फॉलोअर

२६ जून २०१६

पंढरीची वारी

🚩🚩🚩🚩🚩🚩

माऊली हो राम कृष्ण हरी
⛳⛳⛳⛳⛳⛳

पंढरीची वारी दोन दिवसावर आली आहे.
दिनांक 28 जुन रोजी ज्ञानेश्वर माऊली पालखी
सोहळा आळंदी येथून प्रस्थान करणार आहे.
14 जुलै रोजी हा सोहळा पंढरीत पोहचेल.

सुमारे पावणे तीनशे किलोमीटरचा या भक्ती प्रवासात
सुमारे 4 लाख वारकरी सहभागी होतात.
गतवर्षी दैनिक ' पुढारी ' ने मला ही
वारी कव्हर करायची संधी दिली होती.
खुप आनंद लुटला या वारीत.
खुप दिले मला या वारीने !
पायी वारी करण्याचा आनंद औरच!

गतवर्षी वारी विषयावर 22 लेख लिहू शकलो,
शिवाय तेवढेच माझी वारी दिनविशेष लिहता आले.
माऊली कृपा, दुसरे काय?

याही वर्षी पुढारीने मला ही संधी दिली आहे.
वारीला निघालो आहे, 
माऊली कृपेने तुमच्यासाठी 'पुढारी'त लिहणार आहे.
शिवाय WhatsApp आणि Blog वर अपडेट्स देणार आहेच.

आशिर्वाद असु द्या, माऊलींनो !
....................

सतीश मोरे,
9881191302
दैनिक पुढारी कराड.

Visit my blog
Click this link👇�
karawadikarad.blogspot.in

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

२५ जून २०१६

पंढरीची वारी

दिनांक 28 जुन ते 14 जुलै 2016

माऊली माऊली

चला येताय ना वारीला!

वारी live
on blog daily

खास अनुभव  आणि वेगवेगळ्या बातम्या

फक्त पुढारी मध्ये

२० जून २०१६

सखीला मी का आवडतो


एकदा सखीने विचारले
तुला मी का आवडते ?

          खुप विचार केला
          पण उमगलंच नाही
          मला तु का आवडतेस?
          खुप वेळा स्वतःला विचारलं
          उत्तर नाही मिळालं

काय सांगू तुला सखे

             तुझं हसणं मला आवडतं
             तुझं डोळे मिचकावनं तर वेड लावतं
             तुझा श्वास मला रोखतो
             तुझा भास मला बैचेन  करतो

तुझं असणं मला साथ देतं
तुझं नसणं मला भिरभिर करतं
तुझा आवाज धडकन वाढवतो
तुझा स्पर्श स्फुल्लिंग आणतो

             तुझी सावली मला साथ देते
             तुझी मिठी तुझ्यात सामावून घेते
             तुझी लाली मला खुणावते
             तुझी .... मला
             सारं जग विसरायला लावते

तुझं वागणं तुझं चालणं
तुझं गाणं, तुझं बोलणं
तुझं असणं, हळूच रूसणं
तुझं माझं करता करता
शेवटी तुझंच खरं करणं

         तुझे शब्द , तुझे अलंकार 
         माझं सारं तुझंही तुझं


तुझी काया, तुझा स्पर्श
तुझं बिलगणं,तुझं जवळ येणं
मला ओढणं,  माझ्यात सामावणं
बेफाम होऊन श्वासात विरघळणं
तनातून मनात, मनातून देहात घुसणं

          तुझ्यासोबतचा हर क्षण आठवतो
          मला जगण्याची नवी उर्मी देतो
पण
तुझ्यावर मी प्रेम का करतो
तु मला का आवडतेस
खरंच सांगता येत नाही


           कारण
          तुला मी माझ्यातच पाहतो
          स्वःतवरच प्रेम का करतो
           कुणी कधी का पुसतो?


              सतीश मोरे





१८ जून २०१६

सिक्किम सफर 7

रोप-वे आणि पॅराग्लायडिंगचा थरार , लोकल साईट सिंईग,गणेश टोक आणि खुप गंगटोक सिक्किमची राजधानी. सगळीकडे उंचच उंच इमारती. हिरवीगार झाडे. डोंगरकपारीत काढलेले नागमोडी रस्ते. अतिशय सुंदर, स्वच्छ ग्रीन सिटी. रस्त्यावर कोठेही कचरा पहायला मिळणार नाही. अतिक्रमण नाही.. पानपट्टी नाही. खोकं नाही, हातगाडा नाही. सर्व काही शिस्तीत नियमबद्ध. वाहतूक यंत्रणा तत्पर आणि विनम्र. वाहतूक पोलिस सज्ज, सजग आणि फुल टाईम कार्यरत. नो ट्राफिक जाम, नो गोंधळ. हे सर्व गंगटोकमध्ये पहायला मिळते. पर्यटन हाच मुख्य व्यवसाय असलेल्या गंगटोकमध्ये आणि आसपासच्या सर्व भागात लहान-मोठी हॉटेल्स,घरगुती निवास व्यवस्था अतिशय परवडणाऱ्या दरामध्ये उपलब्ध आहेत. पर्यटनपूरक व्यवसाय आणि पर्यटन ठिकाणी राज्य शासनाने विशेष सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत. महाराष्ट्रातून सिक्किमला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या गेल्या दोन वर्षांत खूप वाढली आहे. ती महामहिम राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्यामुळे. महाराष्ट्रातला माणूस सिक्किमला जातो तेव्हा राज्यपाल मराठी आहेत हे ऐकताना, सांगताना त्याची छाती फुलून येते. राजभवन विश्रामगृह आणि राजभवनचा पाहुणचार यावर वेगळं लिहीणार आहेच. आम्ही राजभवनचे पाहुणे असल्यामुळे विश्रामगृहावर उतरलो होतो. दोन दिवस गंगटोक सिटी व लगतच्या गावांत पर्यटन ठिकाणे पाहण्यासाठी राखीव ठेवले होते. स्थानिक प्रवासासाठी चार व्यक्तींसाठी अल्टो,व्हेगनआर अशा कार 1800 ते 2500 रुपये भाड्याने दिवसभरासाठी मिळू शकतात

