फॉलोअर

०८ ऑक्टोबर २०२३

कृतज्ञतापूर्वक धन्यवाद


कृतज्ञतापूर्वक धन्यवाद !* 

पितृऋणातून मुक्त होणे कधी शक्य नाही. मातृऋण तर त्याहून अधिक असते. तरीही आई-वडिलांसाठी जेवढे काही करता येणं शक्य आहे ते करायचं असतं.आईबरोबरच माझ्यावर संस्कार करून शिस्त आणि स्वावलंबनाचा धडा देत मला उभं करणारे माझे वडील,माझी शाळा, माझे विद्यापीठ, जीवनविद्येचे महा 'तारे' वसंतराव सखाराम मोरे यांच्या '९१' व्या वाढदिवसानिमित्त आयोजित सोहळा काल संपन्न झाला.

तळेगाव दाभाडे होऊन आलेले खास पाहुणे 'थंडा मामला' हॉटेल समूहाचे अविनाश गीते आणि पुण्याचे शैलेश जोशी वडेवाले यांनी उपस्थितांना व्यवसाय उभारणीत आलेल्या रोमांचक आठवणी सांगून उद्योग व्यवसाय वृद्धिसाठी काय आणि कसे करावे याबाबत मार्गदर्शन केले. मी या दोघांचाही खूप आभारी आहे.

गेल्या दहा वर्षापासून मी या कार्यक्रमाचे मी स्वप्न पाहत होतो. ते काल सत्यात उतरले. माझ्या विनंतीला मान देऊन कराड, कोरेगाव,पाटण,खटाव,सातारा, इस्लामपूर तालुक्यातील माझा मित्र परिवार,पै पाहुणे,अमिताभ बच्चन प्रेमी समुह, लायन्स क्लब परिवार,जीवनविद्या मिशनचे पदाधिकारी आणि नामधारक, कराड शहरातील सर्व क्षेत्रातील मान्यवर,पत्रकार, शासकीय अधिकारी, करवडी आणि परिसरातील ग्रामस्थ या कार्यक्रमास उपस्थित राहिले. दादांना शुभेच्छा दिल्या. *तुमच्या उपस्थितीमुळे दादांना नवे बळ मिळाले,मी आपला कायम ऋणी राहील* 

@सतीश वसंतराव मोरे आणि कुटुंबीय.

०८.१०.२०२३

०१ ऑक्टोबर २०२३

पहिलं अमिताभ दर्शन

आठवण पहिल्या अमिताभ दर्शनाची 
आणि 'मन का हो तो अच्छा' या संवादाची!

१९९८ साली सन्माननीय राज ठाकरे यांच्या शिवउद्योग सेनेच्या वतीने अमिताभ बच्चन यांचा पुणे येथील गणेश कला क्रीडा मंदिर येथे एक कार्यक्रम आयोजित केला असल्याची बातमी पेपरमध्ये माझ्या वाचण्यात आली. या कार्यक्रमाला जायचंच असा निश्चय करून माझे मित्र आणि आमच्या यादव- मोरे क्लासेसचे माझे सहकारी अजित यादव यांना गाडीवर बसवलं आणि माझ्या , पहिल्या कमाईवर मी स्वतः विकत घेतलेल्या नव्या बॉक्सर सिटी हंड्रेड MH११ N २७२९ वरून आम्ही पुणे गाठले. 

तो दिवस होता ११ नोव्हेंबर १९९८. सायंकाळी सहाच्या दरम्यान कार्यक्रम होता. तिथं माझा बालमित्र हणमंत काशिद अगोदरच पोहचला होता.आम्ही तिथे पोहोचेपर्यंत सर्व हॉल गच्च भरून वाहत होता. बाहेरही खूप गर्दी झाली होती. आत जायला जागाच उरली नव्हती. साडेपाच सहाच्या दरम्यान आमचे लाडके अमिताभ बच्चन आलिशान गाडीतून  उतरले आणि थेट हॉलमध्ये गेले. मी त्यांना  पाठमोरे पाहू शकलो. त्यांची ती पाठमोरी छबी आजही माझ्या नजरेत साठवली आहे. 

