फॉलोअर

०२ जुलै २०१७

मोकळ्या समाजातील वारकरी वाढताहेत !

मोकळ्या समाजातील वारकरी वाढताहेत !
मुख्य सोहळ्याची उंची कायम पण यंत्रणेवर ताण

सोहळ्यातील वारकरी पेक्षा मोकळा समाजात जास्त वारकरी

भंडीशेगाव सतीश  मोरे

माऊली पालखी सोहळा गेल्या दहा वर्षात खुप बदलतोय, वारीला अधिक  चांगलं आणि सुखसुविधा मिळत आहेत. वारीत सहभागी वारकर्याची संख्या दोन तीन लाख लाखावर सहा सात लाखावर पोहचली आहे. एकीकडे ही बाब सुखावह होत असताना शिस्तबद्ध पालखी सोहळ्यातील वारकरी संख्या कमी होऊन बेशिस्त मोकळ्या समाजातील मुक्त वारकर्याची संख्या वाढत चालली आहे. दोन्ही ठिकाणी सहभागी वारकरी पंढरीची वारीच करतात मात्र स्वच्छतेचा बोर्या उडत  आहे .शिस्तबद्ध पालखी सोहळा विरूद्ध मोकळा समाज याच्यातील साफसफाई बाबतच्या परस्पर विरोधी भुमिकेमुळे स्वच्छ आणि सुंदर वारी संकल्पनेला छेद बसत आहे.

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा काय असतो याबाबत अनेक जण  अनभिज्ञ आहेत.  काही जण आळंदी ते पंढरपूर दरम्यान वारकरी रथाच्या मागे पुढे चालतात, यालाच पालखी सोहळा असे म्हणतात. वास्तविक पालखी सोहळा हा एक शिस्तबद्ध संस्कार आहे. 
संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा आळंदी येथून तर संत तुकाराम महाराज पालखी सोहळा देहु येथून सुरू होतो. या सोहळ्यात राज्यभरातून अनेक दिंड्या सहभागी होतात. ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यात रथापुढे 27 तर रथामागे  सुमारे 300 नोंदणीकृत दिंड्या तसेच नोंदणी नसलेल्या सुमारे 200 दिंड्या आहेत. तुकोबा माऊली पालखी सोहळ्यात नोंदणीकृत 325 तर नोंदणी नसलेल्या 100 हून अधिक दिंड्या आहेत. या दोन्ही सोहळ्यामध्ये सुमारे 1 हजार दिंड्या असल्याची नोंद आहे. एका दिंडीमध्ये 50 ते एक हजार वारकरी असतात. यामध्ये  झेंडेकरी, वीणेकरी, टाळकरी, चोपदार, पाणी सेवा देणारे तसेच इतर सेवेकरी यांचा समावेश असतो. दोन्ही पालखी सोहळ्यात सहभागी नोंदणीकृत दिड्या, त्यामध्ये सहभागी सर्व वारकरी एकत्र येऊन जी परिक्रमा करतात त्याला पंढरीची वारी असे म्हणतात.

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात रथापुढे आणि मागे असणाऱ्या दिंड्या पुर्ण सोळा दिवसात एकमेकांशी घट्ट बांधलेल्या असतात. सुरूवातीला नगारखाना, त्यापाठोपाठ 27 ते 1 या रथापुढे असणाऱ्या दिंड्या,  त्यामागे माऊली पालखी रथ, त्यानंतर  उर्वरित 300 दिंड्या असा पालखी सोहळा असतो.  या दिड्यातील वारकरी नियोजित वेळेत सकाळी सहा /सात वाजता चालायला सुरुवात करतात.  या सोहळ्यातील दिड्याचा क्रम,  दुपारचा भोजन विसावा, सकाळ संध्याकाळचा विसावा याची जागा निश्चित असते. या सर्व दिंडीसाठी पालखीतळावर जागा निश्चित असते, सर्व काही नियोजनबद्ध आणि पद्धतशीर  असते. यामध्ये सहभागी वारकरी, टाळकरी कोणालाही मध्येच कुठेही थांबता येत नाही,  मधूनच बाहेर जाता येत नाही, विश्रांती घेता येत नाही. वारी मार्गावर वाटप केल्या जाणाऱ्या कोणत्याही सुविधा, खाऊ, वस्तू याचा है वारकरी स्वाद घेत  नाहीत. सैनिकी शिस्तीने एका तालात ते चालतात,  ऐवढच काय विशिष्ट दिंडीचा विशिष्ट वेळी कोणता अभंग असतो, हेही ठरलेलं आहे. यामध्ये दिड ते दोन लाख वारकरी असतात   शिस्तबद्ध माऊली सोहळा हा इतका देखणा  असतो की दर्शनासाठी  आलेला भाविक त्याच्या प्रेमात पडलो.

