माझी आई जिच्याविषयी मी काय लिहावे याचा मी खूप दिवसांपासून विचार करतोय. आज महिला दिनाच्या निमित्ताने हा प्रयत्न.
माझ्या आई इतके या जगात कोणी सोशीक सहनशील आणि ग्रेट महिला असेल असे मला वाटत नाही. आई हे जरी नाव डोळ्यापुढे घेतलं तर अनेक अडचणी सामोरं जायचं प्रेरणा मिळते. माझ्यासाठी सर्व काय केलं माझ्या शांताईने.
माझ्या आईचं नाव शांताबाई. ती नावाप्रमाणेच खूप शांत आहे. माझी आई चिडलेली मी कधी पाहिली नाही. तिने जे सहन केले ती सहनशीलता तिला कुठून मिळाली हेच मला कळत नाही. माझ्या आई विषयी काही बोलताना डोळे भरून येतात. दोन दिवसांपासून विचार करतोय आईविषयी काही तरी लिहावं. पण मी लिहू शकतो नाही. मन घट्ट करुन लिहायचा प्रयत्न करतोय.
जेव्हा एखादी स्त्री सर्व दुखाना संकटाला सामोरे जाते तेव्हा ती किती मोठी होते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे माझी आहे.
माझी आई, तिच्याविषयी मी काय बोलायचं !
जेव्हा मला थोडंसं कळायला लागलो होतो, तेव्हापासून मी माझ्या आईला काम करताना, शेतातून उसाच्या काचोळ्याचं ओझं आणताना, शेतात काम करताना पाहिलं होतं. माझ्या आईला हे काम का करायला लागते, असा प्रश्न मला नेहमी पडत असे. पण ती कुटुंब व्यवस्था होती, त्या व्यवस्थेमध्ये कामाची विभागणी होती. पुढे जसा मोठा होत गेलो तसतसे मला माझ्या आईचा समर्पित स्वभाव अनुभवायला आला. कसलीही अडचण असो किंवा कोणीही काही बोलले तरी माझी आई कधी कुणाला वाकडं बोलली नाही, घरातला व्यक्ती असो वा बाहेरचा. माझ्या आईला कोणीही कसेही बोलले तरी आणि ते सहज सरळ घेत होती.
कधी अपमानाची वागणूक मिळाली तरी ती अपमान सहन करत राहिली.मात्र काही प्रसंगात अपमान होत असताना तिच्या चेहऱ्यावरचे भाव मी टिपले होते. आपल्या कुटुंबासाठी आपल्या नवऱ्यासाठी आणि आपल्या मुलासाठी तिने अनेकदा अपमान सहन केलेला मी पाहिलेला आहे.
आमचं घर रस्ता कडेलाच आहे. जेव्हा 85 च्या दरम्यान आम्ही गावातल्या वाड्यातून स्टॅण्ड जवळील घरात राहायला आलो. ओगले काच कारखाना बंद पडल्यामुळे दादांची नोकरी बंद झाली होती, त्यामुळे आम्ही तेथे दुकान सुरू केले होते. दुकानाच्या निमित्ताने किंवा आमच्या वडिलांच्या सामाजिक स्वभावामुळे रोज घरात अनेक माणसे येत असत.गावातला कोणी आमच्या घरी आला तर आई त्याची प्रेमाने चौकशी करायची, आजही करते. दारात आलेल्या माणसाला चहा न पिता परत पाठवायचं नाही हा आमच्या वडिलांचा नियम होता. तो नियम आई तंतोतंत पाळते,आजही ते काम सुरू आहे.
1990 च्या दरम्यान माझे वडील तळेगाव दाभाडे येथे शिफ्ट झाले. दोन मुलींच्या लग्नानंतर झालेला कर्जाचा वाढता डोंगर कमी करण्यासाठी वडिलांनी तळेगाव येथे काम हाती घेतले होते. नंतर यांच्यापाठोपाठ माझा थोरला भाऊ म्हणजे अण्णा तोही तळेगावला गेला, त्यापाठोपाठ वहिनी पुण्याला गेल्या. त्यामुळे करवडीच्या घरात मी आणि आई आम्ही दोघेच राहिलो होतो. तेव्हा माझं कॉलेज सुरू होतं. कॉलेजच्या अभ्यास करत करत करवडी येथील एक छोटेसे दुकान मी आणि आई चालवत असे.
