फॉलोअर

२२ ऑगस्ट २०२४

मी अनुभवलेला श्रावण आणि ज्ञानेश्वरी पारायण सोहळा


श्रावण महिना आणि या महिन्यातील सण याचा आणि माझा खूप जवळचा संबंध आहे. आजचा श्रावण महिना आणि नव्वदच्या दशकातील श्रावण महिना यात जमीन आसमानचा फरक आहे. श्रावण महिना बदललेला नाही, निसर्ग बदललेलं नाही मात्र माणसं बदलली आहेत. ठीक आहे ...माणसं बदलायला पाहिजेत कारण बदलणे हा निसर्गाचा नियम आहे. माणसं बदलली म्हणून वाईट वाटण्याचं काय कारण नाही मात्र आम्ही अनुभवलेला श्रावण खरंच एक वेगळा होता. 1990 च्या दशकातला आमचा श्रावण, आमचे शालेय जीवन, आमचं कॉलेज जीवन आणि आमचा श्रावण महिन्याकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन खरंच वेगळा होता. मी अनुभवलेला श्रावण आज तुमच्यासाठी.

श्रावण महिन्यात बहुतांश गावामध्ये ज्ञानेश्वरी हरिनाम सप्ताह साजरा केला जातो. श्रावण महिना हा पवित्र महिना. या महिन्यात सोमवार, मंगळवार, शनिवार हे तीन उपवास तर प्रत्येक घराघरा मध्ये केले जात होते. काही घरांमध्ये गुरुवार पण केला जात असे. मात्र सोमवार हा आमचा आवडता वार. कारण करवडीपासून जवळच सदाशिवगड आम्ही आमच्यासाठी श्रद्धास्थान  होते . याचबरोबर सदाशिवगडाच्या पायथ्याशी असणारे जानाई मंदिर सुद्धा आमच्यासाठी श्रद्धास्थान होते. करवडी, वाघेरी विरवडे, पार्ले, बनवडी, टेंभू, गोवारे, सुरली, कामथी, सदाशिव गडाच्या सर्व माच्या या सर्व गावासाठी सदाशिवगड म्हणजे श्रद्धेचे स्थान. होते,आजही आहे. प्रत्येक श्रावणी सोमवारी सदाशिव गडावर जाऊन तेथील निसर्गाच्या सानिध्यात सोमवार आनंद लुटणे हे आमच्यासाठी पर्वणी होती. त्याकाळी या परिसरातील प्रत्येक शाळेची सहल श्रावण महिन्यात सदाशिव गडावर जात असे. सदाशिवगडावर जायचे, तिथून पुढे कच्च्या रस्त्याने खाली उतरून जानाई देवीच्या मंदिरात जायचे, असा आमचा दिनक्रम असे. श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी सदाशिव गडावर जाण्यामध्ये जी मजा होती ती आज नाही. पण आम्ही लुटलेला श्रावण महिन्यातील आनंद हा खरंच वेगळा आनंद होता. 

आमच्या परिसरातील सर्व भाविकांचे श्रद्धास्थान म्हणजे जानाई देवी मंदिर. सुरलीच्या घाटात अलीकडे रस्त्याकडेला जानाई देवीचे मंदिर आहे. या मंदिरात श्रावण महिन्यातील तिसऱ्या मंगळवारी मोठी यात्रा भरते. या मंदिरात परिसरातील अनेक भाविक महिला येतात. जानुबाईच्या दारात जाऊन पाय ठेवल्यावर, डोकं ठेवल्यानंतर सगळ्या अडचणी दूर होतात, पूर्ण वर्षभराचा थकवा निघून जातो, जानुबाईची कृपा असेल तर सर्व काही शक्य असतं, अशी भोळी भोळी भावना या भावात भागातील महिलांची असते, आजही आहे. श्रावण महिन्यातील सोमवार आणि मंगळवार आमच्यासाठी आनंदाचे दिवस होते कारण या दिवशी शाळेला अर्धा दिवस सुट्टी असायची.धार्मिक स्थान किंवा परंपरा साठी सुट्टी देणे हे आजच्या नियमात बसत नाही. आणि हो मला आणखीन एक आठवते प्रत्येक शनिवारी आमच्या टिळक हायस्कूलमध्ये बजरंग बलीची उपासना केली जायची. मारुतीचा फोटो लावून  शनिवारी उपासना करून नारळ फोडत असू.आमच्या सोबत नारळ फोडणारे प्रसाद वाटणारे मुस्लिम सहित सर्व जाती धर्माचे विद्यार्थी होते. आज विनायक गरुड म्हणून  नावाजलेले वेदशास्त्र पंडित आहेत तो त्यावेळी आमचा गुरु. विनायकच्या पाठीमागे आम्ही वर्गात मारुती स्तोत्र म्हणत आणि वर्गातील प्रत्येकाच्या स्तोत्र पाठ झाले होते .