कार्यक्रम सुरू झाला. अमिताभ बच्चन यांनी 'मै ओर मेरी तनहाई' सादर केली. तसेच आयुष्यात घडलेले काही प्रसंग सांगताना सदैव पुढे चालत रहा असा संदेश देऊन उपस्थित युवकांना उर्जा दिली. बाहेर उभा राहून स्पिकरवरुन आम्ही कार्यक्रम ऐकला. त्या दिवशी पुण्यात मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी या कार्यक्रमाची बातमी पेपरमध्ये येणारच याची खात्री होती. त्यामुळे स्वारगेट स्टँडवर जाऊन पुढारी घेतला,तो अंक आजही माझ्या संग्रही आहे. पुढारीमध्ये अमिताभ बच्चन यांचे भाषण आले होते, जे मी ऐकले होते . काय होते त्या भाषणात? 

"मन का हो तो अच्छा, नहीं हो तो और भी अच्छा" अमिताभ बच्चन यांनी  त्यांचे वडिल हरिवंशराय बच्चन अमिताभजी तोंडून ऐकलेला हा दिव्य विचार मला खूप भावला. ''जर एखादी गोष्ट आपल्या मनासारखी झाली तर ते खरंच चांगलं असतं पण दुर्दैवानं आपल्या मनासारखे झालं नाही तर ते त्याहुन अधिक चांगलं असतं. कारण जे आपल्या मनासारखं होत नाही, ते ईश्वराच्या मनासारखं असतं आणि ईश्वर कधीही कुणाचं वाईट करुच शकत नाही" 

बच्चन यांच्या वडिलांचा हा दिव्य विचार खुद्द बच्चन यांच्या तोंडून मी ऐकलेला आहे. हा विचार माझ्या मनावर त्या दिवसापासूनच इतका भिनला आहे की कधीही मला कोणत्याही अडचणी आल्या, कार्यालयीन, सामाजिक, वैयक्तिक असो किंवा कौटुंबिक असो मी हे वाक्य डोळ्यासमोर घेतो आणि मला प्रश्नांची उत्तरे मिळतात. 

१९९८ साली पाठमोरा पाहिलेला तो अमिताभ बच्चन माझ्या आजही आठवणीत आहे मात्र त्या कार्यक्रमात दिलेल्या तो संदेश माझ्या मनावर खूप बिंबलेला आहे.

सतीश वसंतराव मोरे
९८८११९१३०२
मी अमिताभ बच्चन प्रेमी.
११.१०.२०२०

अज्ञात शेठ


सलाम अज्ञात शेठ यांच्या दातृत्वाला !

*"स्वतः साठी कधी कुणाच्या दारात हात पसरायला जाऊ नका. समाजातील दीन दुबळे आणि गरीबांसाठी, अनाथांसाठी, होतकरू लोकांसाठी कुणाच्याही दारात कधीही जा. दुसऱ्यांसाठी मागायला गेला तर देणारा पण विचार करतो, हा समाजासाठी मागायला आला आहे आणि तुम्हाला भरभरून मिळतं "* असं माझ्या मुलीला मी हे नेहमी सांगत असतो.‌ याच निसर्गाच्या नियमानुसार मी चालायचा प्रयत्न करतो आणि मला नेहमी मदतीला अनेक हात धावून येतात. याचा प्रत्यय आज पुन्हा एकदा आला.

