 |
माझे दादा, माझ्या पाठीशी सतत |
मला घडवणारी शाळा: माझे दादा
आयुष्य खुप सुंदर आहे, आणखी सुंदर बनण्यासाठी गरज आहे सकारात्मक विचारांची, चांगल्या लोकांच्या संगतीची. असं म्हणतात तुम्ही काय खाता , पिता यापेक्षा ते कोणाबरोबर बसून खाता हे अधिक महत्वाच आहे. शाकाहार योग्य की मांसाहार हा वादाचा विषय आहे. पण हा आहार करताना तुमच्या बरोबर कोणत्या विचाराचे लोक आहेत, तो आहार करताना तुम्ही काय चर्चा करता, काय बोलता, त्यावर बरंच काही अवलंबून असते. आपल्या सोबत असणारे लोक आपल्या आयुष्यात खुप काही बरं वाईट घडवून, बिघडवून जातात. आपले आदर्श कोण असावेत याचा जाणीवपुर्वक विचार करत आपण वाटचाल करीत राहीलो तर त्याचा खुप मोठा परिणाम आपल्या जडणघडणीवर होत राहतो. माझ्या आयुष्यात सर्वश्री माझे वडील, सर्वश्री अमिताभ बच्चन, सदगुरू वामनराव पै यांच्या विचाराचा माझ्यावर फार मोठा प्रभाव आहे. कोणतीही अडचण आली तर या तिघा महाविभुतींचा सल्ला, संवाद आणि दिव्य विचार मला फक्त तारतातच नव्हे तर पुन्हा उभारण्या साठी बळ देतात. आजचा ब्लॉग मध्ये माझ्या वडिलांसाठी !
1982 साली 76% मार्क्स मिळून चौथी पास झालो. त्यावेळी हे गुण फार मोठे होते. माझ्या वडिलांनी करवडी जिल्हा परिषद शाळेतून कराडच्या टिळक हायस्कूल मध्ये मला प्रवेश घेतला. त्यावेळी या शाळेत प्रवेश मिळणे अवघड काम होते. माझ्या वडलांचे ओगले काच कारखान्यातील जुने मित्र विठ्ठल पाटील यांच्या शिफारसीने मला प्रवेश मिळाला. मला चांगले आठवतंय मला प्रवेश दिला म्हणून शाळेतील एका क्लर्कना आमच्या गावी जेवायला बोलवले होते, असो. टिळक हायस्कूल मध्ये मला घालण्याचा निर्णय दादांनी खुप विचार करून घेतला होता. त्यावेळी ब्राह्मणाची शाळा, हुशार मुलांची शाळा म्हणून प्रसिद्ध होती. या शाळेत मला चांगल्या विचारांचा, बुद्धिमान मुलाची साथ आणि आदर्श शिक्षकाकडून उच्च शिक्षणाचे डोस मिळातील, असा माझ्या वडिलांना विश्वास होता. ओगले ग्लास कंपनीत फोअरमन म्हणून काम करणाऱ्या मात्र बाबांचे सर्व मित्र ब्राह्मण, गुजर मारवाडी आणि सुशिक्षित लोक होते. त्याच्या संगतीतच ते मोठे झाले. या संगतीमुळेच मी माझ्या वडलांच्या तोंडात कधी शिवी ऐकली नाही. माळ न घालता ते आजन्म शाकाहारी आहेत. शाकाहारी विचाराच्या लोकांची संगत आणि शाकाहार यामुळे आज वयाच्या 83 व्या वर्षी ते ठणठणीत आहेत, आजही कराडात येतात, चालत पेठेत फिरतात.
आपल्या पेक्षा किमान पाच दहा टक्के जास्त गुण असलेल्या मुलाबरोबर मैत्री ठेव, रोज नवीन काहीतरी शिकायला मिळते, शिकत जा, चार ओळी तरी वाचत रहा, लिहित रहा , या त्यांच्या चार सुत्रांनी मला घडवले. टिळक हायस्कूल मध्ये मला मिळालेला प्रवेश, या शाळेत भेटलेले सवंगडी, डाॅ. रा. गो. प्रभुणे, शेडबाळकर, कणबरकर, बल्लाळ, भिंगारदेवे, रोटीथोर, पांढरपट्टे, भिंगारदेवे, पी. एच. शिंदे यांच्या सारखे कडक शिस्तीचे शिक्षक यांच्यामुळे माझ्या आयुष्याला दिशा मिळू शकली. टिळक हायस्कूलमध्ये शिक्षण मिळाले हे माझे खरं तर नशीब आहे आणि हे सगळे शक्य झाले माझ्या वडलांमुळे.

