फॉलोअर

०३ फेब्रुवारी २०२६

सुनेत्राताईनी जपली परंपरा


सुनेत्राताईंनी निभावली सत्तेपलीकडची परंपरा

 _प्रीतिसंगमावरून_ 
सतीश मोरे 
दैनिक पुढारी 

कराडचा प्रीतिसंगम हा महाराष्ट्राच्या राजकीय नकाशावरील एक साधा भूभाग नाही. तो एक विचारकेंद्र आहे. तो एक संस्कारस्थळ आहे. आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे तो एक राजकीय आत्मा आहे.स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीसमोर उभं राहणं म्हणजे केवळ श्रद्धांजली अर्पण करणं नाही, तर एका संपूर्ण वैचारिक परंपरेसमोर नतमस्तक होणं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नेते आले, अनेक गेले; पण काही स्थळं अशी असतात, जी व्यक्तींपेक्षा मोठी असतात. प्रीतिसंगम हे त्यातलं एक आहे.

अजित पवार यांचं प्रीतिसंगमाशी असलेलं नातं हे औपचारिक नव्हतं. ते राजकीय नव्हतं. ते भावनिक आणि वैचारिक होतं.ते चव्हाण साहेबांच्या समाधीस्थळी येऊन केवळ अभिवादन करत नसत, तर तिथे बसत असत. मौनात. चिंतनात. आत्मसंवादात.त्या शांततेतूनच ते प्रेरणा घेत असत, दिशा घेत असत, आणि कर्तव्याची जाणीव नव्याने जागी करत असत.

राजकारणात प्रेरणास्थानं असतात, पण त्यांच्याशी नातं फार काळ टिकत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सर्वेसर्वा शरद पवार यांच्या पाठोपाठ प्रीतीसंगमाचे आणि अजित पवारांचं नातं हे सातत्याचं होतं — परंपरेचं होतं — संस्कारांचं होतं. अजित दादांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांच्या पश्चात सुनिता ताईनी पण तेच केलं. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी कराडच्या प्रीतिसंगमाला दिलेली भेट, ही केवळ एक औपचारिक कार्यक्रम नव्हता. तो एक राजकीय संदेश होता — शांत, सौम्य, पण अर्थपूर्ण. 

अतिशय विपरीत, अनाकलनीय आणि दुःखद घटना घडून गेली. अशा परिस्थितीत सत्ता हाती आल्यानंतर पहिलं पाऊल कुठे टाकायचं, यावर नेतृत्वाची दिशा ठरते. मंचावर की स्मृतीस्थळी? प्रचारात की प्रेरणास्थानी? प्रसिद्धीत की परंपरेत? सुनेत्रा पवार यांनी प्रेरणास्थानाची निवड केली. ही निवड राजकीय गणिताची नव्हती,ती राजकीय संस्कृतीची होती.महाराष्ट्राच्या राजकारणात आज सत्तासंघर्ष,आरोप-प्रत्यारोप, वाद-विवाद आणि गदारोळ यांचा काळ आहे.या पार्श्वभूमीवर प्रीतिसंगमावरची शांतता अधिक बोलकी ठरते.

प्रीतिसंगमावर सुनेत्रा ताई पवार येण्यापासून ते परत गाडीतबसून निघेपर्यंतचा काळ,हा राजकीय कार्यक्रमाचा वेळ नव्हता.तो एका स्त्रीच्या अंतर्मनाचा अवकाश होता.डोळ्यांत साचलेलं पाणी स्पष्ट दिसत होतं.ते वाहत नव्हतं…ते दाबून धरलेलं होतं.दुःख, जबाबदारी आणि संवेदनशीलता —या तिन्ही गोष्टींचं मिश्रण त्या डोळ्यांत उतरलेलं होतं.त्या प्रीतिसंगमावर आल्या होत्या प्रेरणेसाठी. सत्तेच्या प्रदर्शनासाठी नव्हे. प्रतिमानिर्मितीसाठी नव्हे. राजकीय संदेशासाठी नव्हे —तर दिशा शोधण्यासाठी.

महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारीआणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या भविष्यासाठीचं आव्हान —हे दोन्ही ओझं त्या मनात घेऊन आल्या होत्या.या क्षणी त्या उपमुख्यमंत्री नव्हत्या.त्या एक स्त्री होत्या.एक आई होत्या. त्या अनेक महिलांना भेटल्या.हात धरले.संवाद साधला.पण त्या डोळ्यांत एक वेगळंच मौन होतं.ते मौन म्हणत होतं —“मी उपमुख्यमंत्री झाले असेन,पण मी आधी एक स्त्री आहे.”प्रीतिसंगमावर येणं ही एक औपचारिक भेट नव्हती.
ती एक अंतर्मनाची यात्रा होती. स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांचा वारसा,कराडकरांची माती आणि प्रीतिसंगमाची शांतता —या तिन्ही गोष्टी त्या शोधत होत्या.त्या समाधीसमोर नतमस्तक झाल्या,पण खरं नमन त्यांनी जबाबदारीसमोर केलं. 

कारण इथे शब्द नाहीत — विचार आहेत.इथे घोषणा नाहीत — मूल्य आहेत.इथे राजकारण नाही — संस्कार आहेत. अजित पवार यांना जिथे प्रेरणा मिळायची,तिथेच सुनेत्रा पवार यांनी नतमस्तक होणं,ही केवळ श्रद्धांजली नाही —ती एक परंपरेची सातत्यपूर्ण साक्ष आहे. सत्ता ही बदलत राहते.पदं येतात-जातात.नेते बदलतात.पण परंपरा टिकली पाहिजे.विचार टिकले पाहिजेत. संस्कार टिकले पाहिजेत.प्रीतिसंगम याचाच साक्षीदार आहे. उपमुख्यमंत्री म्हणून आलेल्या सुनेत्रा ताईंचीची कराड भेट ही एक बातमी नाही,ती एक संपादकीय अर्थ असलेली घटना आहे.कारण ती सांगते —सत्तेचा वारसा नव्हे,तर संस्कारांचा वारसा पुढे जात आहे.आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला आज सर्वाधिक गरज आहे —ती याच वारशाची.

सतीश मोरे, 
दै.पुढारी कराड 
9881191302

Sunetra Ajit Pawar 
Ajit Pawar

०२ फेब्रुवारी २०२६

पडद्यावरचा अमिताभ आवडतो आणि पडद्याबाहेरचा भावतो

पडद्यावरचा अमिताभ आवडतो आणि
पडद्याबाहेरचा अमिताभ अधिक भावतो...कारण
सतिताभ की नजरसे अमिताभ 
भाग २

बॉलिवूडच्या इतिहासात अनेक सुपरस्टार आले, गेले…
पण काही जण फक्त कलाकार नसतात, ते युगपुरुष बनतात.अमिताभ बच्चन हे त्यातलेच एक नाव. जंजीर पासून सुरु झालेला प्रवास आज अॅग्री ओल्ड मॅन पर्यंत तसाच आहे. अन्यायाच्या विरुद्ध उभा राहणारा आणि तरुण पिढीला भावलेला अमिताभ आज 82 वर्षाचा झाला तरीही सर्व गटातील चाहत्यांना आवडतो. त्याचे एक एक चित्रपट अनेकदा पाहिले आहेत, अक्षरशः त्याचं पारायण केलं आहे. त्याच्या चित्रपटातील अनेक संवाद मुखदगत आहेत.तो पडद्यावरचा बच्चन आम्हाला भावतोच. मात्र पडद्या बाहेरचा अमिताभ आम्हाला जगण्याची दिशा देतो, प्रेरणा देतो स्फूर्ती देतो. याची कारण दोन आहेत.

त्यांची कथा ही फक्त सिनेमाची नाही, ती आहे संघर्षाची, स्वाभिमानाची आणि न झुकणाऱ्या जिद्दीची.साल 1999 — अमिताभ बच्चनांच्या आयुष्यातील सर्वात अंधारलेला काळ.त्यांची कंपनी ABCL (Amitabh Bachchan Corporation Ltd) पूर्णपणे कोसळली होती.Miss World Pageant च्या आयोजनामुळे आर्थिक संकट अधिकच गडद झालं.परिस्थिती इतकी बिकट होती की — अमिताभ यांच्यावर जवळपास 90 कोटी रुपयांचं कर्ज होतं.

बँक खात्यात शून्य शिल्लक होती.निवासस्थान असलेल्या ‘प्रतीक्षा’ बाहेर रोज कर्जदारांची गर्दी, धमक्या, शिवीगाळ सुरू होती.घराचा निलाव करण्याची प्रक्रिया सुरू होण्याच्या मार्गावर होती.धीरूभाई अंबानी यांनी मदतीचा हात पुढे केला,पण अमिताभनी स्वाभिमानाच्या भूमिकेतून नकार दिला.ते म्हणाले नाहीत, पण त्यांच्या कृतीतून स्पष्ट होतं — “भीक मागून नाही, मेहनतीने उभा राहायचं.”

शहंशाहाचा नम्र क्षण
एक सकाळ.अमिताभ बच्चन घरातून बाहेर पडले. प्रतीक्षा पासून पाचशे मीटरच्या अंतरावर ते चालत पोहोचले. रस्त्यावर आलेला अमिताभ रस्त्यावरून चालत निघाला होता. ते थेट आपल्या जुन्या मित्राकडे — यश चोप्रा यांच्याकडे गेले.हात जोडून त्यांनी काम मागितलं.तो क्षण केवळ भावनिक नव्हता,तो बॉलिवूडच्या इतिहासातला सर्वात मोठा आत्मसन्मानाचा क्षण होता —जिथे ‘महानायक’ अहंकार न ठेवता उभा राहिला.

