फॉलोअर

०८ नोव्हेंबर २०२२

शांती सागर ते शिवशंकर व्हाया कराड जनता


सतीश मोरे

शांतीसागर ते शिवशंकर व्हाया कराड जनता

कुणी पण यावं आणि टिकली (ढपली) मारून जावं’ अशी अवस्था कराडची झाली आहे. कराड शहर दिसतंय छोटं, वाटतंय छोटंस पण या शहराचा आर्थिक आवाका फार मोठा आहे, ही जाणीव आपल्यातल्या खूप कमी जणांना असेल, मात्र बाहेरच्या संस्थांना आहे. आर्थिक सुबत्त्याने नटलेल्या कराडला लुटण्यासाठी जणू काही वित्तीय संस्था, बँका पतसंस्था यांची चढाओढच लागलेली आहे. नुकतंच शहरातील सुमारे २५ कोटी रुपये ठेवी असणार्‍या शिवशंकर पतसंस्थेला टाळा लागला. गेल्या १५ वर्षात कराड शहरातील नावाजलेल्या दोन बँका, सुमारे २५ हून अधिक पतसंस्था बंद पडल्या आहेत, अनेक खाजगी वित्तीय संस्थांनी कराडकरांना गंडा घालून गाशा गुंडाळला आहे. काही संस्था इतर संस्थामध्ये विलिन करण्यात आल्यात. मात्र बंद पडलेल्या बँका आणि पतसंस्था मधील ठेवीदारांचे पैसे अजूनही मिळालेले नाहीत. बँका पतसंस्था स्थापन करून या माध्यमातून स्वतःची राजकीय दुकानदारी उभी करणे, दोन नंबरचे पैसे एक नंबर करणे, हे पैसे बांधकाम व्यवसायामध्ये लावणे याची जणू कराडमध्ये स्पर्धाच लागलेली आहे. एकावर एक संस्था डुबल्यामूळे या पुढील काळात कुठल्या बँकेत पैसे ठेवायचे असा प्रश्न सामान्य नागरिकाना पडला आहे.