स्वावलंबनाचा मंत्र दादांनी मला लहानपणापासूनच दिला, करवून घेतला. कमवा आणि शिका हा कर्मवीर भाऊराव पाटील यांनी दिलेला नारा दादानी स्वत अंगीकारला होता. अतिशय खडतर परिस्थितीत कष्ट करत त्यांनी मॅट्रिक परिक्षा दिली, पास झाले. खरं तर हे शिक्षण त्याकाळी फार मोठे होते. त्यांच्या बरोबर शिक्षण घेतलेल्या करवडी गावातील सर्वाना शिक्षकाची नोकरी लगेच मिळाली होती. मात्र राजकीय ओळख, शिफारस नसल्याने आणि गावातील प्रमुख भावकीतील काहीनी खोडा घातल्याने त्याना ती नोकरी मिळाली नाही.
ओगले काच कारखान्यात नोकरी मिळाली. तिथेही त्यानी ज्ञानाची भुक भागवण्यासाठी ग्रंथालय चळवळीत सहभागी झाले. तिथे त्यांनी ब्राह्मण आणि मारवाडी समाजाचे मित्र जोडले. यासंगती मुळे त्याचेवर झालेले संस्कार झाले. एकत्र कुटुंब पद्धतीत आम्ही वाढलो. 13 जणांचे आमचे कुटुंब. आमचे दादा थोरले. आम्ही पाच भावंडे, आई, दादा तसेच आज्जी, चुलते, दोन काकू, चुलत भाऊ, बहीण अशा मोठ्या कुटुंबात खुप चांगले संस्कार मिळाले. 1979 साली ओगले काच कारखाना पहिल्यांदा बंद पडला आणि तेथून पुढे आमच्या कुटुंबाची झालेली परवड, आत्महत्या करावी अशी झालेली परिस्थिती आणि या सर्व परिस्थितीत माझ्या दादाचे झालेले हाल मी पाहिले आहेत. काही गोष्टी मला चांगल्याच आठवतात. याच दरम्यान आमच्या एकत्रित कुटुंबातील वाटण्या झाल्या. लग्नाच्या वयाची पदवीधर मोठी मुलगी, नंतर भाऊ आण्णा, तिच्यापाठीवर आणखी एक मुलगी, आणखी एक मुलगी आणि सर्वात लहान मी. असे कुटुंब कसे चालवायचे, कारखाना बंद पडला होता, घरात लग्नाला आलेली मुलगी,सहकार्य करायला कोणीनाही, अशा परिस्थितीत दादांनी धीराने तोंड दिले. 1980 साली ताईचं लग्न झाले. 1982 मध्ये काच कारखाना दुसर्यांदा बंद पडला, त्यानंतर दादानी गावात किराणा दुकान सुरू केले. चौदा पंधरा तास काम करून घर चालवले. पुढे गावातील दुकान आण्णा पाहू लागला.

नंतरच्या काळात करवडी काॅलनी येथे आणखी एक दुकान सुरू केले. उधारी, घरगुती अडचणी यामुळे दुकानात तोटा झाला. दुसरी मुलगी लग्नाला आली होती . स्थळ पहायला सुरू झाली होती. मात्र लग्नाला पैसे कोठून आणायचे? कसे लग्न होणार या विवंचनेत दादांना रात्री झोप लागत नव्हती. पहाटेच्या वेळी उठून बसलेले दादा मी अनेकदा पाहीले आहेत. पाहुण्यातीलच एक स्थळ आले . बिजवर स्थळ शोधले म्हणून घरातले सारे नाराज होते. दादांच्या वर रागावले होते. पण पर्याय नव्हता. 1983 साली दारातच लग्न झाले. या लग्नाला सारे दुकान रिकामे झाले होते. कर्जे वाढली, 1985 साली दुकान बंद पडले. कर्ज खुप झाले होते, कामाच्या शोधात दादा तळेगाव दाभाडे येथे गेले. लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेल्या पैसाफंड काच कारखान्यात स्क्रिन पेंटींग काॅन्ट्रॅक्ट मिळाले. नंतर तिथेच ईगल फ्लास्क कंपनीत पण ठेका मिळाला. या काळात दादा एकटे तिथे रहायचे. स्वत स्वयंपाक करून खायचे. पुढे आण्णाचे लग्न झाले, तो पण सहकुटुंब तिकडे गेला. यावेळी मी आणि आई दोघेच करवडीत रहात होतो. किराणा दुकान बंद पडले असले तरी शासनमान्य केरोसिन दुकान सुरू होते. मी आणि आई हे दुकान चालवायचो. महिन्यातून एकदा राॅकेलचा टॅन्कर यायचा. मी पावती करत होतो, आई कॅन मध्ये तेल भरायची. माझे काॅलेज आणि क्लासेस सुरू होते. दादा तळेगाव वरून पैसे पाठवायचे. यावेळी दादांनी मला लिहीलेली पत्रे आजही मला आठवतात. पुढे तीन नंबरच्या मुलीचे लग्न झाले . 1994 -95 मध्ये कर्ज कमी झाले, गहाण ठेवलेली राने सोडवली. 1996 मध्ये सारे जण आले.
