फॉलोअर

१३ मे २०२४

पान्डेचरी.... 32 वर्षांनंतर



32 वर्षांनंतर पुन्हा एकदा पाॅडेंचरी... पुद्दुचेरी...!


सद्घागुरू गाडगे महाराज कॉलेजच्या सहलीमधून 1992 साली मैसूर बेंगलोर पांडेचेरीला गेलो होतो. त्यावेळेला आमचे हेड होते प्राध्यापक जाधव सर जाधव सर. सरांच्या नेतृत्वाखाली आम्ही या सर्व भागातील बॉटनिकल गार्डन पाहिल्या होत्या. जाधव सरांनी पॉंडिचेरी शहर दाखवताना ज्या पद्धतीने वर्णन केले होते ते वर्णन आजही डोळ्यासमोर आहे. 1992 साली पांडेचेरी ठिकाण पाहताना जे उत्सुकता होती तीच उत्सुकता आजही आहे. आज 32 वर्षानंतर या शहराला देताना त्या सर्व आठवणी पुन्हा जागी झाल्या.


पॉंडिचेरी ला जायचं म्हटल्यानंतर कसं जायचं असा प्रश्न पडला आणि नेटवर सर्च केलं तर कराड वरून थेट पांडेचेरीला रेल्वे आहे, हे कळल्यानंतर खूप आनंद झाला. शनिवारी पहाटे पाच वाजता कराड रेल्वे स्थानकावर पोहोचलो, माझे मित्र किशोर पाटील सर आणि मुले आम्हाला सोडायला आली होती. दुसऱ्या दिवसी सकाळी साडेसात वाजता पांडेचरीमध्ये 26 तासानंतर पोचलो. माझ्यासोबत माझा मित्र अनिल चव्हाण आहे. आम्ही दोघांनी ट्रेनमध्ये नवीन ओळखी केल्या. ट्रेनमध्ये विटा भागातील सोन्या-चांदीचा व्यवसाय करणारे काही लोक भेटले. सकाळी सात वाजता आम्ही पोचल्यानंतर रिमझिम पावसाने आमचे स्वागत केले. शहरातच मध्यभागी हॉटेल निवडले. दहा वाजता शहर फिरायला बाहेर पडलो. संपूर्ण शहराचा सर्व भाग टू व्हीलर वरून पाहिला. शहराचे मुख्य आकर्षण आणि केंद्र असलेल्या योगी अरविंद घोष यांच्या आश्रमाला भेट दिली. आश्रमामध्ये जाऊन समाधीस्थळी अभिवादन केले. आश्रमाचा हा परिसर फ्रेंच कॉलनी म्हणून सुद्धा ओळखला जातो. या परिसरात फ्रेंच लोकांची वस्ती मोठ्या प्रमाणात आहे. फ्रेंच राजदूत या ठिकाणी राहतात. पांडेचरी आणि फ्रेंचचा फार मोठा संबंध आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात फ्रेंच लोकांनी पांडेचरी सह परिसरावर राज्य केले होते. फ्रेंच लोक या ठिकाणी व्यापारासाठी आलेले होते. भारतावर इंग्रजांची सत्ता आल्यानंतर इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामध्ये झालेल्या व्यापार करारानुसार फ्रेंच लोक त्या ठिकाणीच राहिले. भारत स्वतंत्र झाल्यानंतर हा संपूर्ण परिसर भारताच्या ताब्यात आला. मात्र त्या ठिकाणची असणारी सामाजिक परिस्थितीचा विचार करून हा भाग केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर करण्यात आला. आज जेव्हा या भागाला भेट दिली तेव्हा फ्रेंच लोकांनी अतिशय शिस्तबद्धपणे बसवलेली वसाहत पाहून एवढ्या जुन्या काळातील त्यांच्याकडे किती मोठे वास्तू कौशल्य होतं याची जाणीव झाली. या परिसरात पोलिसांचा बंदोबस्त असतो. फ्रेंच राजदूताच्या भव्य बंगल्यासमोर We Support Ukraine  नावाचा एक बोर्ड पाहायला मिळाला. समुद्रकिनारी वसलेल्या पांडेचरी समुद्र काठावर वाॅर मेमोरियल आहे. समुद्रकिनाऱ्या लगत महात्मा गांधी यांचा भव्य पुतळा आहे. पांडेचेरी महापालिकेची अतिशय सुंदर अशी भव्य गार्डनही या ठिकाणी आहे. या सर्व ठिकाणी जाऊन आलो.