‘मोहब्बतें’ : नव्या पर्वाची सुरुवात
यश चोप्रा आणि आदित्य चोप्रा यांनी त्यांना ‘मोहब्बतें’ मधील नारायण शंकर ही भूमिका दिली.शिस्तप्रिय, कडक, तत्त्वनिष्ठ प्रिन्सिपल —भूमिका लहान, पण प्रभावी होती.
अमिताभ बच्चनांनी ती स्वीकारली — कोणतीही अट न घालता.

टीव्हीचा धोका आणि इतिहास
त्याच काळात स्टार प्लसवर सुरू झालं होतं. त्या काळात मोठे कलाकार टीव्हीवर जाणे म्हणजे करिअर संपल्याचं लक्षण मानलं जायचं.टीव्हीला “छोटा पडदा” म्हणत उपहास केला जायचा.पण अमिताभ बच्चनांनी वास्तव स्वीकारलं. कोणतेही काम वाईट नसतं जर तर समोर आलेल्या प्रामाणिकपणे केलं तर यश मिळतं हा पिताश्री हरिवंश राय बच्चन यांचा संदेश त्यांच्या मनावर खोलवर कोरलेला होता. त्यांनी धोका पत्करला. KBC साइन केला.

2000 : एका युगाचा पुनर्जन्म
साल 2000 मध्ये दोन घडामोडी घडल्या —टीव्हीवर KBC घराघरात पोहोचला.आवाज घुमला —“लॉक किया जाए?”
आणि सिनेमागृहात ‘मोहब्बतें’ सुपरहिट ठरली.अमिताभ बच्चनांना फिल्मफेअर बेस्ट सपोर्टिंग अ‍ॅक्टर पुरस्कार मिळाला.या दोन प्रोजेक्ट्सनी फक्त कर्ज फेडलं नाही,तर अमिताभ बच्चन यांना नव्याने घडवलं.त्यांची प्रतिमा पुन्हा उभी राहिली.ते पुन्हा एकदा देशाचे महानायक बनले.

पडद्यावरचा नाही, पडद्याबाहेरचा बच्चन मोठा

माझ्या दृष्टीने अमिताभ बच्चन फक्त अभिनेता नाहीत.मला पडद्यावरचा बच्चन आवडतोच, पण त्याहून अधिक आवडतो —
👉 पडद्याबाहेरचा बच्चन
जो संघर्षाला कधी झुकला नाही
जो अपयशासमोर कधी गुडघे टेकला नाही
जो अपमानाने थांबला नाही
जो सतत काम करत राहिला
जो वयाने नाही, वृत्तीने तरुण राहिला जो पडला… पण पुन्हा उभा राहिला.
तोच माझ्यासाठी खरा अमिताभ बच्चन आहे.

*अमिताभ_निती*

अमिताभ बच्चन यांची कहाणी म्हणजे फक्त कमबॅक नाही,
ती आहे मानवी जिद्दीची जिवंत गाथा.ही कथा सांगते —

“गिरना बुरा नहीं है,
गिरकर न उठना बुरा है।”

“हालात चाहे कितने भी नीचे क्यों न हों,
अगर हौसला ज़िंदा है — तो वापसी तय है।”

 _आज अमिताभ बच्चन हे नाव अभिनेता म्हणून मोठं नाही,तर संघर्षाचं प्रतीक म्हणून मोठं आहे._ 

आय लव्ह अमिताभ बच्चन.

सतीश मोरे सतिताभ.
अमिताभ बच्चन प्रेमी.
9881191302

Amitabh Bachchan Amitabh Bachchan Premi Group - Karad,Satara Abhishek Bachchan

२९ जानेवारी २०२६

आठवणीतील अजितदादा


यशवंत विचारांची शिदोरी
दादांची न थांबणारी पावलं 

यशवंत विचारांच्या मुशीत आणि शरद पवारांच्या राजकीय तालमीत अजित पवार यांचे नेतृत्व घडले.
यशवंतराव चव्हाण साहेबांवरील त्यांची निष्ठा आणि आदर प्रत्येक वर्षी प्रकर्षाने दिसायचा. २५ नोव्हेंबर, चव्हाण साहेबांचा स्मृतिदिन असला की अजितदादा प्रीतिसंगमावर हमखास उपस्थित असायचे. २५ नोव्हेंबरला कराडमध्ये येऊन चव्हाण साहेबांच्या समाधीस्थळी श्रद्धांजली अर्पण करणे, हा अजित पवार यांचा न चुकणारा कार्यक्रम होता.राजकारणाच्या धकाधकीतही मूल्ये, विचार आणि परंपरा जपणारा नेता म्हणून त्यांचे हे व्यक्तिमत्त्व कायम लक्षात राहणारे आहे.


प्रीतिसंगमावर वेळेअगोदरच पोहचले 
२०१२ किंवा २०१३ सालची गोष्ट असेल. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पुण्यतिथीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कराड येथे मुक्काम होता. प्रीतीसंगमावरील समाधीस्थळी सकाळी आठ वाजता मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत अभिवादन होणार होते. त्यामुळे प्रीतीसंगम परिसरात सकाळपासूनच धामधूम होती. कराडकर मोठ्या संख्येने अभिवादनासाठी उपस्थित होते.मात्र ठरलेल्या वेळेआधीच, म्हणजे सव्वा सात वाजताच अजित पवार यांचे आगमन झाले. (खरं तर हीच त्यांची खासियत). प्रशासन खडबडून जागे झाले. त्यांनी थेट चव्हाण साहेबांच्या समाधीस्थळी जाऊन अभिवादन केले आणि नंतर बाहेर येऊन कृष्णा–कोयना संगमाकडे पाहत काही काळ उभे राहिले. आम्ही सर्व पत्रकार तिथेच होतो.त्यावेळी दादांचे लक्ष सैदापूरच्या दिशेने, कृष्णा नदीकाठावर उभारलेल्या स्मशानभूमीच्या शेडकडे गेले. क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी अधिकाऱ्यांना प्रश्न विचारले—“हे शेड कोणी बांधले? नदीकाठाची ही जमीन जलसंपदा विभागाची आहे. त्यांना परवानगी कोणी दिली?” अजितदादा कुठल्याही गोष्टीची सखोल माहिती घेतात, चौकशी करतात, हे अधिकारी जाणून होते. त्यामुळे ते क्षणभर गडबडले आणि निरुत्तर झाले.

प्रशासनावर पकड : विश्रामगृहाचा अनुभव

पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना कराड विश्रामगृहाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते व अजित पवार यांच्या उपस्थितीत होणार होते. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अनेक मंत्र्यांचा ताफा त्या ठिकाणी उपस्थित होता.भूमिपूजनाच्या ठिकाणी पोहोचताच अजित पवार यांनी विश्रामगृहाचे ड्रॉइंग मागवून घेतले.“कशा पद्धतीने इमारत उभारणार? एवढा खर्च करता, तर प्लॅन योग्य आहे का?”अशी विचारणा करत त्यांनी आराखड्यातील काही त्रुटीही अधिकाऱ्यांना समजावून सांगितल्या.आम्ही पत्रकार हे दुरून पाहत होतो. प्रशासनावरील त्यांची पकड आणि विविध क्षेत्रांतील अचूक ज्ञान याचा तो एक जिवंत अनुभव होता.


पत्रकार परिषद आणि एक हसरा क्षण

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार यांनी सर्व सूत्रे हातात घेतली. त्यानंतर उपमुख्यमंत्री म्हणून ते 13 सप्टेंबर 2023 रोजी कराडला यशवंतराव चव्हाण साहेबांना अभिवादनासाठी आले होते. यावेळी प्रीतीसंगमावर पत्रकार परिषद झाली. पक्ष वेगळा झाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर ताण-तणाव जाणवत होता मात्र तरीही त्यांनी चव्हाण साहेबांचे अभिवादन करून या पुढील काळात शाहू फुले आंबेडकर यांचा वारसा पुढे नेण्यासाठी साठी कटीबद्ध असल्याचे सांगितले. शेवटच्या टप्प्यात मी हळूच एक प्रश्न विचारला—“दादा, तुमच्या नव्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षांच्या निवडी कधी होणार?” दादांनी माझ्याकडे रोखून पाहिले आणि हसत म्हणाले,“लवकरच करतो…आणि तुला विचारून करतो!” क्षणात पत्रकारांमध्ये एकच हशा पिकला. दादांचा हा सहज, मोकळा संवाद आजही लक्षात आहे.

