फॉलोअर

०१ जून २०२१

यशवंतरावांची वेणुबाई


यशवंतरावांची ‘वेणूबाई’
***********
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री ते देशाचे उपपंतप्रधान अशी उच्चपदे भूषवणार्‍या यशवंतराव बळवंतराव चव्हाण यांच्या सुविद्य पत्नी सौ. वेणूताई यांची आज पुण्यतिथी. यशवंतराव होण्यामध्ये त्यांचा आईचा जितका मोलाचा वाटा होता तितकीच महत्त्वाची साथ त्यांच्या पत्नी वेणूताई यांचीही होता. 41 वर्षे यशवंतरावांना सोबत देणार्‍या वेणूताईंवर यशवंतरावांचे खूप प्रेम होते. 1 जून 1983 साली वेणूताई यांचे निधन झाले आणि त्यांच्या पाठोपाठ दीड वर्षातच म्हणजे 25 नोव्हेंबर 1984 साली यशवंतरावांचेही निधन झाले. यशवंतराव आणि वेणूताई यांच्या पती-पत्नीच्या नात्यांमध्ये अडचणीच्या, सुखदुःखाच्या आणि भरभराटीच्या काळात सुद्धा एक अतुट नातं होतं. आज वेणूताई चव्हाण यांच्या पुण्यतिथी दिनी यशवंतराव चव्हाण यांनी वेणूताई चव्हाण यांना लिहिलेल्या पत्राच्या माध्यमातून वाहिलेली आदरांजली.


महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतरावांनी सूत्रे हाती घेतली मात्र यशवंतराव यांच्या सारखा बुद्धिमान राजकारणी नवी दिल्लीमध्ये हवा असल्यामुळे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवारलाल नेहरू यांनी यशवंतरावांना मध्यरात्री फोन केला होता. पंडितजींनी यशवंतरावांना मी तुम्हाला एक नवी संधी देत आहे. तुमच्यावर संरक्षणमंत्री पदाची जबाबदारी देणार आहे, असे  फोनवरून सांगितले. पंडितजींनी ही बाब कोणालाही सांगू नका असे सांगितल्यानंतर यशवंतरावांनी मला ही गोष्ट एका व्यक्तीला सांगावी लागेल असे पंडितजींना सांगितले. त्यावर अशी कोणती व्यक्ती आहे असे विचारताच मला माझ्या पत्नीला हे सांगावे लागेल, असे यशवंतराव मिश्किलीने म्हणाले होते. 1962 ते 66 या काळात संरक्षण मंत्री, त्यानंतर 1970 ते 1974 या काळात अर्थमंत्री आणि 1974 ते 1977 या कालावधीमध्ये विदेश मंत्री म्हणून यशवंतरावांची कारकीर्द उल्लेखनीय आहे. या कारकीर्दीत यशवंतरावांना जगभरात अनेक देशात भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. या दौर्‍यामध्ये यशवंतरावांना पत्नी वेणूताईंना प्रकृतीच्या कारणामुळे नेता येत नाही याचे दुःख होते. पत्नीवर असलेले प्रेम आणि तिच्या शिवाय केलेला परदेश दौरा, पाहिलेली रम्य ठिकाणे, वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या उच्च नेत्यांच्या भेटी या विषयाची सर्व माहिती आपल्या पत्नीला सांगण्यासाठी 1965 ते 1977 या कालावधीमध्ये वेणूताईंना एकूण 96 पत्रे लिहिलेली आहेत. या पत्रात चव्हाण साहेबांनी जगभरातील अनेक देशांना दिलेल्या भेटीतील सविस्तर वर्णन केले आहे. दिवसभर काय झाले? काय पाहिले ? याचे इतंभूत वर्णन वाचताना प्रत्यक्ष यशवंतराव वेणूताई चव्हाण यांच्या समोर बसलेले आहेत, असा भास होतो. ही सर्व पत्रे वेणूताईंना लिहिली खरी मात्र ती प्रत्यक्ष ती पोस्ट मध्ये टाकली नाहीत. परदेश दौर्‍यावरून परत आल्यानंतर त्यांनी ही पत्रे वेणूताईंना हातामध्ये दिली.

