फॉलोअर

११ एप्रिल २०१६

वेळ काढून वाचा, दोन महापुरुषांची जयंती आहे



' वेळ काढुन वाचा कारण 125 जयंती आहे '

असे शिर्षक असलेली नालंदा सामाजिक संघ महाराष्ट्र या ग्रुप अॅडमीननी व्हाॅटसअपवर शेअर केलेली एक पोस्ट सर्वत्र फिरत  आहे. मला ती खुप आवडली. गेली अनेक वर्षेपासून छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मी पहात  आलो आहे. ही जयंती साजरी करताना माझ्या मनात याच प्रकारचे विचार उमटले होते, बहुतांशी तेच विचार या पोस्ट मध्ये आहेत. त्यामधील काही भडक शब्द वगळून , एडिटींग करून अॅडमीन लेखकाच्या परवानगीने ती पोस्ट जशीच्या तशी पुढे सादर करत आहे .

मी लहान असतानाचे काही प्रसंग मला आजही आठवतात . त्यापैकी एक प्रसंग सांगावासा वाटतो. सप्टेंबर महिन्यात ग्रामीण भागात पावसाळी लागण केलेल्या पिकांची कापणी सुरु होते. त्याच दिवसात सकाळी सकाळी बहुरूपी,पिंगळा,अस्वलवाला,वासुदेव तशीच ढोलगं व चाबकाचा आसुड ओढत कडकलक्ष्मी मरीआई दारादारावर यायचे.  आम्ही डोळे चोळतच अंथरूणातून उठून बाहेर यायचो. तेव्हा आई सुपातुन या लोकांना धान्य, घेवडं ज्वारी घालायची. कपाळी टिळा लाऊन ते लोक निघून यायचे. यांचा उद्देश पोट भरण्याचा होता हे आज ध्यानात येतंय. पण हे लोक याच दिवसात का येतात याचं उत्तर मला चळवळीत आल्यावर मिळाले.कारण या काळात सुगी असते.



तशीच काही दिवसांनी बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती येणार आहे. त्यानंतर काही दिवसानंतर शिवजयंती येणार आहे. भक्त मंडळी जागे होण्याची चाहुल लागली आहे.म्हणूनच हा लेखन प्रपंच.

काही दिवसांवरच क्रांतीसुर्य विश्वरत्न बाबासाहेब डाॅ.भिमराव आंबेडकर यांची व त्यानंतर अन्य महापुरूषांची जयंती आल्या आहेत. ज्या महापुरुषांनी आपली सारी हयात बहुजन समाजाला स्वातंत्र्य हक्क मिळवून देण्यासाठी घालवली . प्रसंगी स्वतःच्या संसाराकडे दुर्लक्ष केले. त्या महापुरूषांचा जो उद्देश होता आमच्या संपूर्ण स्वातंञ्याचा. आज त्याच महापुरुषांचं दुर्देवं त्यांची जयंती साजरी करण्याचा आमचा उद्देश काय असतो ?

समाजातून पट्टी गोळा करणे , जेवणं घालणे आणि सगळ्यात महत्त्वाचे हजारो-लाखो रुपये खर्च करुन डाॅल्बी सिस्टिम सांगणे, मिरवणूक काढणे आणि दारु पिऊन मिरवणुकीत धाबड धिंगाणा, नंगा नाच करणे इतकाच असतो. गांधी,नेहरू,टिळक,आगरकर,गोखले,सावरकर  यांच्या जयंत्या साज-या करताना डाॅल्बी लावून,दारु पिऊन नंगा नाच करत धिंगाणा घालतात का ?  जेवनावळ्या घालतात का ? आणि आम्ही !

आम्ही आमच्या समाजातून हजारो रूपये गोळा करतो,आणि दंगा,नाच, दारु,जेवण, मिरवणूक काढून उधळून टाकतो. आमचा तरुण ज्योत आणायला जातो पण ज्योत घेऊन पळताना त्याला एक क्वाटर मारल्याशिवाय पळता येत नाही २०० मिलि टाकून ५० कि.मी पळण्याची तयारी दाखवणारा आमचा तरुण अर्धा किलो मेंदूचा वापर करताना दिसत नाही हे दुर्देव आहे.

गावातून,गल्लीतून मिरवणूक काढताना बाबासाहेबांच्या पुढे नाचताना स्प्राइड आणि थम्स अप मध्ये मिसळून दारु प्यावी लागते कारण नाचताना कुठे बाजूला जाऊन चालत नाही., तग धरला पाहिजे.  गाणी तर त्याहून भारी, कोणती ????
पोरी जरा जपून दांडा धर.....शांताबाई .....

नशेत धुंद होऊन नाचणारा तरुण आमच्याच आया बहिणींची,आमच्याच महापुरुषांची आब्रु वेशीवर टांगत असतो आणि दुस-या दिवशी बाहेर काही झाले तरी पण हा अंथरूणात घोरत पडलेला असतो. वर्षभरात एकच दिवस काम ते हि चुकीचे !

काही बुद्धीवादी लोक आमच्या महापुरुषांची चरिञ आणि चारिञ्य बदनाम करुन आम्हाला संपवु इच्छितोय आणि आम्ही माञ गुंगीचं औषध घेउन आरामात झोपुन राहतो. षड्यंञ पुर्वक एखाद्याने जातियवाद वाढण्यासाठी पुतळा विटंबना,डिजिटल बोर्ड फाडला तर आपण जागे होतो अन आमच्याच बांधवाच्या विरोधात उभे राहतो.
गुलाम लोक स्वताच्या मेंदुने चालत नाहीत तर शत्रूच्या इशार्यावर चालतात त्यामुळे त्यांचा सत्यानाश हा अटळ असतो, हे कधी आम्हाला कळणार?

आजपर्यंत आपण आमच्या महापुरुषांच्या जयंत्या साज-या केल्या त्या शञुच्या, व्यवस्थेच्या सोईनुसारच केल्या.आणि त्याचा फायदा त्याच्या व्यवस्थेला भरभरून झाला. त्यामुळे आमच्या समाजाला आमच्या महापुरुषांचा खरा इतिहास समजलाच नाही. पण दंगली, जातीयवादाला माञ प्रेरणा मिळाली व आमची पिढी व्यवस्थेच्या गुंगीत गुंगुन राहिली.
बांधवानो, एक दिवस नाचून किंवा जयंती साजरी करुन आम्हाला आमचा इतिहास ,आमचे महापुरूष समजणार नाहीत. त्यासाठी आम्हाला सातत्याने समाजाला जागृत करावं लागेल. आमचे महापुरूष हे आमची प्रेरणा आहेत व त्यांचा इतिहास हीच आमची विरासत आहे.आमच्या महापुरुषांचा खरा इतिहास जर आम्ही आमच्या समाजाला समजाऊन सांगू शकलो नाही तर आमच्यासारखे षंढ आम्हीच असू .आम्हाला आजपर्यंत धर्माची,जातीची दारु देऊन उच्च  व्यवस्थेने आमच्याकडुन नागड्यानेच माकडनाच करुन घेतला . पण यातुन आम्ही आमची आब्रु , स्वाभिमान त्यांच्या वेशीला कधी बांधून ठेवला कळलच नाही.

