फॉलोअर

२९ मे २०२५

जीवनाचं खरं सौंदर्य दुसर्‍याच्या आयुष्यात बदल घडवणंराजकीय संघर्षातून घडलेल्या सत्तरीतील ‘तरुण’ डॉक्टरांनी उलगडले आयुष्यातील आनंदाचे रहस्य


जीवनाचं खरं सौंदर्य दुसर्‍याच्या आयुष्यात बदल घडवणं
राजकीय संघर्षातून घडलेल्या सत्तरीतील ‘तरुण’ डॉक्टरांनी उलगडले आयुष्यातील आनंदाचे रहस्य

संयमी व अभ्यासू नेतृत्व अशी ओळख असणारे यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती आदरणीय डॉ. सुरेश भोसले यांचा आज वाढदिवस. सत्तराव्या वर्षीही पंचवीशीतील तरुणाइतका उत्साह असलेले डॉ.सुरेशबाबा हे मितभाषी, संयमी आणि सदाहरित नेतृत्व आहे. वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला दैनिक ‘पुढारी’चे न्यूज ब्युरो चीफ सतीश मोरे यांच्याशी बोलताना त्यांनी आयुष्याचा प्रवास उलगडला. कृष्णा विद्यापीठ, कृष्णा कारखाना यांच्या निर्मितीपासून मुलगा डॉ.अतुल भोसले आमदार होण्यासाठी केलेले प्रयत्न यावर बोलत असतानाच संषर्घाशिवाय जीवन नाही असे सांगून शेवटच्या क्षणापर्यंत वैद्यकिय सेवेसह समाजकारणात कार्यरत राहणार, असा इरादा त्यांनी बोलून दाखविला....

प्रश्न ..70 वर्षांपासून आपल्या सामाजिक व राजकीय आयुष्यात अनेक चढ-उतार आले, संघर्ष आले याबाबत आपण काय सांगू शकाल....

उत्तर- 70 वर्षांचा प्रवास फार मोठा आहे. हा प्रवास फार संघर्षातून झाला. सर्व राजकारणी, समाजकारणी आणि सर्वसामान्यांना संघर्षातून जावं लागतं. सुरुवातीच्या काळात जो घरातील संघर्ष झाला, तो व्हायला नको होता. मात्र आम्ही त्याच्यातूनही पुढे आलो. एक वेळ अशी येते की, सर्व मागे ठेवावं लागतं आणि पुढे जावं लागतं. आपण त्याच्यापासून बाजूला जावं लागतं. आपल्याला ज्या क्षेत्रात काम करायचं आहे त्यापासून आपला फोकस बाजुला करून चालत नाही. राजकीय सत्ता आपल्या हातात आली किंवा नाही याचा आपण कधीच विचार केला नाही. राजकारणामध्ये सुद्धा जेव्हा अतुलने ठरवलं की, आपल्याला राजकारणामध्ये काहीतरी करायचं आहे. दोनदा अपयश आलं. तरी तो खचून गेला नाही. तिसर्‍यांदा तो यशस्वी झाला. भाजपाची विचारधारा स्विकारायला वेळ गेल्याने यश मिळायलाही वेळ गेला. आपल्या येथे राष्ट्रीय काँग्रेसचा प्रवाह आहे, या प्रवाहाविरोधात तो निघालेला होता. आज रोजी भाजपचा प्रवाह लोकांनी स्विकारला आहे. आज त्याला यश मिळाल्यानंतर त्याच्यावर जबाबदारी आलेली आहे. 

प्रश्न ..आज तुम्ही वयाच्या 70 व्या वर्षात पदार्पण करीत आहात, मात्र तुम्ही पन्नाशीतील तरुणासारखे उत्साही दिसता. प्रत्येक गोष्ट संयमाने हाताळता. तुमच्या या तारुण्याचे रहस्य काय.....
उत्तर ...रहस्य वगैरे काही नाही. हा स्वभावाचा भाग आहे. आपल्या आयुष्यात समज-गैरसमज होतात ते शब्दाने. आपल्याला एखादी गोष्ट पटली नाही तर ती कशी मांडायची आणि कशी मांडायची नाही, हे शब्दच ठरवतात. कोणाच्या भावना दुखवायच्या नाहीत. कोणाचा अपमान होणार नाही किंवा कोणाला कमीपणा येईल असे वागायचे नाही. विरोधक असे तरीही करायचं नाही. जो-तो त्याच्या मार्गाने चालत असतो आपण आपल्या मार्गाने चालायचे असते. असं केलं तरच राजकारणात बदल होत असतो. निवडणुकीच्या काळात मला भेटायला येणारे इतरांच्या तक्रारी करतात. तो तुमचा कार्यकर्ता तुमच्याविषयी विरोधात बोलतो. तुम्हाला शिव्या देतो, तुम्ही हे कसे सहन करता? यावर मी म्हणतो, तो जर इतका आपल्याला शिव्या देत असेल तर प्रेम सुद्धा तितकंच करत असेल. हा एटीट्यूडचा प्रश्न आहे. तुम्हाला मी तरुण वाटतोय याचं आणखी एक कारण म्हणजे लाइफस्टाइल आहे. मी सर्वांना नेहमीच सांगतो, या जगामध्ये तुमचं काही नाही. प्रॉपर्टी आहे पण तुम्हाला ती सोडून जावी लागणार आहे. घर, मित्र-मंडळी, आई-वडील हे ही तुमचे नाहीत. कारण जाताना तुम्हाला ते ही सोडून जावं लागणार आहे. देवाने तुम्हाला अशी एकच गोष्ट दिलेली आहे ते म्हणजे तुमचे शरीर. त्यामुळे खर्‍या अर्थाने शरीराची काळजी करणं, हे तुमचं कर्तव्य आहे. ही जबाबदारी तुमची आहे. शरीर चांगलं ठेवण्यासाठी कोणी तुम्हाला मदत करू शकत नाही. ही जबाबदारी तुम्हालाच घ्यावी लागेल. मी माझ्या शरीराची काळजी घेतो. म्हणून मी सद़ृढ आहे. दुसरा विषय काही गोष्टी जेनेटेकली येतात. आप्पांच्याकडून मला ते मिळालेले वरदान आहे. 

प्रश्न...तुम्ही एवढ्या मोठ्या गर्भश्रीमंत कुटुंबात जन्माला आला आहात, मात्र तरीही तुमच्याकडील संयम, नम्रता, मितभाषीपणा हे गुण आहेत. हे तुम्ही कसे शक्य करु शकता..........
उत्तर- आप्पा नेहमी म्हणायचे, तुम्ही किती श्रीमंत आहात हे पैशाने कधीच ठरत नाही. तुम्ही दुसर्‍यासाठी काय केलं हीच खरी श्रीमंती आहे. तुमच्याकडे असलेल्या पैशांचा लोकांसाठी योग्य उपयोग करत नसाल तर त्या पैशाला काय अर्थ नाही. आम्हाला सत्ता आली किंवा गेली, याचं कधीच अप्रूप वाटत नाही. चेअरमन असलो किंवा नाही याचं काहीच वाटत नाही. लोकांनी आपल्याला जी जबाबदारी दिलेली आहे ती पार पाडायची, हे मी माझं कर्तव्य समजतो. लोकांनी भेटावं, नमस्कार करावा असं मला कधीच वाटंत नाही. आपल्याला सर्वसामान्यांसाठी काम करायचं आहे. मला स्तुतीपाठक लोक अजिबात आवडत नाहीत. चापलुसी करणारे लोक मी कधीच जवळ करीत नाही. माझ्याजवळ असे लोक तुम्हाला कधीही दिसणार नाहीत. जवळीक सुद्धा कुणाशी किती करायची हे पण तुम्ही ठरवलं पाहिजे. आपल्याला सगळे सारखे धरले पाहिजेत. जवळच्या लोकांना सुद्धा आपण त्यांच्या कामावरुन तोललं पाहिजे. आमच्या संस्थेमध्ये चांगला अधिकारी असेल तर त्याला योग्य न्याय मिळतो, मात्र वाईट असेल तर कसलाही विचार न करता दुसर्‍या दिवशी त्याला कमी करायला मला काहीच वाटत नाही. कारण मी कशामध्येही आणि कुणामध्येही गुंतलेलो नाही. कारखान्यातील संचालकांनाही मी नेहमी सांगतो, ही खुर्ची सांभाळण्यासाठी, टिकवण्यासाठी मी काहीही चुकीचे करणार नाही. मला इथे या पदावर राहायलाच पाहिजे असं काही नाही. माझ्या या स्वभावाचा संचालकावरही चांगला परिणाम होतो. 