पुरस्कार, प्रोत्साहन शब्द आणि कायमची शिदोरी

संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानांतर्गत यशवंतराव चव्हाण आदर्श पत्रकारिता लेखन स्पर्धेत मला सातारा जिल्ह्यात द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला होता. सातारा जिल्हा परिषदेत मोठ्या कार्यक्रमात पुरस्कार वितरण झाले.मी व्यासपीठावर पुरस्कार घ्यायला गेलो तेव्हा अजित पवार यांनी शुभेच्छा देताना म्हटले—
“यश मिळवणे सोपे असते; पण ते टिकवणे अधिक अवघड असते. लिहीत राहा.” खासदार श्रीनिवास पाटील यांनी “हा आमच्या कराडचा पत्रकार आहे” अशी ओळख करून दिल्यावर दादांनी,“होय, मी त्यांना ओळखतो,” असे सांगितले. यानंतर राज्यस्तरीय स्पर्धेत मला यशवंतराव चव्हाण आदर्श पत्रकारिता प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला.पुण्यात झालेल्या या कार्यक्रमास मुख्यमंत्री विलासराव देशमुख, केंद्रीय मंत्री ग्रामीण विकास मंत्री रघुवंश प्रसाद सिंह, ना. अजित पवार आणि ना. आर. आर. पाटील उपस्थित होते. पुरस्कार स्वीकारताना विलासराव देशमुख यांनी त्यांच्या खास शैलीतील हिंदीत या पुरस्काराचा अर्थ सांगितला. त्यावर अजित पवार यांनीही थोड्या मोडक्या-तोडक्या हिंदीत,“इन्होंने महाराष्ट्र में यह अभियान घर-घर तक पहुँचाने का बहुत बड़ा काम किया है,”अशी शाबासकी दिली. यापुढे जाऊन आर आर आबांनी आबांनी 'इन्होंने चांगल्या चांगल्या बातम्या छाप्या है' असे सांगितले. त्या क्षणी सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले.
चुक प्रांजळपणे कबूल करणारा नेता 

अजित पवार हे स्पष्टवक्ते नेते म्हणून ओळखले जातात. 
एखादे वाक्य, बोलीभाषेतील साधेपणा—यामुळे कधी वाद निर्माण होतो; पण त्यांच्या कामातील प्रामाणिकपणा आणि निर्णयक्षमता याबाबत शंका उरत नाही.धरणात पाणी नाही तर ...करायचे का ?असा एक वाक्य ते बोलून गेले होते .यावरून दादांना फार मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर आपली झालेली चूक त्यांना उमगली आणि ते सर्व कार्यक्रम रद्द करून 14 एप्रिल 2013 रोजी ते अचानकपणे कराडला आले. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधी शेजारी त्यांनी आपण केलेल्या चुकीची कबुली दिली आणि दिवसभर मौन व्रत धारण करून आत्मक्लेष केला. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीस्थळी दीर्घ वेळ घालवला. आम्ही पत्रकार दिवसभर त्या परिसरात बसून होतो. आत्मकेश आंदोलनानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी कराडच्या पत्रकारांचे आभार मानले. तो क्षण आजही माझ्या स्मरणात ताजा आहे.

माझ्या आठवणीतला एक बोलका क्षण…

कराड येथे माजी आमदार आनंदराव पाटील नाना यांच्या निवासस्थानी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा दौरा होता. राजकीयदृष्ट्या संवेदनशील मानल्या जाणाऱ्या या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.अजितदादांनी नानांच्या घरी सकाळचा नाश्ता केला. सभोवताली कार्यकर्ते, पदाधिकारी आणि मी एकमेव पत्रकार उपस्थित होतो. त्याच वेळी अजितदादांनी अगदी सहज, मिश्किल आणि थेट शैलीत नानांना एक प्रश्न विचारला —“तुम्ही आणि बाबा वेगळे का झालात?”हा प्रश्न कोणत्याही राजकीय टीकेसाठी नव्हता. तो प्रश्न ऐकून क्षणभर उपस्थितांमध्ये शांतता पसरली, आणि लगेचच हास्याची लकेर उमटली. कारण अजितदादांची देहबोली, आवाजातील सहजपणा आणि चेहऱ्यावरचा भाव हा प्रश्न केवळ राजकारणापुरता मर्यादित नसल्याचे स्पष्ट करत होता. त्यावर आनंदराव पाटील नाना यांनीही प्रसंगावधान राखत, तितक्याच मिश्किलपणे उत्तर दिले. त्यांच्या उत्तरात कोणतीही कटुता नव्हती. तो संवाद ऐकताना असे जाणवले की राजकारणातील मतभेद हे कायमचे वैर नसतात; काळ, परिस्थिती आणि भूमिका बदलत जातात, मात्र नाती आणि स्मृती तशाच राहतात.या छोट्याशा प्रश्नोत्तरात अनेक अर्थ दडलेले होते. 
साताऱ्यात पोहोचेपर्यंत काम झाले पाहिजे…
आमदार बाळासाहेब पाटील यांच्या निवासस्थानी सकाळच्या वेळी न्याहारीसाठी अजितदादा पवार आले होते. ही माहिती कळताच कार्यकर्ते आणि नागरिकांची मोठी गर्दी तिथे जमली. आम्ही पत्रकारही तेथे उपस्थित होतो. वातावरणात उत्सुकता होती, पण त्याहून जास्त अपेक्षा होत्या—कारण अजितदादा म्हणजे काम होण्याची आशा.न्याहारी आटोपून अजितदादा बाहेर पडत होते. गाडीत बसण्याच्या आधीच त्यांच्याजवळ एक सर्वसामान्य नागरिक आला. त्याने जिल्हा परिषदेतले एक काम बराच काळ प्रलंबित असल्याची तक्रार केली आणि हातातला अर्ज दादांच्या समोर धरला.अजितदादांनी तो अर्ज नीट वाचला. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना फोन लावला आणि थेट शब्दांत सांगितले. त्यानंतर सोबत असलेल्या पीएला स्पष्ट सूचना दिल्या—
“आज संध्याकाळी मी साताऱ्यात पोहोचेपर्यंत हे काम झाले पाहिजे. आणि काम पूर्ण झाल्याची माहिती मला कळवली पाहिजे.”हे सगळे त्या ठिकाणी उपस्थित असलेले सादिक इनामदार यांनीही ऐकले. मी स्वतःही तिथे होतो. तो प्रसंग पाहताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली—दादांसाठी हा फक्त अर्ज नव्हता, तर एका सर्वसामान्य माणसाची अपेक्षा होती.
सायंकाळी सादिक इनामदार यांचा मला फोन आला. त्यांनी सांगितले की अजितदादांनी सांगितलेले ते काम पूर्ण झाले आहे आणि संबंधित व्यक्तीला त्याची माहिती देण्यात आली आहे.

हा प्रसंग मला आजही आठवतो. कारण सत्ता, पद किंवा अधिकार यांचा उपयोग स्वतःसाठी नव्हे, तर सामान्यांच्या प्रश्नांसाठी तळमळीने करणारा नेता किती दुर्मीळ असतो, हे त्या दिवशी पुन्हा एकदा जाणवले. शासकीय यंत्रणेला गरज पडल्यास धारेवर धरून काम करून घेण्याची क्षमता आणि इच्छाशक्ती—हीच अजित पवार यांच्या नेतृत्वाची खरी ओळख आहे.

अजित पवार यांच्याबरोबर आलेले हे क्षण, हे अनुभव
एक पत्रकार म्हणूनच नव्हे, तर एक कराडकर म्हणूनही माझ्यासाठी कायमचे आहेत. सदैव वेळ पाळणारे दादा वेळेअगोदरच गेले. घड्याळाला कुठे चांगले दिवस आले असताना घड्याळाची वेळ चुकली. दादांच्या कामाचा उरक, दादांचा स्पष्टवक्तपणा आणि त्यामुळे महाराष्ट्रात पुढच्या काही वर्षात होणारी प्रगती तुम्हा आम्हा सर्वांना पाहायची होती. पण नियतीला हे मान्य नव्हतं. सत्ताधाऱ्यांपेक्षा प्रशासन वरचढ होत असताना प्रशासनावर वचक असणारा नेता जाणं, महाराष्ट्रासाठी चांगलं नाही. असे नेते पुन्हा घडण्यासाठी दोन-तीन दशके जातात. महाराष्ट्राची अनेकदा राजकीय हानी झाली आहे. अजित दादांच्या जाण्यामुळे त्यात आणखी भर पडली.

सतीश मोरे पुढारी कराड 
९८८११९१३०२

२५ जानेवारी २०२६

दीवार...पाच संवाद एक हास्य

दीवार’ : पन्नास वर्षांनंतरही उभी असलेली भिंत 
आणि तिच्यामागचा खोल अर्थ

पाच दमदार संवाद.. एक हास्य !

१९७५ मध्ये प्रदर्शित झालेला दीवार हा चित्रपट आज एक्कावन्न वर्षांचा झाला आहे.
काळ लोटला, पिढ्या बदलल्या, सिनेमाची भाषा बदलली. पण दीवार आणि भिंत अजूनही तितक्याच ठामपणे उभी आहे.

याच पन्नास वर्षांच्या निमित्ताने
गेल्यावर्षी मुंबईमध्ये दीवारचा स्पेशल शो आयोजित करण्यात आला होता.या शोला मी स्वतः उपस्थित होतो. तेव्हा लिहायचं राहून गेलं होतं. ते आता...

मोठ्या पडद्यावर दीवार पाहताना जाणवलं —
हा चित्रपट पाहिला जात नाही,तो अनुभवला जातो.
आज, त्या आठवणीला एक वर्ष पूर्ण होत असताना
या चित्रपटातील पाच अजरामर संवाद जे मला खुप भावतात तुमच्या सोबत शेअर करत आहे 
यावेळी त्यामागचा खोल अर्थ पुन्हा एकदा उलगडून पहावासा वाटतो.

१. “तुम लोग मुझे ढूंढ रहे हो और मै तुम्हारा यहां इंतजार कर रहा हूँ”

हा संवाद ऐकताना तो फक्त आत्मविश्वास वाटतो.
पण खोलात पाहिलं तर तो भीती आणि सत्तेचं गणित उलटवणारा क्षण आहे.
सामान्य माणूस व्यवस्थेपासून पळतो.
इथे विजय व्यवस्थेलाच सांगतो —
मी लपलेलो नाही, मी उभा आहे.
हा संवाद गुन्हेगारीचा नाही,
तो अपमानातून जन्मलेल्या निर्भयतेचा आहे.
जेव्हा माणसाकडे गमावण्यास काहीच उरत नाही,
तेव्हा तो असाच थांबून वाट पाहतो.

२. “आज और एक कुली हप्ता देनेसे इन्कार करेगा”

हा संवाद दीवारचा सामाजिक आत्मा आहे.
एका कुलीचा ‘नकार’ म्हणजे
संपूर्ण शोषणव्यवस्थेला दिलेला धक्का.
इथे विजय स्वतःबद्दल बोलत नाही,तो एका वर्गाबद्दल बोलतो.हा संवाद सांगतो की
बंड नेहमी मोठ्या भाषणातून सुरू होत नाही,
कधी कधी ते फक्त
‘नाही’ म्हणण्याच्या धैर्यातून सुरू होतं.