येणारा काळ हा भयानक आहे आणि आम्ही जर त्यांच्या व्यवस्थेच्या सोईनं आमच्या महापुरुषांच्या जयंत्या सवडीनुसार , पाहिजे तशा करु लागलो तर ही व्यवस्था आम्हाला हिजडे करुन भिक मागायला लावल्याशिवाय राहणार नाहीत. क्रांतीचा एक सिंद्धात आहे, हिजडे क्रांती कधीच करत नाहीत.

गल्लोगल्लीत, बहुजन दुकानदार, शेतकरी,नोकरदार या आपल्याच लोकांना धमकी दाखवून खंडणी गोळा केल्यासारखे जयंतीसाठी आमची पोरं पट्टीं गोळा करतात व तोच पैसा चुकीच्या मार्गाला लावुन येणा-या पिढिला मातीत घालण्याचा डाव रचत आहेत. यासाठी मिञहो,आपण समाजाच्या पैशाचा योग्य सदुपयोग करायला हवा. अन्यथा आपण समाजाची दिशाभूल केल्यासारखे होईल. समाजाच्या पैशातून समाजाला सक्षम विचारधारा द्यायला हवी.  खरा इतिहास व वर्तमान व्यवस्थेचे षड् यंञ सांगून जागे केले पाहीजे . कारण तुमचं स्वातंत्र्य अज्ञानात दडलं आहे आणि समाज जागा झाला, जागृत झाला तरच त्या मंडळींच्या कारस्थानाना चाफ बसेल आणि बहुजनांच्या गळ्याभोवती आवळलेला फास आपोआप तुटेल. यासाठी समाजानेही जे लोक खरोखर बहुजनांना जागृत करत आहेत त्यांनाच पैसा, वेळ, बुद्धी, श्रम,कौशल्य द्यावे. अन्यथा चुकीची जयंती साजरी करणार्यांना खुशाल विरोध करावा. नाहीतर तुमच्याच पैशात तुम्ही तुमचा सत्यानाश करत आहात हे सिध्द होईल.

भक्त आणि अनुयायी यामध्ये फरक आहे. तीनशे पासष्ट दिवसातून एक दिवस जागे होणारा भक्त आणि वर्षभर, आयुष्यभर महापुरूषांच्या विचारावर चालणारे अनुयायी असतात. भक्त एक दिवस जयंती साजरी करतात तेही चुकीच्या पद्धतीने . पण अनुयायी हे तीनशे पासष्ट दिवस निरंतर समाजाला जाग्रुत करतात. भक्त भक्ति करतात व अनुयायी समाजाला स्वातंत्र्य देऊ इच्छितात. समाजाने भक्तानां साथ द्यायची असेल तर गुलामी ही तुमच्या पाचवीला पुजलेली असेल. पण जर समाजाने अनुयायांना साथ दिली तर अनुयायी समाजाला स्वातंञ्याच्या उबंरठ्यावर नेहतील.
तेव्हा जागे व्हा,सतर्क व्हा.आणि भक्ताना अनुयायी होण्यास जागृत करा व तुम्हीही जागृत व्हा.......

नालंदा सामाजिक संघ महाराष्ट्र.



अशी ही पोस्ट आहे. खुप छान विचार मांडले आहेत.


या निमित्ताने मला काही जुन्या गोष्टी आठवल्या. 1982 - 83 साली करवडी गावात आम्ही शिवप्रेमी मंडळ स्थापन केले होते. आम्ही महापुरुषांच्या जयंती साजरी करत. सदाशिवगड, वसंतगड, आगाशिवगडावरून शिवज्योत आणायला जात होतो. कराड तालुक्यात सुद्धा अनेक मंडळे लांब अंतरावरून ज्योत आणायला जायचे. शिवप्रेम जागृत व्हायचे. फलटणच्या शिवाजीराव भोसले यांचे शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित व्याख्यान आयोजित केले जात होते. ते व्याख्यान  ऐकून विचाराचे स्फुल्लिंग पेटायचे.

पुढे पुढे जयंतीचे स्वरूप पालटू लागले. समृद्धी आल्यामुळे पैसा हातात खेळू लागला. वर उल्लेख केलेल्या सर्व गोष्टी हळूहळू होत राहिल्या. जयंती साजरी करताना महापुरुषांचे स्मरण कमी जल्लोष वाढत गेला. छत्रपती शिवाजी महाराज की जय ही घोषणा खरं तर राजांच्या कतृत्वाला सलाम करण्यासाठी आहे. मात्र कराड सारख्या अनेक शहरात मशिदी जवळून मिरवणूक जाताना खुन्नस देण्यासाठी ही घोषणा आज दिली जाते.

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर हे खरे तर सर्व समाजाचे नेते आहेत पण त्यांना  एका चौकटीत नेऊन ठेवण्याचे काम केले जात आहे. यामध्ये बदल झाला पाहिजे अशी सततची मागणी काही पत्रकार, समाजकारणी करत आहेत . याचापरिणाम म्हणून कराडात यावर्षी सर्वाना बरोबर घेऊन 125 वी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी होणार आहे, हे कौतुकास्पद आहे.

सोशल मीडिया हे समाजजागृतीचे प्रभावी माध्यम आहे. महापुरुषांचे विचार या माध्यमातून तरूण पीढीपर्यंत पोहचू शकतात. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचे अनेक ग्रुप व्हाॅटसअप , फेसबुकवर आहेत. मात्र दुर्दैवाने या ग्रुपमध्ये फक्त डोकी भडकावणारे विचार टाकले जातात. महापुरुषांना जातीच्या चौकटीत बंदिस्त केले जात आहे.