आज आपल्या ३६५ मानवतेचे सेवेकरी या समुहावर एक मेसेज पडला. जिजाऊ अनाथ आश्रमाचे समीर नदाफ यांनी हा मेसेज टाकला. आश्रमातील ३५ मुलांचे कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीनची गरज आहे असा आशयाचा हा मेसेज होता. आमच्या ग्रुप वरील सर्व सेवेकरी मंडळींनी याबाबत काय करावे असा विचार सुरू केला. मी पण याबाबत विचार केला की कुणाला वॉशिंग मशीन मागू शकतो. सहज कराडातील अज्ञात शेठना फोन केला आणि त्यांना ही अडचण सांगितली . 

अज्ञात शेठ यांच्या दुकानात सर्व कंपन्यांचे वॉशिंग मशीन आहेत .एखाद्या कंपनीकडून सामाजिक उतराई निधीतून अशा प्रकारे वॉशिंग मशीन देता येईल का? असे मी त्यांना विचारले.यावर त्यांनी एक मिनिटात कसलाही विचार न करता कंपनीकडून काय देता येईल मला माहित नाही पण मी माझ्या वतीने ही वॉशिंग मशीन देऊ इच्छितो असे सांगितले. 

जगात असे लोक आहेत यावर विश्वास बसत नाही पण जगात अज्ञात शेठ यांच्या सारखे चांगले लोक खुप आहेत, हे पटलं. एक दोन दिवसात आम्ही दोघे स्वतः जाऊन जिजाऊ अनाथ आश्रमाला वाॅशिंग मशीन देणार आहोत. 

 *महत्त्वाचे.* .. वाशिंग मशिन दिल्याबद्दल माझे कुठेही नाव घेऊ  नका, अशी विनंती त्यांनी मला केली. अचंबित होऊन मी त्यांना कारण विचारले असता ते म्हणाले, *मी जे दिलं आहे ते मला आणि माझ्या देवाला माहीत आहे,काय गरज आहे जगाला हे सगळं सांगायची ?*

मी निशब्द झालो. डोळ्यात आनंदाश्रू तरळले आणि सहज एक वाक्य बाहेर पडलं, 'देवा, परमेश्वरा,अल्लाह या अज्ञात शेठचं भलं कर, कल्याण कर ! '

*@ सतीश मोरे सतिताभ*
 9881191302

०७ ऑगस्ट २०२३

डोक्यावर कितीही ओझं असू दे मित्र किंवा मैत्रीण भेटली पाहीजे




डोक्यावर कितीही ओझं असू दे, 
फक्त मित्र किंवा मैत्रीण भेटली पाहीजे. 
सारं ओझं हलकं होतं. 
समस्या पुर्ण कधीच संपत नाहीत 
पण मित्र भेटला की मार्ग मात्र नक्की निघतो.

तुमच्यापैकी अनेकांना हा अनुभव आला असेल. मी तर अनेकदा या अनुभवातून जातो. सोबत दिलेला फोटो पहा दोघी मैत्रिणी भेटल्या आहेत, दोघींच्याही डोक्यावर ओझं आहे मात्र यांच्या काय गप्पा रंगल्या आहेत. ओझं असुनही गप्पा काही संपत नाहीत. कारण मैत्रीण भेटल्यानंतर आपल्या डोक्यावर असलेले वजन ओझं वाटतच नाही.

परवा माझा शिकवणीमधला मित्र भगवान भेटला होता. दोघांनी करवडीजवळ मावळा धाबा येथे जेवण केलं, खूप गप्पा मारल्या. दरम्यान दुसरा एक मित्र श्रीधरला फोन लावला, स्पीकर लावून जवळजवळ आम्ही दिड तास बोललो .दोघे समोरासमोर होतो तर तिसरा सातारा मध्ये होता. मात्र ज्या गप्पा झाल्या त्यातून आनंद तर मिळालाच, उर्जाही मिळाली.