३. “सुना है लिफ्ट के दीवारों के कान नहीं होतें”
हा संवाद शहराचं वास्तव उघड करतो.
महानगरात भिंती सुद्धा निष्पाप नसतात.
इथे प्रत्येक शब्द ऐकला जातो, पण लिफ्ट मध्ये ऐकायला दुसऱ्या बाजूला कोणी नसल्यामुळे लिफ्ट मध्ये बोलण्यास एक सुरक्षितता आहे.
हा संवाद म्हणजे
भीतीने बांधलेली शहरे,
सत्तेच्या सावलीत जगणारी माणसं
आणि कायम अस्वस्थ वातावरण —
यांचं प्रतीक आहे.

४. “मी आज भीं फेके हुए पैसे नही उठाता”
हा संवाद विजयचं अंतरंग उघड करतो.
तो गुन्हेगारी जगतात आहे,
पण तो पूर्णपणे भ्रष्ट नाही.
आईने दिलेले संस्कार
आजही त्याच्या आत जिवंत आहेत.
हा संवाद सांगतो —
गरीबी माणसाला झुकवू शकते,
पण स्वाभिमान मोडू शकत नाही.
याच ठिकाणी विजय एक ‘गुन्हेगार’ न राहता
एक ‘माणूस’ बनतो.

५. “आज मैं ये बिल्डिंग मेरे माँ को तोफा देनें जा रहा हूँ”
हा संवाद म्हणजे दीवारचा आत्मा.
संपूर्ण चित्रपटात विजय जे काही करतो,
त्यामागे एकच स्वप्न आहे —
ज्या आईने तुझ्यासाठी खस्ता काढल्या मजूर म्हणून काम केलं त्या आईला आता आराम मिळावा म्हणून त्या आईला सुरक्षित घर.
ही बिल्डिंग फक्त इमारत नाही,
ती विजयच्या संघर्षाची,
त्यागाची आणि वेदनेची साक्ष आहे.
पण याच क्षणी नियती निर्दय ठरते.
स्वप्न पूर्ण होतं,
पण समाधान मिळत नाही.

'दीवार’मधलं दुर्मिळ हास्य'
दीवारमधील विजय
लहानपणीचा मजुराचा मुलगा ते
आईच्या मांडीवर प्राण सोडणारा विजय —
हा संपूर्ण प्रवास करारी, बंडखोर आणि वेदनांनी भरलेला आहे.
पूर्ण चित्रपटात अमिताभ बच्चन फक्त दोन वेळा हसतो.
कारण विजय हा आनंदी नायक नाही,
तो घुसमटलेल्या जनतेचा चेहरा आहे.
पण रेल्वे स्टेशनवरचा तो प्रसंग खास आहे.
भाऊ पोलीस ट्रेनिंगसाठी निघालेला असतो.
शशिला भेटायला प्रेयसी नीतू सिंग आलेली असते.
निरोपाच्या क्षणी विजय भावाला मिठी मारतो,
क्षणभर हसतो आणि फक्त एवढंच म्हणतो —
“अच्छी है.”
हा छोटासा संवाद विजयचं मोठेपण दाखवतो.
स्वतः अंधाऱ्या वाटेवर चालणारा माणूस
भावासाठी उजळ आयुष्य स्वीकारतो.

Amitabh Bachchan Premi Group - Karad,Satara Amitabh Bachchan Bachchanvede Kolhapuri 

सतीश मोरे सतिताभ
९८८११९१३०२
अमिताभ बच्चन प्रेमी

१९ जानेवारी २०२६

जेव्हा तू साडी नेसून


दुलारी,

जेव्हा तू साडी नेसून माझ्यासमोर येतेस,
तेव्हा माझ्या नजरा तुझ्यावरच थबकतात,
आणि मन नकळत पुन्हा तुझ्याच प्रेमात हरवतं !

साडीचा पदर जेव्हा तू अलगद डोक्यावर घेतेस,
तेव्हा लाज आणि सौंदर्य एकमेकांत मिसळतात,
आणि तू अधिकच मोहक दिसू लागतेस !

पदर खोचून, कमरेवर हात ठेवून उभी राहतेस,
तेव्हा तुझ्या देहबोलीतला आत्मविश्वास
माझ्या श्वासांची गती वाढवतो !

साडीचा पदर अंगाभोवती घट्ट लपेटून,
जेव्हा तू खाली मान घालून हसतेस,
तेव्हा तुझ्या लाजेची ऊब
माझ्या मनाला स्पर्श करून जाते !

साडी नेसून तू जेव्हा मिरवतेस,
तेव्हा तुझ्या प्रत्येक पावलागणिक
माझं हृदय वेडावून जातं !

तुला साडी नेसताना, शांतपणे न्याहाळणं—
तो क्षणच माझ्यासाठी
इच्छा आणि प्रेम यांचं पवित्र मिलन ठरतं !

आणि तुझ्या साडीच्या निऱ्या नीट करताना,
माझ्या बोटांतून वाहणारी ती स्पर्शाची थरथर
मला संपूर्णपणे तुझाच करून जाते !

दुलारीचा सति
१७.०१.२०२६


१८ जानेवारी २०२६

तुला विसरण्याचा प्रश्नच नाही


माझा श्वास तुझिया नावे, तूच माझे प्राण ।
तुझ्याविण क्षण न सरावा, तूच माझे भान ॥
जगणे आले तुझ्यामुळे, तूच माझा अर्थ ।
तुला विसरण्याचा प्रश्नच नाही, एवढाच स्वार्थ ॥१॥

दुःखाच्या वाटेवरती, तू दीप उजळविले ।
अश्रू माझ्या डोळ्यांतले, हळुवार पुसिले ॥
संकटाच्या क्षणी सखी, उभी माझ्या पाठी ।
तुला विसरण्याचा प्रश्नच नाही, जीवनसाथी ॥२॥

जगण्याची रीत शिकवली, संयमाचा मार्ग ।
प्रेमासंगे प्रेरणा, केलीस तूच वर्ग ॥
डगमगता पडता मी, धरला तूच हात ।
तुला विसरण्याचा प्रश्नच नाही, अतुट आपलं नातं ॥३॥

सति सावित्री नाते आपुले, सात जन्मांचे व्रत ।
वचन निभावण्याची रीत, शिकवलंस सत्य ॥
पदोपदी साथ देशी, सुख-दुःख समसमान ।
तुला विसरण्याचा प्रश्नच नाही, तूच  ईमान ॥४॥

दुलारीचा सति
१६.०१.२०२६

१६ जानेवारी २०२६

नैतिक अधःपतन @९९


नैतिक अधःपतन @299

'पुढारी' प्रतिसंमावरून 

परवा एका मित्राच्या वाढदिवसानिमित्त सुर्ली घाटातून जाण्याचा योग आला. कडेगाव–विटा–सोलापूरला जाताना हा घाट लागतो. यापूर्वीही या घाटातून अनेकदा प्रवास केलेला आहे. या घाटाच्या पायथ्याशी सदाशिवगड पंचक्रोशीतील अनेक गावांचे ग्रामदैवत असलेले जानाई देवीचे मंदिर आहे. येथे नेहमीच भाविकांची मोठी गर्दी असते.मात्र त्या दिवशी या मंदिर परिसरातून जाताना जे दृश्य पाहायला मिळाले, त्यामुळे अक्षरशः डोकं सुन्न झालं.

खरं तर मंदिराच्या आसपास खेळण्यांची दुकाने, छोटी हॉटेल्स, चहाचे टपरे, प्रवाशांसाठी आवश्यक सोयीसुविधा असायला हव्या होत्या. हा परिसर विकासाच्या दृष्टीने पुढे जायला हवा होता. येथे चांगले रेस्टॉरंट, हॉटेल किंवा चहाचा गाडा सहज चालू शकला असता. पण प्रत्यक्षात तसं काहीच दिसलं नाही.

उलट मंदिराच्या अगदी समोरच एक  पंचतारांकित लॉज उभा राहिलेला दिसला. त्याचे नुकतेच उद्घाटन झाले होते. त्याच्या थोडे पुढे गेल्यावर आणखी एक लॉज दिसला. एवढ्या दुर्गम घाटरस्त्यावर दोन लॉजची गरज आहे का? मी कार चालवत होतो. शेजारी माझे दोन पत्रकार मित्र बसले होते. जसा सुर्ली घाट चढायला सुरुवात केली, तसा पुन्हा एकदा धक्का बसला. संपूर्ण घाटात चक्क आठ-दहा ठिकाणी मोठमोठे फलक झळकत होते — “फक्त २९९ रुपयांत लॉज उपलब्ध”. सार्वजनिक बांधकाम विभागाचे दिशादर्शक फलक कमी होते पण “२९९ मध्ये लॉज उपलब्ध, खाली मोबाईल नंबर, पाण्याची बाटली फ्री” अशा जाहिरात फलक प्रत्येक वळणावर होते.

२९९ रुपयांत लॉज भाड्याने मिळतो, म्हणजे तिथे नेमकं काय चालतं? त्या लॉजमध्ये असं काय आहे की अशा पद्धतीने जाहिरात करावी लागते? जनमानसाचा कानोसा घेतला, परिसराचा अभ्यास केला आणि या प्रश्नांची उत्तरे शोधू लागलो, तसं मन अधिकच अस्वस्थ झालं.