श्रावण महिन्यात करवडी गावामध्ये ज्ञानेश्वरी सप्ताह पारायण आयोजित केले जायचे. या पाराणात आमच्या गावातील शंभरहून अधिक भाविक, वारकरी ज्ञानेश्वरी पारायण वाचायला बसत असत. गावातील मुख्य चौकात असणारे हनुमान मंदिर, या मंदिरात हे पारायण होत असे. पहाटे काकड आरती, सकाळी सात ते बारा वाचन, त्यानंतर दुपारचे जेवण, पाच ते सहा प्रवचन, रात्री नऊ ते 11 कीर्तन असा अखंड हरिनाम सप्ताह असायचा. या पारायणामध्ये अखंड विणा धरण्याची पद्धत होती. हा विणा 24 तास खाली ठेवला जात नसे. दोन दोन तासाला विण्याचा विणेकरी बदलले जात असे. विणेकरी कोण असावा याचं नियोजन केले जात असे. पारायणासाठी गावातील श्रद्धाळू भाविक बसायचे. ज्याच्याकडे ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे त्याला काय अडचण नसे. मात्र ज्याच्याकडे ग्रंथ नसेल त्यासाठी तो ग्रंथ उपलब्ध करून दिला जात असे. मी स्वतः करवडी गावामध्ये चार पारायण केलेली आहेत. मला चांगलं आठवतं सकाळी उठून लवकर आंघोळ करून ज्ञानेश्वरी ग्रंथ घेऊन जात. सात वाजता तिथे पोहोचल्यानंतर सोहळा प्रमुख आमच्या गावचे प्रसिद्ध कीर्तनकार ज्योतीराम महाराज करवडीकर हे आम्हाला सुरुवातीलाच भगवद्गगीते मधील एक श्लोक म्हणून दाखवत. सात ते बारा वाचन व्हायचे. एका सुरात एका वेगात आम्ही सर्वजण ग्रंथ वाचन करत असू. ज्ञानेश्वर पारायण सोहळा संपल्यानंतर दुपारी एका ठिकाणी तर सायंकाळी एका ठिकाणी जेवणाची पंगत असे. पारायणामध्ये बसलेल्या सर्व स्त्री पुरुष यांना या पंक्तीला जेवणाचे खास निमंत्रण असे. पंगतीमध्ये त्यांना पहिल्या मान असतो. अनेक वर्षे या ज्ञानेश्वर पारायणामध्ये सकाळ आणि संध्याकाळचे जेवण असे. कुणी जेवण द्यायचे याचे नियोजन केले जात असे किंवा ही यादी ठरलेली असे. 

