फॉलोअर

१५ मार्च २०१८

करवडीचा शिवाजीराव पाटील चहावाला

पहाटे साडेपाच वाजले असतील. गाढ झोपेत होतो.   दादांचा फोन आला, जागा झालो. गावात थोडासा पाऊस पडतोय, विहिरीजवळ सिमेंट उघडं पडलं असेल, लवकर निघ, असं दादांनी सांगितलं. पटकन उठलो, आवरलं, बूलेट बाहेर काढली आणि जायला निघालो नाक्यावर पोहोचलो. सदाशिव गडावर जाण्यासाठी ओळखीचे  काही मित्र भेटले, त्यांनी गडावर येण्याचा आग्रह केला मात्र मला जायचे आहे पाऊस पडत आहे असे सांगुन तेथून निघालो.

आज इतक्या सकाळी सकाळी खूप दिवसांतून  बाहेर पडलो होतो. पहाटे गार वारा वाहात होता.  रस्त्यांवर अनेक जण चालत होते, व्यायामासाठी बाहेर पडले होते.  कृष्णापुल ओलांडला,  गजानन सौसायटी मध्ये आलो. चौपदरीकरणाचे काम झाल्यामुळे कराड ओगलेवाडी दरम्यान वाहतूक सुसह्य झाली आहे.  त्यामुळे वेगाने निघालो,  रेल्वे पुलावर काही वृद्ध लोक व्यायाम करत होते.  काही समोरून चालत येत होते. एका वृद्धाने काठीला रेडियम लावलेले होते, सोबत बॅटरी पण होती. समोरून येणाऱ्या वाहनांच्या लाईट पडल्यामुळे रेडियम चमकावे, त्याला माणूस दिसावा म्हणून त्या बाबांनी ती काळजी घेतली होती. आता ओगलेवाडी सोडून करवडी रस्त्याला लागलो.  समोरून अनेक वाहने येत होती. करवडीत पोहचलो. ओळखीचे एक भेटले त्यांच्याशी बोलताना  लक्षात आले आज गुरुवार आहे बाजारासाठी जनावरे घेऊन अनेक टेम्पो कराडला निघाले होते.

पावणे सहाच्या दरम्यान मी रानात पोहचलो होतो. अजुनही अंधार होता.  किरकोळ पाऊस  पडून  गेला होता. काही अडचण नव्हती.   बुलेट थेट शेतात विहिरीजवळ नेली लांबूनच पाहिले सिमेंट पोती झाकलेली होती.  गाडी परत वळवली, कराड फलटण रस्त्यावर येऊन थांबलो.  अजूनही दाट अंधार होता समोरून उसतोड बैलगाड्या निघाल्या होत्या. गाडीवान गाडी हाकत होता. बैलगाडीमध्ये गाडी मालकीण मागच्या बाजूस झोपलेली होती. ओळीने जाणाऱ्या या बैलगाड्या, त्यांची कुटुंबे पाहून ऊसतोड कामगारांचं आयुष्य काय असते,  त्यांना किती कष्ट करावे लागतात याचा सहज विचार आला.

पुढे आलो. करवडी स्टॅंडवर टपरीवजा चहाच्या गाड्यावर लाईट चालू होती, भक्तीसंगीताचा आवाज ऐकू आला.  मगाशी येतानाच येतानाच मी लाईट पाहिली होती.  इतक्या सकाळी हॉटेल ते ही करवडीत उघड असेल याचा मी विचार केला नव्हता.  थांबलो आमच्या गावचे शिवाजीराव आनंदराव पाटील यांनी यांचे हे हाँटेल आहे. बुलेट साईटला उभी केल़ी.  इतक्या सकाळी मला पाहून शिवाजीरावांनी आज सकाळी सकाळी इकडे कुठे, असे म्हणून त्यांनी  चौकशी केली.  लगेच किटली मधून चहा भरायला लागले  मात्र मी चहा पीत नसल्याचं सांगून गरम पाणी देण्याची विनंती केली. मग आमच्या गप्पा सुरू झाल्या इतक्या लवकर हाँटेल उघडता असा आश्चर्याने सवाल केल्यानंतर अहो मी तीन वाजताच उघडतो असे त्यांनी सांगितले. 

