक कामे चांगली होतील, तुम्हाला चांगली सेवा होईल आणि तुम्हाला एक चांगला मित्रही मिळेल,जो तुम्ही जेव्हा त्या हॉटेलमध्ये जाल तेव्हा तुम्हाला अतिशय चांगली सेवा देईल.

जगातील प्रत्येक व्यक्तीला मान सन्मान आहे , प्रत्येक व्यक्ती ही अप्रतिम,वेगळी आहे. त्याच्याइतकी मोठी,असामान्य व्यक्ती तुम्हाला इतरत्र कुठेही मिळू शकणार नाही.(कदाचित तुम्हाला त्याच्यापेक्षा मानसन्मानाने मोठी व्यक्ती मिळेल मात्र त्या व्यक्ती इतकी मोठी व्यक्ति इतरत्र मिळणार नाही)

प्रत्येक वस्ती ही असामान्य आहे, असाधारण आहे, त्याच्यामध्ये असणारे गुण तुम्हाला कुठेही मिळणार नाही, इतर कोणामध्येही मिळणार नाहीत .म्हणून प्रत्येक व्यक्तीशी आपण सन्मानाने बोलले पाहिजे आणि यातच आपले खरे सुख आणि सौख्य सामावले आहे.

आजपासून आपण सर्वांशी आदराने बोलूया. तुमच्या समोर आलेल्या कोणाही व्यक्तीला एकेरी नावाने बोलवू नका.अहो जाहो म्हणजेच आदराने बोलवा. बघा काय चमत्कार घडतात ! समोरचा माणूस तुमच्यामध्ये झालेला बदल पाहून तुमच्या प्रेमात पडेल आणि तुमची कामे होत जातील !

घरातील, काही जवळचे लोक, शाळेतील मित्र मैत्रिणी यांना एकेरी बोलणं हा झाला प्रेमाचा भाग. मात्र तोच मित्र, ती मैत्रीण आज मोठ्या पदावर असेल तर त्याच्याशी सार्वजनिक ठिकाणी बोलताना आदरानेच बोलले पाहिजे. अमकातमका माझा क्लासमेट आहे, तो किती ... आहे मला माहिती आहे ! त्याचे पराक्रम मला माहित आहेत,  त्याला साधी पॅन्टही बांधता येत नव्हती,अशाप्रकारे ओळख दाखवण्याच्या नादात त्याचा अपमान करू नका. तुम्ही दोघे जेव्हा एकत्र येता तेव्हा तुम्ही त्याच्याशी एकेरी बोला मात्र आपल्या उच्चपदस्थ मित्राची पब्लिक ठिकाणी आदरानेच बोलले पाहिजे.

मकर संक्रांती दिनी आजपासून सर्वांशी गोड बोलण्याबरोबरच आदराने ही बोलायला शिकूया ! बघूया पुढच्या मकर संक्रातीपर्यंत तुम्ही किती लोकप्रिय होता ते !

©@ सतीश वसंतराव मोरे
*सतिताभ*

१५.०१.२०१९

karawadikarad.blogspot.com

११ जानेवारी २०१९

टिळकचे दोस्त

*अंतरंग*

आपण कोणाशी सोबत केली पाहिजे याबाबत लहानपणी माझ्या वडिलांनी दादांनी मला दिलेला सल्ला मला चांगलाच आठवतोय. 1982 मध्ये  कराडच्या टिळक हायस्कूलमध्ये पाचवीच्या वर्गात मला माझ्या वडिलांनी मुद्दामहून प्रवेश घेतला. हा प्रवेश घेताना सहकार्य केलेल्या एका क्लर्कना आमच्या घरी जेवायला आणलेलं पण मला आठवतंय. खरंतर करवडी गावात सातवीपर्यंत प्राथमिक शाळा होती, ओगलेवाडीला पण हायस्कूल होते.  करवडी गावातून कराडला शाळेला पाठवायचे म्हणजे खर्चिक होते, मात्र *शिक्षणासाठी पैसे घालणे म्हणजे योग्य ठिकाणी भांडवल गुंतवणे अशा विचाराचे माझे दादा होते.*

टिळक हायस्कूलमध्ये अनेक मोठे विद्यार्थी घडले आहेत, तेथे प्रवेश घेतला तर माझा मुलगा हुशार मुलांच्या संगतीत राहील आणि तो यशस्वी होईल असा माझ्या वडलांना विश्वास होता.

