राम कृष्ण हरी,
मोगरा फुलला..!
आनंदी आनंद गडे,
जिकडे तिकडे चोहीकडे.!
किती सांगू मी सांगू कुणाला
आज आनंदीआनंद झाहला.!
हे काहीच नाही, ह्यापेक्षा अजून अनेक अलंकार, विशेषणं, रुपक वापरून काव्यातून आजचा आनंद व्यक्त करता येईल. मात्र तरीही आज मला जो आनंद झाला आहे,आज मी जे अनुभवले आहे ते सांगायला माझ्याकडे शब्द अपुरे पडणार आहेत. आज पंढरीची वारी पूर्ण झाली. गेली सोळा दिवस आळंदी ते पंढरपुर पायी चालत असताना विठ्ठलाचा शोध घेता घेता विठ्ठलमय होऊन गेल्यावर मला आलेले अनुभव सांगावे तेवढे कमीच आहेत. गेले तीन वर्षे वारी केली मात्र वारीनंतर पंढरपूर विठुरायाचे दर्शन झाले नाही, केवळ कळसाचे दर्शन घेऊन मला बारशीच्या दिवशी घरी येत होते. पण यावर्षी आज सर्व काही शक्य झालं. विठ्ठलाच्या पूजेचा मान ज्यांच्याकडे होता ते विठ्ठल-रुक्मिणी देवस्थान समितीचे अध्यक्ष अतुल भोसले यांच्याबरोबर मला थेट मंदिरात जाता आले. विठ्ठल पूजा पाहता आली, विठ्ठलाला डोळे भरून पाहता आले. हा आनंद कसा वर्णावा हेच मला कळत नाही.

आज दिवस उजाडला पंढरपुरातील वारकऱ्यांच्या जयघोषाने. विठ्ठल रुक्मिणी देवस्थान कमिटीने भव्य भक्तनिवास उभे केले आहे या भक्तनिवासाशेजारीच वेदान्त भक्त निवास मध्ये आमची राहण्याची सोय होती. दहा वाजता तयार झालो, नाश्ता केला, पंढरपुरात काही रस्त्यावर फेरफटका मारला. पुन्हा रूमवर आलो. दुपारी जेवायला एका ठिकाणी बसलो तेव्हा अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या अध्यक्ष ना.नरेंद्र पाटील यांची भेट झाली. नरेंद्र पाटील यांनी आपले अनुभव कथन करताना आषाढी एकादशी दिवशी पहिल्यांदाच पंढरीत आलो आहे असे सांगितले. या अगोदर अनेकदा पंढरीला आलो आहे. मात्र या दरम्यान आलेला अनुभव एक वेगळाच आहे. पंढरपूर खूप बदलत आहे पूर्वीचे पंढरपूर आत्ताचे पंढरपूर याचा विचार केला असता स्वच्छ पंढरपुरचे स्वप्न आता साकार होऊ लागले आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी माझ्याशी बोलताना व्यक्त केली. या दरम्यान लेकीचा देवयानीचा फोन आला. त्यांच्या शाळेमध्ये आज पंढरीची वारी निघाली होती डोक्यावर पाण्याचा हंडा घेऊन देवयानी वारकरी बनवून त्या दिंडीमध्ये सहभागी झाली होती. तीने पाठवलेला फोटो पाहून खूप आनंदलो.