बौद्ध मंदिरे आणि घंटा

लोकल साईट पाहण्यासाठी आम्ही सकाळी लवकर निघालो. आमच्या दोन्ही वाहनांवर "गेस्ट ऑफ गव्हर्नर'  असे स्टिकर लावण्यात आले. त्यामुळे आमची छाती फुगली होती. बौद्ध धर्माचा प्रभाव असलेल्या या राज्यात अनेक ठिकाणी बौद्ध मंदिरे (मोनॅस्ट्री) आहेत. अशा एका प्राचीन मोनॅस्ट्रीला आम्ही भेट दिली. अतिशय देखणी अशी मोनॅस्ट्री गंगटोकमध्ये आहे. त्याठिकाणची शिस्त, स्वच्छता, शांतता आणि पावित्र्य याविषयी मी पहिल्या भागात लिहिलेलेच आहे. मोनॅस्ट्रीच्या आवारात गोल फिरणाऱ्या घंटा हमखास असतात. जीवन सतत गतीमान असले पाहिजे. चल वस्तु जीवंतपणाचे लक्षण आहे, असा संदेश या फिरणाऱ्या घंटा देतात. एका-एका मोनॅस्ट्रीमध्ये अशा अनेक घंटा प्रवेशद्वारापासूनच लावलेल्या असतात. त्या घंटा म्हणजे छोट्या-मोठ्यांचे आकर्षणाचे केंद्रच आहे. कोणताही बौद्ध भिक्षुक किंवा गुरू मोनॅस्ट्रीमध्ये बसलेला पहावयास मिळाला नाही. त्यांच्या प्रार्थना आणि ध्यानसाधनेचे वेळेतच ते येथे येतात, असे सांगण्यात आले. गंगटोकमधील प्राचीन मोनॅस्ट्रीसमोरच  फार जुने वस्तुसंग्रहालय आहे. या ठिकाणी भगवान गौतम बुद्धांच्या आयुष्यातील सर्व प्रसंग लाकडावर, लोखंडावर कोरलेले पहावयस मिळाले. तिबेटियन पद्धतीच्या इमारतींमध्ये हे संग्रहालय आहे.

रोप वे मधून दिसणारे गंगटोक 


रोप वे चा निखळ आनंद

रोप-वेचा अतिशय सुंदर अनुभव गंगटोकमध्ये घेता येतो . एसटीडीसी मान्यताप्राप्त दोन ठिकाणी रोप-वे ची सोय आहे. शहरातच ही सोय असल्यामुळे कमी बजट असलेल्या लोकांना गंगटोकचा "एयर व्ह्यू' रोप-वे मधून घेता येतो. प्रति व्यक्ती 200 रुपये इतके तिकिट आहे. रोप-वे च्या केबिनमध्ये जाण्यासाठी लिफ्टमधून तिसऱ्या मजल्यावर नेले जाते. जाणारे आणि येणारे असे दोन मार्ग आहेत. दोन्ही केबिन रुममध्ये आठ ते दहा (वजनावर अवलंबून) प्रवासी बसल्यानंतर रोप-वे सुरू होतो. सुमारे 300 फुट उंचावरून हा आनंददायक प्रवास असतो. केबिनमधून गंगटोकचे विलोभनीय दर्शन होते. रस्त्यावर धावणारी वाहने, पर्वतरागांत उभ्या असलेल्या उंच-उंच इमारती पाहताना खूप मजा येते. वाहतूक व्यवस्था किती शिस्तबद्ध आहे याचे दर्शन मला पहिल्याच दिवशी रोप-वे मधून प्रत्यक्ष पहावयास मिळाले.


गणेश टोक आणि  हनुमान टोक

गंगटोक शहरामध्ये लष्कराच्या छावण्या आहेत. लष्कराच्या ताब्यात असलेल्या गणेशटोक आणि हनुमान टोक या उंच टेकड्यांवर जावून गंगटोकचा वेगळाच व्ह्यू पहावयास येतो. या दोन्ही ठिकाणी गणेश आणि हनुमान मूर्ती सिक्किमचे तत्कालीन गव्हर्नर औंधचे पंतप्रतिनिधी ............................ यांनी बसविलेल्या आहेत. अतिशय सुंदर मंदिरे आणि डोळ्याला भावणाऱ्या मूर्ती आहेत. हनुमान टोक मंदिरात भाविकांची खूप गर्दी असते. येथे पूजा व इतर विधी करण्यासाठी भारतीय जवान आहेत.
धबधबा गार्डन, रॉक गार्डन, स्डेडियम आदि ठिकाणे दाखवून साडेचार ते पाच वाजेपर्यंत पर्यटकांना महात्मा गांधी मार्केटच्या दारात सोडण्यात येते. सिक्किममध्ये दिवस पाच वाजता सुरू होतो. 8 वाजता सर्व व्यवहार सुरू होतात. मार्केटजवळ आल्यानंतर मुख्य विषय असतो खरेदी. सिक्किमला 8 ते 4.30 ही येथील कामाची वेळ आहे. 4.30 ते 5 वाजेपर्यंतच वाहन उपलब्ध होते. जास्त पैसे देवून, विनंती करून वेळ वाढवता येते.
महात्मा गांधी रोड मार्केट खास पर्यटकांसाठी विकसित केलेल्या ओपन महात्मा गांधी मार्केटमध्ये कोणत्याही प्रकारच्या वाहनांना 24 तास प्रवेश बंद आहे. 30 फूटाचा भव्य मोठा रस्ता आणि दोन्ही बाजुला दुकाने, मोठ-मोठ्या कंपन्यांची शोरुम अतिशय सुंदरपणे सजविलेली दुकाने हे महात्मा गांधी मार्केटचे वैशिष्ट्‌य आहे. कोणत्याही दुकानातून बाहेर पडा.. नवीन दुकानात जा... खरेदी करा. वाहतुकीचे, रस्ता क्रॉस करण्याचे कसनेही टेन्शन नसते. सोबत मुले असतील तर ते रस्त्यावर निवांत खेळत बसतात. तुम्ही बिनधास्त शॉपिंग करायचे. असा या मार्केटचा कन्सेप्ट आहे. कूकरीपासून स्वेटरपर्यंत, शूजपासून ब्रॅन्डेड कपड्यापर्यंत आकर्षक क्रोकरीपासून  सजावट करणाऱ्या सर्व प्रकारच्या वस्तुंपर्यंत सगळ्या प्रकारचे साहित्य येथे उपलब्ध आहे. मुख्य मार्केटला मधूनच उतार असलेेल्या बोळात पायऱ्यांवरून खाली गेल्यानंतर याही ठिकाणी खूप दुकाने आहेत. गांधी मार्केटला गेल्यानंतर लगेच खरेदीच्या मागे न लागता अर्धा-पाऊणतास पूर्ण मार्केट फक्त पाहण्यात मजा असते. एकास-एक वस्तु असल्यामुळे उगीच त्या दुकानात घेतलं, इथे घ्यायला पाहिजे होेते असं नंतर वाटू शकतं.