मला कराडला शाळेला घातल्यानंतर सुरुवातीपासूनच त्यांनी मला सांगितले होते, तु करवडी गावात हुशार असशील, तुझा करवडीत पहिला नंबर आला आहे मात्र तिथे कराडात तुझ्यापेक्षाही खुप बुद्धीमान मुले आहेत. *तिथे तुझ्यापेक्षा जास्त मार्कस असणाऱ्या मित्रांच्या बरोबरच तु संगत केली पाहिजेस.* तुझे मित्र ब्राह्मणाचे असले पाहिजेत, व्यापारी समाजातील असले पाहिजेत, राजकीय संबंधित असले पाहिजेत.

माझ्या दादांना हे सांगताना कोणताही जातीभेद व्यक्त करायचा नव्हता तर समाजात कोणत्याही जातीपातीच्या  घटकांकडे जे चांगले गुण आहेत त्यांच्याकडून ते गुण तु घेतले पाहिजेत, असे त्यांना मला सांगायचे होते. सर्वोत्कृष्ट निकालाची, यशाची परंपरा असणार्‍या टिळकमध्ये राहून तू हुशार झाला पाहिजे, असा मला त्यांचा सल्ला असायचा.

*व्यापारी वर्गातील मुलांच्या कुटुंबातील मुलांच्या मैत्रीमुळे  व्यापार करणे किती आणि कसे योग्य असते हे तुझ्या लक्षात येईल. हुशार मुलांच्या सोबत राहून तुला त्यांच्या इतके गुण मिळवण्याची प्रेरणा मिळेल असे माझे माझ्या दादा मला नेहमी सांगायचे .*

माणसाच्या जीवनात संगतीला फार महत्त्व आहे. Man is known by the company he keeps असा एक इंग्रजी सुविचार आहे. *मला तुमच्या मुलाचे मित्र सांगा मी तुम्हाला तुमच्या मुलाचे भविष्य सांगतो, या आशयाचेही एक सुवचन आहे.*

टिळक हायस्कूल मध्ये मला मिळालेले दिपक तडक,नितिन कुलकर्णी, चिंतामणी कुलकर्णी,  दिपक काकडे, विनायक गरुड, विनायक जुगे,मनोज विजापुरे, मिलिंद नवाळे, हिरा भंडारी, डायालाल खंडेलवाल, सागर जोशी, हिदुंराव यादव, शहाजी यादव, फारूक शेख, इनामदार, जयंत जोशी, प्रशांत पाटील, सुभाष पाटील, दिपक पाटील, उमेश देशपांडे हे सर्व जातीधर्माचे मित्र म्हणजे माझे सल्लागार ,आधार होते. टिळक मुळेच मी जो काय आज आहे तो आहे. मित्रांनी मला खूप छान साथ सोबत दिली. अगदी दुपारचा डबा शेअर करण्यापासून सायकलवर टीबल सीट बसवून बस स्टँडवर सोडण्यापर्यंत,अभ्यासात मदत करण्यापासून कराडातील बोळ न् बोळ दाखविण्यापर्यंत, सरांचा मार कसा आणि गणिताचा तास कसा चुकवायचा , याचे ज्ञान मला मिळालेल्या मित्रांमुळेच प्राप्त झाले आहे.

(पूर्वार्ध)

©@ सतीश वसंतराव मोरे
*सतिताभ*

११.०१.२०१९

karawadikarad.blogspot.com

१० जानेवारी २०१९

देत रहा

*अंतरंग*

कराडच्या टिळक हायस्कूलमध्ये माझे शालेय सर्व शिक्षण झाले. प्रत्येक वर्षी जुलै महिन्यात आमच्या शाळेत उपक्रम राबवला जायचा , त्याचं नाव होतं विद्यार्थी दानकलश योजना !  गोरगरीब, गरजू विद्यार्थ्यांसाठी गरजू विद्यार्थ्यांसाठी इतर सर्व विद्यार्थ्यांकडून किंवा दानशूर व्यक्तींच्या कडून देणगी गोळा करून गरीब विद्यार्थ्यांना शालेय गणवेश, वह्या पुस्तके याचे वाटप केले जायचे .

हा कार्यक्रम आमचे कडक शिस्तीचे पण विद्यार्थीप्रिय मुख्याध्यापक रा.गो. प्रभुणे यांच्या प्रमुख उपस्थितीत होत असे. या कार्यक्रमादरम्यान प्रत्येक वर्षी प्रभुणे सरांचे भाषण असायचे. स्पष्ट आणि कडक आवाजात त्याचे ऐकलेलं भाषण आजही कानात घुमतंय. ते म्हणत, आपल्या कडे जे काही देता येईल ते आपण द्यायला हवे. दान करण्याइतका जगात दुसरा कोणताही आनंद नाही. *देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे ,घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे .*

भाषण संपल्यानंतर विद्यार्थ्यांना वस्तू वाटल्या जायच्या. वस्तू वाटल्यानंतर त्या मुलांच्या चेहर्‍यावर जे समाधान दिसायचे ते समाधान फक्त आम्हाला त्यावेळी कळत, दिसत होते. मात्र प्रभूणे सरांनी जे वाक्य सलग सहा वर्षे आमच्या कानावर बिंबवले होते त्याचा खरा अर्थ आज समजू लागला आहे.