कराडमध्ये पंधरा वर्षांपूर्वी शांतीसागर नावाचे एक मोठी पतसंस्था आली होती. मुळात ही पतसंस्था राजकीय हेतूने स्थापन झालेली होती, हे सर्वांनाच माहित आहे. त्यानंतरच्या काळात कडेगांवची दत्त नागरी, डॉ. पतंगराव कदम पतसंस्था, भुदरगड यासारख्या पर जिल्ह्यातील अनेक संस्था या ठिकाणी आल्या. त्यांनी मोठ्या प्रमाणात ठेवी गोळा केल्या. या ठेवी गोळा करताना मोठ्या व्याजदराचे आमिष दाखवण्यात आले. त्यानंतरच्या काळात पतसंस्थांच्या माध्यमातून राजकारण या हेतूने कराड तालुक्यातील काही राजकीय मंडळींनी पतसंस्था काढल्या. त्या पण बुडीत निघाल्या. पार्ले येथील यशवंत संस्था अशाच कारणामुळे रसातळाला गेली आहे. पुढील काळात कराड मधील देव देवतांच्या नावाने काढलेल्या अनेक पतसंस्था बंद पडत गेल्या. घर, लग्न, भविष्य निर्वाह कारणासाठी ठेवलेले पैसे बुडायला लागले तर दाद कुणाला मागायची असा प्रश्न सामान्य ठेवीदारांना पडला. सरकारने पाच लाखापर्यंत ठेवीला संरक्षण दिले. मात्र एवढ्याच एका कारणामुळे बँका पतसंस्थांवरचा विश्वास वृद्धिंगत झाला, असे नाही. पाच लाखापर्यंत ठेवीला संरक्षण देण्याचे आमिष दाखवून अनेक संस्थांनी ठेवी गोळा केल्या. पैसे गोळा केले.
निनावी नावाने बँकेमध्ये पैसे जमा केले मात्र पुढील काळात या दोन बँकाही बंद पडल्या. आपणास कळले असेल मी कराड जनता सहकारी बँक आणि जिजामाता बँकेविषयी बोलत आहे.
कराड जनता सहकारी बँक रसातळाला जाणार आहे, याची जाणीव बँकेच्या संचालक मंडळांना किंबहुना अध्यक्षांना होती. त्यांनी यातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न केला. मात्र संस्थेमध्ये असणार्‍या निनावी ठेवी, बुडीत कारखानदारांना भरमसाठ प्रमाणात देण्यात आलेली न वसूल होणारी कर्जे अशी अनेक कारणे असल्यामुळे जनता बँकेला वाचवायला कोणी पुढे आलं नाही. शेवटी कराड जनता बँक बुडली. या बँकेवर बंधने आल्यानंतर पुढील काळात संचालक मंडळाने कर्ज वसुलीसाठी मनापासून प्रयत्न केला नाही किंवा फक्त प्रयत्न केला आहे, असे दाखवले. वास्तविक कराड जनता बँकेमध्ये काय झाले आहे, याचे सविस्तर विवेचन या बँकेविरोधात तक्रारदार राजेंद्र पाटील यांनी अनेकदा प्रसारमाध्यमासमोर दिलेले होते. मात्र जनता बँकेच्या संचालक मंडळांनी सुधारणा न करता अनेक गोष्टी दाबण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी ही बँक संपली.
कराड शहरातील किंबहुना तालुक्यातील जनतेचे खरंच आश्चर्य वाटतं, कराड जनता बँक बुडाल्यानंतर या बँकेविरोधात एकही मोठ्ठं आंदोलन झालं नाही किंवा जे झालं ते गाव पातळीचं होतं. बँकेत पैसे बुडून सुद्धा कराडचे लोक शांत कसे बसतात, याचं आश्चर्य वाटतं. यापूर्वी भुदरगड, शांतीसागर, दत्त, यशवंत पतसंस्था, डॉ. पतंगराव कदम पतसंस्था अशा अनेक संस्थांकडून ठेवीचे पैसे न मिळालेले कर्जदार अशाच प्रकारे शांत बसले होते.
कराड जनता बँकेच्या विरोधात काही प्रमाणात आंदोलन झाली. त्यानंतर या बँकेवर प्रशासक पूढे अवसायक आला. त्यांनी चांगल्या पद्धतीने नियोजन करून सुमारे ३७५ कोटी रुपयांच्या ठेवी परत दिल्या. मात्र, पाच लाखापर्यंतचीच रक्कम परत मिळू शकली. ज्यांनी पाच लाख रुपयेच्या ठेवी ठेवलेले आहेत आणि ज्याची दाम दुप्पट दहा लाख किंवा त्याहून अधिक झालेली आहे, अशा लोकांना सुद्धा पाच लाखच मिळाले. ज्यांनी दहा लाख किंवा पाच लाखाहून अधिक रक्कम भरलेली आहे, त्यांनाही पाच लाख मिळाले. अशाप्रकारे कराड जनता बँकेमध्ये ठेवीच्या माध्यमातून जे पैसे बुडालेले आहेत, तो आकडा १०० कोटीच्या दरम्यान नक्कीच असेल. या जनता बँके विरोधात कराड शहरातील कोणाही लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन जनतेला किंबहुना ठेवीदारांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला नाही. कराड शहरातील सर्वच लोकप्रतिनिधी कोठून ना कोठून जनता बँकेच्या संचालक मंडळाचे जवळचे नातेवाईक, मित्र किंवा त्यांच्या राजकीय मित्र होते, आहेत. कराड, मलकापूर शहरात आज रोजी पर जिल्ह्यातील, राज्यातील आणि देशातील सुमारे ६० बँकांचे कामकाज चालते. तसेच ५० पतसंस्थांचे काम चालते. या बँकांमध्ये कराड शहरातील, तालुक्यातील लोकांनी गुंतवलेल्या ठेवीची आकडेवारी अधिकृत उपलब्ध नसली तरी हा आकडा सुमारे ५००० कोटीच्या दरम्यान आहे. यावरून आपणास कळले असेल कराड शहरात किती पैसे आहेत. २००२ साली कराडला एचडीएफसी बँकेची एक शाखा उघडली. ही बँक कराड शहरात आल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मलाही