वैचारिक बैठक असणारे अॅडमीन असणारे नालंदा, शिवम सारखे काही ग्रुप सुद्धा  आहेत. डाॅ. शिरीष काटकर अॅडमीन असलेल्या शिवम ग्रुपमध्ये रोज नऊ ते साडे दहा दरम्यान एका सामाजिक, ऐतिहासिक विषयावर चर्चा होते. या ग्रुपचे अनुकरण करण्याची गरज आहे.

बाबासाहेब आंबेडकर यांचा एक तेजस्वी विचार आहे.  वाचा, शिका आणि संघर्ष करा. हा विचार पुर्ण न वाचता केवळ संघर्ष करण्यावर जोर दिला जातो. या जगात ज्ञानाइतकी ताकद कशातच नाही, हे बाबासाहेबांनी सुद्धा ओळखले होते. बाबासाहेबांनी मिळवलेल्या पदव्याची माहिती घेतली तर हे लक्षात येईल.

बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार घालून अभिवादन केले म्हणजे आपले काम संपत नाही. बाबासाहेबांच्या, महाराजांची जयंती साजरी केली, पुतळ्याभोवती लायटींग केली म्हणजे चांगली जयंती झाली असे नाही तर त्यांचे विचार किती डोक्यात शिरले, किती जण शिकले, किती जण एमपीएससी, युपीएससी परिक्षेत चमकले हे महत्वाचे आहे.
शिवजयंतीला किती लांबून ज्योत आणली यापेक्षा राजांचे विचार किती लांब पोहचवले, हे ध्यानात घेतले पाहिजे. वाहनांवर, मोबाईलवर, हातावर शिवाजी महाराजांचे चित्र लावून मिरवताना छत्रपतीचे आचरण किती करतो, हे ही पहायला हवे.

शिवचरित्र अभ्यासक संतोष तोत्रे यांनी जे महिलांचा सन्मान करत नाहीत त्यांना शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा अधिकार नाही, असे प्रखर मत मांडले आहे, ते योग्यच आहे. महापुरुषांच्या जयंती साजरी करताना त्या निमित्ताने गोळा केलेल्या वर्गणीतून घरोघरी शिवचरित्र, भीमचरित्र, बाबासाहेबाचे विचार, संविधान प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे.
आंबेडकर जयंती दिनी ड्राय डे असावा अशी चळवळीतील विचारवंताची मागणी रास्त आहे. पण फक्त हे करून मुळ प्रश्न संपणार नाही. त्यासाठी वैचारिक क्रांती हाच पर्याय आहे आणि ही क्रांती होण्यासाठी शिक्षणाला पर्याय नाही
.
मारूल हवेली ( पाटण ) येथील एका दलित कुटुंबातील विनोद मस्के नावाचा मुलगा अमेरिकेत मायक्रोसाॅफ्ट कंपनीमध्ये उच्च पदावर काम करीत आहे. परवा संगणक तज्ज्ञ सारंग पाटील यांनी या मुलांच्या खडतर प्रवासाची कहाणी सांगितली. केवळ अभ्यासाच्या जोरावर हा मुलगा तिथं पोहचला आहे, बिल गेट्स सोबत बैठकीला बसतो, वर्षाला एक कोटी रूपये पगार घेतो. आपल्यातीलच अशा एका मुलाचा आदर्श घेऊन आपणही शिकलेच पाहिजे असा संकल्प आपण 125 व्या जयंती दिनी घेऊ या.


महत्त्वाचे. ..कराड सारख्या शहरात  अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज आणि  भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी मिरवणूक काढण्यात येते.  कराड मधील शिवप्रेमी आणि भिमप्रेमी जनतेचा मला अभिमान आहे.  कराडचे अनुकरण इतरांनीही करावे , ही अपेक्षा.

जय शिवराय, जय भिम !

.               ....सतीश मोरे
  

१० एप्रिल २०१६

सखीचं वेगळपणं



सखी कोण आहे,
सखी काय आहे ,
ती कुठून आली,
कुठे आहे ?
हे मी या अगोदरच एका ब्लॉगवर लिहिले आहे.

सखीला काय आवडतं, 
तिचं काय आवडते,
काय वेगळे आहे तिच्याकडे !
हे पण सांगीतले पाहीजेच ना !!!!



                                               शनिवार कविता डे




      सखी,

             तुझं वेगळेपण
                  तुझ्या नावात आहे
                     तुझ्या स्वभावात आहे
                         तुझ्या स्पष्ट बोलण्यात आहे
                              तुझ्या प्रेमाबाबतच्या दृष्टिकोनात आहे.




 
                  तुझं वेगळेपण
                      तुझ्या हास्यात आहे,
                          तुझ्या गोड लाजण्यात आहे,
                             तुझ्या हळुवार वावरण्यात आहे,
                                  तुझ्या दिलखेचक कटाक्षात आहे.


              तुझं वेगळेपण 
                  तुझ्या नजरेत आहे ,
                     तुझ्या आवडीनिवडीत आहे,
                         तुझ्या हव्याहव्याशा स्पर्शात आहे,
                            तुझ्या मला शोधणाऱ्या बैचेनीत आहे.


                                      तुझं वेगळेपण ,  
                                           तुझ्या सजण्यात आहे ,
                                               तुझ्या कस्तुरी गंधात आहे ,
                                                   तुझ्या नशीली नयनात आहे ,
                                                             तुझ्या माझ्या नात्यातील दृष्टीकोनात आहे .
         
                                         तुझं वेगळेपण, तुझ्यातच आहे 





                             

                                    ......सतीश मोरे





०८ एप्रिल २०१६

मराठमोळी गुढी सिक्कीम मध्ये




स्व. यशवंतराव चव्हाण यांचे अनुयायी, खा. शरद पवार यांचे विद्यार्थी दशेपासूनचे विश्वासू सहकारी, कराड लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार व सिक्कीम राज्याचे राज्यपाल श्रीनिवास पाटील हे मराठमोळ्या मराठी, संस्कृती जपणारे नेतृत्व आहे, नव्हे खानदानी वाघ   असे म्हटले तर  वावगे ठरणार नाही. ऐवढ्या मोठ्ठ्या पदावर जाऊन पण त्यांनी मातीची नाळ काय सोडलेली नाही. आज सकाळी सकाळी मह्रामहीम राज्यपाल महोदयांनी राजभवन निवासस्थाना समोर गुढी उभारली. पत्नी सोबत छान फोटो काढून मला पाठवून दिला. नवीन मराठी वर्षाच्या शुभेच्छा दिल्या , काय म्हणायचे या विभुतीला !