मसूर परिसरात ५०० ते ८०० रुपयांत लॉज उपलब्ध आहेत. त्याचेही फलक शामगाव घाटात लावलेले आहेत. काही लॉजमध्ये तासावर सेवा दिली जाते. काही ठिकाणी तर ओळखपत्रही घेतली जात नाहीत. या लॉजमध्ये नक्की काय चालतं? कराड तालुक्यात खरंच एवढ्या मोठ्या प्रमाणात पर्यटन व्यवसाय वाढलेला आहे का?  या लॉजची गरज कुणासाठी आणि कशासाठी आहे?

२९९ रुपयांत मिळणाऱ्या खोल्यांचा वापर नैतिक अधःपतनासाठी होत असल्याची चर्चा उघडपणे ऐकू येते. महाविद्यालयीन युवकांमध्ये या लॉजची मोठ्या प्रमाणावर क्रेझ (?)आहे. ज्या वयात शिक्षण घ्यायचं, मोठं होण्याची स्वप्नं पाहायची आणि करियरचा बेस पक्का कयायचा, त्या वयातच गर्लफ्रेंड–बॉयफ्रेंडच्या नावाखाली ही मुलं कोणताही विचार न करता चुकीच्या मार्गावर जात आहेत. यामध्ये अल्पवयीन मुलामुलींची संख्या खुप आहे.हे चित्र केवळ सुर्ली शामगाव घाटापुरते मर्यादित नाही. कराड शहर व मलकापूर  परिसरात एका  पैलवानाचे तसेच एका नामवंत उद्योगपतीचे अनेक लॉजेस आहेत. या लॉजमध्ये कराड शहरातील पर्यटकांची मोठी गर्दी असते, असे मात्र दिसत नाही. दिवसभर लॉज सुरू असतात; परंतु संध्याकाळी चौकशी केली तर बहुतेक ठिकाणी मुक्कामी कोणीच नसते. मग एवढ्या मोठ्या प्रमाणावर लॉज उभे राहण्यामागचं कारण नेमकं काय?

उंब्रज परिसर तर जणू काही लॉज गैरप्रकारांचं माहेरघरच बनलं आहे. कराड–मसूर रस्त्यावर, तासवडे टोलनाका परिसरात ‘लॉज’ नावाखाली एका हॉटेलमध्ये पोलिसांच्या कृपेने गेल्या अनेक वर्षांपासून अनैतिक व्यवसाय सुरू आहेत. संबंधित लॉज चालक सर्वांना ‘मॅनेज’ करतो, अशीही माहिती आहे. काही नवीन युवकांना तर या धंद्याचं प्रशिक्षण दिलं जातं — “लॉजचा धंदा काढा, सगळं व्यवस्थित चालतं, दिवसाला एवढे मिळतात, वर्षभरात गुंतवलेले पैसे निघतात” — अशी शिकवण दिली जाते.

परवा सह्याद्री साखर कारखान्यावर साखर आणण्यासाठी गेलो होतो. रेल्वे गेट ओलांडून थोडं पुढे गेल्यावर एक साधं घर दिसलं. त्या घराबाहेर ‘लॉज’ असा फलक लावलेला होता. इतक्या छोट्या घरात लॉज चालवण्याची परवानगी कोणी दिली? त्याचे नियम काय आहेत? त्या लॉजमध्ये नेमकं काय चालतं? या प्रश्नांची उत्तरे शोधली, तेव्हा धक्कादायक वास्तव समोर आलं.

साधारणपणे कराड तालुक्यातील उंडाळे परिसर, रेठरे कारखाना, शिवनगर, मसूर, कोपर्डे, उंब्रज किंवा जिथे शैक्षणिक संस्था मोठ्या प्रमाणावर विकसित झाल्या आहेत, अशा भागांत लॉजची संख्या प्रचंड आहे. गेल्या दहा वर्षांत हे लॉज मोठ्या प्रमाणावर उभे राहिलेले आहेत. या लॉजची नोंदणी कुठे आहे, याचा अभ्यास पोलिसांनी करायला हवा. मात्र स्थानिक ग्रामस्थांच्या माहितीनुसार हे लॉज परगावातील लोकांचे असून, त्यांनी गावागावांत इमारती बांधून किंवा जागा भाड्याने घेऊन हा व्यवसाय सुरू केला आहे.

सुर्ली घाटावर जाताना “२९९ रुपयांत लॉज उपलब्ध” असा फलक पाहिल्यानंतर या लॉजमध्ये सुरू असलेली स्पर्धा किती टोकाला गेलेली आहे, याची प्रचिती येते. कराड तालुक्याची आर्थिक परिस्थिती पाहता शहरातील चांगल्या हॉटेलमध्ये साधारण २ हजार रुपयांच्या आसपास खोली मिळते. मग शहराबाहेरील किंवा मलकापूर परिसरातील लॉजमध्ये हजार ते बाराशे रुपयांत खोली कशी मिळते? स्पर्धेमुळे हे दर ८००–९०० रुपयांपर्यंत खाली येतात. त्याही पुढे जाऊन काही लॉज चालकांनी “तासावर लॉज उपलब्ध” असे फलक सरळ बाहेर लावले आहेत.ग्राहक मिळवण्यासाठी सुर्ली घाटात “२९९ रुपयांत लॉज उपलब्ध” असा फलक लावला जातो. या जाहिरातींमुळे एक संपूर्ण पिढी बर्बाद होत आहे, याची जाणीव या लॉज मालकांना का होत नाही?

जर २९९ रुपयांत नैतिक अधःपतन घडत असेल, तर पुढे काय होणार? पुणे–मुंबईत जे घडतं, तेच आज कराड, उंब्रज, मसूरसारख्या छोट्या गावांत घडत असेल, तर पुणे–मुंबईला नावं ठेवण्यात काय अर्थ आहे?कराड शहर हे शैक्षणिक माहेरघर म्हणून ओळखलं जातं. शासकीय व खासगी महाविद्यालयांची संख्या मोठी आहे. अशा ठिकाणी विद्यार्थ्यांच्या नैतिक अधःपतनासाठी अशा प्रकारचे लॉज उपलब्ध असणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. लॉज चालक फक्त दिवसभरात किती पैसे मिळतील, किती गल्ला जमेल, याचाच विचार करत आहेत, त्यांना समाजाचं कसलेही घेणे-देणे नाही.

वाढत चाललेली तथाकथित लॉज संस्कृती ही केवळ सामाजिक नव्हे, तर नैतिक आणि प्रशासकीय अपयशाची स्पष्ट खूण आहे. या लॉजमुळे युवकांचे भविष्य, शैक्षणिक वातावरण आणि समाजाची मूल्यव्यवस्था धोक्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर केवळ टीका करून थांबणे पुरेसे नाही; ठोस आणि तातडीच्या उपाययोजना आवश्यक आहेत.

तालुक्यातील सर्व लॉज, विश्रांतीगृहे व खासगी मुक्काम सुविधा यांची नवीन तपासणी मोहीम राबवली पाहिजे. कोणतीही लॉज परवाना, नोंदणी, अग्निसुरक्षा प्रमाणपत्र, आरोग्य विभागाची मान्यता याशिवाय चालू राहू नये. नियमबाह्य लॉज तात्काळ बंद करण्यात यावीत.

प्रत्येक लॉजमध्ये दोन्ही व्यक्तींचे वैध ओळखपत्र घेणे बंधनकारक करावे. प्रवेशद्वार, रिसेप्शन आणि पार्किंग परिसरात सीसीटीव्ही सक्तीचे करावेत. तासावर खोल्या देण्यास स्पष्ट बंदी घालावी.

पोलीस, नगरपरिषद, स्थानिक ग्रामपंचायत व आरोग्य विभाग यांनी संयुक्तपणे अचानक तपासण्या (Surprise Raids) कराव्यात. “मॅनेजमेंट” संस्कृती मोडीत काढण्यासाठी कारवाई केवळ कागदोपत्री न राहता प्रत्यक्ष जमिनीवर दिसली पाहिजे.

महाविद्यालये, शाळा, वसतिगृहे यांच्यापासून ठराविक अंतरात लॉज चालवण्यास बंदी घालावी. शिक्षणनगरी म्हणून ओळख असलेल्या कराडसारख्या शहरात ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे.

या विषयाकडे केवळ प्रशासनाची जबाबदारी म्हणून पाहून चालणार नाही. पालक, शिक्षक, सामाजिक संस्था, ग्रामसभा यांनी युवकांशी संवाद साधला पाहिजे. नैतिक शिक्षण, समुपदेशन आणि मार्गदर्शनाची गरज आज अधिक तीव्र आहे.

“२९९ रुपयांत लॉज”, “तासावर रूम” अशा फलकांवर कायदेशीर बंदी घालावी. सार्वजनिक ठिकाणी, घाटरस्त्यांवर अशा जाहिराती लावणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई झाली पाहिजे.

लॉज संस्कृतीऐवजी खरे पर्यटन, स्थानिक व्यवसाय, हॉटेल्स, चहाचे टपरे, हस्तकला, ग्रामीण पर्यटन यांना प्रोत्साहन देण्यात यावे. युवकांना रोजगाराच्या सकारात्मक संधी उपलब्ध झाल्या, तर चुकीच्या मार्गाकडे जाण्याचे प्रमाण आपोआप कमी होईल.

आज २९९ रुपयांत मिळणारी खोली उद्या समाजासाठी फार मोठी किंमत वसूल करू शकते. एक पिढी बर्बाद होण्याआधीच प्रशासन, समाज आणि लोकप्रतिनिधींनी जागं होणं गरजेचं आहे. अन्यथा आपण उद्या केवळ प्रश्न विचारणारे नव्हे, तर त्याला जबाबदार ठरणारे ठरू.

सतीश मोरे पुढारी कराड 
९८८११९१३०२

१५ जानेवारी २०२६

कृष्णा नदी वाहत राहिल; पण तिच्या काठावर स्वप्ने बुडू नयेत !