 दुपारी आम्ही पाॅन्डेचरी  येथील भव्य बोटॅनिकल गार्डनला भेट द्यायला गेलो. मात्र दुरुस्तीच्या कामासाठी सप्टेंबर अखेर ही गार्डन बंद असल्याचा बोर्ड बाहेर लावला होता. त्यामुळे थोडी निराशा झाली. या बोटॅनिकल गार्डनमध्ये १९९३ साली आम्ही फिरलो होतो, प्लांट कलेक्शन केले होते, तेथील झाडांची माहिती घेतली होती. प्रत्येक झाडालाही एक नाव असते हे नाव या झाडावर लावलेले होते, यांचा अभ्यास केला होता. आम्ही बॉटनीचे विद्यार्थी या गार्डनला भेट देऊन आम्हाला खूप शिकायला मिळाले होते. मात्र आज ही गार्डन बंद असल्यामुळे तसेच बाहेर आलो. गार्डनच्या बाहेर फोटो काढले आणि आरोविल्ली या गावाकडे जायला निघालो. हे ठिकाण फाउंडेशन पासून सोळा किलोमीटर अंतरावर आहे आणि हे गाव तामिळनाडू राज्यामध्ये येते. 

ऑरोविल हे भारतातील एक शहर आहे. ही एक आहे प्रायोगिक वैश्विक नगरी आहे. ही नगरी विल्लुपुरम जिल्हा, तामिळनाडू येथे आहे. भारतातील पाँडिचेरी या केंद्रशासित प्रदेशाच्या जवळ ही नगरी आहे.

ऑरोविलची स्थापना आणि हेतू

श्रीमाताजींच्या ऊर्फ मीरा अल्फान्सा यांच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शनाने ऑरोविल या आंतरराष्ट्रीय नगरीची स्थापना करण्यात आली. दि. ०२८ फेब्रुवारी १९६८ रोजी, तामिळनाडूच्या दक्षिणेस पाँडिचेरीच्या उत्तरेस, युनेस्को समर्थित हा आंतरराष्ट्रीय समुदाय स्थापन करण्यात आला. मानवी एकता साध्य करणे हे या आंतरराष्ट्रीय नगरीचे ध्येय आहे. इ.स.१९६० मध्ये श्रीमाताजीनी ऑरोविल या प्रायोगिक नगरीची संकल्पना भारताच्या सरकारपुढे मांडली आणि त्यांच्या पाठिंब्याने ती युनेस्कोमध्ये मांडण्यात आली. इ.स.१९६८ मध्ये मानवतेच्या भवितव्यासाठी महत्त्वाचा प्रकल्प म्हणून युनेस्कोने त्यास एकमताने मान्यता दिली.

ऑरोविलच्या स्थापना-दिनी श्रीमाताजींनी फ्रेंच भाषेत भाषण दिले होते आणि ते ऑल इंडिया रेडिओ वरून थेट प्रसारित करण्यात आले होते. श्रीमाताजींनी दिलेल्या संदेशात ऑरोविलचा हेतू स्पष्ट केला तो असा - ऑरोविल ही एक अशी वैश्विक नगरी बनू इच्छिते की, जेथे पंथातीत होऊन, सर्व राष्ट्रीयता व सर्व प्रकारच्या राजकारणाच्या अतीत होऊन, सर्व देशांमधील स्त्रीपुरुष, शांती व प्रगतशील सुसंवादाने जीवन व्यतीत करू शकतील. मानवी एकता प्रत्यक्षात उतरविणे हा ऑरोविलचा हेतू आहे.