आम्ही तिघांनी आता पन्नासी गाठली आहे, तिघांचं कामाचं स्वरूप क्षेत्र वेगवेगळे आहे. तिघांच्या अडचणी आणि समस्याही वेगवेगळ्या आहेत. माझ्या व्यवसायातील समस्या ते सोडवू शकत नाहीत, त्यांच्या मी सोडवू शकत नाही. मात्र आम्ही भेटल्यानंतर या समस्यावर, मुला मुलींच्या शिक्षणावर चर्चा करतो आणि काहीतरी मार्ग काढायचा प्रयत्न करतो. 

मित्रासोबत बोलल्यानंतर आनंद मिळतो, मन मोकळं होतं. मित्र असतातच रिलीज होण्यासाठी ! ज्याला चांगले मित्र आहेत तो कधीही डिप्रेशन मध्ये जाऊ शकत नाही, वाईट काम करू शकत नाही, संकटाला खचून जाऊन आत्महत्या करू शकत नाही. किंबहुना तशी वेळ येऊ नये म्हणून सतत मित्रांच्या सोबत राहत जा. मित्र भेटले की त्याच्याजवळ रिलीज व्हा. जे चाललंय ते सांगा, जे हवं आहे ते सांगा. काय मार्ग निघतोय का बघा. मित्र नक्की मार्ग काढतात. आपल्या डोक्यावरचे ओझं हलकं झालं की खूप बरं वाटतं. आणि हो फक्त अडचणी आणि कामाचीच चर्चा करू नका. जरा आठवणीच्या हिंदोळ्यावर जा. शाळा कॉलेजमधल्या एखाद्या मित्रमैत्रिणीचा विषय काढा, लहानपणी केलेल्या खोड्यांना उजाळा द्या, शाळा बुडवून केलेल्या करामतीचा विषय काढा. बालपणीचा काळ अजूनही आपल्यासाठी प्रेरणादायी आहे,असतो. मित्र सोबत असला की सारं काही मिळवता येतो, गेलेलं सुद्धा पुन्हा मिळवता येते. 

आज मैत्री दिनाच्या निमित्ताने मिरज, वडूज, सातारा येथून तिघेजण एकत्र आलो आहे. चौघांनी मिळून घरात स्वयंपाक केला आहे, आता जेवायला बसणार आहे. जेवण झाल्यावर भांडीही चौघेच घासणार आहे. ऐसी खुशी और कहा ! मेरी दोस्ती मेरा प्यार!

जागतिक मैत्री दिनाच्या शुभेच्छा !

सतीश वसंतराव मोरे सतिताभ
०६.०८.२०२३

२६ जुलै २०२३

पाऊस आणि ती दोघं


*मनात असलेलं प्रेम आणि ओठांवर आलेलं हास्य लपवून ठेवता येत नाही. ते व्यक्त केलं नाही तरी ते प्रकट हौतंच. तुम्ही जरी ते दाबून ठेवले तरी ते डोळ्यात उतरतंच.* डोळे कधी खोटं बोलत नाहीत. मग डोळे खुप सांगून जातात. अशा वेळी जर पाऊस आला आणि दोघांमध्ये एकच छत्री असेल तर ! एकाच छत्रीत ती दोघ एकत्र चालतात, पाऊस बरसत राहतो. काय बोलायचं हे ओठांवर येत नाही. चालता चालता मग हळूवार स्पर्श होतो. ती लाजरीबोजरी होतं. तो बावरा होतो. प्रेमाची भावनाच खूप काही सुखावून जाते. 

काला पत्थर या चित्रपटातील गाण्याचा हा सीन. साहीर लुधीयानवी यांचं गाणंपण तितकेच दमदार. 'इश्क और मिश्क छुप ना पाये' आणि महेंद्र कपूर यांचा पहाडी आवाज.  हे ऐकताना जे सुचलं ते असं....

अबोला संपेना 
अन् पाऊसही थांबेना,
हृदयातील प्रीती ओठावर येईना !
ओल्याचिंब भावनांना,
डोळ्यात साठवताना,
जलधारा बरसत राहील्या ,
जलधारा बरसत राहील्या !