नेमकं याच्या उलटं मोकळा समाज दिंडी मध्ये असते. गावातील मोठ्या किंवा माळकरी व्यक्तीनं पुढाकार घेऊन एक दिंडी स्थापन केली जाते. दिंडीचा खर्च करण्यासाठी वर्गणी  गोळा केली जाते, अनेक ठिकाणी भिशी पण आहे. अशा प्रकारच्या 1000 हून अधिक दिंड्या माऊली सोहळ्याच्या पुढे चालतात.  या दिंड्याबरोबरच पाच ते 25 च्या ग्रुपने चालणारे वारकरी,  माऊली सोहळ्यातील काही सेवेकरी हे पण मोकळ्या समाजातून चालतात.  हे वारकरी पहाटे दोन, तीन वाजता चालायला सुरुवात करतात. त्याच्यावर कोणाचेही नियंत्रण, बंधन नसते.  त्याच्या मुक्कामाच्या, भोजनाच्या, विसावा अशा कोणत्याही जागा ठरलेल्या नसतात. मात्र अनेक सधन दिंडी मालकांनी स्वमालकीचे तंबू घेतले आहेत.  पहाटे उठायचे, फ्रेश होऊन चालायला सुरुवात करायची, स्नान करायला योग्य जागा मिळाली की थांबायचे, पुन्हा चालायचे.  कुठेतरी मोफत चहा,  नाश्ता जेवणाची सोय  असेल तर हे वारकरी कुठेही थांबतात. ठराविक दिंड्या वगळता या वारकरी साठी स्वतंत्र भोजन व्यवस्था नसते.  कोणाचेही नियंत्रण नसल्याने मोकळा समाजातील वारकरी कुठेही थांबतात, कंटाळा आला की थांबतात. गेल्या काही वर्षांत सेवाभावी संस्था,  संघटना आणि मंडळानी वारी मार्गावर चहापाणी पासून आंघोळ,  भोजन सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.  स्वतंत्रपणे चालणे आणि कोणाचेही  नियंत्रण नसणे यामुळे गेल्या चार वर्षांत मोकळा समाजातील वारकर्याची संख्या दो लाखावरून चार लाखावर गेली आहे.

मोकळ्या समाजातील वारकरी माऊली सोहळ्यासाठी प्रशासनाने  उपलब्ध करून दिलेल्या सर्व सुविधांचा लाभ घेतात.  आपण सोहळ्यातच चालत  आहे अशी यांची भावना आहे.  पहाटे दोन ते सकाळी सहा सात पर्यंत तरी हे वारकरी चालतात त्यावेळी चार पाच तास त्याचा अखंड प्रवाह वाहत असतो. सात वाजता माऊली सोहळा सुरू होतो तेव्हा त्याच्या साठि वाट मोकळी करून दिली जाते. दोन्ही दिड्यातील वारकरी पंढरीच्या धारीचाच भाग आहेत.

