विस्कळीत आघाड्यांतील "सेटलमेंट'
27 नोव्हेंबर रोजी होऊ घातलेल्या कराड नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी कराड शहरात ओढून-ताणून एकत्र आलेल्या, वैयक्तिक द्वेषापोटी वेगळ्या झालेल्या नेत्यांच्या आणि विरोधाला विरोध म्हणून तयार झालेल्या आघाड्यांमध्येच सामना रंगणार आहे. 5 वर्षे गुण्यागोविंदाने सुख - दु:खाच्या वाटणीत एकत्र राहिले, तेच आता लोकशाही नव्हती एकाधिकारशाही होती असे म्हणत जनशक्तीचा नारा देत विरोधात उभे ठाकले आहेत. केंद्रात व राज्यात सत्ता असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या गोळाबेरीज नेत्यांनी भविष्यातील सत्तेचा लाभ डोळ्यासमोर ठेवून एकत्र येण्याचा देखावा केला आहे. शिवसेनेनेही आम्ही "संपलोय पण संपलेलो नाही' असा केविलवाणा प्रयत्न करत कसेबसे उमेदवार जमवले आहेत. एम आय एम , बहुजन रिपब्लीकन सोशालिस्ट पार्टी, कराड शहर नागरी विकास या पार्ट टाईम आघाड्या नाही म्हणायला उभ्या आहेत ! माजी मुख्यमंत्र्याचा वैयक्तिक करिश्मा वगळता कॉंग्रेस शून्य आहे.

नगरपालिका निवडणुकीसाठी सत्ताधारी लोकशाही आघाडीने नगराध्यक्ष पदासहीत अन्य 22 जागांवर उमेदवार दिले आहेत. आ. बाळासाहेब पाटील यांचे नेतृत्व मानणारी लोकशाही आघाडी शहरातील सर्वात मोठी आघाडी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शहरात ज्येष्ठ नेते पी.डी. पाटील यांना मानणारा आणि निवडणुकीतही त्याच्या पाठीशी राहणारा 35 टक्के मतदार आहे. हा मतदार संपूर्ण शहरात विभागलेला आहे.
2001, 2006, 2011 मध्ये झालेल्या सर्वच निवडणुकीत लोकशाही आघाडीने कोणाची तरी साथ घेत सत्ता काबिज केली आहे. 2001 साली थेट जनतेतून शारदा जाधव नगराध्यक्षा झाल्या. मात्र लोकशाही आघाडी आणि नगरविकास आघाडीक एकत्र येऊन 16 जागांवर विजयि झाले होते. 2006 मध्ये लोकशाही आघाडी स्वतंत्र लढली आणि 12 जागांवर विजयी झाली. डॉ. अतुल भोसले यांच्या 3 आणि एका अपक्षांचा पाठींबा घेऊन ही आघाडी अडीच वर्षे सत्तेत राहिली. 2011 मध्ये जजनशक्ती आघाडीमध्ये फुट पडून राजेंद्रसिंह यादव यांचा गट लोकशाहीला मिळाला आणि 21 जागा जिंकून ही आघाडी पुन्हा सत्तेत आली. या तिन्ही निवडणुकींचा विचार करता सत्तेत येण्यासाठी आवश्यक 15 ते 20 टक्के मतांचा आधार लोकशाही आघाडीला इतरांकडून घ्यावाच लागला आहे.
5 वर्षांचा सुखाचा संसार सोडून लोकशाही आघाडीतून राजेंद्रसिंह यादव आणि जयवंत पाटील ययांचा गट आज पुन्हा जनश्नतीला जाऊन मिळाला आहे. 2011 साली 18 जागांवर उमेदवार उभे करून लोकशाहीचे 16 उमेदवार विजयी झाले होते. तर याच आघाडीच्या बॅनरखाली राजेंद्रसिंह यादव यांना मानणारे 5 सदस्य विजयी झाले होते. आज लोकशाही आघाडीने 22 जागांवर उमेदवार देताना तडजोडी स्विकारल्या आहेत. धक्कादायक निकालापेक्षा सन्मानाने थांबण्याचा निर्णय घेताना सुभाषराव पाटील यांनी किंगमेकरची भूमिका स्विकारली आहे.