राज्यपाल साहेबांविषयी खुप लिहता येईल,  लिहिले आहे, नुकताच त्याचा अमृतमहोत्सवी वाढदिवस 11 फेब्रुवारी रोजी साजरा झाला. कराड लोकसभा मतदारसंघाचे कर्तृत्व संपन्न खासदार, खासदार काय करू शकतो याचे मुर्तीमंत उदाहरण ही राजकीय ओळख . साधेपणा, उच्च शिक्षण, मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व,  सर्व गटातील लहान थोर व्यक्तीसोबत असलेले जिव्हाळ्याचे नाते,  बोलण्याची पद्धत, जबरदस्त व्यक्तीगत आणि पिळदार मिशा या सर्वासहीत रांगडे नेतृत्व म्हणजे श्रीनिवासपाटील.



कराड पाटण तालुक्याने विविध क्षेत्रात अनेक रत्ने जन्माला घातली.स्व. यशवंतराव चव्हाण  लोकनेते बाळासाहेब देसाई, ज्येष्ठ नेते पी डी पाटील, यशवंतराव मोहिते, जयवंतराव भोसले या दिवंगत नेत्याबरोबरच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विलासराव पाटील उंडाळकर आणि राज्यपाल साहेब या नेतृत्वानी कराड पाटणचे  नाव राज्यपातळीवर, देशपातळीवर नेऊन ठेवले. शिक्षण, प्रशासन, राजकारण, समाजकारण यासह प्रत्येक क्षेत्रात उत्तुंग यश मिळविलेले व राज्यपाल म्हणून सर्वोच्चपदी विराजमान झाल्यानंतर तेवढ्याच ताकदीने सेवा बजावणारे राज्यपाल श्रीनिवास पाटील हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आहेत.  

मारूल हवेली सारख्या एका छोट्याशा गावातून येऊन सुद्धा आपल्या कुशाग्र बुद्धीच्या जोरावर त्यांनी विद्येची उच्च शिखरे गाठली. गावातील मारूतीच्या देवळातील शाळेतून आपल्या शिक्षणाची सुरूवात करणाऱ्या श्रीनिवास पाटील यांनी मॅट्रीकला कराड केंद्रात गुणवत्ता यादीत झळकले. पुढे पुण्याच्या सर परशुरामभाऊ महाविद्यालयातून 1 जनरल सेक्रेटरी म्हणून निवडून आले. श्रीनिवास पाटील यांना स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांचे लहानपणापासूनच मार्गदर्शन लाभले. तर शरद पवार यांच्याबरोबर युवक कॉंग्रेसमधील निकटचे सहकारी म्हणून त्यांचा प्रवास सुरू झाला. हे दोघेही चव्हाण साहेबांचे लाडके तरूण  कार्यकर्ते म्हणून नावारूपास आले. अर्थशास्त्र विषयात एम.ए. व मुंबई येथील शासकीय विधी महाविद्यालयातून एल.एल.बी. पदवी मिळविली. दरम्यान राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून 1965 साली उपजिल्हाधिकारी म्हणून त्यांची निवड झाली. चव्हाण साहेबांच्याच सल्यानुसार राजकीय कारर्कीद सोडून प्रशासकीय सेवेत रूजू झाले.



कोल्हापूर जिल्ह्यात प्रांताधिकारी म्हणून त्यांच्या प्रशासकीय कारकिर्दीला सुरूवात झाली. प्रशासकीय सेवेतील त्यांच्या कामाची दखल घेत शासनाने अनेकदा अडचणीत असलेल्या विविध संस्थावर त्यांची प्रतिनियुक्तीवर नेमणूक केली. यामध्ये संगमनेर साखर कारखाना, भारत सरकारच्या पिंपरी येथील हिंदुस्तान ऍटीबायोटिक्स, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, 1992 साली पिंपरी चिंचवड महानगर पालिका आयुक्त व 1995 साली नागपूर सुधार प्रन्यास अध्यक्ष म्हणून त्यांची झालेली नियुक्ती तसेच अडचणीत असलेल्या या संस्थांचा केलेला कायापालट यामुळे एक संकटमोचक अधिकारी अशी ख्याती महाराष्ट्रभर झाली.
सर्वसामान्य माणसांशी नाळ जोडलेला व त्यांच्या प्रश्नांची जाण असणारा एक लोकाभिमुख जिल्हाधिकारी, साखर उद्योगाचे सखोल ज्ञान असणारा संचालक म्हणून त्यांनी केलेले काम आज लोकांच्या स्मरणात आहे. प्रशासकीय कारकिर्दीच्या शिखरावर असताना शरद पवार यांच्या एका हाकेवर भारतीय प्रशासकीय सेवेतून स्वेच्छानिवृत्ती स्विकारली.

1999 साली स्थापन  झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस या नव्या राजकीय पक्षाला अवघड असलेल्या कराड लोकसभेची निवडणूक लढवून उच्चांकी मताधिक्याने विजय मिळविला. जनतेचा लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना मतदारसंघात विकासकामांचा जणू डोंगरच  उभा केला. खेड्या पाड्यासह मतदारसंघातील त्यांच्या प्रयत्नातून उभी राहिलेली विकासकामे आजही त्यांच्या कर्तृत्वाची साक्ष देताना कर्तबगार लोकप्रतिनिधी काय करू शकतो याचे ते उदाहरण आहेत.

देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जाणाऱ्या सिक्कीम राज्याच्या राज्यपालपदी नियुक्ती झाल्यानंतर तेथेही त्यांनी आपला वेगळा ठसा उमठविला आहे. 

सिक्कीमच्या दुर्गम भागाचा दौरा करणारे व सिक्कीमच्या सर्वसामान्य नागरिकांसाठी राजभवनाचे द्वार कायम खुले ठेवणारे राज्यपाल म्हणून त्यांची नवीन ओळख निर्माण झाली आहे.
मिशीवाला साहब अशी त्यांची राज्यात  ओळख झाली आहे.  सिक्कीमच्या राजभवनात  गेल्या दोन वर्षांत अनेक लहान मोठे कार्यक्रम  झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, शरद पवार यांच्या सहीत अनेक देशी विदेशी पाहुणे येऊन गेले. जे आले ते सिक्कीमच्या आणि श्रीनिवास पाटील यांच्या प्रेमात पडले. याचे कारण म्हणजे  सिक्कीमच्या संस्कृतीशी एकरूप होत असताना महाराष्ट्रीयन ढप त्यांनी जपली आहे.