या सर्व पत्राची सुरूवात ‘प्रिय सौ. वेणुबाईस्’ अशी आहे तर समारोप ‘तुझाच यशवंतराव’ असा आहे. या पत्रातून यशवंतरावांची वेणुताईविषयी काळजी दिसून येतेच आणि प्रेमही व्यक्त होते. बहुतांश पत्रात “तुझी तब्येत कशी आहे, तब्येतीची काळजी घेतेस ना? तू आपली प्रकृती चांगली ठेवत असशील, प्रकृती सांभाळा, डॉक्टर रोज येतात ना? अशी विचारपूस करणारी वाक्य आहेत. 19 सप्टेंबर 1971 साली लिहिलेल्या एका पत्रात ते म्हणतात, आज रात्री कुठे जायचे नाही. त्यामुळे सर्व निवांत आहे. वाचण्यासाठी भरपूर आणले आहे. तुझी आठवण झाली आणि तुझ्या प्रकृतीच्या शंकेने व्याकूळ झालो. प्रकृतीची काळजी घे.”

26 एप्रिल 1974 साली क्वॉलालंपूर येथून लिहिलेल्या पत्रात ते लिहितात ‘आज सारा दिवस तुझ्या आठवणीत गेला, तुझ्या संगतीत काढलेले कष्टाचे, आनंदाचे सर्व क्षण कसे अलगुन - बिलगून जवळ येतात आणि मन एका अर्थाने कृतज्ञतेने भरून जाते.’ तर 2 मे 1975 साली किंग्स्टन जमैका येथून लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात, ‘तुझी आठवण सारखी येत असते, पण आज तुझ्या संगतीची तीव्रता फार वाटली.’

यशवंतराव परदेश दौर्‍यावर निघताना वेणूताईंना खूप वाईट वाटे. फ्रेंड फोर्ट येथून 28 ऑगस्ट 1975च्या पत्रात ते वेणुताईंना धीर देताना म्हणतात, ‘तू मी निघताना फारच संयम दाखवला, तुला असे एकाकी सोडून निघताना मी किती व्याकुळ होत असेन, कल्पना आहे ना? 1975 साली ऑक्टोबर महिन्यात यशवंतराव अफगाणिस्तान दौर्‍यावर होते. या दरम्यान काबूल येथून लिहिलेला लिहिलेल्या पत्रात ते वेणूताईंना म्हणतात, ‘आज दिवाळी ! तुझी फार आठवण झाली. गेल्या 25-30 वर्षात ही पहिलीच दिवाळी आहे,  मी तुझ्यापासून दूर आहे आणि एकटा परदेशात आहे. सकाळी आशामाईचे दर्शन घेताना तुम्हा सर्वांची आठवण झाली.’
यशवंतरावांचे पुस्तक प्रेम सर्वांनाच माहिती आहे. जगभरातील कोणत्याही देशात गेल्यानंतर तेथून त्यांनी वस्तू, दाग-दागिने नव्हे तर पुस्तके आणलेली आहेत. देशाचा परराष्ट्रमंत्री किंवा संरक्षण मंत्री परदेशात गेल्यानंतर काय आणतो तर पुस्तके ? हे वाचून अलीकडच्या राजकारण्यांना थोडे आश्चर्य वाटेल. यशवंतरावांनी शासकीय सोयीचा कधीही गैरवापर केला नाही. 10 मे 1975 साली मेक्सिको सिटी मधून लिहिलेल्या एका पत्रात ते म्हणतात, ‘काल हॉटेल मधील दुकानातून एक दोन पुस्तके विकत आणली.  वस्तू पाहिल्या. मात्र महागाई फार आहे म्हणून विचार सोडून दिला. घरच्या आठवणीने अस्वस्थ वाटते आहे. आज आता चार-पाच दिवसांनी घरी येणार आहे म्हणून परतीच्या प्रवासाची ओढ आहे.’ 2 ऑक्टोबर 1972 साली रॉयल हवेन या हॉटेलमधून लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात, ‘काहीतरी घ्यावे म्हणून दुकानात गेलो. भरमसाठ किंमती. येथील लाकडात कोरलेली एक सुंदर कलाकृती फार आवडली. किंमत 650 डॉलर्स म्हणजे जवळ जवळ 5 हजार रुपये. म्हंटले रामराम. निदान नेत्रसुख तरी मिळाले.’

