फॉलोअर

२५ ऑगस्ट २०२५

ठरवून ठरवलं तरी


ठरवणं आणि ठरणं

आपल्या आयुष्यात प्रत्येकजण काही ना काही ठरवत असतो.
कधी एखादं ध्येय गाठायचं, कधी एखादं नातं टिकवायचं,
कधी एखादी चांगली सवय लावून घ्यायची—
"आजपासून मी हे करणारच!" असं ठाम मनाशी पक्कं ठरवतो.

पण प्रश्न असा आहे की,
ठरवलं तसं नेहमी घडतं का?
बर्‍याचदा आपल्याला वाटतं तसं होत नाही.
कधी परिस्थिती बदलते, कधी अडथळे येतात,
कधी आपल्या हातात नसलेल्या गोष्टी
संपूर्ण चित्र बदलून टाकतात.

म्हणूनच “ठरल्याप्रमाणे झालं, तर ठरवायला अर्थ आहे;
नाहीतर ती केवळ ठरवाठरवी ठरते” असं वाटतं.
आपल्या ठरवण्याला पूर्ण होण्यासाठी
वेळ, संधी आणि परिस्थितीची साथही हवीच असते.

तरीही जीवनाची गंमत हीच—
आपण न ठरवता देखील अनेक गोष्टी
आपोआप घडत जातात.
कधी न ठरवलेली माणसं भेटतात,
न ठरवलेल्या वाटा समोर येतात,
न ठरवलेल्या संधी आपल्याला उचलून नेतात.
तेव्हा लक्षात येतं की,
आपल्या पलीकडे कुणीतरी मोठा ठरवणारा आहे—
जो आपल्या आयुष्याची दिशा ठरवतो.

म्हणूनच जीवनाकडे पाहताना दोन गोष्टी महत्त्वाच्या ठरतात—
१) आपण हवं ते नक्की ठरवणं, प्रयत्न करणं.
२) आणि न ठरलेलं जे घडेल त्याला समजूतदारपणे स्वीकारणं.

कारण शेवटी—
आपण ठरवतो तेवढंच नाही,
तर जे न ठरवता घडतं,
तेच कधी कधी आयुष्याला खरी दिशा देतं!

अपेक्षांचे दरवाजे बंद करा



अपेक्षांचे दरवाजे हळूहळू बंद करा,
समाधानाचे दरवाजे आपोआप खुले होतील !

खूप अपेक्षा धरल्यानंतर काय होतं आणि त्याचा शेवट काय होतो याचा अनुभव अनेकांनी अनेक वेळा घेतला असेल. छोटं उदाहरण देतो – आपण भर दुपारी उन्हातून घरी यायला लागतो. रस्त्यात आपण विचार करतो, आता मी घरी गेल्यानंतर माझी मुलगी किंवा माझी बायको माझं स्वागत करेल आणि थंड पाण्याचा ग्लास आणून देईल, टॉवेल आणून देईल. पण घरी गेल्यावर होतं त्याच्या उलट. आपण जेव्हा घरात जातो, तेव्हा ती व्यक्ती काहीतरी काम करत असते, किंवा ती तिच्या विश्वात असते. ती फक्त दरवाजा उघडते आणि आपल्याला आत घेते व पुन्हा आपल्या कामाला लागते. आपण मात्र अपेक्षा घेऊन आलेलो असल्याने त्या सर्व अपेक्षा भंग होतात आणि मनाला खूप वाईट वाटतं. “मी एवढं कुटुंबासाठी करतो आणि मला कोणी साधा पाण्याचा ग्लासही विचारत नाही” असे विचार मनात येतात.

या उलट आपण असं केलं तर? – कोणतीही अपेक्षा न करता घरात गेलो आणि घरात आपल्या बायकोने किंवा मुलांनी थंड पाण्याचा ग्लास किंवा वर सरबत आणून दिलं, तर किती आनंद होईल! खरंच हे करून बघा – अपेक्षेशिवाय एखाद्या व्यक्तीकडे गेल्यानंतर जे मिळतं, त्यातून मिळणारा आनंद हा दामदुप्पट असतो, अगदी एफडीसारखा!