आज गुढीपाडवा. राज्यपाल साहेबांनी सिक्कीम मध्ये गुढी उभारली. कुठेही गेला तरी मराठी माणूस आपली संस्कृती विसरत नाही. पाटील साहेबांनी आज हे सिद्ध करून दाखवले आहे. दोन वर्षे ते राज्यपाल आहेत, खुप मोठ्या पदावर  आहेत, पण आजही पुढारी मध्ये  एखादी त्यांची बातमी आली तरी तेथून फोन करतात, आभार मानतात. अमृतसर सुवर्ण मंदिर भेटीची बातमी पुढारीत प्रसिद्ध झाली तेव्हा तर सकाळी सहा वाजता त्यांचा फोन आला होता. 

वाढदिवसाला सुद्धा न विसरता माझ्या सारख्या वार्ताहराला फोन करतात, हे खरंच वेगळंच गणित आहे.  भेटले की काय सतीश, बरं आहे ना,  या एकदा सिक्कीमला, असे निमंत्रण त्यानी अनेकदा मला दिले आहे. 


प्रगल्भता म्हणजे काय,

फार मोठ्ठे बोलणे, उच्च पदावर पोहचणे म्हणजे प्रगल्भता नव्हे !
छोट्या छोट्या गोष्टी मध्ये बारकावे पाहणे, अनुकरण करणे आणि जपणे म्हणजे प्रगल्भता.

राज्यपाल साहेबांना पाहून आणखी काय बोलायचे प्रगल्भता विषयी!

       ..........सतीश मोरे

०७ एप्रिल २०१६

लेखक आणि मनुष्यप्रिय अधिकारी






काल संध्याकाळी कराड येथील निवासी नायब तहसीलदार बी. एम. गायकवाड यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रम झाला. शासकीय  अधिकारी येतात, जातात, पुन्हा नवीन  अधिकारी येतो,  कार्यकाल संपला की त्याची पण बदली होते. बदली झाली की लोक त्यांना विसरून जातात. बदली होते तेव्हा त्याना निरोप दिला जातो, कार्यक्रम होतो. गोड गोड बोलले जाते,  कारण तो अधिकारी पुन्हा कुठे तरी उपयोगी पडणार  असतो.

नवीन अधिकारी येतो परत त्याचे स्वागत होते, पुन्हा तेच. ही परंपरा मी गेल्या वीस वर्षांत पहात  आलो आहे. पण
शासकीय अधिकारी सेवानिवृत्त होतो आणि त्याचा मोठ्ठा कार्यक्रम होतो, त्याला कलेक्टर येतात, तालुक्यातील सर्व स्तरावरील लोक येतात, तलाठी, सर्कल, कोतवाल, पोलीस पाटील,  चळवळीवाले, आंदोलनवाले, स्वस्त धान्य दुकानदार संघटना, पत्रकार सारे जण येतात, हे पहील्यादाच  पहायला मिळाले.


बी. एम. गायकवाड हे काय फार मोठ्ठे अधिकारी नाहीत, नायब तहसीलदार पद फार  उंचीचे नाही तरी पण लोक का आले याचे कारण शोधण्याचा प्रयत्न केला तर त्यांची काम करण्याची पद्धत हे उत्तर द्यावे लागेल. तहसीलदाराकडे जाण्यापुर्वी काम घेऊन नायब तहसीलदार कडे जातात.  तिथे काम झाले नाही, समाधानकारक उत्तर मिळाले नाही तर मग पुढे जातात.  पण कराडात गायकवाड साहेब  आल्या पासून असे झालेच नाही. आलेल्या प्रत्येक माणसाला बोला काय सेवा करू आपली, असे म्हणणारा नायब तहसीलदार बहुधा हे एकमेव असावेत . आता  हे वाक्य  कानावर पडल्यावर काम घेऊन आलेला सामान्य माणूस निम्मा थंड व्हायचा. मग त्याचे काम काय आहे,  येथे होणार आहे का, नसेल तर काय करावे लागेल, कोणाकडे जावे लागेल, कागदपत्रे कोणती अपुरी आहेत, ती कुठे मिळतील, किती दिवस लागतात,  आदी सर्व माहिती त्याला देऊन खुश करण्याची हातोटी गायकवाड यांच्या कडे होती.

तलाठी,  सर्कल किंवा गावपातळीवर अन्याय झालेला, रागाने लालबुंद माणुस इथे आल्यावर या बसा असे म्हणून पाणी प्यायला द्यायचे, वर चहा सांगायचा, ही माणसे थंड करण्याची त्याची पद्धत खरंच सर्व ऑफीसमध्ये काम करणारांसाठी अनुकरणीय आहे .

एखाद्या शासकीय अधिकारी बाबत कौतुकास्पद लिहायला मिळतंय हा पण सुखद अनुभव आहे. या कार्यक्रमात गायकवाड यांच्या पत्नीची एक समर्पित बाजू पहायला मिळाली आणि याच कारणामुळे मी आज हा ब्लॉग लिहायला घेतला.

एक वर्षापुर्वी बी एम गायकवाड यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याने त्याच्या वर  उपचार सुरू झाले. एक किडनी असेल तर मनुष्य जगू शकतो मात्र दोन्ही फेल झाल्याने किडनी प्रत्यारोपण करण्याचा निर्णय घेण्यात आला. किडनी दात्यांचा शोध सुरू झाला. एकच रक्तगट  आणि इतर अनेक बाबी जुळायला लागतात. तपासणी दरम्यान त्याच्या पत्नीची किडनी मॅच होत असल्याचे लक्षात आले. पत्नीने तात्काळ होकार दिला,उगीच नाही तिला अर्धांगिनी म्हटलं जातं.  ऑपरेशन झालं, किडनी प्रत्यारोपण झालं. अतिशय किचकट ऑपरेशन असल्याने डाॅक्टरांनी त्यांना सहा महिने सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला दिला.

महीनाभर त्यांनी आराम केला. रोज सकाळी दहा ते रात्री दहा दरम्यान माणसे पहायचा,  त्याच्यासोबत बोलायचे, वादविवाद सोडवायचे , गोरगरीब निराधार लोकांना मदत करायची , त्याचे प्रश्न सोडवायचे या आणि याच कामात, लोकसेवेत 35 वर्षे कार्यरत असलेल्या  गायकवाड यांना आता घरात बसु वाटेना, करमेना. त्याना ऑफिसला जाण्याचे वेध लागले. दिड महिन्यानंतर गायकवाड साहेब पुन्हा कराड तहसीलदार कार्यालयात हजर झाले. कामाला सुरूवात केली. हळूहळू त्याची प्रकृती सुधारू लागली, ते ठणठणीत बरे झाले. काम करणार्‍या माणसाला कामात व्यस्त असले तरच बरे वाटते. त्या वातावरणातच, छंदात, कामात असेल तर  तो प्रत्येक गोष्टीवर, संकटावर, अडचणीवर मात करू शकतो. हेच यातून सिद्ध होते.