करवडी गावांमध्ये रॉकेलची एजन्सी त्यावेळी आमच्याकडे होती. प्रत्येक महिन्यातल्या पहिल्या आठवड्यात रेशनिंगचे रॉकेल द्यायला एक टँकर गावात येत असे. तो टॅंकर आल्यानंतर माझी आणि आईची खूप तारांबळ होत असे. दादा आणि आण्णा पुण्याला असल्यामुळे रॉकेलचे दुकान चालवायचे जबाबदारी माझ्यावर आणि आईवर येऊन पडली होती. रॉकेलचा टँकर गावांमध्ये आला की ते राकेल खाली उतरून घेण्यासाठी गडबड व्हायची. रॉकेलचे मोठे बॅरेल ढकलत रस्त्याला आणायचे परत ते भरून नंतर ढकलून आत घरात न्यायचे. यासाठी मी आणि आई दोघेच काम करत.रॉकेल आल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून ग्राहकांची रॉकेल न्यायला आमच्या दारात गर्दी होत होती. सकाळ आणि संध्याकाळ दोन वेळात मी आणि आई हा रॉकेल विक्रीचा व्यवसाय करत होतो. माझ्या आईला लिहिता-वाचता येत नाही. ती शाळा शिकलेली नाही. त्यामुळे रॉकेलच्या पावत्या करणे, रेशनकार्डवर नोंदी करणे, वहीमध्ये ग्राहकांच्या सह्या घेणे आदी कामे मी छोट्या टेबलावर बसून करत असे. त्याच वेळेला शेजारी आई रॉकेल ग्राहकांच्या डब्यांमध्ये भरून देत असे. त्यावेळी पाच लिटर आणि एक लिटर चा माप असायचं हे मापटं राकल भरायचे आणि नरसाळ्यातून ग्राहकांच्या डब्यात ओतायचे अशी पद्धत असे.
रॉकेल विक्री करत असताना संपूर्ण हाताला रॉकेलचा वास येत असे. संपूर्ण शरीर पांढरे पडत असे. मात्र माझी आई हे काम अतिशय तत्परतेने आणि हिरीरीने करत असे. मला हे काम करताना नेहमी वाटायचे हे दुकान बंद करावे आणि माझ्या आईला सुख द्यावे.पण हळूहळू परिस्थिती बदलत होती.
या अगोदर सांगितल्याप्रमाणे माझी आई जराही शिकलेली नव्हती. पण तिच्या ह्या अशिक्षितपणाचा अनेकांनी फायदा घेतला, ते अनुभव सांगून मला कुणाला दूखावायचे नाही. पण माझ्या आईने कधीही कुणाला फसवले नाही. शालेय शिक्षण जरी घेतले नसले तरी माझ्या आईचे व्यवहार चातुर्य खूप आहे. कोणतेही काम करायला ती कधीही मागेपुढे पहात नाही. हातात आलेले कोणतेही काम पूर्ण करण्यामध्ये माझा आईचा हात कोणी धरू शकत नाही.
आईने मला सुरुवातीपासूनच नेहमी स्वावलंबनाचे धडे दिले. काम करणे गरजेचे आहे तु काम करत जा,शाळा शिकून मोठा हो .तुझ्याकडे आता शाळा शिकण्याचे काम आहे , तू चांगला अभ्यास कर मोठा हो, असं मला नेहमी सांगत असे. जेव्हा मी कॉलेजला होतो तेव्हा रोज सकाळी उठून स्वयंपाक करून माझ्यासाठी डबा करून द्यायची. कॉलेज वरून आल्यानंतर संध्याकाळी परत दुकान काम करत आई बरोबर माझा दिवस कसा जात असे मला कळत नसे.