पॅराग्लायडिंग ...अनबिटेबल

गंगटोकमधील आकर्षणाचे मुख्य केंद्र आहे पॅराग्लायडिंग. पॅराशूटसारख्या रंगबेरंगी छत्रीतून स्वच्छंदपणे हवेतून बागडणे, फिरणे, निसर्गाचा आनंद घेणे म्हणजे पॅराग्लायडिंग. याराना या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि अमजद खान यांनी केलेलं पॅराग्लायडिंग सर्वांनाच आठवत असेल. शासनमान्य तीन ठिकाणी पॅराग्लायडिंगची सुविधा उपलब्ध आहे. यासाठी सकाळी लवकर 10 ते 12 वाजेपर्यंत या केंद्रावर पोहोचावं लागतं. गर्दी खूप असते. प्रत्येकी 3 हजार रुपये आकारले जातात. 20 ते 80 किलो वजन असणाऱ्या व्यक्तिलाच पॅराग्लायडिंग करता येते.



बुकिंग झाल्यानंतर दिलेल्या वेळेत नेमून दिलेल्या ठिकाणी पोहोचावे लागते. स्वच्छ हवा, शुभ्र प्रकाश व अनुकूल नैसर्गिक परिसिथती असेल तरच पॅराग्लायडिंग करता येते. पाऊस असेल तर कोणत्याही परिस्थितीत केले जात नाही. उंच ठिकाणावर गंगटोक दूरदर्शन केंद्राच्या टॉवरनजिक पॅराग्लायडिंग स्टार्ट-अप सेंटर आहेत. याठिकाणी जाण्यासाठी अतिशय चढाचा, अवघड वळणदार रस्ता 5-6 किलोमीटर पार केल्यानंतर येथे पाहोचतो. पायलट नियम समजावून सांगतो. आपल्या शरीरावर जॅकेट व पॅराग्लायडिंग किट बांधले जाते. हातात सेल्फी स्टिक व कॅमेरा दिला जातो. सुरूवात करताना उताराच्या रस्त्याने खूप जोरात पळत जावे लागते. संपूर्ण किट दोन्ही बाजूला उंच धरून दोन सहाय्यक आपल्यासोबत धावतात. हवा शिरल्यानंतर पॅराग्लायडिंग पॅराशूट फुलतो व अचानक आपण उचललो जातो.



पॅराग्लायडिंग स्टार्ट-अप खूप रिस्की आहे. मात्र लॅन्डिंग अतिशय आनंददायक असते. फुटबॉल स्टेडियमवर पॅराग्लायडिंग लॅडिंग होताना आपले नातेवाईक फोटो काढण्यासाठी आतुरलेले असतात. मात्र स्टार्ट-अपच्या वेळेला कोणीही नसते. हा आनंद घेतलाच पाहीजे असा आहे. 15 ते 20 मिनीटे हवेमध्ये तरंगणे खरंच स्वर्गीय सुख असते. हातातील सेल्फी कॅमेऱ्याने खालून-वरुन निसर्गाची रुपे टिपली जातात. खाली उतरल्यानंतर हे व्हिडिओ शुटिंग सीडी किंवा मोबाईलमध्ये 500 रुपये आकारून लोड करून दिले जाते. हा सर्व आनंद एकदा तरी घेतलाच पाहिजे असा आहे.

बर्थडे सेलिब्रेशन हेलिकॅप्टरम्ध्ये

रेडी टू राईड  इन हेलिकॅप्टर


पॅराग्लायडिंगपेक्षा कमी दरात 15 मिनीटांची हॅलिकॅप्टर राईड गंगटोकमध्ये उपलब्ध आहे. महात्मा गांधी मार्केट चौकातच एसटीडीसीच्या ऑफिसमध्ये आदल्या  दिवशी बुकिंग करावे लागते. 5 व्यक्तींसाठी 15 मिनीटांसाठी 9500 रुपये काढले जातात. 1  2 व्यक्ती असेल तरीही तेवढेच पैसे आकारले जातात.
माझ्या लग्नाचा 19 वा वाढदिवस 22 मे . हा दिवस आम्ही वेगळ्या प्रकारे एन्जॉय केला. कुटुंबातील चार सदस्यांसाठी स्वतंत्र हेलिकॅप्टर बूक केले होते. वास्तविक हेलिकॅप्टरमध्ये कॅमेऱ्याशिवाय कोणत्याही वस्तु नेण्यास परवानगी नाही. तरीही विनंती करून आम्ही केक घेतला होता. अतिशय रुबाबदारपणे आम्ही चॉपरमध्ये जावून बसलो. सरदार पायलटने दोन मिनीटांत सूचना केल्या, सीटबेल्ट लावला आणि चॉपर हवेत उडाले. हेलिकॅप्टरमधून गंगटोक शहराचे विलोभनीय दर्शन झाले. पटापट फोटो काढले, सेल्फी काढले. पाच मिनीटांनंतर चिरंजीव पियुष, लेक देवयानी यांच्या समोर आम्ही दोघांनी हेलिकॅप्टरमध्ये बर्थडे केक कापला. एकमेकांना शुभेच्छा दिल्या. लेकीने आणि पियुषने सर्वांना केक भरवला.


लग्नाचा वाढदिवस विमान किंवा हेलिकॅप्टरमध्ये केला किंवा लग्नच विमानात केले अशा मोठ्या लोकांच्या बातम्या मी वाचल्या, पाहिल्या होत्या. पण स्वत:च्या लग्नाचा वाढदिवस हेलिकॅप्टरमध्ये करण्याचा दूर्मिळ दूग्धशर्करा योग मला गंगटोकमध्ये अनुभवायला आला. हा दिवस आयुष्यातील संस्मरणीय राहील यात शंकाच नाही.








१७ जून २०१६

सिक्किम सफर 6

हाऊ अॅन्ड व्हाॅय टू गो सिक्किम...?




सिक्किम म्हणजे सौंदर्याची खाण, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. राज्याचा विस्तार, भूभाग सातारा जिल्ह्याएवढाही नाही. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर असे चार विभाग आणि चार जिल्हे. सर्व जिल्हे छोट्या-मोठ्या रस्त्यांनी राजधानी गंगटोकशी जोडलेले आहेत. राज्यात कोठेही सपाट भूभाग पहावयास क्वचितही मिळणार नाही. डोंगरदऱ्या, उंच शिखरे, नद्या, खोरे, तळी आणि हिरवीगार झाडी असलेले कदाचित देशातील हे एकमेव राज्य असावे आणि हीच नैसर्गिक संपत्ती जपण्याचे, वाढविण्याचे, संवर्धन करण्याचे काम सिक्किमवासिय करीत आहेत. म्हणूनच सिक्किमला जायचे तर फक्त निसर्गसौंदर्य पहायलाच , खेळायला, थरार अनुभवायला !