19 जानेवारी 1974 साली रोम येथून लिहिलेल्या पत्रात थोडेसे नाराज झालेले मात्र जनतेवर मनापासून प्रेम करणारे यशवंतराव वेणूताईंना म्हणतात, ‘महाराष्ट्रात सर्व पोटनिवडणुकीत झालेले पराभव धक्का देणारे आहेत. कठीण प्रश्न, न सुटलेले गुंतागुंतीचे प्रश्न व रागावलेले लोक यांच्याकडे परत येतो आहे. पण ते घरचे प्रश्न आणि घरचे लोक आहेत. त्यांच्यातच राहायचे आहे, त्यांच्यातच मरायचे आहे. घरी परतण्यास मन अत्यंत उत्सुक आहे.’ परदेशात कुठेही असले तरी यशवंतराव घरी परतण्यास नेहमी उत्सुक असायचे. 1975 साली लिहिलेल्या एका पत्रात ते लिहितात, ‘भेटीसाठी उत्सुक, घरासारखे दुसरे रुबाबदार आणि आसरा देणारे दुसरे ठिकाण असू शकत नाही.’
26 एप्रिल 1974 मध्ये क्वॉलालंपूर मध्ये एक पुस्तक प्रदर्शन पाहत असताना एका पुस्तकामध्ये लेखकाने त्यांच्या पत्नीविषयी व्यक्त केलेल्या भावना वाचून पत्नी वियोगात बुडालेले यशवंतराव लिहितात, ‘तुझ्या संगतीची साथ ही ईश्वराने दिलेली मोठी देणगी आहे. त्याच्या या कृपेच्या जाणिवेने माझे मन आकंठ भरलेले आहे. तुझ्या उदार अंतःकरणाने मध्ये माझ्या या जाणिवेला जागा राहू दे. एवढे सांगण्यासाठी हे पत्र लिहीत आहे.’
यशवंतरावांचे हे सर्व लेखन पत्ररूप आहे. त्यांनी हे लेखन माध्यम स्वीकारले याला विशिष्ट कारण आहे. त्यांनी सार्‍या जगाचा प्रवास केला. वेणूताई यांची प्रकृती दुर्बल, हजारो मैलाचा धावपळीचा प्रवास त्यांना झेपणारा नव्हता. वेणूताई नित्य दिल्लीत, स्वगृही ! यशवंतरावांना याची खंत असावयाची ही खंत त्यांनी पत्रातून नमूद केली आहे. एकाकीपणाची ही खंत या लेखनाची प्रेरणा ठरली असावी, असे ‘विदेश दर्शन’ या यशवंतराव चव्हाण यांच्यावरील एका पुस्तकाचे संपादक रामभाऊ जोशी म्हणतात. रामभाऊ जोशी यांनी संकलित केलेल्या पुस्तकात ही सर्व पत्रे उपलब्ध आहेत.


वेणूताईंना लिहिलेली ही पत्रे पाहिल्यानंतर वेणूताईंवर यशवंतरावांचे किती प्रेम येते हे तर लक्षात येतेच त्याबरोबर यशवंतराव वेणुताई प्रेम कथेची दुसरी बाजू, दोघांमधील परस्पर भेटीची व्याकुळता लक्षात येते. वेणूताईंच्या पुण्यतिथीदिनीच्या पूर्वसंधेला ‘विरंगुळा’ या बंगल्यात जाऊन ही सर्व पत्रे पाहण्याचा, वाचण्याचा मला योग आला. ही पत्रे वाचताना खरंच डोळ्यातून पाणी आले. यशवंतराव चव्हाण यांच्या सारखा सुसंस्कृत समाजकारणी राजकारणी होणार नाहीच. त्याच बरोबर त्यांना खंबीरपणे साथ देणारी दुसरी वेणूताईही होणार नाही, असे म्हणले तर वावगे ठरणार नाही. वेणूताईंना भावपूर्ण आदरांजली.
*********
प्रीतिसंगमावरून
- सतीश मोरे

२७ मे २०२१

कसं सावरू


काय सावरू, कसं सावरू,
मनाला सावरु कि स्वतःला?