ऑरोविलच्या केंद्रस्थानी मातृमंदिर आहे. दि.२१ फेब्रुवारी १९७१ रोजी या मातृमंदिराचा शिलान्यास समारंभ संपन्न झाला. श्रीअरविंद आश्रमाच्या श्रीमाताजींनी स्थापन केलेल्या ऑरोविलच्या मध्यभागी, मातृमंदिर आहे. पूर्णयोगाच्या अभ्यासकांसाठी आध्यात्मिक महत्त्व असलेली ही इमारत आहे. याला 'ऑरोविलचा आत्मा' (सोल ऑफ द सिटी ) ( फ्रेंच : L'âme de la ville ) असे म्हणतात.
‘मातृमंदिर’ हे केवळ एखादे प्रेक्षणीय पर्यटनस्थळ नाही. तर ते व्यक्तीला शांतचित्ताने एकाग्रता करता यावी यासाठी निर्माण करण्यात आलेले एक स्थान आहे. व्यक्तीने मनाच्या शांत, समचित्त अवस्थेत तेथे प्रवेश करणे अपेक्षित आहे.

मातृमंदिराच्या पायथ्याच्या सभोवती बारा भुयारी कक्ष आहेत. या प्रत्येक कक्षाची रचना भिन्न आहे. येथे बसून ध्यान करण्याची सोय आहे. या कक्षांना पुढीलप्रमाणे नावे देण्यात आली आहेत. - मन:पूर्वकता, विनम्रता, कृतज्ञता, चिकाटी, अभीप्सा, ग्रहणशीलता, प्रगती, धैर्य, चांगुलपणा, औदार्य, समत्व (समभाव), शांती.मातृमंदिराच्या सभोवती १२ उद्याने आहेत. त्या उद्यानांचा अर्थ - सत्‌, चित्‌, आनंद, प्रकाश, जीवन, शक्ती, ऐश्वर्य, उपयोगिता, प्रगती, तारुण्य, सुसंवाद, परिपूर्णत्व.

गोल डोम आकाराच्या मातृमंदिराला भेट दिल्यानंतर अध्यात्मिक शांतता तर मिळालीच मात्र अतिशय प्रयत्नपूर्वक जपलेला हा परिसर पाहिल्यानंतर भारतातही अशा ठिकाणची मंदिरे उभे राहू शकतात याचा अभिमान वाटला. सायंकाळी उशिरा पान्डेचरीला पोहोचल्यानंतर पुन्हा दोन बीच पाहिले. हे बीच म्हणजे परिसरातील लोकांसाठी पिकनिक पॉईंट आहेत. शहरातील बाजारपेठ भाजी मंडई या ठिकाणी भेटी दिल्या. 

उन्हाचा तडाका खूप होता. दिवसभर शहरातून फिरताना काही गोष्टी लक्षात आल्या त्या म्हणजे येथील लोक फार कष्टाळू आहेत. रविवार हा पांडेचरीच्या बाजारचा दिवस असल्यामुळे भाजी मंडईत गेल्यानंतर विविध तर्हेचे लोक पाहायला मिळाले. आणखीन एक गोष्ट पाहिला मिळाली ती म्हणजे पॉंडेचरी येथील सर्व सिग्नलवर उन्हाचा तडाका बसू नये म्हणून पॉंडिचेरी पीडब्ल्यूडी खात्याने नेट शेड उभे केलेले आहेत. आम्हालाही याचा खूप चांगला फायदा झाला.  ३२ वर्षांनंतर जुळून आलेला हा योग आणि ही सहल नक्की स्मरणात राहील.

सतीश वसंतराव मोरे सतिताभ 
9881191302

अपुर्ण...

उद्या महाबलीपुरम..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...