फॉलोअर

१६ मे २०२४

कांचीपुरम मी निशब्द...पृथ्वी वरील मंदीराची शंभर नंबरी राजधानी..!



कांचीपुरम मी निशब्द...
पृथ्वी वरील मंदीराची शंभर नंबरी राजधानी..!

महाबलीपुरम येथील दिव्य आणि भव्य मंदिराचे सौंदर्य डोळ्यात साठवून आता आमचा पुढचा प्रवास सुरू झाला. साडेदहाच्या दरम्यान महाबली परम येथील रूम सोडली आणि आम्ही बस स्टॅन्ड वर आलो. येथून कांचीपुरमचे  अंतर केवळ 60 किलोमीटर होतं. हा प्रवास आम्ही तामिळनाडूच्या खाजगी बस म्हणून करायचा ठरवले. बस मध्ये बसलो तर 60 किलोमीटर साठी फक्त 25 रुपये तिकीट होतं. रमत गमात किनारपट्टीवरून निवांत आमचा प्रवास सुरू झाला. या बस मध्ये मोठ्या आवाजात तमिळ गाणी लावली होती. गाण्याचा अर्थ कळत नव्हता मात्र आवाज सुंदर होता संगीत तर अतिशय ठेका लावणारे होते. तो आनंद खरंच वेगळा होता. पूर्ण बसमध्ये  खचाखच गर्दी होती. आम्हाला जागा मिळाली होती. मात्र गाणी ऐकत, शेजारच्या लोकांशी संवाद साधत आमचा प्रवास कधी संपला हेच आम्हाला कळलं नाही. दुपारी दोन वाजता आम्ही कांचीपुरम येथील हॉटेलमध्ये पोहोचलो.आम्ही जेव्हा येथे आलो तेव्हा येथे पाऊस सुरू होता, संपूर्ण पावसाळी वातावरण होते. पाचच्या दरम्यान आम्ही लोकल एक रिक्षा बुक केली आणि कांचीपुरम सिटी पाहायला सुरुवात केली. 


हजारो मंदिरांचे शहर म्हणून ओळखले जाणारे शहर, कांचीपुरम.  हे शहर मंदिर वास्तुकला, 1000-स्तंभांचे हॉल, विशाल मंदिराचे मनोरे आणि रेशमी साड्यांसाठी ओळखले जाते. कांचीपुरम हे भारतातील सर्वात महत्त्वाचे पर्यटन स्थळ म्हणून काम करते. कांचीपुरम हे परदेशी पर्यटकांसाठीही आकर्षणाचे केंद्र आहे. हे शहर कांचीपुरम जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. 

सहाव्या शतकाच्या शेवटी सिंहरिष्यम राजानं कांचीपुरम इथं आपली राजधानी स्थापन केली. या राजाने कृष्णा ते कावेरीपर्यंतचा मुलूख काबीज करून आपल्या राज्याची व्याप्ती वाढवली. पुरु महेंद्रवर्मा हा मोठा प्रसिद्ध मंदिरनिर्माता होता. त्यानी महाबलीपुरम इथं मोठमोठ्या एकसंध पाषाणांतून देव खोदून काढण्याचं काम करून घेतल . त्यानंच 'गविलासप्रहसन नावाचं संस्कृत प्रहसन लिहिलं. संस्कृत भाषेत आज अस्तित्वात असल पहिले प्रहसन !

दुसरा नरसिंहवां यानं कांचीपुरममध्ये कैलासनाथ राजसिंहवर नामक शिवालय बांधलं. नगरेषु कांची' या शब्दात साक्षात् कविकुलगुरू कालिदासानं ज्या कांचीपुरमनगरीचं वर्णन केलं आहे, ते कांचीपुरम अगदी आजही तिथल्या मंदिरांसाठी आणि हातमागावर विफलेल्या झोकदार जरी-पदराच्या कांचीपुरम साड्यांसाठी प्रसिद्ध आहे. अगदी आजही या शहरात अक्षरण पावलागणिक एक मंदिर आहे. आज कांचीपुरम कामाक्षीदेवीच्या मंदिरासाठी ओळखले असले तरी कांचीपुरममध्ये शिवाची  आणि देवीची हजारभर तरी लहान- मोठी मंदिरं असतील. त्यातले सगळ्यात पुरातन मंदिर म्हणाजे 'कैलासनायार कोविल' किंवा कैलासनाथाचं मंदिर.

कांचीपुरम हे शहर पाहताना माझ्या मनात अनेक विषय येत होते. खरंच पृथ्वीवरचा आजपर्यंत मी पाहिलेला मंदीराचा स्वर्ग कुठे असेल तर कांचीपुरम येथे असेल. आयुष्यात पहिल्यांदाच इतकी भव्य आणि दिव्य मंदिरे पाहिली. 100 ते 1000 मंडपाचे खांब असणारे दगडी बांधकाम, अप्रतिम कलाकृती, जिकडे पाहील तिकडे फक्त सौंदर्य.. सौंदर्य आणि कल्पकता. कांचीपुरमचे वर्णन खरंच शब्दात करणे अवघड आहे.  आजपर्यंत मी पंढरपुरात अनेक मंदिरे पाहिली होती मात्र कांचीपुरम येथील भव्य दिव्य मंदिरे पाहिल्यानंतर मंदिरे कशी असावी आणि कुठे असावीत याचे उत्तर फक्त कांचीपुरम एवढंच येतं.