खरंच आपल्याजवळ आहे ते देण्यात जो आनंद आहे ,जी मजा आहे ती घेण्यात कधीच नसते. घेणाऱ्याचे हात नेहमी पसरलेले असतात, देणार्‍यांचे हात नेहमी आतुरलेले असतात. देताना हाताची पाच बोटे एकत्र असतात.

'कराग्रे वसते लक्ष्मी'
म्हणजे आपल्या बोटात, हातात लक्ष्मी असते. पाच बोटातील लक्ष्मी (पाच बोटे) आपण जेव्हा एखादी वस्तू देतो तेव्हा एकत्र येते, मात्र ही पाच बोटे दुसऱ्या कडून काहीही घेताना लांब जातात. (करून पहा)

एकत्र आलेली लक्ष्मीदेवी  तुम्हाला इतरांना द्या, समाजातील दीन दुबळ्या लोकांना दान करा, तुमच्या आयुष्यात आनंद आला आहे आता त्याच्या डोळ्यात आनंद आणा असे सांगत असते.

कालच यशवंत महोत्सवाच्या कार्यक्रमात बोलताना अतुल शास्त्री भगरे गुरुजी म्हणाले , कोट्यवधी रुपयांची संपत्ती असणारे,अफाट श्रीमंत असणारे लोक पुन्हा रस्त्यावर आलेले तुम्ही पाहिले असतील. करोडपती रोडपती झालेला तुम्ही पाहिला असेल ! मात्र  दान केलेली व्यक्ती रस्त्यावर आली आहे, भीक मागत आहे असे तुम्हाला कधीच दिसणार नाही.  कारण *दान करणारा माणूस कधीही गरीब होत नाही उलट तो श्रीमंत आणि समृद्ध होतो. तो जेवढे देतो त्या दुपटीने, चौपटीने देण्याची व्यवस्था ईश्वराने केलेली असते.*

©@ सतीश वसंतराव मोरे
*सतिताभ*

१०.०१.२०१९

karawadikarad.blogspot.com

०७ जानेवारी २०१९

फक्त हसुया तरी

*अंतरंग*

भारतीय वंशाचे तत्ववेत्ते रॉबिन सिंग यांचे एक पुस्तक खूप लोकप्रिय आहे. *'तुम्ही मेल्यावर कोण रडणार आहे ? Who will cry when you due? '* हे पुस्तक मी दोनदा वाचून काढले आहे. त्यात ते म्हणतात, मनुष्य जन्माला येतो तो किती दिवस जगतो यापेक्षा त्याने त्याला मिळालेल्या आयुष्यात जगासाठी काय केलं हे महत्त्वाचे असते. त्याने स्वतःसाठी काय केलं , कुटुंबासाठी काय केलं , किती संपत्ती मागे ठेवली याचा हिशोब नातेवाईक करतात. मात्र जग आठवणीत ठेवतं फक्त त्या व्यक्तीने समाजासाठी काय केले तेच !

पाठीमागे ठेवलेली संपत्ती त्याची मुले,मुलगी व नातेवाईक त्यांच्या पश्चात वापरतात ,काही जण त्यात भर घालतात ,काही जण विकून टाकतात मग काय माग राहतं?

एखाद्या व्यक्तीने केलेलं वेगळं काम हेच पाठीमाग राहतं. आपण केलेल्या काम चांगलं असेल तर पुढच्या अनेक पिढ्या त्या कामावर समाजात ताठ मानेने जगतात,आपल्या पूर्वजांनी केलेल्या कामात आपण काहीतरी भर घातली पाहिजे.आपला जन्म हा पूर्वजांनी मिळवलेली संपत्ती विकण्यासाठी नव्हे तर ती टिकवून ठेवत आणि सामाजिक कार्यात भर घालत समाजासाठी काहीतरी वेगळे करून दाखवण्यासाठी आहे.

समाजाचा आपल्यावर फार मोठा उपकार असतो. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत समाजातला प्रत्येक घटक आपल्यासाठी काहीतरी करत असतो.  प्रत्येक व्यक्ती मोलाची आणि महत्त्वाची आहे. या व्यक्तीच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आपण समाजाला काय दिले पाहिजे .

