फॉलोअर

११ ऑक्टोबर २०१७

अमिताभ बच्चन वाढदिवस पुढारी विशेष

पुढारी साभार
महानायक@75
अमिताभ बच्चन @ 75 नजरेतून

भारतीय सिनेसृष्टीतील ‘पारंपरिक’ अभिनेत्याची सगळी परिमाणे बदलून टाकत 70 मि.मी. पडदा अमिताभ बच्चन या नावाने एकट्याने व्यापला. 1973 साली प्रदर्शित झालेल्या ‘जंजीर’मधील  ‘ये पुलिस स्टेशन है। तुम्हारे बाप का घर नही।’ असे डोळ्यांत अंगार फुलवून म्हणत त्वेषाने ‘खलनायक’च्या खुर्चीला लाथ मारणार्‍या ताडमाड अमिताभने कोट्यवधी लोकांच्या मनांचा ताबा घेतला आणि 2017 मध्ये टीव्हीच्या छोट्या पडद्यावर ‘देवी और सज्जनो आज हम खेलते है.. कौन बनेगा करोडपती..’  असे म्हणत सन्मानपूर्वक स्पर्धकाला खुर्ची देतो, तेव्हाही त्याने घेतलेला ताबा सुटलेला नाही.. आज अमिताभ वयाची 75 वी वर्षपूर्ती करीत आहेत.. त्यानिमित्ताने या महानायकाच्या आयुष्यातील वेचक आणि अशा वेधक नोंदी...

१. बीग बी यांचा ११ ऑक्टोबर १९४२ला अलाहाबाद येथे जन्म झाला.

२.प्रख्यात कवी हरिवंशराय बच्चन हे त्यांचे वडील. खरे आडनाव श्रीवास्तव कवी म्हणून स्वीकारलेले बच्चन हेच नाव ते वापरु लागले 

३. के. ए. अब्बास दिग्दर्शित सात हिन्दुस्तानी (१९६९) हा पहिला चित्रपट.

4. रेखा नायिका असलेल्या ‘दुनिया का मेलाफ’ मधून त्यांना काढून संजय खानला घेतले.

५. यार मेरी जिंदगी हा त्यांचा चित्रपट तब्बल 21 वर्षांनी पूर्ण झाला तर रुद्र, शिनाख्त, बंधुआ, टायगर, रिश्ता, सरफरोश असे चित्रपट मुहूर्ताला बंद पडले. 

६. कुलीच्या सेटवर 26 जुलै 1982 रोजी मारहाणीच्या दृश्यात ठोसा चुकवण्याच्या प्रयत्नात अमिताभ यांच्या पोटात टेबलाचा लागलेला कोपरा जीवघेणा ठरला. तेव्हा त्यांच्या तब्येतीला आराम पडावा, ते बरे व्हावे म्हणून देशभरातीलच नाही तर विदेशातील चाहत्यांनाही प्रार्थना केल्या. 

७. १९८४ मध्ये अलाहाबाद लोकसभा मतदारसंघातून हेमवतीनंदन बहुगुणा यांचा पराभव करून खासदार म्हणून लोकसभेत प्रवेश केला. 

८. खुदा गवाह (१९९२) नंतर त्यांनी काही काळ चित्रपटापासून दूर राहणे पसंत केले.

९. अमिताभ यांना कारचे प्रचंड वेड आहे. त्यांच्या ताफ्यात लेक्सस, रॉल्स रॉयल फैंटम, बीएमडब्ल्यू, मर्सडीज यांसारख्या कारचा समावेश आहे.

१०. सफेद रंगाची रॉल्स रॉयल फँटम ही 4.5 कोटींची गाडी प्रोड्युसर विधु विनोद चोप्रा यांनी ‘एकलव्य’ चित्रपटातील शानदार कामासाठी गिफ्ट केली होती. 

११. अमिताभ बच्चन यांनी एका ब्रिटीश कंपनीमध्ये काम करणारी एक महाराष्ट्रीयन मराठी मुलगी होती. बिग बींना तिच्याशीच विवाह करायचा होता. पण ते शक्य झाले नाही त्यामुळे नोकरी आणि कोलकाता दोन्ही सोडून ते मुंबईला आले होते.

१२. हिंदीमध्ये अमिताभ यांच्या डॉन,अग्निपथ,जंजीर या गाजलेल्या चित्रपटांचे रिमेक बनवण्यात आले.

१३. दक्षिणेत दीवार,नसिब,अमर अकबर अँथनी,जंजीर,कस्मे वादे आदि चित्रपटांचे रिमेक बनवण्यात आले.या प्रत्येक चित्रपटात रजनीकांत यांनी अमिताभ यांनी साकारलेली भुमिका केली.

