*माझी व्हर्चुअल वारी*
*सतीश मोरे*
कराड करवडी कराड,कराड ते मसूर
दि.13आणि 14 जुन 2020
राम कृष्ण हरी
*माऊली यंदा पंढरीची वारी नाही, यंदा वारकऱ्यांचे दर्शन नाही, यंदा वारीचा आनंद नाही, यंदा वारीला जायला मिळणार नाही, यंदा पालखी निघणार नाही, यंदा राज्यभरातून कोठूनही वारकरी आळंदीवरून पंढरपूरला जाणार नाहीत. मात्र मनाने वारकरी वारीला जाणार आहेत. आज वारी असती तर काय झालं असतं? आज मी कुठे पोहचलो असतो, आज पालखी कुठल्या गावात मुक्कामाला गेलेल्या असत्या, आज कुठल्या गावात पंगत झाली असती, याची चर्चा गावागावातील वारकरी आता घरात बसून पुढचे काही दिवस करणार आहेत. यंदा वारी नाही म्हणून गप्प न बसता आपण काय करू शकतो असा प्रश्न माझ्या मनात आला आणि मी स्वतः ठरवले आपण वारीला जायचं. आपल्या सोबत वारकरी नसतील, काही हरकत नाही. पण आपण वारीला जायचं सकाळी उठून पंढरपूरच्या दिशेला तोंड करून विठ्ठलाला नमस्कार करायचा आणि वारीला जायला बाहेर पडायचं. आपल्या मनामध्ये माउलीला मन भरून साठवून ठेवायचं आणि चालत राहायचं. माऊलीचा जयघोष करायचा रोज किमान 14 किलोमीटर कराड परिसरात चालायचं आणि 18 दिवसात 240 किमी वारीचा हा टप्पा पूर्ण करायचा,असा मी मनोमन निश्चय केला आणि माझ्या निश्चयाला माझ्या जवळच्या मित्रांनी आणि कुटुंबानेही पाठिंबा दिला*.
काल १३ जुन शनिवारी ज्ञानेश्वर माऊलीं पालखी सोहळा सुरू झाला. संध्याकाळी पाच वाजता आळंदी मध्ये ज्ञानोबा माऊली तुकाराम, राम कृष्ण हरी, विठोबा रुक्माई या हरिनामाचा जयघोष झाला. केवळ 50 वारकऱ्यांच्या उपस्थित ही वारी सुरू झाली. हा सोहळा सुरू झाला. सोहळ्याचे मालक यांनी माऊलींच्या पादुका हातात घेतल्या, चोपदारांनी आवाज दिला. माऊलींच्या मंदिराला प्रदक्षिणा घातली त्यानंतर नगर प्रदक्षिणा करून माऊलींच्या पादुका त्यांच्या आजोळी वाड्यात मुक्कामाला आल्या. हा सर्व सोहळा पुढारी फेसबुक लाईव्ह मी पाहिला.
प्रत्येक वर्षी आळंदीमध्ये हा सोहळा पाहताना सुमारे तीन चार तास वारकरी बेफान होऊन नाचलेले मी पाहिले आहेत. तो आनंद या वर्षी पाहायला मिळाला नसला तरी मनात ही चित्रे डोळ्यासमोर उभी राहिली होती. माऊलींच्या मंदिरात खचाखच गर्दी झाली होती, प्रमुख दिंडी मालक, टाळकरी, विणेकरी, झेंडेकरी माळकरी, झेंडेकरी तसेच मृदंग वादक आणि डोक्यावर तुळशीवृंदावन घेतलेल्या महिला वारकरी ज्ञानोबा माऊलीच्या गजरात नाचत होत्या. हे चित्र डोळ्यासमोर उभे राहिले, खरंच मी तो आनंद कराडात घरात बसून सुटला आणि मग ठरलं चला आपण आता जाऊ या वारीला! खरंतर प्रत्येक वर्षी आळंदीच्या मंदीरातील हा सोहळा संपल्यानंतर माझ्या सोबत असणारे रणजीत नाना पाटील किंवा वेळोवेळी पुण्यापर्यंत पालखी सोबत चालायला आलेले माझे पुढारी चे सहकारी, प्रमोद पाटील आम्ही सारेजण माऊलीच्या पादुका आजोळ घरी विसावल्या नंतर आम्ही पुण्याला जायला निघतो. पुणे टू आळंदी हे अंतर 28 किलोमीटर आहे. पालखी कसबा पेठ पर्यंत पोहोचेपर्यंत हे अंतर तीस बत्तीस किलोमीटर पर्यंत पोहोचते. पहिल्याच दिवशी हे अंतर कापायचे असल्यामुळे खूप त्रास होतो म्हणून आम्ही दुसऱ्या दिवशी पालखीसोबत न चालता सात आठ वाजताच पुण्याला जायला निघतो.आजही जर मी आळंदीत असतो तर चालायला सुरुवात केली असती. खरं तर मी मोबाईलवर माऊलीचा सोहळा पाहत होतो. हा सोहळा पाहिल्यानंतर मनाची तयारी केली आणि कराडला आळंदी समजले आम्ही पुण्याला जायला निघालो.

