रोज काहीतरी लिहीत जा असे माझे बाबा नेहमी सांगत. 1986 साली वाचकांची पत्रे सदरात पुणे तरूणभारत मध्ये पहिलं पत्र प्रसिद्ध झालं.1998 साली लोकमत ओगलेवाडी वार्ताहर म्हणून लेखनासाठी मार्ग खुला झाला. 2001मध्ये पुढारीत वार्ताहर म्हणून रूजू झालो.आजपर्यंत थोडंफार लिहीलं,अजून खुप लिहायचं आहे. करवडी,कराडची शाळा,काॅलेज पुढे ओगलेवाडी बनवडी भागात क्लासेसच्या निमित्ताने तसेच मिडियामध्ये सुंदर लोकांची साथ,सोबत लाभली.करवडी-कराड व्हाया ओगलेवाडी प्रवासात आलेले अनुभव लेखन हौस पुर्ण करण्यासाठी हा ब्लॉग प्रपंच!
फॉलोअर
१६ सप्टेंबर २०२५
२५ ऑगस्ट २०२५
ठरवून ठरवलं तरी
ठरवणं आणि ठरणं
आपल्या आयुष्यात प्रत्येकजण काही ना काही ठरवत असतो.
कधी एखादं ध्येय गाठायचं, कधी एखादं नातं टिकवायचं,
कधी एखादी चांगली सवय लावून घ्यायची—
"आजपासून मी हे करणारच!" असं ठाम मनाशी पक्कं ठरवतो.
पण प्रश्न असा आहे की,
ठरवलं तसं नेहमी घडतं का?
बर्याचदा आपल्याला वाटतं तसं होत नाही.
कधी परिस्थिती बदलते, कधी अडथळे येतात,
कधी आपल्या हातात नसलेल्या गोष्टी
संपूर्ण चित्र बदलून टाकतात.
म्हणूनच “ठरल्याप्रमाणे झालं, तर ठरवायला अर्थ आहे;
नाहीतर ती केवळ ठरवाठरवी ठरते” असं वाटतं.
आपल्या ठरवण्याला पूर्ण होण्यासाठी
वेळ, संधी आणि परिस्थितीची साथही हवीच असते.
तरीही जीवनाची गंमत हीच—
आपण न ठरवता देखील अनेक गोष्टी
आपोआप घडत जातात.
कधी न ठरवलेली माणसं भेटतात,
न ठरवलेल्या वाटा समोर येतात,
न ठरवलेल्या संधी आपल्याला उचलून नेतात.
तेव्हा लक्षात येतं की,
आपल्या पलीकडे कुणीतरी मोठा ठरवणारा आहे—
जो आपल्या आयुष्याची दिशा ठरवतो.
म्हणूनच जीवनाकडे पाहताना दोन गोष्टी महत्त्वाच्या ठरतात—
१) आपण हवं ते नक्की ठरवणं, प्रयत्न करणं.
२) आणि न ठरलेलं जे घडेल त्याला समजूतदारपणे स्वीकारणं.
कारण शेवटी—
आपण ठरवतो तेवढंच नाही,
तर जे न ठरवता घडतं,
तेच कधी कधी आयुष्याला खरी दिशा देतं!
अपेक्षांचे दरवाजे बंद करा
अपेक्षांचे दरवाजे हळूहळू बंद करा,
समाधानाचे दरवाजे आपोआप खुले होतील !
खूप अपेक्षा धरल्यानंतर काय होतं आणि त्याचा शेवट काय होतो याचा अनुभव अनेकांनी अनेक वेळा घेतला असेल. छोटं उदाहरण देतो – आपण भर दुपारी उन्हातून घरी यायला लागतो. रस्त्यात आपण विचार करतो, आता मी घरी गेल्यानंतर माझी मुलगी किंवा माझी बायको माझं स्वागत करेल आणि थंड पाण्याचा ग्लास आणून देईल, टॉवेल आणून देईल. पण घरी गेल्यावर होतं त्याच्या उलट. आपण जेव्हा घरात जातो, तेव्हा ती व्यक्ती काहीतरी काम करत असते, किंवा ती तिच्या विश्वात असते. ती फक्त दरवाजा उघडते आणि आपल्याला आत घेते व पुन्हा आपल्या कामाला लागते. आपण मात्र अपेक्षा घेऊन आलेलो असल्याने त्या सर्व अपेक्षा भंग होतात आणि मनाला खूप वाईट वाटतं. “मी एवढं कुटुंबासाठी करतो आणि मला कोणी साधा पाण्याचा ग्लासही विचारत नाही” असे विचार मनात येतात.
या उलट आपण असं केलं तर? – कोणतीही अपेक्षा न करता घरात गेलो आणि घरात आपल्या बायकोने किंवा मुलांनी थंड पाण्याचा ग्लास किंवा वर सरबत आणून दिलं, तर किती आनंद होईल! खरंच हे करून बघा – अपेक्षेशिवाय एखाद्या व्यक्तीकडे गेल्यानंतर जे मिळतं, त्यातून मिळणारा आनंद हा दामदुप्पट असतो, अगदी एफडीसारखा!
अपेक्षा करून एखाद्या व्यक्तीकडे गेलो तर अपेक्षाभंग होण्याचा फार मोठा धोका असतो. आपण फक्त आपलं कर्तव्य बजावायचं आणि कोणालाही भेटायला जाताना निर्विकार भावनेने जायचं. कोणत्याही अपेक्षा घेऊन जायचं नाही. मग पहा – किती छान आनंद होतो. “अपयश मरणावून वोखटे” असं मी एकदा कुठेतरी ऐकलं होतं. पण मी असं म्हणतो – अपेक्षाभंग त्याहूनही अधिक वाईट!
अपेक्षा माणसाला खूप क्षीण बनवतात आणि दुसऱ्यावर अवलंबून राहायला शिकवतात. अपेक्षांच्या बाजारात आपण स्वतःला विकून टाकतो आणि स्वतःचं स्वत्व हरवून बसतो. क्षीण झालेला माणूस अपेक्षेच्या आशेने काहीतरी मिळेल असं गृहित धरतो आणि मनापासून काम करत नाही किंवा दुसऱ्यावर अवलंबून राहतो. अपेक्षेच्या या दबावाखाली आपण अपेक्षाभंगरूपी दुःखाला जवळ बोलावून घेतो. त्याऐवजी असं केलं तर? – विना-अपेक्षा आपण एखाद्याशी संबंध ठेवले, तर किती आनंद होईल बघा.
अपेक्षांचे दरवाजे सतत उघडे ठेवले, तर त्या दरवाजातून अपेक्षाभंगाची दुःखं येतात. त्याऐवजी अपेक्षांचे दरवाजे हळूहळू बंद करा, मग बघा – समाधानाचे दरवाजे आपोआप उघडले जातील.
✍️ सतीश मोरे सतिताभ
मोठ्या सुखाच्या शोधात धावू नका,
छोट्याशा आनंदात लपलेलं सुख शोधा !