१४. अमिताभ   यांचे  20 चित्रपटात नाव ‘विजय’ आहे. त्यानंतर अमित हे दुसरे सर्वाधिक वेळा वापरलेले गेले नाव होय. 

१५. अमिताभ यांनी दुहेरी भुमिका करण्याततही बाजी मारली आहे.डॉन,दि ग्रेट गॅबलर, आखरी रास्ता, देशप्रेमी, अदालत, सत्ते पे सत्ता, कस्मे वादे अशा अनेक चित्रपटात त्यांनी दुहेरी भुमिका केली.

१६. अमिताभ यांनी चित्रपटात गाणीही गायली आहेत.मि.नटरवलाल मधील मेरे पास आओ मेरे दोस्तो,लावारीसमधील मेरे अंगने मे.सिलसिलामधील निला आसमा सो गया  आणि रंग बरसे ही त्याची काही उदाहरणे.

१७.कारकीर्दीच्या उत्तरार्धात अमिताभ यांना अनेक चांगल्या भुमिका मिळाल्या. त्यासाठी त्यांनी गेट अपही बदलला. पा चित्रपटातील आजारग्रस्त लहान मुलाची भुमिका हे त्याचे सर्वोत्तम उदाहरण

१८. उतारवयात अमिताभ यांच्या बागबन, बाबूल, आँखे, पीकू, पिंक, वजीर, शमिताभ या वेगळ्या चित्रपटातील भुमिकाही गाजल्या.

१९. रामगोपाल वर्मा यांच्या शोले या चित्रपटात अमिताभ यांनी गब्बरसिंगची भुमिका केली होती.हा चित्रपट सुपरफ्लॉप ठरला

२०. अमिताभ यांनी अनेक चित्रपटात पोलिस अधिकाऱ्याची भुमिका केली. त्यांना अँग्री यंग मॅन हा किताब मिळवून देणाऱ्या जंजीर या चित्रपटातही ते पोलिस अधिकारी होते. 

२१. राजेश खन्ना, संजीवकुमार अशा अनेक दिग्गजांसोबत अमिताभ यांनी काम केले. शक्ती या चित्रपटातील दिलीपकुमार यांच्यासोबत त्यांची अभिनयाची जुगलबंदी रंगली.

२२. विनोदी भुमिका रंगवण्यात अमिताभ यांचा हातखंडा आहे. अमर अकबर अँथनी हा चित्रपट आणि त्यातील आरशासमोरील प्रसंग हे त्याचे उत्तम उदाहरण.

२३. ‘कौन बनेगा करोडपती’मधून अमिताभ यांनी २००० साली टीव्हीवर पदापर्ण केले. सर्वसामान्य प्रेक्षकांना रिलेट होईल अशी शैली, नर्मविनोदी संवाद, अत्यंत उच्च दर्जाचे पण सोपे हिंदी यामुळे हा शो प्रचंड लोकप्रिय झाला आणि अमिताभ यांच्या कारकीर्दीला नवे वळण मिळाले. यंदा या शोचे नववे सत्र सुरु आहे.

२४. आवाज ही अमिताभ यांची आणखी एक खासियत. कथेची पार्श्वभूमी कथन करण्यासाठी अनेक चित्रपटात अमिताभ यांचा आवाज वापरण्यात येतो. १९७७ साली सत्यजित राय यांनी शतरंज की कहानी या चित्रपटात अमिताभ यांचा आवाज वापरला होता. महाभारत मालिका तसेच जोधा अकबर, लगान हे काही गाजलेले चित्रपट. 

२५. अमिताभ यांना आतापर्यत चार राष्ट्रीय पुरस्कार मिळाले असून हा एक विक्रमच आहे. अग्नीपथ (२०००), ब्लॅक (२००५), पा (२००९) आणि पिकु (२०१५) या चित्रपटांसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्यचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाल आहे. 

२६. १९८४ साली पद्मश्री, २००१ साली पद्भुषण तर २०१५ साली पद्मविभुषणने सन्मानित करण्यात आले आहे. २००७ साली फ्रान्स सरकारने त्यांना ङ्गनाईट ऑफ दी लेजिओनफ हा सन्मान बहाल केला. 

२७. महानायकला आतापर्यंत तब्बल २२० वेगवेगळे पुरस्कार मिळाले असून सात वेगवेगळया विद्यापीठांनी डॉक्टरेट देऊन त्यांचा सन्मान केला आहे. 