STDC सिक्किम टुरिस्ट डेव्हलपमेंट कार्पोरेशन (एसटीडीसी), सिक्किम सरकार आणि सिक्किमचे प्रेमळ लोक पर्यटकांच्या स्वागतासाठी सतत तत्पर असतात. सिक्किमला जायला तसा एकमेव मार्ग आहे. तो मार्ग बागडोग्रा (पश्चिम बंगाल) येथून जातो. दार्जिलिंगहूनही सिक्किम राज्यात प्रवेश करता येतो. पण दार्जिलिंगला जाण्यासाठी बागडोग्रामध्ये जावेच लागते. नऊ दिवसांचे नियोजन करून आम्ही सिक्किम दौऱ्यावर निघालो. वास्तविक तीन-चार महिने अगोदर विमानाचे तिकिट बुक केले तर सिक्किम सहल स्वस्तात आणि फायदेशीर होऊ शकते. शिवाय विमानप्रवासाचाही आनंद लूटता येतो. पश्चिम बंगालमध्ये कोलकातापर्यंत रेल्वेने जाऊन पुढे आठ तास कोलकाता ते जलपायगुडी असा रेल्वे प्रवास करून बागडोग्राजवळूनच सिक्किमला पोहोचता येते. बागडोग्रा ते गंगटोक हेलिकॉप्टर सेवा उपलब्ध आहे.  मात्र अगोदर बुकिंग करावे लागेल. हा प्रवास नैसर्गिक परिस्थितीवर अवलंबून असतो . शिवाय साहित्य, बॅगा न्यायला वाहन स्वतंत्र पाठवावे लागते.





रेल्वे प्रवास 44 तास, विमान सेवा 4 तास

पुण्याहून प्रत्येक मंगळवारी कामाक्षी एक्सप्रेस या खास गाडीतून जलपायगुडीपर्यंत पोहोचता येते. हा प्रवास 44 तासांचा आहे. दिल्ली, कोलकाता येथून जलपायगुडीला जाण्यासाठी अनेक एक्सप्रेस उपलब्ध आहेत. ज्याच्याकडे भरपूर वेळ आहे आणि रेल्वे प्रवासाचा आनंद घ्यायचा आहे त्यांना हा पर्याय उत्तम आहे. पुणे आणि मुंबई येथून बागडोग्रा येथे जाण्यासाठी थेट विमानसेवा उपलब्ध आहेत. तीन-चार महिने अगोदर तिकिट काढले तर एक व्यक्ती 10 ते 11 हजारांत रिटर्न प्रवास करू शकते. विमान प्रवासाचा आनंद वेगळाच आहे. रेल्वे प्रवासात पूर्ण दोन दिवस, दोन रात्री जातात.
पुण्याहून बागडोग्रा येथे जाण्यासाठी विमानाने थेट विमानसेवा असेल तर चार तास आणि दिल्ली एक थांबा विमानसेवा असेल तर पाच ते सात तास लागतात.

 माय जर्नी बाय  एअर

मुंबईहून इंडिगोच्या सकाळी 7 वाजून 25 मिनीटांनी सुटणाऱ्या विमानातून आम्ही प्रवासाला निघालो. ही विमान सेवा अतिशय सोयीची आणि जलद आहे. प्रवास कसा झाला हे कळलंच नाही.  साडेनऊ वाजता आम्ही गुवाहटी विमानतळावर पोहोचलो. उतरताना  आकाशातून गंगा नदीचे पात्र पहावयास मिळाले. दोन तीन दिवस जोरावर वृष्टी  झाल्यामुळे पाणी गढूळ होते. लष्कर हवाई अड्डा, फोटोग्राफी करणेस मनाई आहे, असे आमच्या वैमानिकाने जाहीर केले. म्हणायला का होईना  मी गुवाहाटीला जाऊन आलो. खाली उतरण्यास परवानगी नव्हती.  गुवाहटीचे प्रवासी उतरले आणि  तेथून पुढे बागडोग्राला जाणारे प्रवासी या विमानात बसले. एक तास ही प्रक्रिया सुरू होती. साडेदहा वाजता आम्ही पुन्हा आगेकूच केले. साडेअकरा वाजता बागडोग्रा या लष्करी हवाई तळावर आम्ही उतरलो.





जलपायगुडीमध्येही डूगडूग...

बागडोग्रा ते जलपायगुडी या दरम्यानच्या प्रवासात रस्त्यावर धावणाऱ्या मिनीडोअर (आपल्याकडील डूगडूग) मला दिसल्या. डूगडूग बघून मला कराडची आठवण झाली. चला,  करवडी, वाघेरीची आरोळी दिली. इकडेपण डूगडूग आहे होय , असे मी आमच्या कार ड्रायव्हरला विचारले. तेव्हा त्याने पश्चिम बंगालमध्ये खासगी वाहतूक जोरात चालते. खासगी वाहतूकीवरच पर्यटन व्यवसाय जोरात चालतो, असे त्याने सांगितले.


बागडोग्रा ते गंगटोक 5 तास

बागडोग्रा हे सिक्किमचे प्रवेशद्वार आहे. सिक्किमची राजधानी गंगटोक ते बागडोग्रा हे अंतर 110 किलोमीटर आहे. आपल्याकडील 110 किलोमीटर अंतर डोळ्यासमोर घेवून तुम्हाला हा प्रवास दीड-दोन तासांचा वाटला असेल, पण तसे नाही. हे अंतर पार करायला नैसर्गिक परिस्थिती चांगली असेल तर किमान 5 तास लागतात. बागडोग्रा पश्चिम बंगालमध्ये आहे. तेथून गंगटोकला जाण्यासाठी खासगी वाहने उपलब्ध आहेत. अगोदर नियोजन केले तर विमानतळावरच तुम्हाला न्यायला टॅक्सीचालक सज्ज असतो.बागडोग्रा ते गंगटोक इनोव्हा गाडी सिझननुसार साडेचार ते साडेपाचहजार भाडे देवून मिळते. अगोदर बुकिंग न केल्यास बागडोग्रा विमानतळाबाहेर वाहने मिळतात. मात्र जास्त पैसे मोजावयास लागू शकतात.  नियोजन करून हा प्रवास करणे कधीही चांगले.