पुन्हा एकदा विश्रांती घेऊन घेण्यासाठी वेदांत निवास मध्ये गेलो दरम्यान देवस्थान समितीचे अध्यक्ष डॉक्टर अतुल भोसले यांच्याशी फोनवर बोलून सायंकाळी किती वाजता मंदिरात जायचे याबाबत निश्चित केले.अतुल भोसले यांच्या हस्ते देवस्थान समितीच्या वतीने मानाची पुजा बारा वाजता होणार होती. त्यामुळे अकरा वाजता नवीन भक्त निवास मध्ये भेटण्याचे ठरले. त्यानंतर आराम केला पाच वाजता पंढरपूरचे दर्शन घेण्यासाठी आम्ही सर्वजण बाहेर पडलो. चौफाळा चौकात आलो. अनेक वारकरी येत होते.चौफाळा येथे श्रीकृष्ण मंदिरात दर्शन घेऊन वारकरी पुढे विठ्ठल मंदिराकडे जात होते, दर्शन लाईन फार दूर पर्यंत गेली होती. त्यामुळे अनेक जण मुखदर्शन तिकडे जात होते. मुखदर्शनाची लाइन सुद्धा गोपाळपुरापर्यंत गेलेली होती. अनेक वारकऱ्यांनी कळसाचे दर्शन घेतले त्या अगोदर नामदेव पायरी पाशी जाऊन नमस्कार केला, कोणी फुगड्या खेळल्या ,वैष्णव नाचू लागले. अनेकांनी चंद्रभागा तीरावर जाऊन पुंडलिकाचे दर्शन घेतले. चंद्रभागेमध्ये स्नान केले ,काहींनी फक्त हात पाय धुतले. चंद्रभागेच्या पलीकडे मोठी जत्रा भरली होती त्या जत्रेत जाण्यासाठी नावेची सोय करण्यात आली होती. काही भाविक नावेतून पलीकडे जात होते.

चंद्रभागा तीरावर विश्वशांती केंद्र आळंदी आणि एमआयटी पुणे यांच्यावतीने नमामी चंद्रभागा आरतीचा उपक्रम सुरू होता.चंद्रभागा नदी स्वच्छ आहे.आणखी स्वच्छ व्हावी गंगानदीच्या धर्तीवर चंद्रभागेचे सुद्धा स्वच्छता व्हावी,चंद्रभागेत गेल्यानंतर तिचे पाणी पिण्याची इच्छा व्हावी, इतपत स्वच्छ व्हावी, याची सुरुवात आपल्यापासून करावी. नद्या स्वच्छ ठेवाव्यात नद्या ह्या उद्याचे भविष्य आहे असा संदेश देत प्राध्यापक विश्वनाथ कराड यांनी हा उपक्रम हाती घेतला होता .डॉ. विश्वनाथ कराड यांच्याशी संवाद साधला, त्यांची मुलाखत घेतली. विश्वनाथ कराड यांनी मीडियाच्या माध्यमातून नमामी चंद्रभागा हा संदेश सर्वत्र जाऊ शकतो अशी इच्छा व्यक्त करून मीडियामुळे देश बदलत आहे मीडियाने जनजागृतीसाठी पुढाकार घ्यावा अशी इच्छा व्यक्त केली .त्यानंतर माझ्यासहित रणजीत पाटील यांचा डॉ.कराड यांनी सत्कार केला. तेव्हा रात्रीचे आठ वाजले होते पुन्हा विठ्ठल मंदिर चौकात आलो कळसाचे दर्शन घेतले पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आलो.आता भूक लागली होती खानावळीमध्ये जायचा निर्णय घेतला. यात्रेमुळे खानावळी मध्ये खूप गर्दी होती .जेवण झाल्यानंतर पुन्हा वेदांत भक्ती निवास मध्ये आलो. अतुल बाबांचे सहाय्यक प्रदीप आणि धनाजी पाटील पुणेकर यांचा मेसेज आला बाबांनी अकरा वाजेपर्यंत बोलवले आहे. फ्रेश होऊन पुन्हा भक्त निवास मध्ये गेलो भक्तनिवास हा पंढरपुरातील सर्वात मोठा पायलट प्रोजेक्ट आहे. येथे बाराशे वारकऱ्यांना राहण्याची सोय करण्यात आली आहे .हे भक्त निवास इतर भक्त निवास प्रमाणे वाटत नाही तर एक पंचतारांकित हॉटेल वाटते. या ठिकाणी साडेसहा वाजता आम्ही फोटोसेशन केले.माझ्या सहकाऱ्यांना पंढरीची वारी काय अनुभव आला यांच्या मुलाखतीही घेतल्या .