आश्चर्य वाटले होते. या बँकेच्या उद्घाटनाला मी गेलो होतो. त्यावेळी बँकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना आपण एवढ्या छोट्या शहरात बँकेची शाखा का काढली, असे विचारले होते. त्यावर त्या अधिकार्‍याने ‘तुम्हाला कराड शहराविषयी काय माहिती आहे? आणि कराड शहरात किती पैसे बँकेत पडून आहेत? असा उलटा सवाल केला होता. त्या काळात कराड मधील वेगवेगळ्या बँका पतसंस्थांमध्ये ५०० कोटी रुपये पडून होते. एचडीएफसी सारख्या बँकने कराडमध्ये येताना शहराचा, तालुक्याचा अभ्यास केला होता. सहकार चळवळीच्या माध्यमातून तसेच अनेक शैक्षणिक संस्था कराड शहरांमध्ये असल्यामुळे इथे फार मोठी आर्थिक सुबत्ता आहे. कृष्णा-कोयना नदी काठावर असलेल्या समृद्धीमुळे लोकांच्या खिशात अनेक वर्षापासून पैसा आलेला आहे. कोल्हापूरनंतर आर्थिक राजधानी म्हणून पश्चिम महाराष्ट्रात कराडचे नाव घेतले जाते. म्हणूनच परजिल्ह्यातील संस्थानी कराडला अग्रक्रम दिला आहे. मात्र अशा लुटणार्‍या बँका, पतसंस्थांना कराडमध्ये येऊ न देण्यासाठी यापुढील काळात प्रयत्न करण्याची गरज आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी असणारी कराड अर्बन बँक नावाची मोठी बँक अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहे. या बँकेवर लोकांचा विश्वास आहे. कारण त्यामध्ये काम करणारे संचालक मंडळ पूर्ण व्यावसायिक आहे. या उलट कराड जनता बँक आणि जिजामाता बँकेचे अध्यक्ष संचालक मंडळ पक्के राजकारणी होते आणि या राजकारणानेच जनता बँकेची वाट लावली, असे लोक आता उघड उघड बोलतात. ‘जिथे सर्वाधिक व्याजदराची लालच तिथे सर्वाधिक मोठा धोका’ असे एक छोटेसे समीकरण आर्थिकसंस्थाविषयी बोललं जातं. मात्र जास्त व्याजदरच्या मोहात पडलेल्या ठेवीदारांना त्याचा फटका बसला आहे.
 आर्थिक संस्था मजबूत होण्यासाठी त्यामध्ये काम करणारे संचालक मंडळ कोण आहेत, बँकेचा कारभार कसा चालतो, बँकेचे खरे ऑडिट रिपोर्ट कुठे पाहायला मिळतील, याचा अभ्यास करण्याची आज गरज आहे. मात्र सामान्य ठेवीदारांना हे माहीत नसते. कराडातील सुदृढ पतसंस्था किंवा बँका कोणत्या? बाहेरून आलेल्या कोणत्या आहेत? कोणत्या बँका फसव्या आहेत? कोणत्या पतपेढ्या किंवा मल्टीस्टेट संस्था धोक्यात आहेत? याची माहिती यापुढील काळात कराडकारांना झाली पाहिजे, नव्हे कराडकरांनी ती घेतलीच पाहिजे. असे झाले नाही तर लुटण्यासाठी उत्कृष्ट सिटी कराड हा आर्थिक संस्थांचा फंडा या पुढील काळातही यशस्वी होत राहील आणि कराडकरांचे पैसे बुडत राहतील. शिवशंकर नागरी पतसंस्थेचे उदाहरण घेतले तर या पतसंस्थेत काय घोटाळा झाला आहे, याची गावभर चर्चा आहे. सहकार उपनिबंधक यांच्याकडून फक्त तपास सुरू आहे. पुढील काही महिन्यात या पतसंस्थेत नक्की काय झाले आहे? हे सत्य बाहेर येईल. परंतु आज रोजी या बँकेत, पतसंस्थेत पैसे ठेवलेल्या ठेवीदारांचे धाबे दणाणले आहेत.
अशाच प्रकारच्या कराडमध्ये अनेक पतसंस्था आहेत, की ज्या पतसंस्थांचे मालक-चालक पतसंस्थेमध्ये ठेवलेला सर्व पैसे स्वतःच्या वैयक्तिक प्रकल्पावर, मोठ्या साईटवर लावून बसलेले आहेत. मध्यंतरी कोविडच्या संकटामुळे अशा काही पतसंस्थांचे आर्थिक गणित बिघडले होते. काही पतसंस्था डबघाईला आल्या. तर काही बंद पडल्या. मात्र या पतसंस्थांचे गेल्या चार वर्षातील ऑडिट रिपोर्ट पाहिले तर हे रिपोर्ट अतिशय सुंदर आहेत. अनेक पतसंस्थांना ‘अ’ वर्ग मिळालेला आहे. आता हे ऑडिट करणारे खाजगी व शासकीय ऑडिटर यांना सुद्धा आरोपी करण्याची गरज आहे. पैसे खाऊन खोटी कागदं रंगवणारे ऑडिटर आणि पैसा चारणारे टोणगे संचालक मंडळ यांना आता यापुढील काळात सहकार खात्याने काळ्या यादीत टाकण्याची गरज आहे. बँका, पतसंस्थांचे ऑडिट करताना सर्व कागदपत्रे व्यवस्थित तपासून घेण्याची जबाबदारी ऑडिटरची असते. मात्र हे अधिकारी नक्की काय करतात? कागद पाहताना त्यांच्या चष्म्यावर, डोळ्यावर झापड आलेली असते की काय? असाही प्रश्न पडतो. कराडकरांनो या पुढील काळात बँका, पतसंस्थांमध्ये पैसे ठेवताना सावध राहा, रात्र वैर्‍याची आहे, असे नाही तर दिवस सुद्धा वैर्‍याचाच आहे. नाहीतर रात्रभर तमाशात नाचून मिळवलेले मंगला बनसोडे यांचे एका संस्थेने बुडवले तसे तुमचेही कष्टाचे पैसे बुडत राहतील. तुमच्याही मुला-मुलींची लग्नं पैशाअभावी मोडतील.आजारपणासाठी, म्हातारपणासाठी तुम्ही आर्थिक संस्थेत ठेवलेला पैसा तुम्हाला उपयोगी पडणार नाही. तुमचं घराचं स्वप्न स्वप्नच राहील.