मात्र सोहळ्यात पुढे चालणारा मोकळा समाज नियंत्रित नसल्यामुळे तो पुढे जाऊन जी घाण करतो, त्याचा फार मोठा फटका सोहळ्यातील वारकरीना बसतो.  स्वच्छ आणि सुंदर वारी उपक्रम गेल्या तीन वर्षांत चौपदार फौडेशनने प्रभावी पणे राबवला आहे.  या उपक्रमाला छेद देण्याचे काम मोकळा समाज करत आहे. मोकळा समाजातील वारकरीच्या स्वच्छता विषयक सोयीसाठी दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेण्याची गरज आहे.

०१ जुलै २०१७

 एक तरी वारी अनुभवावी

   एक तरी वारी नुभवावी 

वेळापूर : सतीश मोरे 

जाता पंढरीसी सुख वाटे जीवा/
आनंदे केशवा भेटताची //
या सुखाची उपमा नाही /
पाहिली शोधोनी अवघी तीर्थे //

पंढरीची वारी कशासाठी करायची ? असा प्रश्न वारीला न गेलेल्या किंवा वारीला जाण्याच इच्छुक नसलेल्या अनेकांना पडत राहतो. वारीत काय आहे? काय मिळणार आहे वारी करून? नुसतं चालणं म्हणजे वारी का? वारी करणं म्हणजे काम नसणाऱ्यांचे काम. म्हातारपणी वारी करायची असते, वारीत सगळी घाणंच असते.  कसं करायचं सगळं ऍडजस्ट? मला एवढ्या गर्दीत जायला आवडंत नाही. वारी करून कुठं विठ्ठल भेटतो का? असे अनेक प्रश्न निर्माण होणाऱ्या नास्तिक, आस्तिक, फुल टाईम- पार्ट टाईम भक्त-अभक्तांसाठी एकदा येऊन पहाच. तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये एक तरी ओवी अनुभवावी, असे म्हटले आहे. पंढरीची वारी करून वर्षभरासाठी टॉनिक घेऊन आलेला वारकरी मात्र एक तरी वारी करावी, अनुभवावी असेच म्हणतो. वारीत जे मिळतं.. ते कुठेच मिळंत नाही. वारीत देव तरी भेटतोच शिवाय देवासारखी माणसंही भेटतात. माणसानं माणसाशी कसं वागायचं? हे ही शिकायला मिळतं. 

वारकरी संप्रदायाचे कार्य शतकानुशतके कोणत्याही प्रकारचा गाजावाजा न करता चालले आहे कारण हा संप्रदाय गावागावात खोलवर रूजला  आहे. अंधश्रद्धेला कसलाही थारा नसलेल्या या संप्रदायाच्या अनेक परंपरा, चालीरीती  आहेत. ज्ञानेश्वर महाराज  ,नामदेव महाराज ,  एकनाथ महाराज आणि तुकाराम महाराजांनी या संप्रदायासाठी फार मोठ्ठे योगदान दिले आहे  आषाढी, कार्तिक, माघी अथवा चैत्री यापैकी एका शुद्ध  एकादशीस गळ्यात तुळशीची माळ घालून जो नियमाने पंढरपुरास जातो तो पंढरपूरचा वारकरी आणि त्यांच्या उपासनेचा मार्ग म्हणजे वारकरी पंथ . वारी केल्यास अनेक लाभ पदरी पडतात,  निष्ठा बळकट होते.  अंतरीचा प्रेमा वर्धिष्णू होतो.  संत सज्जनाच्या भेटी होतात. वारी हे देव  आणि भक्ताचे उच्च पातळीवरील स्नेहसंमेलनच असते. ज्ञानेश्वर महाराज हे खरे तर श्रेष्ठ योगी आणि ज्ञानी, परंतू ज्ञान आणि योग विसरून ते वारीच्या भक्तीप्रेमरसात तन्मय झाले. एकनाथ ममहाराजांनी वारीस साधनाचे सार म्हटले आहे. 