ताकद असूनही किंवा वर्षानुवर्षे त्याच्या गटाशी एकनिष्ठ अनेक कुटुंबे असतानाही प्रभाग क्र. 6 आणि 10 मध्ये त्यांनी उमेदवार दिलेले नाहीत. प्रभाग क्र. 8, 9 आणि 11 प्रभागात एक-एकच उमेदवार दिला आहे. यादव आणि पाटील यांनी 5 वर्षे हेवा वाटेल असा संसार केला आहे. मनाने एकत्र असलेले हे दोन्ही गट पाच वर्षांत सर्वच चांगल्या - वाईट गोष्टीत समान भागीदार होते. तत्याच्यावर लक्ष ठेवायला किंबहुना सुख-दु:खाच्या भागीदारीत जयवंत पाटील हे सोबत होते. सुभाषराव पाटील, राजेंद्रसिंह यादव, जयवंत पाटील या तिघा नेत्यांनी भांडणे न करता कारभार केला. आज प्रभाग 10 मध्ये राजेंद्रसिंह यादव तर प्रभाग 8 मधून जयवंत पाटील उभे आहेत. या दोन प्रभागांत लोकशाही आघाडीला सक्षम उमेदवार देता आला असता पण का दिला नाही ? याची कारणे कराडकरांना चांगलीच ठाऊक आहेत.
जयवंत पाटील आणि राजेंद्रसिंह यादव लोकशाही आघाडीला कदापिही सोडून जाणार नाहीत, अशी खात्री सुभाषराव पाटील यांना होती. त्यामुळेच बेरजेचे राजकारण करत सुभाषकाकांनी दोघांशीही चांगले संबंध ठेवले. शेवटच्या टप्प्यात जयवंत पाटील आणि सुभाषकाका यांचे संबंध फारच ताणले. मात्र यादव आणि सुभाषकाका यांचे सलोख्याचे संबंध राहिले. भविष्ङ्माकत राजेंद्रसिंह यादव यांच्या ताकदीचा फफायदा घेता यावा. नगराध्यक्ष एका गटाचा आणि बहुमत दुसऱ्या गटाचे अशी परिस्थिती निर्माण झाली तर यादव-पाटील युती पुन्हा करणे सोपे व्हावे या दृष्टीने राजेंद्रसिंह यादव यांच्या विरोधात लोकशाहीने उमेदवारी न ददिल्याची चर्चा आहे.
प्रभाग क्र. 6 मधून उभ्या असलेल्या शारदा जाधव यांचा पाठींबा, जुने संबंध आणि ताकद विचारात घेऊन लोकशाहीने येथे थांबणेच पसंत केले आहे. राजेंद्रसिंह यादव आणि अरुण जाधव यांच्या गटानेही प्रभाग क्र.4 आणि 1 मध्ये लोकशाही आघाडीच्या उमेदवाराविरोधात त्यामानाने सक्षम उमेदवार दिलेले नाहीत. यादव -जाधव आणि सुभाषकाका यांच्या पडद्यामागील तडजोडीची कराडात चर्चा सध्या आहे. प्रभाग 4 मधून आप्पा माने यांच्या उमेदवारीसाठी जयवंत पाटील यांचा आग्रह होता. पण अशोकराव पाटील यांचे नाव पुढे आले.आप्पा माने यांना उमेदवारी न दिल्यास जबाबदारी घेणार नाही, असा पवित्रा जयवंत पाटील यांनी घेतला होता. अशोक पाटील यांच्या उमेदवारीमुळे जयवंत पाटील मोकळे झाले आहेत. ते आता चार मध्ये फार लक्ष घालणार नाहीत. प्रभाग क्र. 8 मधून लोकशाही आघाडीला सागर बर्गे यांच्या रुपाने मनसेचा उमेदवार आयात करावा लागला. जयवंत पाटील यांच्या विरोधात सक्षम उमेदवार न मिळाल्याने लोकशाहीला हा निर्णय घ्यावा लागला, अशी चर्चा शहरात आहे.