सतीश मोरे

२८ ऑक्टोबर २०२२

मुकंद्दर का सिकंदर


याचं तिच्यावर, तिचं दुसऱ्यावर

आपला सर्वांना माहित आहे मुकद्दर का सिकंदर रहा चित्रपट अमिताभ बच्चन यांच्या अभिनयाचा कळस म्हणला तर वावगं ठरणार नाही. या चित्रपटाची कथा आणि या चित्रपटासारखा प्रेमाचा पंचकोन या अगोदर कुठल्या चित्रपटांमध्ये दाखवलेला नाही, यापुढेही असा चित्रपट होणार नाही.

समाजाने ठोकरलेल्या छोट्या सिकंदरला लहानपणापासून मेमसाबनं प्रेम दिले, मायेच्या शालीची उब दिली, अशा मेमसाबवर प्रेम करणारा सिकंदर. उपकाराच्या ओझ्याखाली दबलेला आणि खोटा आरोप लागल्यामुळे बदनाम झालेल्या सिकंदरने फक्त मेमसाबवरच प्रेम केले. 

मात्र या मेमसाबचे नंतरच्या काळात प्रेम जडले वकिल विशाल उर्फ विनोद खन्ना याच्यावर. दुसरीकडे जोहराबाई होती. ती तर पहिल्या भेटीतच सिकंदरवर फिदा झाली होती, सिकंदर शिवाय ती कुणाचाच विचार करत नव्हती. मात्र जोहरावर प्रेम होतं दिलावर अर्थात अमजद खानचं .

अमजदखानचा जीव रेखावर, रेखाचं प्रेम अमिताभवर,
अमिताभचा जीव राखीवर आणि राखी तर फिदा होती विनोद खन्नावर. एक वेगळे प्रेमाचं रसायन प्रकाश मेहरा यांनी या चित्रपटात अतिशय सुंदर पद्धतीने हाताळलं. या चित्रपटाविषयी आणखीन काय बोलाल तेवढं आहे !

🆎 प्रेमी सतीश मोरे सतिताभ

१७ ऑक्टोबर २०२२

अमिताभ बच्चनची सातवी भेट

मराठीत अमिताभजींना वाढदिवसाच्या शुभेच्छा !
62 कराडचे बच्चन प्रेमी !
बच्चनजींनी बालपणी दिलेलं चाॅकलेट !
 *एबी एबी जल्लोष !*
*आज 9 वाजता सोनी टीव्हीवर !* 

कराड येथील आम्ही 62 बच्चन प्रेमी सोनी टीव्हीवर "कौन बनेगा करोडपती"च्या आजच्या सोमवारच्या शोमध्ये दिसणार आहोत. कराडच्या अमिताभ बच्चन प्रेमी ग्रुपमुळे ही संधी साधून आली आहे.

