फॉलोअर

२६ फेब्रुवारी २०२५

खेळ मांडला


*चाकावर खेळ मांडला..* 
*व्यवस्थेचा...शिक्षणाचा आणि परिस्थितीचा...!*

सायंकाळी चारची वेळ असेल.. माझं काम आटोपून शेतात पाच मिनिटं जाऊन यावं म्हणून करवडीला गेलो होतो. शेतात जाऊन आलो, बाहेर रस्त्यावर उभा राहिलो. शेतासमोरच मोकळ्या जागेवर एका साखर कारखान्याची टोळी (फड) होती. या फडामध्ये झोपड्या (खोपा) मांडल्या होत्या. अर्थातच टोळीतील तोडकरी कुटुंब शेतात ऊस तोडायला गेले होते. 

या कष्टकरी कुटुंबाचा दिनक्रम आपल्यासारख्या पोट सुटलेल्या लोकांसारखा नसतो.  लेकरांवर त्यांचं फार प्रेम असतं. पण पोटाची खळगी भरण्यासाठी पहाटे चार पासून ही कुटुंब कामावर जातात. कामावर जाताना सारा स्वयंपाक करून ठेवला जातो. लहानग्या पोरा बाळांना कामावर नेता येतं किंवा कधी कधी नेता येत नाही. ती पोरं भगवान भरोसे त्या झोपड्यामध्ये सोडून ही कुटुंबं ऊस तोडायला जातात. मग या चिमुकल्या पोरांची जबाबदारी पडते त्यातल्या त्यात आठ दहा वर्षाच्या मोठ्या मुलांवर.  

अशीच अकाली पालकत्व आलेली दोन मुलं आणि एक मुलगी या फडावर होती. या तीन मुलांच्याकडे एकच काम होतं त्या झोपड्यांमध्ये असलेल्या छोट्या छोट्या मुलांची काळजी घ्यायची, त्यांना खाऊ घालायचं, त्यांना आधार द्यायचा, त्यांना खेळवायचं. हे काम त्यांनी चोख पार पाडलं होतं. खोपीमध्ये जे काय आहे ते खाऊन ही पोरं आता एक झोप काढून बाहेर पडली होती. सूर्याची प्रखर किरणे हळू कमी होऊ लागली होती आणि याच कालावधीत ही छोटी मुले झोपडी बाहेर आली. आणि  त्यांनी एक खेळ मांडला.

 शहरांमध्ये आपण व्हील चक्र, जायंट व्हिल किंवा मोठा झोपाळा पाहिला असेल. पण या शेतमजुरांच्या मुलांना कुठून मिळणार असला  झोपाळा ? एवढे पैसे कुठे आहेत त्यांच्याकडे? त्यांना जत्रेत जायला मिळेल? ? मुलांना घेऊन जत्रेला जावं ,त्यांना गोड गोड खाऊ घालावं, त्यांना जत्रेत फिरवावं? चिरमुरे द्यावेत? एवढा वेळ कुठे आहे त्यांच्या पालकांकडे ? मुलांना खाऊ घालण्यासाठी काम केले पाहिजे, कष्ट केले पाहिजे या एकाच उद्देशाने त्यांचे पालक शेतात ऊस तोडणी करत होते. 

तिथे एक बैलगाडी उभी होती. तर दुसरीकडे बंद पडलेली एक बैलगाडी होती. या बैलगाडीचे चाक काढलेले होते. बैलगाडीचे चाक एका उंचीवर मांडून यांच्या आई-वडिलांनी तिथे एक चक्र तयार केलेले होते. या चक्रावर बसून मग या मुलांनी खेळ मांडला. तिथे चार पाच छोटी छोटी मुलं होती . त्यांच्या अंगावर साधे कपडेही नव्हते. ही मुलं या चकरावर बसली. त्यांच्यातला एक थोरला मुलगा ते चक्र गोल गोल फिरवत होता. दुसरी एक मुलगी त्या छोट्या छोट्या मुलांना त्या चक्रावर बसवत होती आणि मग खेळ सुरू झाला..

काय आनंद होता या गोष्टींमध्ये काय सांगू...! ‌ किती निष्पाप मुलं होती ती.. इवलीसी...आहे त्या गोष्टींमध्ये आनंद मानत तो आनंद लुटण्याचा प्रयत्न सुरू ठेवला होता. गोल गोल चक्र फिरल्यानंतर एक छोटीशी मुलगी खाली पडली. तिला उचलून एका मुलाने उभे केले. पुन्हा खेळ सुरू झाला. ती मुलं ओरडत होती, कोणी रडत होती, कोणी हसत  होती,आनंद लुटत होती आणि मी शांतपणे ते पाहत होतो.

लहानपणी असा खेळ आम्ही पण केलेला होता. पण तोडकरी कुटुंबातील मुलांचा हे खेळ पाहून मन हेलावलं. यातील एका दोघा मुलांना विचारलं तुम्ही शाळेत जाता का ? दोघांनी एका सुरात एकच उत्तर दिले.. 'आम्हाला शाळा काय माहित नाही .. शाळेत आम्ही कधी गेलोच नाही. '... ऊस तोडणी कामगारांची मुले जर शाळेत जात नसतील तर त्यांना भविष्य कसे चांगले असणार...? त्यांनी पण आपल्या आई-वडिलांच्या मागे  फक्त ऊस तोडत बसायचे काय ?

सोबतचा हा व्हिडिओ पाहताना जेवढा आनंद होत होता, तेवढेच ही मुलं शाळेत जात नाहीत  हे ऐकल्यानंतर डोळ्यातून पाणी येत होते...! काय करू शकतो आपण या मुलांसाठी ...?  बाजूला आलो आणि लेखणीच्या माध्यमातून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली...!तुम्हाला भेटायला दोन दिवसानंतर पुन्हा येतो... असं वचन देऊन तिथून निघालो....!

आपण काय करू शकतो का या मुलांसाठी ? ज्यांच्या अंगावर कपडेही नाहीत... ज्यांना शिक्षण काय माहित नाही... ज्यांना पुस्तकं वह्या काय असतं याची माहितीही नाही...!

*सतीश वसंतराव मोरे सतिताभ*
9881191302

Featured Post

ना बोलना जरूरी है

*अंतरंग* *'ना बोलना बहुत जरुरी है'* अग्निपथ चित्रपटातील विजय दिनानाथ चौहान ( अमिताभ बच्चन ) हे कमिशनर गायतोंडे (विक्रम गोखले) यांच...