या कार्यक्रमात मला बोलायची संधी मिळाली .
गायकवाड यांचा वरील अनुभवाला जोडून एक गोष्ट सांगितली.
ही गोष्ट मी महाविद्यालयीन काळात वाचली होती.



गोष्ट आहे एका लेखकाची

एक खुप मोठ्ठे प्रतिभावंत लेखक होते.  साहित्य क्षेत्रात त्यांचा दबदबा होता. मुंबईतील  एका चाळीत ते रहात होते. लोकसंपर्क आणि संवाद ही त्या लेखकाची जमेची बाजू होती.  त्याच्या नावावर चार पाच पुस्तके प्रसिद्ध झाली.  हळूहळू परिस्थिती पण सुधारली.  साहित्य अकादमी पुरस्कार त्यांना मिळाला.  पुरस्काराची मोठ्ठी रक्कम त्यांनी पत्नीकडे सुपुर्त केली. तुला जे हवं ते कर, तु साथ दिलीस म्हणुनच हे दिवस आले असे त्यांनी कृतज्ञतापुर्वक सांगितले.  पत्नीचे पतीवर खुप प्रेम होते.  आपल्या नवर्‍याने घेतलेले कष्ट, गाजवलेल्या रात्री याची तिला जाणीव होती.  चाळीतल्या घरात नवर्‍याला  एकांत मिळत नाही , दंगा असतो हे तिने पाहिले होते. त् एकांतपणा मिळाला तर नवरा आणखी लिहू शकेल, या उद्देशाने तिने उपनगराबाहेर एक जागा घेतली, टुमदार बंगला बांधला.  एक वर्षानंतर नवर्‍याच्या वाढदिनी तो बंगला त्याला गिफ्ट म्हणून दिला.

आता आपण या बंगल्यात राहू. तुम्ही निवांत बसून लिहा, पत्नीने लाडात येऊन सांगितले.
कुटुंब तिकडे रहायला गेले. महिना आनंदात गेला. पण त्या लेखकाला काही लिखाण करणे शक्‍य झाले नाही, तो कागद घेऊन बसायचा पण शब्द काय कागदावर  उतरत नव्हते. एकांत होता पण वातावरण नव्हते,  बुद्धीमत्ता होती मात्र बाहेर पडत नव्हती.  प्रतिभा खुप सारी होती पण  व्यक्त होत नव्हती.  त्या लेखकाला वेड लागण्याची वेळ आली.

त्याने पत्नीला विनंती केली,  आपण जुन्या घरात रहायला जाऊ या.  येथे एकांत  आहे पण त्याचा मला काही उपयोग नाही.  माझी पात्रे चाळीत राहणाऱ्या लोकांमध्ये  आहेत, लोकल ट्रेन मध्ये  आहेत, रस्त्यावर आहेत.
मी तिथेच राहीलो तर लिहू शकतो, असे त्यांनी पत्नीला सांगितले. पुन्हा ते जोडपे चाळीत रहायला गेलं.
या गोष्टीचा मतीतार्थ आणि शासकीय सेवेत काम करत असलेल्या गायकवाड यांच्या सारख्या  कार्यक्षम  अधिकारी, कर्मचारीचा अनुभव सारखा आहे . माणूस हा मनुष्य प्रिय प्राणी आहे,  असं म्हणतात. माणसात राहीला तरच त्याला माणुसकी पहायला, शिकायला आणि अनुभवायला मिळेल. बरोबर आहे ना !

सुज्ञ अर्धागिनींने बंगला दिला, आराम दिला. 
किडणी दिली , आयुष्य दिले
तरीही जीव वाचवला, 
खुलवला, वाढवला.......मनुष्य सोबतीनेच !


गुण दोषासहीत स्वीकारणे म्हणजे प्रेम


प्रेम, लव,  इष्क,  मोहब्बत, प्यार
आणखी खुप खुप नावे आहेत, समानार्थी शब्द आहेत.
प्रत्येक शब्दात खुप गोडवा आहे, आनंद आहे, हुरहुर आहे, जवळीक आहे, आपलेपण आहे, काळजीवाहूपणा आहे, वात्सल्य आहे .

सर्व नात्यांना प्रेम या एका शब्दाने मोठ्ठा अर्थ मिळवून दिला आहे.
प्रेमाबाबत, प्रेमाखातर, प्रेमामुळे, प्रेमापोटी
बरेच जण बरेच काही करत आले आहेत,करत राहतील.
प्रेम म्हणजे काय हे मात्र कोणी पटकन सांगू शकणार नाही !
खुप अर्थ आहेत.. प्रेम आणि प्रेमाचे



 
कुणीतरी आपली काळजी घ्यावी असं वाटणं म्हणजे प्रेम,
आपल्यावर जीव ओवाळून टाकणे म्हणजे प्रेम
हवं तेव्हा जवळ येणे,वेळ देणं म्हणजे प्रेम की
वाट्टेल ते आणून देणं,गरजा पूर्ण करणे म्हणजे प्रेम

सकाळी सकाळी गुड मॉर्निंग म्हणणे म्हणजे प्रेम
उठल्या उठल्या गरम चहाचा कप आणून देणं म्हणजे प्रेम
दिवसभरात एकदातरी भेटणं, बोलणं म्हणजे प्रेम की
आयुष्यभर साथ सोबत देणं म्हणजे प्रेम

लाॅग ड्राईव्हला फिरायला जाणे म्हणजे प्रेम
सोबत देणं, चार पावलं चालणं म्हणजे प्रेम
एकमेका जवळ बसणं म्हणजे प्रेम की
दूर असूनही एकमेकांना समजून घेणं म्हणजे प्रेम

हातात हात घालून सिनेमा पहाणे म्हणजे प्रेम
आम्हाला विसरू नको वाटणं म्हणजे प्रेम
खोटं खोटं रागावणं म्हणजे प्रेम की
रागाऊनही जवळ जाणं, रूसणं फुगणं म्हणजे प्रेम

मित्रासाठी शाळेला दांडी मारणं म्हणजे प्रेम
मैत्रिणीसाठी दिवसभर घिरट्या घालणं म्हणजे प्रेम
एका लुकसाठी बस तासनतास बसणं म्हणजे प्रेम की
एकही शब्द न बोलता तिच्यासाठी झुरणं म्हणजे प्रेम