आपण समाजासाठी काय देऊ शकतो याचा विचार अनेकांना पडेल. मात्र आपल्या परीने जे काही देता येईल तेही आपण करू शकतो.

तत्त्ववेत्ते राँबिनसिंग असे म्हणतात, *तुम्हाला जर काही देता आलं नाही तर किमान रोज दिवसभरात पाच अनोळखी व्यक्तींच्या कडे बघून हसा, त्या व्यक्तीला आनंद द्या.* हसणे ही अशी वस्तू आहे की जी देण्यासाठी पैसे खर्च करावे लागत नाहीत .आपल्या समोर आलेल्या अनोळखी व्यक्तींकडे बघून हसल्यावर तोही आपल्याकडे बघून हसेल आणि आनंदाची देवाणघेवाण होईल.

*जगात आपण जन्माला आलोय आहे, आनंद लुटण्यासाठी ,आनंद वाटण्यासाठी !*

© @ *सतिताभ*

७.०१.२०१९

karawadikarad.blogspot.com

०६ जानेवारी २०१९

Art of understanding other people

*अंतरंग*

आपण जेव्हा एखाद्यावर आरोप करतो, त्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करतो किंवा त्याने केलेल्या चुकीबद्दल पापाबद्दल किंवा अव्यवहाराबाबत त्याला लगेच जबाबदार धरतो , तेव्हा आपण आपलं दुसरी बाजू पाहायला नेहमी विसरतो .

मला बारावीच्या इंग्रजी पुस्तकात एक धडा होता , *'आर्ट ऑफ अंडरस्टँडिंग आदर पिपल*'. त्यामध्ये वाचलेलं एक वाक्य मला अजूनही आठवते. आपण जेव्हा एखाद्याला जबाबदार धरून केलेल्या चुका बाबत त्याला पिंजऱ्यात उभा करतो तेव्हा आपण त्याच्या दुसऱ्या बाजूचा कधीही विचार करत नाही .

खरंतर दुसऱ्याला समजून घेणं ही फार मोठी कला आहे . एखाद्याने चूक केली किंवा न विचारता एखादी वस्तू घेतली, तुमच्या पासून एखादी गोष्ट लपवली तर आपण त्याला डायरेक्ट आरोपी समजतो, याला दोषी ठरवतो.  मात्र ते करण्यापूर्वी *त्याने ते का केलं असावं ? याचा विचारही आपण केला पाहिजे.अशा वेळी आपण पहिल्यांदा त्याच्या जाग्यावर आपल्या स्वतःला उभ करावं. त्याच्या नजरेतून आपल्याकडे पहायला हवं.* त्याने असं का केला असावं याचाही विचार करावा, त्याच्या जागेवर जाऊन  हे पाहिले तर कदाचित आपल्याला त्याची उत्तरे मिळतील.

आपण दुसऱ्याला समजून घेतले तर पुढील बरेच अनर्थ टळतील. रागाच्या भरात एखाद्यावर केलेले आरोप किंवा एखाद्याला दोषी ठरवले तर आपले नातेसंबंध तुटू शकतात. त्या व्यक्तीने असे का केले आहे हे जेव्हा आपल्याला समजल्यानंतर हळहळ करत बसण्यापेक्षा एखाद्याबाबत तात्काळ मत व्यक्त करू नका.

© @ *सतिताभ*

६.०१.२०१९

karawadikarad.blogspot.com

२२ डिसेंबर २०१८

सर्वांत लहान दिवस आणि सर्वात लहान रात्र

🌎🌞🌎🌞🌎🌞🌎
➖➖➖➖➖➖➖
*☑ २१ डिसेंबर......*
*आज असतो वर्षातील सर्वात लहान दिवस*
➖➖➖➖➖➖➖
वर्षातील प्रत्येक दिवस तसा वेगळा असतो.त्यामधील २१ डिसेंबर हा वर्षातील सर्वात छोटा दिवस असतो. याला विंटर सोलस्टाइस नावानेही ओळखले जाते. पृथ्वीच्या आपल्या अंतरावरील आवर्तना दरम्यान वर्षातील एक दिवस असा येतो जेव्हा दक्षिण गोलार्धात सूर्याचे पृथ्वीपासूनचे अंतर सर्वात जास्त असते. परिणामी २१ डिसेंबर हा दिवस वर्षाचा सर्वात लहान दिवस असतो आणि रात्र सर्वात मोठी असते. या दिवसाला विंटर सोलस्टाईस असे म्हटले जाते.