किती रुसू, किती खोटं हसु
हसुरुसू आवरू कि स्वतः ला?

काय बोलू , कसं बोलू
शब्द आवरू कि स्वतःला?

काय चुकलं, कुणाचं चुकलं
चुका शोधत बसू कि स्वतःला?

काय करू, काय न सोसू
सोसणं सावरू, कि स्वतःला ?

सती.
बुद्ध पौर्णिमा
२६.०५.२०२१

१९ मार्च २०२१

सांग ना आई !

 



सांग ना शांतांई!


सांग ना आई,

तु एवढी भोळी का आहेस?

सांग ना आई,

माझ्यावर एवढ़ं प्रेम का करतेस?


सांग ना आई,

तुला कसं कळतं मी दुखी आहे?

सांग ना आई,

तुला कसं कळत मला भुक लागली?


सांग ना आई,

तु एवढी प्रेमळ का आहेस?

सांग ना आई,

तु एवढी सुंदर का आहेस?


सांग ना आई,

स्वतचं दुःख तु कसं लपवतेस?

सांग ना आई,

वेदना तु कशा बरं पचवतेस?



सांग ना आई,

माझ्यावर खोटं कसं रागावतेस?

सांग ना आई,

माझ्यासाठी क्षणोक्षणी का झुरतेस?


सांग ना आई,

तु इतकी नम्र का आहेस?

सांग ना आई,

तु इतकी धाडशी कशी आहेस?


सांग ना आई,

तु स्व:तला कसं सावरतेस?

सांग ना आई,

आम्हाला कसं उभं करतेस?

आई लवकर बरी हो!


सतीश १९.०३.२०२१





आई....आई ...आई



लवकर बरी हो..


....सतीश 😊

१९०३२०२१

०८ मार्च २०२१

तुला कळेल तेव्हा

विद्युल्लता

कळतंय 
तुला सारं,
वळतंय 
पण तुला सारं,
पण व्यक्त का 
होत नाही,
हेच उमगत 
नाही कोडं !

म्हणुनच साद घालतोय


तुझं मन होईल
तेव्हा प्रतिसाद दे!

तुझं मन होईल
तेव्हा प्रतिमा पाठव!

तुझं मन होईल
तेव्हा व्यक्त हो!

तुझं मन होईल
तेव्हा समजून घे!

तुझं मन होईल 
तेव्हा निघून ये!

तुझं मन होईल
तेव्हा आपलं बनवं!


सतीताभ

०८०३२०२१

११ फेब्रुवारी २०२१

उत्साहाचा उस्फुर्त झरा... खासदार श्रीनिवास पाटील




उत्साहाचा उस्फुर्त झरा

खासदार श्रीनिवास पाटील साहेब यांचा आज वाढदिवस. मारूल हवेलीकर, पुणे कलेक्टर, कराड लोकसभा मतदार संघाचे खासदार, सिक्कीमचे राज्यपाल ते आज सातारा लोकसभा मतदार संघाचे खासदार असा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. त्यांच्या विनम्र स्वभावामुळे श्रीनिवास पाटील साहेब सातारा सांगली कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यातील अनेकांच्या हृदयात आहेत. 