अपेक्षा करून एखाद्या व्यक्तीकडे गेलो तर अपेक्षाभंग होण्याचा फार मोठा धोका असतो. आपण फक्त आपलं कर्तव्य बजावायचं आणि कोणालाही भेटायला जाताना निर्विकार भावनेने जायचं. कोणत्याही अपेक्षा घेऊन जायचं नाही. मग पहा – किती छान आनंद होतो. “अपयश मरणावून वोखटे” असं मी एकदा कुठेतरी ऐकलं होतं. पण मी असं म्हणतो – अपेक्षाभंग त्याहूनही अधिक वाईट!

अपेक्षा माणसाला खूप क्षीण बनवतात आणि दुसऱ्यावर अवलंबून राहायला शिकवतात. अपेक्षांच्या बाजारात आपण स्वतःला विकून टाकतो आणि स्वतःचं स्वत्व हरवून बसतो. क्षीण झालेला माणूस अपेक्षेच्या आशेने काहीतरी मिळेल असं गृहित धरतो आणि मनापासून काम करत नाही किंवा दुसऱ्यावर अवलंबून राहतो. अपेक्षेच्या या दबावाखाली आपण अपेक्षाभंगरूपी दुःखाला जवळ बोलावून घेतो. त्याऐवजी असं केलं तर? – विना-अपेक्षा आपण एखाद्याशी संबंध ठेवले, तर किती आनंद होईल बघा.

अपेक्षांचे दरवाजे सतत उघडे ठेवले, तर त्या दरवाजातून अपेक्षाभंगाची दुःखं येतात. त्याऐवजी अपेक्षांचे दरवाजे हळूहळू बंद करा, मग बघा – समाधानाचे दरवाजे आपोआप उघडले जातील.

✍️ सतीश मोरे सतिताभ

मोठ्या सुखाच्या शोधात धावू नका,
छोट्याशा आनंदात लपलेलं सुख शोधा !

१८ ऑगस्ट २०२५

ये इंसान क्या है, खुदा के भी आगे प्यार झुकता नही


माझे दक्षिणेतील आवडते निर्माते दिग्दर्शक के. सी. बोकाडिया यांच्या बॅनरखालील 1985 मध्ये रिलीज झालेला 'प्यार झुकता नही' हा चित्रपट मला खूप आवडतो. अमिताभ बच्चन यांच्या नंतर आवडणारा दुसरा सर्वात जवळचा हिरो म्हणजे मिथुन चक्रवती. 1985 साली आम्ही आठवी नववीला असेन. या काळात प्रेमाचं आकर्षण तर होतंच ! मात्र चित्रपटाचं आकर्षण फार होतं. चित्रपटातातील गाणी रेडिओवर किंवा टेप रेकॉर्डर ऐकण्याचा एक वेगळा ऑरा त्या काळात होता.

मला आठवते 'प्यार झुकता नहीं 'हा चित्रपट मी राजमहल थिएटरला पाहिलेला आहे. हा चित्रपट त्याकाळी खूप हिट झालेला होता. या चित्रपटातील 'तुमसे मिलकर ना जाने क्यू' हे गाणं खूप लोकप्रिय झालं होतं. बिनाका गीतमाला मध्ये अनेक आठवडे हे गाणं टॉपला होतं. चित्रपटातील सर्वच गाणी छान होती. शब्बीर कुमार  आणि लता मंगेशकर यांच्या सुंदर आवाजातील ही गाणी लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी स्वरबद्ध केली होती. या चित्रपटातील 'तुम्हे अपना साथी बनाने से पहले, मेरी जान मुझको बहुत सोचना है, हे गाणं मला खूप आवडतं. मी या गाण्याविषयीच आज थोडसं बोलणार आहे. 