१८ ऑगस्ट २०२५
ये इंसान क्या है, खुदा के भी आगे प्यार झुकता नही
माझे दक्षिणेतील आवडते निर्माते दिग्दर्शक के. सी. बोकाडिया यांच्या बॅनरखालील 1985 मध्ये रिलीज झालेला 'प्यार झुकता नही' हा चित्रपट मला खूप आवडतो. अमिताभ बच्चन यांच्या नंतर आवडणारा दुसरा सर्वात जवळचा हिरो म्हणजे मिथुन चक्रवती. 1985 साली आम्ही आठवी नववीला असेन. या काळात प्रेमाचं आकर्षण तर होतंच ! मात्र चित्रपटाचं आकर्षण फार होतं. चित्रपटातातील गाणी रेडिओवर किंवा टेप रेकॉर्डर ऐकण्याचा एक वेगळा ऑरा त्या काळात होता.
मला आठवते 'प्यार झुकता नहीं 'हा चित्रपट मी राजमहल थिएटरला पाहिलेला आहे. हा चित्रपट त्याकाळी खूप हिट झालेला होता. या चित्रपटातील 'तुमसे मिलकर ना जाने क्यू' हे गाणं खूप लोकप्रिय झालं होतं. बिनाका गीतमाला मध्ये अनेक आठवडे हे गाणं टॉपला होतं. चित्रपटातील सर्वच गाणी छान होती. शब्बीर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या सुंदर आवाजातील ही गाणी लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी स्वरबद्ध केली होती. या चित्रपटातील 'तुम्हे अपना साथी बनाने से पहले, मेरी जान मुझको बहुत सोचना है, हे गाणं मला खूप आवडतं. मी या गाण्याविषयीच आज थोडसं बोलणार आहे.
तपूर्वी या चित्रपटाची स्टोरी तुम्हाला माहित नसेल तर सांगतो. गर्भ श्रीमंत कुटुंबातील एक तरुणी आणि सामान्य कुटुंबातील फोटोग्राफर तरूण यांची ही प्रेम कथा ! त्यांच्यातील हे प्रेम सहज फुलत जातं, दोघेही प्रेमात उत्कंठ बुडून जातात. लग्न करायचा निर्णय घेतात. मग ती तरूणी आपल्या वडलांसमोर आपल्या प्रेमाची कबुली देते. तिचे वडील त्याला एका पार्टीमध्ये यायचं निमंत्रण द्यायला सांगतात. प्रियकराला एका पार्टीमध्ये येतो. श्रीमंत बाप या छोट्या तरुणाला बाजूला घेऊन जातो आणि त्याची पूर्ण औकात काढतो. पार्टी सुरू झाली असते आणि अपमानित झालेला तो तरुण आपल्या भावना गीतातून व्यक्त करतो. 'तुम्हे अपना साथी बनाने से पहले, मेरी जान मुझको बहुत सोचना है' हे सांगताना गरीब श्रीमंतीतील मोठी दरी आपल्याला एक करू शकत नाही, तुझ्यावर मी आयुष्याची दोरी बांधू शकत नाही असं स्पष्ट सुनावतो. तुझ्याशी लग्न केलं किंवा तुझ्यासोबत लग्न गाठ बांधली तर तुला माझ्यासोबत अनेक संकटाला तोंड द्यावे लागेल, माझ्यासोबत तुला कधी उपाशी राहावं लागेल, जगाचे टोमणे ऐकून घ्यावे लागतील असं व्यक्त होत असताना असताना तो तरुण आपल्या मनातील गरिबीच्या भावना व्यक्त करतो.
शब्बीर कुमार यांच्या गंभीर आवाजातील हे गाणं मला खूप आवडत होतं, आजही आवडतं. हा तरुण ही भावना व्यक्त केल्यानंतर थांबतो, पार्टीतून जायला लागतो मात्र ती तरुणी त्याला थांबवते. त्यानंतर त्या तरुणीने आपल्या आई-वडिलांसमोर त्या पार्टीमध्ये दिलेलं उत्तर मला त्याहून अधिक आवडतं. लतादीदींनी एका सुरात, एका दमात हे गाणं म्हटलं आहे. एस एच बिहारी यांनी लिहिलेल्या या गीतामध्ये अनेक उर्दू शब्द आहेत, त्याचा अर्थ मला त्यावेळी कळत नव्हता. आता थोडासा अभ्यास करून किंवा माहिती घेऊन माझ्या परीने मी या गाण्याचा अर्थ काढण्याचा मी थोडासा प्रयत्न केला आहे. बघा आपणाला आवडतो का?
मोहब्बत जिन्हें हो गई हो किसी से
मोहब्बत जिन्हें हो गई हो किसी से
मोहब्बत का अंजाम कब सोचते हैं?
ये ऐसा सुहाना सफ़र है कि जिसमें
हज़ारों हैं नकाम कब सोचते हैं
चराग़-ए-वफ़ा अपने हाथों में लेकर
मोहब्बत की राहों में जो चल पड़े हैं
बयाबाँ में होगी कि सहरा में होगी
कहाँ होगी अब शाम कब सोचते हैं
कहाँ होगी अब शाम कब सोचते हैं
मोहब्बत के मारों को अब और, ऐ, दिल
सताएँगी क्या सख़्तियाँ ज़िंदगी की?
जिन्हें थक के नींद आ गई पत्थरों पर
वो दुनिया का आराम कब सोचते हैं?
ये इंसान क्या है, ख़ुदा के भी आगे
कभी प्यार दुनिया में झुकता नहीं है
प्यार झुकता नहीं है
मोहब्बत ही जिनका ख़ुदा बन चुकी हो
किसी और का नाम कब सोचते हैं?
मोहब्बत जिन्हें हो गई हो किसी से
मोहब्बत का अंजाम कब सोचते हैं
मोहब्बत का अंजाम कब सोचते हैं
असे हे गाण्याचे बोल होते. यात खोलवर असा अर्थ आहे.
मोहब्बत जिन्हें हो गई हो किसी से
मोहब्बत का अंजाम कब सोचते हैं…
👉 ज्यांना खरं प्रेम झालं आहे, ते कधीच त्याचा शेवट किंवा परिणाम काय होईल हे विचार करत नाहीत. प्रेम हे सुंदर असतं ही भावना त्यांच्यामध्ये बसलेले असते त्यामुळे मी प्रेम केल्यावर काय होईल याचा ते का बर विचार करतील?
ये ऐसा सुहाना सफ़र है कि जिसमें
हजारों हैं नकाम कब सोचते हैं…
👉 प्रेमाचा प्रवास इतका सुंदर आहे की त्यात किती अडचणी येतात हे प्रेमिक कधी मोजतच नाहीत. या प्रवासात खूप सुंदर आठवणी मिळतात, खूप वेगळा अनुभव मिळतो हा अनुभव इतका सुखद असतो ती त्या अडचणीचा विचार प्रेमिक कधीच करत नाहीत
चराग़-ए-वफ़ा अपने हाथों में लेकर
मोहब्बत की राहों में जो चल पड़े हैं…
👉 ज्यांच्या हृदयात निष्ठेचा दिवा आहे आणि जे प्रेमाच्या मार्गावर निघाले आहेत,ते संकटे वा शेवटाची भीती बाळगत नाहीत. आलेली सगळी संकट त्यांना संधी वाढतात किंवा सोपी वाढतात. प्रेमाच्या या जादुई दिव्याच्या प्रकाशात ते अनेक वादळाला सामोरे जातात,त्यामुळे त्यांना संकटाची भीतीच वाटत नाही.