साधन ते सार पंढरीची वारी 
आन तू करी सायासाचे 

पालखी सोहळ्यातसहभागी होऊन केली जाणारी वारी हे पृथ्वीवरील सर्वात मोठ्ठे सुख आहे.  गैल्या काही वर्षात ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यात सहभागी वारकरी आणि दिंड्याची संख्या फार वाढली आहे. पण पालखीबरोबर येणारा हा समुदाय फक्त जमा झालेल्या गर्दीच्या स्वरूपाचा नसून तो एकाच भावनावलयाने गुंफलेला सुत्रबद्ध आणि शिस्तबद्ध समाज  असतो. वर वर पाहिले तर भिन्न प्रकारचे, स्वभावाचे,बुद्धीचे वा वर्गाचे स्रीपुरूष दिसतील, मात्र या सर्वामधून प्रेम भक्तीची एकच भावना असल्याने  अनेकत्वात एकत्वाचा चिवट धागा असतो. 
दुसरी गोष्ट म्हणजे वारीतील वातावरण.  पंधरा दिवसाच्या या काळात वारकरी निराळ्या सृष्टीत प्रवेश करतो. एक निराळाच आनंद अनुभवतो. घर, दार, संसार, काम, शेती, नोकरी या दैनंदिन जीवनातील क्षुद्र कल्पना दूर राहतात. आळंदी ते पंढरपूर हा एखादा प्रवास, खूप
मार्ग न राहता भक्ती प्रेम सागरच बनून जातो. या प्रेमस्मृतीत दिवस केव्हा गेला, रात्र कधी आली याचे भान रहात नाही.  

रात्री न कळे दिवस न कळे / 
अंगी खेळे दैवत हे /

एक एक दिवस  येतो जातो, वाटेत गावे येतात, जातात. पंढरी आणखी जवळ आली आहे याचे समाधान सर्व थकवा दूर घालवते. सर्वाच्या शारीरिक व मानसिक  अवस्था भिन्न  असल्या तरी सर्वाच्या हद्याच्या गाभाऱ्यात माऊलीच्या प्रेमाची ज्योत तेवत  असते, सर्वाच्या ह्दयात आपणाबरोबर माऊली आहेत , तीचा हात धरून आपण चालत  आहोत ही गोड भावना  असते. त्यामुळे वाचालीचा क्षीण रहात नाही.  वाटच पायाखालून चालते,  माणुस नव्हे.  उन, वारा, पाऊस हा एक खेळच असतो,  त्यात देहदंडनाची, तपश्चर्येची रूक्ष भावना नसते. निर्मळ चित्ते झाली नवनिते,  पाषाणा पाझर फुटती रे, असा अनुभव येतो. चिता व काळजीने ग्रासलेले मन या वातावरणात आल्यावर त्याला संजीवनी येते. या प्रसन्नतेने तो आपोआप नाचू लागतो 

वारीत सहभागी होऊन मिळणारे सुख, लुटलेला आनंद शब्दात व्यक्त करता येण्याऐवढा छोटा नाही.  या,  सहभागी व्हा  आणि पहा, असेच जणू सारे वारकरी सांगू इच्छितात. पंढरीचीवारी  इतर सर्व तिर्थयात्रेहून अधिक श्रेष्ठ आहे. वाराणसीत मेल्यावर मोक्ष ,  गयेला पितृऋणाचा नाश मात्र पंढरीत  रोकडा लाभ होतो,  असे संत तुकाराम महाराज म्हणतात .

मरण मुक्ती वाराणसी /
पितृऋण गया नाही //
उधार नाही पंढरीशी/
पायापाशी विठोबाच्या //

चौकट

पंढरीची वारी मी अनेक वर्षापासून करत आहे. मला काही तरी मिळावे म्हणून मी वारीला येत नाही. वारीला येणाऱ्या माणसाला काही मागावे लागत नाही. येथे मिळणारे सुख जगातील सर्वात मोठे  असे सुख आहे. वारी ही परमात्म्याला भेटण्याचा सहज आणि सोपा मार्ग आहे. 