महामहिम राज्यपालांच्या निमंत्रणानुसार आम्ही सिक्किमला निघालो असल्याने राज्यपालांचे खासगी सचिव इरफान सर यांनी आमच्यासाठी इनोव्हा  कारची व्यवस्था केली होती. सुमारे 15-20 किलोमीटर सपाट भूभागावरून प्रवास करीत आम्ही डोंगराच्या घाट रस्त्याला लागलो. तिश्ता नदीच्या काठावरील वळणाचा रस्ता सुरू झाला. सुमारे 70 किलोमीटर अंतर पार केल्यानंतर रंगपो येथून सिक्किमची हद्द सुरू होते. या दरम्यान वळणदार, नागमोडी घाटातून तिश्ता नदीचे मोहक दर्शन होते. तिश्ता नदीवर तीन-चार ठिकाणी लहान-मोठी धरणे बांधली आहेत.


रिवर राफ्टिंगचा थरार...
Ready for  River Rafting 


तिश्ता गावाजवळ मोठा वीज प्रकल्प आहे. हे गाव पार केल्यानंतर तिश्ता नदीत रिवर राफ्टिंगचा थरार अनुभवण्यासाठी आम्ही थांबलो. टुरिझम विभागाच्या परवानगीशिवाय हे रिवर राफ्टिंग सुरु आहेत. हा पश्चिम बंगालचा भाग आहे. रिवर राफ्टिंग म्हणजे तरफेसारख्या जाड प्लास्टिकच्या बोटीमधला थरारक प्रवास.

तिश्ता नदीच्यावरील भागात असलेल्या धरणातून केव्हाही पाणी सोडले जाते. तसेच नदीमध्ये डोंगर, पर्वत, कडे कोसळण्याचे प्रकार सर्रास होत असतात. अचानक पाणी पातळी वाढते. यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव रिवर राफ्टिंगला कायदेशीर परवानगी नाही. मात्र नैसर्गिक परिस्थती चांगली असल्यामुळे आम्ही रिवर राफ्टिंग करण्याचा बेत आखला.
प्रति माणसी 700 रुपये इतके तिकिट आकारले जाते. आपल्या थराराचे व्हिडिओ शुटिंग आणि पन्नास फोटो काढण्याचे 500 रुपये वेगळे आकारले जातात. खिशातील सर्व साहित्य, मोबाईल इनोव्हामध्येच ठेवून  आम्ही एका जीपमध्ये बसलो. जीपच्या टपावरच ती बोट बांधली होती. अतिशय उताराच्या, खडकाळ रस्त्यातून ही जीप नदीकाठाला नेली. सुरक्षा जॅकेट घातल्यानंतर आम्ही नदीच्या काठावर उभ्या असलेल्या बोटीमध्ये बसलो. पोहायला येत असले नी नसले तरी काळजी करू नका, आम्ही आहोत.. तुम्ही सुरक्षा जॅकेट घातलेले आहे. इथे अपघात कधीच होत नाहीत. नदीचे पात्र जास्त खोल नाही, असा धीर देणारा सल्ला बोट पायनटने दिला.



डर के  आगे जीत है

मोठ्या व्यक्तींच्या हातात बॅलेन्स करण्यासाठी आणि चालवण्यासाठी वल्हे दिले. एका व्यक्तिला समोर बसविले. बोट खोल पाण्यात उताराला एकदम लागली की समोरच्या व्यक्तीने छाती बोटीच्या पुढच्या भागावर टेकवून झोपायचे, असा सल्ला दिला आणि आमचा पंधरा मिनीटांचा तो थरारक प्रवास सुरू झाला. हेलकावे खात खात बोट निघाली. आम्ही बोट वल्हवत होतो. ग्रेट गॅम्बलर मधील ओ मारे मायचो...गुणगुणणारा आठवला. गणपती बाप्पा मोरया चा घोष केला. दोनच मिनीटांत तीव्र उतार आला आणि बोट खाली गेली. पायलटच्या सूचनेनुसार आम्ही बॅलेन्स केला. बोटीत पाणी घुसले. कपडे ओली झाली. आता संपलं, असे वाटले. आम्हा सर्वांचीच भीतीने चाळण झाली . आमची छोटी मुले ओरडून एन्जॉय करीत होती, मात्र मोठ्यांना भीतीचा अनुभव आला. दोन-तीनदा हेलकावे खाल्ले. नदीकाठावरून आमचा फोटोग्राफर शुटींग करीत होता. मधूनच आम्ही तिकडे बघत होतो. मोठ्या दगडाजवळून आमची तरफ बोट गेली. मात्र त्या भागाची माहिती असलेल्या पायलटने काळजीपूर्वक हाताळत बोट बाजूला घेतली. पुढे शांत नदीपात्रात बोट थांबली. पोहायचे असेल तर खाली उतरा, अशा सूचना पायलटने केल्या. मात्र ओलेचिंब झालेल्या आमच्यापैकी कोणालाच खाली उतरण्याची इच्छा झाली नाही. लवकर बाहेर घेऊन चल,  असे सांगितले.  नदीकाठाला बोट आल्यानंतर फोटोसेशन केले. खाली उतरलो आणि सुटकेचा नि:श्वास सोडला. एवढा मोठा थरार आयुष्यात पहिल्यांदाच अनुभवला होता. "डर के आगे जीत है' चा अनुभव आला  आणि "जो डर गया वो मर गया' हा गब्बरसिंगचा डायलॉग आठवला.

रात्री 8 च्या सुमारास गंगटोक शहरात आम्ही प्रवेश केला.
राजभवनच्या गेटवर सुरक्षा तपासणी झाल्यानंतर राजभवन विश्रामधामच्या दारात उतरलो.

थरारक अनुभव 




१६ जून २०१६

सिक्कीम सफर भाग 5


मुख्यमंत्र्यांची इच्छा.. राज्यपालांचा आग्रह... 
साकारले पहिले स्वतंत्र महिला पोलिस स्टेशन राणीपुल



पवनकुमार चामलिंग यांनी सिक्किमच्या मुख्यमंत्रीपद पाचव्यांदा शपथविधी घेतल्यानंतर कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने विशेष लक्ष देण्याचे अभिवचन दिले होते. राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी कार्यभार स्विकारल्यानंतर मुख्यमंत्री पवनकुमार चामलिंग, मंत्री मंडळ, आमदार, गंगटोकचे नगरसेवक यांच्यासोबत वेळोवेळी बैठका घेतल्या. राज्याच्या प्रगतीबरोबरच कायदा व सुव्यवस्थेच्यादृष्टीने एकमत घेतले.


याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्र्यांचा पायलट प्रोजक्ट म्हणून स्वतंत्र महिला पोलिस स्टेशनच्या निर्मितीचा पाया रचला. राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनीही याबाबत मुख्यमंत्र्यांना काही सूचना केल्यानंतर सिक्किम राज्यात पहिल्या स्वतंत्र महिला पोलिस ठाण्याची निर्मिती झाली.