२८. ऑस्ट्रेलियातील ‘ला ट्रोबे विद्यापीठ’ येथे अमिताभ यांच्या नावाने शिष्यवृत्तीही दिली जाते. प्राण्यांच्या संरक्षणासाठी काम करणार्या ‘पेटा’ संस्थेने ‘हॉटेस्ट व्हेजिटेरियन’ म्हणून अमिताभचा गौरव केला होता.

२९. अलहाबादमधील क्रीडा संकुल , इटावा येथील सरकारी शाळा यांना अमिताभ यांचे नाव देण्यात आले आहे. अलाहाबादमधील एक रस्ताही त्यांच्या नावाने आहे. 

३०. खुदा गवाह शुटिंगच्या वेळी अफगाणिस्तानच्या अध्यक्षांनी अमिताभ यांना वायुसेनेची खास सुरक्षा दिली होती. अफगाणिस्तानमध्ये सर्वाधिक लोकप्रिय हिंदी चित्रपट म्हणून खुदा गवाहची नोंद आहे. 

३१ .अमिताभ यांचे खास वैशिष्ठय म्हणजे ते दोन्ही हाताने लिहू शकतात. 

३२. मुलांच्या मुलाची  भूमिका करणारे अमिताभ एकमेव अभिनेते आहेत. ‘पा’ चित्रपटात त्यांनी अभिषेक बच्चनच्या मुलाची भूमिका केली होती. 

३३. एकाच नावाच्या दोन वेगवेगळया चित्रपटात ( दिवार १९७४ आणि २००४) कामही अमिताभ यांनी केले आहे. 

३४. गाड्यांबरोबर अमिताभ यांना घड्याळे जमा करण्याचाही छंद आहे. लंडन आणि स्वित्झर्लंड ही त्यांची आवडती ठिकाणे. 

३५. अमिताभ यांनी पहिली कविता १९८२ साली इस्पितळात असताना लिहिली. धर्मयुगमध्ये ही कविता प्रसिद्ध झाली होती. 

३६. घरातील बेडरुम ही त्यांची आवडती जागा. येथे बसून शांतपणे वाचन करणे त्यांना आवडते. 

३७. विल्यम्स शेक्सपियरच्या अजरामर ‘हेम्लेट’ ची भूमिका साकारण्याची अमिताभ यांची इच्छा आहे. 

३८. ते कधीही चहा, कॉफीही घेत नाहीत. दारुड्या व्यक्तीचा उत्तम अभिनय करणारे अमिताभ दारुला शिवतही नाहीत. 

३९. अँग्री यंग मॅन साकारणारे अमिताभ प्रत्यक्षात फारसे चिडत नाहीत. 

४०. त्यांच्याकडे पेनचा मोठा संग्रह असून त्यात केशरी रंगाची शाई असणारा एक पेन देखील आहे. 

४१. रस्त्यावरची भुर्जी, भाजलेले कणिस त्यांना प्रचंड आवडते. संधी मिळेल तेव्हा अभिषेकसमवेत जाऊन ते याचा आनंद घेतात. 

४२. हिंदीशिवाय बंगाली, पंजाबी, गुजराती आणि मराठी या भाषा अमिताभ बोलू शकता आणि समजू शकतात. जर्मन, फ्रेंच, रशियन आणि इटालियन या विदेशी भाषाही त्यांनी शिकल्या आहेत. 

४३. ट्वीटर, फेसबुकवर अमिताभ प्रचंड सक्रिय आहेत. ट्वीटवर त्यांचे ३ कोटी तर फेसबुकर अडीच कोटी फॉलोअर्स आहेत. ट्वीटरवर अमिताभ स्वत: फक्त ११५७ जणांना फॉलो करतात.

४४. विशेष म्हणजे सोशल मीडियावरील आपले अकाऊंट अमिताभ स्वत: हाताळतात.  केवळ सोशल मीडिया नव्हे तर अमिताभ चांगला ब्लॉगरही असून नियमितपणे ब्लॉग लिहित असतात.  

४५. अमिताभ यांनी सेकंड हॅन्ड फियाट घेतली होती. ही त्यांची पहिली गाडी. 

४६. सहा फुट २ इंच उंची असलेले अमिताभ बॉलीवूडमधील सर्वांत उंच अभिनेते आहेत. 

४७. मुंबईत स्ट्रगल करतांना राहण्यासाठी जागा नसल्याने त्यांनी अनेक रात्री मरीन ड्राईव्हर काढल्या आहेत. 

