फॉलोअर

०४ जानेवारी २०२४

सिकंदर प्रेमी संजय


नमक हलाल पहायला 
सायकलवरून टिबल सीट सातारला 
जाणारा अमिताभ बच्चन प्रेमी.... संजय शिंदे 

संजय शिंदे ...
एक कट्टर बच्चन प्रेमी... 
एक चांगला माणूस ...
एक कुटुंबवत्सल व्यक्ती 
आणि दिलदार मित्र 
संजय शिंदे यांचा आज वाढदिवस आहे . 
त्यानिमित्त ....

संजय शिंदे, कराडचे लोकप्रिय नगरसेवक. शिंदे आमचे पाहुणे आहेत. जुनी ओळख आहेच , होती. तरीही ही त्यांची माझी ओळख वादातून झाली. त्यांच्या आई नगरसेविका होत्या.पुढारीमध्ये नगरपालिका सभेतील एक बातमी प्रसिद्ध झाली होती. त्या बातमी बाबत संजय शिंदे यांनी मला नोटीस पाठवली. आम्ही छापलेली बातमी किंवा त्यांनी दिलेला खुलासा या दोन्ही त्या त्या ठिकाणी योग्य होत्या. राजकीय लोकांनी काही कारणास्तव त्यांना तसे करायला भाग पाडले होते, हे त्यांनाही आणि मलाही समजलं आणि पुढे आमच्यातले गैरसमज दूर झाले आणि आम्ही चांगले मित्र झालो. पुढे त्यांच्या प्रत्येक निवडणुकीत मित्र म्हणून मी त्यांच्यासोबत राहिलो. 

आमची मैत्री घट्ट झाली ती 2015 सालापासून. त्याचं कारणही तसंच होतं. त्यांच्या आणि माझ्यातील एक समान धागा होता तो म्हणजे अमिताभ बच्चन. संजय शिंदे यांचे बच्चन प्रेम आणि अभ्यास खरच अफाट आहे. त्यांचं बच्चन प्रेम माझ्यासारखंच लहानपणापासून आहे. संजय शिंदे यांच्या नावाची सुरुवात S ने होते आणि माझ्याही नावाची. एस फॅक्टर आमच्यामध्ये इतका घट्ट होत गेला, आमची मैत्री तशीच मजबूत होत गेली.अमिताभ बच्चन प्रेमी ग्रुप 8 जानेवारी 2015 रोजी स्थापन झाला. तेव्हापासून संजय शिंदे या ग्रुपचे संस्थापक ॲक्टिव्ह मेंबर आहेत. शिंदे यांचे दोन बंधू विकास आणि प्रकाश. तेही बच्चन प्रेमी आहेत. त्या तिघांच्या बंधुप्रेमाचा मला अनेकदा अनुभव आलेला आहे. हे तिघे भाऊ सकाळ आणि संध्याकाळ रोज एकत्र येतात, गप्पा मारतात. त्यांनी जी इमारत बांधली आहे त्या ठिकाणी अशी व्यवस्था केली आहे की तिघांनी एकमेकाला भेटलंच पाहिजे. हे तिघे एकदा बच्चनचा नमक हलाल चित्रपट बघायला कराड ते सातारा सायकल वरून टिबल सीट गेले होते. एकाचे वय १७, एकाचे १४ आणि संजय शिंदे यांचं वय ११. विचार करा.. कराड ते सातारा ५४ किलोमीटर अंतर, तेही ट्रिपल सीट जाणारे हे बालक शिंदे बंधूं. त्यांच्या बच्चन प्रेमाविषयी काय बोलावं. म्हणूनच म्हणतो संजय शिंदे यांचा सारखा बच्चन प्रेमी होणे अवघड आहे. 

संजय शिंदे यांचे एक फार मोठे स्वप्न होते ते स्वप्न पूर्ण करण्यात माझा वाटा होता आणि ते संजय शिंदे कधी विसरत नाहीत. अमिताभ बच्चन यांना भेटायची इच्छा कुणाची नसेल! संजय शिंदे यांची सुद्धा होती.आयुष्यात मला आता काही नको फक्त एकदा अमिताभ बच्चन भेटायचे आहे, ती भेट तुम्ही मला करून द्या, असे संजय शिंदे मला वारंवार बोलले होते. अखेर तो दिवस उजाडला. पाच सप्टेंबर २०१९ रोजी अमिताभ बच्चन ग्रुप मधील आम्ही पन्नास जण एकाच वेळी केबीसी सेटवर गेलो होतो त्यात संजय शिंदेही होते. बच्चन भेटीचा अनुभव संजयजी अजूनही मला आजही सांगतात की अमिताभ बच्चन समोर आल्यानंतर त्यांचे अंग थंड पडले होते, विश्वास बसत नव्हता. अमिताभ बच्चन यांची पहिली भेट अजूनही संजय शिंदेच्या स्मरणात आहे. कधी कधी हा विषय निघाल्यानंतर ते अतिशय नम्रपणे मला म्हणतात, मोरे साहेब मी तुम्हाला कधी विसरणार नाही.तुम्ही माझ्या आयुष्यातलं एक असं स्वप्न पूर्ण केला आहे जे पूर्ण होईल का नाही याची मला खात्री नव्हती.