माझे दादा हे माझ्या साठी कायम आदर्श राहिले आहेत. त्यांनी मला केलेले उपदेश,सतत दिलेले प्रोत्साहन खुप प्रेरणादायी होते. मला आठवतंय मी पाचवी सहावीला असेन ,घरासमोर पडद्यावर मराठी सिनेमा आला होता. जानकी सिनेमा होता. दिवसभर स्पिकर लागला होता, जाहिरात सुरू होती. मला पिक्चर पहायला जायचे होते. दिवसभर दादाच्या मागे लागलो होतो. दादानी नकार दिला, पण मी पिच्छा सोडला नाही. शेवटी त्यांनी एका अटीवर मला परवानगी दिली. दिवसभर दुकानात बसायचे, काम करायचे, पुड्या बांधायच्या. मी ही अट मान्य केली. संध्याकाळी मला एक रूपया मिळाला, पहिल्या कमाईचा! सिनेमा पहायला मिळाला. स्वावलंबनाचा तो पहिला धडा होता. सॅल्युट टू दादा! आणखी एक गोष्ट लक्षात आहे माझ्या. 1984 ची घटना असेल. गावातीलच मंगला बनसोडे यांचा गावात तंबूत तमाशा होता. मोठ्ठी क्रेझ होती ती त्यावेळी. मला तमाशा पहायला जायचं होते. मी दादांना विचारले , मी तमाशा सुरू असताना लेमन गोळ्या विकायला घेऊन जातो. त्यांनी होकार दिला. लेमन गोळ्या पुडा घेतला , तमाशा तिकीट काढले ,आत गेलो . डोक्याला रूमाल बांधून 'अरे लेमन गोळ्या ' असे ओरडत गोळयाचा पुडा विकला. मला माझा तो गेट अप अजुनही आठवतोय.
काम करताना लाजू नका, पैसा मिळतोच पण त्याबरोबर अनुभव सुद्धा मिळतो, असे दादांचे सुत्र होते. तु ज्या क्षेत्रात काम करतोस त्या ठिकाणी सर्वोच्च काम करून दाखव, असा सल्ला मला दादाचा नेहमी असायचा,आजही असतो.
मी सहावीची परिक्षा दिली तेव्हाची गोष्ट. आमचे किराणा दुकान सुरू होते. दुकानात काम करत होतोच पण दादा किंवा आण्णा जेवायला जात तेव्हाच. त्यामुळे सुट्टीत काय करणार, असा प्रश्न होता. दादांनी मला ओगलेवाडी येथे कामाला लागले. मेन रोडवर लोकमान्य मेडिकल आणि जनरल स्टोअर्स नावाचे दुकान आहे, त्याचे मालक यशवंतराव उर्फ पाटील हे माझ्या दादाचे मित्र होते. या दुकानात मी कामाला जाऊ लागलो. सकाळी दहा ते सहा या वेळेत मी तिथे काम करायचो. खुप मजा यायची. नवीन शिकायला मिळाले. वस्तुचे दर कळले, ज्ञानात भर पडायची, नवे मित्र, लोक ओळखीचे झाले. शाळा सुरू होईपर्यंत 10 जुन पर्यंत साधारण दिड महिना तिथे काम करत होतो. मालक विश्वास आणि अशोक पाटील यांच्या घरातील लोक मला आपलाच म्हणत. कौतुक करत. शाळा सुरू होताना या दुकानातून सर्व वह्या ,पुस्तके, दप्तर, पेन, पेन्सिल, खोड रबर आणि गाईडस घेऊन जायचे, हाच माझा पगार. सलग दोन वर्षे या दुकानात सुट्टीत मी काम केले आहे. स्वतःच्या कमाईतून घेतलेली पुस्तके, वह्या घेऊन शाळेत जाताना जो आनंद मिळाला तो क्वचितच कुणाला मिळाला असेल! ही कार्यशाळा माझ्या आयुष्यात कायम स्मरणात राहील अशी आहे.o
दादा माझ्या साठी खूप मोठ्ठे आहेत आणि राहतील.
( पुर्वार्ध )