 *सतिताभ* 
२६.०७.२०२३

१८ जून २०२३

आज खुश तो बहोत होंगे तुम ? देवाशी भांडण नव्हे... स्वतःची स्वतः केलेलं बंड अन् संवाद !

आज खुश तो बहोत होंगे तुम ?

देवाशी भांडण नव्हे... 
स्वतःची स्वतः केलेलं बंड अन् संवाद !


आयुष्यात कधीतरी अशी वेळ येते जेव्हा सारं काही संपल्यासारखं वाटतं. कोणीही मदतीला येत नाही किंवा आलं तरी त्यांचे प्रयत्न, मदत तोकडी असते. मनुष्य हतबल होऊन जातो. काय करावं सुचत नाही. सर्व पर्याय संपतात. सर्व वाटा बंद होतात. कुणाकडं जावं हेच कळतं नाही. ज्यांना आपण जवळचं मानलेलं असतं त्यांनीच आपल्याला संकटात आणून आपल्याकडं तोंड फिरवलेलं असतं. अशा वेळी एकच पर्याय उरतो तो म्हणजे देव, देव्हारा, देऊळ !

देव कुठं असतो, तो तर आपल्यातंच असतो. पण तो दिसत नाही. आपल्यात असलेल्या देवाशी भांडायच तर मग आपणच स्वतः आरशासमोर उभे राहून बोलत बसलं पाहिजे किंवा देवळात तरी जायला पाहिजे. आरशासमोर उभे राहून बोलत बसलो तर पाहणारे लोक वेडं म्हणतील. असा विचार करून मग तो देवळात जातो. खरं तर देवळाबाहेर असणाऱ्या काही मनुष्यरूपी देवानींच त्याला फसवलेलं असतं, तोंड फिरवलेलं असतं. मग देवळातील देवाशी तो संवाद साधण्यासाठी, आपलं मन मोकळं करण्यासाठी गाभाऱ्यात प्रवेश करतो . खरं तर देवाशी त्याचं भांडण असतं, देवानं कुठे माझं चांगलं केलं आहे असा विचार करून म्हणून तो याअगोदर कधीच तिकडं फिरकलेला नसतो. देवाशिवाय सारं काही शक्य होईल, असा त्यांचा भ्रम झालेला असतो. पण वेळंच अशी येते त्याला देवळात जावं लागतं.

देवळात गेल्यावर इतक्या दिवस त्याच्या मनात साचलेलं सारं काही बाहेर पडतं. सगळं काही चांगलं करूनही देवांनं माझ्याशी असं का केलं? माझ्या भावनांशी खेळ का केला? असं का केलं, असा प्रश्न त्याच्या मनात आल्यामुळे तो देवाशी थेट भांडायला सुरुवात करतो. 

देवाला अरं तुरं करतो, जणू काही देव त्याचा जवळचा खास मित्र आहे, घरगडीच आहे. खरं तर त्या देवाला त्यांनं कधी मानलेलं नसतं. मात्र यावेळी तो लाडाने नव्हे रागाने देवाशी भांडतो आणि सुरुवात होतो देवाशी संवाद, 'आज खुश तो बहुत होगे तुम ?' माझ्या आयुष्यात एवढ्या सगळ्या काही गोष्टी झाल्या तरीही मी तुझ्या मंदिरात आलो नाही, तुझी पायरी चढलो नाही. पण आज तू तशी वेळ आणलीस. मला तुझ्या मंदिरात यावं लागलं. तुला बरं वाटत असेल ना ? तुला उकळ्या फुटत असतील ना? कसं झुकवलं याला!कसा नांगा जिरवला यांचा, कशी खोडी मोडली यांची ! अशा द्वेषपूर्ण शब्दांत तो भांडायला सुरुवात करतो.