सज्जन महाराज, नांदेडकर

22 वर्षे  नित्य वारकरी

 

  

२९ जून २०१७

मॅनेजमेंट गुरू... माऊली पालखी सोहळा


माळशिरस : सतीश मोरे

पंढरीचा वारकरी।
वारी चुकोनेदी हरी।।

पंढरीची वारी कशी सुरू होते.. कशी चालते, वारकऱ्यांना  कोण निमंत्रण पाठवतं? लाखो वारकऱ्यांच्या राहण्याची, खाण्या-पिण्याची सोय कोण करतं? कसं चालतं हे सगळं..! कुणाची तक्रार नाही.. कोणाचा वाद नाही.. कोणी मोठा नाही.. कोणी लहान नाही. कोण कोणाला नाव विचारत नाही, जात विचारत नाही. सगळेजण फक्त एकाच ध्यासाने, एका दिशेने सलग अठरा दिवस ऊन, वारा, पाऊस याची कदर न करता कसे चालतात. त्यांना ही शक्ती कोठून मिळते? हे सगळंच एक न उलगडणारं कोडं आहे ! जगातील कोणत्याही देशात.. कोणत्याही धर्मात अशा प्रकाची सतत अठरा दिवस चालणारी धार्मिक यात्रा नाही. वारकरी हे कसं घडवून करतात? हा सर्व संशोधनाचा विषय आहे. संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा आणि जगतगुरु तुकोबा महाराज पालखी सोहळा या दोन प्रमुख पालख्यांबरोबरच राज्यभरातील शंभरहून अधिक गावांतून येणाऱ्या  विविध  संतांच्या नावाच्या पालख्या आणि सुमारे पाच हजार गावांतून येणाऱ्या लहान-मोठ्या दिंड्या यांचे नियोजन हा अवघ्या जगासाठी अभ्यासाचा विषय आहे. हे सर्व घडवून आणणारा वारकरी माऊली हा सर्वश्रेष्ठ "मॅनेजमेंट गुरु' आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 

संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा आळंदी येथून तर संत तुकाराम महाराज पालखी सोहळा देहु येथून सुरू होतो. या सोहळ्यात राज्यभरातून अनेक दिंड्या सहभागी होतात. ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यात रथापुढे 27 तर रथामागे  सुमारे 300 नोंदणीकृत दिंड्या तसेच नोंदणी नसलेल्या सुमारे 200 दिंड्या आहेत. तुकोबा माऊली पालखी सोहळ्यात नोंदणीकृत 325 तर नोंदणी नसलेल्या 100 हून अधिक दिंड्या आहेत. या दोन्ही सोहळ्यामध्ये सुमारे 1 हजार दिंड्या असल्याची नोंद आहे. एका दिंडीमध्ये 50 ते एक हजार वारकरी असतात. यामध्ये  झेंडेकरी, वीणेकरी, टाळकरी, चोपदार, पाणी सेवा देणारे तसेच इतर सेवेकरी यांचा समावेश असतो. प्रस्थानाअगोदर दोन-तीन महिने दिंडी प्रमुखाच्या नेतृत्चाखाली तयारी सुरु होते. दिंडीत सहभागी वारकऱ्यांच्या संख्येनुसार राहण्याची सोय, तंबू, भोजन,  वाहतूक याची तयारी केली जाते. सर्व संच एकत्र करून वारकऱ्यांना घेऊन  वाहने  आळंदी, देहुत पोहोचतात. प्रस्थानाच्या आदल्या दिवशी  या दिंड्यांतील वारकरी आळंदी, देहुतील मठामध्ये किंवा खासगी जागेत कुठेही मुक्काम करतात. ज्ञानेश्वर माऊली व तुकाराम महाराज या दोन्ही पालख्यांचा पुण्यात दोन दिवस मुक्काम असतो. पुण्यनगरीत माऊली भक्तांच्या सेवेसाठी महानगरातील अनेक सेवाभावी संस्था, मंडळे कार्यरत असतात. पुण्यात वारकऱ्यांच्या निवासाची सोय शाळा, महाविद्यालये, धर्मशाळा येथे केली जाते. अनेक वारकरी  मिळेल तेथे  निवास करतात. अलिकडे पुणे, पिंपरी-चिंचवड येथील अनेक अपार्टमेंटस्‌च्या बेसमेंटमध्ये वारकऱ्यांच्या निवासाची सोय केली जाते. पुणे शहर सोडून या दोन्ही पालख्या वेगवेगळ्या दिशेने पंढरपूरकडे मार्गक्रमण करतात आणि त्यानंतर येणाऱ्या सासवड आणि लोणी काळभोर येथील मुक्कामाच्या ठिकाणापासून खऱ्या अर्थाने  वारीचे अचूक मॅनेजमेंट पहायला मिळते.