मला सुरुवातीपासून या पारायणामधील एक गोष्ट आवडत असे ती म्हणजे प्रवचन. न चुकता या प्रवचनासाठी मी जात असे. कीर्तन रात्री नऊ ते अकरा असायचे. मात्र सकाळी लवकर शाळा असल्यामुळे मला ते शक्य होत नसे किंवा मला त्या काळात कीर्तन आवडत नव्हते. प्रवचनांमधून एक वेगवेगळे मुद्दे मिळत असत. प्रवचन सुरू होण्यापूर्वी 'श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम' हा जप दहा मिनिट जपला जात असे. त्यानंतर ज्ञानेश्वरी ग्रंथ समोर ठेवून एका प्रवचन केले जात असे. प्रवचनकार  वेगळे आणि कीर्तनकार वेगळे असायचे. हे प्रवचन संपल्यानंतर सायंकाळी ज्याच्या घरी पंगत आहे त्या ठिकाणी जावे असू. काल्याचे किर्तन हे अतिशय महत्त्वाचा दिवस  या दिवशी मात्र मी नक्की कीर्तन ऐकायला जात असे. या दिवशी संपूर्ण दिवसभर जन्माष्टमीचा उपवास असे. रात्री बारा वाजता जन्म सोहळ्यात  सुंठवडा खायला मिळत असे.आमच्या गावाचे चिंचकर उर्फ तेली मामा नावाचे एक मोठे वारकरी होते. धोतर पायजमा सोबत काठी आणि घोंगडं, जबरदस्त मिशा असं त्यांचं रुबाबदार नेतृत्व होतं. ते या सोहळ्याचे सूत्रधार म्हणा किंवा संयोजक म्हणा किंवा कंट्रोलर म्हणा. तेली मामांचा आमच्या गावात फार मोठा दरारा होता. पारायणासाठी आलेल्या सर्वांना योग्य ठिकाणी बसायला जागा देणे, कुणालाही उठू न देणे, कीर्तन सुरू असताना कोणता अडथळा येऊन देणे ही जबाबदारी त्यांच्याकडे असायची. त्याकाळी किर्तन ऐकायला फार मोठी गर्दी होत असे. पंचक्रोशीतील लोक कीर्तन ऐकण्यासाठी गावात यायचे.गोपाळ काल्याच्या दिवशी आम्ही दहीहंडी फोडायला जात असे .गोपाळकाला दिवशी आमच्या गावातील पारायणाची समाप्ती होत. ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहातील ते आठ दिवस म्हणजे आमच्या आयुष्यातील सुखद दिवस असायचे. 

प्रत्येक वर्षी पारायणाला बसायला मिळेल किंवा यामध्ये सहभाग व्हायला मिळेल अशी परिस्थिती नसायची‌ मात्र श्रावणातील काही व्रत्तवैकल्ये , परंपरा आम्ही नक्की करत असू.  शिखर शिंगणापूर हा आमचा कुलस्वामी. प्रत्येक सोमवारी आम्ही सकाळी न बोलता पाणी घालायला गावातील महादेवाच्या मंदिरात जात होतो. कोण लवकर उठते, कोण लवकर मंदिरात पोहोचते अशी आमच्या भावंडांमध्ये, मित्रपरिवारामध्ये स्पर्धा असायची. गावापासून अंतरावर इंजाळे नावाच्या परिसरात महालिंगेश्वर मंदिर नुकतेच उदयाला येऊ लागले होते. या ठिकाणी पायी सहल काढण्याची एक वेगळी परंपरा होती. संध्याकाळच्या वेळी आम्ही या मंदिरात जात असो. पुढील काळात कराड तालुका वारकरी संघाच्या पुढाकाराने बंडातात्या कराडकर यांच्या नेतृत्वाखाली कराड शहरात दोन तीन मोठी पारायणे झाली. हा वारकरी संप्रदायाचा कराड तालुक्यातील उदय होता. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन सोहळ्यानिमित्त कराडात फार मोठा सोहळा झालेला होता. यात आम्ही सहभागी झालो होतो. आमच्या करवडी गावासहित कोपर्डे कार्वे, काले, शेरे, दुशेरे, कोडोली या गावातील वारकरी संप्रदायातील लोक पारायणात त्या संख्येने सहभागी झाले होते.कृष्णा घाटावर झालेला हा भव्यदिव्य पारायण सोहळा माझ्या अजूनही चांगल्या स्मरणामध्ये आहे. सकाळी उठून उठून आम्ही लवकर तयार होऊन सायकलवरून कराडला पोहचत. कृष्णा नदीच्या प्रीतिसंगगावर झालेला हा पारायण सोहळा अतिशय भव्य दिव्य झालेला होता. या सोहळ्यात राज्यभरातील नामवंत कीर्तनकार सर्वजनकार यांचा ज्ञानयज्ञ अजूनही स्मरणात आहे. दहा हजार लोकांची पंगत एका वेळेला बसण्याची व्यवस्था नदीच्या वाळवंटात झालेला हरिनामाचा गजर आजही कानात दुमदुमत आहे आहे. या पारायण सोहळ्या विषयी सविस्तर माहिती घेऊन मी लवकरच लिहिणार आहे.