प्रश्न ..तुमचे राजकीय गुरू कोण? तुमचे सर्व पक्षातील नेत्यांशी चांगले संबंध आहेत..?
उत्तर- माझे कोणीही राजकीय गुरु नाहीत मात्र सर्व पक्षातील राज्यकत्यांशी माझे चांगले संबंध राहिले आहेत. स्व.विलासराव पाटील-उंडाळकर (काका) तसे फटकळ होते. मात्र माझ्याशी त्यांचे संबंध अतिशय चांगले होते. माझा त्यांच्याशी संवाद होत होता. शेवटच्या क्षणी रुग्णालयात असताना मी त्यांना भेटायला गेलो होतो. तेव्हा तिथे असलेल्या सर्वांना त्यांनी बाहेर काढून माझ्याशी संवाद साधला. राजकारण कसं चालतं..., राजकारणात कसं वागलं पाहिजे..., या विषयावर त्यांनी मला मोलाचा सल्ला दिला. जे त्यांना त्यांच्या मुलाशी बोलायला पाहिजे होतं ते माझ्याशी बोलले. वाळवा तालुक्यातील जयंतराव पाटील यांच्याशीही माझे सलोख्याचे संबंध आहेत. इथं बाळासाहेब पाटील यांच्याशी जयवंत शुगर आणि विधानसभा निवडणुकीमुळे संबंध ताणले होते. मात्र झालेल्या चुका मान्य करुन आम्ही पुढे गेलो. आज आम्ही एकत्र काम करीत आहोत. 

प्रश्न ..कृष्णा विद्यापीठ आणि कृष्णा कारखान्याची एवढी मोठी जबाबदारी स्वीकारताना भविष्यातील बदलांकडे तुम्ही कोणत्या नजरेने पाहता... 
उत्तर ...जगभरात काय चालले आहे, त्याचा अभ्यास आम्ही सातत्याने करत असतो. सर्व व्यवसाय इंडस्ट्रीमध्ये फास्ट चेंजेस होत आहेत. त्यामुळे अडपटेशन तुम्हाला सातत्याने करावे लागतील. कारखान्याबाबत मी नेहमी म्हणतो, आजची जी कारखान्यात टेक्नॉलॉजी आहे. ती पुढच्या काळात चालणार नाही. त्यामुळे तुम्हाला नव्या बदलांसाठी सतत दक्ष राहावे लागेल, अभ्यास करावा लागेल. आरोग्यसेवेत सध्या काय नवीन ट्रेंड आहे, हे पहावे लागते. वैद्यकीय सेवेमध्ये डिसिजन मेकिंग अत्यंत महत्वाचा असतो. पेशंटला ट्रीट करताना योग्य डिसिजन घ्यावा लागतो, आणि तो डिसीजन विथ रिझन हवा. भविष्यात कुठे पोटेन्शिअल आहे याचा आम्ही विचार करतो. आम्ही मोठे निर्णय घेतो. मात्र त्याची अंमलबजावनी टप्प्याटप्प्याने करतो. मध्यंतरी कृष्णा कारखाना वीस वर्षे आमच्याकडे नव्हता. मात्र अन्य सर्व संस्था स्थिर आहेत, प्रगतीपथावर आहेत. एग्रीकल्चर कॉलेज असो किंवा मेडिकल कॉलेज यांच्या ब्रांचेस असो. फार्मसी कॉलेज असो नर्सिंगसह सर्व कॉलेजेस राज्यामध्ये नावाजलेले आहेत. आमच्या सर्व संस्थांचा पुढील पाच वर्षाचा प्लॅन तयार आहे. कारखाना आणि विद्यापीठात आजचे चॅलेंजेस आणि भविष्यात उद्भवणारे चॅलेंजेस याचा विचार करून आमचे प्लॅन तयार आहेत. जे आपल्याला चॅलेंज वाटते, आणि ज्याची आपल्याला भीती वाटते, त्याचं रूपांतर तुम्ही संधीमध्ये केलं पाहिजे. 

प्रश्न ..आपल्या वाढदिवसानिमित्त सभासद, शेतकरी आणि कराड तालुक्यातील जनतेला काय सांगाल.....
उत्तर ...आपला शेतकरी समाज शेतीवर अवलंबून आहे. गेल्या 50 वर्षांमध्ये इतके बदल झाले आहेत. हे सर्व शेतकरी अल्पभूधारक झालेले आहेत. शेतकर्‍यांचे राहणीमान सुधारलं असलं तरी फक्त शेतीवर त्यांचं चालणार नाही. शेतकर्‍यांच्या घरातील मुले शिकली पाहिजेत. नोकरी किंवा व्यवसायाचा मार्ग त्यांनी स्विकारला पाहिजे. भविष्यात सामुदायिक शेतीची कन्सेप्ट राबवावी लागणार आहे. कराड दक्षिणमध्ये कृष्णा साखर कारखान्याशिवाय एकही मोठी इंडस्ट्री नाही, म्हणून मी अतुलला सुद्धा भविष्यात या मतदारसंघात नव्या इंडस्ट्रीज आणाव्या लागतील, याबाबत सुचविले आहे. कृष्णा कारखान्याच्या संघर्षामध्ये जयवंत शुगर उभा राहिला. संघर्षच झाला नसता तर कृष्णेचे चार कारखाने झाले असते. ‘कृष्णा’ कारखान्याबाबत भविष्यात काही योजना आहेत, याबाबत आता सांगणे योग्य नाही. 

प्रश्न ...तुमच्या आयुष्यातील सर्वात सुखद अशी घटना कोणती..? अतुल आता आमदार झाला आहे. त्याविषयी काय सांगाल..?
उत्तर...मुले सेटल झाली. राजकारणात हे करिअर अतुलने स्वीकारलं. संषर्घातून तो आमदार झाला. हा एक आनंदाचा क्षण होता. अतुलकडे पोटेन्शिअल आहे म्हणून ते होऊ शकलं. याशिवाय छोटे-छोटे आनंदाचे प्रसंग माझ्या आयुष्यात रोज घडतात. एखादा कॅन्सरचा पेशंट बरा होऊन घरी जातो तेव्हा त्याच्या चेहर्‍यावर जो आनंद असतो, तो आनंद पाहण्यात वेगळा आनंद असतो. या विभागात काम करणारांना तुम्ही भाग्यवान आहात, असे मी म्हणतो. एवढ्या वेगवेगळ्या कामांत बिझी असूनही रोज सकाळी मी ऑपरेशन थिएटरमध्ये जातो. कारण यामध्येच आनंद आहे. आज स्त्रियांमध्ये कॅन्सरचे प्रमाण फार मोठे आहे. कॅन्सरची ट्रीटमेंट करणं फार गरजेचे आहे हा विचार करूनच कृष्णा रूग्णालयाचे कोबाल्ट युनिटमध्ये सुरू आहे. कॅन्सरबाबत जनजागृती करण्याचे आमचे प्रयत्न असतात. कोबाल्ट युनिटमधून गेल्या अनेक वर्षापासून आम्ही 30 हजारांहून अधिक रुग्णांवर मोफत उपचार केले आहेत. अतुलसुद्धा माझ्यासारखा थोडा संयमी व्हायला लागला आहे. 2006 सालापासून अतुलने सक्रिय राजकारण सुरु केले. तेव्हापासून त्याच्यामध्ये अनेक बदल झाले आहेत. प्रयत्नांती परमेश्वर हे या उक्तीप्रमाणे प्रयत्न करून अतुलने आमदारकी खेचून आणली आहे. त्यांने केलेल्या कामामुळे पक्षानेही अतुलला चांगला न्याय दिला आहे. भविष्यात तो अजून चांगले काम करेल. शिवाजी स्टेडियमसाठी 100 कोटी रुपये आणले आहेत. आपल्या जाण्यानंतर आपल्या पाऊलखुणा मागे राहिल्या पाहिजेत असं काम व्हायला पाहिजे. आरोग्य सेवा, आरोग्य विद्यापीठ हे नाव कायमस्वरूपी राहणार आहे. यशवंतराव चव्हाण यांनी राबविलेल्या योजनांमुळे आपण आजही त्यांचे नाव घेतो. कृष्णा रुग्णालय उभं राहण्यामध्ये चव्हाण साहेबांबरोबरच वसंतदादा पाटील यांचे फार मोठे योगदान आहे. 

