निसर्गवारी*
संकल्प २२१ वृक्ष लागवडीचा!
८ जुलै २०२१
राम कृष्ण हरी माऊली
आमच्या निसर्ग वारीने कराड तालुक्यातील कराड उत्तरचा भाग गेल्या सात दिवसात पूर्ण केला आहे किंवा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे.आजपासून आमची वारी पुढील बारा दिवस कराड दक्षिणच्या कोयना कृष्णा नदीकाठावर असलेल्या गावामध्ये असणार आहे .
आज आमची निसर्गवारी होती कराडजवळच्या वारुंजी गावात. सकाळी सव्वा सहा वाजता आम्ही वारुंजी फाट्यावर पोहोचलो. गेली दोन दिवस आजारी असल्यामुळे येऊ न शकलेले आमचे वारकरी रणजीत पाटील आज स्वतः गाडी घेऊन वारुंजी फाट्यावर आले होते. या ठिकाणी असलेल्या श्री गणेश मंदिरासमोर आम्ही एकत्र आलो. गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष करून अतिशय सुंदर मंदिर परिसरातर काही काळ विसावलो. या परिसरातील नागरिकांनी गणेश मंदिर परिसर अतिशय चांगल्याप्रकारे विकसित केला आहे. या मंदिरात गणेश चतुर्थीला फार गर्दी असते. दिवसभर भाविक याठिकाणी येतात. मंदिरातील पूजा विधी सर्व अतिशय चांगल्या पद्धतीने केल्या जातात. थकलेल्या, दमलेल्या पादचरींना विसावा मिळावा यासाठी येथे बेंचेस ठेवलेले आहेत.गणपतीला नमन करून आम्ही वारुंजी गावात निघालो.
आजचा वारी प्रवास नेहमीप्रमाणे निसर्गरम्य परिसरात होता. अंतर थोडे होते मात्र नेहमीप्रमाणे ठरल्याप्रमाणे सहा किलोमीटर वारी झाली पाहिजे असा विचार करून आम्ही गावाकडे निघालो. जरा पुढे आल्यानंतर ग्रामपंचायत ऑफिस समोरून जुने वारुंजी गावाकडे वळालो. वारुंजी गावात ऊस शेती मोठ्या प्रमाणात आहे. वारुंजी हे बागायतदार गाव आहे. या गावात अनेक प्रगतशील शेतकरी आहेत. या शेतकऱ्यांनी राबवलेले प्रयोग पाहण्यासाठी बाहेरगावचे अनेक लोक येतात. वारुंजी, केसे,पाडळी,गोटे हा भाग हे भैरवनाथ पाणी पुरवठा संस्थेच्या माध्यमातून सुजलाम सुफलाम झाला आहे. हरिपाठ सुरू केला. आज माऊलींची वारी असती तर आज आम्ही जेजुरी मध्ये पोहचलो असतो.सासवड ते जेजुरी असा प्रवास केला असता, या पायी दिंडीमध्ये आणि दुपारी विसावा कुठे केला असता? काय केले असते? या आठवणी जाग्या झाल्या.
आम्ही जुने वारुंजी गावाजवळ पोहचलो,रस्त्याला वेताळेश्वर हे वारुंजीचे ग्रामदैवत मंदिर पाहिले. येथून पुढे आल्यानंतर वारुंजीच्या वरूणेश्वर मंदिरा समोर थांबलो, या मंदिरा शेजारी १८४२ साली बांधलेला एक दगडी पार आहे, पारा वरील शिलालेखात तसा उल्लेख आहे.या पारावर फार जुने उंच पिंपळाचे झाड आहे. हा पार जर १८४२ सालचा असेल तर हा पिंपळाचा वृक्षही त्या दरम्यानच लावलेला असावा. इतका जुना पिंपळाचा वृक्ष पाहून आम्ही नतमस्तक झालो. हे पिंपळाचे झाड काही महिन्यापूर्वी या झाडाखाली लावलेल्या अगरबत्त्यामुळे पेटले होते.आग विजवण्यासाठी ग्रामस्थांनी कराड नगरपालिकेचा अग्निशमन बंब आणला.गेल्या पाच सहा महिन्यात या झाडाने पुन्हा भरारी घेतली आहे.हे झाड मरणार नाही याची ग्रामपंचायतीने फार काळजी घेतली आहे.
पिंपळाचा जुना वृक्ष आणि दगडी पार यावरून वारुंजी हे किती जुने गाव आहे, हे लक्षात येते. आपण वारुंजी फाटा आणि नवीन गाव नेहमी पाहतो. मात्र जुन्या वारुंजी गावात कोयना काठावर जाऊन हे जर गाव पाहिले तर या गावाची भव्यता लक्षात येते. 1967 च्या भूकंप,कोयना धरण निर्मिती तसेच वेळोवेळी आलेल्या भीषण पुरानंतर महाराष्ट्र शासनाने हे गाव नदीपासून वरच्या भागात पुनर्वसित करण्याचा निर्णय घेतला. भविष्यात पाणी व्यवस्थापनामध्ये अडचणी येऊ नयेत किंवा नैसर्गिक आपत्ती आली तर नदीकाठच्या गावांना धोका पोहोचू नये म्हणून कोयनाकाठची वारूंजी,सुपनेसह अनेक गावे नदी काठापासून वरच्या बाजूला पुनर्वसित करण्यात आली. लोक जुनी घरे, वाडे जशीच्या तशी सोडून नवीन भागात राहायला आले. जुन्या गावात आम्ही आज जेव्हा गेलो तेव्हा गावाच्या अनेक स्मृती पाहायला मिळाल्या. अजूनही सुस्थितीत असणारे दोन तीन भव्य वाडे पाहिल्यानंतर या गावाची सुबत्ता लक्षात आली. कोयना नदी काठावरील या गावातील हे भव्यदिव्य वाडे पाहिल्यानंतर या गावातील शेतकरी किती सधन होते,याचा अनुमान आला.खरं तर या जुन्या वाड्याची डागडुजी होणे गरजेचे आहे, हे वाडे ज्यांच्या मालकीचे आहेत त्यांच्या वारसदारांनी आपल्या जुन्या पिढीचा वाडारूपी आठवणी जपून ठेवल्या पाहिजेत,असे मला वाटले. जुन्या गावात राहायला शासनाकडून परवानगी नसल्यामुळे सारे ग्रामस्थ, या वाड्याचे मालक नवीन गावात स्थायिक झालेले आहेत.