४८. वृत्तनिवेदक म्हणून त्यांनी आकाशवाणीत अर्ज केला मात्र आवाज ‘चांगला’ नसल्याने त्याला ही नोकरी मिळाली नाही. 

४९. सात हिंदुस्थानी या पहिल्या चित्रपटासाठी अमिताभ यांना १ हजार रुपये मानधान मिळाले होते. 

५०. आज जाहीरात क्षेत्रात अमिताभ यांना सर्वाधिक मागणी आहे. मात्र सुरवातीच्या दिवसांत त्यांनी एका जाहीरातीसाठी डबिंग केले तेव्हा त्याचे ५० रुपये त्यांना मिळाले होते. 

५१. १९७३ ते १९८४ दरम्यान अमिताभ यांचे १९ चित्रपट गोल्डन ज्युबली झाले होते.

५२. लंडन येथे २०१२ साली झालेल्या ऑलिम्पिकमध्ये मशाल धावकाचा मान अमिताभ यांना मिळाला होता. 

५३ ‘बॉलीवूड’ हा शब्द अमिताभ यांना आवडत नाही. ‘हिेंदी फिल्म इंडस्ट्री’ या शब्दाचा वापर ते शक्यतो करतात. 

५४. इजिप्तमध्ये २००१ मध्ये झालेल्या अलेक्झांडर चित्रपट महोत्सवात त्यांचा ‘अॅक्टर ऑफ मिलेनियम’ म्हणून गौरव करण्यात आला. 

५५. ‘मि. इंडिया’ या चित्रपटाची कथा अमिताभ यांना डोळ्यासमोर ठेवूनच लिहिण्यात आली होती.  शशि कपूर यांचा ‘उत्सव’ आणि राकेश रोशनचा ‘किंग अंकल’ ही अमिताभसाठीच लिहिण्यात आले होते.

५६. त्यांच्या मते वहिदा रेहमान ही हिंदी चित्रपटातील सर्वांत सुंदर अभिनेत्री आहे. 

५७. नव्वदीच्या अखेरीस ‘मृत्युदाता’ या चित्रपटातून दुसऱ्यांदा कमबॅक केल्यानंतर अमिताभ यांना ‘बिग बी’ हे टोपण नाव देण्यात आले. 

५८. लंडनच्या मदाम तुसाँ संग्रहालयात २००१मध्ये अमिताभ यांचा मेणाचा पुतळा उभारण्यात आले. येथे स्थान पटकावणारे ते हिंदी सिनेसृष्टीतील पहिले अभिनेते आहेत. 

५९. रेखा, परवीन बॉबी आणि झीनत अमान या अमिताभसमवेत सर्वाधिक चित्रपटात नायिका म्हणून झळकल्या. सायरा बानो (हेराफेरी १९७६), मुमताज (बंधे हात १९७३), नुतन (सौदागर १९७३), रती अग्निहोत्री (कुली १९८३) यांनी फक्त एकाच चित्रपटात अमिताभसमवेत काम केले.

६०. यश चोप्रा दिग्दर्शित कभी कभी या मल्टिस्टारर चित्रपटांचे जवळपास सगळे शुटिंग काश्मिरमध्ये महिनाभरातच पूर्ण करण्यात आले होते. 

६१. सत्ते पे सत्ते मधील ‘अॅन्टी हिरो’ ची भूमिका करताना अमिताभ यांनी लेन्सचा वापर केला होता. या लेन्स घालताना आणि काढताना प्रचंड त्रास होत असे. 

६२. सुमारे १८ चित्रपटात अमिताभचा मृत्यु दाखवण्यात आला आहे. 

६३. युनिसेफ, पेटा, सेव दी टायगर, स्वच्छता अभियान अशा अनेक सामाजिक प्रकल्पांसाठी अमिताभ सदीच्छा दूत म्हणून काम करतात. 

६४. अनेक सुपर हिट चित्रपट देणारे सुभाष घई आणि अमिताभ अद्यापही एकत्र आलेले नाही. ‘देवा’ नावाच्या चित्रपटाची घोषणा झाली. पण त्याची पुढे प्रगती झाली नाही. 

६५. अमिताभ आणि अमिरखान ‘ठग्ज ऑफ हिंदोस्तान’ चित्रपटातून पहिल्यांदाच एकत्र येणार आहेत. 

६६. दर रविवारी अमिताभ त्यांच्या ‘जलसा’ या घराबाहेर येऊन चाहत्यांना अभिवादन करतात. गेल्या ३५ वर्षांपासून ही परंपरा सुरु आहे.  