रात्री सव्वाअकरा वाजता भक्त निवास मध्ये डॉक्टर अतुल भोसले यांची मुलाखत घेण्यासाठी गेलो आम्हाला एखाद्या पंचतारांकित हॉटेलमध्ये बसले असा भास होत होता पण हे हॉटेल नसून महाराष्ट्र शासनाच्या मालकीचे पंढरपूर देवस्थान समितीच्या मालकीचे भक्त निवास होते. कॉन्फरन्स हॉलमध्ये बसून अतुल बाबांचे मुलाखत घेतली. यावेळी शिर्डी देवस्थान समितीचे अध्यक्ष हे सहकुटुंब त्या ठिकाणी आले होते बाबांच्या सोबत गप्पा मारताना स्वच्छ पंढरपूर हे स्वप्न सत्यात उतरले आहे याचा आनंद वाटला. कराडकर माणूस कोणत्याही ठिकाणी गेला तर वेगळेपण करून दाखवतो ,कराडचे नाव उंच होतो हे पाहून खूप आनंद झाला. वारी करत असताना प्रत्येक वेळी पंढरपुरात येतो, अधुनमधुन सुद्धा येत असतो. प्रत्येक वर्षी पंढरपूर अधिकाधिक स्वच्छ होत गेले होते,पंढरपूरमध्ये बदल होत गेले होते हे बदल स्वतः डोळ्यांनी पाहिलेले असल्यामुळे कराडच्या माणूस मंदिर समितीचा अध्यक्ष असल्याचा खूप अभिमान वाटला. आता पावणेबारा वाजले होते अतुल भोसले यांच्या हस्ते साडेबारा वाजता देवस्थान समितीच्या वतीने विठ्ठल-रुक्मिणी पुजा होणार होती, तिकडे आम्ही निघालो. अतुलबाबांनी स्वतः विचारपूस करून तुम्ही कोणत्या गाडीत बसत आहे, याची काळजी घेतली. त्यांचा समवेतच कँन्ववाँय मधून विठ्ठल रुक्मिणी मंदिराकडे निघालो. मंदिराकडे जाणारे रस्ते गर्दीने फुलले होते, या रस्त्यावर उभे राहायलाही जागा नव्हती.मात्र पोलिस बंदोबस्तात आमची वाहने हळू पुढे जात होती एक वेगळा अनुभव होता. पंढरी मध्ये एवढ्या मान-सन्मानात विठ्ठल रुक्मिणी मंदिराकडे जाण्याची संधी मला मिळाली होती. हा सर्व सन्मान दैनिक पुढारीचा होता, माझ्यातील वारकर्याचा होता. गेली चार वर्षे वारी करत असल्यामुळे वारकऱ्यांसाठी विठ्ठलाने पायघड्या टाकूनच माझ्यावर कृपा केली होती.

विठ्ठल मंदिराच्या डाव्या बाजूला असलेल्या प्रवेशदारात सर्व आम्ही उतरलो. खूप गर्दी असल्यामुळे ढकलाढकली झाली. त्यातूनही मार्ग काढत डॉ. अतुल भोसले, गौरवीताई भोसले तसेच ना. शेखर चरेगावकर आत मध्ये गेले. प्रमुख लोकांच्या तसेच पासधारकासोबत गर्दीमध्ये बाहेरील काही लोकांनी घुसण्याचा प्रयत्न केला.त्यामुळे पोलिसांना कोण पासधारक आहे हे कळलं नाही,थोडी ढकलाढकली झाली मला पोलिसांनी बाजूला सारले, मी ओळखपत्र दाखवले मात्र थोडा वेळ थांबा पाच मिनिटात परिस्थिती आटोक्याखाली येईल मग तुम्हाला आज पाठवतो असे सांगून त्यांनी मला बाजूला उभे केले. या दरम्यान एका पक्षाच्या पदाधिकाऱ्यांने घातलेला गोंधळ पाहिला मी शांत बसून हे सर्व पाहत होतो. विठ्ठलाच्या दर्शनाची आस लागली होती आता प्रवेश मिळायला काही अडचण नव्हती,थोडावेळ संयमाने एका बाजूला उभा राहिलो.अचानक सोलापूर पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची आठवण झाली. मनोज पाटील यांना फोन लावला आणि तो फोन एका पोलिसांना जोडून दिला.त्यानंतर मंदिराच्या आतमध्ये मला आत सोडण्यासाठी एक पोलीस आले. पोलिसांनी मला बाजूला सारले होते मात्र त्याच पोलिसांनी सन्मानाने मला परत आत मंदिरामध्ये आणून सोडले. खरे तर पोलिसांच्या या कृत्याचा मला जराही राग आलेला नव्हता, राग येण्याचे कारणच नव्हते, त्यांनी त्यांचे कर्तव्य केले होते.गेली सोळा दिवस पंढरीच्या वारीमध्ये तडजोड करण्याची सवय झाली आहे. त्यामुळे परिस्थितीला सामोरे जाणे आहे ती परिस्थिती स्वीकारणे, संयम ठेवणे हे चांगलेच उमगले होते. मागच्या तीन वाऱ्यात सुद्धा मला हाच अनुभव आला होता.