आजचा शो अतिशय महत्त्वाचा आहे. या शोसाठी या वर्षी अमिताभ बच्चन प्रेमी ग्रुपची आतापर्यंतची सहावी बॅच 7 आक्टोबर 2022 रोजी मुंबईला गेली होती. गेल्या तीन वर्षात 300 जणांना *अमिताभ बच्चन प्रेमी ग्रुपच्या* पुढाकाराने, प्रयत्नाने महानायक अमिताभ बच्चन यांचे केबीसी मध्ये *विनामुल्य* दर्शन घडवले आहे. 

आम्ही सर्वजण 8 तारखेला सकाळी 8 वाजता सेटवर पोहोचलो. भेटीची एक्साइटमेंट फार मोठी होती. आत गेल्यानंतरचे सेटवरचे विद्युलोशित वातावरण पाहून आम्हाला खूप आनंद झाला. 10 ते 2 असे चार तास आमच्या समोर साक्षात अभिनयाचे देव अमिताभ बच्चन साहेब होते. 

काय तो आवाज, काय ते चालणं, काय ते बोलणं, काय तो रुबाब, काय ती नम्रता,काय त्या टाळ्या, काय तो दंगा, काय तुझा झगमगाट... काय काय बोलू अमिताभ बच्चन यांच्या बाबत! चार तास बाहेर धो धो पाऊस पडत होता. शूटिंगला अडचणी येत होत्या. मात्र या कालावधीत आम्ही अमिताभ बच्चन यांच्याकडे एकटक नजर लावून त्यांच्यातील एकेक रूबरू पाहत, होतो, बेधुंद होऊन जात होतो.
 *शो दरम्यान 150 दर्शक सेटवर होते त्यापैकी तब्बल 62 जण कराड सातारचे होते.* आम्ही खूप दंगामस्ती केली. अमिताभ बच्चन यांच्या समवेत गप्पा मारल्या. 

शो संपल्यानंतर अमिताभ बच्चन प्रेमी ग्रुपचे *खजिनदार सतीश भोंगाळे यांनी अमिताभ बच्चन यांना अतिशय वेगळ्या शैलीत मराठीमध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा* दिल्या. या शुभेच्छा देत असताना अमिताभ बच्चन यांनी शांतपणे दोन मिनिटे मराठीमधील शुभेच्छा ऐकूण घेतल्या. यावेळी ग्रुपचे अध्यक्ष सतीश मोरे यांनीही अमिताभ बच्चन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांना कराड भेटीचे निमंत्रण दिले. कराडचे *दिलबहार सलूनचे मालक कैलास काशीद यांनी* दिवार मधील अमिताभ बच्चन यांचं पोर्टेट तसेच सध्या पुण्याच्या डि वाय पाटील आर्ट काॅलेजमध्ये शिक्षण घेत असलेले कराडचे *दिग्विजय हेमंत पाटील यांनी काढलेले अतिशय सुंदर स्केच* आम्ही अमिताभ बच्चन यांना दाखवलं. या दोन्ही कलाकारीचे अमिताभ बच्चन यांनी कौतुक केले, माहीती घेतली आणि त्यावर स्वाक्षरी पण दिली. यादरम्यान अमिताभ बच्चन यांनी ग्रुपने 11 तारखेला कराडात नमक हलाल चित्रपटाचे आयोजन केल्याचे सतीश मोरे यांनी अमिताभ बच्चन यांना सांगितले. यानिमित्त तयार केलेल्या खास पोस्टरवर सुद्धा अमिताभ बच्चन यांनी सही केली.

कराडचा उभारता युवक वेदांत *अभय नांगरे यांनी 'स्वित्झर्लंड आयर्न मॅन'* स्पर्धा पूर्ण केल्याबद्दल अमिताभ बच्चन यांनी त्याचे अभिनंदन करून त्याच्या एका फोटोवरही स्वाक्षरी दिली, वेदांतसाठी हा अविस्मरणीय क्षण होता. दरम्यान कराडचे चित्रपट अभिनेते *जुगलकिशोर ओझा* यांनी त्यांच्या अदाकार या संस्थेच्या वतीने अमिताभ बच्चन यांना 'जीवन गौरव' पुरस्काराची ट्रॉफी बहाल केली. अमिताभजी यांनी ती अतिशय विनम्रपणे स्वीकारली. 