६७. सुपरस्टार रजनीकांत आणि अमिताभ यांनी अंधा कानुन, गिरफ्तारसारख्या मोजक्या चित्रपटात एकत्रित काम केले. गिरफ्तारमध्ये कमल हसनही होता. 

६८. १९७८ मध्ये एकाच महिन्यात अमिताभ यांचे त्रिशुल, डॉन, कस्मे वादे, बेईमान प्रदर्शित झाले. सगळेच हाऊसफुल्ल होते 

६९. निवडणुकीत विजयी झाल्यानंतर अमिताभ यांचे अलहाबाद येथे अभुतपूर्व स्वागत करण्यात आले. नव्या कोऱ्या साड्या पायघड्या म्हणून वापरण्यात आल्या होत्या. 

७०. अमिताभ यांच्या पडद्यावरील आईची भूमिका सर्वाधिक वेळा निरुपा रॉय यांनी केली. 

७१. अनेक फ्लॉप चित्रपट नंतर हा शेहनशाहही निराश झाला. एका रात्री ते  यश चोप्रांकडे गेला आणि एखादा चित्रपट देण्याची विनंती केली. त्यानंतर ‘मोहब्बते’ तयार झाला. गुरुकुलच्या अत्यंत कडक मात्र तितक्याच हळव्या प्रमुखाच्या भूमिकेत अमिताभशिवाय कोणीही शक्य नव्हता. 

७२. वक्तशिरपणाचे दुसरे नाव अमिताभ. शुटिंग सकाळी सात असेल तर हा शेहनशाह ६.४५ ला हजर. मग सेटवर कोणी असो किंवा नसो. 

७३. चित्रपटांसाठी अमिताभचा पहिला फोटोशुट त्यांचा मोठा भाऊ अजिताभ यांनी केले. 

७४. अमिताभ यांच्या आई तेजी बच्चन यांनाही अभिनाची आवड होते. पण कौटुंबिक जबाबदारीमुळे त्यांना हे शक्य झाले. मग त्यांनी अमिताभला प्रोत्साहन दिले. 

७५. अमिताभ नायक असलेले सुप्रिमो नावाचे कॉमिक्सही प्रकाशित झाले होते.
संकलन  : मुकुंद फडके, केदार प्रभुणे

१० ऑक्टोबर २०१७

०१ सप्टेंबर २०१७

सीओ जिओ



कराडला येणार
नवे मुख्याधिकारी
सत्ताधारी नगरसेवकाची
झाली जय्यत तयारी !

आता होणार फक्त
ईकासावरच चर्चा
ना टेंडरचं टेंशन
ना भिती कलेक्शनची वरच्या !

सेवक,कर्मचारी,अधिकारी
सारे आज बसणार
रंगीत संगीतच्या चर्चेत
आम्हीच जिंकल्याच बरळणार !

औंधकर गेले डांगे आले
जिंकले कोणी ना हरले
आण्णा दादा काका
कारभारी हुशार आपले !


....सतीश मोरे

२९ जुलै २०१७

त्यासीं म्हणे जो आपुला

त्यासी लोक म्हणती आपुले...!




वटवृक्षाखाली एखादं रोपटं लावलं तर त्या वृक्षाच्या छायेमुळे ते रोपटं वाढत नाही कोमजतं किंवा खुंटतं हा निसर्ग नियम आहे. खरंतर त्या रोपट्याला वटवृक्षाच्या सावलीमुळे सूर्यप्रकाश मिळत नाही. आणि त्यामुळे प्रकाश संष्लेषणाची क्रिया होत नाही. त्यामुळे ते रोपटं वाढत नाही, हे झालं ते रोपटं न वाढण्याचं शास्त्रीय कारण ! पण त्या रोपट्याच्या मनात थोड्या वेगळ्या दिशेने जायची इच्छा झाली तर ते सूर्यप्रकाशाकडे वळतं, ते रोपटं वेगळा मार्ग काढतं, मोठं होतं. आमदार बाळासाहेब पाटील यांच्याबाबत असंच म्हणाव लागेल. 