---
बयाबाँ में होगी कि सहरा में होगी
कहाँ होगी अब शाम कब सोचते हैं…
👉 त्यांच्या प्रेमाचा अंत कुठे होईल – ओसाड वाळवंटात की हिरव्या गालीच्यावर – हे ते कधीच विचार करत नाहीत. त्यांच्या दृष्टीने प्रेम एक सुंदर भावना असते त्या भावनेच्या विश्वात राहून सुखदुःखाची वाट ते सहज चालत राहतात. प्रेमाच्या या धुंद लहरी मध्ये ते चांगल्या वाईटाची पर्वा करत नाहीत.
मोहब्बत के मारों को अब और, ऐ दिल
सताएँगी क्या सख़्तियाँ ज़िंदगी की?
👉 जे आधीच प्रेमाच्या वेदनांनी विद्ध झाले आहेत, त्यांना आयुष्याची इतर अडचणी आणि त्रासाचा काय त्रास होणार? प्रेमात आलेल्या चांगल्या वाईट अनुभवाने ते आता इतके भक्कम झाले आहेत की त्यांना कसलाही त्रास झाला,कसलीही संकट आली तर त्याचं काहीच वाटत नाही.
जिन्हें थक के नींद आ गई पत्थरों पर
वो दुनिया का आराम कब सोचते हैं…
👉 जे थकून दगडांवरही झोपू शकतात, त्यांना जगाच्या सुखसोयींची काय पर्वा ? उन,वारा, वादळ पाऊस याची त्यांना काही पर्वा नसते. खायला चांगलं अन्न मिळालं किंवा नाही मिळालं,चांगल्या सुविधा नाहीत मिळाल्या याचीही त्यांना पर्वा नसते. निखळ प्रेमाची भावना त्यांना सुखद गारवा देत असते.
ये इंसान क्या है, ख़ुदा के भी आगे
कभी प्यार दुनिया में झुकता नहीं है…
👉 माणूस देवासमोर झुकतो, पण खरे प्रेम कधीही कुणा पुढेही झुकत नाही. प्रेम हेच सर्वोच्च आहे. प्रेम आणि ईश्वर, प्रेम आणि जगाचा निर्माता या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. देव सुद्धा अनेकदा प्रेमासमोर नतमस्तक झाला आहे, मग जगासमोर हे प्रेमी कसे बरे हार मानतील ? खरं, निखळ प्रेम कधीच धमकी,दबाब,आकर्षण, पैसा ,सत्ता, प्रसिद्धी, बळजबरी किंवा दादागिरी यापुढे झुकलेले नाही, झुकणारही नाही.
---
मोहब्बत ही जिनका ख़ुदा बन चुकी हो
किसी और का नाम कब सोचते हैं…
👉 ज्यांच्यासाठी प्रेमच देव झाले आहे, ते दुसऱ्या कशाचाही विचार करत नाहीत. प्रेमात उत्कंठ बुडालेले आहेत.आता प्रेमालाच भक्ती मानू लागलेले आहेत. भक्ती आणि प्रेमाच्या रसाळ प्रवाहात डुंबून गेले आहेत. प्रेमाशिवाय ते इतर कोणताही विचार कसा करतील?, प्रेम हेच त्यांच्यासाठी सर्वोच्च आनंद आहे.
या गाण्यात प्रेमाची ताकद,त्यातील निष्ठा आणि त्याचे वेगळेपण सांगितले आहे. खऱ्या प्रेमिकांना अडचणी, शेवट, जगाच्या सुखसोयी किंवा संकटांची भीती नसते. त्यांच्यासाठी प्रेमंच ईश्वराहून सर्वोच्च असते. एस एच बिहारी यांनी यांनी प्रेमाच्या भावना कुट कुट भरून या गीतामध्ये व्यक्त केलेल्या आहेत. हे गाणं अजरामर आहे.
#सतीश मोरे सतिताभ
०८ ऑगस्ट २०२५
वेल्लूर किल्ला.. भव्य दिव्य पण मराठ्यांच्या इतिहास लपवला जातोय !
वेल्लूर किल्ला.. भव्य दिव्य
पण मराठ्यांच्या इतिहास लपवला जातोय !
कांचीपुरमचा मुक्काम आटोपून आम्ही सकाळी लवकरच बाहेर पडलो.आज बुधवार आमचं डेस्टिनेशन होतं वेल्लोर. वेल्लोरला जाण्यासाठी खाजगी बस पकडली. वेल्लोर बस स्थानकावर उतरल्यानंतर रिक्षा केली.गेली तीन-चार दिवस आम्हाला चांगले रिक्षावाले मिळाले होते, मात्र वेल्लोर मध्ये रिक्षा चालकांनी आमच्या कडून अर्धा किलोमीटर साठी हटून, गटून दिडशे रुपये घेतले. उन कडक होते. रूमवर जाऊन आराम केला आणि दुपारी चार वाजता वेल्लोर पाहण्यासाठीसाठी बाहेर पडलो.
वेल्लूर पासून जवळच तिरूमलाईकोडी येथे लक्ष्मी नारायणी मंदिर सुवर्ण मंदिर आहे लक्ष्मी नारायणी विष्णू नारायणाची पत्नी आहे. हे मंदिर 40 हेक्टर (100 एकर) जमिनीवर स्थित आहे आणि वेल्लोर-आधारित धर्मादाय ट्रस्ट, श्री नारायणी पीडम यांनी बांधले आहे, ज्याचे अध्यक्ष अध्यात्मिक नेते श्री शक्ती अम्मा ज्यांना 'नारायणी अम्मा' म्हणून ओळखले जातं. सोन्याचे आच्छादन असलेले मंदिर, दिड टन सोन्याचा वापर केले आहे.मंदिर कलेमध्ये तज्ञ कारागिरांनी जटिल काम केले आहे. सोन्याच्या पट्ट्या सोन्याच्या फॉइलमध्ये रूपांतरित करणे आणि नंतर तांब्यावर फॉइल बसवणे यासह प्रत्येक तपशील जपला आहे.हे मंदिर पाहिला दिवसातून सकाळी आणि संध्याकाळी पंधरा मिनिटे मोफत प्रवेश दिला जातो. इतर वेळेला मात्र हे मंदिर पहायचे असेल तर दीडशे रुपये तिकीट आकारले जाते. आम्ही तिकीट घेऊन मंदिर परिसरात गेलो. या ठिकाणी मोबाईल फोन येण्यास परवानगी नाही. मोठ्या प्रमाणात सिक्युरिटी आहे. दर्शन बारी फार लांब आहे. या बारी मधूनच आपल्याला मंदिराला गोल वेढा घालून तेथे जावे लागते. सुवर्ण मंदिरातील भव्यता राहून डोळ्याचे पारणे फिटले. दर्शन बारी मध्ये चहापाण्याची सुविधा करण्यात आलेली आहे.आम्हाला लगेच दर्शन मिळाले.या मंदिराच्या शेजारीच बालाजी मंदिर आहे, येथे लाडूचा प्रसाद दिला जातो. तामिळनाडूमधील अनेक मंदिरे पाहिली मात्र हे सुवर्ण मंदिर श्रीमंताचे मंदिर असल्याचे माझी भावना झाली आणि इथे सर्व गोष्टीला पैसे आकारले जात होते.