प्रशासकीय सेवेतून स्वेच्छानिवृत्ती होऊन त्यांचे मित्र खासदार शरद पवार यांच्या आग्रहाखातर ते राजकारणात आले आणि त्यांनी राजकारणात सुद्धा प्रशासकीय कामातील अनुभवाच्या शिदोरीवर प्रचंड कामे करत एक खासदार काय करू शकतो याचे मूर्तिमंत उदाहरण बनले आहेत. कराड लोकसभेचे खासदार म्हणून ते १९९९ साली निवडणूक जिंकले. खासदार म्हणून निवडून दिल्यानंतर त्याने कामाचा सपाटाच लावला. मी २००१ पासून त्यांना ओळखतो. तेव्हा निवास पाटील यांच्या कार्यालयात सतत जाणे आणि व्हायचे. तत्पूर्वी रेल्वे रिझर्वेशन कन्फर्म होण्याचे करण्यासाठी खासदार ऑफिसमध्ये पत्र घेण्यासाठी माझ्यासारखे अनेक जण त्यांच्या कार्यालयात जात. खासदारांचे पत्र मिळाल्यानंतर रेल्वेचे रिझर्वेशन कन्फर्म होते हे याअगोदर कुणालाच माहीत नव्हते.


 वेगवेळ्या कारणासाठी श्रीनिवास पाटील यांच्याशी झालेली भेट यातूनच आमची ओळख घट्ट होत गेली. श्रीनिवास  पाटील यांचे तत्कालीन स्वीय सहाय्यक नाना खामकर यांच्या माध्यमातून मला श्रीनिवास पाटील यांच्याकडे यांच्यासोबत गप्पा मारायचा योग यायचा. कामाचा किती व्याप असला तरी श्रीनिवास पाटील पत्रकारांसाठी स्वतंत्र वेळ द्यायचे. 


केंद्र सरकारच्या माध्यमातून कराड भागातील कामे करण्यासाठी त्यांचा सतत पाठपुरावा असायचा. त्यांनी केलेल्या कामाचे श्रेय घेण्याचा अधून मधून प्रयत्न होत असे.अशी परिस्थिती निर्माण झाली तर खासदार कार्यालयातून आम्हाला पाटील यांनी केंद्रीय मंत्र्यासोबत केलेल्या पत्रव्यवहाराचे कागदपत्रे तात्काळ पोहोच होती. दुसऱ्याच्या कामाचे श्रेय घेण्याची सवय श्रीनिवास पाटील यांना कधी नव्हती, हे या पत्रातून आम्हाला अनेकदा समजून यायचे.


कोणतेही काम करायचे असेल तर ते कसे करायचे, त्यासाठी कोणाला पत्र लिहायचे, कुठल्या नियमांत बसवायचे, त्याचे प्रशासकीय मंजुरी कशी घ्यायची,  खासदार फंडात जर एखादी गोष्ट बसत नसेल तर वेगळ्या फंडात बसवून कसा पैसा आणायचा, केंद्रीय  पातळीवर कसा पाठपुरावा करायचा, दिल्लीला गेल्यानंतर कोणाला भेटायचे, कुणाला भेटल्यावर काय सांगायचे, आपली कामे कशी मंजूर करून घ्यायची, खासदार शरद पवार साहेब यांचे नाव कुठे घ्यायचे, कधी घ्यायचे यांचे त्यांना चांगले भान होते किंबहुना याबाबत श्रीनिवास पाटील यांचा हात कोणी धरु शकत नाही. त्यामुळेच सलग दोन टर्म कराड लोकसभा मतदार संघाचे खासदार म्हणून काम करताना त्यांनी शिराळा, वाळवा, कराड, सातारा, तसेच पाटण आणि जावळी खोऱ्यात पुलांचे जाळे उभे केले. निसरेपूल असो किंवा कराडचा कृष्णा नदीवरील नवीन पूल असो हे पूल निवास पाटील यांच्या प्रयत्नांमुळेच मंजूर झाले आहेत.