प्रश्न ..जयवंतराव आप्पा यांनी मला एक गोष्ट सांगितली होती, मला चांगले लोक मिळाले म्हणून मी एवढे मोठे काम करू शकलो. हे खरं आहे का...........
उत्तर... हो, हे बरोबर आहे. हे टीमवर्क आहे. इतक्या विविध अडचणी असतात, कुठलेही काम करताना लोक तुमच्यासोबत असतील तर तुम्ही काहीही करू शकता. फक्त लोकांची साथ पाहिजे. एखादी वस्तू विकायची म्हणलं तरी सुद्धा लोकांची गरज लागतेच. लोकं बरोबर नसतील तर आपण काही करू शकलो नसतो. संस्थेत किती इक्विपमेंट आहेत..... किती इमारती आहे...... याच्यावर त्या संस्थेचे मूल्यमापन होत नाही. तर संस्थेत काम करणारी माणसं किती मोठी आहेत, त्यावर त्या संस्थेची किंमत ठरते. आज आमच्या दवाखान्यात जेवढा आमच्या वॉर्ड बॉयला किंमत दिली जाते सन्मान दिला जातो, तेवढाच सन्मान मोठ्या पदावरील डॉक्टरांना दिला जातो. अजून दुसरा कॅम्पस आम्ही निर्माण करत आहोत. काम अजून वाढवायचे आहे, जोपर्यंत शरीर साथ देतंय तोपर्यंत काम करीतच राहणार आहे. राजकारणातून निवृत्तीचा एक भाग असतो. मुळातच रिटायरमेंटचा कन्सेप्ट वेगळा असतो. मनापासून रिटायर होणे एक आणि कामापासून वेगळं होणं असे रिटायरमेंटचे प्रकार आहेत. आयुष्यभर जे काम केलं आहे, त्याच्यापासून आपण बाजूला राहू शकत नाही.


२१ मे २०२५

प्रतिभाशाली युवा लेखक यशराज देसाई


प्रतिभाशाली युवा लेखक.....यशराज देसाई 

राजकारणी लोकांच्या घरी राजकारणी, डॉक्टरांच्या घरी डॉक्टर, शिक्षकाच्या घरी शिक्षक,आयपीएस अधिकाऱ्यांच्या घरी आयपीएस किंवा सैनिकांच्या घरी सैनिक जन्माला येतो,अशी अनेक उदाहरणे आपण पाहिली असतील. पण राजकारणी लोकांच्या घरी एक लेखक जन्माला येतो आणि तो अवघ्या वयाच्या 27 व्या वर्षी तत्त्वज्ञान विषयक हे पुस्तक लिहितो असे उदाहरण क्वचितच पाहायला मिळते. 

होय, असा एक तरुण आहे आपल्या पाटण तालुक्यात. विनम्र आणि तितकाच डॅशिंग आणि उंचपुरा अशा युवा लेखकाला भेटण्याचा योग नुकताच मला आला. खरंतर  या पुस्तकाचे प्रकाशन दोन वर्षांपूर्वीच झालं आहे पण त्यानंतरच्या कालावधीत त्यांना भेटण्यासाठी मला वाट पहावी लागली. परवा वेळ घेऊन त्यांना भेटायला गेलो. दुपारी बारा वाजताची वेळ ठरलेली होती. साडे अकरा वाजताच त्यांच्या कार्यालयातून मला फोन आला 'कुठे पोहोचला आहात' त्यावेळी मी विहे घाटात होतो. पुढच्या पंधरा-वीस मिनिटात मी माझे मित्र धवल जाधव यांच्या समवेत त्यांच्या कार्यालयात अर्थात लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्यावर मरळी येथे पोहोचलो. 

मी मगापासून बोलतोय तो युवा लेखक दुसरे कोणी नसून लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई आहेत. त्यांचे वडील सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पर्यटन मंत्री आहेत. 'लिविंग द ग्रेटर लाइफ' या इंग्रजी पुस्तकाचे लेखक यशराज शंभुराज देसाई... राजकारण्यांच्या घरात जन्माला आलेला एक प्रतिभाशाली लेखक. 27 व्या वर्षी तत्त्वज्ञान विषयक पुस्तक लिहीणं हे काय वय नाही. मात्र लोकनेते बाळासाहेब देसाई यांचा वारसा, लहानपणापासून आई-वडिलांचे संस्कार आणि तितक्याच कडक शिस्तीत  वाढलेल्या आणि शिक्षणालाच महत्त्व देणाऱ्या देसाई कुटुंबाने महाविद्यालयाने शिक्षण पूर्ण होईपर्यंत यशराज देसाई यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करायला सांगितले, राजकारणापासून त्यांना थोडं लांब ठेवले होते. यशराज देसाई यांनी सातारा येथील मोना स्कूल येथे शालेय शिक्षण पूर्ण केले व त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (MIT), पुणे येथून स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. 

महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच त्यांच्या मनात काही विचार घोळत होते, सकारात्मक विचारातून आयुष्यात कसं पुढे जायचं ? आयुष्यात काय केले पाहिजे, कसे राहिले पाहिजे लाइफ म्हणजे काय आहे यावर त्यांनी केलेल्या सखोल चिंतनातून जगण्याची प्रेरणा कागदावर उतरवली.   Living The Greater Life: It is what you and I do हे इंग्रजी पुस्तक जन्माला आलं. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन झालं. 

"Living the Greater Life" हे पुस्तक आपल्या जीवनातील न बोलल्या जाणाऱ्या सत्यावर भाष्य करतं. प्रौढ वयात आपण स्वतःपेक्षा मोठ्या जबाबदाऱ्या घेतो – समाज, संस्था, आणि इतरांच्या भल्यासाठी. यामुळे आपल्याला नेहमीच "आपण काय करायला हवं आहे" यानुसार जगावं लागतं, जे "आपण कोण आहोत" यापेक्षा वेगळं असतं. डिजिटल जग, विशेषतः सोशल मीडिया, आपल्याला सतत प्रभावित करतं. या प्रभावामुळे आपले विचार, निर्णय, आणि जीवनशैलीही बदलते – जे कधी कधी आपल्याला खऱ्या आयुष्यातून दूर नेतं.

हे उच्च जीवन जगताना आपल्याला अनेकदा दोन व्यक्तिमत्त्वे बाळगावी लागतात – एक बाह्य जगासाठी आणि दुसरं आपल्यासाठी. याचा मानसिक ताण, गमावलेले क्षण आणि पश्चात्ताप यांचं ओझं वाटू लागतं. शेवटी एक प्रश्न सतत मनात राहतो. ही मोठी ('Greater') जीवनशैली खरंच जगण्यासारखी आहे का? आणि जर आपण ती जगलो नाही, तर काय? 

यावर यशराज देसाई यांनी यावर आपल्या साध्या आणि सोप्या लेखणीतून  पुस्तकातून प्रकाश टाकला आहे, आपली मतं व्यक्त केली आहेत, उपाययोजना सुचवल्या आहेत.

लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे नातू असणारे यशराज देसाई सध्या राजकारणात ऍक्टिव्ह आहेत. सध्या ते लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याचे चेअरमन म्हणून काम पाहत आहेत. फलटण येथील निंबाळकर घराण्यातील उच्चशिक्षित युवती सोबत त्याचा नुकताच विवाह झाला आहे. इंग्रजी पुस्तकाचे लेखक म्हणून त्यांनी साहित्य क्षेत्रात पाऊल ठेवले आहे  आणि याच एका कारणामुळे यशराज देसाई यांना भेटावे अशी माझी इच्छा होती. या भेटीत आम्ही दोघांनी त्यांचं पुस्तक आणि साहित्य याशिवाय  कोणतीही चर्चा केली नाही. पुस्तक निर्मितीचा प्रवास मांडताना महाविद्यालयीन जीवनातील काही आठवणी सांगितल्या. 