सुवर्ण मंदिर दर्शन घेऊन आम्ही वेल्लोर किल्ल्याकडे निघालो. वेल्लोर किल्ल्याचा इतिहास काय आहे याबाबत थोडीफार माहिती होती. इतिहास तज्ञ व इंटरनेट वरून मिळालेली माहिती पुढीलप्रमाणे.
वेल्लूर किल्ल्याची मालकी विजयनगरच्या सम्राटांकडून , विजापूरच्या सुलतानांकडे , मराठ्यांकडे , कर्नाटकी नवाबांकडे आणि शेवटी ब्रिटिशांकडे गेली , ज्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत किल्ला ताब्यात ठेवला . ब्रिटिश राजवटीत, टिपू सुलतानचे कुटुंब आणि श्रीलंकेचे शेवटचे राजा , श्री विक्रम राजसिंहा यांना किल्ल्यात कैदी म्हणून ठेवण्यात आले होते. श्रीरंगारायाच्या विजयनगर राजघराण्याच्या हत्याकांडाचाही तो साक्षीदार आहे .
1650 च्या दशकात, श्रीरंगाने म्हैसूर आणि तंजोर नायकांशी युती केली आणि गिंगी आणि मदुराईवर हल्ला करण्यासाठी दक्षिणेकडे कूच केले . त्याचा पहिला मुक्काम म्हणजे गिंजीचा किल्ला ताब्यात घेतला, परंतु मदुराईच्या थिरुमलाई नायकाने उत्तरेकडून वेल्लोरवर हल्ला करून श्रीरंगाचे लक्ष वळवण्यासाठी विजापूरच्या सुलतानाला विनंती केली . विजापूरच्या सुलतानाने तातडीने मोठी फौज पाठवून वेल्लोरचा किल्ला ताब्यात घेतला. त्यानंतर, मदुराई-विजापूरच्या दोन्ही सैन्याने वेल्लोर-तंजोर सैन्याचा पराभव करून गिंजीवर एकत्र आले. युद्धानंतर दोन्ही किल्ले विजापूरच्या सुलतानाच्या ताब्यात गेले. या पराभवाने विजयनगर सम्राटांच्या शेवटच्या थेट पंक्तीचाही अंत झाला. या घटनेनंतर 20 वर्षांच्या आत मराठ्यांनी विजापूर सुलतानांकडून किल्ला ताब्यात घेतला.
1676 मध्ये, थोर मराठा राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मावळ्यांनी तंजोर देशाकडे दक्षिणेकडे कूच केले. त्याच वर्षी, छ शिवाजी महाराजांचा भाऊ एकोजी याने तंजावरचा ताबा घेतला, परंतु त्यांच्या जवळच्या शेजारी मदुराई आणि विजापूर सुलतान यांच्याकडून त्यांना धोका होता , जे अनुक्रमे गिंगी आणि वेल्लोर येथे होते. शिवाजी महाराजांच्या सैन्याने 1677 मध्ये प्रथम जिंजीचा किल्ला ताब्यात घेतला, परंतु वेल्लोरवर हल्ला करण्याचे काम त्यांच्या सहाय्यकाकडे सोपवले आणि मुघल सम्राट औरंगजेबच्या प्रदेशावर हल्ला होत असल्याने ते दख्खनकडे गेले. 1678 मध्ये, प्रदीर्घ चौदा महिन्यांच्या वेढयानंतर, किल्ला मराठ्यांच्या ताब्यात गेला. शिवाजी महाराजांच्या प्रतिनिधीने गडाची तटबंदी मजबूत केली आणि त्या भागावर १६७८-१७०७ या कालावधीत शांततेत राज्य केले.
मराठा साम्राज्याचा प्रतीक असलेलं वेल्लोर किल्ला पाहण्यासाठी खरंतर खूप उत्सुकता होती. हा किल्ला पुरातत्व खात्याच्या ताब्यात आहे. या किल्ल्याचे अतिशय चांगल्या पद्धतीने जतन केले जात आहे. किल्ल्याच्या बाहेर समोरच भव्य गार्डन तयार करण्यात आलेले असून या गार्डनमध्ये सायंकाळी वेळेला फार मोठी गर्दी असते. किल्ल्याच्या तटबंदी भक्कम आहेत ,तटबंदी समोर मोठा खंदक असून त्यामध्ये पाणी वाहत होतं . किल्ल्यावर टिपू सुलतानचा महाल आहे, भव्य मशिद आहे, भव्य सेंट जॉर्ज चर्च आहे आणि त्याहून डोळे दिपवणारे जलकंठेश्वरर मंदीर आहे. यापैकी जलकंटेश्वर मंदिर त्याच्या भव्य कोरीव कामांसाठी प्रसिद्ध आहे. किल्ल्याची बांधणी काहीशी जलदुर्गासारखी असून त्याच्या सभोवती दुहेरी दगडी चिरेबंदी तट आहे. तटाभोवती खोल व रुंद खंदक आहे. पूर्वेला किल्ल्याचा मुख्य दरवाजा आहे. किल्ल्यात जलकंठेश्वर विजयानगर वास्तुशैलीतील भव्य मंदिर असून त्याच्या मंडपातील तीरशिल्पात देव-देवतांच्या पूर्णाकृती मूर्ती आहेत. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंस नृत्यमग्न असलेल्या पार्वतीची त्रिभंगातील मूर्ती लक्षवेधक आहे. किल्ल्यात अनेक शासकीय कार्यालये असून येथील खंदकातील पाण्यावर मत्स्यसंशोधन केंद्र चालविले आहे.