संजय शिंदे यांचा आज वाढदिवस आहे. अजून खूप लिहिता येईल त्यांच्याविषयी मात्र आता एवढेच सांगेन, एक चांगला नगरसेवक, एक चांगला मित्र, कोणत्याही गोष्टीसाठी सतत तात्काळ उपलब्ध होणारा, 'मुकंदर का सिकंदर' हा चित्रपट ज्यांना खुप आवडतो, अशा कराडच्या सिकंदर मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

सतीश मोरे सतिताभ
९८८११९१३०२

१९ डिसेंबर २०२३

जीवन शिक्षण विद्या मंदिर @ करवडी'


*जीवन शिक्षण विद्या मंदिर @करवडी* 

करवडी गावातील दिवस खुप रम्य होते. बालपणीचे, शालेय जीवनातील दिवस तर त्याहून वेगळे होते. एसटी स्टँड पाठीमागे माझी प्राथमिक शाळा होती,आहे. *शाळेला 'जीवन शिक्षण विद्या मंदिर, करवडी' असे नाव होते. खरंच जीवन शिक्षण विद्यामंदिर हे नाव किती सार्थ आहे हे त्या सरकारी शाळेत शिकलेले आहे त्यांनाच कळू शकेल*. या चारही शब्दाची आपण जर फोड केली तर आज शाळेत काय काय शिकलं, शिकले पाहिजे आणि काय शिकवलं जातं शिकवायला हवं, हे उमगेल.

जीवन शिक्षण...जीवन जगण्याचं शिक्षण देणारं केंद्र म्हणजे ही शाळा. शिक्षण म्हणजे काय.क्षणाक्षणाला शिकले पाहिजे, काहीतरी नवीन आत्मसात केले पाहिजे, हे शिकवणारे केंद्र म्हणजे माझी शाळा. विद्या मंदिर.. विद्या एखाद्या क्षेत्रात, विषयात पारंगत होणे आणि ती विद्या देणारी ही शाळा. एखाद्या विषयाचा खोल अभ्यास करणे, सतत अभ्यास करत राहणं आणि हे देणारं केंद्र म्हणजे शाळा. शेवटचा शब्द आहे मंदिर. खरंच हे शाळा एक मंदिर असतं. जिथे ज्ञानाची पूजा केली जाते, ज्ञान हा देव असतो.शिक्षक गुरु असतात. शाळेची इमारत सुधारणा मंदिर असते. आपण देवाच्या मंदिरात कशासाठी जातो शांतता मिळवण्यासाठी, काहीतरी मागण्यासाठी. शाळा रुपी मंदिरात आपण ज्ञानार्जन करण्यासाठी जातो आणि हे मिळवलेले ज्ञान पुढच्या आयुष्यात आपल्याला खूप उपयोगी पडते. देवाच्या मंदिरात शांतता मिळते आणि देवाचा आशीर्वाद मिळतो आणि आपण देवाला काहीतरी मागतो. शाळा रुपी मंदिरात जे ज्ञान मिळते हे ज्ञान मिळून आपण शहाणे होतो, पुढे पारंगत होतो, नोकरीला लागून पैसे मिळवतो, सुखी होतो आणि पुढच्या पिढीला हे ज्ञान देतो. 

*२००० सालच्या दरम्यान कुणा अतिहुशार अधिकाऱ्याच्या कि शिक्षण मंत्र्यांच्या डोक्यात काय आलं कुणास ठाउक! त्यानं जीवन शिक्षण विद्या मंदिर हे नाव बदलून प्राथमिक शाळा असं केलं. कदाचित काही पुरोगामी लोकांच्या लोकांना 'मंदिर' हे नाव नको असेल म्हणून त्यांनी हे नाव बदलून टाकलं. असो..कालाय तस्मै नमः* 