कृष्णा नदी वाहत राहिल; पण तिच्या काठावर स्वप्ने बुडू नयेत !

कराड येथील कृष्णा नदीवरील पूल आज केवळ वाहतुकीपुरता मर्यादित राहिलेला नाही; तो हळूहळू एका गंभीर सामाजिक जखमेचं प्रतीक बनत चालला आहे. गेल्या दीड वर्षांत तब्बल 13 जणांनी येथे आत्महत्या केल्याची नोंद आहे. विशेष म्हणजे, या घटनांमध्ये महाविद्यालयीन युवतींचे प्रमाण वाढत असल्याचे वास्तव अत्यंत अस्वस्थ करणारे आहे. हे केवळ पोलिसी नोंदीतील आकडे नाहीत; ही वेळेआधी संपलेली आयुष्ये, उद्ध्वस्त कुटुंबे आणि मूक प्रेक्षक बनलेला समाज यांची वेदनादायी कहाणी आहे.
या पुलाच्या दोन्ही बाजूंना संरक्षण जाळी लावण्याची मागणी योग्यच आहे; मात्र केवळ जाळी लावून आत्महत्येचा प्रश्न सुटणार नाही. आत्महत्या होऊच नये, यासाठी आजच्या तरुण पिढीला खर्‍या अर्थाने समुपदेशनाची गरज आहे. आई-वडील, मामा, भाऊ-बहीण हेच समुपदेशनाचे पहिले केंद्र असले पाहिजे. आपल्याच माणसांसमोर व्यक्त होता येत नसेल, तर प्रत्येक ठिकाणी सुलभ आणि विश्वासार्ह समुपदेशन केंद्रे उपलब्ध असली पाहिजेत.
कराड शहरात पन्नासहून अधिक लहान-मोठी महाविद्यालये, अ‍ॅकॅडमी आणि शाळा आहेत. येथे सुमारे 25 हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. गेल्या काही वर्षांत मोबाईल, सोशल मीडिया-व्हॉट्सप, इन्स्टाग्राम, फेसबुक यांच्या माध्यमातून नैतिकतेचे अधःपतन होत आहे. चांगल्यापेक्षा वाईट गोष्टींचाच अधिक बोलबाला दिसतो. ज्यांचं ऐकायला पाहिजे असे आदर्श व्यक्ती समाजात उरलेले नाहीत; आणि जे आहेत, त्यांच्याकडे जाण्यासाठी, त्यांचं ऐकण्यासाठी तरुण पिढीकडे वेळच नाही !
आयुष्यात अनेक घटना घडतात; त्या घटनांना सामोरे कसे जायचे, याचे शिक्षण अनेकांना कधीच मिळालेले नसते. अशा वेळी सोशल मीडियावर कुणीतरी भेटतो, तोच ‘गुरू’ बनतो; पण तो मानसिक आधार देऊ शकत नाही. मनातील घुटमळ व्यक्त करण्यासाठी जिव्हाळ्याचा ओलावा हवा असतो-जो आजच्या काळात अनेक मुली-मुलांना मिळत नाही. परिणामी, शेवटी आत्महत्येचा विचार पुढे येतो. आणि दुसर्‍यांनी शोधलेला हा मार्ग हीच मुलं स्वीकारतात-आणि कृष्णा नदीच्या पुलावर पोहोचतात.
आत्महत्येची कारणे वेगवेगळी,
पण मूळ वेदना समान
अपयशाची भीती, शैक्षणिक दबाव, प्रेमात मिळालेली फसवणूक, कौटुंबिक अपेक्षा, सामाजिक तुलना, मानसिक एकटेपणा-आत्महत्येमागची कारणे प्रत्येक प्रकरणात वेगळी असतात. मात्र त्या सर्वांच्या मुळाशी एकच भावना असते-आपण एकटे आहोत; आपले दुःख कुणालाच महत्त्वाचे वाटत नाही. आजच्या स्पर्धात्मक युगात युवकांवर ‘यशस्वी’, ‘समजूतदार’, ‘संयमी’ आणि ‘परिपूर्ण’ असण्याचा अदृश्य दबाव आहे. चुकण्याची, अपयशी ठरण्याची किंवा फसवणूक होण्याची मुभा समाज देत नाही. अशा परिस्थितीत एक छोटासाही धक्का जीवघेणा ठरू शकतो.
आत्महत्या ही समस्येचे उत्तर नाही; ती केवळ वेदना पुढील पिढीकडे हस्तांतरित करते. आज असह्य वाटणारी अडचण उद्या सुटू शकते; पण संपलेले आयुष्य कधीच परत येत नाही. हे सत्य त्या क्षणी संबंधित व्यक्तीला जाणवत नाही, आणि म्हणूनच समाजाने त्या क्षणाआधी हस्तक्षेप करणे गरजेचे आहे.
महत्त्वाचा प्रश्न असा आहे की-ज्या कारणासाठी आत्महत्या केली जाते, ते कारण आत्महत्येनंतर संपते का? आत्महत्या केल्यानंतर मागे राहणार्‍या आई-वडिलांचे, भावंडांचे, नातेवाईकांचे दुःख संपते का? हा विचार आजची पिढी का करत नाही?
तरुण मुलां-मुलींना नेमकं काय हवं आहे?
त्यांना उपदेश नको, तर समजून घेणारा संवाद हवा आहे.त्यांना दोष नको, तर आधार हवा आहे. त्यांना तुलना नको, तर विश्वास हवा आहे.
घरात, महाविद्यालयात आणि समाजात अशा सुरक्षित जागा निर्माण झाल्या पाहिजेत, जिथे मुली भीती, लाज किंवा शिक्षेच्या दबावाशिवाय आपले दुःख, अन्याय मोकळेपणाने व्यक्त करू शकतील.
प्रसिद्धीचा धोका : आत्महत्येचा ‘संसर्ग’
कृष्णा पुलावरून आत्महत्या झाल्यानंतर त्या घटनेला मिळणारी प्रसिद्धी हा आणखी एक गंभीर मुद्दा आहे. सोशल मीडिया, अफवा, अति-संवेदनशील बातम्या, फोटो-व्हिडिओ यांमुळे नकळत आत्महत्येचे ‘रोमँटीसीकरण’ होते. काही अस्वस्थ मनांमध्ये यामुळे तरी सगळ्यांचे लक्ष वळेल असा भ्रम निर्माण होतो. ही मानसिक साखळी समाजासाठी धोक्याची घंटा आहे.
माध्यमांची भूमिका येथे अत्यंत महत्त्वाची आहे. बातमी देताना संवेदनशीलता, मर्यादा आणि जबाबदारी पाळली गेली पाहिजे. आत्महत्येची ठिकाणे, पद्धती किंवा तपशीलवार वर्णन समाजहिताला घातक ठरते.
प्रशासन, संस्था आणि समाजाची सामूहिक जबाबदारी
ही समस्या केवळ व्यक्तीपुरती मर्यादित नाही; ती सामाजिक अपयशाची खूण आहे. शैक्षणिक संस्थांनी समुपदेशन कक्ष केवळ औपचारिकतेपुरते न ठेवता, ते प्रभावीपणे कार्यरत ठेवले पाहिजेत.
पालकांनी गुण, यश आणि तुलना यापलीकडे जाऊन मुला-मुलींच्या भावनिक आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे. मित्रांनी सगळं ठीक आहे या मुखवट्यामागची वेदना ओळखण्याचा प्रयत्न केला पाहिजे.प्रशासनाने कृष्णा पुलासारख्या ठिकाणी सुरक्षा अडथळे, सीसीटीव्ही, समुपदेशन संदेश आणि हेल्पलाईन क्रमांक ठळकपणे लावले पाहिजेत.
बोलणे हेच पहिले पाऊल
मानसिक त्रासात मदत मागणे ही कमजोरी नसून ती शहाणपणाची आणि धैर्याची खूण आहे. यासाठी खालील हेल्पलाईन उपलब्ध आहेत.
मानसिक आरोग्य हेल्पलाईन
*एएएसआरए (आसरा)आत्महत्या प्रतिबंध : +91 9820466726
* 112 वर फोन करा. पोलिस मदतीस येतात.
* 1091 समुपदेशनसाठी मदत.
* 1098 लहान मुलावरील तक्रारीबाबत.
तरुण मुला-मुलींच्या आत्महत्या थांबल्या पाहिजेत-ही केवळ भावना नाही; ती समाजाची जबाबदारी आहे. प्रत्येक आयुष्य अमूल्य आहे, प्रत्येक समस्या तात्पुरती आहे आणि प्रत्येक अंधारामागे प्रकाशाची शक्यता असते.
अपयश, प्रेमभंग किंवा अडचण ही आयुष्याची अखेर नसते-ती कधी कधी नव्या वाटांची सुरुवात असते. एक वाट बंद झाली म्हणून आयुष्य थांबत नाही. कृष्णा नदी वाहत राहील; पण तिच्या काठावर स्वप्ने बुडू नयेत-हीच समाज म्हणून आपली खरी भूमिका आहे.