माझ्या आईवडिलांचे दर्शन घेऊन वारीचा आजचा पहिला दिवस सुरु करावा असा निश्चय करत मी घराबाहेर पडलो. सायंकाळी सात वाजून वीस मिनिटांनी वारीची सर्व तयारी करत कुटुंबातील सर्वांनी एकमेकाचे दर्शन घेऊन सोमवार पेठतून निघालो आणि थेट एकटाच करवडीच्या दिशेने चालायला सुरुवात केली. कानात हेडफोन लावले होते. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी हा संत अभंग लतादीदींच्या स्वरात ऐकण्यात जी मजा आहे तो स्वर्गीय आनंद जगात कुठेच नाही. लतादीदी यांनी गायलेला भेटी लागे जीवा हा तुकाराम महाराजांचा अभंग मला फार आवडतो. तो ऐकत तसेच भक्तीगीते ऐकत राम कृष्ण हरी नामाचा जयघोष करत आठच्या ओगलेवाडी रेल्वे पुलावर पोचलो.
दिपक मेडिकल चे धनंजय राजमाने माझे मित्र आहेत त्यांना फोन करून दुकानासमोर पाणी घेउन यायला सांगितले. दरम्यान पेठेत आल्यानंतर सदा माऊली फोटोग्राफर यांना फोन करून घराच्या बाहेर बोलावले, त्यांचे दर्शन घेतले. त्यांना माझी वारी ची कल्पना खुप आवडली. पाणी पिऊन पुन्हा करवडीच्या दिशेने निघालो. नऊच्या सुमारास गावी पोहचलो, स्टॅंडवर बाळू तात्या आणि हनुमंत कुंभार यांची भेट झाली. घरात आई-वडील, वहिनी आणि अण्णा यांचे दर्शन घेऊन जेवण केले आणि पुन्हा 09:25 च्या सुमारास कराडला यायला निघालो.
खूप वेगळा आनंद झाला होता.दरम्यान करवडी ओगलेवाडी दरम्यान काही ठिकाणी अंधारअसल्यामुळे सागरला गाडी घेऊन मदनेवस्ती परत यायला सांगितले. राम कृष्ण हरी जयघोष करत चालत होतो. पुढे पंडित भीमसेन जोशी यांची अभंगवाणी ऐकत एकटा रस्ताने कराडच्या दिशेने निघालो होतो. ज्याचा सखा हरी अवघे विश्व त्यावरी कृपा करी, हा संत जनाबाई यांचा अभंग पंडित भीमसेन जोशी यांच्या आवाजात ऐकताना खूप गहिवरून आले. माझ्या सोबतही माझा हरी आहे, मला रस्त्याला काही अडचण येणार नाही, कुणी रस्त्यात माझ्या आडवे येणार नाही मी रात्रीच्या अंधारातही सुखरूप घरी पोहोचणार याची मनोमन खात्री पटली. रस्त्यावर अनेक कुत्री होती मात्र एकही कुत्रं माझ्या मागे लागलं नाही. ज्याचा सखा हरी हा अभंग काल रात्री मी प्रत्यक्ष अनुभवला.