गावाला फेरफटका मारला, रस्त्यात आणि शेतकरी भेटले ग्रामीण जीवन पाहायला मिळाले. गुराळाचे एक मोठं धुराडं दिसलं. या गावात पूर्वी अनेक गुराळं होती, काळाच्या ओघात ती बंद झाली. पुढे चालत आम्ही केंद्रीय जल आयोगाच्या इमारतीजवळ पोहचलो.कोयना आणि कृष्णा नदीच्या पाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि त्याचा पाणी उंचीचा नोंदी करण्यासाठी कराडमध्ये जल आयोगाची दोन कार्यालये आहेत. त्यापैकी एक कार्यालय जुन्या वारुंजी गावात आहे. कोयना धरणातून सोडण्यात येणारे पाणी येथे पोहोचल्यानंतर या पाण्याची उंची किती आहे,पाण्याचा वेग किती आहे, किती क्सुसेक्स पाणी आहे याची माहिती या कार्यालयात संकलित केली जाते. अशाच प्रकारचे जल आयोगाचे दुसरे कार्यालय रुक्मिणीनगर (कराड) मध्ये आहे. याठिकाणी कृष्णा कोयना संगम झाल्यानंतर कृष्णा नदीच्या पाण्याचे उंचीचे व्यवस्थापन केले जाते, याच्या नोंदी ठेवल्या जातात. स्टेशन रोडवरील कृष्णा पुलावरून कृष्णा नदीत वायर रोपला बांधलेली जी बोट दिसते, ती बोट केंद्रीय जल आयोगाच्या मालकीची आहे. वारुंजी येथील केंद्रीय जल आयोगाच्या या इमारतीपासून आम्ही तसेच पुढे चालत आलो. हा रस्ता हायवेला जाऊन मिळतो. हायवे पर्यंत जाऊन पुन्हा आम्ही वारुंजी फाट्यावर गणेश मंदिरापर्यंत पोहोचलो आणि आमचा पायी वारीचा साडे पाच किलोमीटरचा टप्पा पूर्ण झाला. आज आम्ही वारुंजी गावाला प्रदक्षिणा घातली.
साडेसात वाजले होते,आमचे वाहन ताब्यात घेऊन आम्ही थेट वारुंजी स्मशानभूमीमध्ये पोहचलो. याठिकाणी उपसरपंच अनुज पाटील आणि त्यांचे ग्रामपंचायतीचे कर्मचारी आमची वाट पाहत बसले होते. वारुंजीची स्मशानभूमी मोठ्ठी आहे. या स्मशानभूमीमध्ये आम्ही वडाचे एक झाड लावले. जुने वारुंजी उठून नवीन वारुंजी वसले. अनेक वर्षे या नवीन गावाला गावठाण दर्जा मिळाला नव्हता. त्यामुळे अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते .ग्रामस्थांनी शासन दरबारी प्रयत्न केले. नुकताच नवीन गावाला नवीन गावठाण दर्जा मिळाला आहे,असे आम्हाला आमच्या अनुज पाटील यांनी सांगितले. मंदिरा समोर बसून आम्ही नाष्टा घेतला आणि पुन्हा अनुज पाटील यांच्या निवासस्थानी चहा घेतला.
यावेळी आळंदी वारीमधील एक सहकारी हरिभाऊ गरुड भेटले, ते दुचाकीवरून ऊसाचे ओझे घेऊन आले होते. वारकरी वारसा असलेले हरिभाऊ गरुड आम्हाला त्यांच्या घरी घेऊन गेले.त्यांच्या घरात चरण धुवून महिला माऊलींनी आमचे औक्षण केले,स्वागत केले.हे स्वागत हे आमचे नव्हते तर आमच्यातील वारकऱ्याचे होते, माऊलींचे होते, विठ्ठलाचे होते.निसर्गवारी करणाऱ्या आम्हा वारकऱ्यांमध्ये आता विठ्ठल वसलेला आहे. खरंतर चराचरामध्ये विठ्ठल आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये विठ्ठल आहे. सर्वांनी एकमेकाचे पाया पडून दर्शन घेतले. वारकरी संप्रदायमध्ये सर्वजण समान असतात, कोणी लहान असतो कोणी मोठा नसतो. येथे सर्व जण एकमेकांच्या पाया पडतात आणि एकमेकाला माऊली म्हणतात. आज तो आनंदाचा क्षण आणि अनुभवला.
आजची आमची वारी आनंदमय झाहली.
राम कृष्ण हरी
जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल
*सतीश मोरे*