आता श्रावण महिन्यात आमच्या गावातील पारायण सुरू झाले आहे .या सोहळ्यात सहभागी होणं मला शक्य नाही. मात्र परवा गावात जाण्याचा योग आला उद्यापासून पारायण सुरु होणार होते. मग हनुमान मंदिरात जाऊन बसलो. मंदिरात पोहोचल्यानंतर जोरदार पाऊस सुरू झाला. सुमारे अर्धा तास या मंदिरात मी बसून होतो. माझ्यासोबत माझा गावातील जुना मित्र राहुल पाटील आणि आमचा शेजारी संजय पिसाळ हे दोघे होते. गावातील सर्व मंदिरात जाऊन आलो हनुमान मंदिरात आल्यावर चर्चा सुरू होती. आम्ही जुन्या आठवणीला उजाळा दिला. पारायणामध्ये ज्ञानेश्वरी वाचन करत असताना चार तास ते पाच तास बसावे लागत असे. या वेळेला पाठ खूप दुखत असे. ज्याला मंदिरातील खांबाशेजारी बसायला मिळत असेल त्याला खांबाला टिकून बसणं शक्य होतं.  त्या खांबाला टेकून मी परवा बसलो, खूप आनंद झाला. ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. असं वाटलं या ज्ञानेश्वरी पारायण मध्ये आपण सहभागी व्हावं, कीर्तन ऐकावं मात्र मला शक्य झालं नाही.

 पण मनातील ही इच्छा कुठेतरी खोलवर रुजलेली होती आणि ती इच्छा माऊलींच्या पर्यंत पोहोचली. काल बुधवारी माऊलींनी वारीमध्ये झालेल्या मजा मित्रांना कराडला पाठवून दिले. हे माझे मित्र म्हणजे हरिभक्त परायण सचिन पवार आळंदीकर‌‌.. सचिन पवार हे वारकरी दर्पण या मासिकाचे संपादक आहेत. गेल्या काही वर्षांपासून ते आळंदी मधून वारकरी दर्पण या मासिकाचे प्रसिद्ध करतात. माऊली सचिन पवार हे माझ्या पुढारी कराड ऑफिसमध्ये आले,आम्ही गप्पा मारल्या आणि ते सहज बोलून गेले मला शेरे येथे किर्तन सेवेसाठी जायचे आहे. मी कसलाही विचार न करता त्यांच्यासोबत कीर्तनासाठी पोचलो. खूप वर्षानंतर सात ते नऊ या कालावधीत कसलेही फोन न घेता, कुणालाही एंटरटेन न करता दोन तास कीर्तन सोहळ्यामध्ये सहभागी झालो. सचिन पवार यांनी अतिशय सोप्या भाषेत वारकरी म्हणजे काय? भजन म्हणजे काय आणि संतांचे आपल्या आयुष्यातील महत्त्व देवाहून कसे अधिक आहे हे पटवून दिले. खूप दिवसातून कीर्तन ऐकायला मिळाले, कीर्तन अनुभवायला मिळाले. खरंच वारकरी संप्रदाय खूप मोठा आहे. या संप्रदाय विषय किती लिहावे तेवढे कमी आहे. वारकरी संप्रदायाची मला आवड निर्माण झाली माझ्या आजीमुळे. त्या आजीची आठवण हा लेख लिहिताना आल्याशिवाय राहत नाही.


सतीश वसंतराव  मोरे करवडी.

9881191302

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...