"जीवन शिक्षण विद्या मंदिर करवडी" ही माझी शाळा खरंच संस्काराचं केंद्र होती, एक मंदिर होतं, आनंददायी ठिकाण होतं. माझं पहिली ते चौथी शिक्षण या शाळेत झालं. सुहास पिसाळ, रमेश पिसाळ, अरविंद पिसाळ, अनिल बनसोडे, रवि सुतार हे माझे वर्गमित्र. मला आठवतंय या शाळेत जाताना आम्हाला खूप आनंद व्हायचा. शाळा दहा वाजता असली तरी आम्ही मित्र साडेनऊ वाजता शाळेत जाऊन बसायचो. दप्तर कोपऱ्यात ठेवून मग आमचे खेळ सुरू व्हायचे. गुरुजी आल्यानंतर वर्ग उघडायचे. *माझ्यासहित सर्व विद्यार्थ्यांना पहीलं एकच काम असायचं शाळेचा परिसर स्वच्छ करणे*. शाळा स्वच्छ करण्यासारखी मजा खरंच कुठे नसेल.खराटे तिथे नसायचे मग आसपासच परिसरातील निरगुडी शोधायची. निरगुडी तोडायची आणि खराटा तयार करायचा. काही जणांकडे वर्ग स्वच्छ करण्याचे काम असायचे. कोपऱ्यात केरसुणी ठेवलेली असायची, ती घेऊन काही मुले मुली वर्ग स्वच्छ करायचे. त्याकाळी वर्गामध्ये थोड्याच फरश्या होत्या? साधी शेणाने सारवलेली खडबडीत जमीन. प्रत्येक शनिवारी आम्हाला वर्ग सारवायचे वेगळं काम असायचं. आसपास रस्त्यावर पडलेलं शेण गोळा करायचं आणि शाळा सारवायची. आपली शाळा आणि वर्ग स्वच्छ ठेवणे, सारवणे हे शिक्षण एवढ्या छोट्या वयात मिळालं होतं. म्हणून तर म्हणलं ना ही शाळा म्हणजे जीवन कसं जगायचं हे शिकवणारे एक मंदिर आहे. हे सारं करून मग प्रार्थनेसाठी उन्हात उभं रहायचं.  

सुर्यवंशी बाईंचा मी लाडका विद्यार्थी. मधल्या सुट्टीत मी घरी जेवायला गेलो की भाजलेले शेंगदाणे घेऊन यायचो आणि बाईना द्यायचो. बाईंनी माझ्या कडून पाढे छडी लागेने पाठ करवून होते.माझ्या शाळेतील पहिली ते चौथीचे वर्ग मला आजही आठवतात. आता ती शाळा काही अंशी पाडली आहे, जुन्या शाळेचा काही भाग अजून शिल्लक आहे. या शाळेने आम्हाला खूप काही दिलें आहे. आजही या शाळेत जायला मला फार आवडते. घरासमोरच शाळा असल्यामुळे शाळा सुटल्यानंतर शाळेचे पटांगण म्हणजे आमच्यासाठी सारं काही असायचे. क्रिकेट हा तसा त्याकाळी थोडा महागडा खेळ होता. मग या शाळेच्या पटांगणावर सुरपाट्या, कबड्डीचे ग्राउंड आखले जायचे. रात्रीच्या अकरा बारा पर्यंत इथे खेळ चालायचे. विट्टी दांडू आणि गट्टया तर आवडते खेळ. या खेळात आम्ही इतकं रमायचे की घरची आठवण येत नसे. काही मित्रांची आई टिकारणं घेऊन यायची तेव्हा आमचा खेळ संपायचा. 

शाळेच्या परिसरात अनेक झाडे होती.आमच्या घरासमोरच शाळेच्या कंपाऊंड लगत एक वड आणि दोन बाभळीची झाडं होती. ही तिन्ही झाडे आता अस्तित्वात नाहीत. पण या झाडाखाली आम्ही खेळलेले खेळ, दुपारच्या सुट्टीत मारलेल्या गप्पा आजही आठवतात. या झाडाखाली बसून उन्हाच्या सुट्टीत खाल्लेले गारीगार आणि त्याची चव आजही जिभेवर रेगाळत आहे. कधी कधी माकडवाला यायचा, मग माकडाचे खेळ या झाडाखालीच व्हायचे. चौथीला मला या शाळेत 74 टक्के मार्क मिळाले माझा वर्गात दुसरा नंबर आला होता. पहिला नंबर अनिल बनसोडे किंवा रवी सुतारचा आला असेल. एवढे चांगले मार्क मिळाल्यानंतर माझ्या वडिलांच्या तीव्र इच्छेनुसार पाचवीला मला १९८२ साली कराडच्या टिळक हायस्कूलमध्ये दाखल करण्यात आले. टिळक हायस्कूलचा प्रवास खूप सुंदर आहे, त्यावर लिहीनच पुढे कधी तरी. मात्र करवडी येथील प्राथमिक शाळेतील या आठवणी हृदयावर कोरलेल्या आहेत. माणूस कितीही मोठा झाला तरी आपली पहिली शाळा विसरू शकत नाही. जीवन शिक्षण विद्या देणारी माझी शाळा आणि त्या शाळेतील सर्व शिक्षकांना वंदन !