10.40 च्या सुमारास कृष्णा नाक्यावर पोहोचलो. धर्मवीर संभाजी चौकात कृष्णा सर्कलवर रणजीत पाटील आणि बापू डुबल पाणी बाटली घेऊन आले होते. त्यांच्यासोबत गप्पा मारल्या. सुमारे साडेचार तासात करवडी कराड ते करवडी ते असे पंधरा किलोमीटर अंतर माऊलींच्या कृपेमुळे पूर्ण झाले होते.
दरम्यान नामदार बाळासाहेब पाटील यांची गाडी आम्हाला क्रोस करून गेली. त्यामुळे त्यांना मी स्वतः फोन लावला आणि माझ्यावर वारी विषयी थोडीशी माहिती दिली. नामदार बाळासाहेब पाटील यांचे चिरंजीव जशराज पाटील हे सुद्धा प्रत्येक वर्षी वारीला जातात, पायी वारी करतात. गत वर्षी त्यांची फलटण नजीक माझी भेट झाली होती. जशराज पाटील यांची मुलाखत घेतली होती. जशराज पाटील यांनाही फोन करून या आठवणींना उजाळा दिला. रात्री अकराच्या सुमारास माझ्या शेजारी विराग जांभळे यांच्यासोबत गप्पा मारत सोमवार पेठेत पोचलो.पाय खूप दुखत होते, सर्वांनी माझे स्वागत केले. बाराच्या दरम्यान झोपी गेलो झोपताना उद्या सकाळी पाच वाजता उठायचे आहे असा संकल्प करून अंतर्मनाला तशा सूचना दिल्या.
*१४ जुन २०२०*
सकाळी पाच वाजता जाग आली, खरंतर उठायची अजिबात इच्छा होत नव्हती. काही क्षण राहुदे जायचं आज, असं वाटलं. आळंदी ते पुणे या दरम्यान कंटाळा आल्यानंतर आम्ही एखाद्या ठिकाणी रस्त्याकडेला, फुटपाथ वर कुठेतरी झोपत असतो. आज तिथे असतो तर आपल्याला उठावे लागले असते आणि आपण उठलोच असतो आणि पुण्याला सकाळ पर्यंत पोहोचलो असतो, असे मनात आले. त्यामुळे झोपेचा पराभव करून जागो झालो. फ्रेश होऊन तयार झालो. हॉटेल साईराजचे सुर्वे आप्पा आणि अशोक मोहने यांचे फोन झाले. आता आज मसूरला वारीला जायचं होतं. सव्वा पाच वाजता सुर्वे आप्पांचा फोन आला, पाऊस पडतोय काय करायचं. मात्र पाऊस आपल्याला काय करतोय, आपण वारकरी आहोत अशी त्यांना सांगितले, त्यांना घरापर्यंत द्यायला सांगितले.
साडेपाच वाजता आप्पा आणि मी चालायला सुरुवात केली.
कानात अभंगवाणी सुरुवात होती.भर पावसात आम्ही चालत राहिलो, पाऊस आम्हाला काहीच करू शकत नव्हता. सोबत छत्री घेतली होती, मात्र तरीही पाऊस लागत होता. आम्ही चालत कृष्णा पुलावर आलो.आता उजाडलं होतं. रस्त्यावर चालणारांची संख्या खूप होती, व्यायाम करणारे सुद्धा काही लोक दिसले. पुढे आलो आमच्या सद्गुरु गाडगे महाराज कॉलेज समोर अतिशय सुंदर असा नजराणा होता. माझं कॉलेज अधिकच सुंदर दिसत होतं. वरून पाऊस पडत होता. कॉलेजसमोर फोटो काढला.