यशराज देसाई यांना भेटल्यानंतर  एका युवा साहित्यकाला भेटून आनंद झाला. भविष्यात त्यांनी उद्योग क्षेत्रातील करिअर आणि आव्हाने यावर लिखाण करावे. वडील शंभूराज देसाई यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांनी कमी वयात साखर कारखान्याचे चेअरमन म्हणून कार्यभार स्वीकारला आहे. साखर कारखान्यातील बदलती परिस्थिती,भविष्यात कारखान्यासमोरील आव्हाने आणि उपाय यावर त्यांचा हळूहळू अभ्यास होईल आणि या अभ्यासातून त्यांनी उद्योजकांना मार्गदर्शक पुस्तकाचे लेखन करावे अशा मी त्यांना शुभेच्छा दिल्या. लेखक यशराज देसाई यांना भेटून वेगळी प्रेरणा मिळाली.

...सतीश मोरे सतिताभ
9881191302

१९ मार्च २०२५

miss you धनंजय


धनंजय शिवाय फिकी पिकी रंगपंचमी...😓


आजची रंगपंचमी आपल्याला गेल्या वर्षी खेळलेल्या रंगपंचमीची आठवण करून देत आहे.गेल्या वर्षी आपण अमिताभ बच्चन प्रेमींनी एकत्र येऊन पाॅकेट कॅफे मध्ये एक छोटासा कार्यक्रम 'रंग बरसे' आयोजित केला होता. रंगपंचमीची गाणी म्हणत, ऐकत सर्व जण रंगात न्हाऊन गेलो. आपण खूप आनंद लुटला होता. कमी वेळात जास्त मजा आली होती. कार्यक्रम संपल्यावर ना धनंजय राजमाने यांनी आणलेला गॉगल घालून आपण सर्वांनी फोटो काढले होते, आठवतय का? या कार्यक्रमाची गावभर चर्चा झाली होती. याही वर्षी असाच कार्यक्रम करण्याचं नियोजन केले होते. याही वर्षी रंगपंचमी कार्यक्रम व्हावा म्हणून सर्वात जास्त आग्रह होता तो धनंजय राजमाने यांचा.

धनंजय आपल्यातील अतिशय गौरवशाली कलाकार, गायक आणि सच्चा अमिताभ बच्चन प्रेमी. त्यांनी हा कार्यक्रम गेल्या वर्षी प्रमाणे होण्यासाठी मला खूप वेळा फोन केला होता. आपण हा कार्यक्रम घ्यायचं ठरवलं पण होतं. संभाजी शेवाळे दाजी यांनासुद्धा त्यांनी फोन केला होता. शेवटी धनंजय यांच्या आग्रहाखातर या कार्यक्रम घेण्यासाठी मी पॉकेट कॅफेचे धनंजय माने यांना फोन करून कल्पना दिली होती.

सकाळची वेळ ठरली होती. धनंजय राजमाने कराओके सेट घेऊन येणार होते. पण नियतीच्या मनात वेगळेच होतं. आज धनंजय माने आपल्यात नाहीत. त्यांच्याशिवाय यावर्षी रंगपंचमी सुनीसुनी, फिकी पिकी आहे. धनंजय यांच्याशिवाय यावर्षी कसा बर रंग लावावा वाटेल ?

गेल्या वर्षी रंग बरसे कार्यक्रमात आपल्यातील एक बच्चन प्रेमी दिवंगत राहुल खोचीकर यांच्या स्मरणार्थ एबीपी संजय शिंदे मेहेरबान यांनी शोले चित्रपटातील गाणे म्हटले होते 'ये दोस्ती हम नही छोडेंगे' 
अतिशय भावूक वातावरणात हे गाणं त्यांनी सादर केलं होतं. ते ऐकताना राहुलची खूप आठवण आली होती. आज पुन्हा हे गाणे ऐकताना धनंजय राजमाने यांची खुप आठवण येते.

धनंजय, धनूशेठ, धनुदादा..
धनंजय बच्चन....

तू आम्हाला सोडून जायला नाही पाहिजे होतं... तू आम्हाला अजून हवा होतास.. तुझी खूप गाणी आम्हाला ऐकायची होती.. तुझ्यासोबत आम्हाला खूप फिरायचं होतं.. तुझ्यासोबत आम्हाला कराओके गाण्याचा कार्यक्रम घ्यायचा होता... तुझ्यासोबत आम्हाला परदेश दौरा करायचा होता... तुझ्यासोबत आम्हाला अमिताभ बच्चन यांचे अनेक कार्यक्रम घ्यायचे होते... तुला घेऊन पुन्हा एकदा अमिताभ बच्चन यांना भेटायला जायचं होतं... तुझ्यासोबत आम्हाला आयुष्यातील अनेक रंग उधळायचे होते... !

पण आज तू आमच्यासोबत नाहीस.. तू आम्हाला धोका दिलास... तू असं का केलंस...? नियतीच्या मनात जरी वेगळं असलं तरी नियती एवढी निष्ठूर कशी होऊ शकते ? धनंजय तुझ्या सारखा सच्चा अमिताभ बच्चन प्रेमी, सच्चा मनमिळावू आणि निष्पाप मित्र आपल्यातून जाणं ही माझी फार मोठी हानी आहे. खूप वाईट वाटतंय.. धनंजय राजमाने तुमच्या मुळे ओगलेवाडी मध्ये थांबायला एक जागा होती, स्पेस होता. आता ओगलेवाडी मध्ये आम्ही कुणासाठी थांबू ???. 

धनंजय, अमिताभ बच्चन प्रेमी ग्रुपच्या प्रत्येक कार्यक्रमात तू तुझं वेगळंपण टिकवलं होतंस. एकदा नमक हलाल चित्रपट लावलेला होता तेव्हा तू 'शहेनशहा' मधील अमिताभ बच्चन यांचा गेटअप करून आलेला होता. परवा 11 ऑक्टोबरला कालिया चित्रपट आपण प्रभात मध्ये लावलेला होता. कालिया चित्रपटातील कैदी नंबर 602 मेकअप करून तू आला होतास. तुला घेऊन हथकडी घातलेली पोज घेऊन आपण प्रभात मध्ये फोटो काढले होते.बच्चन प्रेमी ग्रुपच्या प्रत्येक कार्यक्रमात तू काही तरी वेगळे करायचा. ग्रुप मधील सर्वांना तू तुझ्या घरी गाणे ऐकायला बोलावलं होतं, ग्रुप मधील सर्वांना तुझ्या मुलाच्या लग्नाच्या वेळी बोलावलं होतं. ग्रुप मधील सर्वांनी तुझ्या घरी यावं, तुझं गाणं ऐकावं, त्यांनी एखादं गाणं सादर करावे अशी तुझी खूप इच्छा असायची. बच्चन प्रेमी मित्रांना तू अनेकदा लग्नाची, वाढदिवसाची पार्टी दिली होतीस. तु सर्वांना जपलं होतं, सगळे जण तुझ्या गाण्यावर, बच्चन वेडे पणावर प्रेम करत होते. तुझ्यासारखा सच्चा मित्र आणि दिलदार खरच मिळणार नाही. तेरे जैसा यार कहा...कहा ऐसा याराना !


!

मिस यु धनंजय....!


 *_सतीश मोरे सतिताभ आणि* 
*अमिताभ बच्चन प्रेमी ग्रुप सर्व सदस्य_* 

 _सोबत... संजय शिंदे यांनी सादर केलेलं गीत_

२६ फेब्रुवारी २०२५

खेळ मांडला


*चाकावर खेळ मांडला..* 
*व्यवस्थेचा...शिक्षणाचा आणि परिस्थितीचा...!*

सायंकाळी चारची वेळ असेल.. माझं काम आटोपून शेतात पाच मिनिटं जाऊन यावं म्हणून करवडीला गेलो होतो. शेतात जाऊन आलो, बाहेर रस्त्यावर उभा राहिलो. शेतासमोरच मोकळ्या जागेवर एका साखर कारखान्याची टोळी (फड) होती. या फडामध्ये झोपड्या (खोपा) मांडल्या होत्या. अर्थातच टोळीतील तोडकरी कुटुंब शेतात ऊस तोडायला गेले होते. 