 श्रीनिवास पाटील खासदार होण्याअगोदर कराड आणि सातारा लोकसभा मतदारसंघाने अनेक खासदार पाहिले होते. मात्र दिल्लीचा निधी गल्लीत आणणारा खासदार मतदारसंघाने श्रीनिवास पाटील यांच्या माध्यमातून १९९९ ते २००९ या कालावधीमध्ये पाहिला. खा.पाटील यांच्या वैयक्तिक कामाबाबत किंवा कामकाजपद्धती बाबत बोलायला खरंच शब्द कमी पडतील. हा माणूस समोर आलेल्या प्रत्येक व्यक्तीला जिंकतो, समोर आलेल्या कुठल्याही व्यक्तीला मोकळ्या हाताने परत पाठवत नाही, समोरच्या व्यक्तीचे काम होते किंवा न होते मात्र त्या संबंधित लागणारी सगळे कागदपत्रे,पाठपुरावा श्रीनिवास पाटील लगेच करतात. प्रशासकीय अधिकारी असताना राज्यभरातील वरिष्ठ शासकीय, निमशासकीय,खाजगी क्षेत्रातील अधिकाऱ्यांशी खा.पाटील यांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते,आहेत. राज्यातील कोणत्याही ठिकाणचे काम घेऊन गेले तर खा. पाटील त्या व्यक्तीसाठी थेट त्या अधिकाऱ्याला फोन लावतात, हे मी अनेकदा पाहिले आहे.  पुण्या मुंबईतील अनेक कंपन्यांच्या मालकांना, एच आर विभागातील प्रमुखांना फोन करून अनेक युवकांना त्यांनी नोकर्‍या मिळवून दिल्या आहेत. कसलेही काम असेल तरच खा. पाटील यांच्याकडे जावा असे कराडकर मोठ्या आनंदाने किंवा विश्वासाने म्हणतात.त्यांच्याकडे गेल्यानंतर काम होतेच,याचा अनुभव अनेकांनी घेतला आहे. कराड रेल्वे स्थानकावर अनेक नवीन गाड्या थांबत नव्हत्या, अशा काळात निवास पाटील यांनी रेल्वेमंत्र्यांशी पत्रव्यवहार करून केलेली कामे कराडकरांनी पाहिलेली आहेत.


 वैयक्तिक पातळीवर हा माणूस खूप हळवा आहे, त्यांना कुटुंबासोबत रहायला खूप आवडते. श्रीनिवास पाटील यांच्या थोरल्या मुलाला एक असाध्य आजार होता. त्या मुलाच्या आजारपणात लाडक्या मुलाची खासदार बापाने केली सेवा अनेक जणांनी पाहिली आहे. मुलाच्या अखेरच्या काळात मुलासाठी सर्व काही करणारा बाप पाहिल्यानंतर असा बाप सर्वांनाच मिळावा, असे मला काही क्षणभर वाटले होते.


 मध्यंतरी एकदा कराडातील एका कार्यक्रमासाठी तात्कालीन रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव कराडला आले होते. त्यांच्या जेवणाची सोय खा. पाटील यांच्या गोटे येथील घरी केली होती. त्यावेळी लालूप्रसाद यांच्याशी बोलताना बिहारी भाषेत बोलणारे पाटील पाहून लालूजी सुद्धा खूश झाले होते. कुठेही कोणीही भेटला तरी त्याला वाहनांच्या खिडकीतून हात करणारे, त्यासाठी क्षणभर थांबणारे आपले खासदार अशी त्यांची ओळख आहे. सातारा जिल्ह्यातील जनतेच्या हृदयात ते स्थान करून राहिले आहेत याचे कारण त्यांचे तळागाळातील लोकांशी असणारे संबंध. समोरच्या व्यक्तीला नावानिशी ओळखणारे, वाढदिवसाला फोन करणारे, पुरस्कार मिळाला तर स्वतःहून अभिनंदन करणारे, छोट्या मुलांना कौतुकाने गोष्ट सांगणारे, प्रशासकीय सेवेत जाणाऱ्या युवकांना मार्गदर्शन करणारे,घरात दुःखद घटना घडली तर भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असा वडिलकीचा आधार देणारे आणि यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या मार्गावरुन चालणारे श्रीनिवास पाटील हे कराड लोकसभा मतदार संघाची शान होते व आहेतच.  