पालखी सोहळा सकाळी सातच्या सुमारास मार्गस्थ होतो आणि संध्याकाळी सहाच्या दरम्यान मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचतो. साधारण 6 ते 8 किलोमीटर अंतर पार पडल्यानंतर पहिला विसावा घेतला जातो. पहिल्या विसाव्यानंतर पुढे तेवढेच अंतर पार पडल्यानंतर  दुपारी 12 च्या सुमारास जेवणासाठी सोहळा विसावतो. एक तासानंतर पुन्हा सोहळा मार्गस्थ होतो. सायंकाळी चारच्या सुमारास आणखी एका ठिकाणी विसावा घेतला जातो. त्यानंतर मुक्कामाच्या ठिकाणी सोहळा पोहोचतो.  वारकरी सकाळी 7 वाजता चालावयास सुरूवात करतात. "ज्ञानेश्वर माऊली तुकाराम', "राम कृष्ण हरी..' च्या जयघोषात भजनाच्या तालावर टाळ वाजवत वारकरी चालत असतात. प्रत्येक दिंडीच्या सुरुवातीला झेंडेकरी, त्या पाठोपाठ वीणेकरी. सोबत तुलशी वृंदावन आणि पाण्याचा हंडा घेतलेली महिला वारकरी अन्‌ त्यांच्या पाठोपाठ तीन किंवा चारच्या ओळीत टाळकरी  आणि शेवटी  चोपदार अशी प्रत्येक दिंडीतील व्यवस्था असते. शिस्तबद्ध सोहळ्यातील वारकरी कोणत्याही प्रलोभनाला बळी पडत नाहीत. एकदा चालावयास सुरूवात केल्यानंतर जोपर्यंत माऊलींचा रथ थांबत नाही तोपर्यंत कोणतीही दिंडी मध्ये थांबतच नाही. वारकऱ्यांच्या सेवेसाठी अनेक गावांत रस्त्याकडेला सुविधा उपलब्ध  करून दिल्या जातात, मात्र माऊली सोहळ्यातील कोणताही वारकरी ओळ सोडून  कधीही त्या सेवेचा लाभ घ्यायला जात नाहीत. दिंडीत कोणीही बाहेरचा व्यक्ती येऊ शकत नाही. चोपदार या सर्व गोष्टींवर लक्ष ठेऊन असतात.