जलकंठेश्वरर मंदीर पाहून झालं. पण हुरहूर लागली होती माझ्या शिवरायांचे नाव कुठे आहे काय याची, मराठा साम्राज्य उल्लेख कुठे आहे काय याची ! छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांनी हा किल्ला जिंकला होता याचा इतिहास मात्र या ठिकाणी कुठेही लेखी स्वरूपात पहायला मिळत नाही. याचं फार वाईट वाटलं. या परिसरात फिरताना अनेक जणांना याबाबत विचारलं मात्र याची माहिती कुणालाही नव्हती. रिक्षा ड्रायव्हरला विचारलं, सिक्युरिटी गार्डन विचारलं, आर्किलॉजिकल सर्वे विभागाच्या काही लोकांना विचारलं. मात्र कोणीही या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा साम्राज्य होतं याची माहिती नसल्यास सांगितले. नाही खूप वाईट वाटलं. अशाच प्रकारे इतिहास लपवण्याचा प्रकार आग्रा येथे केला जातो. तिथंही छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला पराक्रम तेथील गाईड लोक कोणाला सांगत नाहीत. किमान आग्रा किल्ल्याच्या बाहेर छत्रपती शिवाजी महाराज यांचा असणारा भव्य पुतळा पाहून उत्साही किंवा उत्सुक पर्यटक विचारतात तरी हा पुतळा कुणाचा आहे. मात्र गाईड फक्त शिवाजी महाराजांचा पुतळा आहे एवढंच सांगतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेब बादशहाच्या हातावर तुरी देऊन आग्रा येथून स्वतःची सुटका केली होती याची माहिती दिली जात नाही. याचा मी स्वतः साक्षीदार आहे. वेल्लूर किल्ल्याचा परिसर भव्य आहे. हा किल्ला पुरातत्व खात्याच्या ताब्यात असला तरी किल्ल्याचा सविस्तर इतिहास इथे लिहिल्याचे कुठेही पाहायला मिळाले नाही. हे खाते भारत सरकारचे आहे की तामीळनाडू सरकारचं आहे याबाबत शंका आली..यावर काय करता येईल याचा विचार महाराष्ट्रातील गडप्रेमी, शिवप्रेमी आणि सत्ताधारी राजकारण्यांनी करण्याची गरज आहे.
सहा दिवसाचा दक्षिण भारत अभ्यास दौरा झाला. आता परतीच्या प्रवासाचे वेध लागले होते. रात्री साडेबारा वाजता वेल्लूर कंन्टेटमेंट स्टेशनवरती पोहोचलो आणि आमच्या कराडच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली. गुरुवारी रात्री उशिरा पोहचणार आहे. भेटू लवकरच
उद्या वाचा ..
दक्षिण भारतात आणि भारतीयांत वेगळे काय दिसलं?
*सतीश वसंतराव मोरे सतिताभ*
9881191302
२९ मे २०२५
जीवनाचं खरं सौंदर्य दुसर्याच्या आयुष्यात बदल घडवणंराजकीय संघर्षातून घडलेल्या सत्तरीतील ‘तरुण’ डॉक्टरांनी उलगडले आयुष्यातील आनंदाचे रहस्य
राजकीय संघर्षातून घडलेल्या सत्तरीतील ‘तरुण’ डॉक्टरांनी उलगडले आयुष्यातील आनंदाचे रहस्य
संयमी व अभ्यासू नेतृत्व अशी ओळख असणारे यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती आदरणीय डॉ. सुरेश भोसले यांचा आज वाढदिवस. सत्तराव्या वर्षीही पंचवीशीतील तरुणाइतका उत्साह असलेले डॉ.सुरेशबाबा हे मितभाषी, संयमी आणि सदाहरित नेतृत्व आहे. वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला दैनिक ‘पुढारी’चे न्यूज ब्युरो चीफ सतीश मोरे यांच्याशी बोलताना त्यांनी आयुष्याचा प्रवास उलगडला. कृष्णा विद्यापीठ, कृष्णा कारखाना यांच्या निर्मितीपासून मुलगा डॉ.अतुल भोसले आमदार होण्यासाठी केलेले प्रयत्न यावर बोलत असतानाच संषर्घाशिवाय जीवन नाही असे सांगून शेवटच्या क्षणापर्यंत वैद्यकिय सेवेसह समाजकारणात कार्यरत राहणार, असा इरादा त्यांनी बोलून दाखविला....
प्रश्न ..70 वर्षांपासून आपल्या सामाजिक व राजकीय आयुष्यात अनेक चढ-उतार आले, संघर्ष आले याबाबत आपण काय सांगू शकाल....
उत्तर- 70 वर्षांचा प्रवास फार मोठा आहे. हा प्रवास फार संघर्षातून झाला. सर्व राजकारणी, समाजकारणी आणि सर्वसामान्यांना संघर्षातून जावं लागतं. सुरुवातीच्या काळात जो घरातील संघर्ष झाला, तो व्हायला नको होता. मात्र आम्ही त्याच्यातूनही पुढे आलो. एक वेळ अशी येते की, सर्व मागे ठेवावं लागतं आणि पुढे जावं लागतं. आपण त्याच्यापासून बाजूला जावं लागतं. आपल्याला ज्या क्षेत्रात काम करायचं आहे त्यापासून आपला फोकस बाजुला करून चालत नाही. राजकीय सत्ता आपल्या हातात आली किंवा नाही याचा आपण कधीच विचार केला नाही. राजकारणामध्ये सुद्धा जेव्हा अतुलने ठरवलं की, आपल्याला राजकारणामध्ये काहीतरी करायचं आहे. दोनदा अपयश आलं. तरी तो खचून गेला नाही. तिसर्यांदा तो यशस्वी झाला. भाजपाची विचारधारा स्विकारायला वेळ गेल्याने यश मिळायलाही वेळ गेला. आपल्या येथे राष्ट्रीय काँग्रेसचा प्रवाह आहे, या प्रवाहाविरोधात तो निघालेला होता. आज रोजी भाजपचा प्रवाह लोकांनी स्विकारला आहे. आज त्याला यश मिळाल्यानंतर त्याच्यावर जबाबदारी आलेली आहे.
प्रश्न ..आज तुम्ही वयाच्या 70 व्या वर्षात पदार्पण करीत आहात, मात्र तुम्ही पन्नाशीतील तरुणासारखे उत्साही दिसता. प्रत्येक गोष्ट संयमाने हाताळता. तुमच्या या तारुण्याचे रहस्य काय.....
उत्तर ...रहस्य वगैरे काही नाही. हा स्वभावाचा भाग आहे. आपल्या आयुष्यात समज-गैरसमज होतात ते शब्दाने. आपल्याला एखादी गोष्ट पटली नाही तर ती कशी मांडायची आणि कशी मांडायची नाही, हे शब्दच ठरवतात. कोणाच्या भावना दुखवायच्या नाहीत. कोणाचा अपमान होणार नाही किंवा कोणाला कमीपणा येईल असे वागायचे नाही. विरोधक असे तरीही करायचं नाही. जो-तो त्याच्या मार्गाने चालत असतो आपण आपल्या मार्गाने चालायचे असते. असं केलं तरच राजकारणात बदल होत असतो. निवडणुकीच्या काळात मला भेटायला येणारे इतरांच्या तक्रारी करतात. तो तुमचा कार्यकर्ता तुमच्याविषयी विरोधात बोलतो. तुम्हाला शिव्या देतो, तुम्ही हे कसे सहन करता? यावर मी म्हणतो, तो जर इतका आपल्याला शिव्या देत असेल तर प्रेम सुद्धा तितकंच करत असेल. हा एटीट्यूडचा प्रश्न आहे. तुम्हाला मी तरुण वाटतोय याचं आणखी एक कारण म्हणजे लाइफस्टाइल आहे. मी सर्वांना नेहमीच सांगतो, या जगामध्ये तुमचं काही नाही. प्रॉपर्टी आहे पण तुम्हाला ती सोडून जावी लागणार आहे. घर, मित्र-मंडळी, आई-वडील हे ही तुमचे नाहीत. कारण जाताना तुम्हाला ते ही सोडून जावं लागणार आहे. देवाने तुम्हाला अशी एकच गोष्ट दिलेली आहे ते म्हणजे तुमचे शरीर. त्यामुळे खर्या अर्थाने शरीराची काळजी करणं, हे तुमचं कर्तव्य आहे. ही जबाबदारी तुमची आहे. शरीर चांगलं ठेवण्यासाठी कोणी तुम्हाला मदत करू शकत नाही. ही जबाबदारी तुम्हालाच घ्यावी लागेल. मी माझ्या शरीराची काळजी घेतो. म्हणून मी सद़ृढ आहे. दुसरा विषय काही गोष्टी जेनेटेकली येतात. आप्पांच्याकडून मला ते मिळालेले वरदान आहे.