बदलत्या परिस्थितीनुसार त्यांना अचानक सातारा लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करायची संधी मिळाली आणि ते मोठ्या मताने सातारा लोकसभेवर निवडून गेले. लोकसभा निवडणूक काळातील निवास पाटील यांची भाषणे, कठीण परिस्थितीत समोरच्या संकटाना तोंड देण्याची तयारी, वेळ प्रसंगी संयम तर काही वेळा जशास तसे उत्तर देऊन समोरच्यांना गप्प बसणणारे उमेदवार श्रीनिवास पाटील या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळाले होते.


खासदार शरद पवार यांचे ते जवळचे मित्र. मात्र शरद पवार यांच्या नावाचा वापर ते खूप कमी काम करतात. आम्ही अनेकदा त्यांना भेटतो तेव्हा निवास पाटील यांनी शरद पवार यांच्या सोबतच्या कॉलेजवयीन किस्से सांगतात.मात्र पवार साहेबांचे नाव सांगून या व्यक्तीने सार्वजनिक जीवनात कोणताही लाभ घेतलेले नाहीत. मैत्री वेगळे आणि राजकारण वेगळे हा मंत्र त्यांनी आयुष्यभर जपला आहे त्यामुळेच खासदार श्रीनिवास पाटील आणि शरद पवार यांच्या मैत्रीचे अनेक जण नाव घेतात. 


मध्यंतरीच्या काळात त्यांना सिक्कीम राज्याचे राज्यपाल म्हणून काम करण्याची संधी मिळाली. प्रशासकीय सेवेतील एक व्यक्ती खासदार झाल्यानंतर त्यांनी तो बदल स्वीकारलेला होता. मात्र कलेक्टर खासदार आणि पुन्हा राज्यपाल या पदावर काम करत करताना श्रीनिवास पाटील यांच्या कामाचा खऱ्या अर्थाने कस लागला. सिक्कीम या राज्याचे राज्यपालपद म्हणजे येड्या गबाळ्याचे काम नाही. अतिशय संवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिक्कीम राज्याच्या सीमा पाहता या राज्याच्या राज्यपालपदी या अगोदर उच्चविद्याविभूषित, इंग्लिश हिंदी भाषेवर प्रभुत्व असणाऱ्या व्यक्तींचीच निवड झाली होती. श्रीनिवास पाटील आमच्याकडेही गुण होतेच, या गुणा बरोबरच त्यांचा प्रशासकीय अनुभव पाहून केंद्र सरकारने त्यांना या निवडले असावे. सिक्कीम राज्यात मिशीवाला गव्हर्नर म्हणून निवास पाटील यांनी गाजवलेली कारकीर्द सर्वांनाच ज्ञात आहे.  राज्यपाल झाल्यानंतर त्यांनी राज्यातील जनतेसाठी राजभवन खुले केले. या अगोदरचे राज्यपालाना भेटण्यासाठी खूप कष्ट पडायचे मात्र श्रीनिवास पाटील यांनी सिक्कीममध्ये काम करताना जनता , राज्य सरकार आणि राजभवन यांच्यामधील दूरी करण्याचा प्रयत्न केला. सिक्कीमला सेंद्रिय राज्य करण्यामध्ये निवास पाटील यांचा मोलाचा वाटा होता. सिक्कीम राज्यातील पर्यटन व्यवसाय वाढवण्यासाठी त्यांनी वैयक्तिक पातळीवर खूप प्रयत्न केला .महाराष्ट्रातील ज्याठिकाणी त्यांनी काम केले आहे त्या जिल्ह्यातील अनेक पर्यटक या कालावधीमध्ये सिक्कीमला जाऊन आले, राजभवनावर राहिले. सिक्कीममधील वास्तव्यामध्ये राज पाहुणचार घेण्याचा मान माझ्यासहीत अनेकांनी घेतला आहे. सिक्किम मध्ये येण्याचे केवळ निमंत्रण न देता तेथे आलेल्या प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र वेळ देऊन त्याची खातीर करण्यामध्ये ती कुठेही कमी पडले नाहीत. राज्यभरातील सुमारे 25 हजार अधिक लोक श्रीनिवास पाटील यांच्या सहा वर्षाच्या कालावधीमध्ये गंगटोकला जाऊन आले असावेत.