लेखन @कृष्णा विद्यापीठ कॅम्पस सेन्ट्रल गार्डन 

*सतीश वसंतराव मोरे*
सतिताभ 
9881191302

१८ डिसेंबर २०२३

Save me I am the Oldest Tree here



Save me I am the Oldest Tree here
धन्यवाद डॉ. सुरेश बाबा, Dr.Suresh Bhosale  एक झाड वाचवल्याबद्धल !

पत्रकार परिषद असो वा एखाद्या नातेवाईकांना रुग्णालयात भेटण्यासाठी जाण्याच्या कारणासाठी असो, कराडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये आणि कृष्णा विद्यापीठ परिसरात जाण्याचा योग मला अनेकदा येतो. या परिसरात गेल्यानंतर कृष्णा विद्यापीठ हे केवळ कराडचेच नव्हे तर जिल्ह्याचे, अवघ्या महाराष्ट्राचे वैभव आहे याचा पदोपदी अनुभव येतो. परवा कोल्हापूरला एका पाहुण्यांकडे गेलो होतो. तेव्हा त्या पाहुण्यांनी मला सहज एक गोष्ट बोलून दाखवली, "पुण्यानंतर शैक्षणिक आणि आरोग्याचे माहेरघर आणि सर्वात मोठे केंद्र कोणतं असेल तर तुमचं कराड ! " छाती एवढ्या अभिमानाने फुलून आली होती काय सांगू !आपल्याला हा एवढा मोठा बहुमान मिळण्याचे कारण म्हणजे कराडचं मोठं कृष्ण हॉस्पिटल आहे. 

कृष्णा हॉस्पिटलच्या इतर उपक्रमाबाबत मला आता बोलायचे नाही.आज मला सांगायचे आहे कृष्णा विद्यापीठ परिसरात राबवलेल्या एका वेगळ्या उपक्रमाविषयी. देवयानीला आगाशिवनगर मध्ये क्लासला सोडल्यानंतर आज जिमला सुट्टी असल्यामुळे काय करायचे असा विचार करून मी कृष्णा विद्यापीठ कॅम्पस मध्ये प्रवेश केला. आज संपूर्ण कृष्णा विद्यापीठ कॅम्पस परिसर फेरफटका घालायचा असा विचार करून मी कृष्णा सरिता बाजारच्या बाजूने आत प्रवेश केला.

आदरणीय स्व.जयंतराव भोसले आप्पा यांच्या समाधीस्थळला अभिवादन करून पुढे वळसा घालून आलो .रस्त्याच्या बाजूला भव्य जिमनॅसीयम, महिला होस्टेल्स, नर्सिंग स्कूलच्या इमारती तसेच निवासी इमारती डोळे दिपून घेत होत्या. आपण कराडमध्ये आहोत की परदेशात आहोत असं वाटत होतं. या इमारतीच्या चारी बाजूला, सभोवताली शेजारी, अलीकडे, पलीकडे जाणीवपूर्वक निर्माण केलेली हिरवाई आणि वृक्षलागवड पाहून मन प्रसन्न होत होते. एवढी सुंदर आणि मोहक झाडे या ठिकाणी लावलेली आहेत की आपण या झाडांच्याच प्रेमात पडतो. ही झाडे पाहून मनाला आनंद तर मिळतोच तर शिवाय आपणही झाडांच्या इतकं उंच व्हावं, सतत हिरवगार राहावं आणि ऊन वारा पाऊसरूपी कसलंली संकट आली तर खचू नये, एवढं मात्र नक्की शिकायला मिळतं.


तसाच पुढे गेल्यानंतर कृष्णा विद्यापीठ परिसरातील फार्मसी कॉलेजच्या समोर रस्त्यावर येऊन माझी पावले थांबली. रस्त्याच्या मध्यभागी एक भला मोठा वृक्ष उभा होता, या वृक्षाला वळसा घालून रस्ता पुढे गेला होत. हा वृक्ष रस्त्याच्या मध्यभागी येऊन सुद्धा त्याला वाचवण्याचा प्रयत्न कृष्णा विद्यापीठाने तथा डॉक्टर सुरेश भोसले बाबा यांनी केल्याचे पाहून खूप आनंद झाला. मध्यभागी असलेल्या या वृक्षाला संरक्षित करून 'मी सर्वात जुना वृक्ष आहे आय एम द ओल्डेस्ट हिअर ' अशी सोनेरी पाटी या झाडावर लावलेली पाहायला मिळाली. येथून रस्ता जात असताना मध्यभागी आलेला हा महाकाय वृक्ष तोडणे खरंतर फार अवघड नव्हते. हा वृक्ष तोडून आणखीन शंभर झाडे कृष्णा विद्यापीठात डॉक्टर सुरेश बाबा भोसले यांना लावता आली असती .मात्र सर्वात जुना हा वृक्ष वाचवण्यासाठी त्यांनी जो प्रयत्न केला, त्या प्रयत्नाला खरंच दाद दिली पाहिजे, सलाम केला पाहिजे. 