या कष्टकरी कुटुंबाचा दिनक्रम आपल्यासारख्या पोट सुटलेल्या लोकांसारखा नसतो.  लेकरांवर त्यांचं फार प्रेम असतं. पण पोटाची खळगी भरण्यासाठी पहाटे चार पासून ही कुटुंब कामावर जातात. कामावर जाताना सारा स्वयंपाक करून ठेवला जातो. लहानग्या पोरा बाळांना कामावर नेता येतं किंवा कधी कधी नेता येत नाही. ती पोरं भगवान भरोसे त्या झोपड्यामध्ये सोडून ही कुटुंबं ऊस तोडायला जातात. मग या चिमुकल्या पोरांची जबाबदारी पडते त्यातल्या त्यात आठ दहा वर्षाच्या मोठ्या मुलांवर.  

अशीच अकाली पालकत्व आलेली दोन मुलं आणि एक मुलगी या फडावर होती. या तीन मुलांच्याकडे एकच काम होतं त्या झोपड्यांमध्ये असलेल्या छोट्या छोट्या मुलांची काळजी घ्यायची, त्यांना खाऊ घालायचं, त्यांना आधार द्यायचा, त्यांना खेळवायचं. हे काम त्यांनी चोख पार पाडलं होतं. खोपीमध्ये जे काय आहे ते खाऊन ही पोरं आता एक झोप काढून बाहेर पडली होती. सूर्याची प्रखर किरणे हळू कमी होऊ लागली होती आणि याच कालावधीत ही छोटी मुले झोपडी बाहेर आली. आणि  त्यांनी एक खेळ मांडला.

 शहरांमध्ये आपण व्हील चक्र, जायंट व्हिल किंवा मोठा झोपाळा पाहिला असेल. पण या शेतमजुरांच्या मुलांना कुठून मिळणार असला  झोपाळा ? एवढे पैसे कुठे आहेत त्यांच्याकडे? त्यांना जत्रेत जायला मिळेल? ? मुलांना घेऊन जत्रेला जावं ,त्यांना गोड गोड खाऊ घालावं, त्यांना जत्रेत फिरवावं? चिरमुरे द्यावेत? एवढा वेळ कुठे आहे त्यांच्या पालकांकडे ? मुलांना खाऊ घालण्यासाठी काम केले पाहिजे, कष्ट केले पाहिजे या एकाच उद्देशाने त्यांचे पालक शेतात ऊस तोडणी करत होते. 

तिथे एक बैलगाडी उभी होती. तर दुसरीकडे बंद पडलेली एक बैलगाडी होती. या बैलगाडीचे चाक काढलेले होते. बैलगाडीचे चाक एका उंचीवर मांडून यांच्या आई-वडिलांनी तिथे एक चक्र तयार केलेले होते. या चक्रावर बसून मग या मुलांनी खेळ मांडला. तिथे चार पाच छोटी छोटी मुलं होती . त्यांच्या अंगावर साधे कपडेही नव्हते. ही मुलं या चकरावर बसली. त्यांच्यातला एक थोरला मुलगा ते चक्र गोल गोल फिरवत होता. दुसरी एक मुलगी त्या छोट्या छोट्या मुलांना त्या चक्रावर बसवत होती आणि मग खेळ सुरू झाला..

काय आनंद होता या गोष्टींमध्ये काय सांगू...! ‌ किती निष्पाप मुलं होती ती.. इवलीसी...आहे त्या गोष्टींमध्ये आनंद मानत तो आनंद लुटण्याचा प्रयत्न सुरू ठेवला होता. गोल गोल चक्र फिरल्यानंतर एक छोटीशी मुलगी खाली पडली. तिला उचलून एका मुलाने उभे केले. पुन्हा खेळ सुरू झाला. ती मुलं ओरडत होती, कोणी रडत होती, कोणी हसत  होती,आनंद लुटत होती आणि मी शांतपणे ते पाहत होतो.

लहानपणी असा खेळ आम्ही पण केलेला होता. पण तोडकरी कुटुंबातील मुलांचा हे खेळ पाहून मन हेलावलं. यातील एका दोघा मुलांना विचारलं तुम्ही शाळेत जाता का ? दोघांनी एका सुरात एकच उत्तर दिले.. 'आम्हाला शाळा काय माहित नाही .. शाळेत आम्ही कधी गेलोच नाही. '... ऊस तोडणी कामगारांची मुले जर शाळेत जात नसतील तर त्यांना भविष्य कसे चांगले असणार...? त्यांनी पण आपल्या आई-वडिलांच्या मागे  फक्त ऊस तोडत बसायचे काय ?

सोबतचा हा व्हिडिओ पाहताना जेवढा आनंद होत होता, तेवढेच ही मुलं शाळेत जात नाहीत  हे ऐकल्यानंतर डोळ्यातून पाणी येत होते...! काय करू शकतो आपण या मुलांसाठी ...?  बाजूला आलो आणि लेखणीच्या माध्यमातून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली...!तुम्हाला भेटायला दोन दिवसानंतर पुन्हा येतो... असं वचन देऊन तिथून निघालो....!

आपण काय करू शकतो का या मुलांसाठी ? ज्यांच्या अंगावर कपडेही नाहीत... ज्यांना शिक्षण काय माहित नाही... ज्यांना पुस्तकं वह्या काय असतं याची माहितीही नाही...!

*सतीश वसंतराव मोरे सतिताभ*
9881191302

१३ सप्टेंबर २०२४

जब तक जिंदगी हैं तब तक संघर्ष है


अमिताभ बच्चन यांचे वडील हरिवंश राय बच्चन यांचे एक अतिशय सुप्रसिद्ध वाक्य आहे मी हे वाक्य अनेकदा ऐकले आहे, वाचले आहे. हरीवंशराय बच्चन म्हणतात, जब तक जिंदगी है तब तक संघर्ष है जिस दिन संघर्ष खतम हुआ उस दिन तुम्हारी जिंदगी भी खत्म हो जायेगी' आयुष्यात फक्त संघर्ष केला आणि यश मिळालं नाही असं एकही उदाहरण आपल्याला पाहायला मिळणार नाही. ज्यांनी संघर्ष केला त्यांना यश हे मिळतच आणि संघर्षाशिवाय यशाची चव ही चांगली लागत नाही.

जीवन जगत असताना आयुष्यात अनेक खाच खळगे येतात परंतु हे खाचखळगे जे कोणी भरतात त्यांनाच पुढे जाण्याच्या वाटा दिसतात. पुढे अडथळे दिसले म्हणून जो थांबतो तो तिथेच विसावतो आणि त्याची प्रगती होत नाही. अडथळे पार पाडण्याची कला ज्यांना अवगत आहे तो आलेल्या प्रत्येक संकटाला आनंदाने स्वीकारतो. जीवनातील प्रत्येक गोष्टीकडे जर तुम्ही सकारात्मक दृष्टीने पाहत गेला तर जीवन संघर्ष असले तरी ते आनंदमय होऊन जाते. कधी कधी सर्व संपलय असं वाटतं, पुढे काहीच दिसत नाही, माझ्याच वाटायला हे का आलं? असं सुद्धा वाटू लागतं. अशा परिस्थितीत खूप जण संघर्ष करायचे सोडून देतात,पळून जातात. मात्र संघर्ष ज्यांनी स्वीकारलेला आहे ते या संकटावर मात करतात आणि जीवन सुंदर बनवतात. 

सफलताओं का आनन्द तभी सम्भव है जब मनुष्य में संघर्ष के लिए अपेक्षित इच्छा-शक्ति हो और दृढ़ इच्छा-शक्ति हो। इच्छा-शक्ति के अभाव में सामर्थ्यवान व्यक्ति भी अपने ध्येय तक पहुँचने में सफल नहीं हो सकता है। दृढ़ इच्छा-शक्ति और धैर्य उसके साथी हों तो सफलताएँ सदैव चरण चूमती हैं, अन्यथा इसके अभाव में ध्येय के निकट पहुँचकर भी धड़ाम से नीचे गिर सकते हैं। और अन्ततः निराशा ही हाथ लगती है और हाथ मलते रह जाते हैं।

१२ सप्टेंबर २०२४

मंगला बनसोडे करवडीकर २७ (७२) वर्षाची तमाशा सम्राज्ञी!


मंगला बनसोडे करवडीकर  
२७ (७२) वर्षाची तमाशा सम्राज्ञी!
 