The Krishna River Will Keep Flowing—But Dreams Must Not Drown on Its Banks*

The bridge over the Krishna River in Karad is no longer limited to being just a means of transport; it is slowly turning into a symbol of a deep social wound. Over the past one and a half years, as many as 13 people have reportedly died by suicide at this spot. What is even more disturbing is the increasing proportion of college-going young women among these cases. These are not merely figures in police records; they represent lives cut short too soon, families shattered, and a society reduced to being a silent spectator.
The demand to install protective fencing on both sides of the bridge is justified; however, fencing alone will not solve the problem of suicide. To prevent suicides altogether, today’s younger generation needs genuine and meaningful counseling. Parents, uncles, siblings—family itself should be the first center of counseling. If one cannot express themselves even before their own people, then accessible and trustworthy counseling centers must be available everywhere.
Karad city has more than fifty small and large colleges, academies, and schools, with over 25,000 students pursuing education. In recent years, mobile phones and social media platforms such as WhatsApp, Instagram, and Facebook have contributed to moral decline. Negative influences seem to dominate over positive ones. Role models who deserve to be heard are no longer visible in society; and even when they exist, the younger generation has neither the time nor the inclination to approach or listen to them.
Many people never learn how to face life’s challenges. At such times, someone encountered on social media becomes a so-called “guru,” but such a person cannot provide real emotional support. To express inner turmoil, one needs warmth, empathy, and closeness—something many young boys and girls lack today. As a result, thoughts of suicide begin to surface. A path discovered by others is then adopted by these young minds, leading them to the Krishna bridge.
Different Causes, but the Same Pain at the Core
The reasons behind suicide vary—fear of failure, academic pressure, betrayal in love, family expectations, social comparison, emotional loneliness. Each case has a different cause, but at the root lies a single feeling: “I am alone; no one values my pain.”
In today’s competitive era, young people are under invisible pressure to be “successful,” “mature,” “patient,” and “perfect.” Society does not allow room for mistakes, failure, or betrayal. In such circumstances, even a small shock can become fatal.
Suicide is not a solution to any problem; it merely transfers pain to the next generation. A difficulty that feels unbearable today may be resolved tomorrow—but a life once lost can never return. Unfortunately, this truth does not register in the critical moment, which is why society must intervene before that moment arrives.
An important question remains: does the reason for suicide really end after the act? Does the suffering of parents, siblings, and relatives left behind come to an end? Why does today’s generation not think about this?
What Do Young Boys and Girls Really Want?
They do not want sermons; they want empathetic dialogue.
They do not want blame; they want support.
They do not want comparison; they want trust.
Safe spaces must be created at home, in colleges, and in society—places where young people can express their pain and injustice freely, without fear, shame, or punishment.
The Danger of Publicity: The “Contagion” of Suicide
Another serious issue is the publicity that follows suicides from the Krishna bridge. Social media, rumors, sensational news, and photos or videos unintentionally romanticize suicide. This creates an illusion in some disturbed minds that at least they will gain attention. This psychological chain reaction is an alarming danger for society.
The role of the media is extremely crucial here. While reporting such incidents, sensitivity, restraint, and responsibility must be maintained. Highlighting locations, methods, or graphic details of suicide is harmful to the public interest.
Collective Responsibility of Administration, Institutions, and Society
This problem is not limited to individuals; it reflects a broader social failure. Educational institutions must ensure that counseling cells function effectively and not merely as a formality.
Parents must look beyond marks, success, and comparisons, and focus on their children’s emotional well-being. Friends must try to recognize the pain hidden behind the mask of “everything is fine.” The administration must install safety barriers, CCTV cameras, counseling messages, and helpline numbers prominently at places like the Krishna bridge.
Speaking Up Is the First Step
Seeking help for mental distress is not a weakness; it is a sign of wisdom and courage. The following helplines are available:
Mental Health Helplines:
AASRA (Suicide Prevention): +91 9820466726
Dial 112: Police assistance
1091: Counseling support
1098: Child helpline
Suicides among young boys and girls must stop—this is not just an emotion, it is a social responsibility. Every life is precious, every problem is temporary, and behind every darkness there is a possibility of light.
Failure, heartbreak, or hardship is not the end of life; sometimes, it marks the beginning of a new path. Life does not stop because one road is closed. The Krishna River will keep flowing—but dreams must not drown on its banks. That is our true role as a society.
— Satish More
Daily Pudhari, Karad
9881191302

०९ जानेवारी २०२६

उद्दीष्ट हट्टी मनोहर शिंदे

उद्दिष्ट ‌‘हट्टी‌’ राजकारणी..

मनोहर भास्करराव शिंदे हे नाव घेतलं की डोळ्यासमोर येतं मलकापूर. मनोहर शिंदे आणि मलकापूर यांचं नातं इतकं घट्ट झालं आहे की या दोन्ही नावांना एक वलय प्राप्त झालं आहे. या नात्यासोबत आणखीन एक नातं आहे, ते म्हणजे मलकापूरची 24 बाय 7 योजना. मलकापूरच्या विकासासाठी, उद्दिष्ट साध्य करण्यासाठी स्वतःचं खरं करणाऱ्या ‌‘हट्टी मनोहर शिंदे भाऊ‌’ यांचा आज 9 जानेवारी रोजी वाढदिवस,त्यानिमित्ताने...

मलकापूरसारख्या छोट्या गावातील एक युवा कार्यकर्ता ते प्रगल्भ राजकारणी असा मनोहर शिंदे यांचा प्रवास मी गेल्या चोवीस वर्षांपासून अनुभवला आहे. माजी आमदार भास्करराव शिंदे यांचा मुलगा, केवळ अशी ओळख असणारे मनोहर शिंदे, ज्यावेळी ते काहीच नव्हते तेंव्हापासून मनोहर शिंदे यांना मी पाहत आलो आहे. आता मात्र ‌‘मनोहर शिंदे भाऊ‌’ या नावाचा ब्रँड कराड, मलकापूरसह जिल्ह्यात तयार झाला आहे. परंतु हा प्रवास छोटा नाही, सोपा तर अजिबातच नाही. या प्रवासात मनोहर शिंदे यांना जे यश, कीर्ती आणि नाव मिळालं आहे, याची माझ्या अभ्यासातून किंवा माझ्या मते केवळ दोन कारणे आहेत. ती म्हणजे विशिष्ट कामासाठी स्वतःला झोकून देणे आणि ते काम होत नाही तोपर्यंत सतत पाठपुरावा करत राहणे.

सुरुवातीला मलकापूर ग्रामपंचायत होती, आता मलकापूर नगरपालिका झाली आहे. यामध्ये मलकापूर नगरपंचायत नावाचा एक टप्पा येऊन गेला. हा टप्पा फार महत्त्वाचा होता. ग्रामपंचायतीची मलकापूर नगरपंचायत करणे म्हणजे अंगावर अनेक शत्रू ओढवून घेण्यासारखे होते. कर वाढणार, शासनाचे नियम वाढणार, घरपट्टी वाढणार, पाणीपट्टी वाढणार अशा काही गोष्टी नकोशा असणारे सामान्य नागरिक आणि त्यांना चिथावणी देणारे राजकीय नेते यामुळे शक्यतो कोणी नगरपंचायत करायच्या नादाला लागत नाही. मनोहर शिंदे यांनी हे अग्निदिव्य स्वीकारले आणि खा. पृथ्वीराज बाबा यांच्या पाठीमागे लागून तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याकडून मलकापूरची नगरपंचायत करून आणली. नगरपंचायत झाल्यामुळे मिळणारा भरघोस विकास निधी आणि त्यामुळे गावाचा होऊ शकणारा विकास याची जाण शिंदे यांच्याकडे होती. सुदैवाने मनोहर शिंदे यांच्याकडे मलकापूरची सत्ता आल्यानंतर राज्यात आणि केंद्रात काँग्रेसचे सरकार होते, याचा त्यांनी पुरेपूर फायदा घेतला. आणखी दुधात साखर पडली, 2010 साली पृथ्वीराज चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री झाले. मग मलकापूरला भरभरून विकासाची गंगाच वाहू लागली. विकासकामे ही कधीही न संपणारी प्रक्रिया आहे. एक विकास झाला की दुसरी विकासकामे पुढे उभी असतात. त्यामुळे कमी-जास्त होत असलं तरी मलकापूरमध्ये एके काळी काहीच नव्हतं, मात्र ते सगळं आणण्यासाठी मनोहर शिंदे यांनी केलेली धडपड, केलेले प्रयत्न मी स्वतः पाहिलेले आहेत. कराड शहरालगत मोठ्या वेगाने विकसित होत असलेले मलकापूर शहर म्हणजे नागरिकांसाठी राहण्यासाठी सर्वोत्तम ठिकाण, तर व्यापाऱ्यांसाठी सोन्याची खाणच. सहकार महर्षी स्वर्गीय जयवंतराव भोसले यांनी कृष्णा अभिमत विद्यापिठ व हॉस्पिटलच्या माध्यमातून मलकापूरच्या विकासाची कक्षा उंचावली. मलकापूर शहर वाढलं, विकसित झालं ते फक्त कृष्णा हॉस्पिटलमुळे. सर्व बाजूंनी विकसित झालेल्या मलकापूरमध्ये महामार्गालगत राहायला मिळणे, त्याबरोबरच कृष्णा हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय सुविधा मिळणे, सर्व प्रकारचे शिक्षण मिळणे आणि हे सगळे कमी खर्चात उपभोगायला मिळणे, ही संधी कोण कशी बरे घालवेल? आणि याच गोष्टीमुळे मलकापूरचा विकास झपाट्याने होत गेला, लोकसंख्या वाढत गेली. भौतिक सुविधा कमी पडू लागल्या. मग डोळ्यासमोर विकासाची ब्ल्यू प्रिंट ठेवून मनोहर शिंदे यांनी शहर विकासाचे नियोजन केले.
उत्तम, भव्य आणि सुंदर रस्ते हा तर प्रत्येकाचा अधिकार आहेच. रस्ते मोठे झाले तरच शहराचा विकास होतो हे खरे असले तरी विकसित होत असलेल्या मलकापूरमध्ये सुरुवातीला घरोघरी शुद्ध आणि मुबलक पाणी गेले पाहिजे, हा विचार डोळ्यासमोर ठेवून मनोहर शिंदे यांनी 24 बाय 7 पाणीपुरवठा योजना आखली. या योजनेच्या मंजुरीपासूनच ही योजना सुरू होणार का? चालणार का? टिकणार का? 24 तास पाणी कोणी देऊ शकतं का? 24 तास पाणी देऊन काय उपयोग होणार? मनोहर शिंदेंना यश मिळणार नाही? मलकापूर ग्रामपंचायत तोट्यात जाणार-अशा नकारात्मक आणि उलटसुलट चर्चा त्यावेळी रंगल्या होत्या. मात्र मनोहर शिंदे यांनी या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केले. देशभरात जिथे ही योजना सुरू आहे तिथे जाऊन माहिती घेतली, अभ्यास केला. 24 तास शुद्ध आणि मुबलक पाणी देणे शक्य आहे. हे पाणी दिलं तर पाण्याचा अपव्यय कमी होईल, लोकांना शुद्ध पाणी मिळालं की मलकापूरमध्ये लोक राहायला येतील, मलकापूरचा विकास होईल, लोकांना आरोग्य मिळेल-हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून त्यांनी ही योजना उभी केली, चालवली. देशात आदर्शवत ठरवत या योजनेच्या माध्यमातून मलकापूरचं नाव जगाच्या नकाशावर नेऊन ठेवलं. मनोहर शिंदे होते म्हणूनच ही योजना चालू शकली आणि यशस्वी झाली, यात काही शंका नाही. मनोहर शिंदे यांचा स्वभाव थोडासा हट्टी आहे, ते स्वतःचं खरं करतात. मात्र ते शहराच्या विकासासाठी हट्ट करतात, हे मी अनेकदा पाहिलं आहे. 24 बाय 7 योजना राबवताना त्यांनी हा हट्टच केला आणि या हट्टीपणामुळेच ही योजना यशस्वी झाली, हे त्रिवार सत्य आहे.