आम्ही दिलेल्या प्रत्येक फोटोवर अमिताभ बच्चन यांची मिळालेली स्वाक्षरी हा आमच्यासाठी मोलाचा असा ठेवा होता,आहे.

बच्चन प्रेमी ग्रुपचे उपाध्यक्ष *संजय बदीयानी यांच्या मिसेस शिल्पा* सेटवर उपस्थित होत्या. सौ. शिल्पा या मुळ मुंबईच्या. त्यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत एक आठवण शेअर केली. *1976 साली तेव्हा मुंबईमध्ये डॉन चित्रपटाचे शूटिंग सुरू होते. त्यावेळेला शिल्पा मॅडम दुसरीला होत्या.* त्या सेंट ट्रिझा कॉन्व्हेंट हायस्कूल सांताक्रुज येथे शिकत होत्या. या हायस्कूल मध्ये डॉन चित्रपटाचे शूटिंग झालेले होते. चित्रपटातील कलाकार प्राण (जेडी) यांची दोन मुले (इ है बम्बई नगरीया वाली) अमिताभ (विजय) बच्चन यांच्यासोबत असतात. ही दोन्ही मुलं ट्रिझा कॉन्व्हेंट हायस्कूल शाळेत शिकत असल्याचे सिनेमात दाखवले होते. या मुलांना भेटायला अमिताभ बच्चन (विजय) पिक्चर मध्ये आलेला होता. तेव्हा आठ वर्षांच्या शिल्पा बदीयानी त्या शाळेत शिकत होत्या. या शूटिंग दरम्यान अमिताभ बच्चन हे शाळेतील सर्व मुलांना भेटलेले होते आणि त्यांनी सर्व मुलांना *स्टार डबल डेकर चॉकलेट* दिलेले होते. ही आठवण सौ. बदीयानी यांनी अमिताभ बच्चन यांना सेटवर सांगितली. त्यावेळी अमिताभ बच्चन यांनी 'हा ये बहुत पुराना पिक्चर है, मुझे याद है' असे म्हणून आठवणींना उजाळा दिला. 

अमिताभ यांनी अनेकदा अनेकांकडे पाहून केलेला नमस्कार, विनम्रपणे स्वीकारलेल्या शुभेच्छा, एबी एबी असा सेटवर केलेला जल्लोष हा आमच्यासाठी अविस्मरणीय क्षण होता. हा आनंदाचा क्षण आज आपण केबीसीत पाहणार आहोत. 

शूटिंग दरम्यान व शूटिंग संपल्यानंतर घडलेल्या या सर्व गोष्टी जरी केबीसीत दिसणार नसल्या तरी या निमित्ताने 8 ऑक्टोबर रोजीचा दिवस आयुष्यभर आमच्या हृदयाच्या कप्प्यात राहणार आहे.

केबीसीची शूटिंग झाल्यानंतर आम्ही अमिताभ बच्चन यांच्या सोबत अनेक फोटो काढले. हे फोटो आम्हाला नोव्हेंबर महिन्यात मिळणार आहेत. आज तुम्ही आम्हाला केबीसीमध्ये अमिताभ बच्चन पाठीमागे, पुढे कुठे तरी दिसणार आहोत. तर मग आपण आजचा केबीसी भाग नक्की पहा. आम्ही दिसलो की टाळ्या वाजवून आनंद व्यक्त करा. टिव्हीचा फोटो काढून आम्हाला पाठवा.

 *सतीश वसंतराव मोरे.* 
सतिताभ

17 ऑक्टोबर 2022

#kbc
#kaunbanegacrorepati
#amitabhbachchanpremikarad
#abpk
#sonytv
#kbc14

१४ ऑक्टोबर २०२२

सावर मला...


एकदा ती म्हणाली,
ऐ वेड्या,
बस की आता, 
आवरू दे मला !

मग मी सहज बोललो 
अगोदर मला सावरं, 
मग तुझं आवरं !

न्हाहून प्रेमरसात नीव,
तुझ्यात गुंतलाय जीव 
बेफाम भावनेचा गुंत्ता , 
तो अगोदर सोडवं , 
मग तुझं आवरं !

