आज महाशिवरात्री सदाशिव गडावर जाण्याचा योग आला. सदाशिवगडाचे आणि माझे नाते काय आहे हे यापूर्वी मी अनेकदा लिहिले आहे.
आज सदाशिवगडावर महाशिवरात्री असल्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होती. कराड शहर सहित परिसरातील अनेक शिवभक्त सकाळी पासूनच गडावर येत होते. आठच्या सुमारास मी सहकुटुंब गडावर पोहोचलो. गडावर गेल्या काही वर्षात खूप बदल झाले आहेत. डॉक्टर योगेश कुंभारमार यांच्या पुढाकाराने मावळा प्रतिष्ठानच्या माध्यमातून गडावर अनेक सुविधा पोहोचण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.पाईप लाईनने वरती पाणी देण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. गडावर आता हिरवी झाडे दिसू लागले आहेत. थकलेल्या, दमलेल्या,कंटाळलेल्या, दुनियादारीमुळे विटलेल्या लोकांना एक वेगळा आनंद मिळावा म्हणून काही क्षण निवांत बसण्याचे बसण्याचे ठिकाण आता सदाशिवगड बनू लागले आहे.
पूर्वी फक्त सोमवारी गडावर शिवभक्तांची ये-जा असायची. आता रोज गडावर किमान शंभर लोक ये जा करत असतात. काही जण पहाटे लवकर गडावर जातात, साडेसात वाजेपर्यंत घरी पोहोचलेले असतात. यि सदाशिवगडावर दोन वर्षानंतर जाण्याचा मला योग आला.
महादेवाचे दर्शन घेतले , बाहेर आल्यानंतर मावळा प्रतिष्ठानने शिवभक्तांसाठी खिचडी ,केळी आणि दुधाची सोय केली होती. अतिशय आदराने आणि प्रेमाने हे शिवसेवेकरी आलेल्या शिवभक्तांना सेवा देत होते, काय हव आहे आणि काय नक याची अदबीने चौकशी करत होते. काही शिवभक्तांनी गडावर टाकलेल्या पाण्याच्या बाटल्या हे सेवेकरी गोळा करत होते. गड स्वच्छ कसा राहील आणि येणाऱ्या भाविकांची चांगली सोय होईल यासाठी सगळे स्वतःच्या घरातील काम असल्याप्रमाणे हे काम करत होते.
दोन वर्षांपूर्वी महाशिवरात्रीदिनी असाच एक शिवभक्त सेवेकरी मला भेटला होता. तो येणाऱ्या-जाणाऱ्या अनेकांना सांगत होता, भक्तांनो महादेवाच्या पिंडीवर दूध उतू नका हे दूध बाहेर आणून आमच्याकडे द्या ते दूध गरम करून कुणाच्यातरी मुखात जाऊ द्या, अशी विनवणी तो सर्वांना करत होता. खरा शिवभक्त मला दोन वर्षांपूर्वी तिथे भेटला होता. आजही मनोभावे सेवा करणारे मावळा प्रतिष्ठानचे अनेक सेवेकरी पाहिल्यानंतर निष्काम भक्ती काय असते हे मला अनुभवायला आले.
खिचडी दूध आणि केळी याचा आस्वाद घेतल्यानंतर आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. गडावरील पठारावर देवयानीने इकडे तिकडे उड्या मारल्या आणि आम्ही गड उतरायला सुरुवात करतात तिथे असलेल्या भगव्या झेंड्या जवळ आलो. त्यानजीक आम्हाला एक वेगळेच चित्र दिसले. दोन, तीन, पाच वयाची तीन छोटी मुले आणि अंदाजे 20/22 वय असणारी एख साधारण महिला वेफर्स शेंगदाणे लाडू विकत बसली होती. छोट्या पोत्यावर बसून या माउलीने दुकान थाटले होते. या छोट्या दुकानाला सहकार्य करण्यासाठी तिची तीन छोटी मुले मांडी घालून दुकानदाराच्या ऐटीत बसली होती. येणा जाणाऱ्यांना हे घ्या पाच रुपया शेंगदाणे घ्या अशी हाक मारत होती.
ती छोटीशी तीन फुलपाखरे पाहून आमचे लक्ष तिकडे गेले. डोक्यावर इतके सारे साहित्य आणि तीन पाखरांना घेऊन ही माऊली तिथे कशी बरी आली असेल ! सकाळी किती वाजता उठली असेल. एवढे साहित्य आणि तीन चिमण्या पाखरांनी घेऊन ही माऊली कशी बरी गडावर चढली असेल, असा विचार आल्यानंतर डोळ्यात दोन आसू उभे राहिले. खर तर आज सर्वांसाठी महाशिवरात्री होती . मात्र या माऊलीसाठी ती एक व्यवसाय करण्याची चांगली संधी होती. शेंगदाणे, वेफर्स आणि राजगिऱ्याचे लाडू विकून त्या माऊलीला किती बरे पैसे मिळाले असतील? 200 ,300, 400 ! या दोन तीनशे रुपयावर या माऊलीचा संसार कसा बरे चालत असेल? हा विचार करूनच मन हेलावले. माऊलीची चौकशी केली त्यांच्याकडून थोडे साहित्य विकत घेतले आणि त्या छोट्याना दुकानदार म्हणत हसून नमस्कार केला. व्यापार कसा करावा याचे बाळकडू त्यांना एवढ्या छोट्या वयात आईकडून मिळाले असेल नसेल ही झाली एक बाजू ! मात्र पोटाची खळगी भरण्यासाठी या पोरांना आई सोबत एवढा उंच गड चढून यावे लागले,दिवसभर उन्हात बसावे लागले, हा विचार आल्यानंतर आपली पोर किती सुखी आहेत हे जाणवलं ! या ईवल्याश्या मुलांना आमच्या आमचं खूप अप्रूप वाटलं. मग आम्ही त्यांच्या सोबत बसून मस्त फोटो काढला.फोटो काढताना त्यांच्या चेहऱ्यावर जे हास्य उमटलं ते पाहून 'फोटो ऑफ द महाशिवरात्रि डे' हाच तो अशी जाणीव झाली.
शंभो शंकरा या ईवल्याच्या बालकांना एवढी मोठी ताकत तू कुठून दिलीस ,आई सोबत गडावर येऊन व्यवसाय करण्यास चार पैसे मिळण्यासाठी उन्हातानात बसण्याची सहनशक्ती त्यांना कशी मिळाली ! खरंच परमेश्वर किती मोठा आहे याची जाणीव झाली. शंभोशंकराच्या लीला आपणास ज्ञात आहेत. मात्र महाशिवरात्री दिवशी आज पाहिलेली ही *'स्त्री सहनशक्तीची कहाणी'* प्रत्यक्ष पाहून आई ! असा टाहो फोडावासं वाटलं.
*सतीश वसंतराव मोरे*
*सतिताभ*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा