कृष्णाकाठ .. सामान्य मुलाची असामान्य कथा !
कृष्णाकाठचे वाचन प्रत्येक शाळेत व्हावे.
यशवंतराव चव्हाण यांचं आत्मचरित्र 'कृष्णाकाठ' ही तमाम साहित्यप्रेमींना आणि यशवंत प्रेमींना लाभलेली सुंदर देणगी आहे. कृष्णाकाठ एका सामान्य मुलाची असामान्य अशी कथा आहे. मी यशवंतराव चव्हाण होणार अशी प्रतिज्ञा करणाऱ्या छोट्या यशवंताची ती मूर्तिमंत सत्य कथा आहे. या आत्मचरित्रावरातून आजच्या पिढीला आदर्श व्यक्तिमत्वाचं दर्शन घडते आणि हा आदर्श आजच्या पिढीला मार्ग दाखवेल. कृष्णाकाठ प्रत्येकाने वाचलेच पाहिजे. कृष्णाकाठचं वाचन केले आहे तोच खरा यशवंत प्रेमी आणि तोच खरा सातारकर आहे,असे मी मानतो.
कृष्णाकाठ मी महाविद्यालयीन काळात पहिल्यांदा वाचली. त्यानंतर पुन्हा एक दोनदा संदर्भासाठी ही कादंबरी वाचून झाली आहे .मात्र कृष्णाकाठचे माझे प्रेम अजूनही कमी झालेले नाही. यशवंतराव चव्हाण यांचे आणि कराडचे दृढ नातं आहे. यशवंतराव चव्हाण यांचे विचार टिकवणारा, वाढवणारा आणि रुजवणारा एकमेव कराड तालुका आहे, असे मला वाटते. कराड तालुक्यातील आजचे सुसंस्कृत राजकारणी यशवंतराव चव्हाणांचा शंभर टक्के आदर्श घेत नसतील किंवा त्यांच्या वाटेवर चालत नसतील खरे पण 70% तरी ते त्यांचा अनुकरण करतात. या अगोदर होऊन गेलेले अनेक लोकप्रतिनिधी यशवंतराव चव्हाण यांचे मूर्तीमंत अनुयायी होते. यामध्ये मी ज्येष्ठ नेते पी डी पाटील विलासराव पाटील उंडाळकर, संभाजी बाबा थोरात यांची प्रामुख्याने नावं घेता येतील.
1984 साली यशवंतराव चव्हाण साहेबांच्या निधनानंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार कुठे करावेत याबाबत वाद सुरू असताना पी डी पाटील साहेब यांनी ती जबाबदारी घेतली आणि कराडच्या प्रितीसंगमावर चव्हाण साहेबांचे अंत्यसंस्कार झाले. त्यानंतर चव्हाण साहेबांच्या इच्छेनुसारच तिथं सुंदर अशी बाग उभी राहिली. या बागेचा इतिहास यापूर्वी मी अन्यथा लिहिलेला आहे. चव्हाण साहेबांचे विचार आणि चव्हाण साहेब काय होते हे पहायचं असेल तर कराडच्या वेणूताई चव्हाण स्मारकाला अवश्य एकदा भेट द्यावी, त्याचबरोबर चव्हाण साहेब जिथे राहत होते त्या विरंगुळा बंगल्यालाही भेट द्यावी. गरीब कुटुंबातला सामान्य मुलगा शिक्षणासाठी कराडला येतो, वार लावून जेवतो. शिक्षणासाठी त्यांची आई घर विकते जमीन विकते. पुढे हा मुलगा महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी कोल्हापूरला जातो. पुणे मुंबई असा प्रवास करून तो मुलगा हळू हळू राजकारणात स्थिरावतो, समाजकारणात मोठा होतो आणि संयुक्त महाराष्ट्राचा पहिला मुख्यमंत्री होतो. देवराष्ट्रे किंवा ढवळी हे गाव पाहिले तर या गावातला मुलगा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊ शकतो हे कोणालाही पटणार नाही. खरंतर या छोट्याशा गावातील मुलगा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊ शकतो, हे पटत नाही. पुढच्या काळात तो युवक देशाच्या राजकारणात स्थिरावतो. अर्थमंत्री, संरक्षण मंत्री, परराष्ट्रमंत्री आणि उपपंतप्रधानपणापर्यंत झेप घेतो. महाराष्ट्राला कधीही पंतप्रधान पदाच्या उंची गाठता आली नाही परंतु किमान त्या उंचीपर्यंत जवळ जाण्याचे कर्तृत्व फक्त यशवंतराव चव्हाण यांनी केलं आहे.
अशा या यशवंतराव चव्हाण यांचे कृष्णाकाठ या आत्मचरित्राचे मी वाचन केल्यानंतर हे आत्मचरित्र सर्वांनी वाचावे असे मला नेहमीच वाटत असते. पुढारी कार्यालयामध्ये अनेक मान्यवर भेट देतात या मान्यवरांचे स्वागत गेल्या अनेक वर्षापासून मी कृष्णाकाठ देऊनच केले आहे. कराड शहरातील आलेले कलेक्टर दर्जाचे अधिकारी किंवा पोलीस उपाधीक्षक असो किंवा पोलीस अधिकारी असो या सर्वांचं स्वागत मी कृष्णाकाठ देऊनच करतो.