रस्त्याच्या मध्यभागी  असे महाकाय वृक्ष आणि आणि उंच डेरेदार वृक्ष आपण या अगोदर पाहिले असतील. पण ही दृश्यं अमेरिका ,इंग्लंड, फ्रान्स  अशा पाश्चात्त्य देशात पाहायला मिळतात. काळाच्या ओघात रस्ते रुंदीकरण आलेच, रस्ते मोठे झाले पाहिजेत. मात्र रस्ता जिथून जातो तिथे जर जुने वृक्ष येत असतील तर ते वृक्ष वाचवण्याचा प्रयत्न आपण नक्की केला पाहिजे. रस्ते कुठेही बांधता येतील मात्र जुने वृक्ष पुन्हा तिथे उभं करणे अवघड असते. हाच दृष्टिकोन डोळया ठेवून समोर ठेवून डॉक्टर सुरेश बाबा भोसले यांच्या कल्पकतेतून कृष्णा विद्यापीठ परिसरातील हा उंच वृक्ष वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्याबद्दल खरंच कृष्णा विद्यापीठ प्रशासन आणि डॉ. सुरेश बाबा भोसले यांचे आभार मानावे तितके थोडे आहेत. हा वृक्ष पाहून त्यानंतर मी पुढे असलेल्या लायब्ररी समोरील सेंटर पार्क मध्ये गेलो. तिथेही अशाच प्रकारचा उंच असा एक पिंपळ वृक्ष जपला आहे. या झाडाशेजारी बसूनच हे सर्व लिहिण्याचा आनंद मला लुटला.


वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे..!

सतीश मोरे सतिताभ
९८८११९१३०२

ता.क.
हा ब्लॉग लिहून झाल्यानंतर त्या वृक्षसंवर्धन डॉ. विनायक भोसले यांना फोन केला.  यावेळी त्यांनी  एक इंटरेस्टिंग माहिती सांगितली. कृष्णा विद्यापीठ परिसरात जे वृक्ष, झाडी आणि हिरवाई फुलली आहे, या सर्व झाडांना पाणी कुठून येते ? कृष्णा रुग्णालयात बाथरूम ,वॉश बेसिन मध्ये वापर करून जे सांडपाणी गोळा होते, ते सर्व पाणी एका ठिकाणी गोळा केले जाते. या ठिकाणी उभारण्यात आलेल्या एटीपी प्लांटमध्ये हे सर्व पाणी आणून ते स्वच्छ केले जाते आणि हे स्वच्छ केलेले पाणी पाईप लाईन मधून या सर्व झाडांना घातले जाते, असे विनायक भोसले यांनी मला सांगितले. पर्यावरणप्रेमी डॉ. सुरेश बाबा भोसले यांच्या या कल्पनेला दाद दिली पाहिजे.

#Vinayak Bhosale  #savetrees #oldesttrees

२७ ऑक्टोबर २०२३

तुम अतीत़ हों...


तुम अतीत़ हों...

गेलेला काळ, बीता हुआ कल किंवा अतीत म्हणा.. एक सुखद किंवा दुःखद आठवणीने भरलेला असतो. या काळात आपल्याला अनेक सुखद आठवणीने भरून ठेवलेलं असतं. जुन्या आठवणी आपल्याला ताज्यातव्याना करतात, आनंद देतात.. तर कधी कधी दुःखही देतात. 

लहानपणीचा काळ सुखाचा असं म्हणतात,पण 'बिता हुआ कल' म्हणजे फक्त लहानपणीचा काळ नव्हे तर तुमच्या गत आयुष्यात घडलेल्या सुखद घटना किंवा तुमच्या आयुष्यात टर्निंग पॉईंट देणाऱ्या काही प्रेरणादायी घटना तसेच तुम्हाला उध्वस्त करणाऱ्या काही दुःखद घटनाही असतील. या घटना तुम्ही आयुष्यभर कधी विसरत नाही, तो क्षण देणारी ती व्यक्तीही कधी विसरू शकत नाही.

हा 'अती़त'' आपल्याला काही गोष्टी शिकवून जात असतो, परिणाम देत असतो. 'त्या' सोबत राहायला माणसाला खूप आवडतं. असं म्हणतात आयुष्यात घडून गेलेल्या गोष्टीचा विचार करायचा नसतो,सतत पुढे जायचं असतं. 'सिलसिला' मध्ये संजीव कुमार पत्नी रेखाला एक गोष्ट बोलून जातो, 'अती़त को एक मिठी याद समझ़कर भूल जाना चाहिए'... पण हा 'अती़त' विसरणं अशक्य असतं जर तो अती़त एखादी व्यक्ती असेल तर. कारण त्या व्यक्ती सोबतच्या आठवणी तसेच घडलेल्या काही गोष्टी आपल्या मनावर अतिशय खोलवर बिंबलेल्या,कोरलेल्या असतात. त्या गोष्टी किंवा ती व्यक्ती आपण कधीच विसरू शकत नाही. 