प्रश्न...तुम्ही एवढ्या मोठ्या गर्भश्रीमंत कुटुंबात जन्माला आला आहात, मात्र तरीही तुमच्याकडील संयम, नम्रता, मितभाषीपणा हे गुण आहेत. हे तुम्ही कसे शक्य करु शकता..........
उत्तर- आप्पा नेहमी म्हणायचे, तुम्ही किती श्रीमंत आहात हे पैशाने कधीच ठरत नाही. तुम्ही दुसर्यासाठी काय केलं हीच खरी श्रीमंती आहे. तुमच्याकडे असलेल्या पैशांचा लोकांसाठी योग्य उपयोग करत नसाल तर त्या पैशाला काय अर्थ नाही. आम्हाला सत्ता आली किंवा गेली, याचं कधीच अप्रूप वाटत नाही. चेअरमन असलो किंवा नाही याचं काहीच वाटत नाही. लोकांनी आपल्याला जी जबाबदारी दिलेली आहे ती पार पाडायची, हे मी माझं कर्तव्य समजतो. लोकांनी भेटावं, नमस्कार करावा असं मला कधीच वाटंत नाही. आपल्याला सर्वसामान्यांसाठी काम करायचं आहे. मला स्तुतीपाठक लोक अजिबात आवडत नाहीत. चापलुसी करणारे लोक मी कधीच जवळ करीत नाही. माझ्याजवळ असे लोक तुम्हाला कधीही दिसणार नाहीत. जवळीक सुद्धा कुणाशी किती करायची हे पण तुम्ही ठरवलं पाहिजे. आपल्याला सगळे सारखे धरले पाहिजेत. जवळच्या लोकांना सुद्धा आपण त्यांच्या कामावरुन तोललं पाहिजे. आमच्या संस्थेमध्ये चांगला अधिकारी असेल तर त्याला योग्य न्याय मिळतो, मात्र वाईट असेल तर कसलाही विचार न करता दुसर्या दिवशी त्याला कमी करायला मला काहीच वाटत नाही. कारण मी कशामध्येही आणि कुणामध्येही गुंतलेलो नाही. कारखान्यातील संचालकांनाही मी नेहमी सांगतो, ही खुर्ची सांभाळण्यासाठी, टिकवण्यासाठी मी काहीही चुकीचे करणार नाही. मला इथे या पदावर राहायलाच पाहिजे असं काही नाही. माझ्या या स्वभावाचा संचालकावरही चांगला परिणाम होतो.
प्रश्न ..तुमचे राजकीय गुरू कोण? तुमचे सर्व पक्षातील नेत्यांशी चांगले संबंध आहेत..?
उत्तर- माझे कोणीही राजकीय गुरु नाहीत मात्र सर्व पक्षातील राज्यकत्यांशी माझे चांगले संबंध राहिले आहेत. स्व.विलासराव पाटील-उंडाळकर (काका) तसे फटकळ होते. मात्र माझ्याशी त्यांचे संबंध अतिशय चांगले होते. माझा त्यांच्याशी संवाद होत होता. शेवटच्या क्षणी रुग्णालयात असताना मी त्यांना भेटायला गेलो होतो. तेव्हा तिथे असलेल्या सर्वांना त्यांनी बाहेर काढून माझ्याशी संवाद साधला. राजकारण कसं चालतं..., राजकारणात कसं वागलं पाहिजे..., या विषयावर त्यांनी मला मोलाचा सल्ला दिला. जे त्यांना त्यांच्या मुलाशी बोलायला पाहिजे होतं ते माझ्याशी बोलले. वाळवा तालुक्यातील जयंतराव पाटील यांच्याशीही माझे सलोख्याचे संबंध आहेत. इथं बाळासाहेब पाटील यांच्याशी जयवंत शुगर आणि विधानसभा निवडणुकीमुळे संबंध ताणले होते. मात्र झालेल्या चुका मान्य करुन आम्ही पुढे गेलो. आज आम्ही एकत्र काम करीत आहोत.
प्रश्न ..कृष्णा विद्यापीठ आणि कृष्णा कारखान्याची एवढी मोठी जबाबदारी स्वीकारताना भविष्यातील बदलांकडे तुम्ही कोणत्या नजरेने पाहता...
उत्तर ...जगभरात काय चालले आहे, त्याचा अभ्यास आम्ही सातत्याने करत असतो. सर्व व्यवसाय इंडस्ट्रीमध्ये फास्ट चेंजेस होत आहेत. त्यामुळे अडपटेशन तुम्हाला सातत्याने करावे लागतील. कारखान्याबाबत मी नेहमी म्हणतो, आजची जी कारखान्यात टेक्नॉलॉजी आहे. ती पुढच्या काळात चालणार नाही. त्यामुळे तुम्हाला नव्या बदलांसाठी सतत दक्ष राहावे लागेल, अभ्यास करावा लागेल. आरोग्यसेवेत सध्या काय नवीन ट्रेंड आहे, हे पहावे लागते. वैद्यकीय सेवेमध्ये डिसिजन मेकिंग अत्यंत महत्वाचा असतो. पेशंटला ट्रीट करताना योग्य डिसिजन घ्यावा लागतो, आणि तो डिसीजन विथ रिझन हवा. भविष्यात कुठे पोटेन्शिअल आहे याचा आम्ही विचार करतो. आम्ही मोठे निर्णय घेतो. मात्र त्याची अंमलबजावनी टप्प्याटप्प्याने करतो. मध्यंतरी कृष्णा कारखाना वीस वर्षे आमच्याकडे नव्हता. मात्र अन्य सर्व संस्था स्थिर आहेत, प्रगतीपथावर आहेत. एग्रीकल्चर कॉलेज असो किंवा मेडिकल कॉलेज यांच्या ब्रांचेस असो. फार्मसी कॉलेज असो नर्सिंगसह सर्व कॉलेजेस राज्यामध्ये नावाजलेले आहेत. आमच्या सर्व संस्थांचा पुढील पाच वर्षाचा प्लॅन तयार आहे. कारखाना आणि विद्यापीठात आजचे चॅलेंजेस आणि भविष्यात उद्भवणारे चॅलेंजेस याचा विचार करून आमचे प्लॅन तयार आहेत. जे आपल्याला चॅलेंज वाटते, आणि ज्याची आपल्याला भीती वाटते, त्याचं रूपांतर तुम्ही संधीमध्ये केलं पाहिजे.
