मोकळ्या समाजातील वारकरी वाढताहेत !
मुख्य सोहळ्याची उंची कायम पण यंत्रणेवर ताण
सोहळ्यातील वारकरी पेक्षा मोकळा समाजात जास्त वारकरी
भंडीशेगाव सतीश मोरे
माऊली पालखी सोहळा गेल्या दहा वर्षात खुप बदलतोय, वारीला अधिक चांगलं आणि सुखसुविधा मिळत आहेत. वारीत सहभागी वारकर्याची संख्या दोन तीन लाख लाखावर सहा सात लाखावर पोहचली आहे. एकीकडे ही बाब सुखावह होत असताना शिस्तबद्ध पालखी सोहळ्यातील वारकरी संख्या कमी होऊन बेशिस्त मोकळ्या समाजातील मुक्त वारकर्याची संख्या वाढत चालली आहे. दोन्ही ठिकाणी सहभागी वारकरी पंढरीची वारीच करतात मात्र स्वच्छतेचा बोर्या उडत आहे .शिस्तबद्ध पालखी सोहळा विरूद्ध मोकळा समाज याच्यातील साफसफाई बाबतच्या परस्पर विरोधी भुमिकेमुळे स्वच्छ आणि सुंदर वारी संकल्पनेला छेद बसत आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा काय असतो याबाबत अनेक जण अनभिज्ञ आहेत. काही जण आळंदी ते पंढरपूर दरम्यान वारकरी रथाच्या मागे पुढे चालतात, यालाच पालखी सोहळा असे म्हणतात. वास्तविक पालखी सोहळा हा एक शिस्तबद्ध संस्कार आहे.
संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा आळंदी येथून तर संत तुकाराम महाराज पालखी सोहळा देहु येथून सुरू होतो. या सोहळ्यात राज्यभरातून अनेक दिंड्या सहभागी होतात. ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यात रथापुढे 27 तर रथामागे सुमारे 300 नोंदणीकृत दिंड्या तसेच नोंदणी नसलेल्या सुमारे 200 दिंड्या आहेत. तुकोबा माऊली पालखी सोहळ्यात नोंदणीकृत 325 तर नोंदणी नसलेल्या 100 हून अधिक दिंड्या आहेत. या दोन्ही सोहळ्यामध्ये सुमारे 1 हजार दिंड्या असल्याची नोंद आहे. एका दिंडीमध्ये 50 ते एक हजार वारकरी असतात. यामध्ये झेंडेकरी, वीणेकरी, टाळकरी, चोपदार, पाणी सेवा देणारे तसेच इतर सेवेकरी यांचा समावेश असतो. दोन्ही पालखी सोहळ्यात सहभागी नोंदणीकृत दिड्या, त्यामध्ये सहभागी सर्व वारकरी एकत्र येऊन जी परिक्रमा करतात त्याला पंढरीची वारी असे म्हणतात.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात रथापुढे आणि मागे असणाऱ्या दिंड्या पुर्ण सोळा दिवसात एकमेकांशी घट्ट बांधलेल्या असतात. सुरूवातीला नगारखाना, त्यापाठोपाठ 27 ते 1 या रथापुढे असणाऱ्या दिंड्या, त्यामागे माऊली पालखी रथ, त्यानंतर उर्वरित 300 दिंड्या असा पालखी सोहळा असतो. या दिड्यातील वारकरी नियोजित वेळेत सकाळी सहा /सात वाजता चालायला सुरुवात करतात. या सोहळ्यातील दिड्याचा क्रम, दुपारचा भोजन विसावा, सकाळ संध्याकाळचा विसावा याची जागा निश्चित असते. या सर्व दिंडीसाठी पालखीतळावर जागा निश्चित असते, सर्व काही नियोजनबद्ध आणि पद्धतशीर असते. यामध्ये सहभागी वारकरी, टाळकरी कोणालाही मध्येच कुठेही थांबता येत नाही, मधूनच बाहेर जाता येत नाही, विश्रांती घेता येत नाही. वारी मार्गावर वाटप केल्या जाणाऱ्या कोणत्याही सुविधा, खाऊ, वस्तू याचा है वारकरी स्वाद घेत नाहीत. सैनिकी शिस्तीने एका तालात ते चालतात, ऐवढच काय विशिष्ट दिंडीचा विशिष्ट वेळी कोणता अभंग असतो, हेही ठरलेलं आहे. यामध्ये दिड ते दोन लाख वारकरी असतात शिस्तबद्ध माऊली सोहळा हा इतका देखणा असतो की दर्शनासाठी आलेला भाविक त्याच्या प्रेमात पडलो.