एकिकडे सोहळ्यातील दिंड्या सकाळी मार्गक्रमण करतात. तर दुसरीकडे या दिंड्यांत सहभागी वारकऱ्यांच्या सेवेसाठी अनेक हात झटत असतात. दिंडीत सहभागी वारकरी आणि सेवेकरी यांची लगबग पहाटे तीन वाजता सुरू होते. प्रात:विधी आणि अंघोळ आटोपून सोहळ्यात प्रत्यक्ष चालणारे वारकरी पहाटे चार वाजेपर्यंतच तयार होतात. या दरम्यान पालखी तळावर मुक्कामाच्या ठिकाणी उभारलेले सर्व तंबू काढले जातात. तंबुचे सर्व साहित्य तसेच वारकऱ्यांचे साहित्य, गाठोडी, पिशव्या ट्रक,जीप, टेम्पोमध्ये ठेवले जाते. ही वाहने चारच्या सुमारास पुढील मुक्कामाच्या ठिकाणी मार्गस्थ होतात. भोजन व्यवस्थेसाठी स्वतंत्र वाहन असते.  या वाहनात स्वयंपाकी तसेच सेवेकरी महिला आदी लोक बसतात. हे वाहन दुपारच्या नियोजित भोजन ठिकाणी मार्गस्थ होते. माऊलींच्या पालखी सोहळ्यात गेल्या अनेक वर्षांपासून ज्या दिंड्या सहभागी होत आहेत त्या सर्व दिंड्यांचे दुपारचे भोजनाचे ठिकाण अनेक वर्षांपासून एकच आहे. ठरलेल्या ठिकाणीच हे वाहन थांबते. हे वाहन सकाळी सातच्या सुमारास नियोजित ठिकाणी पोहोचते. त्यानंतर त्यामधील सेवेकरी नित्यक्रम आटोपून लगेच भोजन तयार करण्याच्या तयारीस लागतात. या ठिकाणी कोणत्या दिवशी कोणता स्वयंपाक करायचा याचेही नियोजन ठरलेले असते. अनेक दिंड्यांमध्ये तर भोजनाचा मेनूही वर्षानुवर्षे एकच आहे. (कराडकर 12 नंबर दिंडीच्या लोणंद मुक्कामी दुपारच्या जेवणात गुलाबजामून असतेच. तर तोंडले-बोंडले येथे दुपारच्या जेवणात वारकरी गेल्या अनेक वर्षांपासून चकुल्यांचा स्वाद घेतात.) दुपारी 12 वाजता दिंडीत चालणारे वारकरी ठरलेल्या ठिकाणी येतात. या वारकऱ्यांची पहिली पंगत होते. त्यानंतर इतर वारकरी, सेवेकरी मोकळ्या समाजातून चालणारे वारकरी यांची दुसरी पंगत होते. भोजनानंतर वारकरी थोडावेळ विसावा घेतात. नगारा वाजल्यानंतर लगेच पालखीच्या पुढे किंवा मागे नेमून दिलेल्या जागेवर आपल्या दिंडीमध्ये जातात. दुपारच्या भोजनाची व्यवस्था झाल्यानंतर भोजन वाहतुकीचे वाहन मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचते. थोडावेळ आराम केल्यानंतर पुन्हा पाच वाजता संध्याकाळच्या जेवणाची तयारी सुरू होते. भोजन व्यवस्थेमध्ये (दिंडीतील वारकरी संख्येनुसार) 10 ते 20 जण कार्यरत असतात. अनेक पंगतींसाठी दानशूर लोकांनी धान्य, तेल, साखर आदी वस्तूरुपात मदत दिलेली असते. दिंडीत कितीही लोक आले तरी कोणालाही अन्न कमी पडत नाही. वारकऱ्यांच्या निवासासाठी प्रत्येक दिंडी मालकाने तंबुची सोय केलेली असते. तंबुचे सर्व साहित्य, लोखंडी ऍंगल, ताडपत्री, मेका यांचे (राहुटी) नियोजन प्रत्येक दिंडी मालकाने अनेक वर्षांपासून करून ठेवलेले आहे.