महाराष्ट्राची तमाशा लोककला ज्यांनी जिवंत ठेवली,कला हेच जीवन असं ब्रीद डोळ्यासमोर ठेवून वयाच्या नव्या वर्षापासून तमाशा फळात आपली कला दाखवणाऱ्या, करवडी गावचे भूषण श्रीमती मंगला बनसोडे करवडीकर यांचा आज ७२ वा वाढदिवस. वय फक्त एक आकडा असतो असं म्हणतात आणि हे वाक्य मंगला बनसोडे यांना तंतोतंत लागू पडतं. आज सकाळी मी त्यांना भेटायला गेल्यानंतर 72 वा वाढदिवस नसून हा तुमचा 27 वाढदिवस आहे असा सहज बोलून गेलो.यामागे कारणही तसंच आहे. 27 वर्षाच्या तरुणीला लाजवेल अशी लावणी आजही त्या करतात, समोर असणाऱ्या हजारो तमाशा रसिकांना लावणीच्या तालावर नाचवतात, त्यांचं मनोरंजन करतात त्यांना दुःख विसरायला भाग पडतात. 

औद्योगिक क्षेत्रात जशी टाटा, बिर्ला, बजाज ही घराणी आहेत, किंवा सिनेमा क्षेत्रात जशी कपूर, खान, बच्चन, देओल घराणी आहेत तसे तमाशात क्षेत्रात शंभर वर्ष जुनं एक घराणे आहे.अनेकदा ‘ घराणेशाही ’ हा शब्द उपरोधानं वापरला जातो पण खरतरं मोठा नावलौकिक असलेल्या घरात जन्माला आल्यावर मोठी जबाबदारी असते, लोक आपल्या अगोदरच्या पिढीशी त्या व्यक्तीची तुलना करतात. या सगळ्या परीक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण झालेलं कलाक्षेत्रातील आभाळाएवढं मोठ्ठ नाव म्हणजे
मंगल बनसोडे. आजोबा भाऊ बापू मांग नारायणगावकर, आई विठाबाई नारायणगावकर या दोन मोठ्ठा वारसा अभिमानाने आपल्या नावासोबत घेऊन मात्र स्वकर्तृत्वावर यश मिळवून आज तमाशासृष्टीवर मंगलताई अधिराज्य गाजवीत आहे.


तमाशा कलावंतांचे जीवन किती कष्टाचं असतं हे त्या कुळाला गेल्यानंतरच कळतं. मला थोडंफार कळलं,दिसलं त्यावरून मी म्हणू शकतो मंगलताईनीं खुप कष्ट सोसलं आहे. अनेक मी नेहमीच म्हणतो चित्रपटातील टॉपच्या हिरोईन पेक्षा मंगला बनसोडे कितीतरी पटीने श्रेष्ठ आहेत. आठ महिने तमाशा दौऱ्यामध्ये असताना त्या रोज कार्यात व्यस्त असतात. दिवसातील आठ दहा तास प्रवासात जातात. तमाशाच्या ठिकाणी पोचल्यानंतर मग थोडाफार आराम मिळतो, पुन्हा संध्याकाळी तमाशा सुरू होतो. रात्री उशिरा संपतो. पहाटे पुन्हा प्रवास सुरू होतो. कला सादर करत असताना रोज नवीन गावातील नवीन प्रेक्षक असतात. नव्या ढंगाचे असतात. कुणी तमाशा बघायला आलेला असतो, कुणी बाई बघायला आला असतो तर कोणी कला बघायला असतो.‌ मात्र या सर्वांसमोर अभिनय करताना त्या सर्वोत्तम द्यायचा प्रयत्न करतात. रोज नवा नवा अभिनय करत असतात. तमाशामध्ये रिटेक नसतो, चित्रपटांमध्ये अनेक रिटेक असतात. एका टेक मध्ये रोज तमाशाच्या फडात कला सादर करताना मंगला बनसोडे यांच्यातील कलाकार अजून प्रगल्भ होत जातो.

आई विठाबाई मांग नारायणगावकर यांच्यापासून वेगळी झाल्यानंतर मंगला बनसोडे यांनी स्वतंत्र फड सुरू केला. त्यावेळी आम्ही पाचवी सहावीत असेल. या तमाशाच्या रंगीत तालमी करवडी मध्ये होत असत. रंगीत तालमीसाठी आमच्या घरासमोर जनार्दन मोरे यांची बंद पडलेली पोल्ट्री निवडलेली होती. जुलै ऑगस्ट महिन्यात रिहसल सुरू व्हायच्या. त्याकाळी मनोरंजनाची फार साधने नसल्यामुळे आमच्या गावातील सर्व लोक हे बघायला तिथे जमायचे. आम्ही मुलं जात असू, काहीजण आम्हाला हटकत मात्र तरीही लांबून आम्ही गाणी,वगनाट्याच्या रंगीत तालमी पहात होतो. मंगला बनसोडे यांच्या सोबतीला त्यांचे पती रामचंद्र बनसोडे खांद्याला खांदा लावून वगनाट्यामध्ये आपला ठसा उमटवत होते. पुढे छोटा नितीन तमाशा मध्ये आला.मंगला बनसोडे यांचा थोरला मुलगा अनिल माझा पहिली ते चौथीचा जिल्हा परिषद शाळेतील क्लासमेट. शाळा सोडून त्याने तमाशा बॅक स्टेज सांभाळण्याची जबाबदारी घेतली. हळू तमाशा मोठा होत गेला. संगीताची राणी मंगला बनसोडे , लिटिल मास्टर नितीन बनसोडे आणि वग सम्राट रामचंद्र बनसोडे या तिघांच्या जोडीने राज्यात एक फार मोठा काळ गाजवला, तमाशा क्षेत्रात अक्षरश धुमाकूळ घातला. मंगला बनसोडे यांनी आई विठाबाई यांच्या पावलावर पाऊल टाकत बैठी लावणीच्या माध्यमातून तमाशाला एक उंची लावून दिली.
कधी काळी आई विठाबाईसोबत तमाशात काम करताना मंगलताईंनी बंडाचा झेंडा उभारला, पती रामचंद्र बनसोडे यांच्यासाठीने स्वतःचा स्वतंत्र फड उभारायचा हे जाहीर केलं. खरं तर सगळं सुरळीत सुरु असतांना धोका पत्करायचा नाही हे धोपट विचार करणाऱ्या माणसाचं धोरण असतं, पण जो धोका पत्करतो तोच इतरांपेक्षा अधिक यशस्वी होतो हे जगाचं यशाचं सूत्र आहे. आई विठाबाईच्या तमाशातून बाहेर पडल्यावर पती रामचंद्र यांच्यासोबत स्वतःचा तमाशा फड सुरु करताना ‘ पुनश्चः हरि ओम ‘ म्हणत आयुष्याच्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात केली. या प्रवासात खडतर काटेरी रस्ता होता, अनंत अडचणी होत्या... पण स्व निर्मितीचा आनंद होता, रामचंद्रासोबतच्या सीतामाईने आहे ती परिस्थिती गोड मानली तशी इथेही रामचंद्रासोबत आहे त्या परिस्थिती सुख मानलं. रामचंद्र बनसोडे हे उत्तम कलारसिक, उत्तम वगलेखक त्यांच्या रसिक व्यक्तिमत्वाला ‘ मंगल ‘ नावाचं मांगल्याचं कोंदण लाभलं. महाराष्ट्राला विष्णू बाळा पाटील, बापू बिरू वाटेगावकर, जन्मठेप कुंकवाची, भक्त प्रल्हाद, येथे नांदते मराठेशाही असे एकाहून एक सरस वगनाट्य बघायला मिळाली. आज नीतिनकुमार आणि अनिलच्या रूपाने पुढची पिढी तमाशाचा वारसा समर्थपणे पुढे नेत आहे. घरात नातवंडे बागडताहेत... मुलगी लक्ष्मी शेती आणि घराचा सगळा कारभार पाहत आहे. घराचं गोकुळ होणे म्हणजे यापेक्षा वेगळ ते काय असतं... 