नेमकं याच्या उलटं मोकळा समाज दिंडी मध्ये असते. गावातील मोठ्या किंवा माळकरी व्यक्तीनं पुढाकार घेऊन एक दिंडी स्थापन केली जाते. दिंडीचा खर्च करण्यासाठी वर्गणी गोळा केली जाते, अनेक ठिकाणी भिशी पण आहे. अशा प्रकारच्या 1000 हून अधिक दिंड्या माऊली सोहळ्याच्या पुढे चालतात. या दिंड्याबरोबरच पाच ते 25 च्या ग्रुपने चालणारे वारकरी, माऊली सोहळ्यातील काही सेवेकरी हे पण मोकळ्या समाजातून चालतात. हे वारकरी पहाटे दोन, तीन वाजता चालायला सुरुवात करतात. त्याच्यावर कोणाचेही नियंत्रण, बंधन नसते. त्याच्या मुक्कामाच्या, भोजनाच्या, विसावा अशा कोणत्याही जागा ठरलेल्या नसतात. मात्र अनेक सधन दिंडी मालकांनी स्वमालकीचे तंबू घेतले आहेत. पहाटे उठायचे, फ्रेश होऊन चालायला सुरुवात करायची, स्नान करायला योग्य जागा मिळाली की थांबायचे, पुन्हा चालायचे. कुठेतरी मोफत चहा, नाश्ता जेवणाची सोय असेल तर हे वारकरी कुठेही थांबतात. ठराविक दिंड्या वगळता या वारकरी साठी स्वतंत्र भोजन व्यवस्था नसते. कोणाचेही नियंत्रण नसल्याने मोकळा समाजातील वारकरी कुठेही थांबतात, कंटाळा आला की थांबतात. गेल्या काही वर्षांत सेवाभावी संस्था, संघटना आणि मंडळानी वारी मार्गावर चहापाणी पासून आंघोळ, भोजन सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. स्वतंत्रपणे चालणे आणि कोणाचेही नियंत्रण नसणे यामुळे गेल्या चार वर्षांत मोकळा समाजातील वारकर्याची संख्या दो लाखावरून चार लाखावर गेली आहे.
मोकळ्या समाजातील वारकरी माऊली सोहळ्यासाठी प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या सर्व सुविधांचा लाभ घेतात. आपण सोहळ्यातच चालत आहे अशी यांची भावना आहे. पहाटे दोन ते सकाळी सहा सात पर्यंत तरी हे वारकरी चालतात त्यावेळी चार पाच तास त्याचा अखंड प्रवाह वाहत असतो. सात वाजता माऊली सोहळा सुरू होतो तेव्हा त्याच्या साठि वाट मोकळी करून दिली जाते. दोन्ही दिड्यातील वारकरी पंढरीच्या धारीचाच भाग आहेत.
मात्र सोहळ्यात पुढे चालणारा मोकळा समाज नियंत्रित नसल्यामुळे तो पुढे जाऊन जी घाण करतो, त्याचा फार मोठा फटका सोहळ्यातील वारकरीना बसतो. स्वच्छ आणि सुंदर वारी उपक्रम गेल्या तीन वर्षांत चौपदार फौडेशनने प्रभावी पणे राबवला आहे. या उपक्रमाला छेद देण्याचे काम मोकळा समाज करत आहे. मोकळा समाजातील वारकरीच्या स्वच्छता विषयक सोयीसाठी दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेण्याची गरज आहे.