बनवडी फाट्यावर अशोक मोहने आमची वाट बघत होते. त्यांना घेऊन पुढे मार्गक्रमण केले, कोपर्डे हवेलीमध्ये सातच्या दरम्यान आम्ही पोचलो होतो. पाऊस थांबला असल्यामुळे सोबत आणलेला रेनकोट आणि छत्र्या एका माऊलींच्या घरात ठेवल्या. सिद्धनाथ मंदिराचे दारात जाऊन दर्शन घेतले आणि पुढे चालत राहिलो. कोपर्डे गावातील अनेक लोक भेटले. रेल्वे लाईन च्या अलीकडे रस्त्याच्या डाव्या बाजूला निकम यांची एक फार जुनी विहीर आहे. ही विहीर अतिशय देखणी आहे. सुमारे साठ वर्षांपूर्वी बांधलेली ही विहीर पाहून तिथे जाण्याचा मोह आम्ही रोखू शकलो नाही. विहिरीचे पाणी वापरले जात नव्हते, उपसा बंद होता मात्र या विहिरीने एकेकाळी पंधरा एकर जमीन भिजवली होती, असे निकम यांनी मला सांगितले. त्यांचा निरोप घेऊन पुढे आलो.
शिरवडे रेल्वे फाटकाजवळ पोचलो. मालगाडी येणार असल्यामुळे फाटक बंद होते. माणूस कितीही मोठा झाला तरी रेल्वे गाडी पाहिल्या नंतर जो आनंद त्याला मिळतो तो वेगळाच असतो. अगदी लहानपणापासून मी तो आनंद घेत आहे. करवंडी वरून कराडला शाळेत येताना आमचे साडेदहाची करवडी कराड एसटी बस पार्ले मार्गे जायची. ही बस विरवडे रेल्वे फाटकाजवळ आली की हमखास पावणे अकराच्या सुमारास कोयना एक्स्प्रेस आणि महाराष्ट्र एक्सप्रेस या गाड्यांचे क्रॉसिंग व्हायचे आणि ते गेट अनेकदा बंद असायचे. एसटी रेल्वे गेट समोर थांबली की आम्हाला झुक झुक गाडी पाहण्याचा खूप आनंद होत असे. रेल्वे निघून झाल्यानंतर ते गेट उघडण्यासाठी रेल्वेचे कर्मचारी गोल हात फिरवून ते गेट कसे उघडायचे हे आम्ही पाहत होतो. आज मला त्या क्षणाची पुन्हा आठवण झाली. आता शिरवडे रेल्वे गेट वर मालगाडी पाहून खूप आनंद झाला.
पुढे निघालो साडेआठच्या सुमारास सह्याद्री कारखाना वर पोहचलो. कारखान्याच्या शेजारी डोंगराच्या पायथ्याशी असणाऱ्या आदरणीय स्वर्गीय पी.डी. पाटील साहेब यांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले आणि पुढे चालू लागलो. सुर्वे यांच्या ओळखीचे गजरे नावाचे एक वकील कारखान्याच्या पेट्रोल पंपाचे राहतात, त्यांच्या घरी चहासाठी थांबलो. त्यांनी स्वतःच चहा करून दिला. सकाळपासून पोटात काही नव्हते मात्र त्यामुळे चहा पिऊन खूप तरतरी आली.वकील साहेबांचा निरोप घेऊन मसूरच्या दिशेने चालू लागलो. साखर कारखाना पासून मसूर चार किलोमीटर अंतरावर राहिले होते. मात्र हे चार किलोमीटर आता खूप लांब वाटत होते. सलग दोन दिवस चालणे झाल्यामुळे पाय खूप दुखत होते. पाय वर उचलत नव्हता. मात्र माउली नामाचा गजर करत असल्यामुळे पुन्हा ताकद आली आणि नऊच्या सुमारास मसुरचे एसटी स्टँड दिसू लागले. आनंदाला पारावर उरला नाही.