'बिता हुआ कल' प्रेरणादायी असतो, वेदनादायी असतो, सतत जवळ असतो त्रासदायक पण असतो. मात्र अनेकदा आपल्याला जेव्हा पुन्हा वाईट प्रसंग येतात तेव्हा तो जुना काळ आठवला की तो कल, ती आठवण 'औषध' म्हणूनही काम करत असतो. अशा या 'अतीत' विषयी सहज चार ओळी बाहेर पडल्या...

तुम अतीत़ हो...
पर सबसे करीब हों !

तुम अतीत़ हों...
पर सबसे खुब़सुरत हों !

तुम अतीत़ हों...
पर तकलिफें खुब़ देते़ हों !

तुम अतीत़ हों...
पर दवा़ भी तुम ही़ हों !

सतीश मोरे सतिताभ
२७.१०.२०२३

१३ ऑक्टोबर २०२३

बेमिसाल अमिताभ आणि अमिताभ बच्चन प्रेमी ग्रुप

*बेमिसाल अमिताभ ...!*
*बेमिसाल अमिताभ बच्चन प्रेमी ग्रुप !*
*होय हे पुन्हा एकदा सिद्ध झालं !*

अमिताभ बच्चन यांच्यावर नितांत प्रेम करणारा एक ग्रुप म्हणून अमिताभ बच्चन प्रेमी ग्रुपची सातारा जिल्ह्यात ख्याती आहे. सिनेमा कलाकारांसाठी काहीही करणारे जगभरात भरपूर आहेत पण एखाद्या कलाकारावर , त्यांच्यावर वेड्यासारखं प्रेम करणारे अमिताभ बच्चन प्रेमी खूप कमी आहेत.

पडद्यावरचा अमिताभ बच्चन आमच्या बच्चन प्रेमींना आवडतोच.मात्र पडद्या बाहेरचा, 58 व्या वर्षीही संघर्ष करणारा, कर्जबाजारी असूनही न डगमगणारा, कुणाच्याही दारात काम मागण्यासाठी जायला न कचरणारा, 'तुमचे सर्व कर्ज किती आहे या चेकवर लिहा , मी सारं फेडतो' अशी अंबानी यांची ऑफर न स्वीकारता काम मागणारा अमिताभ. स्वाभिमानी आणि अभिमानी अमिताभला पुढे मोहब्बते चित्रपट मिळतो, पुढे केबीसी मिळतं आणि पुन्हा 'डॉन' ' महा डॉन' होतो. ही कोणत्या चित्रपटाची स्टोरी नाही तर ही सत्य घटना आहे. आणि हाच अमिताभ बच्चन आम्हाला खुप आवडतो.

बेमिसाल अमिताभ बच्चन यांच्यावर प्रेम करणाऱ्या आमच्या बच्चन प्रेमी ग्रुपने अमिताभ बच्चन यांच्या 91 व्या वाढदिवसानिमित्त "बेमिसाल अमिताभ" हा दृकश्राव्य गाण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. टाऊन हॉलमध्ये आयोजित या कार्यक्रमाला कराड आणि तालुक्यातील अमिताभ बच्चन प्रेमी आणि प्रेक्षकांचा अतिशय लाजबाब प्रतिसाद मिळाला. बच्चन प्रेमी ग्रुपने घेतलेले आज अखेरचे सर्व कार्यक्रम हाउसफुल झालेलेच आहेत,हाही कार्यक्रम तितकाच हाऊसफुल झाला.

 समोर दृकश्राव्य माध्यमातून अमिताभ बच्चन यांना पाहणे, त्यांचे डायलॉग ऐकणे, त्यांची गाणी पाहत पाहत ऐकणे, हे कराडकरांचं नव्हे अवघ्या बच्चन प्रेमींचं स्वप्न होतं.  ते प्रत्यक्षात उतरलं कोल्हापूर,इस्लामपूर येथील  'स्वराभिषेक' प्रसुत आणि कराड येथील ABP कलाकारांनी अतिशय उंची आणि सुश्राव्य आवाजात गायलेली गाणी आणि त्याच वेळेला समोर अमिताभ बच्चन यांना पाहणे हे फार मोठे दिव्य स्वप्न होतं आणि ते स्वप्न सर्वांच साकार झालं. 

एका मागे मागे गाणी होत होती, मधूनच अमिताभ बच्चन यांचे दमदार संवाद पण ऐकायला मिळत होते. कोणीच जागेवरून पण हलत नव्हतं. आता कुठलं गाणं ?आता कुठला डायलॉग पाहायला मिळणार ? याची उत्सुकता लागत होती. प्रेक्षकांच्या मधील उत्सुकता वाढवण्यासाठी ,"कौन बनेगा सबसे बडा अमिताभ बच्चन प्रेमी"  प्रश्नमंजुषा क्विझ  वाढवत होती आणि कार्यक्रम एका उंचीवर नेत होती.