सकाळी उठून मुलांचे आवरणं म्हणजे प्रेम
त्याच्यासाठी रोज कॅडबरी आणणं म्हणजे प्रेम
स्कूल बस पर्यंत पोरांना सोडणं म्हणजे प्रेम की
रोज त्याचा होमवर्क करून घेणं म्हणजे प्रेम

बायकोला छान दिसतेस म्हणणं म्हणजे प्रेम
तिला चहा करून देणं म्हणजे प्रेम
तिच्या साठी गिफ्ट आणणं म्हणजे प्रेम की
आज भाजी मस्त केली आहे म्हणणं म्हणजे प्रेम

भाजी निवडायला मदत करणं म्हणजे प्रेम
दळण आणून देणं म्हणजे प्रेम
तिच्या कामाचं कौतुक करणं म्हणजे प्रेम की
तिच्या साडीच्या निर्‍या नीट करणं म्हणजे प्रेम

आईवडिलांची काळजी घेणे म्हणजे प्रेम
त्याच्या इच्छा पुर्ण करणं म्हणजे प्रेम
आईला रोज नमस्कार करणं म्हणजे प्रेम की
आईच्या कुशीत शिरून मिठी मारणं प्रेम

बाबांचा आदर करणं म्हणजे प्रेम
त्याचे नाव मोठ्ठ करणे म्हणजे प्रेम
बाबांच्या भावना समजून घेणे म्हणजे प्रेम की
बांबाना सतत आनंद देणं म्हणजे प्रेम

बहीणीसाठी जेवायला वाट पाहणं म्हणजे प्रेम
तिच्या कडून गोड बोलून काम करून घेणं म्हणजे प्रेम
तिच्यासाठी पैसे वाचवून राखी गिफ्ट आणणे म्हणजे प्रेम की
आयुष्यभर तिला दूर न करणे म्हणजे प्रेम

भावासाठी खाऊ बाजूला काढून ठेवणं म्हणजे प्रेम
त्याला जे आवडतं ते करणे म्हणजे प्रेम
भावाची चुक स्वतःवर घेऊन बाबांचा मार खाणं म्हणजे प्रेम की
दादा मला एक वहिनी आण ही थट्टा म्हणजे प्रेम



किती तरी लिहता येईल या प्रेम स्वरूप प्रेमाबद्धल. प्रेमरस हा शरीरात अविरत पाझरत  असतो . त्यामुळेच  अनेक नाती घट्ट झाली आहेत . परवा मला एकाने विचारले, तुम्ही  अमिताभ बच्चन यांच्यावर खुप प्रेम करता, मोठे फॅन आहात. तुमचा महागुरू बच्चन विषयी पेपर मध्ये काय आले आहे,  वाचले का, असा सवाल त्यांनी केला. मी त्याला सांगितले, मी अमिताभ बच्चन यांच्यावर फॅन म्हणून प्रेम करतो, त्याच्या कलेवर प्रेम करतो, त्याच्या  अभिनयावर जीव टाकतो. मी त्यांना मानतो. आपल्या आवडत्या व्यक्तीला त्याच्या गुणदोषासहीत स्वीकारणे म्हणजे प्रेम . मी बच्चन यांचा फॅन आहे, राहणार. उलट  अशा कठीण प्रसंगात तर नक्कीच त्याच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार.

उदाहरण बच्चनजीचे असले तरी आयुष्यभर आपण हेच करतो.
आपल्या पत्नीचे, पतीचे, भावाचे, बहीणीचे, मित्राचे, मैत्रिणीचे, शेजारच्या व्यक्तीचे, नोकरी 
आणि व्यवसायातील सहकारी मित्रांचे चांगले वाईट गुण आहेत, असतात.
ते आपणास माहित असतात .
आपण 
त्याला -तिला, 
त्याच्या -तिच्या
गुण अवगुणासहीत स्वीकारत असतो आणि तेच खरे प्रेम आहे.

मला आवडलेली, आवडणारी ही  प्रेमाची सर्वात सुंदर व्याख्या आहे.

...अपुर्ण ...



     सतीश मोरे



०५ एप्रिल २०१६

गोवा सहल 2006 फोटो


गोवा सहल 2006  आणि 2016 असा एक ब्लॉग मी एप्रिल मध्ये लिहला होता.
त्यावेळी 2006 चे फोटो मिळाले नव्हते.
आता ते सापडले आहेत. 
खास माझ्या मित्रासाठी टाकत आहे.

गोवा ट्रीप @ 2006 आणि 2016


2006 

2016

गोवा आणि मी खुप जवळच नातं आहे.  खुप जवळचं म्हणजे गोव्यात माझं कुणी नाही  किंवा   मला  गोव्यातील खुप सारी माहिती आहे, असे नाही. गोवा हा महाराष्ट्राच्याच विचाराचा, संस्कृतीचा, मराठी कम् कोकणी भाषिकांचा आहे. गोव्यात गेल्यावर मराठी बोलले तरी चालतं, गोव्यात गेल्यावर रोमिंग पडत नाही, म्हणजेच तो महाराष्ट्राचाच एक भाग आहे, अशी मनाची तयारी होते, म्हणून गोवा मला फार आवडतो. मी गोव्याला चार वेळा गेलो आहे. आज सुद्धा गोव्यातच आहे. तिथे गेल्यावर यापुर्वी आलो तेव्हाच्या काही आठवणी शेअर करण्याची इच्छा झाली, म्हणून तर हे लिहतोय.

मला माझी गोवा पहीली ट्रिप चांगली आठवतेय. 2006 मध्ये केलेली.  दुचाकीवरून फिरायची मला पहिल्या पासूनच फार हौस आहे. त्याअगोदर सायकल वरून सुद्धा औदुंबर, सागरेश्वर, कडेपूर, बत्तीस शिराळा या ठिकाणी सायकल प्रवास केला आहे. पहीली नवी कोरी दुचाकी एम 80 मी स्वकमाईतून 1996 मध्ये खरेदी केली होती.  MH-11-E- 7836 नंबर होता त्या गाडीचा ! कराड तालुक्यात एकन एक गाव फिरलो मी एम 80 वरून. त्यावेळी क्रेझ होती म्हणा ग्रामीण भागात एम 80 ची. दुचाकी वाहन घरात असणे म्हणजे प्रतिष्ठेचे लक्षण होते. तेव्हा लोक काय अडचण आली तर जायला गाडी मागायला यायचे. यादव मोरे क्लासेसचा तो बहरता काळ होता.  याच गाडीवरून सांगली, सातारा, कोल्हापूर ,पुणे जिल्ह्यात बराच प्रवास केला मी आणि बापु डुबल यांनी. इस्लामपूर येथील माणकेश्वर  थिएटर मध्ये पिक्चर पहायला जायला हीच गाडी असायची. पुढे हिरो होंडा SS, बजाज बाॅक्सर AT, स्पेन्डर ,  NXG स्पेन्डर अशी वाहने झाली, पण एम 80 ची मजा औरच.