करवडी गावातील एक माणूस तोही पाटलाच्या घरातला, एसटी स्टॅण्डवर चहाची टपरी वजा हाँटेल काढतो आणि पहाटे तीन वाजता कामाला सुरुवात करतो याचं मला अप्रूप वाटलं.  आमच्यातील पत्रकार जागा झाला चला आता यांची मुलाखत घेऊ असे म्हणून प्रश्नावली सुरू झाली.  शिवाजीराव पाटील यांच्या बोलण्यातून मिळालेली माहिती आणि त्यांच्या कुटुंबाचे कष्ट पाहून मराठी माणूस कुठेही कमी नाही, फक्त त्याने पैसा कमावण्यासाठी कामाची लाज वाटता कामा नये आणि शिवाजीराव पाटील यांनी ती लाज न बाळगता मोठ्या धाडसाने कष्टाने आणि सातत्यपूर्वक काम केल्यामुळेच आज त्यांना चांगले पैसे मिळताहेत, कुटुंब स्थिरस्थावर झालं आहे, याचा आनंद वाटला.

शिवाजीराव पाटील यांचं कुटुंब मध्यमवर्गीय. १० वर्षांपूर्वी त्यांनी कराड मंडईत भाजी विक्रीचा व्यवसाय केला तेव्हापासूनच त्यांना पहाटे काम करायची सवय लागली. चार वाजता उठून  शामराव पाटील भाजी मार्केट मधून भाजीपाला खरेदी करून शिवाजीराव पाटील  सहा सात वाजता मंडईतील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरा शेजारी भाजीपाला बसायचे. १२ वाजता त्यांचा मुलगा गणेश त्यांच्या मदतीला यायचा. गणेशने भाजीपाला विकत वडिलांना हातभार लावलाच शिवाय एमकॉमचे शिक्षणही पूर्ण केले. पुण्यामध्ये त्याला चांगल्या पगाराची नोकरी लागली मात्र एक महिना रात्रपाळी आणि एक महिना दिवसपाळी यामुळे नोकरीचा वैताग आला आणि नोकरी सोडून तो गावाकडे आला. दरम्यान शिवाजीरावांनी  करवडीत चहाची टपरी सुरू केली होती.  तो वडिलांना हातभार लावू लागला.  चांगला जम बसला, चहाची टपरी चांगली चालू लागली लागली. रोज मोठी उलाढाल होऊ लागली.  चांगला जम बसला. मिळालेले पैसे वाचवले पाहिजे म्हणून बचत सुरू केली पिग्मी खाते काढले रोज चांगली रक्कम वाचू लागली.

कराड फलटण रस्त्यावर खुप वाहतूक असते. सकाळी सकाळी चहा प्यायला पुसेसावळी पर्यंत एकही हाँटेल सुरू नसते. याचा अंदाज घेऊन शिवाजीराव पाटील यानी तीन वाजताच काम सुरू करतात. पहाटे 3 ते 9 दरम्यान शिवाजीराव टपरीवर काम करतात नऊ वाजता त्यांचा मुलगा मदतीला येतो. दिवसभर त्यांचा मुलगाच काम करतो. पहाटे 3 ते रात्रीं नऊ पर्यंत ही टपरी सुरू असते. मराठी माणूस 15 ते 18 तास काम करतो आणि काम केले तर किती पैसा मिळू शकतो याचा प्रत्यय मला शिवाजीरावांशी बोलताना आला.

नोकरीपेक्षा धंदा किती श्रेष्ठ आहे याचे मूर्तिमंत उदाहरण मला मला पाहायला मिळाले. शिवाजीराजांच्या मुलाने पुण्यात नोकरी केली असती तर आज त्याला चार आकडी  पगार मिळाला असताही मात्र त्याहून अधिक पैसे गावात राहून धंद्याच्या माध्यमातून त्याला मिळत आहेत. गेली अनेक दिवस मराठी माणूस उद्योगात कमी पडतो असे मी ऐकले होते मात्र करवडीच्या शिवाजीराव पाटील यांना पाहून मराठी माणूसही उद्योग चांगला करू शकतो याचा मला अनुभव आला. मराठा समाजाने आरक्षणासाठी मोर्चा काढला होता त्या काळात मराठी माणसाने कोणताही उद्योग करावा असा एक सूर उमटला होता  शिवाजीराव पाटील यानी तीन वर्षांपूर्वी सुरू केलेली चहावजा टपरी आता चांगली चालत आहे. शिवाजीरावांनी मराठी मुलांसाठी आदर्श आहेत . करवडीच्या आजच्या भेटीत मला एका चांगल्या व्यक्तीला भेटता आले याचा मला आनंद झाला.

ही मुलाखत घेऊन मी परत शेतात आलो. आता उजाडलं होतं. सकाळ सकाळी निसर्गाच्या सानिध्यात बसण्याचा मला अनुभव आला. विहीरी जवळ बसून हे सर्व लिहून काढलं. किती शांतता होती यावेळी.  पक्ष्यांचा चिवचिवाट आणि मोराचा आवाज अशा प्रसन्न वातावरणात मी हे सर्व लिहून काढलं. काय सांगू तुम्हाला किती आनंद मिळाला मला आज!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...