पी.डी.पाटील नावाचा वटवृक्ष कराड नगरीचं वैभव आहे. या वटवृक्षाने विकासाचा डोंगर उभा करताना सहमतीचे राजकारण करून 42 वर्षे कराडचा कारभार केला. यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराचे वारसदार पी.डी.साहेबांनी कराड शहर आणि त्यानंतर कराड उत्तरमधील विकासकामासाठी आयुष्य झोकून दिले. पी.डी.साहेबांच्या घरात शिस्तीचा प्रचंड पगडा त्यांच्या कुटुंबियांवर होता. अनुशासन, समर्पण आणि अचूकता साहेबांच्या नसानसात भिनलेली होती. त्यांना समाजकारणासाठी खूप वेळ द्यायला लागत असल्यामुळे कुटुंबियांसाठी खूप कमी वेळ देता आला. तरीही सर्व मुलांच्यावर चांगले संस्कार करताना पी.डी.साहेबांनी स्वत:च्या उच्च पदाचा फायदा कधीच मुलांना घेऊ दिला नाही. बाळासाहेबांना आपले राजकीय वारसदार म्हणून निवडताना पी.डी.साहेबांनी सर्व मुलांचे अचूक निरीक्षण केले होते. 

1992 साली सह्याद्रि कारखान्याच्या संचालकपदी बाळासाहेब पाटील यांना घेतल्यानंतर साहेबांनी त्यांना स्वतंत्रपणे काम करण्याची संधी दिली. संस्थापक चेअरमनचा मुलगा म्हणून मान, सन्मान न देता कारखान्यात काम करताना काहीतरी शिका असा सल्ला साहेबांनी दिला. 1997 साली बाळासाहेब पाटील चेअरमन झाले. तेव्हा त्यांची झालेली भेट मला आजही आठवते. सफारी ड्रेस आणि कोरलेली दाढी असा एक सामान्य पेहराव असलेले बाळासाहेब पाटील 1997 साली माझ्या लग्नाला आले होते. साधेपणा आणि समोर आलेल्या माणसाचे सर्व म्हणणे ऐकून घेणे ह्या गुणामुळे बाळासाहेब हळूहळू सर्वांच्या मध्ये प्रिय होऊ लागले. सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन झाल्यानंतर त्यांनी बारकावा कसा असावा आणि कसा करावा हे कृतीतून दाखवून दिले.

राज्यातील इतर सर्व साखर कारखान्याच्या परिसरात गेल्यानंतर साखर कारखाना जवळ आला आहे याची जाणीव 1 कि.मी. अंतर असतानाच येते. पण याला अपवाद सह्याद्रि राहिला. याचे कारण पर्यावरण पूरक आणि प्रदुषण विरहित तंत्रज्ञान सह्याद्रिवर बाळासाहेबांनी आणले. बाळासाहेबांचे कारखान्यावर स्वत:हूनही अधिक प्रेम आहे. रात्री-अपरात्री कितीही वाजता जाग आली तर ते कारखान्यात फोन करून माहिती घेतात. कारखान्यातील कोणतीही मशिनरी कोणत्या ठिकाणी आहे, त्या मशिनरीची पूर्ण माहिती बाळासाहेबांना आहे. कोणत्याही विभागातील मशिनरीची माहिती असल्यामुळे कशाप्रकारचा बिगाड झाला हे समोरच्याने सांगितल्यानंतर त्याच्यावरील उपाय बाळासाहेबांच्याकडे तयार असतो. 

कारखान्यात सर्व नवीन तंत्रज्ञान बाळासाहेबांच्या दूरदृष्टीतून आलेले आहे. संगणकीकरण स्विकारणारा सह्याद्रि हा राज्यातला पहिला कारखाना असेल. ऊस नोंदणी कार्यक्रम संगणकीकृत करून सह्याद्रिने राज्यात नवा आदर्श घालून दिला. ऊस किती वाजता कारखान्यावर आला, किती टनेज झाले याचा संदेश सभासदांना पाठवण्याची सोय सह्याद्रिने पहिल्यांदा सुरू केली. त्यामुळे किती ऊस गेला यासाठी कारखान्यावर हेलपाटे घालण्याचे कारण सभासदांना उरले नाही. ऊस दरातही सह्याद्रि नेहमीच अग्रक्रमावर राहिला तो बाळासाहेबांच्या सुक्ष्म नियोजनामुळे. संचालक मंडळ आणि त्यांचे नातेवाईक यांच्यावर चहापाणी, वाहने, सहली हा खर्च इतर कारखान्यामध्ये नेहमी चर्चेचा विषय असतो. सह्याद्रि याला अपवाद आहे. वायफळ खर्च टाळून कमीतकमी खर्चात कारखाना चालवण्याचा सह्याद्रि पॅटर्न राज्यभर प्रसिद्ध आहे. बाळासाहेब पाटील यांनी पी.डी.साहेबांच्या सोबत आणि त्यांच्या पश्‍चात सह्याद्रि कारखाना अतिशय काटकसरीने चालविल्यामुळे यावर्षी राज्यात सर्वाधिक दर देणारा कारखाना म्हणून सह्याद्रिने नंबर पटकावला आहे. 