तपूर्वी या चित्रपटाची स्टोरी तुम्हाला माहित नसेल तर सांगतो. गर्भ श्रीमंत कुटुंबातील एक तरुणी आणि सामान्य कुटुंबातील फोटोग्राफर तरूण यांची ही प्रेम कथा ! त्यांच्यातील हे प्रेम सहज फुलत जातं, दोघेही प्रेमात उत्कंठ बुडून जातात. लग्न करायचा निर्णय घेतात. मग ती तरूणी आपल्या वडलांसमोर आपल्या प्रेमाची कबुली देते. तिचे वडील त्याला एका पार्टीमध्ये यायचं निमंत्रण द्यायला सांगतात. प्रियकराला एका पार्टीमध्ये येतो. श्रीमंत बाप या छोट्या तरुणाला बाजूला घेऊन जातो आणि त्याची पूर्ण औकात काढतो. पार्टी सुरू झाली असते आणि अपमानित झालेला तो तरुण आपल्या भावना गीतातून व्यक्त करतो. 'तुम्हे अपना साथी बनाने से पहले, मेरी जान मुझको बहुत सोचना है' हे सांगताना गरीब श्रीमंतीतील मोठी दरी आपल्याला एक करू शकत नाही, तुझ्यावर मी आयुष्याची दोरी बांधू शकत नाही असं स्पष्ट सुनावतो. तुझ्याशी लग्न केलं किंवा तुझ्यासोबत लग्न गाठ बांधली तर तुला माझ्यासोबत अनेक संकटाला तोंड द्यावे लागेल, माझ्यासोबत तुला कधी उपाशी राहावं लागेल, जगाचे टोमणे ऐकून घ्यावे लागतील असं व्यक्त होत असताना असताना तो तरुण आपल्या मनातील गरिबीच्या भावना व्यक्त करतो. 

शब्बीर कुमार यांच्या गंभीर आवाजातील हे गाणं मला खूप आवडत होतं, आजही आवडतं. हा तरुण ही भावना व्यक्त केल्यानंतर थांबतो, पार्टीतून जायला लागतो मात्र ती तरुणी त्याला थांबवते. त्यानंतर त्या तरुणीने आपल्या आई-वडिलांसमोर त्या पार्टीमध्ये दिलेलं उत्तर मला त्याहून अधिक आवडतं. लतादीदींनी एका सुरात, एका दमात हे गाणं म्हटलं आहे. एस एच बिहारी यांनी लिहिलेल्या या गीतामध्ये अनेक उर्दू शब्द आहेत, त्याचा अर्थ मला त्यावेळी कळत नव्हता. आता थोडासा अभ्यास करून किंवा माहिती घेऊन माझ्या परीने मी या गाण्याचा अर्थ काढण्याचा मी थोडासा प्रयत्न केला आहे. बघा आपणाला आवडतो का?



मोहब्बत जिन्हें हो गई हो किसी से
मोहब्बत जिन्हें हो गई हो किसी से
मोहब्बत का अंजाम कब सोचते हैं?

ये ऐसा सुहाना सफ़र है कि जिसमें
हज़ारों हैं नकाम कब सोचते हैं
चराग़-ए-वफ़ा अपने हाथों में लेकर
मोहब्बत की राहों में जो चल पड़े हैं

बयाबाँ में होगी कि सहरा में होगी
कहाँ होगी अब शाम कब सोचते हैं
कहाँ होगी अब शाम कब सोचते हैं

मोहब्बत के मारों को अब और, ऐ, दिल
सताएँगी क्या सख़्तियाँ ज़िंदगी की?
जिन्हें थक के नींद आ गई पत्थरों पर
वो दुनिया का आराम कब सोचते हैं?

ये इंसान क्या है, ख़ुदा के भी आगे
कभी प्यार दुनिया में झुकता नहीं है
प्यार झुकता नहीं है

मोहब्बत ही जिनका ख़ुदा बन चुकी हो
किसी और का नाम कब सोचते हैं?

मोहब्बत जिन्हें हो गई हो किसी से
मोहब्बत का अंजाम कब सोचते हैं
मोहब्बत का अंजाम कब सोचते हैं

असे हे गाण्याचे बोल होते. यात खोलवर असा अर्थ आहे.

मोहब्बत जिन्हें हो गई हो किसी से
मोहब्बत का अंजाम कब सोचते हैं…
👉 ज्यांना खरं प्रेम झालं आहे, ते कधीच त्याचा शेवट किंवा परिणाम काय होईल हे विचार करत नाहीत. प्रेम हे सुंदर असतं ही भावना त्यांच्यामध्ये बसलेले असते त्यामुळे मी प्रेम केल्यावर काय होईल याचा ते का बर विचार करतील?