पालिकेत सलग दोन टर्म काँग्रेसच्या चिन्हावर बहुमत मिळणं हे सोपं काम नाही. मात्र मनोहर शिंदे यांना हे शक्य झालं कारण त्या काळात काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून तयार केलेलं नेटवर्क. मनोहर शिंदे हे पृथ्वीराज चव्हाण यांचे अतिशय जवळचे होते, आजही आहेत. कराड दक्षिणेत काँग्रेस पक्ष वाढीसाठी मनोहर शिंदे यांचं योगदान फार मोठं आहे. एकनिष्ठ असलेल्या मनोहर शिंदे यांनी जे जे मागितलं, ते तेे पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कालावधीत मलकापूरला दिलं.

शहराच्या विकासकामांबाबत किंवा डोळ्यासमोर ठेवलेलं उद्दिष्ट पार पाडण्यासाठी राजकारणात काही तडजोडी स्वीकाराव्या लागतात. मनोहर भाऊंनाही त्यांच्या अलीकडच्या काळात एक राजकीय तडजोड करावी लागली. काँग्रेसचा हात सोडून भारतीय जनता पक्षामध्ये जावं लागलं. त्यांनी हा निर्णय मलकापूर शहराचा विकास, प्रलंबित राहिलेली कामं पूर्ण करण्यासाठी राज्यात व केंद्रात असलेलं सरकार पाहून घेतला होता आणि त्यानुसार ते निवडणुकीला सामोरे गेले. कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुल भोसले यांनी मनोहर शिंदे मनोहर भास्करराव शिंदे हे नाव घेतलं की डोळ्यासमोर येतं मलकापूर. मनोहर शिंदे आणि मलकापूर यांचं नातं इतकं घट्ट झालं आहे की या दोन्ही नावांना एक वलय प्राप्त झालं आहे. या नात्यासोबत आणखीन एक नातं आहे, ते म्हणजे मलकापूरची 24 बाय 7 योजना. मलकापूरच्या विकासासाठी, उद्दिष्ट साध्य करण्यासाठी स्वतःचं खरं करणाऱ्या ‌‘हट्टी मनोहर शिंदे भाऊ‌’ यांचा आज 9 जानेवारी रोजी वाढदिवस, त्यानिमित्ताने...यांच्यासारखा अभ्यासू नेता भारतीय जनता पक्षामध्ये घेताना मलकापूर शहरातील विविध घटकांचा नक्कीच विचार केलेला असावा. आमदार अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली मनोहर शिंदे यांच्या सोबतीने नुकत्याच झालेल्या मलकापूर नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने मिळवलेलं यश निश्चितच उल्लेखनीय आहे. मनोहर शिंदे भाजपमध्ये गेल्यामुळे अनेक वार्डातील गणितं बदलली आहेत, हे प्रभागनिहाय मतदानाच्या आकडेवारीतून स्पष्ट होतं. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सर्व बाजूंनी त्यांना घेरण्याचा प्रयत्न झाला, त्यांना खाली खेचण्यासाठी मलकापूरात येऊन अनेकांनी प्रयत्न केले, मात्र धुरंधर भाऊ त्यांना पुरून उरले. ते निवडणूक लढवत असलेल्या प्रभागासह मलकापूरातील घराघरातील माणसांचा त्यांना असलेला अभ्यास आणि थेट संबंध त्यांच्या उपयोगी आले. अनेक वर्षे काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते व नेते म्हणून काम पाहिल्यानंतर भाजपमध्ये जाण्याचा निर्णय त्यांना भविष्यकाळात फार मोठी संधी देऊन जाणार आहे. असं म्हणतात, कोणताही निर्णय चुकीचा किंवा बरोबर नसतो; घेतलेला निर्णय जो बरोबर करून दाखवतो, तोच खरा यशस्वी, तोच खरा खिलाडी. भविष्यात मनोहर शिंदे यांच्याकडून काय काम होणार, किती होणार आहे, हे पाहण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे. मनोहर शिंदे यांच्या माध्यमातून अभ्यासू नेता सभागृहात मिळाल्यामुळे त्यांनाच पुन्हा उपनगराध्यक्ष करण्याचा निर्णय आ. अतुल भोसले यांनी घेतला. मलकापूरात अपूर्ण राहिलेली कामे आता आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण होणार आहेत. मलकापूर शहराला जे हवं ते मिळण्यासाठी मनोहर शिंदे हे कार्य करत राहणार आहेत, यात ते यशस्वी होतील अशी खात्री वाटते. 
मनोहर भाऊंना तुम्ही कधीही मुंबईत, पुण्यात किंवा कलेक्टर ऑफिसमध्ये भेटलात, तर त्यांच्या हातात भलीमोठी फाईल असते. नगरविकास खात्यासह विविध विभागांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. कुठल्या खात्यातून निधी कसा आणायचा, प्रस्ताव कसा दाखल केला की निधी मिळतो, हे त्यांना चांगलं ठाऊक आहे. फाईल घेऊन कलेक्टरकडे जाऊन पाठपुरावा करणे, ती फाईल परत विभागीय आयुक्तांकडे गेली आहे का हे पाहण्यासाठी तिथे पोहोचणे आणि शेवटी मंत्रालयात ती फाईल कुठे पोहोचली आहे याचा पाठपुरावा करत त्या मंत्र्यापर्यंत पोहोचणे आणि ते काम करून घेणे, हे त्यांना चांगलं जमतं. परफेक्शन अर्थात परिपूर्णता हा शब्द मनोहर शिंदे यांना तंतोतंत लागू पडतो. राहणीमान असो, समाजात वावरण्याची किंवा बोलण्याची पद्धत असो किंवा पत्रव्यवहाराचा विषय असो-या सर्व ठिकाणी मनोहर शिंदे यांचा अचूकपणा ठळकपणे दिसून येतो. मंत्रालय स्तरावर द्यावयाची पत्रे, राज्य व केंद्रस्तरावर पाठवायची पत्रे मनोहर शिंदे अतिशय अचूकपणे तयार करतात. मुख्याधिकाऱ्यांना जी माहिती नसते, ती भाऊंना माहीत असते.
अनेक गोष्टींवर मनोहर शिंदे भाऊ आणि माझं एकमत असतं, मात्र कधी कधी आमचे तात्त्विक वाद होतात. त्यांच्या जवळच्या काही विघ्नसंतोषी लोकांनी अनेकदा आमच्यात वितुष्ट आणण्याचा प्रयत्न केला, मात्र भाऊंनी त्यांना वेळोवेळी अलगद फेकून दिलं. त्यामुळे आमच्या दोघांमधील वैयक्तिक संबंध कधीही दुरावले नाहीत. ‌‘पुढारी‌’च्या माध्यमातून अनेकदा मलकापूरच्या समस्यांबाबत वस्तुनिष्ठ बातम्या द्याव्या लागतात. मात्र हे छापून आल्यानंतर मनोहर शिंदे यांनी कधीही ‌‘ही बातमी का छापली?‌’ म्हणून मला फोन केला नाही. उलट, ‌‘ही बातमी छापून आल्यामुळे आमचा फायदा झाला. या बातमीचे कटिंग दाखवून मी मंत्रालयात गेलो आणि मलकापूर स्मशानभूमीसाठी निधी आणला,‌’ असं मनोहर शिंदे मला आनंदाने सांगतात. हा त्यांचा गुण खरंच उल्लेखनीय आहे आणि सर्व सत्ताधाऱ्यांनी आदर्श घेण्यासारखा आहे. विरोधात छापून आलेल्या बातम्यांनाही जो सकारात्मकपणे घेतो, त्याचा फायदा उठवतो, असा राजकारणी मी क्वचितच पाहिलेला आहे. 
या पुढील काळातही मनोहर शिंदे यांच्या हातून मलकापूरवासीयांसाठी चांगली कामं होवोत, त्यांना उत्तम आरोग्य लाभो, अशा त्यांना शुभेच्छा!
- सतीश मोरे

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...