बाळासाहेब पाटील यांचे राजकारण आणि त्यांच्या विरोधकांचे राजकारण यात जमिन अस्मानचा फरक आहे. कराड तालुक्यातील इतर कारखानदारांची, लोकप्रतिनिधींची कार्यकर्ता सांभाळण्याची आणि कार्यकर्ता तयार करण्याची स्टाईल फार वेगळी आहे. एखाद्या गावात बाळासाहेबांची सह्याद्रिच्या सभासदांसाठी सभा किंवा बैठक असेल तर कारखान्याचे कर्मचारी, अधिकारी नियोजन करतात. सभेच्या वेळी हे सर्व लोक खाली सामान्य नागरिकामध्ये, सभासदामध्ये बसलेले असतात आणि गावातील ज्येष्ठ नागरिक, सभासद, कारखान्याचे संचालक किंवा इतर लोकप्रतिनिधी व्यासपीठावर असतात. तालुक्यातील इतर लोकप्रतिनिधींच्या बाबतीत बरोबर याच्या उलटे चित्र असते. यामुळेच गावागावात बाळासाहेब पाटील यांना मानणारा वर्ग तयार झाला आहे.

पी.डी.पाटील यांच्यानंतर सर्वांना विश्‍वासात घेणारा, होणार आहे तेच सांगणारा, खोटी आश्‍वासन देऊन समोरच्यांना झुलवत न ठेवणारा, स्पष्टोक्ता नेता म्हणून बाळासाहेब पाटील यांची ओळख आहे. गावागावात युवक वर्गामध्ये ते लोकप्रिय आहेतच शिवाय ज्येष्ठ नागरिकामध्ये त्यांना सन्मानाचे स्थान आहे. आबा, नाना, काका, दादा अशा टोपण नावाने ज्येष्ठांना बोलावून त्यांच्या घरात एकरूप होणारा नेता अशी खासियत बाळासाहेबांची ओळख आहे. 

पहिल्या विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब चांगल्या मताने निवडून आले. यामागे पी.डी.साहेबांची पुण्याई होती. मात्र दुसर्‍या निवडणुकीत जोरदार लढत होऊनही केवळ संयमामुळे बाळासाहेब त्यातून बाहेर पडले. वैयक्तीक, खालच्या स्तरावर जाऊन दुसर्‍या निवडणुकीवेळी प्रचार झाला. मात्र नियोजित प्रचार आणि शेवटच्या क्षणी पी.डी.साहेबांनी घेतलेली एंट्री यामुळे ते दुसर्‍यांदा विजयी झाले. निवडणूक निकालानंतर कराड विमानतळावर आर.आर.पाटील यांच्या समवेत ते मुंबईला निघाले होते. त्यावेळी आर.आर.पाटलांनी त्यांना दिलेला सल्ला आम्ही ऐकला होता. ‘पहिली निवडणूक सोपी असते. दुसरी निवडणूक फार अवघड असते यातून बाहेर पडला की पुढच्या निवडणुका सोप्या होत जातात’. आर.आर.पाटलांचा हा राजकीय अभ्यास किती खरा होता याचा प्रत्यय बाळासाहेब पाटील यांना तिसर्‍या निवडणुकीवेळी आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तिकीट डावलूनही समोरच्या उमेदवाराला 41 हजाराच्या मताधिक्याने पराभूत करून ते विधानसभेत गेले. या निवडणुकीवेळी पुन्हा एकदा बाळासाहेबांचा संयमी प्रचार कामी आला. तिकीट डावलल्यानंतर अर्ज भरण्यावेळी शिवाजी स्टेडियम समोर झालेल्या सभेत काय बोलायचे आणि काय बोलायचे नाही हे ते ठरवूनच गेले होते. याबाबत निवडक कार्यकर्त्यांबरोबरच काही पत्रकारांशी त्यांची चर्चा झाली होती. चौथ्या निवडणुकीत बाळासाहेबांनी समोर दोन उमेदवार असतानाही त्यांनी केवळ संयमी राजकारणाच्या जोरावर त्यांना पराभूत केले.

संयमी राजकारणाचे मूर्तीमंत उदाहरण म्हणून जिल्ह्यातील सर्व आमदार बाळासाहेबांना मान देतात. कितीही अडचणी आल्यातरी संयम न ढळू देता आणि तत्वांशी बांधिल राहून कराड उत्तर मतदारसंघात निर्माण केलेले कार्यकर्त्यांचे जाळे, सह्याद्रि साखर कारखान्याच्या माध्यमातून तयार झालेला कुटुंबप्रेमी सह्याद्रि सभासद वर्ग आणि रोजगाराचे जाळे यामुळे बाळासाहेब पाटील सतत विजय मिळवत गेले आहेत.