सातारचे खासदार म्हणून श्रीनिवास पाटील जेव्हा निवडणुकीला सामोरे गेले तेव्हा त्यांच्या वयावरून चर्चा झाली. मात्र निवडून गेल्यानंतर ७८ वर्षाच्या या योध्याने तरुणांना लाजवेल असा कामाचा धडाका लावला आहे. गेल्या दीड वर्षात ते नव्या जोमाने काम करत आहेत. कोरोनाच्या कालावधीमध्ये सामाजिक अंतर ठेवून श्रीनिवास पाटील यांनी केलेले काम जनतेला माहित आहे. मतदार संघातील गरजू आणि गोरगरिबांसाठी धान्याची पाकिटे पुरवली. आज खा. पाटील यांच्या कार्यालयामध्ये दिवसभर गर्दी असते याचे कारण इथे आल्यानंतर आपले काम होणार याची खात्री असते. आलेल्या प्रत्येक माणसाचे समाधान करण्याचा ते प्रयत्न करतात,सर्वांना वेळ देतात. ते समाजापासून, जनतेपासून, लोकांपासून दूर राहू शकत नाहीत.जनतेसाठी काम करत राहणे हेच खासदार श्रीनिवास पाटील यांच्यासाठी टॉनिक आहे. कायम माणसात राहणारा हा खासदार आज ८० व्या वर्षात पदार्पण करत आहे. पुढील काळात त्यांच्या हातून सातारा जिल्ह्यातील जनतेची सेवा होवो आणि त्यांना दीर्घायुष्य लाभो अशा पुढारी परिवाराच्या वतीने शुभेच्छा.

२२ जानेवारी २०२१

टोपी संभालो याने की संय्मम रखो

 दिनकरराव... टोपी संभालो!


माझ्या अमिताभ बच्चन यांच्या 'अग्निपथ' चित्रपटातील माझा आवडता संवाद मला आठवतो. "हवा तेज चल रहा है, दिनकरराव, टोपी संभालो, उड जायेगा" हा संवाद खुप काही सांगून जातो. 


जेव्हा परिस्थिती उलटी असते,वारा जोरात वाहतो तेव्हा टोपी सांभाळायला हवी,म्हणजे संय्यम ठेवला पाहिजे. जोरात हवा असते तेव्हा आपण ताठ उभे राहिलो तर टोपी उडून जाईल आणि आपले डोके उघडं पडेल. महापुर येतो तेव्हा मोठमोठाले वृक्ष कोसळतात,तिथे परिस्थिती नुसार थोडंस वाकणारे, संयमाने वागणारे लव्हाळ (गवत) जिवंत राहते,अशा आशयाचा संत तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे. 


आपण टोपी सांभाळली नाही तर ती उडते आणि मग आपल्याला उन्हाचे चटके बसतील, पावसात भिजावे लागते. आपल्या समोर संकटं आणि अडचणी वाढतील. ते होऊ न देण्यासाठी आपण थोडंसं बाजुला सरलो, टोपी सांभाळली म्हणजेच संयम बाळगला तर अडचणीची वादळं निघून जातील. वादळ निघून जाईपर्यंत आपण टोपी धरून ठेवावी म्हणजे संय्यम ठेवावा.


अग्निपथ चित्रपटातील या संवादात टोपी म्हणजे संय्यम असा आहे. वादळ म्हणजे संकट. काही वादळं म्हणजे संकटं तुम्हाला तुमच्या ध्येयापासून विचलित करण्यासाठी येत नाहीत तर तुम्हाला नवीन वाटा मोकळ्या करण्यासाठी येत असतात.वादळातून म्हणजे संकटातून बाहेर पडण्यासाठी तुम्ही संयम ठेवला तर ही संकटं निघून गेल्यावर तुम्हाला नवीन स्वच्छ वाट सापडेल.


#संयम 

#अग्निपथ

#अमिताभबच्चन 

 सतीश वसंतराव मोरे.

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...