माझे मित्र कधीही माझ्या घरी येत तेव्हा आई त्यांचं अतिशय प्रेमाने स्वागत करते. दिवाळीच्या काळात एक पद्धत होती. माझा वाढदिवस भाऊबीजेचा, दिवाळीला भाऊबीजेला सर्व मित्रांना घरी बोलवायचं आणि फराळ द्यायचा ही आईची पद्धत. आईने माझ्या मित्रांना नेहमी प्रेमाची वागणूक दिली. माझा मित्र श्रीधर असो किंवा बापू, भिकाजी भोसले, हनुमंत काशीद या सर्वांना आईने आपल्या घरचा सदस्य मानले. जेव्हा हे मित्र माझ्या घरी येत तेव्हा माझ्या आई जवळ बसत आणि आई कडून काही खायला मागत असत. माझे मित्र माझ्या आईची चेष्टा करत पण आईला त्याचा खुप आनंद वाटत असे. माझ्या मुलाचे मित्र आल्यानंतर त्यांना खाऊ द्यायलाच पाहिजे अशी आईची धारणा होती.
आमचं एकत्र कुटुंब. आमच्या आजीला सारं गाव थोरली आई म्हणायचे, कारण आमच्या मोरे वाड्यात आज्जी थोरली. माझी आई पण थोरलीच. मी माझ्या चुलतीला आक्का आणि माय म्हणतो. आई शब्द घेताना पुनरावृत्ती होऊ नये म्हणून मी आईला कायम शांताई नावाने हाक मारत असे. आईला आईच्या नावाने बोलवणारा कदाचित मी पहिला मुलगा असेन. घरात आल्यानंतर आई कुठे आहे म्हणलं की प्रश्न यायचा कुठली आई थोरली आई कि माझी आई. आक्का मला विचारत असे कुठली आई. थोरली आई कि शांताई .
माझी शांताई खूप शांत, तिच्या शांतते मुळेच घरामध्ये नेहमी शांतता असायची. सहन करण्यामध्ये तिचा हात कोण करील असं मला वाटत नाही .सहनशक्ती चे दुसरे नाव माझी आई म्हटलं तर काय वावगं नाही. तिने माझ्यावर जे संस्कार केले त्या संस्कारामुळे कधीही माझ्या तोंडातून कुणाच्याही आईविषयी अपशब्द गेला नाही. माझ्या आईने कधीही कुणाला शिव्या दिल्या, त्यांच्या नावाचे वाटोळं करून हाक मारलेली मी कधी ऐकलेली नाही. माझ्या वडिलांच्या बाबतीत पण मी ते सांगेन. माझ्या वडिलांनी सुद्धा कधीही कुणाला आई-वडिलांच्या नावाने शिवी दिलेलं किंवा रागावलं आहे असे मी कधीच पाहिले नाही.
आई माझ्या आसपासच्या सर्व घरातील लोकांना खूप आवडते. आमच्या शेजारचे सर्व लोक नेहमी आईकडे येऊन बसतात. माझी आई सर्वांची अतिशय प्रेमाने चौकशी करते. माझ्या आईला कोणी फसवले तर त्यांना कधीही समाधान मिळाले नाही. मला जेव्हा माझ्या आईची आठवण येते तेव्हा मी करवडीला जाऊन येतो. असे वाटते की माझी आई कराडला माझ्या पाशी असावी. पण शहरामधील फ्लॅट संस्कृती व कोंदट वातावरण तिला कधीच आवडले नाही. तिला मी कराडला येऊन राहण्याचा आग्रह केला पण जास्तीत जास्त एक दिवस ती कराडात माझ्या फ्लॅटमध्ये राहते. आईची पूर्णवेळ सोबत मिळण्यामध्ये माझे भाऊ अण्णा नशिबी आहे असं मला म्हणावे लागेल.
आईला जेव्हा माझी आठवण येते तेव्हा ती घरात जर कोण असेल तर आजही कुणाच्या घरात जाते आणि आमच्या सतीश ला फोन लावा म्हणून सांगते. संजय कुंभार किंवा पेंटर कुंभार मामा यांच्या फोनवरून मला आजही आई फोन करते आणि काही मागत नाही, सतीश का आला नाहीस ,कधी येणार आहेस एवढंच विचारते. माझी आई माझ्यासाठी शक्तिपीठ आहे ते कायमच राहिल. अजून काय लिहायचं माझ्या शांताई विषयी !