बाळासाहेब पाटील यांच्या विषयी खूप लिहिता येईल. त्यांच्या वक्तशीरपणा आणि सभ्यता याचा खूप जवळून अनुभव अनेकांनी घेतला आहे.
अनंत चतुर्थी दिवशी कराडच्या प्रसिद्ध गजानन हॉटेलमध्ये बाळासाहेबांसमवेत आलेला अनुभव शेअर करायलाच हवा. कराडचा फेरफटका मारून विसर्जन मिरवणूक सुरू झाली आहे का पहायला मी बाहेर पडलो. मित्रासमवेत दत्त चौकात आलो. चहा पिऊन उठणार तेवढ्यात आमदार बाळासाहेब पाटील हॉटेलात आले. आमदारसाहेब आल्यावर हॉटेलचे मालक, वेटर यांच्याबरोबरच नाष्टा करायला बसलेल्या सर्वांचीच लगबग सुरू झाली. 

सुरूवातीच्याच कक्षात टेबलावर नाष्टा करत दोन युवक बसले होते, त्याच्यासमोर साहेब आणि गंगाधर जाधव बसले. काय देणार खायला असे विचारून साहेबांनी पोहे न टाकता मिसळची ऑर्डर दिली. दरम्यान समोर बसलेल्या दोघांची साहेबांनी चौकशी केली. त्यांनी ओळख करून दिली. वडुजच्या त्या दोघांना कळलेच नाही समोरची व्यक्ती कोण आहे. दरम्यान कराडचे आमदार आपल्या सोबत, चौकातील छोट्या छोट्या हॉटेलात नाष्टा करायला बसलेत याचे त्यांना आश्चर्य वाटले. गप्पा मारत नाष्टा झाला. ते दोघे जायला निघाले तेव्हा त्यांना बाळासाहेबांसोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही. वडूजला आमच्या घरी या असे निमंत्रण देऊन दोघे बाहेर पडले.

नाष्टा करून बाहेर पडलो. येतो म्हणून साहेबांना नमस्कार केला, पण थांबा, काय गडबड आहे, असे म्हणत गंगाधर जाधव यांच्या खताच्या दुकानात मला घेऊन गेले. तिथे पण खते, बियाणे याची माहिती घेताना नवीन कुठला शाळू आला आहे असे विचारून बियाणे पिशवी हातात घेऊन पाहिली. दरम्यान दत्त चौकातील नंदकुमार गणेश मंडळांने तयारी झाली आहे असा निरोप दिल्यानंतर आम्ही सारेजण उठलो. साहेबांच्या हस्ते मिरवणूक नारळ फोडण्यात आला. पालखी खांद्यावर घेऊन साहेब थोडे अंतर चालले. कराडच्या नवीन झांज पथकाने सुद्धा नारळ फोडण्याची विनंती केली. पथकातील युवकांची आस्थेने चौकशी केली, सर्वाना नमस्कार करून साहेब तेथून निघाले.

या दिवशी बाळासाहेब पाटील यांच्या लोकसंपर्काचे पैलू पहायला मिळाले. पी.डी.पाटील साहेबांचे राजकीय वारसदार म्हणून लोक त्यांना का मान देतात हे अनुभवायला आले.

१४ जुलै २०१७

पसारा

ती

पसारा सहज मांडला जातो ,
परंतु आवरताना जीव घेतो.....
मग तो घरातला असो
नाहीतर मनातला...........

पसारा मांडणारा
तो सहज मांडून जातो
मनाला मात्र घरघर लावून जातो !

तो

मनातला पसारा आवरायला,
आवरलेला पुन्हा मांडायला
लतिके तुझी साथ हवी आहे
अगं तुझा हात हवा आहे !

@ सतीश

०६ जुलै २०१७

फुगवा

फुगवा

चुकलं कोण, कोण बरोबर ?
थोडं तुझं अन् थोडं माझं  ,
आणि उरलेलं आपल्या दोघांचं !

इतकं रूसायचं असतं का कधी ?
तुटेपर्यत ताणायचं नसतं कधी !

खरं प्रेम म्हणजे दुखावलेली
मने परत जोडणे
खरं प्रेम म्हणजे भांडण
करुन परत जवळ येणे.....!!

तुझं माझं सख्ख नातं तुटंल का कधी ?
माझ्यातून वेगळ करता येणार ना कधी !

        @.....सतीश मोरे

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...