प्रभाग क्र. 11 मध्ये जनशक्ती आघाडीच्या स्मिता हुलवान यांच्या विरोधात लोकशाहीने उमेदवार दिलेला नाही. प्रभाग क्र. 5 प्रमाणेच 11 मध्येही लोकशाहीला उमेदवार आयात करता आला असता. मात्र स्मिता हुलवान यांच्या मुळे गेल्या 5 वर्षांत झालेला त्रास पाहता त्यांना पराभूत करण्यासाठीच सुभाषराव पाटील यांनी आताचे विरोधक (15 दिवसांपूर्वीचे लोकशाहीचे घटक) आणि जनशक्तीकधील घटकांशी जुळवून घेत हुलवान यांच्या विरोधात उमेदवारी दिलेली नाही. यादव आणि पाटील यांचा 5 वर्षांच्या संसारातील कडू-गोड आठवणींचा उमेदवार देताना विचार केला गेला आहे, असे कराडकर उघडपणे बोलत आहेत.
"धरलं तर चावतंय.. सोडलं तर पळतंय..' अशी अवस्था माजी मुख्यामंत्री पृथ्वीराज चव्हाण गटाची झालेली आहे. वास्तविक कराड शहरात पृथ्वीराज चव्हाण यांना मानणारा, त्याच्यावर प्रेम करणारा फार मोठा वर्ग आहे. पण हा वर्ग म्हणजे कॉंग्रेस पक्ष नव्हे . कॉंग्रेस पक्षाचे पृथ्वीराज चव्हाण यांच्याबरोबर असणारे आठ- दहा जे लोक आहेत, ते फक्त पृथ्वीराज चव्हाण यांचा फायदा घेण्यासाठीच आहेत, हे कटू सत्य आहे. राज्यभर कार्यकर्ताचा उपयोग ( वापर ) करून घेणारे हजारो लोकप्रतिनिधी आहेत. पण लोकप्रतिनिधी (पृथ्वीराज चव्हाण) यांचा वापर करून घेणारे अनेक जण कराडात आहेत. या लोकांनी बाबा मुख्यमंत्री असताना त्याचा फायदा घेतला. पण कॉंग्रेस पक्ष वाढीचा कधीच प्रयत्न केला नाही. त्यामुळेच इच्छा असूनही पृथ्वीराज चव्हाण यांना कॉंग्रेस चिन्हावर निवडणूक लढविण्याचा निर्णय मागे घ्यावा लागला.
पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जनशक्तीतच्या झेंड्यावर अरुण जाधव, राजेंद्रसिंह यादव आणि जयवंत पाटील एकत्र आले आहेत. या तिघांनाही बाबांच्या नेतृत्वाखाली एकत्र यायला कधीच अडचण वाटत नाही. मात्र कॉंग्रेसच्या झेंड्याखाली आलो तर बाबांचे सोडून इतरांचेच ऐकावे लागेल. पालिकेचा कारभार नको त्यांच्या हातात जाईल. याची पूर्ण जाणीव असल्यानेच कॉंग्रेसच्या चिन्हावर लढण्यास या तिघांनीही नकार दिला. दिवाळीच्या तोंडावर जिल्ह्यातील सर्व निवडणुका हाताच्या चिन्हावरच लढाव्यातत, असा आग्रह आणि दबाव कॉंग्रेस श्रेष्ठींकडून वाढत होता. पृथ्वीराज चव्हाणांनी तो निर्णय घेण्याचे निश्चितही केले. मात्र त्यावेळी त्याच्यासोबत हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच लोक राहिले (छाननीवेळी त्यांची नावे कळली ). पृथ्वीराज बाबा चालतात मात्र चिन्ह नको, असा विचार असणाऱ्या जाधव-यादव-पाटील यांच्या आघाडीने पुन्हा एकदा दुसरीकडे बोलणी सुरू केली आणि मनात नसतानाही पृथ्वीराज चव्हाण यांना जनशक्ती आघाडीसोबत फरपटत जावे लागले. वास्तविक मुख्यमंत्री असताना त्यांनी भरपूर निधी दिला. मात्र कॉंग्रेस पक्ष वाढविण्यासाठी कधीच लक्ष दिले नाही. ही जबाबदारी त्यांनी बगलबच्च्यांवर सोपविली. मात्र या बगलबच्च्यानी स्वत:चा फायदा करून घेतला. विधानसभा निवडणुकीवेळी कॉंग्रेस पक्षावर असलेल्या प्रेमापोटी नव्हे तर पृथ्वीराज चव्हाण ययांनी दिलेल्या भरभरुन निधीच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी कराडकरांनी हाताला मतदान केले. मात्र तो हात पालिकेच्या निवडणुकीत आणण्याची संधी पृथ्वीराज चव्हाण यांना बगलबच्च्यानी केलेल्या चुकांकुळे गमवावी लागली.