प्रश्न ..आपल्या वाढदिवसानिमित्त सभासद, शेतकरी आणि कराड तालुक्यातील जनतेला काय सांगाल.....
उत्तर ...आपला शेतकरी समाज शेतीवर अवलंबून आहे. गेल्या 50 वर्षांमध्ये इतके बदल झाले आहेत. हे सर्व शेतकरी अल्पभूधारक झालेले आहेत. शेतकर्यांचे राहणीमान सुधारलं असलं तरी फक्त शेतीवर त्यांचं चालणार नाही. शेतकर्यांच्या घरातील मुले शिकली पाहिजेत. नोकरी किंवा व्यवसायाचा मार्ग त्यांनी स्विकारला पाहिजे. भविष्यात सामुदायिक शेतीची कन्सेप्ट राबवावी लागणार आहे. कराड दक्षिणमध्ये कृष्णा साखर कारखान्याशिवाय एकही मोठी इंडस्ट्री नाही, म्हणून मी अतुलला सुद्धा भविष्यात या मतदारसंघात नव्या इंडस्ट्रीज आणाव्या लागतील, याबाबत सुचविले आहे. कृष्णा कारखान्याच्या संघर्षामध्ये जयवंत शुगर उभा राहिला. संघर्षच झाला नसता तर कृष्णेचे चार कारखाने झाले असते. ‘कृष्णा’ कारखान्याबाबत भविष्यात काही योजना आहेत, याबाबत आता सांगणे योग्य नाही.
प्रश्न ...तुमच्या आयुष्यातील सर्वात सुखद अशी घटना कोणती..? अतुल आता आमदार झाला आहे. त्याविषयी काय सांगाल..?
उत्तर...मुले सेटल झाली. राजकारणात हे करिअर अतुलने स्वीकारलं. संषर्घातून तो आमदार झाला. हा एक आनंदाचा क्षण होता. अतुलकडे पोटेन्शिअल आहे म्हणून ते होऊ शकलं. याशिवाय छोटे-छोटे आनंदाचे प्रसंग माझ्या आयुष्यात रोज घडतात. एखादा कॅन्सरचा पेशंट बरा होऊन घरी जातो तेव्हा त्याच्या चेहर्यावर जो आनंद असतो, तो आनंद पाहण्यात वेगळा आनंद असतो. या विभागात काम करणारांना तुम्ही भाग्यवान आहात, असे मी म्हणतो. एवढ्या वेगवेगळ्या कामांत बिझी असूनही रोज सकाळी मी ऑपरेशन थिएटरमध्ये जातो. कारण यामध्येच आनंद आहे. आज स्त्रियांमध्ये कॅन्सरचे प्रमाण फार मोठे आहे. कॅन्सरची ट्रीटमेंट करणं फार गरजेचे आहे हा विचार करूनच कृष्णा रूग्णालयाचे कोबाल्ट युनिटमध्ये सुरू आहे. कॅन्सरबाबत जनजागृती करण्याचे आमचे प्रयत्न असतात. कोबाल्ट युनिटमधून गेल्या अनेक वर्षापासून आम्ही 30 हजारांहून अधिक रुग्णांवर मोफत उपचार केले आहेत. अतुलसुद्धा माझ्यासारखा थोडा संयमी व्हायला लागला आहे. 2006 सालापासून अतुलने सक्रिय राजकारण सुरु केले. तेव्हापासून त्याच्यामध्ये अनेक बदल झाले आहेत. प्रयत्नांती परमेश्वर हे या उक्तीप्रमाणे प्रयत्न करून अतुलने आमदारकी खेचून आणली आहे. त्यांने केलेल्या कामामुळे पक्षानेही अतुलला चांगला न्याय दिला आहे. भविष्यात तो अजून चांगले काम करेल. शिवाजी स्टेडियमसाठी 100 कोटी रुपये आणले आहेत. आपल्या जाण्यानंतर आपल्या पाऊलखुणा मागे राहिल्या पाहिजेत असं काम व्हायला पाहिजे. आरोग्य सेवा, आरोग्य विद्यापीठ हे नाव कायमस्वरूपी राहणार आहे. यशवंतराव चव्हाण यांनी राबविलेल्या योजनांमुळे आपण आजही त्यांचे नाव घेतो. कृष्णा रुग्णालय उभं राहण्यामध्ये चव्हाण साहेबांबरोबरच वसंतदादा पाटील यांचे फार मोठे योगदान आहे.
प्रश्न ..जयवंतराव आप्पा यांनी मला एक गोष्ट सांगितली होती, मला चांगले लोक मिळाले म्हणून मी एवढे मोठे काम करू शकलो. हे खरं आहे का...........
उत्तर... हो, हे बरोबर आहे. हे टीमवर्क आहे. इतक्या विविध अडचणी असतात, कुठलेही काम करताना लोक तुमच्यासोबत असतील तर तुम्ही काहीही करू शकता. फक्त लोकांची साथ पाहिजे. एखादी वस्तू विकायची म्हणलं तरी सुद्धा लोकांची गरज लागतेच. लोकं बरोबर नसतील तर आपण काही करू शकलो नसतो. संस्थेत किती इक्विपमेंट आहेत..... किती इमारती आहे...... याच्यावर त्या संस्थेचे मूल्यमापन होत नाही. तर संस्थेत काम करणारी माणसं किती मोठी आहेत, त्यावर त्या संस्थेची किंमत ठरते. आज आमच्या दवाखान्यात जेवढा आमच्या वॉर्ड बॉयला किंमत दिली जाते सन्मान दिला जातो, तेवढाच सन्मान मोठ्या पदावरील डॉक्टरांना दिला जातो. अजून दुसरा कॅम्पस आम्ही निर्माण करत आहोत. काम अजून वाढवायचे आहे, जोपर्यंत शरीर साथ देतंय तोपर्यंत काम करीतच राहणार आहे. राजकारणातून निवृत्तीचा एक भाग असतो. मुळातच रिटायरमेंटचा कन्सेप्ट वेगळा असतो. मनापासून रिटायर होणे एक आणि कामापासून वेगळं होणं असे रिटायरमेंटचे प्रकार आहेत. आयुष्यभर जे काम केलं आहे, त्याच्यापासून आपण बाजूला राहू शकत नाही.
२१ मे २०२५
प्रतिभाशाली युवा लेखक यशराज देसाई
प्रतिभाशाली युवा लेखक.....यशराज देसाई
राजकारणी लोकांच्या घरी राजकारणी, डॉक्टरांच्या घरी डॉक्टर, शिक्षकाच्या घरी शिक्षक,आयपीएस अधिकाऱ्यांच्या घरी आयपीएस किंवा सैनिकांच्या घरी सैनिक जन्माला येतो,अशी अनेक उदाहरणे आपण पाहिली असतील. पण राजकारणी लोकांच्या घरी एक लेखक जन्माला येतो आणि तो अवघ्या वयाच्या 27 व्या वर्षी तत्त्वज्ञान विषयक हे पुस्तक लिहितो असे उदाहरण क्वचितच पाहायला मिळते.