 कोल्हापूर येथील प्रशांत सालियन, इस्लामपूर येथील शेखर गायकवाड आणि त्यांची कन्या राजेश्वरी गायकवाड यांनी हा कार्यक्रम एका उंचीवर नेऊन ठेवला. ज्येष्ठ गायक आणि संगीतकार सुरेश वाडकर यांची शिष्या असलेल्या राजेश्वरीने 'दो लब्जो की है दिल की कहानी' आणि 'तेरे मेरे मिलन की ये रैना' हे गीत सादर करताना  उपस्थितांच्या अंगावर 'रोमटे खडे केले'. तेरे मेरे मिलन की रैना ऐकताना पाहताना अनेकांच्या डोळ्यातून अश्रू आले. प्रशांत सालियन यांनी 'कभी कभी' आणि 'हर किसी बात का मै तरफदार हुं' या गाण्यातून मुकेशला साक्षात समोर उभे केले. संजय बदीयानी यांच्या 'मंजिले अपनी जगह है' या गझलने सर्वांना वेगळ्या विश्वात नेवून ठेवले. सुधाकर बेडके यांच्या 'मै हुं डॉन' आणि डॉक्टर नितीन जाधव यांनी सादर केलेल्या 'देखा ना.. सोचा ना ..हाय रे रख दी  निशाने पे जा' या गाण्याने उपस्थितना डोलायला लावले, नाचायला लावले. मंगेश हिरवे यांनी सादर केलेल्या 'दिल भर मेरे कब तक मेरे' या गाण्याने कार्यक्रमाची उंची आणखीनच वाढवली.


शेखर गायकवाड आणि प्रशांत सालियन यांच्या 'हम प्रेमी प्रेम करना जाने ' या गाण्याने कार्यक्रमाची सांगता झाली. तत्पुर्वी अमिताभ बच्चन प्रेमी ग्रुपचे थीम सॉंग असलेल्या 'हम' मधील 'एक दुसरे से, करते है प्यार हम', या गाण्याने ग्रुपमध्ये 'जान' आणली. सर्व बच्चन प्रेमी यात सहभागी झाले . त्यानंतर सर्वांनी आनंद  साजरा करताना 'मै हु डॉन', 'दे दे प्यार दे' आणि 'अपनी तो जैसे तैसे' या गाण्यावर उपस्थितांसह सर्वांनीच ठेका धरला. कार्यक्रम इतका सुंदर आणि उंचीवर नेऊन ठेवला तो अतिशय उत्कृष्ट अशा नियोजनाने, दृकश्राव्य माध्यमाने आणि सर्व कलाकारांच्या अतिशय सुंदर अशा आवाजाने !

अडीच तास चाललेल्या या कार्यक्रमातून 'अमिताभ बच्चन प्रेमी ग्रुपने' पुन्हा एकदा सिद्ध केले की कार्यक्रम घेण्यात आणि तो यशस्वी करण्यात 'बच्चन प्रेमी' नेहमीच अग्रेसर असतात.


'बेमिसाल अमिताभ' कार्यक्रमाचे प्रायोजक अर्बन ट्रेंडचे संतोष पवार, हॉटेल प्यासाचे बंडा शिंदे आणि गोल्ड पार्टनर गांधी ज्वेलर्सचे धीरज गांधी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. 'कौन बनेगा सबसे बडा अमिताभ बच्चन प्रेमी' या प्रश्नमंजुषा क्विझचि बक्षीस वितरण समारंभ या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. मध्यंतरात सातारा येथील आमच्या ग्रुप मधील बच्चन प्रेमींनी अमिताभ बच्चन यांची प्रेममय आरती करून बच्चन ग्रुपचे संस्थापक या नात्याने मला 'सातारी कंदी' पेढ्याचा हार घातला .पेढ्याचा हार घालण्याची आयुष्यातील ही पहिली वेळ आणि ही संधी मला मिळाली फक्त अमिताभ बच्चन यांच्या प्रेमामुळे, वेडामुळे !

*बच्चन प्रेमीच्या कडून दिलगिरी* 

हा कार्यक्रम पाहण्यासाठी कराडातून अनेक रसिक आले होते. तांत्रिक कारणामुळे हा कार्यक्रम अर्धा तास उशिरा सुरू झाला. काहीना जागा मिळाली, काहीना उभे राहावे लागले. काहीना बाल्कनी जाऊन बसायला लागले किंवा काही जणांना जागा मिळाली नाही म्हणून परत जावं लागलं. याबद्दल आम्ही बच्चन प्रेमी ग्रुप दिलगिरी व्यक्त करतो. तुम्हा सर्व रसिकांच्या ऋणामध्ये आम्ही कायम राहू.