ये ऐसा सुहाना सफ़र है कि जिसमें
हजारों हैं नकाम कब सोचते हैं…
👉 प्रेमाचा प्रवास इतका सुंदर आहे की त्यात किती अडचणी येतात हे प्रेमिक कधी मोजतच नाहीत. या प्रवासात खूप सुंदर आठवणी मिळतात, खूप वेगळा अनुभव मिळतो हा अनुभव इतका सुखद असतो ती त्या अडचणीचा विचार प्रेमिक कधीच करत नाहीत



चराग़-ए-वफ़ा अपने हाथों में लेकर
मोहब्बत की राहों में जो चल पड़े हैं…
👉 ज्यांच्या हृदयात निष्ठेचा दिवा आहे आणि जे प्रेमाच्या मार्गावर निघाले आहेत,ते संकटे वा शेवटाची भीती बाळगत नाहीत. आलेली सगळी संकट त्यांना संधी वाढतात किंवा सोपी वाढतात. प्रेमाच्या या जादुई दिव्याच्या प्रकाशात ते अनेक वादळाला सामोरे जातात,त्यामुळे त्यांना संकटाची भीतीच वाटत नाही.


---

बयाबाँ में होगी कि सहरा में होगी
कहाँ होगी अब शाम कब सोचते हैं…
👉 त्यांच्या प्रेमाचा अंत कुठे होईल – ओसाड वाळवंटात की हिरव्या गालीच्यावर – हे ते कधीच विचार करत नाहीत. त्यांच्या दृष्टीने प्रेम एक सुंदर भावना असते त्या भावनेच्या विश्वात राहून सुखदुःखाची वाट ते सहज चालत राहतात. प्रेमाच्या या धुंद लहरी मध्ये ते चांगल्या वाईटाची पर्वा करत नाहीत.

मोहब्बत के मारों को अब और, ऐ दिल
सताएँगी क्या सख़्तियाँ ज़िंदगी की?
👉 जे आधीच प्रेमाच्या वेदनांनी विद्ध झाले आहेत, त्यांना आयुष्याची इतर अडचणी आणि त्रासाचा काय त्रास होणार? प्रेमात आलेल्या चांगल्या वाईट अनुभवाने ते आता इतके भक्कम झाले आहेत की त्यांना कसलाही त्रास झाला,कसलीही संकट आली तर त्याचं काहीच वाटत नाही.


जिन्हें थक के नींद आ गई पत्थरों पर
वो दुनिया का आराम कब सोचते हैं…
👉 जे थकून दगडांवरही झोपू शकतात, त्यांना जगाच्या सुखसोयींची काय पर्वा ? उन,वारा, वादळ  पाऊस याची त्यांना काही पर्वा नसते. खायला चांगलं अन्न मिळालं किंवा नाही मिळालं,चांगल्या सुविधा नाहीत मिळाल्या याचीही त्यांना पर्वा नसते. निखळ प्रेमाची भावना त्यांना सुखद गारवा देत असते.


ये इंसान क्या है, ख़ुदा के भी आगे
कभी प्यार दुनिया में झुकता नहीं है…
👉 माणूस देवासमोर झुकतो, पण खरे प्रेम कधीही कुणा पुढेही झुकत नाही. प्रेम हेच सर्वोच्च आहे. प्रेम आणि ईश्वर, प्रेम आणि जगाचा निर्माता या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. देव सुद्धा अनेकदा प्रेमासमोर नतमस्तक झाला आहे, मग जगासमोर हे प्रेमी कसे बरे हार मानतील ? खरं, निखळ प्रेम कधीच धमकी,दबाब,आकर्षण, पैसा ,सत्ता, प्रसिद्धी, बळजबरी किंवा दादागिरी यापुढे झुकलेले नाही, झुकणारही नाही.


---

मोहब्बत ही जिनका ख़ुदा बन चुकी हो
किसी और का नाम कब सोचते हैं…
👉 ज्यांच्यासाठी प्रेमच देव झाले आहे, ते दुसऱ्या कशाचाही विचार करत नाहीत. प्रेमात उत्कंठ बुडालेले आहेत.आता प्रेमालाच भक्ती मानू लागलेले आहेत. भक्ती आणि प्रेमाच्या रसाळ प्रवाहात डुंबून गेले आहेत. प्रेमाशिवाय ते इतर कोणताही  विचार कसा करतील?, प्रेम हेच त्यांच्यासाठी सर्वोच्च आनंद आहे. 