कराडात डॉ. अतुल भोसले, शेखर चरेगांवकर आणि विक्रम पावसकर यांच्या रुपाने दिलेल्या सत्ताकेंद्रांच्या माध्यमातून फिडबॅक घेण्यासाठी पहिल्यापासूनच भारतीय जनता पक्षाने पक्षचिन्हाचा आग्रह धरला. पक्षाचे चिन्ह डॉ. अतुल भोसले यांच्या उमेदवारीने विधानसभेवेळी दक्षिणेत पोहोचले होते. मात्र शहरात कमी पडले होते. तरीही शहरातून मिळालेली 10 हजारांच्या घरातील मते भाजपसाठी जमेची बाजू होती. मनात नसुनही मन न जुळणारे भाजपचे नेते कराडात एकत्र आले. नगराध्यक्ष पदासहित 15 जागांवर त्यांनी उमेदवार कसेबसे उभे केले आहेत. मात्र या पक्षांलाही जनशक्ती आणि लोकशाही आघाडीप्रमाणेच अंतर्गत तडजोडी केल्याचे उमेदवारांवरून लक्षात येते. ब्राम्हण बहुल्य प्रभाग क्र. 4 व 5 मध्ये ब्राम्हण समाजाचा उमेदवार न देता प्रभाग क्र. 1 मध्ये या समाजाचे दोन-दोन उमेदवार देऊन भाजपाने काय साध्य केले ? हे न कळण्याइतपत कराडकर नकीच खुळे नाहीत.
भारतीय जनता पार्टी कराडचे नाव पावसकर जनता पार्टी द्यावे लागेल. लोणंदमध्ये भाजपचा झेंडा लावणाऱ्या जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांना जिल्ह्यात भाजप सक्षम करण्याची द्वारे खुली असताना ते कराडात का अडकले आहेत? हा प्रश्न पडतो. भाजपाच्या जुन्या निष्ठावंताना टाळून जवळच्या लोकांना जवळ करताना भाजपानेही कॉंग्रेसच्याच पावलावर पाऊल ठेवले आहे काय ? असे संघप्रेमी बोलून दाखवत आहेत. एकाच घरातील 4 जणांना तिकिट देऊन भाजपने आमच्याकडे सक्षम माणसे नाहीत हेच जणू मान्य केले आहे. नाही म्हणायला 13 आणि 14 प्रभागात सोशल इंजिनिअरिंगचा भाजपने प्रयत्न केला आहे. नगराध्यक्ष पदासाठीही चांगला उमेदवार दिला आहे. वास्तविक नगराध्यक्ष पद जिंकणे हाच भाजपचा अजेंडा आहे.
एकंदरीतच कराड शहरात बिघडलेल्या आघाड्यांतील विस्कटलेल्या नेत्यांचे एकत्रिकरण यातून सत्ता मिळविणे हाच अजेंडा सध्या तरी दिसतोय . जनशक्ती आणि लोकशाही आघाडीला एकमेकांविरोधात बोलायला सध्या तरी कोणताच मुद्दा दिसत नाही. रेंगाळलेली कामे, रखडलेला विकास या गोष्टीला या दोन्ही आघाडीतील तीन नेतेच जबाबदार आहेत. लोकशाही आघाडीसमवेत सुखाने संसार केलेले राजेंद्रसिंह यादव आणि जयवंत पाटील आज एकत्र येऊन जाधवांच्या जनश्नती आघाडीच्या झेंड्याखाली बाबांना येऊन मिळाले आहेत. त्यामुळे जनश्नती आघाडी सत्ताधारी लोकशाही आघाडीचीच झेरॉक्स कॉपी आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
भाजपाच्या आघाडीत असणारे कारभारी पाच वर्षे अनेक महत्वाच्या आणि लाभाच्या प्रसंगी सत्ताधाऱ्या सोबतच होते, हे कराडकरांना चांगलेच ठाऊक आहे. "एकाला बाजूला काढायचा आणि दुसऱ्याला उभा करायचा तर दुसराही पहिल्यासारखाच निघाला, असे म्हणायची वेळ सध्या आली आहे.
(पूर्वार्ध)