विठ्ठल-रुक्मिणीच्या मंदिराच्या आत डाव्या साईडला देवस्थान कमिटीचे ऑफिस आहे, तेथे अतुल भोसले यांचे सर्व सदस्य तसेच अनेक मान्यवर बसले होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्यासमवेत शासकीय पूजा मान मिळालेल्या जोडपे तिथे उभे होते. त्यांची मुलाखत घेतली. दर्शन बारीमध्ये उभे राहिलेल्या एका दांपत्यास हा मान मिळतो,या दाम्पत्याचा सपत्नीक सत्कार करण्यात येतो तसेच त्यांना वर्षभर मोफत एसटी प्रवास पास दिला जातो.यावर्षी हा मान श्री विठ्ठल मारुती चव्हाण (वय 61)आणि सौ प्रयाग विठ्ठल चव्हाण ( वय 55) मु पो. सांगवी सुनेवाडी तांडा, ता. अहमदपूर जि. लातूर यांना मिळाला.विठ्ठलराव सांगवी सुनेवाडी तांडाचे 10 वर्षे सरपंच व सध्या गावचे तंटामुक्तीचे अध्यक्ष असून
1980 पासून सलग वारी करत आहेत. साडेबाराच्या सुमारास सोवळे नेसून ना.अतुल भोसले सपत्नीक आले, त्यांच्या पाठोपाठ आम्ही सर्वजण विठ्ठल मुर्ती कक्षात गेलो. तिथेही पुन्हा खूप गर्दी होती.गाभारा खुप छोटा आणि त्याबाहेर जागा छोटी आहे. देवस्थानच्या वतीने होणारी शासकीय पूजा अतुल भोसले आणि गौरवी भोसले यांच्या हस्ते सुरू झाली. यादरम्यान विठ्ठलाच्या मूर्ती पासून केवळ दहा पंधरा फुटाच्या अंतरावर ही महापुजा सलग अर्धा तास पाहण्याचा स्वर्गीय योग मला मिळाला.
सोळा दिवस पंढरीच्या वारीत आम्ही चालत होतो, वारकऱ्यांच्या सोबत आम्हाला आनंद मिळत होता.थोडा थकवा आला होता, पावसात भिजल्यामुळे थोडं आजारीपण पडलो होतो. मात्र हा सर्व थकवा विठ्ठलाची सावळी सुंदर मुर्ती पाहून दूर झाला होता. या मुर्तीमधून बाहेर पडणारे तेज माझ्या डोळ्याला पेलवत नव्हते.डोळे मिटून विठ्ठलाचे दर्शन घेतले. विठ्ठल डोळे भरून पाहिल्यानंतर काय मागावे हेच कळत नव्हते. खूप वेळ देवाकडे पाहत होतो.मनात काहीतरी मागावी असे इच्छा होती, मात्र काय मागावे हेच कळत नव्हते.विठ्ठलाचे दर्शन घेऊन मला मिळालेला आनंद या जगातील इतर सर्व वस्तु अथवा व्यक्तीरुपाने मिळणाऱ्या आनंदापेक्षा फार मोठा होता. याची अनुभूती मला आली होती. काय बोलावे काय करावे हेच सुचत नव्हते. विठ्ठलाचे दर्शन घेऊन माझे डोळे तृप्त झाले होते. शेवटी आरती सुरू झाले घंटी वाजायला लागली तेव्हा थोडा भानावर आलो आणि विठ्ठलाकडे साकडे घातले. सर्वांचे कल्याण व्हावे अशी इच्छा केली,सर्व सुखी व्हावेत, सर्वांना त्यांच्या मनाप्रमाणे सर्व सुंदर मिळावे,अशी इच्छा व्यक्त करून खाली बसलो. डोळे भरून पुन्ह पुन्ह विठ्ठलाला पाहिले.