मंगलताई तुमच्यातली अभिनेत्री, तुमच्यातली गायिका, तुमच्यातली नर्तिका, तुमच्यातली फड मालकीण, तुमच्यातली आई, तुमच्यातली बहिण.,तुमचं प्रत्येक रूप लोभस आहे. वर्षभर वेगवेगळ्या ताणतणावांनी त्रस्त झालेल्या हजारो रसिकजनांचे तुम्ही मनोरंजन करत आहात, त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्याच काम तुम्ही करत आहात.देवपूजा, ईश्वरभक्ती यापेक्षा वेगळी काय असणार! रसिकरंजन हे तर पुण्यांचं काम आहे. तुमच्या हातून रसिक रंजनाचे पुण्यकर्म पुढची अनेक वर्ष असेच होत राहो याच मनापासून शुभेच्छा.आपल्या मराठमोळ्या तमाशाला चांगले दिवस येवोत, तमाशाचे तंबू रसिकांच्या गर्दीने ओसंडून वाहोत .आज तुमच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 


सतीश वसंतराव मोरे 
सतिताभ 
9881191302



२२ ऑगस्ट २०२४

मी अनुभवलेला श्रावण आणि ज्ञानेश्वरी पारायण सोहळा


श्रावण महिना आणि या महिन्यातील सण याचा आणि माझा खूप जवळचा संबंध आहे. आजचा श्रावण महिना आणि नव्वदच्या दशकातील श्रावण महिना यात जमीन आसमानचा फरक आहे. श्रावण महिना बदललेला नाही, निसर्ग बदललेलं नाही मात्र माणसं बदलली आहेत. ठीक आहे ...माणसं बदलायला पाहिजेत कारण बदलणे हा निसर्गाचा नियम आहे. माणसं बदलली म्हणून वाईट वाटण्याचं काय कारण नाही मात्र आम्ही अनुभवलेला श्रावण खरंच एक वेगळा होता. 1990 च्या दशकातला आमचा श्रावण, आमचे शालेय जीवन, आमचं कॉलेज जीवन आणि आमचा श्रावण महिन्याकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन खरंच वेगळा होता. मी अनुभवलेला श्रावण आज तुमच्यासाठी.

श्रावण महिन्यात बहुतांश गावामध्ये ज्ञानेश्वरी हरिनाम सप्ताह साजरा केला जातो. श्रावण महिना हा पवित्र महिना. या महिन्यात सोमवार, मंगळवार, शनिवार हे तीन उपवास तर प्रत्येक घराघरा मध्ये केले जात होते. काही घरांमध्ये गुरुवार पण केला जात असे. मात्र सोमवार हा आमचा आवडता वार. कारण करवडीपासून जवळच सदाशिवगड आम्ही आमच्यासाठी श्रद्धास्थान  होते . याचबरोबर सदाशिवगडाच्या पायथ्याशी असणारे जानाई मंदिर सुद्धा आमच्यासाठी श्रद्धास्थान होते. करवडी, वाघेरी विरवडे, पार्ले, बनवडी, टेंभू, गोवारे, सुरली, कामथी, सदाशिव गडाच्या सर्व माच्या या सर्व गावासाठी सदाशिवगड म्हणजे श्रद्धेचे स्थान. होते,आजही आहे. प्रत्येक श्रावणी सोमवारी सदाशिव गडावर जाऊन तेथील निसर्गाच्या सानिध्यात सोमवार आनंद लुटणे हे आमच्यासाठी पर्वणी होती. त्याकाळी या परिसरातील प्रत्येक शाळेची सहल श्रावण महिन्यात सदाशिव गडावर जात असे. सदाशिवगडावर जायचे, तिथून पुढे कच्च्या रस्त्याने खाली उतरून जानाई देवीच्या मंदिरात जायचे, असा आमचा दिनक्रम असे. श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी सदाशिव गडावर जाण्यामध्ये जी मजा होती ती आज नाही. पण आम्ही लुटलेला श्रावण महिन्यातील आनंद हा खरंच वेगळा आनंद होता. 

आमच्या परिसरातील सर्व भाविकांचे श्रद्धास्थान म्हणजे जानाई देवी मंदिर. सुरलीच्या घाटात अलीकडे रस्त्याकडेला जानाई देवीचे मंदिर आहे. या मंदिरात श्रावण महिन्यातील तिसऱ्या मंगळवारी मोठी यात्रा भरते. या मंदिरात परिसरातील अनेक भाविक महिला येतात. जानुबाईच्या दारात जाऊन पाय ठेवल्यावर, डोकं ठेवल्यानंतर सगळ्या अडचणी दूर होतात, पूर्ण वर्षभराचा थकवा निघून जातो, जानुबाईची कृपा असेल तर सर्व काही शक्य असतं, अशी भोळी भोळी भावना या भावात भागातील महिलांची असते, आजही आहे. श्रावण महिन्यातील सोमवार आणि मंगळवार आमच्यासाठी आनंदाचे दिवस होते कारण या दिवशी शाळेला अर्धा दिवस सुट्टी असायची.धार्मिक स्थान किंवा परंपरा साठी सुट्टी देणे हे आजच्या नियमात बसत नाही. आणि हो मला आणखीन एक आठवते प्रत्येक शनिवारी आमच्या टिळक हायस्कूलमध्ये बजरंग बलीची उपासना केली जायची. मारुतीचा फोटो लावून  शनिवारी उपासना करून नारळ फोडत असू.आमच्या सोबत नारळ फोडणारे प्रसाद वाटणारे मुस्लिम सहित सर्व जाती धर्माचे विद्यार्थी होते. आज विनायक गरुड म्हणून  नावाजलेले वेदशास्त्र पंडित आहेत तो त्यावेळी आमचा गुरु. विनायकच्या पाठीमागे आम्ही वर्गात मारुती स्तोत्र म्हणत आणि वर्गातील प्रत्येकाच्या स्तोत्र पाठ झाले होते .

श्रावण महिन्यात करवडी गावामध्ये ज्ञानेश्वरी सप्ताह पारायण आयोजित केले जायचे. या पाराणात आमच्या गावातील शंभरहून अधिक भाविक, वारकरी ज्ञानेश्वरी पारायण वाचायला बसत असत. गावातील मुख्य चौकात असणारे हनुमान मंदिर, या मंदिरात हे पारायण होत असे. पहाटे काकड आरती, सकाळी सात ते बारा वाचन, त्यानंतर दुपारचे जेवण, पाच ते सहा प्रवचन, रात्री नऊ ते 11 कीर्तन असा अखंड हरिनाम सप्ताह असायचा. या पारायणामध्ये अखंड विणा धरण्याची पद्धत होती. हा विणा 24 तास खाली ठेवला जात नसे. दोन दोन तासाला विण्याचा विणेकरी बदलले जात असे. विणेकरी कोण असावा याचं नियोजन केले जात असे. पारायणासाठी गावातील श्रद्धाळू भाविक बसायचे. ज्याच्याकडे ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे त्याला काय अडचण नसे. मात्र ज्याच्याकडे ग्रंथ नसेल त्यासाठी तो ग्रंथ उपलब्ध करून दिला जात असे. मी स्वतः करवडी गावामध्ये चार पारायण केलेली आहेत. मला चांगलं आठवतं सकाळी उठून लवकर आंघोळ करून ज्ञानेश्वरी ग्रंथ घेऊन जात. सात वाजता तिथे पोहोचल्यानंतर सोहळा प्रमुख आमच्या गावचे प्रसिद्ध कीर्तनकार ज्योतीराम महाराज करवडीकर हे आम्हाला सुरुवातीलाच भगवद्गगीते मधील एक श्लोक म्हणून दाखवत. सात ते बारा वाचन व्हायचे. एका सुरात एका वेगात आम्ही सर्वजण ग्रंथ वाचन करत असू. ज्ञानेश्वर पारायण सोहळा संपल्यानंतर दुपारी एका ठिकाणी तर सायंकाळी एका ठिकाणी जेवणाची पंगत असे. पारायणामध्ये बसलेल्या सर्व स्त्री पुरुष यांना या पंक्तीला जेवणाचे खास निमंत्रण असे. पंगतीमध्ये त्यांना पहिल्या मान असतो. अनेक वर्षे या ज्ञानेश्वर पारायणामध्ये सकाळ आणि संध्याकाळचे जेवण असे. कुणी जेवण द्यायचे याचे नियोजन केले जात असे किंवा ही यादी ठरलेली असे. 