*🌀 सोलस्टाईस शब्द सोल्सटाइन या लॅटीन शब्दापासून तयार झाला आहे. त्याचा अर्थ ‘सूर्य स्थिर आहे’ असा होतोय.*

भारतात पावसाळ्यानंतर येणाऱ्या हिवाळ्यात रात्र मोठी असते आणि दिवस लहान होत. २१ डिसेंबर या दिवशी रात्र सर्वात मोठी आणि दिवस सर्वात लहान अशी स्थिती असते.
🔲🔲🔲
आजच्या दिवशी सूर्य दक्षिणायनातून उत्तरायणात प्रवेश करतो. २५ डिसेंबर पासून दिवस मोठा होण्यास सुरूवात होतो. २१ डिसेंबर रोजी सूर्य किरण हे मकर रेषेत लंबवत होत कर्क रेषेले तिरप्याहोत स्पर्ष करतात. यामुळे लवकर सूर्यास्त होतो आणि रात्र लवकर होते. पृथ्वी आपल्या कक्षेतून एक लाख पाच हजार किमी तासाच्या वेगाने सुमारे ८९ कोटी ४० लाख किमी लंब वर्तुळाकार कक्षेत सूर्याची परिक्रमा करते.
🔲🔲🔲

*🌀21 डिसेंबरसह वर्षातील 3 दिवस असतात खास.... वर्षातील प्रत्येक दिवस तसा वेगळा असतो मात्र खगोलशास्त्राच्या दृष्टीने वर्षातील चार दिवस हे महत्त्वाचे मानले जातात.*

21 डिसेंबरसह वर्षातील 3 दिवस असतात खास, जगभरात असे केले जातात सेलिब्रेट
वर्षातील प्रत्येक दिवस तसा वेगळा असतो मात्र खगोलशास्त्राच्या दृष्टीने वर्षातील चार दिवस हे महत्त्वाचे आणि खास असतात.

*🌞 21 डिसेंबर हा वर्षातील सर्वात छोटा दिवस असतो. याला विंटर सोलस्टाइस नावानेही ओळखले जाते.*

*🌞 याशिवाय 21 मार्च आणि 23 सप्टेंबर या दोन्ही दिवशी दिवस आणि रात्रीची वेळ समसमान असते. 21 जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो. या दिवशी वर्षातील सर्वाधिकवेळ सूर्य दर्शन होते.* 
🔲🔲🔲

*🌀21 डिसेबरचा दिवस सर्वात छोटा का?....*

पृथ्वीच्या आपल्या अंतरावरील आवर्तना दरम्यान वर्षातील एक दिवस असा येतो जेव्हा दक्षिण गोलार्धात सूर्याचे धरतीपासूनचे अंतर सर्वात जास्त असते. परिणामी 21 डिसेंबर हा दिवस वर्षाचा सर्वात लहान दिवस असतो आणि रात्र सर्वात मोठी असते. या दिवसाला विंटर सोलस्टाईस असे म्हटले जाते.
- 21 डिसेंबरला सूर्य दक्षिणायनातून उत्तरायणात प्रवेश करतो. या दिवशी सूर्य किरण हे मकर रेषेत लंबवत होत कर्क रेषेले तिरप्याहोत स्पर्ष करतात. यामुळे लवकर सूर्यास्त होतो आणि रात्र लवकर होते.
🔲🔲🔲
२१ डिसेंबर रोजी सूर्य सगळ्यात जास्त दक्षिणेकडे असतो. या बिंदूवर सुर्य असताना हा दिवस वर्षातील सर्वात लहान दिवस आणि सर्वात मोठी रात्र ठरते. दिवस व रात्रीचा कालावधी हा कमी अधिक होत असल्याचा अनुभव नेहमीच येतो. पृथ्वीचा अक्ष २३.५ अंशाने कललेला असल्याने हे घडते. याचाच परिणाम म्हणून सूर्याचे उत्तरायण व दक्षिणायणचा अनुभवसुद्धा येतो. कोणत्याही वस्तुच्या सावलीचे निरीक्षण केल्यास सूर्याचे दक्षिणायण व उत्तरायण सहज लक्षात येऊ शकतो. पृथ्वीवरील ऋतुसुद्धा अक्षाच्या कलतीच्या स्थितीमुळे निर्माण होतात. आकाशात वैष्विक आणि आयनिक वृत्ताचे दोन काल्पनीक छेंदन बिंदू आहे. यापैकी एका बिंदूत २२ मार्च रोजी सूर्य प्रवेश करतो, याला शरद संपात बिंदू असे म्हणतात, या दोन्ही दिवशी रात्रीचा व दिवसाचा कालावधी हा सारखाच असतो.
➖➖➖➖➖➖➖
🌎🌞🌎🌞🌎🌞🌎

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...