आमचे मसूरचे पुढारीचे प्रतिनिधी दिलीप माने तिथे आमची वाटच पाहत होते. त्यांच्या घरी जाण्याचा नियोजन होते. दरम्यान रस्त्याकडेला घिसाडी समाजातील हे कुटुंब काम करताना पहावयास मिळाले. ऐरणीवर तापलेला लोखंडाचा गोळा ठेवून त्याला कुराडीचा आकार देण्याचे काम सुरू होते. एक भाऊ हातात सांडशी घेऊन दाराच्या आत ठेवलेल्या लोखंडाचा तुकडा बाहेर काढतो, तो ऐरणीवर ठेवतो.दुसरा भाऊ घनाने त्यावर जोरात धाव मारत होता. त्याच वेळेला त्यांची 60 ते 65 वर्षाचे आई त्यांच्या मदतीला आल्या आणि सर्वांनी मिळून हे काम सुरू ठेवले. या लोकांचे कष्ट पाहून मला खूप प्रेरणा मिळाली.कष्टाशिवाय यश नाही आणि कष्टाला पर्याय नाही हे ही जाणवले. आमच्याकडे करवडी मधील घराशेजारी मी दहावी अकरावीला असताना अशाच प्रकारचे एक कुटुंब झाडाखाली राहायला आले होते. दिवसभर हे कुटुंब काम करत असे. कुराडी, खुरपी अशी शेतकऱ्यांना आवश्यक असणारे हत्यारे हे लोक करून देत असत. या कुटुंबात एक गर्भवती महिला होती. ती गर्भवती महिला पोटात बाळ असूनही दिवसभर लोखंडी घन उचलून तो मारत असे. ह्या महिलेला ती ताकद कशी मिळत असेल याची मला त्यावेळी सुद्धा अप्रूप वाटले होते. खरंतर गर्भवती महिलांनी काम करायचे नसते मात्र ही महिला अतिशय अवघड असे काम करत होती. दिवसभर त्या महिलेला काम करताना मी पाहिले होते दुसऱ्या दिवशी ही महिला बाळंतीन झाली होती. तिने एका बाळाला जन्म दिला होता. म्हणजेच मुलाला जन्म देण्याच्या आदल्या दिवसापर्यंत या माउलीने केलेले कष्ट मी स्वतः डोळ्याने पाहिले होते. तो क्षण मला आज आठवला.
माने सरांच्या घरी गेल्यानंतर त्यांचे कुटुंबाने आमचे प्रेमाने स्वागत केले. माने सर यांच्या कुटुंबाशी माझा अतिशय जुना ऋणानुबंध आहे. सरांच्या लेकीने आमच्यासाठी अतिशय सुंदर असा व्हेज कटलेट ही डिश तयार केली होती तर माने वहिनी यानी नंतर साजूक तुपातला शिरा करून आम्हाला खायला घातला. मन तृप्त झाले आणि पोटही भरले. माने सरांच्या घरात पोहोचल्यानंतर खूप आनंद झाला. त्यांच्या घरी खूप वर्षानंतर पोहोचलो गेलो होतो, गप्पा मारल्या. सरांच्या दारात घराच्या दारात आंब्याचे एक झाड लावायचे होते, हे झाड माऊलींच्या हस्ते लावले लावावे अशी त्यांनी शेवटी केली. माने सरांनीअगोदरच काढून ठेवलेल्या खड्ड्यात मी वृक्षारोपण केले तर सूर्वेआप्पानी माती घातली आणि अशोक मोहने यांनी पाणी घातले. पंढरीच्या वारीच्या पहिल्या दिवशीची वृक्षारोपणाची ही आठवण माझ्या आयुष्यभर लक्षात राहील.
अन्नदाता सुखी भव असे मनातून भावना आले आणि त्यानंतर माने सरांच्या घरातून बाहेर पडलो.
मसूर मधल्या विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले. परत यायला निघालो तर जिल्हा परिषद सभापती मानसिंगराव जगदाळे त्यांच्या ऑफिसात बसल्याचे पाहून पाहून थांबावे लागले. जगदाळे साहेबांचे आणि माझे संबंध प्रेमाचे आहेत. त्यांच्यासोबत चहा घेतला, गप्पा मारल्या. मसूर ते कराड हा प्रवास आमचा कार मधून होणार होता..माने सर आम्हाला कार मधून सोडायला कराडला आले.आज 14 किलोमीटर एवढे कराड ते मसूर अंतर चालून पूर्ण झाले होते. काल करवडी,कराड पंधरा किलोमीटर अंतर झाले होते. माऊलीच्या आळंदी ते पुणे असे तीस किलोमीटर अंतर दोन दिवसात पूर्ण झाले माझी वारी चा पहिला दिवस अशा पद्धतीने अतिशय आनंदात पार पडला.
*राम कृष्ण हरी.*
Karawadikarad.blogspot.com