आजचा आनंद कसा सांगावा हेच मला कळेनासे झाले आहे. किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला अशी माझी परिस्थिती झाली होती. गेल्या अनेक महिन्यापासून माझ्या मोबाईलची डायलटोन मोगरा फुलला हे भक्तीगीत आहे. मोगरा फुलला हा संत ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग लतादीदीनीं गोड आवाजातून आणखी गोड केला आहे. हा अभंग कानावर पडल्यानंतर मनात आनंदाचा, प्रेमाचा, भक्तीचा ,वात्सल्याचा मोगरा फुलतो आणि ही रिंगटोन ऐकलं तर अनेकजण सुखावतात, मला बोलून दाखवतात.आज तोच मोगरा माझ्या रोमारोमात फुलला होता. शासकीय पुजा संपल्यानंतर विठ्ठल पददर्शन घेतले.त्यानंतर रुक्मिणीच्या दर्शनासाठी गेलो.तेथे अतुल भोसले सपत्नीक उभे होते त्यांच्यासोबत फोटोसेशन केले,तीन वर्षे वारी केली मात्र विठ्ठलाचे दर्शन घेता आले नाही,तुमच्या सहकार्यामुळेच आज शक्य झाले, याबाबत अतुलबाबांकडे कृतज्ञता व्यक्त केली.पुन्हा सभामंडपात आलो. संजय पवार आप्पासोबत आनंद शेअर केला.याठिकाणी मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम चार वाजता होणार होता,त्याची वाट पाहत बसलो.
चारच्या सुमारास मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची शासकीय पूजा पार पडली आणि मुख्यमंत्री मंडपात कार्यक्रम ठिकाणी आले. त्यांच्यासोबत पालकमंत्री सुभाष देशमुख, विजय शिवतारे ,दीपक केसरकर सुरेश खाडे, रणजीत निंबाळकर, बबनराव लोणीकर तसेच ना.अतुल भोसले उपस्थित होते.मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पालखी सोहळ्यातील प्रमुख तीन दिंड्यांचा सर्वोत्कृष्ट दिंडी म्हणून पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. मारुतीबुवा कराडकर दिंडी क्रमांक 12 ला एक लाख रुपये प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. या कार्यक्रमात विविध पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. तसेच मान्यवरांचा सत्कार करण्यात आला स्वतंत्र बातमी देणार आहे, त्यामुळे रिपीटेशन करत नाही. पावणेपाच वाजता कार्यक्रम संपला.मंदिराच्या बाहेर पडण्यापूर्वी गेटवरच पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची भेट झाली. त्यांनी चहा पाण्यासाठी साडेआठ वाजता येण्याचे निमंत्रण दिले. पाच वाजता वेदांत भक्त निवासाकडे निघालो. एकंदरीत आजचा दिवस आणि संपूर्ण वारी आनंदात गेली. गेल्या चार वर्षात वारी करताना जो लाभ झाला नाही तो विठ्ठल दर्शनाचा लाभ झाला.
सगळी माऊली कृपा! आई-वडिलांचे आशिर्वाद! तुमच्यासारख्या हितचिंतकांचे प्रेम आणि माझ्या कुटुंबाची साथ, दुसरं काय !
माऊली राम कृष्ण हरी ! असेच प्रेम राहू द्या !
😌जय माऊली😌
माऊली सतीश मोरे
Also available at
karawadikarad.blogspot.com
🚩🚩🚩माझी वारी 🚩🚩🚩