होय, असा एक तरुण आहे आपल्या पाटण तालुक्यात. विनम्र आणि तितकाच डॅशिंग आणि उंचपुरा अशा युवा लेखकाला भेटण्याचा योग नुकताच मला आला. खरंतर या पुस्तकाचे प्रकाशन दोन वर्षांपूर्वीच झालं आहे पण त्यानंतरच्या कालावधीत त्यांना भेटण्यासाठी मला वाट पहावी लागली. परवा वेळ घेऊन त्यांना भेटायला गेलो. दुपारी बारा वाजताची वेळ ठरलेली होती. साडे अकरा वाजताच त्यांच्या कार्यालयातून मला फोन आला 'कुठे पोहोचला आहात' त्यावेळी मी विहे घाटात होतो. पुढच्या पंधरा-वीस मिनिटात मी माझे मित्र धवल जाधव यांच्या समवेत त्यांच्या कार्यालयात अर्थात लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्यावर मरळी येथे पोहोचलो.
मी मगापासून बोलतोय तो युवा लेखक दुसरे कोणी नसून लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई आहेत. त्यांचे वडील सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पर्यटन मंत्री आहेत. 'लिविंग द ग्रेटर लाइफ' या इंग्रजी पुस्तकाचे लेखक यशराज शंभुराज देसाई... राजकारण्यांच्या घरात जन्माला आलेला एक प्रतिभाशाली लेखक. 27 व्या वर्षी तत्त्वज्ञान विषयक पुस्तक लिहीणं हे काय वय नाही. मात्र लोकनेते बाळासाहेब देसाई यांचा वारसा, लहानपणापासून आई-वडिलांचे संस्कार आणि तितक्याच कडक शिस्तीत वाढलेल्या आणि शिक्षणालाच महत्त्व देणाऱ्या देसाई कुटुंबाने महाविद्यालयाने शिक्षण पूर्ण होईपर्यंत यशराज देसाई यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करायला सांगितले, राजकारणापासून त्यांना थोडं लांब ठेवले होते. यशराज देसाई यांनी सातारा येथील मोना स्कूल येथे शालेय शिक्षण पूर्ण केले व त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (MIT), पुणे येथून स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच त्यांच्या मनात काही विचार घोळत होते, सकारात्मक विचारातून आयुष्यात कसं पुढे जायचं ? आयुष्यात काय केले पाहिजे, कसे राहिले पाहिजे लाइफ म्हणजे काय आहे यावर त्यांनी केलेल्या सखोल चिंतनातून जगण्याची प्रेरणा कागदावर उतरवली. Living The Greater Life: It is what you and I do हे इंग्रजी पुस्तक जन्माला आलं. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन झालं.
"Living the Greater Life" हे पुस्तक आपल्या जीवनातील न बोलल्या जाणाऱ्या सत्यावर भाष्य करतं. प्रौढ वयात आपण स्वतःपेक्षा मोठ्या जबाबदाऱ्या घेतो – समाज, संस्था, आणि इतरांच्या भल्यासाठी. यामुळे आपल्याला नेहमीच "आपण काय करायला हवं आहे" यानुसार जगावं लागतं, जे "आपण कोण आहोत" यापेक्षा वेगळं असतं. डिजिटल जग, विशेषतः सोशल मीडिया, आपल्याला सतत प्रभावित करतं. या प्रभावामुळे आपले विचार, निर्णय, आणि जीवनशैलीही बदलते – जे कधी कधी आपल्याला खऱ्या आयुष्यातून दूर नेतं.
हे उच्च जीवन जगताना आपल्याला अनेकदा दोन व्यक्तिमत्त्वे बाळगावी लागतात – एक बाह्य जगासाठी आणि दुसरं आपल्यासाठी. याचा मानसिक ताण, गमावलेले क्षण आणि पश्चात्ताप यांचं ओझं वाटू लागतं. शेवटी एक प्रश्न सतत मनात राहतो. ही मोठी ('Greater') जीवनशैली खरंच जगण्यासारखी आहे का? आणि जर आपण ती जगलो नाही, तर काय?
यावर यशराज देसाई यांनी यावर आपल्या साध्या आणि सोप्या लेखणीतून पुस्तकातून प्रकाश टाकला आहे, आपली मतं व्यक्त केली आहेत, उपाययोजना सुचवल्या आहेत.
लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे नातू असणारे यशराज देसाई सध्या राजकारणात ऍक्टिव्ह आहेत. सध्या ते लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याचे चेअरमन म्हणून काम पाहत आहेत. फलटण येथील निंबाळकर घराण्यातील उच्चशिक्षित युवती सोबत त्याचा नुकताच विवाह झाला आहे. इंग्रजी पुस्तकाचे लेखक म्हणून त्यांनी साहित्य क्षेत्रात पाऊल ठेवले आहे आणि याच एका कारणामुळे यशराज देसाई यांना भेटावे अशी माझी इच्छा होती. या भेटीत आम्ही दोघांनी त्यांचं पुस्तक आणि साहित्य याशिवाय कोणतीही चर्चा केली नाही. पुस्तक निर्मितीचा प्रवास मांडताना महाविद्यालयीन जीवनातील काही आठवणी सांगितल्या.
यशराज देसाई यांना भेटल्यानंतर एका युवा साहित्यकाला भेटून आनंद झाला. भविष्यात त्यांनी उद्योग क्षेत्रातील करिअर आणि आव्हाने यावर लिखाण करावे. वडील शंभूराज देसाई यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांनी कमी वयात साखर कारखान्याचे चेअरमन म्हणून कार्यभार स्वीकारला आहे. साखर कारखान्यातील बदलती परिस्थिती,भविष्यात कारखान्यासमोरील आव्हाने आणि उपाय यावर त्यांचा हळूहळू अभ्यास होईल आणि या अभ्यासातून त्यांनी उद्योजकांना मार्गदर्शक पुस्तकाचे लेखन करावे अशा मी त्यांना शुभेच्छा दिल्या. लेखक यशराज देसाई यांना भेटून वेगळी प्रेरणा मिळाली.
...सतीश मोरे सतिताभ
9881191302
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)
Featured Post
ना बोलना जरूरी है
*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...
-
*अंतरंग* *परिसे गे सुनेबाई |* *नको वेचू दूध दही ||१* *आवा चालीली पंढरपुरा |* *वेसींपासुन आली घरा ||२* *ऐके गोष्टी सादर बाळे |* *करि जत...
-
प्रतिभाशाली युवा लेखक.....यशराज देसाई राजकारणी लोकांच्या घरी राजकारणी, डॉक्टरांच्या घरी डॉक्टर, शिक्षकाच्या घरी शिक्षक,आयपीएस अ...
-
डाॅ बाबासाहेब आंबेडकर जयंती विशेष 2 जानेवारी 1940 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर कराडात आले होते. कराड मुन्सिपाल्टीने त्यांना या...