या गाण्यात प्रेमाची ताकद,त्यातील निष्ठा आणि त्याचे वेगळेपण सांगितले आहे. खऱ्या प्रेमिकांना अडचणी, शेवट, जगाच्या सुखसोयी किंवा संकटांची भीती नसते. त्यांच्यासाठी प्रेमंच ईश्वराहून सर्वोच्च असते. एस एच बिहारी यांनी यांनी प्रेमाच्या भावना कुट कुट भरून या गीतामध्ये व्यक्त केलेल्या आहेत. हे गाणं अजरामर आहे.


#सतीश मोरे सतिताभ

०८ ऑगस्ट २०२५

वेल्लूर किल्ला.. भव्य दिव्य पण मराठ्यांच्या इतिहास लपवला जातोय !


वेल्लूर किल्ला.. भव्य दिव्य 
पण मराठ्यांच्या इतिहास लपवला जातोय !

कांचीपुरमचा मुक्काम आटोपून आम्ही सकाळी लवकरच बाहेर पडलो.आज बुधवार आमचं डेस्टिनेशन होतं वेल्लोर. वेल्लोरला जाण्यासाठी खाजगी बस पकडली. वेल्लोर बस स्थानकावर उतरल्यानंतर रिक्षा केली.गेली तीन-चार दिवस आम्हाला चांगले रिक्षावाले मिळाले होते, मात्र वेल्लोर मध्ये रिक्षा चालकांनी आमच्या कडून अर्धा किलोमीटर साठी हटून, गटून दिडशे रुपये घेतले. उन कडक होते. रूमवर जाऊन आराम केला आणि दुपारी चार वाजता वेल्लोर पाहण्यासाठीसाठी बाहेर पडलो.

वेल्लूर पासून जवळच तिरूमलाईकोडी येथे  लक्ष्मी नारायणी मंदिर सुवर्ण मंदिर आहे लक्ष्मी नारायणी  विष्णू नारायणाची पत्नी आहे. हे मंदिर 40 हेक्टर (100 एकर) जमिनीवर स्थित आहे आणि वेल्लोर-आधारित धर्मादाय ट्रस्ट, श्री नारायणी पीडम यांनी बांधले आहे, ज्याचे अध्यक्ष अध्यात्मिक नेते श्री शक्ती अम्मा ज्यांना 'नारायणी अम्मा' म्हणून ओळखले जातं. सोन्याचे आच्छादन असलेले मंदिर, दिड टन सोन्याचा वापर  केले आहे.मंदिर कलेमध्ये तज्ञ कारागिरांनी जटिल काम केले आहे. सोन्याच्या पट्ट्या सोन्याच्या फॉइलमध्ये रूपांतरित करणे आणि नंतर तांब्यावर फॉइल बसवणे यासह प्रत्येक तपशील जपला आहे.हे मंदिर पाहिला दिवसातून सकाळी आणि संध्याकाळी पंधरा मिनिटे मोफत प्रवेश दिला जातो. इतर वेळेला मात्र हे मंदिर पहायचे असेल तर दीडशे रुपये तिकीट आकारले जाते. आम्ही तिकीट घेऊन मंदिर परिसरात गेलो. या ठिकाणी मोबाईल फोन येण्यास परवानगी नाही. मोठ्या प्रमाणात सिक्युरिटी आहे. दर्शन बारी फार लांब आहे. या बारी मधूनच आपल्याला मंदिराला गोल वेढा घालून तेथे जावे लागते. सुवर्ण मंदिरातील भव्यता राहून डोळ्याचे पारणे फिटले. दर्शन बारी मध्ये चहापाण्याची सुविधा करण्यात आलेली आहे.आम्हाला लगेच दर्शन मिळाले.या मंदिराच्या शेजारीच बालाजी मंदिर आहे, येथे लाडूचा प्रसाद दिला जातो. तामिळनाडूमधील अनेक मंदिरे पाहिली मात्र हे  सुवर्ण मंदिर श्रीमंताचे मंदिर असल्याचे माझी भावना झाली आणि इथे सर्व गोष्टीला पैसे आकारले जात होते.
सुवर्ण मंदिर दर्शन घेऊन आम्ही वेल्लोर किल्ल्याकडे निघालो. वेल्लोर किल्ल्याचा इतिहास काय आहे याबाबत थोडीफार माहिती होती. इतिहास तज्ञ व इंटरनेट वरून मिळालेली माहिती पुढीलप्रमाणे.