महिला पोलीस ठाणे उद्घाटन प्रसंगी फोटो 

तिमितारक (दक्षिण), फुडोंग (उत्तर), कलूक (पश्चिम) आणि राणीपूल (पूर्व) अशा चार ठिकाणी  स्वतंत्र महिला पोलिस ठाणे नियोजन करण्यात आले आहे. मार्च 2016 रोजी पूर्व सिक्किम जिल्ह्यातील राणीपूल येथे स्वतंत्र महिला पोलिस ठाण्याचे उद्‌घाटन झाले. तायक्वांदोमध्ये इंडोनेशिया, रशिया, भूतान या ठिकाणी झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदके मिळविलेल्या सावित्री प्रधान या डॅशिंग महिला अधिकाऱ्याची पोलिस इन्स्पेक्टर म्हणून नेमणूक झाली.


महिलांचे स्वतंत्र पोलिस स्टेशन हा सिक्किमकरांसाठी वेगळा अनुभव होता. मात्र सर्व प्रकारचे चांगले बदल तात्काळ स्विकारण्याची तयारी असलेल्या लोकांनी राणीपूल पोलिस स्टेशनला सहकार्य करण्याची भूमिका घेतली. वास्तविक हे पोलिस स्टेशन जुने आहे. या ठिकाणी अनेक वरिष्ठ अनुभवी पुरूष पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांनी काम केले होते. त्यांनी महिला पोलिस ठाणे झाल्यानंतर आनंदाने बदल स्विकारला. सावित्री प्रधान यांच्या नेतृत्वाखाली 3  सिनियर ऑफिसर्स, 2 सब इन्स्पेक्टर, 24 कॉन्स्टेबल आणि 10 ऍडिशनल रिझर्व्हड्‌ पोलिस बटालियन असा महिला पोलिस स्टाफ गेल्या दोन महिन्यांपासून कामाला लागला आहे. या पोलिस ठाण्यात आता सर्व महिलाच आहेत.



राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते सावित्री प्रधान यांना विशेष पदक देवून राज्य शासनाने गौरविले होते.  मनिपूर येथे स्पर्धेला जाण्यापूर्वी राज्यपालांनी प्रधान यांना 50 हजार रुपयांची खास मदत देऊ केली होती. सावित्री प्रधान या तायक्वांदो स्पेशालिस्ट, डॅशिंग पोलिस अधिकाऱ्याचा उत्साह आणि काम करण्याची पद्धत याबाबत मुख्यमंत्र्यांसह राज्यपालांनी कौतुक केले आहे. महिला पोलिस ठाण्याच्या अधिकारी दणकट पाहिजेत. यासाठी ती स्पोर्टस्‌ वूमनच हवी. या निकषाखालीच प्रधान यांची पोलिस ठाण्याच्या प्रमुख म्हणून निवड झाली.


राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या भेटीदरम्यान त्यांनी सावित्री प्रधान यांच्याबाबत माझ्याजवळ भरभरुन कौतुक केले होते. राज्यपालांच्या सुचनेनूसार मी या पोलिस ठाण्याला भेट दिली. तेव्हा सिनियर इन्स्पेक्टर अंकिता यांनी आमचे स्वागत केले. प्रधान मॅडम गंगटोक-बागडोग्रा दरम्यान रस्त्यावर अपघात झाल्यामुळे तिकडे गेल्याचे अंकिता यांनी सांगितले. दरम्यान संपूर्ण पोलिस स्टेशन फिरून दाखवून अंकिता यांनी महिला पोलिस ठाण्याचे अनुभव सांगितले.
अंकिता म्हणाल्या, "आम्ही महिला असलो तरीही सर्व बाजूंनी सक्षम आहोत. यापूर्वी आम्ही पुरूष अधिकाऱ्यांसोबत काम केले आहे. कामाचा अनुभव आहे. त्या दरम्यान पीडित महिला ठाण्यात आली तर पुरूष पोलिसांमुळे बोलायला कचरत होते, असा अनुभव होता. आता मात्र आमच्या ठाण्यात आम्ही सर्व महिला आहोत. त्यामुळे पीडित महिला कचरत नाहीत. आम्ही सकाळी 8.30 ते सायं. 6.30  आणि सायंकाळी 6.30 ते सकाळी 8.30 अशा दोन शिफ्टमध्ये काम करतो. कसलीच अडचण येत नाही. सिक्किममध्ये क्राईम रेट खूप कमी आहे.


नो पाॅलिटीकल प्रेशर

वर्षभरात एखाद्या ठाण्यात 50 ते 60 गुन्हे दाखल होतात. राणीपूलमध्ये 2015 मध्ये 62 गुन्हे दाखल झाले होते. सिनियर अधिकारी सावित्री प्रधान या पूर्णवेळ पोलिस ठाण्यात असतात. आम्हा महिला पोलिसांना कसलीही अडचण आली तर धावून येतात. त्यामुळे आमचाही उत्साह वाढला आहे. आम्हाला काम करताना कोणताच दबाव येत नाही. पोलिस स्वतंत्रपणे काम करतात. राजकीय दबाव नसल्यामुळेच सिक्किममध्ये पोलिसांचा दबदबा आहे आणि त्यामुळेच आम्ही गुन्ह्यांवर नियंत्रण ठेऊ शकतो.' , असे सिनियर अधिकारी अंकिता यांनी सांगितले.

डॅशिंग सावित्री मॅडम ठाणे प्रमुख

ठाण्याच्या निरीक्षक सावित्री प्रधान यांचे दरम्यान आगमन झाले. साडेपाच फूट उंचीच्या या डॅशिंग महिला अधिकाऱ्याचा रुबाब व आत्मविश्वास डोळ्यातच दिसत होता. राज्यपालांच्या सूचनेनुसार आम्ही इथे आलो आहे, असे सांगितल्यानंतर प्रधान यांनी "वो बहोत अच्छे आदमी हैं, उन्होंने हम महिलाओें को बहोत सन्मान दिया हैं,' असे त्यांनी उत्साहाने सांगितले. लहानपणापासूनच मला पोलिस क्षेत्रात कार्य करण्याची इच्छा होती. वडिल लहानपणीच वारले. आईला भिती वाटायची. मात्र तरीही मी पोलिस सेवेत दाखल झाले. "मैं सेल्फ डिफेन्स पे विश्वास करती हुँ. गांव-गांव मे लडकियों को इकठ्ठा कर के कॅम्प लेती हुँ और वहां सेल्फ डिफेन्स कि ट्रेनिंग देती हुँ.' असेही सावित्री प्रधान यांनी सांगितले.