न झालेल्या भेटीची उत्कंठा , 
साक्षात भेटीपेक्षा झालीय उत्कंठ,
प्रेमरसात डुबलेल्या 
माझ्या मनाला अगोदर सावरं, 
मग तुझं आवरं !

वार्‍याहून वेगवान विजेहून जलद, 
तुझ्यापर्यंत पोहचणाऱ्या 
माझ्या प्रेमलहरीला अगोदर सावरं, 
मग तुझं आवरं !

कवेत तुझ्या विरघळून जाण्याची , 
ओढ अजुनच वाढलीय मिलनाची, 
ओढीने त्या व्याकुळ 
या जीवाला अगोदर सावरं,
मग तुझं आवरं !

भावनिक गुंफण अन् कोमलता  
नात्यात बहरली आहे आता मणभर, 
हळव्या मनाला 
तु अगोदर सावरं, 
मग तुझं आवरं !

तुझे भास होताना, 
घड्याळाचे काटेही थांबतात क्षणभर , 
मग मात्र मीही होतो स्वैरभर,
अगं वेडे 
म्हणून तर म्हणतो 
अगोदर मला सावरं, 
मग तुझं आवरं !

 *सतिताभ* 
२७.०४.२०२२

१३ सप्टेंबर २०२२

आठवण येते का माझी ?



आठवण माझी येते का माझी माझ्याकडे काम नसतानाही?

आठवण माझी येते का माझी काहीतरी वेगळं खाताना ?

आठवण माझी येते का माझी काहीतरी नवीन वाचताना?

आठवण माझी येते का माझी थंड झुळूक आल्यावर ?

आठवण येते का माझी अवकाशात काळे नभ आल्यावर?

आठवण येते का माझी रिमझिम पाऊस पडून गेल्यावर?

आठवण येते का माझी काही तरी भास झाल्यावर ?

आठवण येते का माझी दूर कुठेतरी ते गाणं ऐकल्यावर ?

०८ सप्टेंबर २०२२

पाट्या नसलेला वेगळा बावर्ची ! लव यु राजेश खन्ना, जया आणि ऋषिकेश मुखर्जी !


पाट्या नसलेला वेगळा बावर्ची !
लव यु राजेश खन्ना, जया आणि ऋषिकेश मुखर्जी  !

खरंतर शालेय जीवनापासून मी अमिताभ बच्चन यांचा डाईंग फॅन आहे. मात्र त्या काळात मिथुन चक्रवती, धर्मेंद्र, जितेंद्र आणि राजेश खन्ना यांचे अनेक चित्रपट मी पाहिलेले आहेत. राजेश खन्ना हा हिंदी चित्रपट सृष्टीतला पहिला सुपरस्टार. राजेश खन्नाने सलग रोप्य महोत्सवी चित्रपट दिलेले आहेत. त्यांच्या नंतर त्यांची जागा अमिताभ बच्चन यांनी घेतली.

राजेश खन्ना यांचे दो रस्ते, दाग, आप कि कसम,सौतन, अवतार, अमृत, रोटी हे चित्रपट मी अनेकदा पाहिले आहेत. ते मला खूप आवडतात. विटा (सांगली) येथील भैरवनाथ थेटर मध्ये फळीवर बसून पाहिलेला दो रस्ते मला चांगला आठवतो. या या चित्रपटातील 'छुप गये सारे नजारे ओए क्या बात हो गई' हे गाणे मला खूप आवडते. कराडच्या प्रभात मध्ये सौतन हा चित्रपट पाहिलेला अजूनही डोळ्यासमोर आहे. आपकी कसम हा चित्रपट आणि त्या चित्रपटातील 'जिंदगी के सफर में गुजर जाते है जो मकान' हे गाणं मला खूप आवडते. या चित्रपटात राजेश खन्नाच्या मुलीचे नाव एकता आहे, हे नाव मला त्यावेळी खूप आवडलं होतं. अवतार मधील 'दुनिया मे कितना गम है, मेरा गम कितना कम है, लोगो का गम देखा तो, मैं अपना गम भूल गया' हे गाणे आणि राजेश खन्ना यांचा दमदार अभिनय मला खूप आवडला आहे. कदाचित डिस्को डान्सर या चित्रपटातील 'गोरो की ना कालोंकी, दुनिया है दिलवालोकी' हे राजेश खन्ना यांच्यावर चित्रित गाणे माझ्या आवडत्या गाण्यांपैकी एक आहे.

राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांनी आनंद या चित्रपटात एकत्र काम केले तर पूर्वी त्यांनी नमक हराम या चित्रपटातही काम केले होते. प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक ऋषिकेश मुखर्जी यांचे राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन हे ऑल टाइम आवडते कलाकार. राजेश खन्ना यांचा  ऋषिकेश मुखर्जी दिग्दर्शित बावर्ची हा चित्रपट मी पाहिलेला नव्हता. बुधवारी रात्री युट्युबवर लावून टिव्ही वर हा पूर्ण चित्रपट पाहिला. या चित्रपटात सुद्धा अमिताभ बच्चन आहेत हे मला आज पहिल्यांदाच कळलं. चित्रपटात अमिताभ बच्चन यांचा अभिनय कुठेही नाही किंवा त्यांच्यावर कुठेही चित्रिकरण नाही. मात्र चित्रपटाच्या सुरुवातीला आणि शेवटी अमिताभ बच्चन यांचा आवाज आहे.

चित्रपटाच्या नावाच्या पाट्या (टाईटल) आपण नेहमीच पाहतो. मात्र बावर्ची या चित्रपटाला हा अपवाद आहे. या चित्रपटाच्या सुरुवातीला नावाच्या पाट्या दाखवलेल्या नाहीत तर पिक्चरचे निर्माते,दिग्दर्शक, संकलक, संगीतकार,गायक या सर्वांची नावे अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या आवाजात ऐकवली आहेत. त्याला हिंदीमध्ये कथा वाचक असे म्हणतात. (हा प्रयोग नाटकात राबवला जातो) अशा प्रकारे चित्रपटाची सुरुवात मी पहिल्यांदाच पाहिली. 

'बावर्ची' हा चित्रपट मला खूप आवडला. हा चित्रपट पाहताना अधून मधून आनंद पिक्चरची आठवण येत होती. स्वतःसाठी स्वतःचे काम कोणीही करतात पण दुसऱ्यासाठी काम केलं तर त्यात खरा आनंद असतो. आनंद वाटत राहा, छोट्या छोट्या गोष्टीत खूप आनंद मिळतो. मात्र तो लुटायचा सोडून मनुष्य मोठ्या आनंदाच्या मागे लागतो. त्याऐवजी छोटा छोटा आनंद घेतला पाहिजे. छोटा छोटा आनंद दिवसभरात अनेक वेळा मिळतो, लुटता येतो. तो घेता आला पाहिजे. मोठा आनंद वर्षातून चार-पाच वेळा मिळतो मात्र तेवढ्यासाठी आपण छोट्या आनंदाकडे दुर्लक्ष करतो,  असा संदेश ऋषिकेश मुखर्जी यांनी या चित्रपटाद्वारे दिला आहे. (७ जुलै १९७२ रोजी हा चित्रपट रिलीज झाला होता त्यानंतर चार महिन्याने माझा जन्म झाला आहे)

ऋषिकेश मुखर्जी यांची दिग्दर्शनाची एक वेगळी शैली याही चित्रपटात मला पाहायला मिळाली. चित्रपट कुठेही बोअर झालेला नाही किंवा या चित्रपटात घेतलेले कलाकार चुकीचे आहेत असं कुठेही वाटलं नाही. सहज फुलत जाणारं कथानक, राजेश खन्ना यांचा सहज अभिनय आणि शेवटपर्यंत उत्सुकता ताणलेला क्लायमॅक्स हे ही या चित्रपटाचे यश आहे. हा चित्रपट मला खुप आवडला, तुम्ही पाहिला असेल तर छानच. नसला पहिला तर अवश्य पहा.

जाता जाता.. या चित्रपटात जया भादुरी आहे. या चित्रपटात राजेश खन्नाला कोणतीही हीरोइन नाही. (आनंद प्रमाणे याही चित्रपटात सुपरस्टार राजेश खन्नाला हीरोइन नाही) जया भादुरीने राजेश खन्नाच्या मानलेल्या बहिणीची भूमिका केली आहे. खूप सुंदर,अल्लड जया या चित्रपटात मला पुन्हा एकदा पाहायला मिळाली.

...सतीश मोरे सतिताभ
    ०८.०९.२०२२
    वेळ रात्री साडे बारा.

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...