वेल्लूर किल्ल्याची मालकी विजयनगरच्या सम्राटांकडून , विजापूरच्या सुलतानांकडे , मराठ्यांकडे , कर्नाटकी नवाबांकडे आणि शेवटी ब्रिटिशांकडे गेली , ज्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत किल्ला ताब्यात ठेवला . ब्रिटिश राजवटीत, टिपू सुलतानचे कुटुंब आणि श्रीलंकेचे शेवटचे राजा , श्री विक्रम राजसिंहा यांना किल्ल्यात कैदी म्हणून ठेवण्यात आले होते. श्रीरंगारायाच्या विजयनगर राजघराण्याच्या हत्याकांडाचाही तो साक्षीदार आहे . 

1650 च्या दशकात, श्रीरंगाने म्हैसूर आणि तंजोर नायकांशी युती केली आणि गिंगी आणि मदुराईवर हल्ला करण्यासाठी दक्षिणेकडे कूच केले . त्याचा पहिला मुक्काम म्हणजे गिंजीचा किल्ला ताब्यात घेतला, परंतु मदुराईच्या थिरुमलाई नायकाने उत्तरेकडून वेल्लोरवर हल्ला करून श्रीरंगाचे लक्ष वळवण्यासाठी विजापूरच्या सुलतानाला विनंती केली . विजापूरच्या सुलतानाने तातडीने मोठी फौज पाठवून वेल्लोरचा किल्ला ताब्यात घेतला. त्यानंतर, मदुराई-विजापूरच्या दोन्ही सैन्याने वेल्लोर-तंजोर सैन्याचा पराभव करून गिंजीवर एकत्र आले. युद्धानंतर दोन्ही किल्ले विजापूरच्या सुलतानाच्या ताब्यात गेले. या पराभवाने विजयनगर सम्राटांच्या शेवटच्या थेट पंक्तीचाही अंत झाला. या घटनेनंतर 20 वर्षांच्या आत मराठ्यांनी विजापूर सुलतानांकडून किल्ला ताब्यात घेतला.


1676 मध्ये, थोर मराठा राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मावळ्यांनी तंजोर देशाकडे दक्षिणेकडे कूच केले. त्याच वर्षी, छ शिवाजी महाराजांचा भाऊ एकोजी याने तंजावरचा ताबा घेतला, परंतु त्यांच्या जवळच्या शेजारी मदुराई आणि विजापूर सुलतान यांच्याकडून त्यांना धोका होता , जे अनुक्रमे गिंगी आणि वेल्लोर येथे होते. शिवाजी महाराजांच्या सैन्याने 1677 मध्ये प्रथम जिंजीचा किल्ला ताब्यात घेतला, परंतु वेल्लोरवर हल्ला करण्याचे काम त्यांच्या सहाय्यकाकडे सोपवले आणि मुघल सम्राट औरंगजेबच्या प्रदेशावर हल्ला होत असल्याने ते दख्खनकडे गेले. 1678 मध्ये, प्रदीर्घ चौदा महिन्यांच्या वेढयानंतर, किल्ला मराठ्यांच्या ताब्यात गेला. शिवाजी महाराजांच्या प्रतिनिधीने गडाची तटबंदी मजबूत केली आणि त्या भागावर १६७८-१७०७ या कालावधीत शांततेत राज्य केले. 