 पोलीस को  पब्लिक का साथ चाहिए  
मी अनेकदा धाडसाने घुसून धडक कारवाई केली आहे. परवा एका तरुणाकडे झोपेच्या प्रमाणापेक्षा अधिक गोळ्या होत्या. त्या बाळगणे इथे गुन्हा आहे. त्याला पकडण्यासाठी मी गेल्यानंतर शरीराने दणकट असलेल्या त्या मुलाला अशा ठिकाणी पकडले की, तो अजिबात हलू शकला नाही. माझ्यासोबत पोलिस फोर्स कमी होता. मात्र तिथे बघ्घ्यांची खूप गर्दी होती. यापैकी कोणीही पोलिसांच्या मदतीला आला नाही. याचे वाईट वाटले. मात्र तरीही आम्ही त्याला पकडून पोलिस ठाण्यात आणले. "पब्लिकने पुलिस को साथ देना चाहिए. तभी पुलिस और अच्छा काम कर सकेगी'अशी आशा व्यक्त करीत काही झालं तरी आम्ही महिला कोठेच कमी नाही असे त्यांनी आत्मविश्वासाने सांगितले.

गुन्ह्यांचे अत्यल्प प्रमाण

कायद्याची कडक अंमलबजावणी करताना कोणत्याही प्रकारचा दबाव नसल्यामुळे आणि मुख्यमंत्र्यांच्या सहकार्याने सिक्किममध्ये पोलिस चांगले काम करीत आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मी महिला आहे म्हणून कधीच त्रास दिला किंवा कार्यालयीन छळवणूक केली असे घडले नाही. पोलिसांच्या चांगल्या कामगिरीमुळेच या वर्षी गेल्या पाच महिन्यांत राणीपूल पोलिस ठाण्यांतर्गत दखल घेण्याइतके   कलम 302, 307, 376, 498 आणि प्रोक्सो असेे फक्त 6 गुन्हे घडले आहेत, असे सावित्री प्रधान यांनी सांगितले.


(क्रमश:)

१५ जून २०१६

सिक्कीम सफर 4


राजभवनातील न्यायमूर्ती
शपथविधी सोहळा.. याचि देही...





अभ्यासू माजी खासदार श्रीनिवास पाटील यांना 2013 मध्ये सिक्किमच्या राज्यपालपदी विराजमान होण्याचा बहुमान मिळाला. घटनात्मकदृष्ट्या या पदाला फार मोठे महत्व आहे. कराड-साताऱ्याच्या जनतेने पृथ्वीराज चव्हाण यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले पाहिले आहे. राज्याचे पहिले मुख्यमंत्री सुद्धा कराडचेच. यशवंतराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्याच्या, देशाच्या विकासात बजावलेली मोलाची कामगिरी सर्वांच्याच लक्षात राहणार आहे.

या दोघा मातब्बरांपेक्षा थोडं वेगळं मात्र घटनात्मकदृष्ट्या फार मोठे पद श्रीनिवास पाटील यांना मिळाले आहे. राज्य छोटं की मोठं यापेक्षा त्या राज्याचा  "प्रथम नागरिक' म्हणून राज्यपालांकडे पाहिले जाते. श्रीनिवास पाटील गेली पावणेतीन  वर्षे या पदावर आहेत. त्यांचा शपथविधी पाहण्याचा योग काही जणांनाच आला असेल.

सिक्किम दौऱ्यात राज्यपालांच्या वतीने  सिक्किम उच्च न्यायालय न्यायमूर्तींच्या शपथविधीचा अविस्मरणीय प्रसंग राजभवनावर अनुभवण्याचा योग आला.

राजभवन  हा विषय औत्सुक्याचा आणि कुतूहलाचा राहिला आहे. सामान्य नागरिकांना या ठिकाणी जाण्याचा किंवा कामाचा योग फार क्वचित येतो. आमदार, खासदार, मुख्यमंत्री, मंत्री आणि राज्यपालांचे पाहुणे यांनाच राजभवनावर प्रवेश असतो. इंग्रजांच्या राजवटीत त्या विभागावर राज करणारा प्रमुख म्हणजे गव्हर्नर. ऐशोआरामात राहणाऱ्या इंग्रज गव्हर्नरनी स्वत:च्या निवासासाठी अनेक प्रमुख ठिकाणे "गव्हर्नर निवास' उभारली आहेत. भारतातील अनेक राज्यात आज असणारे राजभवन बहुतांश इंग्रजांनीच बांधलेली आहेत.



1888 साली सिक्किम-तिबेट  युद्ध संपल्यानंतर ब्रिटीशांनी सहाय्यक राजकीय अधिकारी म्हणून जॉन क्लाऊड व्हाईट यांना सिक्किममध्ये पाठविले. सिव्हिल इंजिनियर असलेल्या व्हाईट यांनी नियोजनबद्ध आराखडा करून हे राजभवन बांधले आहे. उंच डोंगरावर अतिशय सुंदर अशा जागेवर उभारलेल्या या राजभवानातून कांचनगंगा रांगा अतिशय सुंदर दिसतात. या राजभवनाने गेल्या सव्वाशे वर्षांत अनेक घडामोडी, उलथा-पालथ पाहिल्या आहेत. या राजभवनामध्ये एक मराठी माणूस विराजमान आहे. याचा अवघ्या महाराष्ट्राला अभिमान आहे.

सिक्किमच्या मुख्य न्यायाधिशांच्या शपथविधीसाठी आपणास खास निमंत्रण आहे, असा फोन राज्यपालांच्या खासगी सचिवाने मला सायंकाळी केला. दुसऱ्या दिवशी सकाळी हा शपथविधी होणार होता. त्या दिवशी सकाळी 9 वाजता राजभवनातून एक खास वाहन आम्हाला नेण्यासाठी राजभवन सर्किट हाऊसवर आले. वास्तविक राजभवन ते सर्किट हाऊस हे अंतर 200 मीटर आहे. तरीही आम्हाला न्यायला खास वाहन आल्यानंतर हे असे का? विचारले असता "हा प्रोटोकॉल आहे. आपण राज्यपालांचे पाहुणे आहात' असे सांगण्यात आले.