2006 मध्ये गोवा दुचाकी दौरा आखला होता. सोबत लक्ष्मण कचरे, अंकुश पाटील  आणि बापु. फार मोठे थ्रिल होते. कोकण दौरा म्हणजे दुचाकी चालवायला प्रचंड जोश अपोआपच निर्माण होतो. हिरवीगार झाडे, नागमोडी रस्ते, उंच अवघड घाट , चकाचक रस्ता आणि गार वारे अशा वातावरणात गाडी चालवायला मजा खुप येते, कितीही वाहन चालवा कंटाळा येत नाही. आम्ही तीन दिवसाचे नियोजन करून निघालो. सकाळी सकाळी बाहेर पडलो, साहित्य मागे बांधलेले. राधानगरी जवळपास मार्ग एका पुलाजवळ थांबलो, फोटो काढले. पुन्हा प्रवास सुरू. रस्ता माहित नाही, विचारत गेलो. सायंकाळी सात वाजता म्हापसा येथे पोहचलो. कुठे रहायचे माहीत नव्हते.  विचारपूस करत एक शेअर बेसवर हाॅटेल मिळाले. संपूर्ण दिवस प्रवास केला होता, जेवलो आणि झोपलो. सकाळी लवकर उठून कलिंगुट बीचवर पोहोचलो, समुद्रात खेळलो. बारा वाजता निघालो. पणजी,जुन्या गोवा, चर्च पाहीले, फिरलो. पुन्हा मुक्काम म्हापसा. आम्ही चौघे, खर्च काॅमन, मजा अनलिमिटेड !

तिसऱ्या दिवशी परतीचा प्रवास सुरु झाला. पुन्हा कलिंगुट बीच, बागा बीच वर गेलो,  'सौंदर्या'चा आनंद लुटला  किनारपट्टी रस्त्यावरून निघालो, अतिशय दाट झाडीतून जाणारा हा रस्ता खुप छान होता.  एक सुंदर बीच पाहीला, तिथेच आंघोळीला थांबलो. छोटंसं गाव होतं ते.  स्वच्छ विस्तीर्ण समुद्र किनारा, बेफाम वारा यामुळे वेळेचं भान राहीलं नाही. पुढे गोवा महामार्ग सीमेवर फेरीत (बोटीत) गाड्या घातल्या, खुप मजा आली.  दुचाकी, चारचाकी, टेम्पो सारी वाहने एका मोठ्या फेरी बोटीत घातलेली पहिल्यांदाच पाहीली. अद्वितीय, अविस्मरणीय अनुभव होता तो. रेडी गाव लागले.  एव्हाना चार वाजले होते. प्रवास सुरू केला खरा पण तीनशे किलोमीटर कसे पार करायचे, हा प्रश्न निर्माण झाला. सकाळी उठून लगेच निघायला हवे होते, मात्र आम्ही फिरत बसलो. घाटात रात्री प्रवास कसा करायचा, गाडी बंद पडलीतर काय होईल, रात्रभर गाडी कशी चालवायची असा प्रश्न पडला.  आम्ही सगळे एकाच  ऑफिसला,  उद्या कामावर तर गेले पाहिजे, पण कसे पोहचणार, असा प्रश्न पडला.  सायंकाळी सहा वाजता सावंतवाडी मध्ये पोहचलो.  एकत्र बसून चर्चा केली, काय पर्याय नव्हता, शेवटी रहायचे ठरवले.  पण बाॅसना काय सांगणार,  हा विचार मनात आला.  शेवटी गाडी पंक्चर झाली म्हणून फोन केला आणि लाॅज शोधला. बाॅसने ओळखले होते सारं . पण पर्याय नव्हता.  खिशात पैसे थोडे, मग  एकदम साध्या ठिकाणी उतरलो.

सकाळी  उठून तयार झालो. आता आंबोली मार्गे कराड. पण पुन्हा निर्णय बदलला,  आता आजचा दिवस आहे, ऑफीस दांडी पडलीच आहे  तर चला सिंधुदुर्ग, मालवणला.  निघालो सारे. मालवण किल्ला पाहिला, आता जवळच विजयदुर्ग आहे चला पुढे.  मज्जा आली.  तीन वाजता निघालो तेथून.  गगनबावडा मार्गे मजल दरमजल करत रात्री नऊ वाजता कोल्हापूर येथे पोहचलो. रात्री उशिरा कराड!   दुचाकी वरून केलेली ही खास ट्रिप मी कधीच विसरू शकणार नाही.  ऑफिसात आलो सारे अंदाज घेऊन. जे व्हायचे ते झाले, बाॅसनी हेड  ऑफिसला तक्रार केली होती, 'एकाच दिवशी चौघे अनुपस्थित राहिल्याने कामकाज विस्कळीत झाले. ' पुन्हा खुलासा करावा लागला. समजून घेतले सर्वानी.
या ट्रिपनंतर फॅमिली सोबत 2009 मध्ये पुन्हा गोवा पाहीला,  गतवर्षी ऑफिसने गोवा बक्षीस  ट्रिप दिली.  आज पण गोवा ट्रीप वरून परत येत आहे. आता मी ऑफिस बाॅस आहे, ट्रिप पण  ऑफिस स्पाॅन्सर आहे. प्रवासाला आराम कार होती, रहायला मस्त हाॅटेल होतं, स्विमिंग पूल होता, खिशात पैसे होते, जेवण पण लय भारी होतं. परंतु टु  व्हिलर एवढी मजा नाय आली . गोवा तेव्हा पाहिला तितका सुंदर नाही दिसला. 

तीन दिवससोबत माझे जवळचे सहकारी होते. आम्ही enjoy केला, खुप फिरलो, खरेदी पण केली, बीचवर क्रिकेट खेळलो. सर्व उपलब्ध होतं, खुप होतं, साथीदार तर  एकास एक होते. पण थ्रिल नव्हते टू व्हिलर प्रवासाएवढं!


,
2016




We 4

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...