मराठा साम्राज्याचा प्रतीक असलेलं वेल्लोर किल्ला पाहण्यासाठी खरंतर खूप उत्सुकता होती. हा किल्ला पुरातत्व खात्याच्या ताब्यात आहे. या किल्ल्याचे अतिशय चांगल्या पद्धतीने जतन केले जात आहे. किल्ल्याच्या बाहेर समोरच भव्य गार्डन तयार करण्यात आलेले असून या गार्डनमध्ये सायंकाळी वेळेला फार मोठी गर्दी असते. किल्ल्याच्या तटबंदी  भक्कम आहेत ,तटबंदी समोर मोठा खंदक असून त्यामध्ये पाणी वाहत होतं . किल्ल्यावर टिपू सुलतानचा महाल आहे, भव्य मशिद आहे, भव्य सेंट जॉर्ज चर्च आहे आणि त्याहून डोळे दिपवणारे जलकंठेश्वरर मंदीर आहे. यापैकी जलकंटेश्वर मंदिर त्याच्या भव्य कोरीव कामांसाठी प्रसिद्ध आहे. किल्ल्याची बांधणी काहीशी जलदुर्गासारखी असून त्याच्या सभोवती दुहेरी दगडी चिरेबंदी तट आहे. तटाभोवती खोल व रुंद खंदक आहे. पूर्वेला किल्ल्याचा मुख्य दरवाजा आहे. किल्ल्यात जलकंठेश्वर विजयानगर वास्तुशैलीतील भव्य मंदिर असून त्याच्या मंडपातील तीरशिल्पात देव-देवतांच्या पूर्णाकृती मूर्ती आहेत. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंस नृत्यमग्न असलेल्या पार्वतीची त्रिभंगातील मूर्ती लक्षवेधक आहे. किल्ल्यात अनेक शासकीय कार्यालये असून येथील खंदकातील पाण्यावर मत्स्यसंशोधन केंद्र चालविले आहे.

जलकंठेश्वरर मंदीर पाहून झालं. पण हुरहूर लागली होती माझ्या शिवरायांचे नाव कुठे आहे काय याची, मराठा साम्राज्य उल्लेख कुठे आहे काय याची ! छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांनी हा किल्ला जिंकला होता याचा इतिहास मात्र या ठिकाणी कुठेही लेखी स्वरूपात पहायला मिळत नाही. याचं फार वाईट वाटलं. या परिसरात फिरताना अनेक जणांना याबाबत विचारलं मात्र याची माहिती कुणालाही नव्हती. रिक्षा ड्रायव्हरला विचारलं, सिक्युरिटी गार्डन विचारलं, आर्किलॉजिकल सर्वे विभागाच्या काही लोकांना विचारलं. मात्र कोणीही या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा साम्राज्य होतं याची माहिती नसल्यास सांगितले. नाही खूप वाईट वाटलं. अशाच प्रकारे इतिहास लपवण्याचा प्रकार आग्रा येथे केला जातो. तिथंही  छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला पराक्रम तेथील गाईड लोक कोणाला सांगत नाहीत. किमान आग्रा किल्ल्याच्या बाहेर छत्रपती शिवाजी महाराज यांचा असणारा भव्य पुतळा पाहून उत्साही किंवा उत्सुक पर्यटक विचारतात तरी हा पुतळा कुणाचा आहे. मात्र गाईड फक्त शिवाजी महाराजांचा पुतळा आहे एवढंच सांगतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेब बादशहाच्या हातावर तुरी देऊन आग्रा येथून स्वतःची सुटका केली होती याची माहिती दिली जात नाही. याचा मी स्वतः साक्षीदार आहे. वेल्लूर किल्ल्याचा परिसर भव्य आहे. हा किल्ला पुरातत्व खात्याच्या ताब्यात असला तरी किल्ल्याचा सविस्तर इतिहास इथे लिहिल्याचे कुठेही पाहायला मिळाले नाही. हे खाते भारत सरकारचे आहे की तामीळनाडू सरकारचं आहे याबाबत शंका आली..यावर काय करता येईल याचा विचार महाराष्ट्रातील गडप्रेमी, शिवप्रेमी आणि सत्ताधारी राजकारण्यांनी करण्याची गरज आहे.


सहा दिवसाचा दक्षिण भारत अभ्यास दौरा झाला. आता परतीच्या प्रवासाचे वेध लागले होते. रात्री साडेबारा वाजता वेल्लूर कंन्टेटमेंट स्टेशनवरती पोहोचलो आणि आमच्या कराडच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली. गुरुवारी रात्री उशिरा पोहचणार आहे. भेटू लवकरच 

उद्या वाचा ..
दक्षिण भारतात आणि भारतीयांत वेगळे काय दिसलं?

*सतीश वसंतराव मोरे सतिताभ* 
9881191302

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...