*सेल्फी पॉइंट आकर्षण*

टाऊन हॉलच्या प्रवेशद्वारावर व्हाईट ब्लेझरमधील देखणा अमिताभ आणि मुख्य प्रायोजक असलेल्या अर्बन ब्रँडचा राणा यांचे एक फ्लेक्स लावण्यात आलेले होते. हा उपस्थित बच्चन प्रेमींसाठी हा सेल्फी पॉइंट झालेला होता. या ठिकाणी सेल्फी काढण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. बच्चन ब्रँड किती मोठा आहे याची आम्हाला वेळोवेळी जाणीव होतेच. अमिताभ बच्चन आणि अमिताभ बच्चन प्रेमी ग्रुप ABP यांच्या नावावर कराडातील अनेक कार्यक्रम यशस्वी झालेले आहेत. फार मोठे कार्यक्रम आम्ही घडवू शकलो आहे. या पुढील काळातही अमिताभ बच्चन यांचा प्रत्येक वाढदिवसाला 'अमिताभ बच्चन प्रेमी' कराडकरांसाठी संगीतमय किंवा ज्ञानमय मेजवानी घेऊन येणार आहे. 

*जय अमिताभ बच्चन प्रेमी ग्रुप!*

*धन्यवाद कराडकर* 

*धन्यवाद बच्चन* 

*धन्यवाद टीम ABP*

जय बच्चन ! जय बच्चन !जय बच्चन !

*सतीश मोरे सतिताभ*


११ ऑक्टोबर २०२३

My Amitabh Bachchan at 82 today


🆎 *महानायक अमिताभ बच्चन यांचा आज ८२ वा वाढदिवस..!*🆎

✅अमिताभ बच्चन आणि माझं बच्चन प्रेम याबद्दल मी काय सांगू ?

✅अमिताभ बच्चन यांच्या बाबतीत काय लिहू आणि किती लिहू?

✅अमिताभ बच्चन या विषयावर पारायणे करावी लागतील ऐवढा मोठ्ठा बिग बी आहे !

✅पडद्यावरचा अमिताभ तर माझा जीव की प्राण पण पडद्याबाहेरचा अमिताभ माझा आदर्श आहे.

✅५८ व्या वर्षी कर्जबाजारी होऊन सारं संपलेला अमिताभ पुढं पुन्हा धडाडीनं उभा राहिला, म्हणून तो माझा आयडाॅल आहे.

✅मला अमिताभ बच्चन का आवडतो, त्याचं काय भावतं यावर खूप लिहीलं आहे. माझ्या ब्लॉगवर. त्यापैकी काही लिंक्स आज अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त सोबत पाठवत आहे. वेळ मिळेल तेव्हा वाचा.

*सतीश वसंतराव मोरे सतिताभ* 
 🆎🆎🆎🆎🆎🆎

*11 ऑक्टोबर निमित्ताने 11 ब्लॉग '' माझ्या बच्चन ''वर* 

▶️ https://karawadikarad.blogspot.com/2021/10/blog-post.html?m=1 अमिताभ बच्चन यांच्या पाच भेटी पाच अनुभव 

▶️https://karawadikarad.blogspot.com/search/label/amitabh%20deewar?m=1
आज खुश तो बहोत होंगे तुम दिवार

▶️https://karawadikarad.blogspot.com/2018/11/blog-post.html?m=1 व्हेन सतिताभ मिट अमिताभ 


▶️https://karawadikarad.blogspot.com/search/label/first%20meet%20with%20amitabh?m=1 अमिताभ भेटीची स्वप्नपुर्ती

▶️https://karawadikarad.blogspot.com/2016/10/blog-post_11.html?m=1 अमिताभ बच्चन यांचे जुने फोटो 

▶️https://karawadikarad.blogspot.com/2019/01/blog-post_17.html?m=1 ना बोलना बहोत जरूरी है अग्निपथ

▶️https://karawadikarad.blogspot.com/2016/03/blog-post_24.html?m=1 सिलसिला.. रंग बरसे

▶️https://karawadikarad.blogspot.com/2016/03/blog-post_25.html?m=1 बेमिसाल अमिताभ बेमिसाल सखी

▶️https://karawadikarad.blogspot.com/search/label/shakti%20amitabh?m=1 अमिताभ शक्ति

▶️https://karawadikarad.blogspot.com/2022/11/blog-post_13.html?m=1 अमिताभ उंचाई

▶️https://karawadikarad.blogspot.com/2023/10/blog-post_1.html?m=1 पहिलं अमिताभ पाठमोरं दर्शन १९९६

*अमिताभ बच्चन यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!*

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...