 एक नव्हे दोन नव्हे तर पंधरा गुंठे, वीस गुंठे, 30 गुंठे, दोन एकर तीन एकरात वसलेली ही मंदिरे खरंच उत्तम कलाकारीचा नमुना आहेत. दुरुन मंदिराचे प्रवेशद्वार म्हणजेच आपल्याला ते मंदिर वाटते. दक्षिणेमधील मंदिराची हीच खासियत आहे. मंदिराचे प्रवेशद्वार हे मंदिरासारखे वाटते की जे पन्नास ते सत्तर फुटाचे उंचीचे असते. संपूर्ण दगडी बांधकाम असलेली 700 ते 800 दशकातील ही मंदिरे डोळ्याचे पारणे फेटतात. कांचीपुरम येथील शिवमंदिर पाहिले, कामाक्षी मंदिर पाहिले, बालाजी मंदिर पाहिले आणि चित्रगुप्ता चे मंदिर पाहिले. वेळेअभावी आणखी चार-पाच अशी दहा बारा मंदिरे पाहिली. या मंदिराविषयी काय बोलावे हेच कळत नाही. अतिशय विस्तीर्ण ठिकाणी, पवित्रता राखून ही मंदिरे जपली आहेत. मंदिरात कुठेही अस्वच्छता दिसत नाही, कचरा नाही. देवाचे दर्शन लांबून घ्यायचे, दर्शनासाठी कोणतीही फी नाही, ओळीने दर्शन घ्यायचे,अशी ही मंदिरे तात्कालीन राजाने बांधलेली आहेत. मंदिराचे कळस आणि मंदिराचे भव्य सभा मंडप बघतच राहावे लागतात. 

आपल्या महाराष्ट्रातील मंदिरे प्रवेश केला की  दोन मिनिटात संपतात. मात्र या मंदिरात प्रवेश केल्यापासून दहा फूट, वीस फूट नव्हे शंभर फूट, दोनशे फूट ते तीनशे फुटापर्यंत फक्त सभा मंडपच आहेत. सभा मंडप पार करून पुढे गेल्यानंतर मग मुख्य गाभारा लागतो. कांचीपुरम मध्ये 1000 दगडी खांब असलेले एक कैलासनाथ मंदिर आहे. हे मंदिर पहायला दोन ते तीन तास लागतील. सर्व मंदिराच्या परिसरात पाण्याची उत्तम सोय करण्यात आलेली आहे,मोठे तलाव बांधण्यात आलेले आहेत, ही दुरदृष्टी निर्मात्याने ठेवलेली आहे.. मंदिराच्या आसपास कुठेही तुम्हाला राहण्याची सोय पाहायला मिळणार नाही. पावित्र्य राखण्यासाठी राहण्याची सुविधा मंदिराच्या बाहेरच करण्यात आलेली आहे. मंदिराचे पुजारी स्वयं पुर्ण आहेत.

कांचीपुरम हा पृथ्वीवरील स्वर्ग म्हणावे लागेल. मी स्वतः केवळ दहा बारा मंदिरे पाहिली मात्र कांचीपुरम मध्ये शंभरहून अधिक मंदिरे आहेत आणि ही सर्व मंदिरे 200 ते 700 वर्षांपूर्वीची आहेत. मंदिरे पाहताना मन एकदम शांत होतेच, पोटही भरतं .येथील पावित्र्य आणि समर्पण पाहिल्यानंतर मंदिरे असावीत तर कांचीपुरम सारखीच असावेत असे वाटले. शंकराचार्यांना अतिशय प्रिय असणारे कांचीपुरम पाहायचे असेल तर वेळ काढायला हवा.

एवढ्या मोठ्या प्रमाणात बांधलेली भव्य दिव्य मंदिरे, विराट रुप पाहून खरंच मी हँग झालो. सर्वात आनंदमय मंदिर वाटले ते बालाजी मंदिर. आपण सर्वत्र एक मजली मंदिर पाहिले असेल परंतु कांचीपुरम येथील बालाजी मंदिर तीन मजली आहे. या मंदिरात  चढून जाताना अतिशय सुंदर असे बांधकाम केलेले आहे. पायऱ्यावरून वर चढत जाताना कसलाही त्रास होत नाही. तिसऱ्या मजल्यावर तिरुपतीच्या बालाजी इतकं सुंदर असे येथील बालाजी मंदिराचे दर्शन होते. या मंदिरात गेल्यानंतर दहा फुटी मूर्ती पाहून डोळ्याचे पारणे फिटते. कांचीपुरम येथील प्रत्येक मंदिराचा एक इतिहास आहे. येथील शंकराचे भव्य मंदिर जितके प्रसिद्ध आहे तितकेच कामाक्षी मंदिर प्रसिद्ध आहे. कामाक्षी मंदिर पाहायला तर अर्धा तास लागतो. देशातील चित्रगुप्ताचे एकमेव मंदिर कांचीपुरम येथे आहे. चित्रगुप्त आपल्या पाप पुण्याचा इतिहास लिहितात असे म्हटले जा.ते या मंदिरात जाऊन चित्रगुप्तांना पाहण्याचे परम भाग्य आपल्याच लाभू शकते.

शब्द मर्यादा...

सतीश वसंतराव मोरे सतिताभ 
9881191302

उद्या वेल्लूर शहर आणि मराठ्यांनी जिंकलेला वेल्लोर किल्ला

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...