मला सुरुवातीपासून या पारायणामधील एक गोष्ट आवडत असे ती म्हणजे प्रवचन. न चुकता या प्रवचनासाठी मी जात असे. कीर्तन रात्री नऊ ते अकरा असायचे. मात्र सकाळी लवकर शाळा असल्यामुळे मला ते शक्य होत नसे किंवा मला त्या काळात कीर्तन आवडत नव्हते. प्रवचनांमधून एक वेगवेगळे मुद्दे मिळत असत. प्रवचन सुरू होण्यापूर्वी 'श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम' हा जप दहा मिनिट जपला जात असे. त्यानंतर ज्ञानेश्वरी ग्रंथ समोर ठेवून एका प्रवचन केले जात असे. प्रवचनकार  वेगळे आणि कीर्तनकार वेगळे असायचे. हे प्रवचन संपल्यानंतर सायंकाळी ज्याच्या घरी पंगत आहे त्या ठिकाणी जावे असू. काल्याचे किर्तन हे अतिशय महत्त्वाचा दिवस  या दिवशी मात्र मी नक्की कीर्तन ऐकायला जात असे. या दिवशी संपूर्ण दिवसभर जन्माष्टमीचा उपवास असे. रात्री बारा वाजता जन्म सोहळ्यात  सुंठवडा खायला मिळत असे.आमच्या गावाचे चिंचकर उर्फ तेली मामा नावाचे एक मोठे वारकरी होते. धोतर पायजमा सोबत काठी आणि घोंगडं, जबरदस्त मिशा असं त्यांचं रुबाबदार नेतृत्व होतं. ते या सोहळ्याचे सूत्रधार म्हणा किंवा संयोजक म्हणा किंवा कंट्रोलर म्हणा. तेली मामांचा आमच्या गावात फार मोठा दरारा होता. पारायणासाठी आलेल्या सर्वांना योग्य ठिकाणी बसायला जागा देणे, कुणालाही उठू न देणे, कीर्तन सुरू असताना कोणता अडथळा येऊन देणे ही जबाबदारी त्यांच्याकडे असायची. त्याकाळी किर्तन ऐकायला फार मोठी गर्दी होत असे. पंचक्रोशीतील लोक कीर्तन ऐकण्यासाठी गावात यायचे.गोपाळ काल्याच्या दिवशी आम्ही दहीहंडी फोडायला जात असे .गोपाळकाला दिवशी आमच्या गावातील पारायणाची समाप्ती होत. ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहातील ते आठ दिवस म्हणजे आमच्या आयुष्यातील सुखद दिवस असायचे. 

प्रत्येक वर्षी पारायणाला बसायला मिळेल किंवा यामध्ये सहभाग व्हायला मिळेल अशी परिस्थिती नसायची‌ मात्र श्रावणातील काही व्रत्तवैकल्ये , परंपरा आम्ही नक्की करत असू.  शिखर शिंगणापूर हा आमचा कुलस्वामी. प्रत्येक सोमवारी आम्ही सकाळी न बोलता पाणी घालायला गावातील महादेवाच्या मंदिरात जात होतो. कोण लवकर उठते, कोण लवकर मंदिरात पोहोचते अशी आमच्या भावंडांमध्ये, मित्रपरिवारामध्ये स्पर्धा असायची. गावापासून अंतरावर इंजाळे नावाच्या परिसरात महालिंगेश्वर मंदिर नुकतेच उदयाला येऊ लागले होते. या ठिकाणी पायी सहल काढण्याची एक वेगळी परंपरा होती. संध्याकाळच्या वेळी आम्ही या मंदिरात जात असो. पुढील काळात कराड तालुका वारकरी संघाच्या पुढाकाराने बंडातात्या कराडकर यांच्या नेतृत्वाखाली कराड शहरात दोन तीन मोठी पारायणे झाली. हा वारकरी संप्रदायाचा कराड तालुक्यातील उदय होता. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन सोहळ्यानिमित्त कराडात फार मोठा सोहळा झालेला होता. यात आम्ही सहभागी झालो होतो. आमच्या करवडी गावासहित कोपर्डे कार्वे, काले, शेरे, दुशेरे, कोडोली या गावातील वारकरी संप्रदायातील लोक पारायणात त्या संख्येने सहभागी झाले होते.कृष्णा घाटावर झालेला हा भव्यदिव्य पारायण सोहळा माझ्या अजूनही चांगल्या स्मरणामध्ये आहे. सकाळी उठून उठून आम्ही लवकर तयार होऊन सायकलवरून कराडला पोहचत. कृष्णा नदीच्या प्रीतिसंगगावर झालेला हा पारायण सोहळा अतिशय भव्य दिव्य झालेला होता. या सोहळ्यात राज्यभरातील नामवंत कीर्तनकार सर्वजनकार यांचा ज्ञानयज्ञ अजूनही स्मरणात आहे. दहा हजार लोकांची पंगत एका वेळेला बसण्याची व्यवस्था नदीच्या वाळवंटात झालेला हरिनामाचा गजर आजही कानात दुमदुमत आहे आहे. या पारायण सोहळ्या विषयी सविस्तर माहिती घेऊन मी लवकरच लिहिणार आहे.

आता श्रावण महिन्यात आमच्या गावातील पारायण सुरू झाले आहे .या सोहळ्यात सहभागी होणं मला शक्य नाही. मात्र परवा गावात जाण्याचा योग आला उद्यापासून पारायण सुरु होणार होते. मग हनुमान मंदिरात जाऊन बसलो. मंदिरात पोहोचल्यानंतर जोरदार पाऊस सुरू झाला. सुमारे अर्धा तास या मंदिरात मी बसून होतो. माझ्यासोबत माझा गावातील जुना मित्र राहुल पाटील आणि आमचा शेजारी संजय पिसाळ हे दोघे होते. गावातील सर्व मंदिरात जाऊन आलो हनुमान मंदिरात आल्यावर चर्चा सुरू होती. आम्ही जुन्या आठवणीला उजाळा दिला. पारायणामध्ये ज्ञानेश्वरी वाचन करत असताना चार तास ते पाच तास बसावे लागत असे. या वेळेला पाठ खूप दुखत असे. ज्याला मंदिरातील खांबाशेजारी बसायला मिळत असेल त्याला खांबाला टिकून बसणं शक्य होतं.  त्या खांबाला टेकून मी परवा बसलो, खूप आनंद झाला. ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. असं वाटलं या ज्ञानेश्वरी पारायण मध्ये आपण सहभागी व्हावं, कीर्तन ऐकावं मात्र मला शक्य झालं नाही.

 पण मनातील ही इच्छा कुठेतरी खोलवर रुजलेली होती आणि ती इच्छा माऊलींच्या पर्यंत पोहोचली. काल बुधवारी माऊलींनी वारीमध्ये झालेल्या मजा मित्रांना कराडला पाठवून दिले. हे माझे मित्र म्हणजे हरिभक्त परायण सचिन पवार आळंदीकर‌‌.. सचिन पवार हे वारकरी दर्पण या मासिकाचे संपादक आहेत. गेल्या काही वर्षांपासून ते आळंदी मधून वारकरी दर्पण या मासिकाचे प्रसिद्ध करतात. माऊली सचिन पवार हे माझ्या पुढारी कराड ऑफिसमध्ये आले,आम्ही गप्पा मारल्या आणि ते सहज बोलून गेले मला शेरे येथे किर्तन सेवेसाठी जायचे आहे. मी कसलाही विचार न करता त्यांच्यासोबत कीर्तनासाठी पोचलो. खूप वर्षानंतर सात ते नऊ या कालावधीत कसलेही फोन न घेता, कुणालाही एंटरटेन न करता दोन तास कीर्तन सोहळ्यामध्ये सहभागी झालो. सचिन पवार यांनी अतिशय सोप्या भाषेत वारकरी म्हणजे काय? भजन म्हणजे काय आणि संतांचे आपल्या आयुष्यातील महत्त्व देवाहून कसे अधिक आहे हे पटवून दिले. खूप दिवसातून कीर्तन ऐकायला मिळाले, कीर्तन अनुभवायला मिळाले. खरंच वारकरी संप्रदाय खूप मोठा आहे. या संप्रदाय विषय किती लिहावे तेवढे कमी आहे. वारकरी संप्रदायाची मला आवड निर्माण झाली माझ्या आजीमुळे. त्या आजीची आठवण हा लेख लिहिताना आल्याशिवाय राहत नाही.


सतीश वसंतराव  मोरे करवडी.

9881191302

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...