देवाशी एकेरी बोलण्यात त्याला काही वाटत नाही. अनेक संतांनी देवाशी अशाच प्रकारे एकेरी भाषेत संवाद साधला आहे. देव ही गोष्ट अशी आहे जी आपल्यातंच असते, त्यामुळे तो आपल्या जवळचाच असतो. त्यामुळे त्याच्याशी आपण आपल्या जवळची व्यक्ती म्हणून,आपला धाकटा भाऊ, आपला मित्र म्हणून आपला सखा म्हणून भांडू शकतो आणि तोही हेच करतो. आयुष्यात घडलेल्या सगळ्या घटना देवासमोर मांडतो. खरंतर देवाला हे सारं माहीत असतं. मात्र तरीही तो रागाने, मोठ्या आवाजात देवाला सगळं सांगत राहतो, सांगत राहतो, सांगत राहतो! हे देवाशी भांडण नव्हे स्वतःची स्वतः केलेलं बंड अन् एक संवाद आहे !

'दीवार' चित्रपटातील हा प्रसंग आपल्या सर्वांच्या आयुष्यात कधी ना कधी आला असेल, येत राहील. असा प्रसंग आल्यानंतर आपण स्वतःची भांडतो म्हणजेच देवाची भांडतो. आपण केलेल्या चुका आपल्याला कळू लागतात. आपल्या जवळच्या लोकांनी आपल्याला फसवलेलं आपल्याला उमगायला लागतं. आपण हे असं करायला पाहिजे होतं, तसं नको करायला पाहिजे होतं, याचीही आपणाला जाणीव होती. स्वतःने, स्वतःशी, स्वइच्छेने देवासमोर साधलेला संवाद 'दीवार' चित्रपटामध्ये दाखवलेला आहे. तो संवाद होण्याची गरज आहे. 

खरंच स्वतःशी बोलल्यानंतर अनेक प्रश्नांना उत्तर मिळतात. आपलं अंतर्मन हाच आपल्यात वसलेला देव असतो. तो कधीही आपल्याला वाईट करू देत नाही. तो देव आपल्याला चांगल्या वाटा दाखवत असतो. फक्त आपल्याला त्या देवाशी, अंतर्मनाशी संवाद साधायला हवा. देवळात जाऊन जाऊन देवाची भांडण करणं, त्याला आपल्या तक्रारी सांगणे, त्याला नवस करून लाच देणे कधीही चांगलं, मात्र कधीतरी आपण आपल्या स्वतःची भांडलो तरीसुद्धा आपल्याला आपल्या अनेक प्रश्नांची उत्तर मिळू शकतात.. उत्तर मिळू शकतात.. !

जय बच्चन..जय बच्चन !

#Deewar  
#amitabhbachchanpremi 

Amitabh Bachchan 
Amitabh Bachchan Fans Club India 
AMITABH BACHCHAN FAN$ CLUB 
Bachchanvede Kolhapuri 
Amitabh Bachchan = The Great

३० मे २०२३

नाती आणि नोटा


नोटा असत्या तर बदलल्या असत्या ,
इथं नातीच बदलली आहेत !
मग आम्ही काय बदलायचं ?
स्वतःला सावरायचं की आपणही बदलायचं ?
नोटा बदलणं इथं सोपं असतं,
पण नातीच बदलायला लागली तर ?

नोटांना 'मर्यादा' असते,
नात्यांमध्ये 'अमर्याद' प्रेम असते,
नात्यांना 'किंमत' असते,
तर नोटांना 'भाव' असतो..
नोटा बदलणं इथं सोपं असतं,
पण नातीच बदलायला लागली तर ?

नात्यांच्या याचिकेत अनेकदा नोटा जिंकतात.. 
गुळगुळीत नाण्याप्रमाणे नातीही बदलतात ,
नात्यांतील गोडव्यापुढं नोटा भारी पडतात..  
नोटा बदलणं इथं सोपं असतं,
पण नातीच बदलायला लागली तर ?

सतिताभ
३०.०५.२०२३. सुप्रभात 🌹

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...