Guests of Governer असे लिहलेल्या आसनावर आम्ही स्थानापन्न झालो 

पाचच मिनीटांत आम्ही राजभवनसमोर पोहोचलो. सुमारे 150 आसनक्षमता असलेल्या दरबार हॉलमध्ये शपथविधी कार्यक्रम होता. सन्मानपूर्वक आम्हाला तेथे नेण्यात आले. व्यासपीठाच्या अगदी शेजारी उजव्या बाजूला तीन कोच ठेवले होते. यावर "गेस्टस्‌ ऑफ गव्हर्नर' असे लेबल चिकटवले होते. यावर आम्ही स्थानापन्न झालो. हळू-हळू दरबार हॉल भरू लागला.
सिक्किम मंत्रीमंडळातील सदस्य, आमदार, मुख्यमंत्र्यांचे सचिव, राज्यपालांचे सचिव, सिक्किम न्यायालयाचे न्यायाधिश, वरिष्ठ अधिकारी अशी निवडक मंडळी स्थानापन्न होऊ लागली. आम्हाला हे सगळं नवीन होतं. सगळे लोक राज्यपालांचे पाहुणे म्हणून आमच्याकडे पाहत होते. काय हवं काय? विचारत होते. त्यामुळे आमची छाती गर्वाने फुगली होती. 9 वाजून 45 मिनीटांनी न्यायमूर्ती सतीश अग्निहोत्री यांचे आगमन झाले. पहिल्या रांगेत नेमून दिलेल्या कोचवर ते सपत्निक विराजमान झाले. त्या पाठोपाठ मुख्यमंत्री पवनकुमार चामलिंग यांचे तीन-चार मंत्र्यांसोबत आगमन झाले. सर्वांनी त्यांना उभे राहून नमस्कार केला.

मराठमोळ्या साज परिधान करून सौ रजनीदेवी पाटील 

9 वाजून 50 मिनीटांनी फर्स्ट लेडी अर्थात राज्यपालांच्या पत्नी रजनीदेवी पाटील यांचे आगमन झाले. नऊवारी साडी, नाकात नथनी, कपाळावर मोठी टिकली अशा अस्सल मराठमोळ्या पोशाखात आलेल्या सौ. पाटील यांनी सर्वांचेच लक्ष वेधले.
10 चे ठोके पडले आणि राज्यपाल महामहिम श्रीनिवास पाटील यांचे दरबार हॉलमध्ये आगमन होताच सभागृहात पिन ड्रॉप शांतता पसरली. सर्व जण उभे राहिले. न्यायमूर्ती सतीश अग्निहोत्री व्यासपीठावर राज्यपालांशेजारी जाऊन उभे राहिले आणि लगेच लष्कर बॅन्डच्या ठेक्यावर अतिशय सुंदर आवाजात जन-गण-मन सुरू झाले. राष्ट्रगीताची धून वाजत होती आणि तिकडे आमच्या तन-मनांत भारतमातेविषयी आदराच्या भावना प्रेरित होत होत्या.
आपल्याच भागातून मारुल सारख्या छोट्या गावात शिकलेला व्यक्ती आयएएस होतो. पुढे खासदार होतो. राज्यपाल होतो आणि आम्ही त्यांच्यासमोर उभे आहोत ही भावनाच खूप आनंद देऊन गेली. जरीचा फेटा घातलेले राज्यपाल श्रीनिवास पाटील सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते. राष्ट्रगीतानंतर लगेचच राज्यपालांनी शपथविधी कार्यक्रम सुरू करण्याच्या सूचना दिल्या. राज्यपाल आणि न्यायमूर्ती दोघेही उभे राहिले.  "मी अशी शपथ घेतो की ...' असे म्हणत राज्यपालांपाठोपाठ वाचन करीत अग्निहोत्री यांनी शपथ घेतली.  राज्यपालांनी राज्याच्या नव्या न्यायमूर्तींना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर कार्यक्रम संपल्याचे जाहीर करण्यात आले.
शपथविधी नंतर  औपचारिक पदग्रहण 

शपथविधी हा खरे तर पाच मिनीटांचा कार्यक्रम असतो. मात्र त्याची तयारी, राजशिष्ठाचार, कोणी कोठे उभे रहायचे, काय करायचे याचे नियोजन हे खरंच डोळ्यांत सामावून ठेवण्यासारखे होते.

महामहिम राज्यपालांच्या समवेत  न्यायमूर्ती आणि मुख्यमंत्री 

कार्यक्रमानंतर सर्वांनी न्यायमूर्ती सतीश अग्निहोत्री यांना शुभेच्छा दिल्या. फोटोसेशन झाले. त्यानंतर हॉलच्या तळमजल्यावर खास चहा-पानाच्या नियोजनासाठी सारे निघाले. 

मुख्यमंत्री पवनकुमार चामलिंग सोबत मी 

एका महत्वपूर्ण कार्यक्रमासाठी जायचे असल्याने राज्यपालांची परवानगी घेवूनच  मुख्यमंत्री बाहेर जायला निघाले . यावेळी आमच्यातला पत्रकार जागा झाला.  पुढे होऊन मुख्यमंत्र्याना थांबवले. 'आम्ही राज्यपालाचे गावातील पत्रकार आहोत,  तुमच्या सोबत फोटो काढायचा आहे ', असे विचारले.  मोठ्या खुशीने पवनकुमार चामलिंग यांनी ते मान्य केले.  माझा हात पकडला आणि,  ' आओ,  आप हमारे मेहमान है ' , असे म्हणत फोटोसेशन केले.  माझ्या सोबतीला असणारे माझे मित्र प्रशांत सातपुते,  माझे साडू दिलीप खोचरे आणि मी मुख्य मंत्र्यासोबत गप्पा मारल्या.  त्यांना महाराष्ट्र भेटीचे निमंत्रण दिले. 
मुख्यमंत्र्यांसोबत फोटोसेशन 

मुख्यमंत्ती गेल्यावर आम्ही सारे खालच्या मजल्यावर  आलो.
येथील दरबार हॉलमधील दावतखान्यामध्ये सर्व पाहुणे, अधिकारी, मंत्री जमले.  अतिशय नियोजनबद्ध हा हॉल सजविला होता. कोणतीही गडबड न होता शांतपणे चहापानाचा कार्यक्रम संपला. 10 वाजून 30 मिनीटांनी पुन्हा राष्ट्रगीताची बॅन्डवर धून वाजली. त्यानंतर महामहिम राज्यपाल या हॉलमधून सर्वप्रथम सपत्निक बाहेर पडले आणि त्यांच्या पाठोपाठ इतर सारे निघाले.
शपथविधी नंतर न्यायमूर्ती सोबत महामहिम राज्यपाल 

अतिशय देखण्या रुबाबदार आणि राजेशाही कार्यक्रमाचा लाभ "याचि देही... याचि डोळा...' पाहण्याचा योग मला आला. आपला माणूस या पदावर नसता तर राजभवनावर आपल्याला प्रवेश मिळाला असता का? फक्त लांबून किंवा फोटोतच राजभवन पहायला मिळाले असते, अशी भावना मनात आली.
(क्रमश:)
शशपथविधी नंतर साहेबांच्या ऑफिस केबिनमध्ये 

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...