एका तंबुमध्ये 20 ते 30 वारकरी राहू शकतात. त्यानुसार प्रत्येक दिंडीत 15 ते 50 इतके तंबू  (राहुट्या) असतात. हे सर्व साहित्य घेऊन वाहन
मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचते. प्रत्येक गावातील माऊलींच्या पालखीचे मुक्कामाचे ठिकाण गेल्या अनेक वर्षांपासून निश्चित आहे. निश्चित जागेवरच पालखीतळ उभारला जातो. पालखीतळापासून प्रत्येक दिंडीचा मुक्काम कोणत्या ठिकाणी असावा, ती जागा सुद्धा अनेक वर्षांपासून एकच आहे. अनेक वर्षांपासून वारी करणाऱ्या वारकऱ्यांना या जागा ओळखीच्या झाल्या आहेत. कमी जागेत अनेक दिंड्या आपले तंबू उभारतात. या तंबुंची दिशा, जागा हे सुद्धा निश्चित आहे. साहित्य घेऊन आलेला ट्रक मध्यभागी एका विशिष्ट ठिकाणी उभा केला जातो. या ट्रकच्या एका बाजूला भोजन तयार करण्यासाठी ताडपत्री सोडून जागा तयार केली जाते. ही ताडपत्री त्या ट्रकला बांधलेली असते. ताडपत्रीच्या दोऱ्या ताणून बांबुला बांधून तेथे भोजनाचे साहित्य ठेवले जाते. भोजन कक्ष (किचन) तयार झाल्यानंतर  सेवेकरी तंबू उभारण्याच्या कामाला लागतात. दुपारी 12-1 पर्यंत पालखी तळावर अनेक दिंड्यांचे तंबू तयार झालेले असतात.

सायंकाळी सातच्या सुमारास सोहळ्यातील वारकरी आपल्या ठरवून दिलेल्या तंबुमध्ये मुक्कामाला जातात. संध्याकाळी 7 ते पहाटे 3 पर्यंत या वारकऱ्यांसाठी हेच घर असते. पहाटे तीन वाजता सर्व तंबू पुन्हा काढले जातात. साहित्य ट्रकात भरले जाते आणि ही वाहने पुढच्या मुक्कामाला पोहोचतात.

गेली अनेक वर्षे माऊली पालखी सोहळा सुुरु आहे. सर्व नियोजन अखंडपणे  सुरु आहे. कोणी आला किंवा आला नाही म्हणून दिंडी सोहळा कधीच थांबलेला नाही. हा सोहळा अविरत सुरु राहण्यासाठी अनेकांचे हात लागलेले आहेत. कोणतेही इव्हेंट मॅनेजमेंट नाही, निमंत्रण नाही, सांगावा नाही. प्रलोभन नाही, फी नाही, कसलाही बंदोबस्त नाही. निधी मिळण्यासाठी कोणाकडे हात पसरायला जावे लागत नाही. तरीही हा सोहळा निर्विघ्नपणे पार पडत असतो. हे सर्व कोठून येते, कोण करते हे माऊलींच्या विश्वासावर टाकले जाते. सुमारे चार लाख लोक रोज या गावाहून त्या गावाकडे चालत राहतात. पुढच्या गावात मुक्काम करतात. तिथे मांडलेला संसार मोडून पुन्हा पुढच्या ठिकाणी मार्गस्थ होतात. कोणालाही काहीच कमी पडत नाही. कोणीच उपाशी रहात नाही. कोणीच आजारी पडत नाही. कसलीही अडचण आली तरी मदतीसाठी अनेक हात धावून येतात. रहायला, झोपायला , खायला कसलीच अडचण येत नाही. निश्ंिचत होऊन पुढे चालत रहायचे. माऊलींनी सगळी सोय केलेली असते. स्वर्गलोकात सुद्धा असा सोहळा पहायला मिळत नाही. असा सोहळा पाहण्यासाठी देवांनासुद्धा पृथ्वीतलावरच यावे लागले आहे, अशी वारकरी समाजाची धारणा आहे. माऊली पालखी सोहळ्याविषयी कितीही लिहीले तरी कागद अपुराच पडणार आहे. असा हा सोहळा पाहण्यासाठी, अनुभवण्यासाठी जगभरातून अनेक लोक वारीत सहभागी होत आहेत. मॅनेजमेंट गुरु माऊली पालखी सोहळा हे जगासाठी नेहमीच संशोधनाचा विषय राहिला आहे.

या सुखाकारणे देव वेडावला ।
वैकुंठ सोडोनू वारीसी आला ।।

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...