कृष्णाकाठ या आत्मचरित्रावर माझं विशेष प्रेम आहे आणि या प्रेमातूनच या कादंबरीचे प्रत्येक शाळेत वाचन झालं पाहिजे असं मला नेहमी वाटत होतं. मध्यंतरी एक वर्षांपूर्वी बनवडी कॉलनी येथील जागृती विद्यामंदिर येथे जाण्याचा योग आला होता. या ठिकाणी कार्यक्रम संपल्यानंतर शंकरराव खाते बापू आणि त्यांचे संचालक मंडळ तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक यांच्यासमोर मी एक कल्पना बोलून दाखवली.आपल्या शाळेत कृष्णाकाठ या कादंबरीचे वाचन करा आणि या आत्मचरित्रावर आधारित प्रश्नमंजुषा किंवा वकृत्व, शनिबंध स्पर्धा घ्या. यामध्ये जे मुले भाग घेतील आणि यशस्वी होतील त्यांना अमिताभ बच्चन प्रेमी ग्रुपच्या वतीने आणि माझ्या वतीने मी बक्षीस देण्याचा प्रयत्न करेन ही गोष्ट मी बोलून गेलो. याला आता एक वर्ष होऊन गेलं असेल मात्र त्यानंतरच्या काळात शाळेतील शिक्षक वर्गानी माझी सूचना मनात कोरून ठेवलेली होती. 12 मार्च 2024 यशवंतराव चव्हाण साहेबांची जयंती. तत्पूर्वी गेले तीन महिने या शाळेत कृष्णाकाठ या आत्मचरित्राचे वाचन करण्यात आले. रोज शाळा सुरू होताना या आत्मचरित्रामधील दोन तीन पाने विद्यार्थ्यांनी वाचली व समोर उपस्थित विद्यार्थ्यांनी ऐकली. या आत्मचरित्रावर आधारित प्रश्नमंजुषा, वक्तृत्व आणि निबंध स्पर्धा गेल्या आठवड्यात घेण्यात आल्या. या निबंध स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ 12 मार्च रोजी माझ्या अक्षरगुरु जगन पुरोहित यांच्या प्रमुख उपस्थितीत शाळेत पार पडला.
आमच्या अमिताभ बच्चन प्रेमी ग्रुपच्या वतीने आणि माझे वडील वसंतराव सखाराम मोरे यांच्या 91 वाढदिवसा निमित्त यशस्वी दहा विद्यार्थ्यांना रोख रक्कम आणि सर्टिफिकेट देण्यात आले. तब्बल १२० विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. शाळेचे मुख्याध्यापक सुधाकर चव्हाण तसेच त्यांचे इतर सहकारी आणि क्रीडा शिक्षक संजय शिंदे यांनी या कामी फार परिश्रम घेतले. शंकरराव खापे बापू ही बनवडी गावाला मिळालेली एक देणगी आहे. त्यांनी हे गाव आदर्श केले आहेच त्याबरोबरच जागृती विद्यामंदिरच्या नाव माध्यमातून एक अतिशय सुंदर असे शैक्षणिक संकुल उभं केले आहे. या शाळेत माझं जाणे येणे होतं.या शाळेत चव्हाण साहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने काल जाता आले आणि या सर्व विद्यार्थ्यांशी मला संवाद साधता आला हे मी माझे भाग्य समजतो.
चव्हाण साहेबांच्या कृष्णाकाठ या कादंबरीचे वाचन कराड तालुक्यातील नव्हे तर जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत झाले पाहिजे आणि त्या त्या परिसरात असणाऱ्या यशवंतप्रेमी व्यक्तीनी त्या शाळेत जाऊन त्या विद्यार्थ्यांना पाठीवर थाप टाकून त्यांचा गौरव केला पाहिजे, त्यांना बक्षीस दिले पाहिजे, असे माझे ठाम मत आहे. मी या निमित्ताने आपणा सर्वांना आवाहन करतो आपल्या परिसरात असणाऱ्या शाळेस भेट द्या आणि त्या शाळेत कृष्णाकाठ या कादंबरीचे वाचन करावयास शिक्षकांना विनंती करा. यशवंतराव चव्हाण यांचे प्रेरणास्थळ प्रीतिसंगम येथे आपल्या भागातील विद्यार्थ्यांना घेऊन जावा, त्यांना चव्हाण साहेबांचा इतिहास सांगा. यशवंतरावांचे विचार या पुढील काळाची जतन करण्यासाठी पुढच्या पिढीसाठी आपण एवढं तर नक्कीच करू शकतो.
सतीश वसंतराव मोरे सतिताभ
9881191302
ग्रेट..... भारीच
उत्तर द्याहटवा